महाडच्या ऐतिहासिक लढ्याची उद्दिष्टपूर्ती तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा विषमतावादी शक्तींना परिघावर लोटून समतावादी शक्ती सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी येतील
पडघम - देशकारण
अमरनाथ सिंग
  • चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळचे बाबासाहेब आणि त्यांचे इतर सहकारी. साेबत उजवीकडे आर. बी. मोरे
  • Sat , 20 March 2021
  • पडघम देशकारण महाड चवदार तळे सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर आर. बी. मोरे

२० मार्च १९२७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले आणि जनसमुदायाच्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. त्या दिवशी हजारोंच्या संख्येने ‘अस्पृश्य’ लोक त्या तळ्याकाठी जमले होते. सगळ्यांनीच मग बेधडक त्या पाण्याला स्पर्श केला. हजारो वर्षांपासून लादला गेलेला कायदा त्या दिवशी लोकांनी डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तोडून टाकला. धर्मसत्तेच्या प्रचंड जोखडाखाली असलेला तो काळ होता. धर्मसत्तेला आव्हान देण्याची हिंमत लोकांमध्ये अचानक आली नव्हती. त्या मागे एक मोठी सामाजिक प्रक्रिया घडत आलेली होती.

दासगाव या महाडच्या जवळ असलेल्या गावात आर. बी. मोरे (रामचंद्र बाबाजी मोरे) हा मोठा धडपड्या तरुण राहत होता. महार समाजातील या तरुणाने भयंकर जातीय भेदभाव सहन करत अत्यंत कष्टाने शिक्षण घेतले होते. महाड परिसरातील महार लोक त्या काळी मोठ्या प्रमाणात लष्करात भरती झाल्याने त्यांच्या राहणीमानात फरक झाला होता. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत होते. त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली होती. परंतु सामाजिक जीवनात मात्र त्यांना हीनतेची वागणूक मिळत होती. त्या विरुद्ध अस्पृश्य लोकांच्या मनात असंतोष होता. मोरे हा तरुण अस्पृश्यांच्या उत्थापनासाठी धडपडत होता. महाडच्या बाजारपेठेत येणार्‍या अस्पृश्यांना माल विक्री करण्याचा हक्क मिळावा, दूरच्या खेड्यातून लाकूडफाटा विकायला येणार्‍या महारांना प्यायला पाणी मिळावे, सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करण्याचा हक्क मिळावा, यासाठी तो तरुण प्रयत्न करत असे.   

त्याच काळात विद्यापीठीय शिक्षण संपवून ३ एप्रिल १९२३ रोजी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन भारतात परतले होते. इथल्या दलितांची स्थिती बघून ते व्यथित होत असत. याविरुद्ध कृती करावी असे त्यांना वाटत होते. मात्र ही कृती केवळ दलितांनी करून चालणार नाही, तर त्यात दलितेतरांचा पण सहभाग आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. संबंध भारतीय समाजाच्या मुक्तीची चळवळ आपण सगळ्यांनी मिळून उभे केली पाहिजे, असा व्यापक विचार ते मांडत होते. या विचारांच्या आधारे त्यांनी ९ मार्च १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या संघटनेत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होते. अधिपति डॉ. सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड, उपअधिपती मेयर निस्सीम रुस्तमजी जीनवाला, जी. के. नरिमन, डॉ. र. पु. परांजपे, डॉ. वि. पा. चव्हाण आणि बाळ गंगाधर खेर हे होते. त्याशिवाय व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेक्रेटरी सीताराम शिवतरकर, कोषाध्यक्ष निवृती जाधव हे होते. तसेच सभासदात सामंत नानाजी मारवाडी, झीनाभाई मुळजी राठोड, महादेव आंबाजी कांबळे, संभाजी गायकवाड असे लोक होते. अशा प्रकारे दलित व बिगर दलित एकत्र येऊन समाज परिवर्तनासाठी सज्ज झाले होते. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे या संघटनेचे ब्रीद वाक्य होते.

या संघटनेच्या स्थापनेपूर्वी एक महत्त्वाची घटना घडली होती. सीताराम केशव बोले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात एक महत्त्वाचा ठराव मांडला. सार्वजनिक विहिरी, पाणवठे, तलाव, धर्मशाळा अस्पृश्यांसाठी खुली करण्यात यावीत, अशी मागणी या ठरावात करण्यात आली होती. सरकार ज्या स्थळांना निधी पुरवते व त्यांची देखभाल करते, त्या ठिकाणी कोणताही भेदभाव करण्यास मुभा नसेल. प्रदीर्घ चर्चेनंतर तो ठराव मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश १९ सप्टेंबर १९२३ रोजी काढण्यात आला. सुरेन्द्रनाथ टिपणीस हे त्या वेळी महाडच्या नगरपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी नगरपरिषदेत ठराव मंजूर करून घेतला. महाडमध्ये शिकत असलेल्या आर. बी. मोरे या तरुणाच्या कानावर ही बातमी आली. त्याला खूप आनंद झाला. महाडचे पाणवठे आता दलितांना खुले होऊ शकतील असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला.

ठरावाच्या अंमलबजावणीसाठी महाडमध्ये हालचाल करावी, असे यांनी ठरवले. इकडे डॉ. आंबडेकरांना किंवा अनंतराव चित्रे यांना अशी कोणतीही कल्पना नव्हती. पण मोरेंनी लोकांची जमवाजमाव सुरू केली. त्यांनी महाड परिसरात विविध खेड्यांतील महार जातीपंचाचे प्रमुख व  वरिष्ठ जाणत्या लोकांची सभा महाडात बोलावली. सभेत बोले ठरावाची कल्पना लोकांना दिली. आपण एक परिषद महाडला घेऊ अशी कल्पना त्यांनी मांडली. सभेने त्या प्रस्तावास अनुमोदन दिले. मोरेंचा विचार सगळ्यांना मनोमन पटला होता. परिषदेसाठी लागणारा खर्च गावागावातून उभा करू, असे आश्वासन लोकांनी दिले. डॉ. बाबासाहेबांना आणण्याची जबाबदारी लोकांनी मोरेंवरच टाकली. त्यासाठी ते मुंबईला पोहोचले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मोरे यापूर्वी एकदा डॉ. बाबासाहेबांना भेटले होते. ते आपल्याला ओळखतील, असा विश्वास त्यांना होता. पण मुंबईतील त्यांच्या जाणकार मित्रांनी सल्ला दिला की, एकट्याने जाऊन बाबासाहेबांवर प्रभाव पडणार नाही. मोरेंचे तेव्हाचे वय एकवीस-बावीसच्या आसपास होते. म्हणून मग मोरे तेव्हाचे वयोवृद्ध समाजसेवक संभाजी तुकाराम गायकवाड यांना सोबत घेऊन गेले. बाबासाहेबांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. त्या वेळी भाई चित्रे पण उपस्थित होते. प्रस्तावित परिषद कशी यशस्वी करता येईल, याची रूपरेखा मोरे यांनी मांडली. आर्थिक उभारणी आणि लोकांची जमवाजमव कशी करायची, याची स्पष्ट रूपरेखा मोरेंनी आखून ठेवली होती. पुढे अनेक वेळा मोरेंनी डॉ. बाबासाहेबांची भेट घेतली व त्यांना महाडच्या परिषदेसाठी वेळ देण्याची विनंती केली. मोरेंचे संघटन कौशल्य आणि परिषद यशस्वी होण्याची शक्यता तपासून जवळपास तीन वर्षांनी डॉ. बाबासाहेबांनी होकार दिला.

१९२७ सालातील मार्चमधील महाड सत्याग्रहाच्या पूर्वतयारीसाठी कोकणातील रत्नागिरी, दाभोळ, खेड, दापोली, महाड, माणगाव, रोहे आणि पेण इत्यादी ठिकाणी अनेक सभा स्थानिक कार्यकर्त्यांकडून घेण्यात आल्या. सुभेदार सवादकर पलटणीतून रजा टाकून परिषदेच्या कामासाठी महाडात दाखल झाले. मोरे त्यांच्या सहकार्‍यांसह पायाला भिंगरी लावून महाडच्या पट्ट्यात फिरतच होते. सत्याग्रहाचा प्रचार वाड्यावस्त्यांवर करण्यात आला. ‘महार समाज सेवा संघा’चे मुंबईतील अनेक कार्यकर्ते कामातून सुट्ट्या घेऊन कोकणात महिनाभर आधी जागृती करत होते. संभाजी गायकवाड, गोविंद आड्रेकर, भिकाजी गायकवाड, चांगदेव मोहिते, महादेव गुडेकर, केशव आड्रेकर, लखू पाटणकर, सुदाम केंबुलीकर, पांडुरंग साळवी, राघोराम गोयलेकर, बाळू वामनेकर इत्यादी कार्यकर्ते मोरेंच्या सोबतीने झपाटून काम करत होते.

परिषदेच्या दिवशी महाड शहर अस्पृश्य जनतेने फुलून गेले. १९ तारखेला परिषदेचा पहिला  दिवस होता. दुपारपर्यंत पाच हजार लोक मंडपात पोहोचले होते. गावागावातून आलेल्या लोकांच्या हातात काठ्या होत्या. त्या काळी ग्रामीण भागातील महार परंपरेने हातात काठी बाळगत असत. डॉ. बाबासाहेब ज्या वेळी मंचावर आले, तेव्हा हजारोंच्या त्या समुदायाने घुंगराच्या काठ्या उंचावून बाबासाहेबांना मानवंदना दिली. निश्चयाने पेटलेल्या समुदायाचे दृश्य मोठे विलोभनीय आणि रोमांचकारक होते. अनेक शतके दडपल्या गेलेल्या मानवांचा तो पहिला हुंकार होता. परिषदेसमोर बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले. सर्व रूढी आणि सामाजिक बंधने झुगारून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मानव म्हणून स्वतःचा हक्क प्रस्थापित करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेत अनेक ठराव करण्यात आले. त्यापैकी एक होता बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याबाबत. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी मिरवणुकीने महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन शेकडो वर्षांची बंधने झुगारत तळ्याचे पाणी प्राशन केले. ही साधी घटना नव्हती. अस्पृश्य ठरवले गेलेल्या लोकांनी नागरिक म्हणून पहिल्यांदाच सार्वजनिक जीवनात वावरण्याचा हक्क प्रस्थापित केला होता. स्वतः लोकांनी प्रथमच पुढाकार घेतला होता. ही भारतभरच्या शोषित-पीडितांना नवी वाट दाखवणारी घटना होती. गुलामीच्या साखळदंडावर सामूहिक वज्रप्रहार झाला होता. येणार्‍या काळावर या कृतीने न पुसला जाणारा ठसा उमटवला.

आज या घटनेला ९४ वर्षे झाली आहेत. जवळपास एक शतक उलटल्यानंतर आपल्या देशातील आजची स्थिती काय आहे? १२ मार्च २०२१ रोजी उत्तर प्रदेशात गाजियाबादच्या दासना गावात आसिफ नावाच्या मुलाला मंदिरात पाणी प्यायला म्हणून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर मुस्लिमांना प्रवेश बंदी असा फलक लावण्यात आलेला आहे. आपल्या देशात अनेक सार्वजनिक ठिकाणी आजही दलित व मागासवर्गीयांना प्रवेशास बंदी आहे. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी प्यायला, मिशा राखल्या, लग्नात घोड्यावर बसला, दुचाकी किंवा चार चाकी वाहन वापरले, चांगले घर बांधले, स्वच्छ व टापटीप कपडे घातले, उच्च शिक्षण घेतले म्हणून दलितांना मारहाण केली जाते किंवा प्रसंगी ठार मारले जाते. भारतीय संविधानाने सगळ्यांना समान हक्क दिले आहेत. जाती-धर्म-लिंग-भाषा-वंश इत्यादीवरून भेदभाव करण्यास बंदी घातली आहे. परंतु याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी मात्र होत नाही. वर्णव्यवस्थेवर आधारित ब्राह्मण्यवादी मानसिकता आपल्या सांस्कृतिक जीवनावर आजही हावी आहे.

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडचा जो सत्याग्रह झाला, ती एक प्रतीकात्मक कृती होती. सनातनी वृतीच्या लोकांना ती अजिबात रुचली नव्हती. त्यांनी प्रतिहल्ला केला होता. महाड गावात दलित वस्तीवर तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यात अनेक जण जखमी झाले होते. नंतर सनातनी लोकांनी मंत्रोच्चारासह गौमूत्र आणि शेणाने तळ्याचे शुद्धीकरण केले होते. पुढे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. तो कायदेशीर लढा दहा वर्ष चालला. पुढे निकाल दलितांच्या बाजूने लागला. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने समस्त भारतीयांना समान हक्क बहाल केले. परंतु एक शतक उलटून गेले तरी सनातनी मानसिकतेत आजही फरक पडलेला नाही.

ज्या दशकात महाडचा सत्याग्रह झाला, त्याच दशकात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. मिठाचा सत्याग्रह केला. मिठावरील सरकारच्या नियंत्रणाला त्यांनी आव्हान दिले. स्वतः मीठ बनवून ब्रिटिश सत्तेचा कायदा मोडला. अशा प्रकारे त्या दशकात कायदा मोडणार्‍या दोन घटना घडल्या. गांधींनी साम्राज्यवादाचा जुलमी कायदा मोडला, तर डॉ. आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या धर्मसत्तेचा विषमतावादी कायदा मोडला. पुढील काळात ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली व गांधींच्या लढ्याची उद्दिष्टपूर्ती झाली. मात्र डॉ. आंबेडकरांच्या लढ्याची उद्दिष्टपूर्ती झाली, असे म्हणता येणार नाही. तो लढा आजही चालू आहे.

गांधींचा लढा भारतीय समाजाला साम्राज्यवादी गुलामीतून मुक्त करण्यासाठी होता. तर आंबेडकरांचा लढा या मुक्त झालेल्या भारतीय समाजाचे काय, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करणारा होता. समाजाची लोकशाही तत्त्वांवर मानवतावादी उभारणी करण्यासाठी डॉ. आंबेडकर झटत होते. गांधीचे पाऊल जितके महत्त्वाचे होते, आंबेडकरांचे पाऊलसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. इतिहासात दांडी यात्रेला जे महत्त्वाचे स्थान मिळाले, ते स्थान महाड सत्याग्रहाला मिळाले नाही. इतिहासकारांनी महाड सत्याग्रहाचे महत्त्व जसे अधोरेखित करायला हवे होते, तसे केले नाही. स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजाची उभारणी कोणत्या पायावर करावी, याचे सुतोवाच आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीत दिसते. त्यांचे कार्याचे महत्व यावरून पटते की ब्राह्मण्यवादी मूल्यव्यवस्था आणि जातीव्यवस्था कायम ठेवल्याने केवळ दलितांचे नुकसान होत नाही, तर समस्त समाजाच्या विकासाला खीळ बसते.

अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांची जबाबदारी अनेक पटीने वाढते. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात करतानाच बिगर दलितांनाही सोबत घेतले. त्यात टिपणीस, सहस्त्रबुद्धे, भाई चित्रे, देवराव नाईक, डी.व्ही. प्रधान, कमलाकांत चित्रे, गडकरी, आचार्य दोंदे, नारायण नागो पाटील, चंद्रकांत अधिकारी, आर.डी. खवळी अशा विविध जातीय लोकांचा समवेश होता. या लोकांनी व्यापक समाजहित लक्षात घेऊन भारतीय समाजाच्या पुनर्रचनेसाठी काम केले.

डॉ. बाबासाहेबांनी व्यापक दृष्टी ठेवून संघटना उभारल्या. त्यांच्या संघटनाचे स्वरूप बहुजातीय होते. स्वातंत्र्य चळवळीच्या उभारणीचा तो काळ होता, रशियात सर्वहारा क्रांती होऊन शोषणव्यवस्था संपुष्टात आलेली होती. भारतात कम्युनिस्ट चळवळ उदयाला आली होती. अशा काळात डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वात दलितांच्या मुक्ती चळवळीची सुरुवात झाली. महाडच्या सत्याग्रहानंतर वर्षभराने त्याच महाडात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर कोकणात खोतीविरुद्ध आंदोलन सुरू केले. पुढे स्वतंत्र मजूर पक्ष निर्माण केला.

याचा अर्थ त्यांची चळवळ केवळ जातीय शोषणाचा विचार करत नव्हती, तर वर्गीय शोषणाचाही विचार करत होती. आज वर्ग आणि जात अशा दोन्ही व्यवस्थांच्या चक्रात दलित बहुजन अडकलेले आहेत. जातवर्गीय व्यवस्थेविरुद्ध लढा द्यायचा तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. सुरुवातीला आंबेडकरी चळवळीत जो बहुजातीय सहभाग दिसतो, तो पुढील काळात क्षीण झाला. ही चळवळ एकजातीय बनत गेली. डॉ. आंबेडकरांनाही एका जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याच्या हालचाली होऊ लागल्या. त्यामुळे चळवळ संकुचित होऊन कमजोर बनली. महाड सत्याग्रहाची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. जातीव्यवस्था अधिक चिवटपणे स्वतःचे अस्तित्व आजही टिकवून आहे. म्हणून बाबासाहेबांच्या लढ्यात जो बिगर दलितांचा सहभाग दिसतो, तो प्रवाह अधिक व्यापक करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपण विसरता कामा नये.

महाडच्या सत्याग्रहाला संघटित करण्यासाठी ज्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला, त्या आर. बी. मोरे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली. महाडला डॉ. बाबासाहेबांना आणण्यात व त्या लढ्याचे नेतृत्व त्यांना सोपवण्यात मोरेंची दूरदृष्टी आपल्याला दिसते. पुढे  मोरे मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगारांच्या लढ्यात भाग घेण्यास सुरुवात केली. पुढे क्रमात ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. पण डॉ. आंबडेकरांच्या सहवासात ते नेहमी राहिले. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुढे आंबेडकरांनी दिलेल्या सर्व लढ्यात त्यांचा सहभाग राहिला. कॉम्रेड आर.बी. मोरे या नावाने ते प्रसिद्ध झाले. दलित आणि कम्युनिस्ट चळवळीचा सशक्त दुवा ते ठरले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महाड सत्याग्रह ही इतिहासात घडलेली केवळ एक घटना नाही. येणार्‍या काळावर खोलवर परिणाम करेल असे ते महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर असे एखादे वळण येते, जे पुढची वाटचाल प्रकाशमान करते. हे वळण जसे व्यक्तीच्या प्रयत्नामुळे आलेले असते, तसेच ते त्या काळात विकसित झालेल्या विशिष्ट भौतिक परिस्थितीमुळेसुद्धा शक्य झालेले असते. कोणतीही सामाजिक क्रांती केवळ एखाद्या व्यक्तीचा करिश्मा नसते, तर ज्या स्थळकाळात ती संपन्न होते, त्या स्थळकाळाचे संदर्भ तिला लागू होतात. विकसित झालेल्या विशिष्ट भौतिक परिस्थितीत व्यक्ती एखादे ऐतिहासिक पाऊल उचलण्यास प्रवृत होते आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडते.

इतिहासाकडे चिकित्सक दृष्टीने पाहून त्याचे भौतिकवादी विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. जर तथ्यांच्या आधारे विश्लेषण केले तर योग्य निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो. इतिहासाकडे भावनिक दृष्टीने न पाहता वस्तुनिष्ठ दृष्टीने आपण पाहू लागलो, तर येणार्‍या काळात सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला योग्य दिशा मिळू शकेल. असे घडले तर महाड सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याने दिलेले धडे आपल्याला खर्‍या अर्थाने आत्मसात करता येतील.

आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला जाणवते की, केवळ संविधानातील तरतुदी किंवा कायद्याचा बडगा पुरेसा नाही. जातीव्यवस्थेला पोसणारी मूल्यव्यवस्था बदलण्याची खरी गरज आहे. या देशाला महाप्रबोधनाची गरज आहे. दीर्घकाळ चालणार्‍या सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. या सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून लोकांची विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, धारणा बदलण्याची गरज आहे. साहित्य, कला, सिनेमा आदी प्रकार नव्या भारताच्या जडणघडणीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्याची गरज आहे. यासाठी केवळ राज्य शासनाकडून नाही तर जनतेमधील जाणत्या वर्गाकडून पुढाकार घेतला जाण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात विषमतावादी शक्तींना परिघावर लोटून समतावादी शक्ती सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी अहोरात्र काम करावे लागणार आहे. महाडच्या ऐतिहासिक लढ्याची उद्दिष्टपूर्ती तेव्हाच होऊ शकेल.

संदर्भ -

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह - आर. बी. मोरे, प्रकाशक – डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

२) दलित कम्युनिस्ट चळवळीचा सशक्त दुवा : कॉम्रेड आर. बी. मोरे - सतेंद्र मोरे, प्रकाशक : पर्याय प्रकाशन, मुंबई.

..................................................................................................................................................................

लेखक अमरनाथ सिंग सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत.

amarlok2011@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा