आपण शिक्षण देत गेलो, मात्र इप्सित ‘भारतीय माणूस’ आपल्याला तयार करता आला नाही. त्याऐवजी ‘परीक्षार्थी’ तयार करणे हेच आपले ध्येय बनले!
पडघम - सांस्कृतिक
राजन गवस
  • दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि राजन गवस
  • Sat , 30 January 2021
  • पडघम सांस्कृतिक दहावे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन Shikshak Sahitya Sammelan राजन गवस Rajan Gavas

दहावे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आज, ३० आणि उद्या, ३१ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने होत आहे आहे. हे संमेलन ‘शिक्षक भारती’च्या युट्युब चॅनेलवर (https://www.youtube.com/c/ShikshakBharati) पाहता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मश्री डॉ. गणेश देवी करणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे समारोप करणार आहेत. संमेलनात माजी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा, आमदार कपिल पाटील, लोकशाहीर संभाजी भगत, लोक कवी अरुण म्हात्रे, रणजितसिंह डिसले यांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथा-कादंबरीकार डॉ. राजन गवस आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

१.

मित्रहो, शिक्षक वर्तन, परिवर्तन घडवत असतो आणि चांगल्या समाजाची, चांगल्या माणसाची निर्मिती करण्यासाठी तो झटत असतो. म्हणजे शिक्षणामध्ये वर्तन, परिवर्तन केंद्रवर्ती असते. साहित्य हेसुद्धा चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठीच कार्यरत असतं आणि अधिक चांगला समाज निर्माण होण्याचा ध्यास ते घेत असतं. त्यामुळे साहित्य लिहिणारा हा नेहमी व्यवस्थेतील त्रुटीवर बोट ठेवत असतो आणि चांगल्या समाज निर्मितीची अपेक्षा करत असतो. अशा अर्थी लेखक आणि शिक्षक हे दोघेही एकच काम करत असतात. दोघेही योग्य रीतीने जर कार्य करू लागले तर चांगला समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अशा अर्थी दोघांच्याही जवळ प्रतिभेची गरज असते. म्हणजे शिक्षक हा अधिक प्रतिभावान असणं गरजेचं असतं. कारण, राष्ट्र उभारणीमध्ये तो प्रचंड मोठे योगदान देत असतो आणि त्याच्यावर राष्ट्राची उन्नती अथवा राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. म्हणजे शिक्षक हा लेखकाइतकाच महत्त्वाचा घटक आहे आणि हे दोन्हीही घटक चांगल्या समाज निर्मितीसाठी कार्यरत असल्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हे शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये संयोजकांनी ऑनलाईन संमेलन घेण्याचे ठरवल्यामुळे माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्यासमोर या निमित्तानं ठेवणार आहे. हा ऑनलाईन भाषणांचा धुमाकूळ आता शिक्षणातही घुसला आहे. ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षक ऑनलाईन तास घेत आहेत. ही व्यवस्था किती सुंदर आहे, याचे विवेचन ऑनलाईन भाट करत आहेत. आता ना शिक्षकाची गरज, ना शाळेची इमारत हवी, ना खेळाचे मैदान हवे. यातून टेक्नोपिढी निर्माण होऊन आपला देश महासत्ता बनणार आहे. अशी ही भाटगिरी जोरजोरात सुरू आहे.

त्याच वेळी खेड्यापाड्यात वीज नाही, मोबाईलला रेंज नाही, घरात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थी मात्र घाबरागुबरा होऊन बसला आहे. पालकाला याविषयी विचार करायला सवडच उरली नसून त्याची पोटाची लढाई हातघाईवर आली आहे. महागाईने उच्चांक गाठला असून सामान्यांचे जगणे हतबल झाले आहे. मोबाईलसाठी कर्ज देता का, म्हणून गोरगरीब लोक सावकाराच्या दारावर घिरट्या घालत आहेत. हे कोणास सांगितले तर, हे महासत्तावाले ठग गोरगरिबांची खिल्ली उडवत आहेत. अशा काळात मी ऑनलाईन संमेलनाचे अध्यक्षीय भाषण करणार आहे.

२.

शिक्षक म्हणून आणि लिहिणारा म्हणून मला काही म्हणता येईल एवढी तुटपुंजी शिदोरी माझ्याकडे आहे. आज शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आणि लेखक हा कधीच निवृत्त होत नसतो, हे माहीत असल्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न मी आपल्यासमोर उपस्थित करत आहे. त्याचा विचार आपण करावा असे माझे अजिबात म्हणणे नाही.

गेली चाळीस वर्षे अध्ययन, अध्यापनाच्या क्षेत्रात वावरल्यानंतर मला सतत हा प्रश्न पडलेला आहे की, आपल्या प्रशिक्षण वर्गात आणि शिक्षणशास्त्र विभागात शिक्षणाचा इतिहास नीट शिकवला जात नाही. भारतीय शिक्षणाचा इतिहास लक्षात घेत असताना गुरूकुल शिक्षण व्यवस्थेविषयी भरभरून लिहिले जाते, बोलले जाते. ही प्राचीन गुरूकुल शिक्षण व्यवस्थाही बदलत आलेली आहे. कधी काळी ती समृद्ध होती. नंतर ती जातीच्या भिंतीत अडकली. पण ही गुरूकुल व्यवस्था फक्त अभिजन वर्गास उपलब्ध होती. बहुजणांना येथे प्रवेश असण्याची शक्यता नव्हती. म्हणजे या कालावधीत गुरूकुलमध्ये शिकणारे लोक वगळता अन्य बहुजन समाजाची काही शिक्षणव्यवस्थाच नव्हती, असे चित्र आपल्यासमोर रंगवले जाते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

.................................................................................................................................................................

यातून माझ्या मनात उद्भवणारा नेहमीचा प्रश्न, बहुजनांमध्ये कोणतीच शिक्षणव्यवस्था नव्हती, हे जर खरे असेल तर इतकी हजार वर्षे हा समाज तगून कसा राहिला? ज्या अर्थी इतकी हजार वर्षे हा समाज तगून आहे, त्या अर्थी त्यांच्या त्यांच्या शिक्षणव्यवस्था अस्तित्वात असल्याच पाहिजेत. पण याकडे मात्र आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि बहुजन समाज हा अडाणी समजून त्यांच्या ज्ञानव्यवस्थेला दुर्लक्षित केले.

‘अडाणी’ हा शब्द गुरूकुल व्यवस्थेतील नाही. तो शब्द शेतकऱ्याचा आहे. शेतकरी कोणास अडाणी म्हणतो, हे जर आपण शोधले तर आपल्याला असे लक्षात रेईल की, ज्याला नांगर धरता येत नाही, ज्याला कुळव मारता येत नाही, ज्याला कोळपणी, खुरपणी कळत नाही, मळणी, कापणी याबाबत जो अनभिज्ञ आहे, अशास शेतकरी ‘अडाणी’ म्हणत होता. त्याचा हा शब्द अलगद उचलून नंतरच्या काळात ज्याला अक्षर वाचता, लिहिता येत नाही त्यास ‘अडाणी’ समजण्याचा अत्यंत चलाखीने डाव खेळला गेला. यातून आपल्या समाजात अक्षर येते तो ‘ज्ञानी’ आणि अक्षर येत नाही तो ‘अडाणी’ असा समज सर्वमान्य करण्यात अक्षरपरिचित लोक यशस्वी झाले. यामुळे आपण काय गमावतो आहोत, याचेही भान कोणास राहिले नाही.

‘आपल्या शिक्षणाचा इतिहास एका समृद्ध ज्ञानपरंपरेकडे पाठ फिरवून सुरू झाला’, असे वाक्य उच्चारले की, अनेकांच्या भुवरा उंचावतात आणि हे लोक आपल्याकडे काहीच नव्हते. फक्त जातिव्यवस्थने बरबटलेली ग्रामव्यवस्था, रोगराई, अंधश्रद्धा एवढेच होते, असे सांगायला विसरत नाहीत. आपल्याकडे जातिव्यवस्था क्रूर स्वरूपात अस्तित्वात होती. अंधश्रद्धा होत्या. विविध रूढी, परंपरा, समजुती होत्या, हे खरेच आहे. त्यांचे स्वरूप भयावह आणि भीषण होते, हेही नाकारण्यात काही अर्थ नाही. पण याचा अर्थ या समाजाकडे ज्ञानव्यवस्था नव्हती. अध्यापन पद्धती नव्हती, असे समजणे केवळ अडाणीपणाचे लक्षण होते, हे कोणीच समजून घेतले नाही.

त्यामुळे भारतीय शिक्षणाचा इतिहास लिहिताना गुरूकुल पद्धती ही एकमेव अध्ययन, अध्यापन व्यवस्था होती, अशी लोणकढी थाप मारून शिक्षणाबाबतचा चुकीचा इतिहास सांगितला गेला व सांगितला जात आहे. यातूनच इंग्रज आले आणि अक्षरकेंद्री ज्ञानव्यवस्था खुली झाली, असेही नमूद केले जाते. पण या नमूद करण्यात आपण एका प्रचंड ज्ञानव्यवस्थेला नकार दिला आहे, याची जाणीव फारशी दिसत नाही. एक महाकाय ज्ञानव्यवस्था वगळून आपल्याकडे बोन्साय शिक्षणव्यवस्था आपण उभी करतो आहोत, याचे भानही फार कोणास राहिले आहे, असे दिसत नाही. जी शिक्षण व्यवस्था एका समाजातील महाकाय ज्ञानव्यवस्थेला नकार देऊन उभी राहते, तेव्हा तिची शोकांतिका अपरिहार्य असते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा, आपल्यातील ज्ञानी लोक संतापाने उसळून विचारतात की, या अडाणी लोकांकडे कोणती ज्ञानव्यवस्था होती. त्यांना मी सांगू इच्छितो की, निरक्षर अडाणी लोकांकडे त्यांची त्यांची शिक्षण व्यवस्था होती. मग यातील पुरोगामी, आत्यंतिक डावे माझ्या म्हणण्याचा संदर्भ सरळ उजव्या विचारसरणीच्या मांडणीशी जोडू लागतात. उजवी विचारसरणी आमच्याकडे गणपती होता म्हणजे प्लास्टिक सर्जरी होती, आमच्याकडे पुष्पक विमान होते, आमच्याकडे अमूक तमूक होते, असे रचित कथन मांडत असते. त्याच्याशी माझे म्हणणे जोडण्याचा प्रयत्न सतत केला जातो. पण मी यापेक्षा काही वेगळे म्हणतो आहे, हे समजून घेण्याची तसदी मात्र कोणी घेत नाही.

माझे म्हणणे इतकेच आहे की, कृषिजन संस्कृतीने स्वतःच्या ज्ञानव्यवस्था विकसित करत आणलेल्या होत्या. म्हणजेच या कृषिजन व्यवस्थेचे स्वतःचे शेतीशास्त्र होते. संगोपनशास्त्र होते. याबरोबरच आहार, वैद्यकीय, बांधकाम, हवामान, शरीरशास्त्र, पशूप्राणिशास्त्र, पक्षी, माती, वृक्ष, वेली याबाबत परंपरागत ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आलेले होते. त्या काळात बांधलेले किल्ले, गावगाड्यातील वाडे, घरे याबाबतचा अभ्यास आपण केला, तर त्या काळी असणारे बांधकामशास्त्र किती प्रगत होते, याचा अंदाज येतो. तोफेचा मारा झाला तरी न पडणाऱ्या भिंती या काळात बांधल्या गेल्या होत्या. प्रचंड महाकाय किल्ले, त्यांची उभारणी याकडे नजर टाकल्यास त्या काळातील वास्तूशास्त्र, बांधकामशास्त्र कसे होते, याचा आपल्याला प्रत्यय येतो.

हीच गोष्ट वनस्पतीशास्त्र, हवामानशास्त्र, आहारशास्त्र, शेतीशास्त्र, प्राणिशास्त्र याबाबतही आपल्याला प्रत्ययास येईल. चामडे कसे कमवावे, वस्त्र कसे विणावे, गुळ कसा करावा, आलेच वादळ तर जीव कसा वाचवावा, याबाबतचे सखोल ज्ञान विविध समाजात होते. प्रत्येक समाजात स्वतःची ज्ञानव्यवस्था होती.

हे सर्व सांगण्याचा हेतू इतकाच, या बहुजन समाजाने आपल्या स्वतःच्या ज्ञानव्यवस्था विकसित करून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत करण्याच्या अध्यापन व्यवस्थाही निर्माण केल्या होत्या. कधी विधीतून, कधी लोकगीतातून, लोककथेतून तर कधी वेगवेगळ्या सणसमारंभातून हे ज्ञान हस्तांतरीत झाले पाहिजे, याची काळजी घेतली जात होती. या काळी आपल्या समाजामध्ये दोन शिक्षण पद्धती अस्तित्वात होत्या.

यातील पहिली गुरूकुल शिक्षण व्यवस्था होय. ही गुरूकुल शिक्षण व्यवस्था पितृसत्ताक होती. या शिक्षण व्यवस्थेचा आधार शब्दप्रामाण्य आणि ग्रंथप्रामाण्य हा होता. येथे प्रश्नाला मज्जाव होता. असे का असे विचारण्याची सोय नव्हती. जे शब्दांत सांगितले जाते, जे ग्रंथात मांडलेले आहे ते विनातक्रार मान्य करावे, हा या व्यवस्थेचा दंडक होता. जन्मश्रेष्ठत्व व जातिविचार हा या व्यवस्थेचा गाभा होता. उच्च जातीत जन्मलेला माणूस कितीही भ्रष्ट असला तरी तो श्रेष्ठच आहे, अशी ही गुरूकुल व्यवस्था सांगत होती.

या सर्व शिक्षण व्यवस्थेचे ध्येय शोषक निर्माण करणे व त्यासाठी कल्पित कथांची वारेमाप उभारणी करणे हे या व्यवस्थेचे सूत्र होते. यातूनच कोण मुखापासून, कोण बाहूपासून, कोण पोटापासून, कोण पायाच्या अंगठ्यापासून जन्माला आला. याचे गौरवीकरण करत शोषकाच्या निर्मितीतून शोषणव्यवस्था घट्ट करण्याचे इप्सित साध्य केले जात होते. या व्यवस्थेत श्रमाला मज्जाव होता. उलट, श्रम करणाऱ्यांचे शोषण करायचे असे अध्याहृत तत्त्व गृहीत होते. स्त्रियांना या शिक्षण व्यवस्थेत स्थान नव्हते.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

अशा या शिक्षणव्यवस्थेला समांतर असणारी बहुजनांची शिक्षण व्यवस्था होती. त्यातून माणसाला माणूस बनवणे हेच अंतिम ध्येय मानून तिची उभारणी केलेली होती. या व्यवस्थेच्या गाभ्यात श्रम हेच मुख्य मानले जात होते. श्रम केल्याशिवाय जगणे निरर्थक आहे, अशी ही व्यवस्था मानत होती. श्रम करणारा ‘माणूस’ असतो आणि श्रम न करणारा ‘ऐदी’ असतो, अशी या शिक्षण पद्धतीची धारणा होती. चांगल्या माणसाची संकल्पना या शिक्षणव्यवस्थेच्या गाभ्यात वसलेली होती. चांगला माणूस म्हणजे काय, याचे साधे सोपे तत्त्वज्ञान ही व्यवस्था मांडत होती. आपल्या आईवडिलांना कोठेही मान खाली घालायला लागू नये, असे जो वर्तन करतो तो चांगला माणूस, अशी या शिक्षण व्यवस्थेची महत्त्वाची मांडणी होती.

या शिक्षण व्यवस्थेत श्रम आणि सत्य गाभाभूत असल्यामुळे ही व्यवस्था मातृसत्ताक पद्धती महत्त्वाची मानत होती. धाक, लाज, कृतज्ञता यावर ही शिक्षण व्यवस्था उभारलेली होती. निसर्गासहीत जगणे हे या शिक्षण पद्धतीत अध्याहृत होते. आपल्या वाट्यास आलेले काम हाच आपला धर्म एवढी मर्यादित या शिक्षण पद्धतीतील धर्माची व्याख्या होती. संपूर्ण माणूस घडवणे हा एकच ध्यास घेऊन आपल्या मुलाचे संगोपन करणे, हे या शिक्षण पद्धतीत महत्त्वाचे मानले जात होते. समूहभाव आणि सहानुभाव यांची निर्मिती आणि पेरणी यासाठी ही शिक्षण व्यवस्था सातत्याने प्रयत्नशील होती. आई ही या शिक्षण विद्यापीठाची कुलगुरू होती.

३.

याउलट, गुरूकुल शिक्षण पद्धतीत उपरोक्त धारण, संकल्पनांना अजिबात स्थान नव्हते. बहुजन समाजाच्या या सर्वस्पर्शी शिक्षणव्यवस्थेचा अंदाज न आल्यामुळे आंग्ल संपर्कात अक्षरातच ज्ञान असते अशी समजूत प्रस्थापित होत गेली होती. यामध्ये तत्कालीन शिक्षणव्यवस्थेचा वाटा प्रचंड आहे.

आंग्लसंपर्कात या बहुजनांच्या महाकार शिक्षण व्यवस्थेला परीघाबाहेर ठेवण्यात गुरूकुल व्यवस्थेचे शिलेदार आणि इंग्रजी शिक्षणव्यवस्थेचे समर्थक यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली. ज्ञान हे अक्षरातच असते असा समज रूढ करण्यात ते यशस्वी झाले आणि शिकवता शिकवता इथल्या माणसाचे निर्जीविकीकरण करून त्याचे वस्तूत रूपांतर कसे करता येईल, याची यशस्वी चाल तत्कालीन राज्यकर्त्यांनी खेळली आणि त्यामुळेच एका महाकाय शिक्षण व्यवस्थेला नकार देऊन गुरूकुल नंतर आंग्ल धर्मप्रसारकांनी व राज्यकर्त्यांनी प्रस्थापित केलेल्या व्यवस्था याच अध्ययन, अध्यापन व्यवस्था आहेत, असे घट्टपणे पेरण्यात यश मिळवले. बहुजनांच्या अध्ययन, अध्यापन पद्धतीला दिलेला नकार हा भारतीय समूहाला खूपच महागात पडला.

आंग्ल संपर्कातील मॅकॉलेप्रणीत शिक्षणव्यवस्थेने भारतीय समाजात टोकाचे गुंते निर्माण केले. यातूनच इंग्रजी ही भाषा ज्ञानव्यवहाराच्या केंद्रभागी आली. या शिक्षणव्यवस्थेने भारतीय समाजाचा चेहरामोहराच बदलून टाकला. येथून पुढे कोट-टाय संस्कृतीचा जन्म झाला आणि इथल्या निसर्गसंवेदी जगण्याला नकार देण्याची प्रवृत्ती रुजत गेली. आपल्याकडे काहीच नव्हते आणि इंग्रजांनी सर्व काही तिकडून आणले यामुळे आपण शहाणे झालो, असा सर्रास दावा मांडण्याच्या प्रवृत्तींनी उचल खाल्ली. जे काही आपल्याकडे आले ते फक्त इंग्रजांनीच आणले आणि आपल्याकडे काहीच नव्हते, अशी भावना आपोआपच खोलवर रुजत गेली आणि बहुजनांची ज्ञानव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था अडगळीत जाऊन पडली. इंग्रजांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिल्या, हे खरेच असले तरी, येथे काहीच नव्हते असे म्हणणे तितकेसे योग्य नाही.

शिक्षणाचा इतिहास लिहिणाऱ्या मंडळींनी गुरूकुल आणि इंग्रजी शिक्षणाचा उदोउदो करण्यात धन्यता मानली. आपण आणि आपला समाज मागास, अतिमागास असे ज्ञानदिवे प्रकाशित करून आपल्या समाजाचा घात केला, हे मी जाणीवपूर्वक म्हणत आहे. कारण, इंग्रजांना येथे जी शिक्षण व्यवस्था उभी करायची होती, त्यातून त्यांना उपयुक्त कारकून वर्ग निर्माण करायचा होता. राज्य चालवण्यासाठी त्यांना सर्वच लोक इंग्लंडमधून आणणे केवळ अशक्य होते. त्यामुळे आपल्याला हवा असणारा कारकून वर्ग आणि सहाय्यभूत ठरणारा इतर प्रशासकीय कामगार वर्ग येथेच तयार झाला तर आपली अडचण दूर होईल या हेतूने येथे शिक्षणाचा आरंभ केला. त्यामुळे इंग्रज काळातील शिक्षणाचे ध्येय कारकून व तत्सम वर्ग तयार करणे हे होते. त्या शिक्षणाच्या उद्दिष्ट्यांची रचनाही आपोआपच सीमांनी बांधली गेली होती. त्या सीमेत राहूनच अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार केले आणि तसाच वर्ग निर्माण व्हावा याचा कडेकोट बंदोबस्त केला. त्यामुळेच आजही अभिमानाने आणि गौरवाने सांगितले जाते की, त्या काळी व्हर्नाक्युलर फायनल (आजची सातवी) पास झाले की, त्या काळी तलाटी, शिक्षक इत्यादी इत्यादी नोकऱ्या सहज मिळून जायच्या. संरक्षण यंत्रणेतही अशा उमेदवाराची भरती सहज केली जायची. कारण, त्या काळी अक्षरप्राप्त माणसांची आपल्या देशात वाणवा होती.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

.................................................................................................................................................................

इंग्रजी शिक्षणाच्या या शैक्षणिक धोरणाला आपोआपच यश प्राप्त होत गेले आणि येथे कारकुनांच्या पिढ्या तयार होत गेल्या. परंतु, शिक्षण आणि नोकरी याची घट्ट गाठ मारून आपला ते लोक घात करत आहेत, याची पुसटशी जाणीवही कोणास राहिली नाही. शिक्षण आणि नोकरी याची इंग्रजांनी मारलेली गाठ आजही आपल्याला सोडवता आलेली नाही. यामुळे आपण ज्ञाननिर्मिती क्षेत्राला वाळीतच टाकून दिले. परंतु, दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा योग्य वापर करून अनन्य साधारण कामगिरी बजावण्याची अनेकांची आकांक्षा फलद्रूप व्हायला एक वेगळी वाट निर्माण झाली. पण या शिक्षणाने श्रमनिष्ठा भारतीय जगण्यातून हद्दपार केली पाहिजे, याची काळजी घेतली. पुढच्या काळात पदवीधर बेकारांच्या फौजा निर्माण करण्याचा हा दूरदर्शी कार्यक्रम होता.

या आंग्ल कारकुनी शिक्षणाने आपल्या समाजाच्या अनेक परंपरागत बलस्थानावर आघात करून या समाजास सर्वदूर खिळखिळे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या समाजात असणारे मानवी संबंधातील विश्वास, नात्यावरची श्रद्धा, जगण्यातील धाक, लाज, श्रम हद्दपार करण्यात हे शिक्षण यशस्वी ठरले. आंग्ल भाषेतून शिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, असे समजून सांगण्याचा चोवीस तास कार्यक्रम सुरू झाला. या आत्यंतिक धुर्त, हेतूपूर्ण आंग्ल संपर्कातील व्यक्तींचा सुसाट वावर सुरू झाला. यातूनच शब्दावरचा विश्वास, सत्याचे मोल, श्रमावरील निष्ठा, निसर्गासहीत जगणे, सोसवेल इतकीच हिंसा करणे, जगा आणि जगू द्या यासारखी मूलभूत जीवनतत्त्वे बाजूला पडली. बेसुमार जंगलातोड, प्रचंड नासाडी आणि व्यक्तीव्यक्तीवरचा विश्वास उडवणारा व्यक्तिकेंद्री निर्धोक कार्यक्रम हाती घेण्यात आला.

यातून पारंपरिक धारणा, समजुती, रूढी, परंपरा, ज्ञानव्यवस्था या टाकाऊच आहेत, अशी मूलभूत वृत्ती निर्माण करण्याचा हेतूपुरस्सर कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावेळी इंग्रजांना फक्त कारकून निर्माण करायचे असल्यामुळे आणि हा समाज ऐदी व निष्क्रिय करायचा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था येथे उभी करणे व रुजवणे स्वाभाविक होते. या शिक्षण व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा गुरूकुल व्यवस्थेतील लोकांनी घेतला आणि त्यांनी स्वतःच वर्तनबदल करून इथल्या सर्व व्यवस्थेचा कब्जा धूर्तपणे घेऊन शोषकाचे आपले अस्तित्व बळकट करून आपल्या पिढ्यांची पुढच्या काळातील जगण्याची सोय निर्माण करून ठेवली. बहुजनातील जे शिक्षित होतील, त्यांनीही आपल्यासारखेच जगले वागले पाहिजे, असे सापळे रचून खेड्यापाड्यातील नवशिक्षितांचे अवस्थांतर होईल याची काळजी घेतली.

४.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या आंग्लप्रणीत शिक्षणव्यवस्थेचा निःपात करून भारतीय शिक्षणव्यवस्था उभी करण्याची मूलभूत गरज होती. अशा वेळी आपल्याकडे शिक्षण या व्यवस्थेला केंद्रीभूत ठेवून भारत उभारणीचे कार्य केले पाहिजे, असे मात्र ज्ञानी माणसांनी ध्यानात घेतले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताच्या जडणघडणीत शिक्षण परीघावर ठेवून अन्य व्यवस्थांच्या बाबतीत अधिक जाणीवपूर्वक कार्य करण्यास सुरुवात झाली. परिणामी भारतीय माणूस तयार करण्याची जबाबदारी झटकली गेली आणि आपल्याकडच्या राष्ट्र उभारणीचा पायाच ठिसूळ होत गेला, असे म्हणायला जागा आहे.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला कोणत्या नागरिकाची गरज आहे याची जाणीव ठेवून भारतीय माणूस तयार करणारी शिक्षणव्यवस्था येथे उभारली गेली पाहिजे होती. पण या कार्याकडे फारशा गंभीरपणे पाहिले गेले, असे पुरावे आपल्या इहिासात सापडत नाहीत. इंग्रजांनी अस्तित्वात आणलेल्या शिक्षणव्यवस्थेचीच डागडुजी करून तीच शिक्षण व्यवस्था पुढे राबवण्याचा प्रयत्न केला गेला.

यावेळी डॉ. जे. पी. नाईक यांनी भारतीय माणूस तरार करण्याची शिक्षणप्रणाली राज्यकर्त्यांसमोर मांडली होती. पण ती तत्कालीन राजकीय व्यवस्थेच्या पचनी पडली नाही. येथूनच आपल्या शिक्षण व्यवस्थेत गंभीर प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रज काळातच या व्यवस्थेला पर्याय उभे करण्याचा प्रयत्न केला होता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबवून या व्यवस्थेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

इंग्रजकालीन शिक्षण व्यवस्था थोड्याफार डागडुजीने येथे कार्यरत राहिल्यामुळे आपल्या शिक्षणाचे ध्येय भारतीय माणूस तयार करणे हे असले तरी त्यानुसार उद्दिष्ट्ये, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके तयार करण्यात आपण हलगर्जीपणा केला. आपण शिक्षण देत गेलो, मात्र इप्सित ‘भारतीय माणूस’ आपल्याला तयार करता आला नाही. माणसाऐवजी परीक्षार्थी तयार करणे हेच आपले ध्येय बनले. याचे परिणाम आपण सर्वदूर आज होताना पाहतो आहोत. या आंग्लधार्जिण शिक्षणपद्धतीने आपल्या राष्ट्र उभारणीलाच खीळ घातली. त्यामुळे आपण शिक्षण देत गेलो आणि कारकून निर्माण करण्याचा इंग्रजांचा कार्यक्रम जसाच्या तसा सुरू ठेवला. यामुळे आपण आपली शिक्षणपद्धती विकसित न करता उसण्या शिक्षण व्यवस्थेचा अंगीकार करत आपल्या समाजाच्या घडणीचा आपल्याला उपलब्ध असणारा पर्याय आपण नाकारला. या आंग्लप्रणीत शिक्षण व्यवस्थेत आजही आपण कारकुनांचीच निर्मिती करतो आहोत, असे म्हटले तर त्याचा प्रतिवाद करणे केवळ कठीण आहे.

स्वातंत्र्यानंतर केवळ कारकुनी निर्मितीबरोबरच शिक्षण व्यवस्थेत सर्व अपप्रवृत्ती सहज घुसू शकतील, अशी प्रवेश यंत्रणा आपण खुली करून ठेवली. तरीही इथल्या कृषिप्रधान व्यवस्थेतील शिक्षण व्यवस्थेच्या अवशेषरूप खुणा शिल्लक उरल्यामुळे त्या आधारेच आपल्या समाजाच्या घडणीस उपयुक्त असे विचार प्रवाह निर्माण झाले.

या विचार प्रवाहांचा उद्गम आणि विकास शोधायचा झाला तर महात्मा फुले या शिक्षण महर्षीला सगळे श्रेय द्यावे लागेल. आंग्ल पठडीतील शिक्षण घेऊन कृषिजन परंपरेतील ज्ञानव्यवस्थेचा बळकट आधार स्वतःत जिवंत ठेवणाऱ्या महात्मा फुलेंनी नव्या शिक्षण व्यवस्थेची अत्यंत प्रगल्भ सूचन यंत्रणा तयार केली होती. श्रम आणि शिक्षण याची सांगड घातल्याशिवाय हा देश उभारणे कठीण आहे, याची जाणीव महात्मा फुले यांना होती. त्याचबरोबर स्त्रीशिक्षण हे भारतीय समाजाच्या सर्व दुखण्यावरील एकमेव औषध आहे, हे महात्मा फुलेंनी हेरले होते. त्यातूनच नव्या शिक्षण व्यवस्थेला जन्म देण्याचा प्रयत्न केलेला होता. फुलेंसारखा समाजशिक्षक कोणती शिक्षणव्यवस्था सुचवू इच्छितो आहे, हेच नंतरच्या पिढ्यांच्या ध्यानात आले नाही. स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यात सर्वदूर शाळा सुरू करण्यात आल्या. पण त्यांचे भारतीय अभ्यासक्रम, पाठ्यक्रम मात्र इथल्या व्यवस्थेला तयार करता आले नाहीत.

त्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि त्यातून आंग्लकालीन कारकुनी शिक्षण देण्याचे प्रयत्न तहहयात जिवंत ठेवण्यात आले. प्रत्येक वेळी या आंग्लप्रणीत शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार करत आपण शिक्षणात खूपच चांगली कामगिरी करतो आहोत, या भ्रमात आपण राहिलो आणि शिक्षणाबाबत गंभीरपणे विचार करणे आपण टाळले. स्वतंत्र भारतातील शिक्षण व्यवस्थांचे जाळे सर्वदूर पसरले. पण त्या शाळा, कॉलेजातून शिक्षण मात्र इंग्रज काळातील व्यवस्थेला शरण जाऊनच दिले जाऊ लागले. याचा परिणाम आजतागायत आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था उभी करता आली नाही. ज्या देशाला स्वतःची शिक्षण व्यवस्था उभी करता येत नाही, त्या देशाला स्वतःचे भवितव्य फार कणखरपणे उभे करता येते, असे मात्र म्हणता येत नाही. याचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येतो आहे.

५.

आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत. माध्यमिक शाळा आहेत. महाविद्यालये आहेत. विद्यापीठे आहेत. प्रत्येक राज्याचे शिक्षण खाते आहे. विद्यापीठ अनुदान आयोगासारखी राष्ट्रीय संस्था आहे, एनसीटीई, एनसीआरटी यासारख्या संस्था आहेत. पण शिक्षण मात्र आंग्ल पठडीतील आणि आंग्ल आराखड्यानुसारच दिले जाते आहे. अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो की, भारतीय शिक्षणाचा विचार मांडणारा शिक्षणशास्त्रज्ञ मात्र आपल्याकडे निर्माण होऊ शकला नाही.

याला अपवाद फक्त डॉ. जे. पी. नाईक हे होत. ही एकमेव व्यक्ती वगळता आपल्याकडे शिक्षणशास्त्रज्ञ झाला नाही. हे अतिशयोक्तीपूर्ण वाटले तरी ते खरे आहे. आजची संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही पारतंत्र्यातील मेकॉलेप्रणीत शिक्षण व्यवस्थेची डागडुजी केलेली सुधारित आवृत्ती आहे. त्यामुळे येथे पैसा कमावणारे, शोषण करणारे नोकर, राज्यकर्ते तयार होतात. पण ‘भारतीय माणूस’ तयार होत नाही.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

अशा व्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरांवर शिक्षक म्हणून काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे की, आपल्याकडे शिक्षणात काहीच घडले नाही किंवा कोणी जाणीवपूर्वक काही घडावे म्हणून प्रयत्नही केला नाही. आपण आपली एकही भारतीय अध्यापन पद्धती विकसित करू शकलो नाही. हे किती मोठे दुर्दैव आहे. आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा मुख्य आधार ही व्याख्यान पद्धती आहे. फार तर याच्या जोडीला कथन आणि प्रश्न पद्धतीचा आपण उपयोग करत असतो. ‌व्याख्यान ही एकमार्गी चालणारी आणि विद्यार्थ्याचा कोणताही सहभाग अपेक्षित न मानणारी अशी अध्यापन पद्धती आहे. शिक्षकाने बोलत राहायचे आणि विद्यार्थ्याने ऐकत राहायचे. एवढेच या व्याख्यान पद्धतीत गृहीत आहे. त्यात वर्ग अध्यापनाची आंतरक्रिया कशी घडणार आणि वर्तनबदल कसे होणार?

ही एकमार्गी चालणारी अत्यंत बथ्थड अशी पद्धती आहे. पण तीच भारतीय शिक्षणाच्या गाभ्याला असाध्य रोगासारखी चिकटून बसलेली पद्धती आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षक बोलत जातात आणि विद्यार्थी ऐकत जातात. एकमार्गी चालणारी ही क्रिया विद्यार्थ्याचा कोणता वर्तनविकास घडवून आणणार, असा प्रश्नही कोणाला पडला नाही. पडत नाही. बरे ही आंग्ल संपर्कातील व्याख्यान पद्धती विकसित करण्याच्या पुरेपूर व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात होत्या, आहेत. पण त्यांचा उपयोग करून व्याख्यान पद्धतीला नवे आयाम प्राप्त करून द्यावेत, असे कोणाला वाटले आहे, असे आपल्याकडे दिसत नाही.

आपल्या मौखिक परंपरेत कीर्तन, गोंधळाची कथा, जागरणातील कथनव्यवस्था अस्तित्वात आहेत. याआधारे व्याख्यानाला अधिक बहुआयामी करता येणे शक्य होते. पण तसे प्रयत्न झाल्याचेही आपल्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे वर्गात जाऊन पंचेचाळीस मिनिटे बडबडणे एवढीच आपल्याकडे वर्गअध्यापनाची पद्धती अस्तित्वात आहे.

भारतीय समाज हा कथन परंपरांनी समृद्ध आहे. या कथन परंपरांच्या आधारे आपली स्वतंत्र अध्यापन पद्धती विकसित करण्याची पुरेपूर संधी आपल्याकडे अस्तित्वात असताना आपण त्याबाबत किंचितही विचार करू शकलो नाही, हे आपले अपयश आहे. अजूनही आपले शिक्षण हार्बाटच्या पंचपदीपलीकडे फारसे गेले नाही. यातून चांगला विद्यार्थी निर्माण व्हावा, भारतीय माणूस तयार व्हावा, अशी अपेक्षा कशी काय बाळगणार?

आंग्ल संपर्कातील शिक्षण किमानपक्षी खुले होते. त्याच्यात व्यक्तिमत्त्व विकासाच्या शक्यता होत्या. कारकून निर्मिती हे जरी त्याचे ध्येय असले तरी त्यातील फटी शोधून संपन्न व्यक्तिमत्त्व तयार होण्याची शक्यता होती. अशा फटी शोधून एकोणिसाव्या शतकात स्वतंत्र विचाराचे आणि प्रतिभेचे अनेक विचार पुरुष आपल्याकडे निर्माण झाल्याचे पुरावे आपल्याला देता येतात. पण स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र विचाराचा नागरिक तयार होण्याच्या या फटी आपल्या शिक्षणव्यवस्थेने लिंपून टाकल्या. त्यामुळे स्वतंत्र विचाराचे, स्वतंत्र प्रतिभेचे लोक निर्माणच होऊ नयेत, याचा बंदोबस्त स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणव्यवस्थने प्रयत्नपूर्वक केला. भरीस भर म्हणून शिक्षणाला ध्येय असते. शिक्षणाची उद्दिष्ट्ये असतात. उद्दिष्ट्यांतून अभ्यासक्रम जन्माला येतो. अभ्यासक्रमातून पाठ्यक्रम तयार केला जातो. ध्येय, उद्दिष्ट्ये, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम यांच्या दिशादर्शनातून पाठ्यपुस्तक निर्माण होते. ही साखळीच हेतूपुरस्सर विस्मरणात टाकण्यात आली आणि पाठ्यपुस्तक हेच अंतिम मानून आपली अध्ययन, अध्यापन व्यवस्था आकाराला येत गेली.

.................................................................................................................................................................

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa

.................................................................................................................................................................

यामुळे पाठ्यपुस्तक आणि वार्षिक परीक्षा यांची घट्ट गाठ मारली गेली. नेमून दिलेले पाठ्यपुस्तक आणि त्या पाठ्यपुस्तकाच्या आधारावर परीक्षेत उत्तरे लिहून गुणवान ठरण्याचा अभिनव उपक्रम आपल्याकडे सुरू झाला. या गुणांच्या आधारे डॉक्टर, इंजिनीअर, सरकारी अधिकारी, वकील, कारकून, खासदार, आमदार व्हायचे आणि आपल्या समाजाला लुटायचे असा थोर कार्यक्रम सुरू झाला. या साऱ्यात आपल्याला हवा असणारा भारतीय माणूस, त्याचे सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, जगण्याशी दोन हात करण्याच्या त्याच्या सर्व सुप्त गुणांचा विकास इत्यादी इत्यादी बाबी शिक्षणातून हद्दपारच झाल्या आणि गुणवत्तेचे एकमेव मापदंड म्हणजे त्याला परीक्षेत मिळालेले गुण असा समज रुजत गेला.

या परीक्षेतील गुणांवर अतिरिक्त भिस्त ठेवून आपण नव्या समाजाचे स्वप्न पाहू लागलो. यामुळे शिक्षणातील इतर सर्व वर्तनबदलाच्या शक्यता आपण फेटाळून लावल्या. परीक्षेतील मार्क हीच बुद्धिमत्तेची एकमेव कसोटी मानून आपण आपल्या समाजाचा विध्वंस सुरू केला. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उच्चशिक्षणातील प्रवेश नियंत्रित केल्यामुळे आपल्याकडे या गुणांना अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले. यातूनच अनेक शैक्षणिक अपप्रवृत्तींना आपण जन्म दिला.

शाळा, महाविद्यालये अस्तित्वात असताना आजही खासगी क्लासेसची अपप्रवृत्ती शिक्षणात निर्माण करण्याचे असाधारण कर्तृत्व आपण केले. लाखभर पगार देऊन नेमलेल्या शिक्षकाला बाजूस सारून खासगी शिकवण्यांवर भरवसा ठेवणारा पालक वर्ग आपण निर्माण केला. आज तर अवस्था अशी आहे की, वर्गात फक्त विद्यार्थ्याची नोंदणी होते आणि वर्षभर तो खासगी शिकवणुकीसाठी शाळाबाह्य ठिकाणी उपस्थित असतो. मग पगारी शिक्षक हवाच कशाला? असा प्रश्नही कोणाला पडत नाही.

या खासगी शिकवण्यांचा अनियंत्रित सांड, शिक्षणव्यवस्थेत धुमाकूळ घालत असताना कोणालाही त्याविषरी ब्र काढण्याची इच्छा होत नाही. खासगी शिकवण्यातून आपले पाल्य गुणांच्या शर्यतीत अव्वल ठरणार आहे, ही धारणा पालकांच्या मनात ठासून भरल्यामुळे अख्खी शिक्षण व्यवस्थाच मोडकळीत काढण्याचा प्रयत्न सर्वदूर यशस्वी झालेला दिसतो.

परीक्षेतील मार्कांना अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाल्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतूच गायब झाल्याचे कोणालाच काही वाटत नाही. ही आश्चर्यकारक परिस्थिती आहे. अशा या शिक्षण वर्तमानात शासनाच्या तुघलकी निर्णयाने हे संपूर्ण क्षेत्रच मोडकळीस आणलेले आहे. खासगी विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर शिक्षणव्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ उडाला. शिक्षणाला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले. शिक्षणात खासगी शिक्षण सम्राट निर्माण झाले आणि किराणा मालाचे दुकान निघावे तशा शाळा, कॉलेजच्या अमाप निर्मितीला प्रारंभ झाला. या खासगी शिक्षण सम्राटांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच आपल्या दावणीला बांधली आणि शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला. पूर्वी कधी काळी गावातील रिकाम्या मंदिरात शाळा भरायच्या, त्या आता कोंबड्याच्या खुराड्यात, जनावरांच्या गोठ्यात, बंद पडलेल्या गोडवूनमध्ये आणि न विकल्या गेलेल्या अपार्टमेंटमध्ये भरू लागल्या. मैदानाचा पत्ता नाही. इमारतीचा ठावठिकाणा नाही. प्रशिक्षित शिक्षकांचा भरणा नाही. अशा अवस्थेत कोणीही गावठी दारूचा गुत्ता चालवणारा माणूसही शिक्षण सम्राट म्हणून समाजात वावरू लागला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शालेय शिक्षणातून चित्रकला, संगीत, मैदानी खेळ यासारख्या गोष्टी शासनाच्या आशीर्वादाने हद्दपार झाल्या. भरीस भर म्हणून शिक्षण सेवक नावाची नवी गुलामी शिक्षणात निर्माण केली गेली. या खासगी शिक्षण सम्राटांनी शिक्षक या पदाचे सगळे पावित्र्यच घालवून टाकले आणि गुणवत्तेपेक्षा देणगीला महत्त्व प्राप्त झाले. शिक्षक हे पद बाजाराच्या केंद्रभागी आले. ती विक्री खरेदीची गोष्ट बनली आणि शिक्षक भरतीसाठी लाखोंची देवघेव सुरू झाली. स्वातंत्र्यापूर्वी असणाऱ्या शिक्षक या पदाची १९८०पर्यंत थोडीफार प्रतिष्ठा शिल्लक होती. ती या बाजार प्रवृत्तीने पुरती गिळंकृत केली आणि शिक्षक होणे समाजात हास्यास्पद बनून गेले. या सगळ्या गदारोळात शिक्षण ही गोष्ट कुठल्या कुठे उडून गेली.

६.

माझ्या या चाळीस वर्षाच्या शिक्षक म्हणूनच्या आयुष्यात मी माझेच अधःपतन अनुभवत गेलो. अशातच मनाला विकलांग करणाऱ्या अनेक अपप्रवृत्ती जगणे जेरबंद करत होत्या. शिक्षकांच्या संघटना, शिक्षकांच्या पतसंस्था, शिक्षकांच्या विविध ग्राहक संस्था या सगळ्यात शिक्षणाचा झालेला चोळामोळा बघता बघता जीव मेटाकुटीला आला. समाजातून शिक्षक आणि शिक्षण गायब होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. लिहिणारा म्हणून हे सगळेच मला अस्वस्थ करणारे आणि जगणे नकोसे करणारे होते.

आता या समाजातून लेखकच गायब होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जे शिक्षण व्यवस्थेत घडले, तेच साहित्य व्यवस्थेतही घडते आहे. हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. समाजातून शिक्षक आणि लेखक गायब करण्याचा कुटील डाव ज्या लोकांनी खेळण्यास सुरुवात केली, त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ द्यायचे नसतील तर आपण सर्वांनी आदि शिक्षकाचा व आदि लेखकाचा शोध घेऊन त्यास बळ पुरवणे गरजेचे आहे. हे काम इथे जमलेले आमचे शिक्षक करतील याचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा