लेह शहराच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण देणारे पर्यटक हवेत की, वर्षभर थोडे थोडे आणि तेही लडाखमध्ये सर्वत्र जाणारे पर्यटक हवेत? 
पडघम - देशकारण
निवेदिता खांडेकर
  • सोनम वांगचुक आईस स्तुपासह. लेखातील दोन्ही छायाचित्रे - निवेदिता खांडेकर
  • Mon , 04 January 2021
  • पडघम देशकारण लेह leh लडाख Ladakh सोनम वांगचुक Sonam Wangchuk

लोसार हा लडाखी बौद्ध लोकांचा नव वर्षाचा सण इतक्यातच साजरा झाला. आपल्याकडे गुढी पाडव्याला महाराष्ट्रात असतात, तसेच विविध कार्यक्रम, कौटुंबिक भेटी-गाठी, खरेदी आणि पारंपरिक खाद्य-पदार्थांची रेलचेल असा सगळा उत्साह संपूर्ण लडाखमध्ये असतो.

पण इतक्या छान पर्वाच्या वेळी दुर्दैवानं तिथं अगदी मोजके पर्यटक असतात, त्यातही विदेशी जास्त. कारण हा सण लडाखच्या हिवाळ्यात, कधी डिसेंबर, कधी जानेवारीत येतो. सध्या लडाखला जितके पर्यटक जाताहेत, त्यात तिथल्या उन्हाळ्यात, म्हणजेच जून ते सप्टेंबरपर्यंत ९५ टक्के पर्यटक जातात. गेल्या साधारण २०-२५ वर्षांत लडाखची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अगदी साधं उदाहरण. सरकारी आकडे सांगतात ऐंशीच्या दशकात जेमतेम दोन डझन हॉटेल असलेल्या लडाखमध्ये आज जवळजवळ सातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत, ज्यात अगदी स्टार हॉटेल्सपासून साध्या गेस्ट हाउसपर्यंत आणि आजकाल खूपच लोकप्रिय होत चाललेल्या होम-स्टे प्रकारची पण आहेत. यातली ६०-७० टक्के हॉटेल्स एकट्या लेहमध्ये - जी लडाखची राजधानी आहे - आहेत.

त्याला कारणही तसंच आहे. पूर्ण भारतभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथं जातात. त्यातले बहुतांश लेहमध्येच थांबून, लेह शहर, आसपासच्या जागा आणि दूर पँगाँग सरोवर बघून येतात. काही जण नुब्रा वॅलीलाही जातात. पण एकूणच सगळा भार लेह शहरावर आहे. त्या तीन-चार महिन्यांत जवळ जवळ अडीच लाख पर्यटक लडाखला भेट देतात. हा आकडा किती मोठा आहे, हे समजायला लेह शहराची लोकसंख्या माहिती हवी. ती आहे फार फार तर ४०,०००. म्हणजे लोकसंख्येच्या जवळजवळ सहापट जास्त पर्यटक येतात, त्या चार महिन्यांत.

याचा नको तेवढा ताण लेहच्या नैसर्गिक संसाधनांवर पडतो आहे. पारंपरिक पद्धतीनुसार सगळ्या लडाखी लोकांची पाण्याची आवश्यकता फारच कमी आहे. वाहते नळ ही तिकडे संकल्पनाच नव्हती. पण आता लेह शहरात हॉटेल्सचा इतका बजबजाट झालाय की, जवळच वाहणाऱ्या लेह टोकपो (लेह नावाची छोटी नदी)चं पाणी पुरेनासं झालंय आणि चक्क बोरवेल्स टाकून भूजलाची पातळी सतत खाली खाली जाते आहे. बरं प्रश्न इथंच संपत नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

सगळ्या हॉटेल्स, गेस्ट हाउस आणि होम स्टे मिळून सहा हजार खोल्या आहेत. म्हणजे किमान तितके आधुनिक संडास. विडंबन बघा, आम लडाखी माणूस कोरडे (बिना पाण्याचे) संडास वापरतो. मात्र आपल्या अतिथींकरता आधुनिक संडास वापरून पाणी वापरलं जातं, याचं त्याला भानही नाही. मग पाणी वापरणारा संडास आला की, त्या पाण्याच्या शुद्धीकरणाचाही प्रश्न आला. जी गोष्ट पाण्याची, तीच इतर संसाधनांची. तिथली जमीन, कचऱ्याचे वाढते डोंगर, टुमदार लाकूड आणि मातीची घरं जाऊन सिमेंट-विटांची घरं, खाण्या-पिण्याच्या सवयी, सगळंच बदलत गेलं.

लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर

मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यावर तर परिस्थिती फार म्हणजे फार झपाट्यानं बदलत आहे. तिथे केंद्र शासनाने नवीन उद्योग सुरू करण्याचे मनसुबे रचलेत. बाहेरील मंडळींना तिथं जागा उपलब्ध करून देऊन नवे रस्ते, नव्या पायाभूत सोयींची निर्मिती करण्याचं जाहीर केलं आहे. शिवाय, अगदी या वर्षी, काही महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन राष्ट्राला समर्पित झालेला अटल बोगदा, यामुळे तर पर्यटक आणि लडाखेतर मंडळींचे आवागमन वाढणार.

अटल बोगद्यामुळे एकीकडे प्रमाणाबाहेर पर्यटक यायची भीती असली तरी तिलाच उलटवून सोय म्हणून पाहिलं तर चार महिन्यांत होणारी गर्दी आता वर्षभर वाटता येईल. स्विझर्लंड काय, स्कँडेनेवियन देश काय किंवा थंडीतली अमेरिका वा कॅनडा बघायला असंख्य भारतीय पर्यटक जातातच. मग, त्याच किंवा तशाच पर्यटकांनी थंडीतलं लडाख करायला काय हरकत आहे? दिवसा अगदी शून्यापर्यंत उतरणारं तापमान जानेवारी-फेब्रुवारीच्या रात्री हमखास उणे २५, उणे ३०पर्यंत जातं. शेजारच्या काश्मीरच्या बर्फात खेळायला जातात, तसाच, किंबहुना त्याहून जास्त बर्फात इथं खेळायला मिळेल.  

झंस्कार नदीवरचा ‘चादर ट्रेक’ extreme adventure आवडणाऱ्या अनेकांना खुणावतो. थंडीतल्या उणे ३० तापमानात अख्खी नदी गोठलेली असते, जिला ‘चादर’ म्हणतात. त्यावरून चालत, रात्री तंबू त्याच गोठलेल्या नदीकिनारी लावून थांबायचं, असा तो जबरदस्त ट्रेक असतो. शिवाय तिथं असंख्य छोटी-मोठी पर्वत शिखरं आहेत, जी सर करणं अनेकांचं स्वप्न असतं. हेमिस अभयारण्य, काही शतकं जुने गोम्पा (लडाखी बौद्ध मंदिरे) एक नाही अनेक आकर्षणं आहेत, ज्यांना थंडीतही भेट देता येऊ शकते.

लेह व्यतिरिक्त इतरही जागा 

लेह शहराजवळ आहे सेकमॉल शाळा. आणि त्याची संकल्पना आहे सोनम वांगचुक (त्यांच्या आयुष्यावर ‘थ्री इडियट्स’मधलं फुन्गसुक वाङ्गडू हे पात्र बेतलेलं आहे!) यांची. त्यांनी लडाखच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठं काम उभारून ठेवलंय. आणि आता त्याहून पुढे जाऊन त्यांनी शाश्वत विकासाची कास धरत स्थानिक युवकांसाठी रोजगार देईल असं शिक्षण सुरू केलंय. त्याकरता एक मोठं विश्वविद्यालय तिथं उभं राहतंय. ते पूर्ण होईल तेव्हा होईल, पण सध्या त्यांची शाळा बघायला आणि गेल्या सहा-आठ वर्षांत त्यांनी केलेला एक भन्नाट प्रयोग बघायला हिवाळ्यातसुद्धा पर्यटक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार लेहला भेट द्यायला लागलेत. Vertical glacier म्हणजे मनुष्यनिर्मित उभी ‘हिमनदी’ म्हणता येईल, असं ‘आईस स्तूप’ हे संयुक्तिक नाव दिलेलं आहे. त्याच्या कल्पनेपासून प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांसोबत अंमलबजावणी करणारे वांगचुक लेह आणि आसपासच्या परिसराचं होणारं नुकसान बघून व्यथित होतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कालच बातमी वाचली की, या वर्षी गावातल्या लोकांच्या मदतीनं विविध गावांमध्ये तब्बल २६ आईस स्तूप बनवले आहेत. सरासरी तीन लाख लिटर पाणी या प्रत्येक आईस स्तुपांमधून हिवाळ्यात धरून ठेवलं जाईल, जे उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेतीला आणि झाडे लावलीत ती जगवायला कामी येईल. पहिला ‘लडाख आईस क्लायम्बिंग फेस्टिवल’ या वर्षी झाला. त्यामुळे स्थानिक युवकांना पर्यावरणपूरक पर्यटन (इको-टुरिझम) क्षेत्रात व्यवसाय संधी उपलब्ध झाल्यात.

या ‘आईस स्तुपांमुळे’ पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढते आहे आणि लोकांना हळूहळू ‘होम-स्टे’ (म्हणजे, कुणाच्या घरातच एक किंवा जास्त अतिरिक्त खोल्या पर्यटकांकरता ठेवणं आणि त्यांना घराच्या पाहुण्यांसारखं खाऊ-पिऊ घालणं; हे अर्थात पैसे देऊन)ची कल्पना आवडायला लागली आहे. स्थानिकांचा आपली घरं होम-स्टेमध्ये बदलण्याकरता आणि पर्यटकांचा हॉटेलमध्ये राहण्याऐवजी होम-स्टेमध्ये राहण्याकडे कल वाढावा. त्याचा फायदा लेह शहरालाही मिळेल. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

“केवळ चार महिने नको तर वर्षभर पर्यटक हवेत, हा तर विचार करण्याजोगा प्रश्न आहेच, पण सोबतच हाही विचार हवा की, एकट्या लेह शहरावर पूर्ण लडाखचा भार नको,” असे वांगचुक सांगतात.

लडाखच्या अंतर्गत भागात कुठलंही गाव खरं तर पर्यटनाकरता उत्कृष्ट. त्यासाठी सरकारने रस्ते असतील हे बघितलं पाहिजे. लोकांनी आणि समाजसेवी संस्थांनी स्थानिक होम-स्टे वाढवून, तिथल्याच लोकांना ‘गाईड’ म्हणून तयार करणं इत्यादी.

कारण वेळ आली आहे. आता लडाखी लोकांना ठरवावंच लागेल की, मोजक्या चार महिन्यांत पर्यटकांची भरमार आणि तेही जास्तीकरून लेह शहराच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण देणारे पर्यटक हवेत की, वर्षभर थोडे थोडे आणि तेही लडाखमध्ये सर्वत्र जाणारे पर्यटक हवेत? 

(या लेखाचा संपादित अंश ‘मैफिल’ दिवाळी अंक २०२०मध्ये प्रकाशित झाला आहे.)

..................................................................................................................................................................

लेखिका निवेदिता खांडेकर या दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार आहेत. त्या पर्यावरण आणि विकास या विषयांवर लिखाण करतात.

nivedita_him@rediffmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा