महेश एलकुंचवारांची नाटकं आमच्यासमोर हाडामांसाची जिवंत रसरशीत पात्रं उभी करतात, आम्हाला श्रीमंत करतात
पडघम - साहित्यिक
ओंकार गोवर्धन
  • ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Tue , 30 March 2021
  • पडघम साहित्यिक महेश एलकुंचवार महाराष्ट्र फाउंडेशन

महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिकाचे २०२० सालचे साहित्य व समाजकार्यासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे. करोनामुळे यंदा पुरस्कार प्रदान सोहळा जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपात होणार नसला तरी या पुरस्कारांची माहिती देणारी स्मरणिका फाउंडेशनतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील एलकुंचवारांविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार मिळणं ही फार आनंद देणारी गोष्ट आहे. आपल्या आवडत्या नाटककाराला सन्मानित केलं जाणं; भारतातल्या मोठ्या, महत्त्वाच्या नाटककाराला सन्मानित केलं जाणं; आणि आपल्या लेखनातून कायमच जगण्याच्या उत्कटतांचा वेध घेणाऱ्या नाटककाराला जीवनगौरव पुरस्कार मिळणं; असे अनेक आनंद यात सामावलेले आहेत. महेश एलकुंचवार हे कायमच आपल्या सर्व लेखनातून; नाटक, ललितबंध, भाषांतर या सगळ्यांमधून जगण्याचा, नात्यांचा, माणसांचा आणि स्वत:चा शोध घेत आलेले आहेत. किंबहुना संपूर्ण उत्कटतेने जगणं हाच त्यांचा अग्रक्रम राहिलेला आहे. लेखन हे जगण्याचं बाय-प्रॉडक्ट असल्याचं ते कायम म्हणतात.

स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीचे महत्त्वाचे नाटककार म्हणून आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. परंपरांच्या ठाम अधिष्ठानावर आपली मांडणी करणं हा या पिढीचा एक महत्त्वाचा विशेष आहे. पण यातही महेश एलकुंचवार वेगळे उठून दिसतात ते त्यांच्या आत्मस्वरामुळे. अगदी पहिल्या ‘सुलतान’ या एकांकिकेपासून ते २०१९ साली मौजेत आलेल्या ‘बिंदुनादकलातीत’ या ललित लेखापर्यंत हा आत्मस्वर कायमच जाणवत आलेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या एकांकिकांमध्ये, नाटकांमध्ये हा स्वर तीव्र आहे, बोचरा आहे. पाहणाऱ्याबरोबरच लिहिणाऱ्यालाही हा स्वर रक्तबंबाळ करत असावा असं वाटत राहतं. या नाटकांमधली त्यांची पात्रं आपल्या असण्याच्या शोधात आणि आपल्या असण्याच्या अर्थात अत्यंत तीव्रतेने चाचपडताना दिसतात. या पात्रांमध्ये एक न्यून आहे. काहीतरी आयुष्यव्यापी कमतरता आहे. सल आहे. त्यातली काही पात्र कलाकारही आहेत, पण त्यांना आपली कला, आपले कलाउद्देश अत्यंत खोटे वाटत आहेत. आणि मग याचा परिणाम म्हणून ही माणसं मोठमोठ्या पोकळ गोष्टी बोलून आपला रितेपणा भरू पाहतात, स्वत: विद्ध होत होत दुसऱ्यांनाही रक्तबंबाळ करतात. आतून आणि बाहेरून जखमी होत राहतात. इतकं सगळं असूनही या माणसांना कुठेतरी निकोप, निर्मळ, सत्त्वशील, प्रामाणिक आयुष्य जगण्याची इच्छा आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्यातल्या न्यूनतेमुळे भयग्रस्त आणि कमकुवत झालेल्या या माणसांची शाब्दिक आणि प्रसंगी शारीरिक हिंसा आपल्या अंगावर काटा आणत नाही. ती आपल्याला घायाळ करते. करुण करते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महेश एलकुंचवार आपल्या पात्रांना प्रेम देतात, सहानुभूती देतात, मानवी स्खलनाला कुठलीही आदर्शवादी फूटपट्टी न लावता त्या माणसांना त्यांच्या सर्व गुणदोषांसकट स्वीकारतात. आणि मग हे आर्त दु:ख आपल्याला अस्वस्थ करतं.

याच सुरुवातीच्या नाटकांमध्ये प्रस्थापिततेविरुद्धचा प्रक्षोभ आहे. हीन आणि सवंग अभिरुचीचा धिक्कार आहे. साहित्य, नाट्य आणि एकंदरीतच जीवन-व्यवहारातल्या दांभिकतेला तीव्र आक्षेप आहे. बंडखोरी आहे. मध्यमवर्गीय कल्पनांना सणसणीत धक्के दिलेले आहेत. काही ठिकाणी उघड उपहास आणि कुचेष्टा पण आहे. पण यात फक्त थिल्लरपणे टोप्या उडवणं नाही. किंबहुना हा भाग महेश एलकुंचवार यांच्या संपूर्ण लेखनात कुठेही जाणवत नाही. पण त्यांच्या लेखन पूर्वार्धात आक्रमकता आहे, तीव्र आग्रह आहे. आपल्याच शोधापायी मनात निर्माण झालेली अशांतता आणि विव्हलता इथे सतत ठिबकत राहते. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’ ही या काळातील महेश एलकुंचवार यांच्या नाटकांची काही ठळक उदाहरणं म्हणून पाहता येतील.

यानंतर महेश एलकुंचवार जवळजवळ नऊ वर्षं काहीही लिहीत नाहीत आणि त्यानंतर ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘प्रतिबिंब’ एकामागोमाग एक लिहितात. आणि मग ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’, ‘आत्मकथा’, ‘वासांसि जीर्णानि’, ‘सोनाटा’, ‘एका नटाचा मृत्यू’ ही सर्व नाटकं येतात. या मधल्या वर्षांमध्ये काय झालं याच्याशी आपल्याला अर्थातच कर्तव्य नाही, पण यानंतरच्या त्यांच्या नाटकात ‘असण्या’च्या अर्थाबरोबरच, ‘असण्या’च्या शोधाबरोबरच ‘असण्या’चा स्वीकारही दिसतो. लेखकाने भवतालाला कवेत घेतलं असल्याचं जाणवतं. एकंदरीत वैश्विक पसाऱ्यातली मानवी आयुष्याची मर्यादा आणि तिचं भानही जाणवतं. हा सहनशील स्वीकारही आपल्याला पीळ पाडतो, अनेकदा त्यातून प्रश्नही निर्माण होतात आणि आपण अंतर्मुख होतो. यामध्ये देखील महेश एलकुंचवार यांना पडलेले प्रश्न आहेतच. काही प्रश्न तर तेच आहेत, पण ते आता आणखी मोठा पट पुढे पाहू लागतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्वत:बरोबर वाचकाचं, प्रेक्षकाचं भानही विस्तारतात. ‘वाडात्रयी’पासून तर त्यांच्या परंपराभानाचा पोत किती घट्ट आहे हेही जाणवतं. ‘वाडा चिरेबंदी’मधली पडझड, ‘मग्न तळ्याकाठी’मधला बंधुभाव आणि आर्तता, ‘युगान्त’मधला भयाण वास्तवाचा सहनशील स्वीकार हा याच भूमिका अधोरेखित करतो.

एलकुंचवारांची नाटकं आम्हाला काय देतात? तर मुळात ती आमच्यासमोर हाडामांसाची जिवंत रसरशीत पात्रं उभी करतात. त्या पात्रांची उत्कट सुखदु:खं, तडफड आमच्यासमोर उभी राहते. भावभावनांचा एकसंध आलेख आमच्यासमोर उभा राहतो. त्यांची पात्र नटांपुढे आव्हान उभं करतात, त्यातली नाट्यमयता दिग्दर्शकांना आव्हान देते आणि त्यांच्या नाटकांतून तयार होणारी भावना आणि जाणीव प्रेक्षकांना आवाहन करते. एलकुंचवारांची नाटकं या सर्व पातळ्यांवर आम्हाला श्रीमंत करतात.

मराठीत ललित लेखनाची मोठी परंपरा आहे. या परंपरेचे अनेक प्रकार आहेत. त्यांतला एक प्रकार म्हणजे प्रदीर्घ लेखाद्वारे मुक्तचिंतन साधून काही महत्त्वाची प्रेरणा व जाणीव मांडणं हा होय. हा काहीसा अनवट मार्ग आहे. महेश एलकुंचवार यांनी हाच मार्ग जवळ केलेला आहे. त्यांचा ललितलेख, प्रत्येक ललितलेख हा प्रदीर्घ आहे. यामध्ये शोध आहे, प्रश्न आहेत, क्वचित उत्तरं आहेत; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात अनेक माणसं आहेत आणि त्या माणसांबद्दलची अपार कृतज्ञता आहे. ही माणसं आपल्याला किती श्रीमंत आणि समृद्ध करून गेली, ती नसती तर आपण आज असे नसतो, ही भावना या ललितबंधांचा पाया आहे. यामध्ये प्रत्यक्ष भेटलेली जवळची माणसं तर आहेतच, पण संपूर्ण आयुष्याची दिशाच जणू बदलून टाकणारे काही कलाकारही आहेत. काही अत्यंत कमी काळासाठी भेटलेली, पण मनावर कायमचा खोल परिणाम करून गेलेली माणसं आहेत. त्यांत गाणी आहेत. काही नाटकांतील, पुराणांतील, महाकाव्यांतील, चित्रपटांतील व्यक्तिरेखा आहेत आणि या यातील सर्व पात्रांशी महेश एलकुंचवार यांचा वास्तव आणि कल्पित पातळीवरील मुक्त संवाद आहे. हा संवाद आपल्याला आकर्षून घेतो, अंतर्मुख करतो, तर कधी लख्ख प्रकाश पाडतो.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

यात महेश एलकुंचवार यांची अतिशय लखलखीत अशी भाषा आहे. आपला तोल जराही न हलू देता, फुकाचं अलंकरण न करता नेमका अर्थ तितक्याच नेमक्या शब्दांतून व्यक्त करणारी ही भाषा आहे. एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा इतकं हे समृद्ध भाषाभान आहे. पण असं असूनही केवळ भाषा हा या लेखांचा एकमेव महत्त्वाचा मुद्दा कधीच होत नाही. या लेखांमध्ये महेश एलकुंचवार संगीताबद्दल बोलतात, चित्रांबद्दल बोलतात, परंपरांबद्दल बोलतात, साधनेबद्दल बोलतात, याचबरोबरीने ते दु:खाबद्दल बोलतात, करुणेबद्दल बोलतात, एकुटवाणेपणाबद्दल बोलतात, अध:पतनाबद्दल देखील बोलतात. याच लेखांमध्ये, ‘या जगाशी आपला सूर जुळला नाही की काय’, ‘आपण एकटेच आहोत की काय’, ‘आपण असेच राहणार की काय’ अशी अत्यंत विव्हल करणारी जाणीव पसरून राहिलेली आहे. या चिरंतनाच्या आणि अमूर्ताच्या शोधामुळे आपण एकाच वेळी अस्वस्थ आणि समृद्ध होतो.

महेश एलकुंचवार यांचा भारतीय परंपरांचा, भारतीय संगीताचा, पाश्चात्त्य संगीताचा, चित्रकलेचा, भारतीय तत्त्वज्ञानांचा, उपनिषदांचा असा एकंदरीतच अभ्यास, त्यांचा दृष्टिकोन आणि या सर्व अभ्यासाचे आणि दृष्टिकोनाचे त्यांच्या लेखात येणारे संदर्भ हा एक फार प्रभावी असा भाग आहे. अभिजाततेच्या संस्कारांबरोबर आपलं व्यक्तिमत्त्व कसं घडवावं याचा एक नमुना आपण महेश एलकुंचवार यांच्या सर्व लेखांमध्ये पाहू शकतो.

याला जोडूनच एलकुंचवार यांचा कलाविचार येतो. एलकुंचवारांच्या कलाविचारात साधनेला, तपस्येला अतिशय महत्त्व आहे. शोध घेणं ही सर्वांत महत्त्वाची निकड आहे. प्रायोगिक असणं हा नैसर्गिक निर्णय आहे. लौकिक यशापयश अतिशय कमी महत्त्वाचं आहे. कुठल्याही दिखाऊपणाला, अनावश्यक झगमगाटाला त्याच्यात स्थान नाही. कलाकारांनी कायम आपल्या अंत:प्रेरणा तपासून पाहत स्वत:ला आणि स्वत:तील कलेला, कलाकाराला घडवत राहावं, असा अतिशय मूलभूत विचार ते कायम जगलेले आहेत व मांडतही आलेले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इतका मोठा पट मांडणारा महेश एलकुंचवार यांचा असा हा ‘आत्मस्वर’ आहे. आपले प्रश्न मांडण्यासाठी किंवा आपल्या आतल्या प्रश्नांची उकल करण्यासाठीच आपण लिहितो असं ते कायमच म्हणत आलेले आहेत. ‘आजूबाजूच्या वास्तवाकडे ते डोळेझाक करून फक्त स्वत:च्या आतल्या प्रश्नांना महत्त्व देतात’ असा एक आक्षेप महेश एलकुंचवार यांच्याबद्दल कायम घेतला जातो. पण महेश एलकुंचवार यांना आपल्या लेखनातून आणि जगण्यातूनही कधीच असं ढोबळ पुरोगामित्व मिरवण्याची गरज वाटलेली नाही, वाटतही नाही. कुठल्याही विचारसरणीचा वाहक होणं त्यांनी जाणीवपूर्वक नाकारलं आहे.

यातून एक प्रश्न उद्भवतो तो असा की, इतका तीव्र आत्मस्वर जपणार्‍या लेखकाचं आणि समाजाचं नातं असतं का? आणि असेल तर ते काय प्रकारचं असतं? मला वाटतं, महेश एलकुंचवार जी जाणीव देतात, दृष्टिकोन देतात, जे भाषाभान देतात, ते माणसाला समृद्ध करणारं आहे. त्याला भावनिक आणि मानसिक बदलाबद्दल जागरूक आणि जागृत करणारं आहे. आणि यासकट माणसातल्या चिरंतनाला आवाहन करणं, स्वत:ला शक्य तितक्या निकोप स्वरूपात मांडणं हे समाजाप्रती, सामूहिक संवेदनांप्रती दिलेलं मोठंच योगदान असतं. आणि या सर्व गोष्टी देऊन आमचं भावजीवन लख्ख आणि स्निग्ध करणार्‍या महेश एलकुंचवार यांना माझा दंडवत.

..................................................................................................................................................................

ओंकार गोवर्धन

govardhanomkar30@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा