शंका घेणे, समीक्षा करणे आणि ‘जागे राहणे’ अटळ ठरते. आम आदमीच्या कॉमन सेन्सला व अन्य टीकेला स्थान असावे, ते जमेत घेतले जावे. करोना व रेमडेसिवीर हे केवळ निमित्त...
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
दत्ता देसाई
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 23 March 2021
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus कोविड-१९ Covid-19

गेले काही दिवस सतत अस्वस्थ लोक भेटत आहेत. रिक्षावाला म्हणत होता- “साहेब, आत्ता कुठे वर्षभरानंतर धंदा सुरू होतोय, तेवढ्यात हे करोनाचे भूत पुन्हा उभे झाले आहे साहेब. काय खावं, काय करावं?” एक ‘ओला कॅब’ ड्रायव्हर विचारत होता- “साहेब, नेमकं काय राजकारण चाललंय? माझी गाडी कर्जावर घेतलीय. हप्ते तटलेत आणि अख्खं घर माझ्यावर आहे. गेलं वर्ष कसं काढलं काय सांगू?” काही लोक विचारताहेत- “लोकांनी लस घ्यावी म्हणून वाढलाय का करोना”, किंवा “गेल्या वर्षभरात इतर आजारांनी लोक मरायची थांबली का हो?” कोण विचारतेय- “दिल्लीत लाखो शेतकरी महिनोन महिने जमताहेत, तिथं का नाही करोना?” कोण म्हणतेय- “इलेक्शन लागल्यात तिथं कुठंय करोना?” कोण आदित्यनाथच्या सभांचा/कार्यक्रमांचा हवाला देऊन विचारतेय- “तिथं काय आहे नेमकं?”

एरवी मोदीप्रेमापोटी मूग गिळून बसणारे आणि मोदीभक्ती म्हणजे सध्याच्या कोणत्याच विषयाबाबत वा समस्येबाबत शंकाच उपस्थित न करणे, असे मानणारे अनेक सुशिक्षित व व्यावसायिक, उच्च वा मध्यमवर्गीय लोकही खाजगीत अस्वस्थता बोलून दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात वाढलेली बेरोजगारी व थंडावलेला आर्थिक विकास, करोना व्यवस्थापनाचा महाघोळ आणि आपल्या व्यवसायांचे होणारे मातेरे, याबद्दल कुरकुरत आहेत.

हे सारे प्रश्न निदान अर्धे का होईना सत्य आहेत, ते टाळून पुढे जाता येणार नाही. हे प्रश्न उभे करणारी साधी साधी माणसं करोना खोटा आहे, असे अजिबात म्हणत नाहीत. त्यांत अनेकांनी तो सौम्यपणे आणि काहींनी अगदी जवळून तीव्र रूपात अनुभवलाय. पण तरीही त्यांना प्रश्न आहेत आणि ते रास्त आहेत, ‘करोना में कुछ काला है’ ही शंकाही रास्त आहे.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ऑक्टोबर २०२०मध्येच WHOने जाहीर केले होते की, रेमडेसिवीर आणि अन्य तीन औषधे ही करोनाविरोधात कुचकामी ठरली आहेत! WHOच्या यादीतून ही औषधे वगळली आहेत आणि युरोपात अनेक देश ती वापरत नाहीत. रेमडेसिवीर जर WHO यादीतून काढून टाकते, तर त्याविषयी सरकारी व अन्य पातळीवर सर्व यंत्रणेला जागे करणे व नेमक्या सूचना देणे आवश्यक नाही का? तरीही ते औषध काही खाजगी डॉक्टरांनी वापरले वापरले, तर तो त्यांच्या जजमेंटचा व जबाबदारीचा भाग राहील. कारण हे काही बंदी घातलेले औषध नाही. पण WHOने रुग्णालयांतील प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे म्हटले आहे की, या औषधांचा कोणताच परिणाम दिसून आलेला नाही. म्हणून ती यादीतून काढली आहेत.

मात्र महाराष्ट्रापासून अमेरिकेपर्यंत ती अजूनही चालूच आहेत. सुरुवातीपासूनच म्हटले जात होते की, स्टेरोईडस, प्रतिजैविके आणि अन्य उपाय वापरूनच पेशंट बरे केले जात आहेत. रेमडेसिवीर फार तर दोन-तीन दिवस ‘वेळ’ मिळवून देते. आधीच्या अनेक साथींत हे औषध निष्प्रभ ठरले होते, पण करोनाने त्याला हात दिला! गेल्या वर्षांत केवढा काळा बाजार झाला आणि जगभर लोकांची प्रचंड लूट झाली! रामदेवबाबावर करोनावरचे बोगस औषध विकल्याबद्दल हल्ला केला पाहिजे, यात शंका नाही. पण म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांना मोकाट सोडणे हा उपाय नव्हे, ते रामदेवबाबाचे बलदंड मोठे भाऊ ठरताहेत. फक्त ते अनेकदा ‘विज्ञाना’च्या नावाने वा विज्ञानाचा काहीएक टेकू देत काही गैरप्रकार करतात, त्याला कॉर्पोरेट औषध व हॉस्पिटल इंडस्ट्रीचा भक्कम आधार आहे आणि सरकारी यंत्रणांचे पाठबळ आहे. त्याकडे बघून लोकांनी गप्प बसायचे का? शरीरविज्ञान, औषधविज्ञान आणि समाजविज्ञान यांच्या आधारे याबाबत प्रश्न उभे करणे आवश्यक नाही का? पण लोकांची आणि खऱ्या विज्ञानाची बाजू घेऊन फार कमी लोकांनी याबाबत आजवर प्रश्न उभे केले. अगदी एरवी या मुद्द्यांवर काम करणाऱ्या मंडळींनीही हे काम फारसे केलेले नाही.

अगदी प्रथमपासून यात गुंतलेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न अनेकांनी केले आहेत. असंही म्हटलं जातंय की, सस्तन प्राण्यांवर परिणाम करतील असे किमान ५ लाख ते ८.५ लाख जीवाणू-विषाणू आहेत. त्यांचे माणसांवर कधीही ‘हल्ले’ होऊ शकतात. त्यामुळे मुळात रोगप्रतिकारक शक्तीचा मुद्दा ऐरणीवर यावा, असे प्रयत्न नको का करायला? सरकारांवर तसा दबाव नको का आणायला? लोकांना तसे ओरिएंट नको का करायला? अन्नापासून विकासापर्यंतची धोरणे मुळापासून नको का बदलायला? हे काम व निदान याची चर्चा जनतेच्या बाजूने उभे राहणाऱ्या वैद्यक-आरोग्य आणि विज्ञान व विकास-पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व संघटना यांनी नको का करायला? परिवर्तनवादी राजकीय चळवळीत हे भान नको का वाढवायला? याला अजून तरी सकारात्मक उत्तर येताना दिसत नाही!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेतले पाहिजे की- ‘२००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य’ ही एकेकाळी घोषणा होती, खुद्द आंतरराष्ट्रीय समुदायाची. विज्ञान-आरोग्य चळवळीने गेल्या ४० वर्षांत महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आणले. ते केवळ तंत्रज्ञानाबाबत नव्हे तर जीवशास्त्रीय तसेच आरोग्यासंबंधी विविध निसर्गशास्त्रांबाबतही होते. तसेच ते सरकारी धोरणे, कॉर्पोरेट, हितसंबंध, सत्ताकारण आदीसह राजकीय अर्थशास्त्र सांगणारे होते. ते जीवनशैली आणि पर्यावरणीय पैलू आणि ‘प्राचीन ते अत्याधुनिक’मधील ‘व्यावहारिक शहाणपणा’ला (common sense) पुरेसे वजन देणारे होते. तसेच ते मूलगामी व समग्र समीक्षा, प्रबोधन, रचनात्मक पर्याय व चळवळ या अंगांनी होते.

या साऱ्याला खुंटीवर टांगावे असे वातावरण आणि अशी ‘आणीबाणी’ करोनाचा फायदा घेऊन तयार केले गेले. पण अशी ‘शंकेखोर’ व टीकात्मक चर्चा उपस्थित केल्यास काही लोक ‘करोना हे काय कटकारस्थान आहे का?’ असा बाळबोध प्रश्न उभा करतात. करोना खरा आहे. मात्र हेही लक्षात घेतले पाहिजे की, ‘इतिहास कट-कारस्थानांनी घडत नसतो, पण इतिहासात कट-कारस्थाने असतात’. विशिष्ट परिस्थितीचा फायदा घेऊन इतिहासाला विशिष्ट वळण देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सत्ताधारी वर्ग वा विभागांकडून केले जातात, हे विसरता येत नाही. पण आज हे विसरले जाते आहे आणि सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला दबाव बऱ्याच परिवर्तनवादी मंडळींनीही घेतला आहे, हे गेले वर्षभर दिसून येते आहे.

स्वत:च उभे केलेले जुने सर्व मुद्दे खुंटीला टांगून बहुश: करोनावर चर्चा व प्रबोधन सुरू आहे - अनेकदा, अनेक राज्यांत त्याचे स्वरूप ‘सरकारचे विस्तार कार्य’ (extension work) वाटण्याच्या पातळीला पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने नव्या कॉर्पोरेट संगनमताने आरोग्याबाबतची जनकेंद्री, डावी, क्रांतिकारक स्वरूपाची मूलगामी टीका व विरोध हे ‘silent mode’वर घालवण्यात सध्यातरी यश मिळवले आहे असे दिसते. आपल्या चळवळींचे या व अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात काही मूठभर मंडळी अयशस्वी ठरताहेत, हाही गेल्या वर्षभराचा अनुभव आहे.

‘२००० आले, ‘सर्वांना आरोग्या’चे काय झाले?’ असे विचारत त्या वर्षी देशव्यापी व विश्वव्यापी ‘जन आरोग्य अभियान’ सुरू केले गेले होते. ते करताना एका मुद्दा अधोरेखित केला गेला होता- ‘Health is too serious business to be left to the Doctors.’ (War is too serious business to be left to the Generals’च्या चालीवर). २० वर्षांनंतर ते अधिकच व्यापकपणे लागू होताना दिसू लागले आहे, हे चिंताजनक आहे.

इथे मुद्दा सरकारी-सार्वजनिक तसेच स्वतंत्रपणे व छोट्या प्रमाणावर, पण देशभर मोठ्या लोकसंख्येला वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स व सेवकांचा नाही. त्यात दोन्ही प्रकारची (ethical व malpractice करणारी) मंडळी आहेत. त्यातील पहिल्या प्रकारातील लाखो लोकांबद्दल आपण पूर्ण आदर बाळगला पाहिजे. खरा मुद्दा कॉर्पोरेटच्या आणि त्याच्याशी लग्न लागलेल्या प्रशासकीय-वैद्यकीय ‘तर्कशास्त्रा’चा आहे.

शिवाय मुद्दा महामारीचे आणि ‘आणीबाणी’चे जे राजकारण केले जात आहे, त्याचाही आहे. पाळत यंत्रणा सर्रासपणे वापरण्याचे आणि असंवैधानिक अधिकार हातात घेण्याचे आणि त्या आधारे सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे लोकशाहीविरोधी राजकारण हा मुद्दा आहे. भयाचे, दहशतीचे आणि अराजकाचे राजकारण शेवटी ‘बळी तो कान पिळी’ बळकट करते. आज सर्व क्षेत्रांत ते घडते आहे. ते आपल्याच पिल्लांना म्हणजे उदा., वैद्यकीय क्षेत्रातील ‘छोटे’ व्यावसायिक आणि असेच सर्वच क्षेत्रातील आम लोकांना खाऊन टाकते आहे. लोकांना हतबल बनवू पाहते आहे. करोनाकाळ लोकांना सक्षम व आत्मविश्वास पूर्ण बनवण्यासाठी वापरला जातो आहे की, विविध सत्ताधारी (केवळ राजकीय नव्हे, आर्थिक-तंत्रवैज्ञानिक-सांस्कृतिक) यंत्रणा त्याचा वापर लोकांना परवश, हतबल, परावलंबी बनवण्यासाठी करत आहेत?

इथे मुद्दा केवळ व्यक्तींचाही नाही, तर तो पद्धती व संस्कृतीचा आहे. गेल्या ५०-६० वर्षांतील टॉन्सिल-अपेंडिक्स-प्रतिजैविके-banned औषधे-बायपास-स्टेंट याबाबतचा अनुभव आपल्याला काय सांगत आला आहे? आधी त्या विशिष्ट शस्त्रक्रिया व औषधांचा भडिमार करायचा, मग कधीतरी त्याचे दुष्परिणाम वा अनावश्यकता मान्य करायची! पण तोवर असेच नवे काहीतरी प्रकरण बाजारात आणि धंद्यात आणायचे.

हे मान्य आहे की, यातील निवडक गोष्टी निवडक वेळी नक्कीच आवश्यक असतात. पण त्याचे अनावश्यक सरसकटीकरण का व कसे होते? त्यातील अवैज्ञानिकता आणि हितसंबंध यांबद्दल कोण किती भूमिका घेते आणि काय कृती व जागृती केली जाते? त्यावर काहीच नियंत्रण नको का? हेही मान्य आहे की, सर्व योग्य उपाय हे साक्षात्काराने आधीच कळतील असे शक्य नाही. त्यात काही एक प्रयोग आणि ट्रायल-एरर असणार. पण मग ही पद्धती व प्रक्रिया खरोखरी-प्रामाणिक ‘वैज्ञानिक’ असावी, हितसंबंधांनी बांधलेली नसावी, यासाठी काय केले जाते? त्यासाठी तरतुदी आणि यंत्रणा असल्या तरी हे गैरप्रकार सार्वत्रिक बनून सुरू कसे राहतात?

म्हणजेच सतत शंका घेणे, समीक्षा करणे आणि ‘जागे राहणे’ अटळ ठरते. तेही नंतर कधीतरी १० वर्षांनी होण्यापेक्षा त्या त्या क्षणी व्हावे. हे होण्यात आम आदमीच्या कॉमन सेन्सला व अन्य टीकेला स्थान असावे, ते जमेत घेतले जावे. एवढेच म्हणणे. करोना व रेमडेसिवीर हे केवळ निमित्त.

प्रचलित व्यवस्था वा त्यातील तज्ज्ञ जे सांगत आहेत, तेच थोडे इकडे-तिकडे करून सांगण्याऐवजी जनतेची बाजू घेणाऱ्या तज्ज्ञ व डॉक्टरांनी, आरोग्य व विज्ञान चळवळींनी करोनाचे निमित्त करून लोकांमध्ये खोलवरची समज विकसित करणे गरजेचे आहे. जागतिक व भारतीय सर्वंकष अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर हे तातडीचे, खरे शास्त्रीय व परिवर्तनवादी काम आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रत्यक्ष फिल्डमध्ये डॉक्टर- सेवक- सैनिक- सेनापती- कार्यकर्ते- राजकारणी- धुरीण- सामाजिक कार्यकर्ते हे सारे महत्त्वाचे असतात. त्यांच्या योग्य कार्याविषयी पूर्ण आदर हवाच. पण एकतर केवळ वैद्यकीय सेवा म्हणजे आपापत: ‘आरोग्य’नव्हे, युद्ध म्हणजे आपापत: संरक्षण वा शांतता नव्हे, समाजकार्य म्हणजे आपापत: समाज परिवर्तन नव्हे आणि राजकारण म्हणजे आपापत: लोकशाही नव्हे. त्या त्या प्रश्नाला सोडवत पण त्यापलीकडे जायला हवे.

तसेच पुस्तकी व सैद्धांतिक, धोरण व कार्यक्रम आणि प्रत्यक्ष व व्यावहारिक यांचे परस्पर प्रभावी नातेही महत्त्वाचे असते. तिथे सर्व निर्णय एकाच घटकाच्या आधारे होऊ शकत नाहीत. ते अधिक व्यापक पातळीवर व अधिक विवेकी-वैज्ञानिक पद्धतीने व्हायला हवेत हा आग्रह आवश्यक. त्यामुळे वर जे म्हटले आहे, ते असेही पुढे नेत म्हणावे लागते की, politics is too serious business to be left to the politicians आणि social change is too serious business to be left to the social workers! म्हणजेच तद्दन धंदेवाईक तर नकोच पण केवळ चांगले राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते व धुरीण पुरणारे नाहीत. त्यात आम लोक हवेत, समग्र वैज्ञानिकता हवी आणि विवेकी मानवताही!

..................................................................................................................................................................

लेखक दत्ता देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासकह आहेत.

dattakdesai@gmail.com  

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा