‘पंचायतराज’ सक्षम नसण्याचे पाचवे कारण... लोकशाही बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटना यांचा गाव पातळीवर असलेला नाममात्र प्रभाव
पडघम - राज्यकारण
विनोद शिरसाठ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 15 February 2021
  • पडघम राज्यकारण ग्रामपंचायत GramPanchayat पंचायतराज PanchayatRaj लोकशाही Democracy निवडणूक Election

जानेवारीच्या मध्याला महाराष्ट्रातील चौदा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यातील जवळपास दोन हजार ग्रामपंचायती बिनविरोध पद्धतीने निवडल्या गेल्या, तर बारा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. त्याच आठवड्यात निकाल हाती आले. जरी या निवडणुका राजकीय पक्षांच्या नावाखाली थेट लढवल्या जात नसल्या तरी बहुतांश ग्रामपंचायती या ना त्या पक्षाशी (निवडणुकीच्या आधी किंवा नंतर) नाते सांगतात. त्यानुसार, असा दावा केला जातो आहे की, तीन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेशी संबंधित गटांची तर दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपशी संबंधित गटांची सत्ता आली आहे. काँग्रेस पक्षाशी नाते सांगणारे गट दीड हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सत्तेवर आले आहेत, तर तोच आकडा राष्ट्रवादी काँग्रेससाठी दोन हजारांच्या जवळपास जाणारा आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी सरपंचांच्या निवडणुका येत्या आठवड्यात होणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेकडे माध्यमांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिक सजगपणे बघायला हवे.

प्रजासत्ताक भारताच्या निर्मिर्तीनंतर राज्यांसाठी विधीमंडळे आणि देशासाठी संसद अशी पक्की रचना ठरवण्यात आली. त्याच वेळी शहरी भागांसाठी (नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका) आणि ग्रामीण भागांसाठी (ग्रामपंचायत, व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा) स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना करण्यात आली. जवळपास ४० वर्षे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार काही एका मंदगतीने चालू राहिला. त्यात विकेंद्रीकरण व सर्वसमावेशकता यांची बरीच कमतरता होती. विशेषत: ग्रामीण भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाच्या बाबतीत अधिक ढिसाळपणा होता. शिवाय केंद्र व राज्य सरकारे यांच्याकडे जास्तीचे अधिकार एकवटले होते. त्यामुळे कार्यवाहीसाठी बऱ्याच मर्यादा येत होत्या.

त्याच पार्श्वभूमीवर राजीव गांधी यांचे ते प्रसिद्ध विधान गाजले होते. वरून म्हणजे (केंद्रातून वा राज्यातून) एक रुपया निघतो, तेव्हा त्यांतील १५ पैसे तळापर्यंत पोहोचतात, उर्वरित ८५ पैसे मध्येच जिरवले जातात. भारतातील पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याची गरज ठळकपणे अधोरेखित करणारे ते विधान होते. त्यानंतर राजीव सरकारने पंचायती राज व्यवस्था बळकट करण्यासाठी घटनादुरुस्ती करायचे ठरवले, नंतर व्ही.पी. सिंह सरकारनेही ठरवले, पण ते घडले नाही. मात्र १९९३ मध्ये पी.व्ही.नरसिंहराव सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती करून ग्रामपंचायतींना आणि ७४ वी घटनादुरुस्ती करून पालिकांना अधिक बळकट करण्यासाठीचा मार्ग आखून दिला.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

या घटनादुरुस्त्या झाल्या त्याला आता पाव शतक होऊन गेले आहे. या दुरुस्त्यांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमितपणे होत आहेत. अधिक अधिकार, अधिक जबाबदाऱ्या आणि अधिक पैसा ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्याचे निर्णय झाले आहेत. कोणत्याही घटकाची मोनोपॉली राहू नये म्हणून, रोटेशन पद्धतीने आरक्षण आणले आहे.

महिलांचा सहभाग पूर्वी नाममात्र होता, या घटनादुरुस्तीनुसार तो एकतृतीयांश केला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांना त्यांच्या प्रमाणानुसार त्या-त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल अशी तरतूद केली आहे. ग्रामसभा नियमितपणे भरवण्यासाठी व तेथील निर्णयांच्या अंलबजावणीसाठी ठोस अशा तरतुदी केलेल्या आहेत. आणि इतके सारे केलेले असूनही त्यातील बरेच काही कागदावरच राहते आहे, असा बहुतांश ठिकाणचा अनुभव आहे.

याचे एक कारण गाव, तालुका व जिल्हा स्तरांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांची हितसंबंधांची आपोआप तयार होणारी साखळी हे आहे. दुसरे कारण गाव पातळीवर अर्थशक्ती व दंडशक्ती असणारे पाच-दहा लोक वा दोन-तीन गट यांच्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार नियमांनुसार वा पारदर्शक पद्धतीने होण्यास अडथळे येतात. तिसरे कारण गावातील नागरिकांमध्ये आपले हक्क व आपल्या जबाबदाऱ्या यांच्याविषयी असणारे अज्ञान वा अपुरे आकलन. चौथे कारण असे की, तसे आकलन असणाऱ्यांना पुरेसा वेळ गावासाठी देता येत नाही किंवा त्यांचे वास्तव्य गावात नेहमी नसते (नोकरी, व्यवसाय यांच्या निमित्ताने ते बाहेर असतात.) तर या चार प्रमुख कारणांमुळे पंचायतराज व्यवस्था गाव पातळीपर्यंत पाव शतकानंतरही सक्षमपणे कार्यरत झालेली दिसत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

परंतु वरील चार कारणांपेक्षा अधिक महत्त्वाचे असे पाचवे कारण आहे, तेच मूलभूत म्हणावे असे आहे. ते असे की, लोकशाही बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटना यांचा गाव पातळीवर असलेला अभाव किंवा नाममात्र प्रभाव. स्वयंसेवी संस्था व संघटना आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य इत्यादी सामाजिक प्रश्न घेऊन काही संस्था-संघटना काम करीत राहतात. किंवा दलित, आदिवासी भटके विमुक्त इत्यादी समाजघटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी लढत राहतात. त्यांच्यात आणखी बरेच प्रकार आहेत. त्यांच्या कामांचा असा प्रभाव कमी-अधिक पण निश्चितच होत आला आहे. ते ते प्रश्न चव्हाट्यावर आणून वा प्रशासनाच्या अजेंड्यावर आणून परिवर्तनाची पावले पुढे पडण्यासाठी त्या सर्वांचा निश्चितच उपयोग होत आला आहे. परंतु ढोबळ मानाने ते सर्व काम ‘सामाजिक’ म्हणावे असे असते.

गावागावांत राजकीय जाणीव-जागृती करणाऱ्या संस्था व संघटना कायम अपुऱ्या राहिल्या आहेत. म्हणजे निवडणुकीचे राजकारण किंवा सत्ता मिळवण्यातून परिवर्तन करण्यावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या संस्था-संघटना गावपातळीवर पूर्वीपासून कमी आहेत. ज्या कोणत्या आहेत त्या आपली ऊर्जा प्रामुख्याने खर्च करतात, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघर्षांमध्ये.

अर्थात, हे खरे आहे की, स्थानिक पातळीवरील हितसंबंधी घटकांच्या विरोधात संघर्ष करणे खूप कठीण असते. परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की, स्थानिक पातळीवर संघर्ष मोठ्या प्रमाणात केलेला असेल तर त्या संस्था व संघटनांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघर्षात अधिक परिणामकारक सहभाग नोंदवता येईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आज आपल्या देशात जवळपास अडीच लाख ग्रामपंचायती आहेत, त्यातील जवळपास तीस हजार महाराष्ट्रात आहेत. यातील किती ग्रामपंचायतींमध्ये खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावेत अशा पक्षांची वा त्यांच्याशी संबंधित गटांची सत्ता आहे? किंवा तसे प्रयत्न त्यांनी केले आहेत? आणि गावपातळीवर प्रबोधनात्मक, संघर्षात्मक व रचनात्मक काम झालेले नसेल तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांचा प्रभाव पडणार तो कसा? पूर्वी पुरोगामी पक्ष-संघटनांचा प्रभाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर होता, त्याचे प्रमुख कारण त्यांनी पूर्वी तसे त्रिस्तरीय काम केले होते, हेच नाही का?

सारांश, येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील चौदा हजार ग्रामपंचायतींमध्ये किती सरपंच पुरोगामी पक्ष-संस्थासंघटना यांच्याशी नाते सांगणारे आहेत, हे पाहायला हवे; त्यातून काही बोध घ्यायला हवा!

आता शहरीकरण अधिक झपाट्याने वाढत आहे, लहान गावे ओसाड होऊ लागली आहेत हे चित्र एका बाजूला आहे. परंतु पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान यांची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, ग्रामीण भागाकडे वळणाऱ्यांची संख्या वाढीस लागण्याची शक्यता आहे. शिवाय शहरांचे बकालीकरण जसजसे वाढत जाईल, तसतसे पायाभूत सुविधा असलेल्या लहान-मोठ्या गावातच वास्तव्य करून कार्यरत राहण्यासाठीचा रेटा निर्माण होत जाईल. तसे झाले तर पंचायतराज व्यवस्था सक्षम होण्यासाठी अनुकूलता निर्माण होऊ शकेल. सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी या दिशेने विचार करायला हवा.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १३ फेब्रुवारी २०२१च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......