आजच्या भारताला अजून एका न्या. रानड्यांची आणि अजून एका डॉ. आंबेडकरांची फार गरज आहे…
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ‘रानडे, गांधी आणि जीना’ या पुस्तिकेचे मुखपृष्ठ
  • Mon , 04 January 2021
  • पडघम सांस्कृतिक डॉ. बाबासाहेब आंबेडक न्या. रानडे गांधी जीना

न्या. महादेव गोविंद रानडे यांची १७९वी जयंती १८ जानेवारी रोजी आहे, तर त्यांची १२०वी पुण्यतिथी १६ जानेवारी रोजी. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७८ वर्षांपूर्वी रानडे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त दिलेल्या व्याख्यानात न्या. रानडे यांच्या कार्याचे मूल्यमापन कशा प्रकारे केले होते, याचा परिचय करून देणारा हा उदबोधक लेख आजच्या काळात विशेष मननीय ठरावा…

..................................................................................................................................................................

१८ जानेवारी १९४३ रोजी पुण्याच्या गोखले हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महत्त्वाचे व्याख्यान दिले. विषय होता – ‘रानडे, गांधी आणि जीना’. निमित्त होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची १०१ वी जयंती.

या व्याख्यानाचा जाहीर केला गेलेला विषय ‘रानडे, गांधी आणि जीना’ असा असला तरी आंबेडकरांना न्यायमूर्ती रानडे यांच्यावरच बोलायचे होते, हे व्याख्यान वाचल्यावर स्पष्ट होते. कारण आंबेडकरांना गांधीजी आणि जीना यांच्यापेक्षा न्यायमूर्ती रानडे हे नेते म्हणून मोठे वाटत होते.

रानडे समाजात मूलभूत परिवर्तन यावे म्हणून लढले. त्यामुळे ते आंबेडकरांना गांधीजी आणि जीना यांच्यापेक्षा मोठे वाटत होते. गांधीजी आणि जीना मूलतः राजकीय ध्येयांसाठी लढले. त्यामुळे आंबेडकरांना हे दोघे समाजाचे मूलभूत नेते वाटत नव्हते. समाजात खरे परिवर्तन झाल्याशिवाय आणि सर्व जाती-धर्मात एकी आल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने ‘महान’ होणार नाही, असे रानडे यांचे मत होते.

आंबेडकर व्याख्यानात म्हणतात की, खरी तुलना करायची झाली तर ती रानडे आणि महात्मा ज्योतिबा फुले अशीच झाली पाहिजे. रानडे आणि फुले हे दोघेही आंबेडकरांच्या आधीच्या पिढीतले. आंबेडकरांचा जन्म १८९१चा. फुले यांचे निर्वाण १८९०चे, तर रानडे १९०१मध्ये निधन पावले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आंबेडकर व्याख्यानाच्या सुरुवातीलाच रानड्यांबद्दलची एक आठवण सांगतात. वडिलांच्या मृत्यूनंतर आंबेडकर कागदपत्रे तपासत असताना त्यांना त्यात रानड्यांनी ‘ड्राफ्ट’ केलेले एक पिटिशन मिळाले. १८९२ साली ब्रिटिश सरकारने एक ऑर्डर काढून महार लोकांची सैन्यातली भरती बंद केली होती. त्याच्या विरोधात महार जातीतील सैनिकी अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सरकारकडे एक पिटिशन पाठवले होते. ते रानड्यांनी ड्राफ्ट करून दिले होते.

ही आठवण सांगून आंबेडकर व्याख्यानातील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतात - न्यायमूर्ती रानडे यांना एका ‘महापुरुषा’चा दर्जा देता येईल का? आंबेडकर पुढे सांगतात की, रानडे यांचे समर्थक त्यांना ‘महापुरुषा’चा दर्जा देताना दिसतात, तर त्यांचे विरोधक त्यांना तो दर्जा नाकारताना दिसतात. यातली खरी गोष्ट काय? याचा निवाडा करण्यासाठी आंबेडकर इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दाखला देतात.

इतिहास आणि इतिहासाचे तत्त्वज्ञान हा आंबेडकरांचा अत्यंत प्रिय असा विषय होता. रानडे ‘महापुरुष’ होते काय, या प्रश्नाचा शोध घेताना आंबेडकर एक मोठा प्रश्न उपस्थित करतात - इतिहास हे महापुरुषांचे चरित्र असते काय? हा मुद्दा विशद करताना आंबेडकर म्हणतात की - महापुरुष जर इतिहास घडवत नसतील, तर आपण त्यांची दखल घ्यायची काय गरज आहे?

आता महापुरुष आणि इतिहास हा प्रश्न उपस्थित केल्यावर आंबेडकर इतिहासाच्या तत्त्वज्ञानाकडे वळतात. सेंट ऑगस्टीन, हेन्री बकल, कार्ल मार्क्स आणि थॉमस कार्लाइल या चार इतिहासाच्या तत्त्वज्ञांची मते आंबेडकर सांगतात. ऑगस्टीनच्या मते इतिहास हा फक्त दैवी इच्छाशक्तीचा प्रवास असतो. देवाने मानव-जातीचा प्रवास कसा कसा होणार आहे, ते आधीच ठरवलेले असते, त्याप्रमाणे मानवी इतिहासाची पावले पडत जातात. हेन्री बकलच्या मते भौगोलिक परिस्थितीमुळे आणि विज्ञानामधील प्रगतीमुळे इतिहास घडतो. कार्ल मार्क्सचे म्हणणे असे की, जगाची किंवा एखाद्या कालखंडातली आर्थिक परिस्थिती जगाचा आणि त्या त्या कालखंडाचा इतिहास घडवत असते. 

येथे आंबेडकर स्पष्ट करतात की, ऑगस्टीनवर विश्वास ठेवायचा तर देवावर विश्वास ठेवायला लागतो. आणि तसे असेल तर बाकीच्या सिद्धान्तांचा विचार केला नाही तरी चालते. बाकी तत्त्वज्ञाने मुख्यतः मानवी अनुभवाच्या क्षेत्रांवर आधारलेली आहेत. येथे आंबेडकर बकल आणि मार्क्स यांच्या मतांमध्ये काही तथ्य जरूर आहे, असेही सांगून टाकतात.

ऑगस्टीन, बकल आणि मार्क्स यांची थोडक्यात बोळवण करून आंबेडकर कार्लाइलच्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानाकडे येतात. महापुरुषांचे कर्तृत्व इतिहास रचला जाण्यासाठी आवश्यक असते, असे थॉमस कार्लाइलचे प्रतिपादन आहे. कार्लाइलचे ‘हीरो अँड हीरो वर्शिप’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्याने अनेक महापुरुषांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. या महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे इतिहासाला काय काय वळणे घ्यावी लागली, याचा आढावा त्याने त्या पुस्तकात घेतला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या जगातल्या प्रत्येक समाजाला अनेक आव्हाने पेलायला लागत असतात. ती योग्य रीतीने पेलली गेली नाहीत, तर तो समाज सर्वनाशाकडे पावले टाकू लागतो. अशा वेळी काळाच्या हाका काय आहेत, हे नीटपणे जाणण्याचे शहाणपण असलेला नेता असावा लागतो. आणि त्याच्याकडे शहाणपणाबरोबरच आवश्यक ते निर्णय घेण्याचे असामान्य धैर्यसुद्धा असावे लागते.

आपल्या समाजापुढे जी आव्हाने उभी राहिली आहेत, ती योग्य पद्धतीने स्वीकारून त्यांना जो परतवून लावतो, तो ‘महापुरुष’, असे कार्लाइलचे म्हणणे आहे. याशिवाय आपल्या समाजाची जो असाधारण नैतिक प्रगती साधतो, तो ‘महापुरुष’ असेही कार्लाइलचे म्हणणे आहे.

महापुरुष हा इतिहासाचे मुख्य कारण असतो, हे कार्लाइलचे तत्त्वज्ञान आंबेडकर मान्य करतात. समाजापुढे मुख्यत्वेकरून कुठली आव्हाने उभी राहतात, हे समजावून सांगण्यासाठी आंबेडकर विल्यम थेयर यांचा दाखला देतात. थेयर लिहितात -

“प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्था यांच्या आयुष्यात असा काळ येतो की, सगळी प्रगती खूंटून जाते. त्यांच्या धमन्यांमध्ये काठिण्य येते. तरुणांकडे दूरदृष्टी राहत नाही, वृद्धांच्या डोळ्यात कुठलीही स्वप्ने उरत नाहीत. असे लोक आपल्या यशस्वी भूतकाळाच्या अभिमानावर जगू लागतात. तो भूतकाळ जास्तीत जास्त काळ जिवंत कसा राहील याचाच प्रयत्न ते करत राहतात… नव्या काळाच्या आव्हानांसमोर हे लोक तोकडे पडू लागतात.

“अजून एक जास्त गंभीर परिस्थिती उभी राहते. आणि ती म्हणजे सर्वनाशाची परिस्थिती. जेव्हा जेव्हा कुठलेही मोठे संकट एखाद्या समाजापुढे उभे राहत असते, तेव्हा ते त्या समाजाच्या सर्वनाशाची शक्यता आपल्या बरोबरच घेऊन येत असतेच.

“एक वेळ अशी येते की, जुने मार्ग, जुन्या सवयी, जुने विचार समाजाला कसलीही प्रेरणा देण्यास असमर्थ ठरतात. अशा परिस्थितीत नवे विचार सापडले नाहीत तर सर्वनाश अटळ ठरतो.

“कुठल्याच समाजाचा प्रवास कंटकहीन अशा स्वरूपाच्या मार्गावरून होत नाही. क्षयाची परिस्थिती कुठल्याच समाजाला चुकत नाही. सगळे काही किडून जाते, सडून जाते.

“ह्या क्षयाच्या अवस्थेतच सर्वनाशाची बीजे असतात.

“काही समाज या क्षयातून बाहेर पडतात, परत नवी उभारी घेतात. काही समाज या क्षयामध्ये संपून जातात.”

थेयरचे म्हणणे सांगून आंबेडकर म्हणतात, ‘ज्या समाजामध्ये अशा घातक वळणावर ‘महापुरुष’ जन्माला येतात आणि आपले कर्तृत्व गाजवतात ते समाज टिकून राहातात. बाकीचे विझून जातात.’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आंबेडकर पुढे म्हणतात की - कुठल्याही संकटाचा सामना नवा विचार शोधून केला गेला पाहिजे. कुठलाही काळ अनेक मार्ग सुचवत असतो. समाजाला योग्य मार्गावर नेणे हे काळाचे काम नसते. योग्य मार्गावर पाऊल टाकण्याचे काम माणसाचेच असते. समाजाला योग्य मार्गावर नेण्याचे काम ‘महापुरुषा’चेच असते.

साधारणपणे सैनिकी कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांना ‘महापुरुष’ म्हटले जाते. अलेक्झँडर द ग्रेट, अटिला द हुन, सीझर आणि तैमूरलंग अशा मोठी साम्राज्ये उभी करणाऱ्या सम्राटांचा उल्लेख करून आंबेडकर म्हणतात की, अशा लोकांच्या कर्तृत्वाने आपले डोळे दिपले, तरी त्यांच्या कर्तृत्वाचा समाजजीवनावर मूलभूत परिणाम झाल्याचे दिसत नाही. ज्याच्या कर्तृत्वाचा समाजजीवनावर मूलभूत परिणाम होतो तो ‘महापुरुष’!

पुढे असे कर्तृत्व गाजवण्यासाठी नक्की कोणती लक्षणे महापुरुषाच्या व्यक्तिमत्त्वात दिसावी लागतात याची चर्चा आंबेडकर करतात. आंबेडकर इथे कार्लाइल आणि लॉर्ड रोजबरी या विचारवंतांची मदत घेतात. कार्लाइलच्या मते महापुरुषाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा असला पाहिजे. कार्लाइलने ‘सिन्सेरिटी’ हा शब्द वापरला आहे. प्रामाणिकपणा, सच्चेपणा आणि खरा कळवळा, अशा अनेक छटा कार्लाइलला ‘सिन्सेरिटी’ या शब्दामध्ये अपेक्षित आहेत. खरेपणा आणि प्रामाणिकपणा हा महापुरुषाच्या रक्तामध्ये अगदी भिनलेला असला पाहिजे. इतका की, त्याला स्वतःला त्या खरेपणाची वेगळी अशी जाणीवसुद्धा असता कामा नये. खरेपणाशिवाय त्याला जगताच येता कामा नये, इतके खरेपणाचे आणि महापुरुषाचे एकजीवित्व असावे लागते.

लॉर्ड रोजबरीच्या मते अलौकिक बुद्धिमत्ता हे महापुरुषाचे मुख्य लक्षण असते. रोजबरी येथे ‘जिनियस’ हा शब्द वापरतो. परंतु नुसत्या अलौकिक बुद्धिमत्तेने काम होत नाही. महापुरुषात प्रचंड बुद्धिमत्तेबरोबरच अतिप्रचंड ऊर्जा असायला लागते. ती नसेल तर अतिप्रचंड कामे कशी होणार? रोजबरीच्या मते महापुरुषाला समाज स्वच्छ करण्यासाठी पाठवले गेलेले असते. समाजाच्या पुनरुत्थानासाठी तो समाजातल्या विघातक गोष्टींवर तुटून पडतो.

प्रामाणिकपणा, अलौकिक बुद्धिमत्ता आणि ऊर्जा ही महापुरुषाची लक्षणे सांगून झाल्यावर, आंबेडकर त्यांना स्वतःला जाणवलेले ‘महापुरुषा’चे अजून एक लक्षण आवर्जून सांगतात. ते म्हणतात की, या तीन गुणांबरोबरच महापुरुषाच्या ठिकाणी समाजाच्या गतिशीलतेचे भान असायला लागते. ‘सोशल डायनॅमिक्स’चे अत्यंत जागृत असे भान महापुरुषाच्या ठिकाणी असायला लागते. समाजाच्या प्रगतीची अनावर आणि उपजत अशी आस महापुरुषाच्या ठायी असावी लागते. समाजाच्या प्रगतीची आस ही कुठल्याही महापुरुषाची प्रेरणाशक्ती असते.

एवढी चर्चा झाल्यावर आंबेडकर प्रश्न उपस्थित करतात की - या साऱ्या निकषांवर तपासले असता रानडे हे ‘महापुरुष’ म्हणून कसास उतरतात का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रामाणिकपणा, खरेपणा आणि कळवला न्यायमूर्ती रानड्यांकडे नैसर्गिकरीत्याच होता. कार्लाइल सांगतो की, प्रामाणिक दिसण्याची पराकाष्ठा सगळेच नेते करतात. हा झाला ‘बढाईखोर प्रामाणिकपणा’. रानड्यांकडे खरा प्रामाणिकपणा होता. आपल्या सामाजिक कार्याची त्यांना खरी आस होती. प्रामाणिकपणा हा त्यांच्या निसर्गदत्त प्रकृतीचाच एक भाग होता.

रानड्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही. ते नुसतेच निष्णात वकील आणि हायकोर्टाचे न्यायमूर्ती नव्हते. ते पहिल्या दर्जाचे अर्थशात्रज्ञ होते, पहिल्या दर्जाचे इतिहासकार होते, पहिल्या दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ होते आणि पहिल्या दर्जाचे धर्म-अभ्यासक होते.

रानडे राजकारणी नव्हते आणि त्यांचे राजकारणी नसणे ही चांगलीच गोष्ट होती. ते राजकारणात असते तर ‘महापुरुषा’च्या पदवीला पोहोचलेच नसते. अब्राहम लिंकन म्हणाला आहे की - माणूस एकदा राजकारणात उतरला की, तो फक्त लोकहिताचा विचार करू शकत नाही. त्याला स्वतःच्या राजकीय हिताचासुद्धा थोडा विचार करावा लागतो. लोकहिताच्या आणि राजकीय हिताच्या या द्वंद्वातून थोडा का होईना अप्रामाणिकपणा कुठल्याही राजकारण्याच्या अंगात शिरतोच शिरतो. रानडे स्वतः जरी राजकारणी नसले तरी ते राजकारणाचे अत्यंत प्रगल्भ अभ्यासक होते.

एवढे सगळे विशद करून आंबेडकर म्हणतात की, भारताचा इतिहास पाहिला तर रानड्यांएवढी सखोल विद्वत्ता आणि गंभीर दूरदृष्टी असलेला माणूस क्वचितच पाहायला मिळतो. फक्त रानड्यांच्या काळाचा विचार करता ते केवळ प्रकांड विद्वान होते असे नाही तर, कुठल्याही काळाची मोजपट्टी लावली तरी त्यांची विद्वत्ता प्रकांड स्वरूपाची होती, असेच म्हणावे लागते.

येथे आंबेडकर स्पष्ट करतात की - फक्त प्रामाणिकपणा आणि विद्वत्ता एवढ्याच गोष्टी रानड्यांकडे असत्या तर ते ‘महापुरुषा’च्या पदवीला पात्र झाले नसते. परंतु ज्या सामाजिक उद्दिष्टांसाठी त्यांनी काम केले आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते काम केले; हे पाहिले तर त्यांना ‘महापुरुष’ निश्चितपणे म्हणावेच लागते.

इतिहासकार, अर्थशात्रज्ञ किंवा शिक्षणतज्ञ यापेक्षा ते समाजसुधारक म्हणून जास्त प्रसिद्ध होते. समाजसुधारकाला लागणारे धैर्य आणि दूरदृष्टी या दोन्हींचा समन्वय रानडे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. इथून पुढच्या भागात आंबेडकर रानड्यांना कुठल्या काळाच्या पार्श्वभूमीवर काम करावे लागले, हे विशद करतात.

रानड्यांचा जन्म १८४२चा. १८१८ साली खडकीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठा साम्राज्य लयाला गेले. म्हणजे मराठा साम्राज्याच्या अंतानंतर चोवीस वर्षांनी रानडे जन्माला आले. १८१८च्या आधी सगळा भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेलेला असताना स्वातंत्र्याची ज्योत मराठी रियासतीने जागत ठेवली होती. १८१८ साली ही ज्योत अचानक विझली. पेशव्यांचे राज्य गेले याचा समाजातील काही घटकांना आनंद झाला, तरी एकूणात पाहता मराठी रियासतीचा अंत झाल्याचे बघून बहुतेक मराठी लोकांना जबरदस्त धक्का बसला होता. मराठी मुलुखाला प्राणापेक्षा प्रिय असलेले स्वातंत्र्य लयाला गेल्यावर काही लोकांनी त्या अघटिताचा स्वीकार केला. त्या अघटिताला ते शरण गेले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर रानड्यांची प्रतिक्रिया काय होती? ते मनातून हरले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राच्या समाजामध्ये आशा जागवायचे काम केले. त्या भयाण वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आशा जागवणे सोपे नव्हते. या पराभवातूनसुद्धा भविष्यामध्ये एक विजयी राष्ट्र निर्माण होईल, हा विचार त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाला दिला.

त्यांनी लिहिले – “ही भूमी चैतन्य भूमी आहे. हा वंश जगाच्या उत्थानासाठी अस्तित्वात आलेला आहे.” रानड्यांनी एक फार मोठे चैतन्य समाजामध्ये निर्माण केले. लोकांमध्ये त्यांनी मोठा आत्मविश्वास जागवला.

फक्त आशा आणि आत्मविश्वास जागवून रानडे थांबले नाहीत. या अवनत समाजाचे समग्र उत्थान कसे साधता येईल, याचा विचारही त्यांनी समाजापुढे मांडला. आपल्या समाजाचा पराभव का झाला, आपल्या समाजाला ही अवनत अवस्था का प्राप्त झाली, याविषयी अत्यंत तटस्थपणे  विचार केला गेला पाहिजे, असे त्यांनी कळकळीने सांगितले. रानड्यांना जाणवले की, हिंदू समाजव्यवस्थेमध्ये फार मोठे दोष शिरले आहेत आणि त्यामुळे हे पतन झाले आहे. हे दोष दूर केल्याशिवाय या समाजाचे कसलेही उत्थान शक्य होणार नाही.

आता आपल्या समाजामध्ये नक्की कुठले दोष शिरले आहेत, हे लक्षात आल्यावर त्या दोषांच्या  निर्मूलनाचे कर्तव्य करणे, हे ओघानेच आले. विचार पक्के झाल्यावर समाज सुधारणा हेच त्यांच्या आयुष्याचे मुख्य ध्येय बनले. आपल्या कार्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सभा, व्याख्याने, प्रवचने, लेख, मुलाखती, पत्रव्यवहार, प्रतिनिधी सभा आणि प्रतिनिधी मंडळे, हे सगळे त्यांनी अथक सातत्याने आणि अत्यंत उत्साहाने केले. अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या, अनेक नियतकालिके त्यांनी सुरू केली. 

या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना केली. ही सार्वजनिक सभा पुढे अनेक दशके राष्ट्रीय पातळीवर काम करत राहिली. ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’चे एक अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणून या सभेने कामगिरी बजावली. या संस्थेचे कार्य रानडे, अव्याहतपणे आणि अत्यंत धैर्याने करत राहिले.

समाजसुधारणा हे धैर्याचे काम आहे, हे अनेक लोकांच्या लक्षात येत नाही. कारण त्यात तुरुंगात जाण्याची भीती नसते. येथे हे लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागत असेल तर समाजसुधारकांनासुद्धा सामाजिक बहिष्कार सोसावा लागतो. त्यांना समाज वाळीत टाकतो.

येथे आंबेडकर एक प्रश्न विचारतात. तुरुंगवास - तोसुद्धा राजकीय कैद्याच्या सुविधा असलेला तुरुंगवास - आणि संपूर्ण सामाजिक बहिष्कार यात मोठी शिक्षा कोणती? राजकीय कैद्याचा समाजात सन्मान केला जातो, समाजसुधारकाला आपल्याच समाजाचा तिरस्कार सहन करत जगावे लागते. राजकीय कैद्याच्या पाठीमागे सगळा समाज उभा असतो. समाजसुधारकाला मात्र त्याच्या स्वतःच्याच समाजात एकही मित्र उरत नाही.

रानड्यांच्या काळातल्या सामाजिक रूढी कितीही अनैतिक आणि घृणास्पद असल्या तरी त्या रूढी त्या काळात पवित्र मानल्या जात होत्या. त्यांना विरोध करणे साक्षात ईश्वरनिंदेचे पातक करण्यासारखे होते. ज्या रूढी आणि प्रथा रानड्यांना निषिद्ध आणि घृणास्पद वाटत होत्या, त्या समाजाला पवित्र वाटत होत्या.

रानड्यांच्या काळातील बुद्धिवंत दोन प्रकारचे होते. पहिल्या प्रकारच्या बुद्धिवंत वर्गाला पूर्वापार चालत आलेल्या रूढी मान्य होत्या आणि त्याचबरोबर हे लोक राजकीयदृष्ट्या उदासीन होते. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना सामाजिक पुरोगामित्व पटत होते, पण, ‘समाजसुधारणे’पेक्षा त्यांना ‘राजकीय सुधारणा’ जास्त महत्त्वाची वाटत होती.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

पहिल्या प्रकारच्या बुद्धिवंतांचे नेते होते- विष्णुशात्री चिपळूणकर आणि दुसऱ्या वर्गाचे नेते होते- लोकमान्य टिळक. हे दोन्ही प्रकारचे बुद्धिवंत रानड्यांच्या विरोधात एकत्र आले. त्यांच्या या विरोधामुळे सामाजिक सुधारणेच्या चळवळीची तर अपरिमित हानी झाली. आणि त्याचबरोबर राजकीय सुधारणेचीसुद्धा मोठी हानी झाली.

या लोकांचे मत हेगेल या तत्त्वज्ञाच्या मताप्रमाणे होते. आदर्श गाठायचा असेल तर, आहे ती परिस्थिती आदर्श आहे, असे लोकांना सांगा आणि सुरुवात करा. त्यामुळे लोकांचा पाठिंबा मिळतो आणि सुरुवात करता येते. परंतु त्या काळी भारतात अस्तित्वात असलेल्या रूढी इतक्या अवनत स्वरूपाच्या होत्या की, त्यांचा आदर करून कुठलीच प्रगती सिद्ध होणार नव्हती.

या जगातील प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे, हा मूळ हिंदूविचार. त्यामुळे हिंदू धर्माच्या दृष्टीने या जगतातील सर्व मानव समान ठरतात. परंतु रानड्यांच्या काळातील हिंदू धर्मात हा विचार फक्त विचारापुरताच उरला होता. व्यवहारात हा विचार अजिबात अमलात आणला जात नव्हता. सगळे समाज-जीवन ‘मनुस्मृती’च्या धर्तीवर आयोजित केले गेलेले होते.

येथे आंबेडकर नीत्शेच्या ‘सुपरमॅन’चा उल्लेख करतात. नीत्शेच्या तत्त्वज्ञानात ‘सुपरमॅन’ या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साध्या भाषेत सांगायचे तर साधारण मानवानंतर ‘सुपरमॅन’ची अवस्था येते. त्यामुळे बुद्धीने आणि नैतिकतेने प्रगत लोकांना ‘सुपरमॅन’ म्हणता येते. प्रेम आणि समानता हा नीत्शेच्या तत्त्वज्ञानाचा पाया नाही. त्याच्या तत्त्वज्ञानात प्रगती आणि उत्क्रांती ही तत्त्वे, प्रेम आणि समानता या तत्त्वांपेक्षा मोठी मानली जातात. प्रगती आणि उत्क्रांतीमधून ‘सुपरमॅन’ तयार होतो आणि त्यामुळे अजून पुढची प्रगती आणि उत्क्रांती साधली जाते. त्यामुळे फक्त ‘सुपरमॅन’ महत्त्वाचा ठरतो, समाजातील बाकीच्या लोकांना फारसे महत्त्व उरत नाही. नीत्शेच्या या तत्त्वज्ञानात समानतेपेक्षा मानवामानवातील उच्च-नीचतेला महत्त्व प्राप्त होते. समानतेच्या तत्त्वाला तडा देणारे हे तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरांच्या मते ‘मनुस्मृती’ ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे, ते तत्त्वज्ञान नीत्शेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच आहे. फरक एवढाच की, येथे नीत्शेच्या ‘सुपरमॅन’ची जागा ब्राह्मणाने घेतली आहे.

तत्कालीन जातीव्यवथा चातुर्वण्याच्या पद्धतीचा अति-विकृत असा आविष्कार होती. आंबेडकर सांगतात की, या पद्धतीत, समाजातील एकाच वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता. एकाच वर्गाला शस्त्र धरण्याचा अधिकार होता आणि एकाच वर्गाला व्यापार करण्याचा अधिकार होता. आणि या सगळ्यांची सेवा एकाच वर्गाने करायची होती. असा हा विभागलेला भारत इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये शत्रूंच्या तावडीत सापडत आला. शतकानुशतकांच्या गुलामीत अडकत आला.

जेव्हा जेव्हा परकीय संकटे आली, तेव्हा तेव्हा म्हणावे तसे सैन्य उभे राहू शकले नाही. कारण, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र अशा ९० टक्के लोकांना शस्त्र हातात धरायलाच परवानगी नव्हती. त्या काळचे सनातनी विचारवंत भारतीय पराभवासाठी बुद्धाला आणि त्याच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला जबाबदार धरत होते. येथे आंबेडकर नमूद करतात की, जेव्हा संकटाची वेळ समोर आली, तेव्हा भारतीय समाज आपली सेना म्हणावी तशी वाढवू शकला नाही, हे सत्य आहे. या सगळ्या पराभवाला चातुर्वर्ण्य व्यवस्थाच जबाबदार आहे, हे मान्य करावे लागते, असे आंबेडकर ठासून सांगतात. रानड्यांचे विश्लेषण आंबेडकरांच्या विश्लेषणापेक्षा फारसे वेगळे नव्हते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे नुसताच पराभव झाला असे नाही, तर समाजातील एकंदर ऊर्जेचाही क्षय झाला.

ज्याच्या पदरात समाजाकडून काहीच पडलेले नाही, असा माणूस त्या समाजासाठी आपला जीव का म्हणून धोक्यात घालेल? आपल्यावर अन्याय करणाऱ्या समाज-व्यवस्थेचा पराभव झाला तर माणसाला हवाच असतो, हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रानड्यांच्या काळी परिस्थिती काय होती? अर्थव्यवस्था उच्चवर्णीयांच्या ताब्यात होती. अत्यंत निष्ठूरपणे आर्थिक स्वार्थ साधले जात होते. सतीची प्रथा सर्वदूर राबवली जात होती. रजपूत समाजात हजारोंच्या संख्येने नवजात मुलींची हत्या केली जात होती. खालच्या जातीतील लोकांना प्रगतीचे कुठलेही रस्ते प्राप्त होऊ शकत नव्हते. या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध रानड्यांनी आवाज उठवला. अत्यंत सखोल सामाजिक सुधारणा हा एकच मार्ग आहे, असे ते निर्भीडपणे सांगू लागले.

रानडे सुधारणेच्या बाजूने उभे राहिल्यावर त्यांच्या विरोधात अनेक बुद्धिवंत उभे राहिले. ते म्हणू लागले की, आपण पहिल्यांदा राजकीय सुधारणांवर लक्ष केंद्रित करूया. एकदा राजकीय सुधारणा आल्या की, त्यापाठोपाठ बाकीच्या सुधारणासुद्धा आपोआप येतीलच. राजकीय सुधारणा आल्या की, समाजातील लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे शक्य होईल आणि मग सामाजिक सुधारणांना एक अधिष्ठान प्राप्त होईल.

या विचारातील त्रुटी आंबेडकर लगेच लक्षात आणून देतात. ज्या समाजात लोकांना हक्क दिले गेले आहेत, त्या समाजातच राजकीय व्यवस्था लोकांच्या हक्कांचे संरक्षण करू शकते. ज्या समाजात लोकांना मुळातच हक्क नाहीत, तेथे राजकीय व्यवस्था कशाचे संरक्षण करणार? एखाद-दुसरा गुन्हेगार असेल तर कायदा शिक्षा करू शकतो. सगळा समाजच जर एखादा गुन्हा करू लागला, तर शिक्षा कोणाकोणाला करायची?

नुसती राजकीय लोकशाही येऊन काय उपयोग? पहिल्यांदा समाजात लोकशाही झिरपली पाहिजे. तरच राजकीय लोकशाहीचा काहीतरी उपयोग होणे शक्य असते. राजकीय बदल करून सगळ्या लोकांना मूलभूत हक्क देता येतील, असे रानड्यांचे विरोधक म्हणत होते. प्रश्न नुसते मूलभूत हक्क देऊन संपणार नव्हता. मूलभूत प्रश्न असा होता की, हे मूलभूत हक्क अत्यंत निष्ठूर अशा समाजात राबवायचे कसे?

आंबेडकर येथे एडमंड बर्कचे वाक्य सांगतात – “समाजात सामाजिक आणि नैतिक सद्सद्विवेकबुद्धी असेल तरच मूलभूत हक्कांचे रक्षण होते. नुसते कायदे करून हक्कांचे रक्षण करता येत नाही.”

रानड्यांच्या काळात या सद्सद्विवेकबुद्धीच्या दृष्टीने आनंदच होता. अगदी आजसुद्धा दलितांवरचे आणि स्त्रियांवरचे अत्याचार पाहिले, तर आजही या सद्सद्विवेकबुद्धीच्या नावाने आनंदच असल्याचे आपल्याला दिसून येते. ‘सुशासनापेक्षा स्वशासन कधीही श्रेयस्कर’, अशा घोषणा देऊन बुद्धिवंतांनी रानड्यांना असलेला विरोध अजून प्रखर केला.

ही घोषणा, फारसा विचार न करणाऱ्या जनतेला पटण्यासारखी होती. आंबेडकर येथे प्रतिपादन करतात की, समाजामध्ये एकी असेल तरच स्वशासनात म्हणजे लोकशाहीत लोककल्याण साधले जाते. धर्मा-धर्मात, जाती-जातीत विभागलेला समाज लोकशाहीच्या मार्गावर नीट चालू शकत नाही.

या सगळ्याचा विचार करून रानड्यांनी समाजाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न केला. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा समाजाचा ‘मॉरल-स्टॅमिना’ जास्त महत्त्वाचा, असा विचार मांडून त्यांनी समाजजागृतीचे प्रयत्न सुरू ठेवले. रानड्यांच्या काळातील समाजसुधारकांना अगदी साध्या साध्या हक्कांसाठी ५०-५० वर्षे लढावे लागले. लोकांचे दगड खावे लागले. बहिष्कृत व्हावे लागले.

त्या काळी सात-आठ वर्षांच्या मुलींचे विवाह केले जात. विवाह संमतीचे वय वाढवण्यासाठी कितीतरी खटाटोप करावा लागला! विधवांना पुनर्विवाह करता यावा, या साठी किती लढाया लढाव्या लागल्या. हिंदू धर्मियांना परदेशगमन निषिद्ध होते. त्यासाठी किती मारामाऱ्या! स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून काय काय करावे लागले. स्त्रीला संपत्तीमध्ये अधिकार मिळावा म्हणून किती प्रयास! आज अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी, पण किती जणांचे किती रक्त आटले!

१२ वर्षांखालील मुलींशी संभोग करू नका असे सांगितले, तर धर्म बुडल्याच्या हाकाट्या उठायच्या. कितीतरी मुली जबरी संभोगामुळे रक्तस्राव होऊन मेल्या, पण या हाकाट्या थांबत नव्हत्या. हे सगळे महत्त्वाचे विषय विसरून रानड्यांच्या विरोधकांना राजकीय चळवळी छेडायच्या होत्या.

रानडे यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांच्यात अहंकारवाद नव्हता. इतकी व्युत्पन्नता आणि इतके कर्तृत्व गाजवल्यावर थोडा अहंकार आला असता तर ते समजण्यासारखे होते. पण ‘मी सांगतो आहे म्हणून ऐका’ अशी भूमिका रानड्यांनी कधीही घेतली नाही. ‘मी जे सांगतो आहे ते प्रत्येकाने आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या अनुभवाच्या पातळीवर तपासून घ्यावे’ असा त्यांचा आग्रह होता.

कार्लाइल म्हणतो की, इतिहासातील मोठे लोक बँकांच्या नोटेसारखे असतात. ते सोन्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नेमक्या याच गोष्टीमुळे अनेक गोंधळ उडतात. खऱ्या नोटांबरोबरच अनेक खोट्या नोटा इतिहासात ‘महापुरुष’ म्हणून घुसतात. आंबेडकर येथे सगळ्यांना सावध करतात. ते म्हणतात, रानड्यांचा मोठेपणासुद्धा डोळे झाकून स्वीकारू नका.

कार्लाइल सांगतो की - अनेक महापुरुष असे होऊन गेले की, ज्यांनी प्रसिद्धीचा झोत स्वतःकडे वळावा इतके चमकदार कार्य केले, पण त्या कार्यामुळे साधले मात्र काहीही गेले नाही. महापुरुषाची पदवी अनेक ढोंग्यांनी प्राप्त करून घेतलेली आपल्याला दिसून येते. हे खोटे महापुरुष!

आंबेडकर म्हणतात की - रानडे प्रामाणिकपणे आणि शांतपणे कार्य करत राहिले. सगळ्यांनी अचंबा करावा अशा घटना रानड्यांनी घडवल्या नाहीत, हे खरे आहे. पण, त्यांनी कुठलीही आपत्ती समाजावर ओढवून आणली नाही, हेही तेवढेच खरे आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

देशाभिमानाचे उमाळे काढून त्यांनी लोकांच्या भावना कधीही उद्दिपित केल्या नाहीत. रानड्यांनी लोकप्रियतेच्या चापलुसी क्लुप्त्या कधी वापरल्या नाहीत. आपण जहाजाचे कॅप्टन आहोत म्हणून जहाजाशी त्यांनी कधी खेळ केला नाही. जहाज, ठरलेल्या बंदरात अत्यंत सुरक्षितपणे कसे पोहोचेल, याचाच विचार केला.

बदल घडवून आणताना आधीच्या चांगल्या गोष्टींचा नाश घडवून आणायचा नसतो, हे रानड्यांना पक्के माहीत होते. टेम्परामेंट आणि कॅरॅक्टर हे बुद्धी आणि थिअरीपेक्षा मोठे आहेत, याची त्यांना जाण होती. शांत आणि संयमी मानसिकता नसेल आणि स्वच्छ चारित्र्य नसेल तर बुद्धी आणि तत्त्वज्ञानाचा काय उपयोग?

आंबेडकर सांगतात की, कुठलीही राज्यघटना पटकन तयार करता येते. जनतेची मानसिकता घडवायला वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. रानड्यांनी भारतीय समाजाची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. बुद्धी आणि लोकशाही सोडून जनतेची निष्ठा जर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे वळली तर समाजात खूप गोंधळ उडतो.

कुठलीही राज्यघटना यशस्वी व्हायची असेल तर विचार-स्वातंत्र्य एक सर्वोच्च मूल्य म्हणून समाजामध्ये रुजायला लागते. जनतेच्या मनात कायद्याविषयी आदर असायला लागतो. जनतेची मनोधारणा शांतीकडे झुकलेली असायला लागते. द्वेषाने पछाडलेली जनता असेल तर राज्यघटना यशस्वी कशी होणार? अतिरेकी विचारसरणीच्या आहारी गेलेल्या समाजात कुठलीही राज्यघटना काही काळातच मोडकळीस येते. सगळी जनताच जर दुभंगलेली असेल तर त्या जनतेची अंतिम निष्ठा राज्यघटनेला कशी मिळणार? 

वरील विचार उद्धृत करून आंबेडकर सांगतात की, रानड्यांच्या व्यक्तिमत्त्वात आपल्याला ‘लोकशाही मानसिकते’चा आदर्श पाहायला मिळतो. येत्या अनेक पिढ्या हा आदर्श लोकांना प्रकाश दाखवत राहणार आहे.

एखाद्या जहाजाची दुरुस्ती करायची असेल तर त्याला पाण्यापासून दूर करून ‘ड्राय डॉक’मध्ये आणावे लागते. तत्कालीन ब्रिटिश राज्य रानड्यांना ‘ड्राय डॉक’सारखे वाटत होते. जी काही सामाजिक दुरुस्ती करून घ्यायची आहे, ती ब्रिटिश असतानाच करून घ्यायला पाहिजे, असे त्यांचे मत होते. मनाने एक नसलेल्या समाजाला जर स्वातंत्र्य मिळाले, तर प्रचंड गोंधळ उडेल, असे त्यांचे मत होते. पुढचा इतिहास बघितला तर रानड्यांच्या या मतांमधून सत्य कसे प्रतीत होत होते, हे आपल्या लक्षात येते. रानड्यांच्या या मताबद्दल खूप राळ उडवली गेली. ते स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत, असाही प्रचार केला गेला.

आंबेडकर सांगतात की, पारतंत्र्यात अडकलेल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्याची नेहमीच घाई झालेली असते, पण या स्वातंत्र्याची किंमत काय असेल याचा विचार फार कमी लोक करतात. समाज एकसंध न बनवता जर स्वातंत्र्य आणले तर देशाचे विभाजन होईल, असा इशारा रानडे सतत देत राहिले.

देशाचा इतिहास बघता रानडे हा इशारा अतिसावध मनोवृत्तीमधून देत होते, असे म्हणता येईल का?

रानडे व्यक्तिगत गौरवासाठी जगले नाहीत. कीर्तीच्या मोहात ते कधी पडले नाहीत. त्यांना आपले नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहायची महत्त्वाकांक्षा नव्हती. म्हणूनच जेव्हा त्यांना मृत्यूने मिठी दिली, तेव्हा त्यांच्या हृदयात कसलीही खंत नव्हती. अतिशय शांतपणे ते मृत्यूला सामोरे गेले.

एका अत्यंत उदरामतवादी नेत्याच्या अस्तानंतर भारतातील उदारमतवादी चळवळीची अवस्था फारशी चांगली उरली नाही, याची खंत आंबेडकर बोलून दाखवतात. उदारमतवादामध्येच देशाचे उज्ज्वल भविष्य दडलेले असते, हे मानवी इतिहासाने अनेक वेळा दाखवून दिलेले आहे. तरीही समाज परत परत कोत्या आणि द्वेषाने भरलेल्या चळवळींकडे ओढला जात राहातो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आंबेडकरांना ‘महापुरुषां’चे योगदान इतिहासाच्या जडणघडणीसाठी आवश्यक वाटत असले तरी त्यांना आंधळी ‘व्यक्तिपूजा’ मान्य नव्हती. रानड्यांच्या मर्यादासुद्धा ते खुलेपणाने सांगतात. आंबेडकर म्हणतात की, रानडे कधीही लोकनेते झाले नाहीत, ही त्यांची मोठी मर्यादा होती. ते उच्चवर्णीय होते आणि ते जनतेपासून दूरच राहिले. लिबरल पार्टीविषयी आंबेडकर हेच मत व्यक्त करतात. काँग्रेस पार्टी जशी जनमानसात रुजली, त्याप्रमाणे लिबरल पार्टी रुजली नाही, हे आंबेडकरांचे मुख्य दुःख होते. त्यामुळेच रानड्यांचे विचार जनमानसात रुजले नाहीत आणि त्याची भारी किंमत भारताने मोजली.

तुम्ही माणसे मारू शकता, तुम्ही मोठे विचार मारू शकत नाही, या मॅझिनीच्या विचारावर रानड्यांची श्रद्धा होती. आंबेडकरांना हा विचार मान्य नाही. एखादा विचार मरू शकतो किंवा त्याची हत्या केली जाऊ शकते, हे त्यांना माहीत होते. एखाद्या रोपाची जशी निगराणी करावी लागते, त्याचप्रमाणे एखाद्या विचाराचीसुद्धा देखभाल करावी लागते, नाहीतर तो विचार दुर्लक्षित रोपाप्रमाणेच मरून जातो, हे रानड्यांना कधी कळले नाही, असा आरोप आंबेडकर करतात. रानड्यांच्या नंतर लिबरल पार्टीच्या नेत्यांनासुद्धा ही गोष्ट कधी कळली नाही, असे आंबेडकरांचे म्हणणे आहे.

व्याख्यानाच्या सरते शेवटी आंबेडकर सांगतात, रानड्यांनी भारताला शिकवले की, आपण स्वतःच्या खऱ्या हिताशी प्रामाणिक राहिलो तर आपण आपोआप समाजाच्या हिताशी प्रामाणिक राहतो. आपण आपल्या स्वतःशी जसे वागतो, तसेच आपण जगाशी वागायचे असते. उदारमतवादाचा हाच पाया आहे. उदारमतवादामध्येच जगाचे खरे कल्याण असते, हा रानडे आणि आंबेडकर या दोघांचा विचार आहे. एक महापुरुष आणि एक महामानव, दोघेही आपल्याला एकच प्रकाश दाखवत राहिले आहेत.

अत्यंत प्रगल्भ असा उदारमतवाद सांगणारे रानडे १८४२ साली जन्मले. त्यांच्याविषयी आंबेडकर १९४३ साली बोलत होते. त्यानंतर ७७ वर्षे गेली. पुलाखालून इतके पाणी वाहून गेले, तरी देखील या दोघांचे विचार आज ताजेतवाने वाटतात. आजच्या भारताला अजून एका रानड्यांची आणि अजून एका आंबेडकरांची फार गरज आहे, असे मनापासून वाटत राहते.

..................................................................................................................................................................

डॉ. आंबेडकरांचे ‘Ranade, Gandhi And Jinnah’ हे मूळ इंग्रजी पाहण्यासाठी क्लिक करा - 

 RANADE, GANDHI & JINNAH

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा