शिरसाठ म्हणतात तसं केतकर टिळकांच्या स्कूलचे शोभतात. कारण त्यांचा मंडल अहवाल, डाव्या विचारांचे कामगार, दलित, शिवाजी महाराजांना विरोध…
पडघम - माध्यमनामा
बंधुराज लोणे
  • कुमार केतकर
  • Fri , 05 February 2021
  • पडघम माध्यमनामा कुमार केतकर Kumar Ketkar गोविंद तळवलकर Govind Talvalkar अरुण टिकेकर Aroon Tikekar लोकमान्य टिळक Lokmanya Tilak गोपाळ गणेश आगरकर Gopal Ganesh Agarkar महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times लोकसत्ता Loksatta लोकमत Lokmat

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने ‘अक्षरनामा’ने काही लेख प्रसिद्ध केले. त्यापैकी ‘साप्ताहिक साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, प्रवीण बर्दापूरकर यांचे प्रमुख लेख आहेत. प्रवीण बर्दापूरकर केतकरांचे लाभार्थी आहेत, पण शिरसाठ यांनी केतकरांचं गुणगाण करताना एकूणच मराठी पत्रकारितेचा आढावा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या लेखाची दखल घ्यावी लागेल.

प्रथम केतकर सरांना त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. आता एक बाब मान्य केलीच पाहिजे की, केतकर मोठे संपादक आहेत, कारण त्यांनी फक्त मोठ्याच वर्तमानपत्रांत नोकरी केली आहे. दुसरी एक बाब मान्य केली पाहिजे की, केतकरांच्या ज्ञानाचा आवाका, आंतरराष्ट्रीय राजकारणाची त्यांची समज, माहिती वगैरे. त्या बाबतीत केतकर ग्रेट आहेत. प्रश्न कोणाच्या ज्ञानाचा नसतोच, प्रश्न असतो तो या ज्ञानाचं करायचं काय? हे ज्ञान कोणत्या समाजघटकांसाठी तुम्ही खर्ची करता, हा कळीचा प्रश्न असतो.   

त्यासाठी आधी शिरसाठ यांनी केतकरांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांची उजळणी करूया. केतकरांनी १९९५ ते २०१०पर्यंत म्हणजे दीड दशक मराठी पत्रकारितेत ठसा उमटवला. १९९१च्या नंतरची पत्रकारिता म्हणजे ‘केतकर-टिकेकर पर्व’. केतकर टिळक स्कूलचे, तर टिकेकर आगरकर स्कूलचे समजले पाहिजेत. राष्ट्रीय पातळीवर नाव असलेला एकच संपादक म्हणजे केतकर. केतकरांवर फक्त प्रतिगाम्यांनीच टीका केली, बौद्धिक आवाका, निर्भीड वृत्ती, कोणतीही किंमत मोजण्याचा निर्भयपणा, नि:स्पृह वृत्ती हे गुण फक्त माधव गडकरी, तळवलकर, टिकेकर, केतकर आणि नंतर फक्त गिरीश कुबेर यांच्याकडेच आहेत, असा शिरसाठांचा दावा आहे. नाही म्हणायला निखिल वागळे आणि अनंत भालेराव यांचाही एकदा उल्लेख शिरसाठ यांनी केला आहे.

इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते की, शिरसाठ फक्त मुंबई–पुण्याच्या बाहेर बघतच नाहीत. दुसरी बाब म्हणजे त्यांना एकूणच मराठी पत्रकारितेची माहिती कमी असावी किंवा माहिती असली तरी केतकर आणि इतर ब्राह्मणी संपादकांचीच टिमकी वाजवायची असल्याने त्यांनी इतरांची दखल घेतली नसावी. आपणच आपली स्तुती करायची, सोहळे, सत्कार करायचे, अशी एक ब्राह्मणी वृत्ती आपल्याकडे आहे, त्याचा हा लेख एक उत्तम नमुना समजला पाहिजे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आता १९९१च्यानंतरचे दशक जर केतकर-टिकेकर यांचेच होते, तर या काळात इतर संपादक काय करत होते? या काळात घडलेल्या सामाजिक, राजकीय घटनांवर टिकेकर-केतकर यांची काय भूमिका होती? थोडी उजळणी केली तर लक्षात येईल की, टिकेकर-केतकर या दशकात झालेल्या बदलांवर अतिशय प्रतिगामी भूमिका घेत होते. गडकरींनंतर टिकेकर ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. त्यांच्या काळात बाबरी मशिद पाडण्यात आली, तेव्हा ७ डिसेंबर १९९२च्या ‘लोकसत्ता’ची हेडलाईन होती- ‘बाबरी पाडण्याच्या कामाचा शुभारंभ!’

या काळात जागतिकीकरणामुळे कामगार देशोधडीला लागला, मराठवाड्यात दलितांवर अत्याचार वाढले, मुंबईत भयंकर दंगल घडवण्यात आली, तेव्हा टिकेकर काय करत होते? केतकरांनी दंगलीच्या विरोधात भूमिका घेतली होती, मात्र ते जागतिकीकरणाचे प्रखर समर्थक आहेत. केतकरांनी आपल्या संपादकीय कारकिर्दीत कधीच गरीब, कष्टकरी, डाव्या विचारांच्या संघटना, गांधी घराण्याचे विरोधक यांची बाजू घेतलेली नाही. एकीकडे केतकर डाव्यांनी मनमोहनसिंग सरकारला पाठिंबा दिला, तेव्हा आनंद व्यक्त करणार आणि डाव्यांनी मनमोहनसिंग सरकारला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली की, केतकरांची लेखणी प्रकाश करात, सिताराम येचुरींचे वाभाडे काढणार. केतकरांनी आपली ‘महाराष्ट्र टाईम्स’ची संपादकीय कारकीर्द एन्रॉनसारख्या बोगस कंपनीची पालखी वाहण्यात खर्ची केली. या काळात संजीव खांडेकरसारख्या व्यक्तीचं स्तोम माजवलं आणि नंतर ही कंपनी बुडाली तर आपली भूमिका चुकीची होती, अशी कबुली, खंत केतकरांनी कधी व्यक्त केली आहे का?

गंमत म्हणजे केतकर शरद पवार यांचा कमालीचा द्वेष (विरोध नव्हे द्वेष. गांधी घराण्याला आव्हान देणाऱ्यांचा केतकर द्वेषच करतात, मग ते मोहन धारियापासून शरद पवारांपर्यंत कुणीही असोत.) करणार, पण त्याच शरद पवार यांनी आणलेल्या एन्रॉन कंपनीची पालखी वाहणार. केतकरांनी अशी विरोधाभासी किंवा संधिसाधू भूमिका अनेकदा घेतलेली आहे.

माधव गडकरी यांच्याशी कितीही मतभेद असले तरी ते कमालीचे सक्रीय संपादक होते, अनेक प्रश्नांचा पाठपुरावा त्यांनी केला, हे नाकारता येत नाही. त्यांच्या काळातच मराठी वृत्तपत्र आणि संपादकांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती. त्या वेळी केतकर मराठीत कामही करत नव्हते, मात्र शिरसाठ हे श्रेय केतकरांना देतात, ते गडकरींवर अन्याय करणारं आहे.

त्यानंतर अर्थातच निखिल वागळेंचं नाव घ्यावं लागेल. केतकर इंग्रजी पत्रकारितेत होते. त्यामुळे त्यांचे देशभर मित्र असणं साहजिक आहे, मात्र ज्या काळात वृत्तवाहिन्यांचं पीक आलं नव्हतं, त्या काळात गडकरीनंतर देशपातळीवर दखल घेतली गेली, ती निखिल वागळेंचीच. केतकरांची त्यांच्या लिखाणासाठी किंवा संपादकीयांसाठी देशपातळीवर कधीही दखल घेण्यात आली नाही.

ज्याला शिरसाठ ‘केतकर-टिकेकर’ पर्व म्हणतात, त्या काळात मराठी भाषिक वृत्तपत्रसृष्टीत अनेक बदल झाले, अनेक नवीन प्रवाह निर्माण झाले. याच काळात ‘नवा काळ’चे नीळखंड खाडीलकर मुंबईतील गिरणी कामगारांची बाजू घेऊन लढत होते, मंडल अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुरू झालेल्या लढ्यात भाग घेत होते, तर दुसरीकडे निखिल वागळे दलित, मुस्लीम, कष्टकरी, महिला या वर्गासाठी लेखणी झिजवत होते.

१९९३च्या दंगलीत टिकेकर, खाडीलकर यांनी अतिशय प्रतिगामी भूमिका घेतली होती, दंगलीत तेल ओतण्याचे काम ते करत होते, (या बद्दल खाडीलकर यांना न्यायालयाने सजाही दिली आहे.) मुंबईत एकटे निखिल वागळेच दंगलीच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन लिहीत होते. वांद्रे येथील बेहरामपाड्यात वागळेंशिवाय मराठीतील एकाही संपादकानं या काळात पाय ठेवण्याची हिंमत दाखवली नाही. ‘बेहरामपाड्याचं सत्य’ अशी लेखमाला लिहून वागळेंनीच फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील एक बाजू हिरिरीने मांडली, हे नाकारता येत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

याच काळात ११ जुलै १९९७ रोजी घडलेल्या रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार हत्याकांडाच्या बाबतीत टिकेकर-केतकर काय लिहीत होते, हे शिरसाठ यांनी तपासून पाहिलं पाहिजे. या काळातील वर्तमानपत्रं अजूनही उपलब्ध आहेत. केतकर ‘मटा’, ‘लोकसत्ता’, ‘दिव्य मराठी’त होते, ही माहिती शिरसाठ देतात, पण केतकर ‘मी मराठी’ या वृत्तवाहनीत बॉस होते, हे सांगत नाहीत. केतकरांना त्या काळात खरं तर तशी नोकरीची गरज नव्हती, पण ते ‘मी मराठी’च्या सेवेत गेले. केतकर तिथे सामिल झाले, तेव्हा ‘मी मराठी’च्या मालकावर देशभरात फसवणुकीच्या १७ गुन्हांची नोंद होती. हा मालक अजून तुरुंगात आहे. अशा बदमाशासाठी केतकरांनी आपली सेवा का द्यावी? केतकरांच्या या नैतिकेतेबाबत काही बोलायचं नाही का?

केतकरांच्या आधी तळवलकर, गडकरी, समकालीन टिकेकर नंतर थेट गिरीश कुबेरच शिरसाठ यांना बौद्धिक आवाका, निर्भीड, कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असलेले संपादक वाटतात, हा तर मोठा विनोदच म्हणावा लागेल. मुळात बौद्धिक आवाका ही काही कोणाची मक्तेदारी असू शकत नाही. संपादकांशिवाय बौद्धिक आवाका असणारे महाराष्ट्रात अनेक जण आहेत. तळवलकर, केतकर यांचा बौद्धिक आवाका मोठा असेलही, मात्र टिकेकर आणि नंतर थेट गिरीश कुबेरच? खरंच शिरसाठांना काही माहिती नाही की, ते मुद्दाम असं लिहीत आहेत?

गिरीश कुबेर तर सरळ नागपूरच्या मध्यस्थीनंतर किंवा शब्दामुळे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. याच कुबेरांनी नागपूरच्या परिवारातील एका संस्थेचा मध्यंतरी थेट मोहन भागवतांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. आता संघ परिवाराचा पुरस्कार स्वीकारणं, न स्वीकारणं ही प्रत्येकाची भूमिका, पसंती असू शकते, मात्र मग त्यांना निर्भीड, किंमत चुकवण्याची तयारी असलेले वगैरे गुण चिकटवण्याची गरज नाही. मराठी पत्रकारितेत अग्रलेख मागे घेण्याची नामुष्की फक्त गिरीश कुबेर यांच्याच नावावर आहे, हे शिरसाठ यांना माहीत नाही का?

आता केतकर आणि टिकेकर संपादक म्हणून कसे होते, त्यावर थोडं बोललं पाहिजे. टिकेकर तर एकदम बोजड आणि काहीही सामाजिक भान नसलेले संपादक होते. मी त्यांच्या हाताखाली ‘लोकमत’मध्ये काम केलेलं आहे. त्यांनी वैयक्तिक पातळीवर ‘लोकसत्ता’मध्ये सीकेपी पत्रकारांची गोची केली. जातीसाठी माती खाण्याची परंपरा पत्रकारितेतही आहे, किंबहुना थोडी जास्तच आहे. गडकरीच्या काळात ‘लोकसत्ते’त सीकेपीची चलती होती, टिकेकरांनी आपल्या पोटजातीच्या कर्मचाऱ्यांना झुकतं माप दिलं.

टिकेकर यांनी ‘लोकसत्ते’तील पत्रकारांच्या भ्रष्टाचारावर अंकुश आणला, पण इतर नैतिकतेच्या बाबतीत टिकेकर काही फार ग्रेट नव्हते. केतकरांचा चेहरा कितीही पुरोगामी असो, ते संपादक म्हणून आपल्या पोटजातीच्या म्हणजे चित्तपावन ब्राह्मणांच्या पलीकडे पाहू शकले नाहीत. मराठी पत्रकारितेत ज्या काळात ‘लोकसत्ता’, ‘मटा’ची पायरी ओलांडण्याची संधी बहुजन पत्रकारांना नव्हती, त्या काळात निखिल वागळे यांनी बहुजन, दलित तरुणांना संधी दिली. आज अनेक ठिकाणी वागळेंनी संधी दिलेले पत्रकार अनेक पदांवर काम करत आहेत. एका अर्थानं वागळे यांनी मुंबईतील मराठी पत्रकारितेचा ब्राह्मणी चेहराच फाडला असं म्हणता येईल.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

केतकरांनी कधीही त्यांच्या जातीच्या पलीकडे कोणाला संधी दिली नाही. मला त्यांनी ‘लोकसत्ते’त बोलावून घेतलं, पण तेव्हा मला १७ वर्षांचा अनुभव होता. शिवाय तोंडी लावायला माझ्यासारखे पत्रकार लागतातच. केतकरांनंतर ‘मटा’चे संपादक झालेल्या भारतकुमार राऊतांनी अनेक बहुजन पत्रकारांनी नोकरी दिली. केतकरांच्या जातीसाठी माती खाण्याच्या वृत्तीची काही उदाहरणं बघूया.

केतकर आणीबाणीचे कट्टर समर्थक. केतकरांच्या संघविरोधी असण्यात काही विशेष नाही. कारण सावरकरवादी आणि चित्तपावन ब्राह्मण हे संघाच्या विरोधातच होते. संघ ही कऱ्हाडे ब्राह्मणांची संघटना आहे. ‘मुंबई तरुण भारत’ बंद पडल्यावर त्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांना केतकरांनी ‘लोकसत्ते’त संधी दिली. राजीव खांडेकर ‘एबीपी माझा’त गेल्यावर रिक्त झालेल्या निवासी संपादकपदावर केतकरांनी सुधीर जोगळेकर यांची नेमणूक केली. हे जोगळेकर आणीबाणीत संघाचे कार्यकर्ते म्हणून तुरुंगात होते. आता आणीबाणीचं इंदिरा गांधींपेक्षाही जास्त समर्थन करणाऱ्या केतकरांना संघाचे कार्यकर्ते आणि आणीबाणीविरोधक जोगळेकरांना निवासी संपादकपदी नेमण्यात काहीच अडचण झाली नाही, कारण जात- चित्तपावन. व्यवस्थापनानं केतकर यांनाच अचानक नारळ दिला नसता तर केतकरांनी जोगळेकर यांना नक्कीच ‘लोकसत्ते’चं संपादक केलं असतं.

दत्ता पंचवाघ हे दुसरे एक संघी निवृत्त झाल्यावर वृत्त संपादकपदावर एका बहुजन वरिष्ठ उपसंपादकाचा अधिकार होता, त्याची योग्यताही होती, पण केतकरांनी सहा महिने हे पद रिकामं ठेवलं आणि शेवटी एका ब्राह्मण पत्रकाराला बाहेरून बोलावून हे पद दिलं. नारायण राणे यांनी ‘प्रहार’ सुरू केला, तेव्हा राणे केतकरांकडे आले होते. केतकर नवीन वर्तमानपत्र सुरू करण्याची धडाडी का दाखवतील? त्यांनी पुन्हा आपल्या जातीच्या आल्हाद गोडबोले यांना ‘प्रहार’चं पहिलं संपादकपद मिळवून दिलं. अशी कितीतरी उदाहणं मी देऊ शकतो.

जेव्हा वागळे, खाडीलकर मंडल अहवालाच्या अंमलबजावणी आंदोलनात भाग घेत होते, तेव्हा केतकर मंडल अहवालाविरोधात लेखणी चालवत होते. मंडल अहवालामुळे देशात जातीयवाद वाढेल, अशी केतकरांची भूमिका आहे. मंडल अहवालामुळे देशातील ८५ टक्के जनतेला किमान संधी तरी निर्माण झाली हे केतकरांना महत्त्वाचं वाटत नाही. मंडल अहवालामुळे स्वतंत्र भारतात पहिल्यादांच कनिष्ठ जातींना राजकारणात संधी मिळाली, वरिष्ठ जातींच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण झालं, हे सुहास पळशीकर यांचं विश्लेषण, ही केतकरांची खरी पोटदुखी आहे.

इतरांच्या अभिव्यक्तीची काळजी घेणारे केतकर आहेत, असं बर्दापूरकर यांचं निरीक्षण आहे. मात्र केतकर त्यांच्या जातीच्या म्हणजे चित्तपावनांच्या विरोधात कोणी असेल, लिहीत असेल तर या अभिव्यक्तीचा विचार करत नाहीत. वाजपेयीच्या काळात संसदेत सावरकरांचं तैलचित्र लावण्यात आलं. त्या वेळी मोठा वाद निर्माण झाला होता. सावरकर यांचं तैलचित्र संसदेत लावणं कसं महत्त्वाचं, ऐतिहासिक आहे, अशी मांडणी केतकरांनी केली. तेव्हा काँग्रेसचे समर्थक असलेल्या केतकरांना काँग्रेसची सावरकरांबाबत काय भूमिका आहे, हे महत्त्वाचं वाटत नाही किंवा या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असंही त्यांनी कधी केलं नाही, कारण काँग्रेसपेक्षा सावरकर यांचं चित्तपावन असणं केतकरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे.

त्यावेळी प्रा. शमा दलवाई यांनी सावरकरांचं विश्लेषण करणारा लेख ‘लोकसत्ता’कडे पाठवला होता, केतकरांनी तो प्रसिद्ध केला नाही, त्यांनी फक्त सावरकर यांचं गुणगाण करणारेच लेख प्रसिद्ध केले. अशी आहे केतकरांची इतरांच्या अभिव्यक्तीची दखल घेण्याची नि:स्पृह मनोवृत्ती!

देशभर गाजलेलं खैरलांजी हत्याकांड हे जातीय अत्याचार नाही तर प्रेमप्रकरणातून घडलं, असा शोध केतकरांनी लावला. या हत्याकांडाच्या निषेधार्थ उल्हासनगरला आंबेडकरी युवकांनी डेक्कन क्विनला आग लावली. तेव्हा ‘महाराष्ट्रात आगडोंब’ अशी हेडलाईन केतकरांनी ‘लोकसत्ते’त दिली. डेक्कन क्विन जळाली म्हणजे महाराष्ट्राचं भूषण जळालं, असा अग्रलेख केतकरांनी लिहिला.

टिळकही चित्तपावनांचं हित जपणारे नेते होते, चित्तपावनांची पेशवाई बुडाल्याचं टिळकांना भारी दु:ख होतं, इंग्रजांची सत्ता जाऊन पुन्हा पेशवाई आली पाहिजे, अशी टिळकांची भूमिका होती, असं ज्येष्ठ विचारवंत शरद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. हे लक्षात घेतलं तर शिरसाठ म्हणतात तसं केतकर टिळकांच्या स्कूलचे शोभतात. कारण केतकरांचा बहुजनांच्या मंडल अहवालाला विरोध, डाव्या विचारांच्या संघटनांच्या झेंड्याखाली काम करणाऱ्या कामगारांना विरोध, दलितांना विरोध, शिवाजी महाराजांना विरोध. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला, तेव्हा केतकरांनी विरोधात लेखणी उगारलीच.

इथे पर्यावरणवाद्यांचा विरोध आणि केतकरांचा विरोध यात गुणात्मक फरक आहे. राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या पुण्यातील भांडारकर संस्थेवर काही बहुजन युवकांनी संताप व्यक्त केला, संस्थेची तोडफोड केली, (पुस्तकांची नासधूस केली नाही, पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तशी नोंद आहे.) तर या घटनेनंतर केतकरांनी बहुजनांना ज्ञानांचं शत्रू ठरवलं, ‘लोकसत्ते’त तसा अग्रलेख लिहिला. एवढ्यावरच केतकर थांबले नाहीत तर ‘लोकसत्ते’च्या वाचकांकडून लाखो रुपये निधी जमवून केतकरांनी या संस्थेला दिला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशी कर्तबगारी, अशी उदारता केतकरांनी इतर कोणत्याच विषयाबाबत, समाजाबाबत आपल्या पूर्ण संपादकीय आयुष्यात दाखवलेली नाही. केतकरांना परभणीला थोडी धक्काबुक्की झाली होती. ही घटना काही केतकरांनी बहुजनवादी किंवा काही पुरोगामी भूमिका घेतली म्हणून झाली नव्हती, तर ते आपल्या जातीच्या संमलेनासाठी गेले होते, तेव्हा ही घटना घडली होती. याच जातीचं संमेलन पुण्याला झालं होतं, तेव्हा केतकरांनी या संमेलनाला जाणाऱ्या ब्राह्मणांच्या वाहनांना टोलमाफी देण्यासाठी टोलच्या ठेकेदाराकडे शब्द टाकला होता आणि सर्वांना टोलमाफी मिळाली होती. हेही चित्तपावन ब्राह्मणांचं वर्चस्व असलेलं संमेलन होतं.

ज्या दशकाचा शिरसाठ ‘केतकर–टिकेकर पर्व’ असा उल्लेख करतात, त्या काळात पत्रकारितेची सर्व मूल्ये बदलत होती. सर्वत्र ठेकेदारी सुरू झाली होती. इतर कामगारांप्रमाणेच पत्रकारितेतही असुरक्षितेता निर्माण झाली होती. या काळात केतकर-टिकेकर यांनी पत्रकारांसाठी काय केलं? ‘लोकसत्ता’, ‘मटा’मध्ये कायम सेवेत असलेल्या पत्रकारांना ठेकेदारीवर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जेवढा छळ करता येईल, जे काही डावपेच आखता येतील ते केतकरांनी अंमलात आणले. त्यांच्या मानसिक छळाच्या कहाण्या त्यांच्याकडून ऐकल्या पाहिजेत. असे अनेक जण आजही मुंबईत आहेत. या अंगानेही हे दशक केतकरांचंच समजलं पाहिजे.  

आजही एकूणच पत्रकारितेचा चेहरा ब्राह्मणी आहे, सर्व महत्त्वाच्या पदावर आजही ब्राह्मणांचंच वर्चस्व आहे. हे फक्त मराठी पत्रकारितेचं चरित्र नाही, तर देशभर अशीच परिस्थिती आहे. केतकर याच प्रवाहापैकी एक आहेत.

केतकरांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा…

..................................................................................................................................................................

लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.

bandhulone@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा