लिहिणं ही भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
संदीप जगदाळे
  • कथाकार संदीप जगदाळे
  • Fri , 03 February 2017
  • संदीप जगदाळे Sandip Jagdale टोळधाड Toldhad नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

.............................................................................................................................................

“एखादा प्रामाणिक लेखक त्या शक्तींना विरोध केल्याशिवाय राहू शकतो काय, ज्या मानवजातीला आत्मविनाशाकडे ढकलत आहेत.” – मिखाईल शोलाखोव

तुम्ही नेमकं का लिहिता असा प्रश्न जर मला अथवा कोणत्याही गंभीरपणे लिहिणाऱ्याला विचारला गेला तर मला वाटतं नोबेल पुरस्कार स्वीकारताना मिखाईल शोलाखोवने दिलेल्या भाषणातील वरील ओळी उत्तरादाखल पुरेशा आहेत. मी लिहितो कारण मी विरोध केल्याशिवाय राहू शकत नाही. लिहिण्यामागच्या आपल्या भूमिका या वेगवेगळ्या असल्या तरी आपली प्रत्येकाची मूळ भूमिका ही मिखाईल म्हणतो तशी एकच असू शकेल. ती म्हणजे – मानवतावादी.

प्रत्येक कलावंत त्याचा सभोवताल त्याच्या आतमध्ये घेऊन वावरत असतो. तो स्वत:ला या सभोवतालापासून प्रभावित होण्यापासून वाचवू शकत नाही. स्वत:च्या भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक प्रदेशाविषयी तो निरंतर कळत-नकळत आतल्याआत चिंतन करत स्वत:ला घुसळत असतो. आपल्या अनुभवाचे-चिंतनाचे आकार, अवकाश आणि द्रव्य आपल्या अभिव्यक्तीतून मांडतो.

मी ज्या प्रदेशात जन्मलो-वावरलो तो प्रदेश मराठवाड्याचा ग्रामीण प्रदेश आहे. जायकवाडी प्रकल्पातून विस्थापित होऊन पैठण तालुक्यात पुनर्वसन करण्यात आलेलं माझं गाव. भारतातल्या कित्येक खेड्यांप्रमाणे स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती, जागतिकीकरण, उद्योगासाठी जमिनींचं संपादन या महत्त्वाच्या घटनांचे बरे-वाईट परिणाम माझ्याही गावावर झाले. यामुळेच या ग्रामीण समूहात वावरणारा एक घटक म्हणून माझ्या निर्मितीप्रक्रियेच्या अवतीभवती या घटनांचे परिणाम प्रामुख्याने येतात.

नॅशनल बुक ट्रस्टसाठी मराठीतील महत्त्वाचे कथा-कादंबरीकार राजन गवस यांनी संपादित केलेल्या ‘नवलेखन - मराठी कथा’ या तरुण कथाकारांच्या प्रातिनिधिक कथासंग्रहात माझी ‘टोळधाड’ ही कथा समाविष्ट आहे. धरणाच्या निर्मितीसाठी जमीन संपादित करण्यात आल्यानंतर नवीन पुनर्वसित गावात सरकारी खात्यातून मिळालेली जमीन ताब्यात घेण्यासाठी एका गरीब शेतकऱ्याला करावी लागणारी धडपड, प्रशासनाकडून होणारी त्याची पिळवणूक, मोठ्या शेतकऱ्याने केलेलं त्याचं शोषण असा पट घेऊन ही कथा पुढे जाते.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सुरुवातीच्या काही वर्षांत ‘मोठी धरणं, मोठा विकास’ अशी समीकरणं मांडून संपूर्ण देशात वेगवेगळ्या नद्यांवर मोठी धरणं उभारण्यात आली. यासाठी हजारो गावं धरणाच्या घश्यात घालण्यात आली.

धरणात घरदार गेलेल्या लाखो लोकांच्या नशिबी विस्थापितांचं जिणं आलं. प्रकल्पातून विस्थापित झालेल्यांना पुनर्वसनाचं गाजर दाखवण्यात आलं. परंतु पुनर्वसन या प्रक्रियेतून विस्थापितांचं जीवन सुस्थिर होण्याऐवजी गुत्तेदार, राजकीय-प्रशासकीय मंडळी गब्बर झाली. हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार संपूर्ण भारतभर झाला. यामुळे स्वत:चं गाव तथाकथित मोठ्या विकासासाठी आपल्या कल्याणकारी राज्याने हिसकावून घेतल्यानंतर स्वत:ची उखडलेली मुळं पुन्हा रुजावीत यासाठी अनोळखी मातीत जाऊन वसलेली ही माणसं सगळीकडे उपरी-घरघुशी ठरली. ज्या धरणासाठी यांच्या घरादारावरून पाणी फिरवण्यात आलं ती धरणं पूर्ण होऊन पन्नास-पन्नास वर्षं उलटली तरी विस्थापितांचं उपरेपण-उखडलेपण टिकून आहे. हे विदारक जिणं मला कायम कविता आणि कथा यांच्या माध्यमातून मांडावं असं वाटत आलं. यामागचे वेगवेगळे पदर तपासत, त्यातील राजकीय गुंतागुंत समजून घेत हे प्रश्न मांडावेत असा मी प्रयत्न करत आलोय. हिंदीतील प्रसिद्ध कवी अरुण कमल म्हणतात की, ‘प्रत्येक कलावंत कोठून ना कोठून विस्थापित झालेला असतो अन तो हे त्याचं तुटलेपण आपल्या कलाकृतीतून मांडत असतो.’ अरुण कमल यांचं हे विधान मला आपल्या सगळ्यांच्या लिहिण्याचं मध्यवर्ती सूत्र वाटतं. याच अंगानं कवितेला-कथेला पुढे नेण्याचे माझे प्रयत्न आहेत.

माझा जन्म १९८६चा. म्हणजे मी नेमका जागतिकीकरणात समजू-उमजू लागलेला भारताचा नागरिक आहे. माझा जन्म झाला तेव्हा हरितक्रांती होऊन २५ वर्षं उलटली होती आणि आपण नुकतेच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याच्या प्रयत्नांना लागलो होतो. माझ्या गावखेड्याचा सभोवताल मी समजून घेऊन पाहतो, तेव्हा मला हरितक्रांती आणि जागतिकीकरण या दोन घटना माझ्या सभोवतालावर अतिशय मोठा परिणाम करणाऱ्या वाटतात. अलीकडे मी या दोन्ही घटनांमुळे ग्रामीण लोकजीवनावर झालेले परिणाम तपासून पाहण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्याकडे मोठा गाजावाजा करत १९६० साली हरितक्रांती झाली. देशाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी संकरित बियाणं, रासायनिक खतं, ट्रॅक्टर यासारखं नवीन तंत्रज्ञान उत्पादनात हेक्टरी वाढ करण्याच्या हेतूनं शेतीत आलं. या दरम्यान स्वयंपूर्ण असणारा शेतकरी संकरीत बियाणं, रासायनिक खतं, यंत्रं या भांडवली उत्पादनांचा ग्राहक बनला. पर्यायानं उत्पादन वाढलं असलं तरी त्याच्या उत्पादनावरील खर्चही वाढला. मात्र याचवेळेस या वाढीव खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्याचा नफा वाढला नाही. यामुळे अधिक व्यवसाय होऊनही शेती आतबट्ट्यात आली.

इंग्रजांनी सर्वप्रथम पहिल्यांदा आपली ग्रामीण उत्पादनव्यवस्था आणि शेती यांच्या परस्परावलंबित्वाला तडा दिला. नंतर हरितक्रांतीने हे परस्परावलंबित्व संपवून टाकलं. मग अशी परिस्थिती असताना हरितक्रांतीनं नेमका फायदा कोणाचा केला? उत्पादन वाढूनही योग्य भाव न मिळाल्याने तोट्यात गेलेल्या शेतकऱ्याचा की, रासायनिक खतं, संकरित बियाणं, ट्रॅक्टर, प्लॅस्टिकच्या वस्तू उत्पादन करून प्रचंड नफा कमावणाऱ्या भांडवलदारांचा? हा प्रश्न माझ्यासमोर आहे. अर्थात याचं उत्तर शेतकऱ्याच्या बाजूनं नक्कीच नाही. शिवाय हरितक्रांतीनं आपल्या शेतकऱ्याला त्याच्या मूळच्या सेंद्रिय शेतीकडून रासायनिक शेतीकडे नेलं. परंतु आज हरितक्रांती होऊन साठ वर्षं होत आल्यानंतर शेतकऱ्याला सांगण्यात येतंय की, अधिक नफा कमावण्यासाठी रासायनिक शेती सोडून सेंद्रीय शेती करा! आधी हरितक्रांतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीपासून तोडणं आणि आता पुन्हा सेंद्रीय शेती करण्यास सांगणं, यामागचं नेमकं राजकारण काय आहे?

जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतरच आपल्याकडे अचानक शेतकऱ्याच्या आत्महत्या का वाढल्या? शिवाय त्या तेलंगणा, विदर्भ या कापसासाठी जागतिक बाजारपेठेशी जोडलेल्या नगदी पिकाच्या उत्पादक पट्ट्यातच का सुरू झाल्या? वस्तूंची, संपर्काच्या साधनांची, मनोरंजनाच्या साधनांची मुबलकता म्हणजेच जागतिकीकरण, अशी धूळफेक ग्रामीण भारताच्या डोळ्यात का करण्यात येतेय? ही धूळफेक करत असताना गावखेड्यासमोर असणाऱ्या वीज, रस्ते, शीतगृह, बाजारपेठा यासारख्या मूळ समस्यांना बगल तर देण्यात येत नाही ना? गावखेड्यात जागतिकीकरणाविषयीच्या चुकीच्या संकल्पना रुजवून नेमकं कोणाच्या बाजूचं राजकारण खेळण्यात येत आहे? गोरगरीब, सर्वहारा शेतकऱ्याच्या बाजूचं की, शेतकऱ्याच्या जमिनीवर डोळा ठेवून असणाऱ्या भांडवलदारांच्या बाजूचं? हरितक्रांती आणि जागतिकीकरण या दोन महत्त्वाच्या घटनांच्या अनुषंगानं माझ्या वाचना-लिहिण्याच्या आजूबाजूला प्रामुख्याने वरील प्रश्न आहेत.

माझ्या मते लिहिणं ही एक भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे. शिवाय ती एक जोखीमही आहे. चांगलं लिहिणाऱ्याला सगळ्यात मोठा धोका हा ‘करिअरिस्ट’ होण्याचा असतो. यापासून आपण स्वत:ला वाचवलं पाहिजे. प्रत्येक कवी-लेखकाची कलाकृती ही त्याच्या स्वत:च्या मान्यतांचा, त्याच्यावर असणाऱ्या विचारधारांचा प्रभाव घेऊन येत असते. तो त्याच्या जगण्याला सर्वाधिक समांतर असणारी वैचारिक भूमिका स्वीकारत असतो. या दृष्टीनं आपल्या भूमितत्त्वाचा शोध घेणारी देशी विचारपरंपरा मला महत्त्वाची वाटते. स्वत:च्या सर्वसमावेशक-समन्वयवादी कुणबाऊ वृत्तीची सतत जाण ठेवून अनिष्ट ते दूर करण्यासाठी स्वत:च्या परंपरेतील देशी विद्रोहातून स्फुर्ती घेऊन पुढे सरकरणारी विचारधारा माझ्या लिहिण्याला तळ देत आली आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचा प्रेरणास्रोत हा मानवतावाद आहे. इंतज़ार हुसेन यांच्या ‘बस्ती’ या कादंबरीत एक पात्र आहे. ते खिशात सतत एक डायरी घेऊन फिरत असतं. हे पात्र त्या डायरीत त्याला भेटलेल्या चांगल्या माणसांची नावं टिपून घेतं. ही माणसं नाव टिपल्यानंतर वाईट वागल्यास त्यांची नावं खोडूनही टाकतं. अशा प्रकारे संपूर्ण कादंबरीभर त्याच्या डायरीतील नावं कमी-जास्त होत राहतात. परंतु कादंबरी संपते तेव्हा त्याच्या डायरीतील संपूर्ण नावं खोडलेली असतात.

यातून जगातला चांगूलपणा संपून गेल्याचा विदारक अनुभव वाचकाला येतो. वाचक म्हणून ती खोडलेली नावं पाहून मीही विषण्ण झालो होतो, परंतु नंतर लक्षात आलं की डायरीतील सगळी नावं खोडण्यात आली असली तरी नावं लिहिणारं, सतत चांगुलपणाच्या शोधात असणारं ते प्रामाणिक पात्र जिवंत आहे.

अशी स्वत:चा चांगुलपणा जपत इतरांचा चांगुलपणा शोधणारी अल्पसंख्य माणसं तुमच्या माझ्या वर्तमानात वावरतायत. मला वाटतं, ही माणसं एकाकी पडू नयेत, ती एकमेकांना सापडावीत म्हणून आपण आपल्या लिहिण्यातून या चांगल्या माणसांच्या बाजूनं उभं राहणं गरजेचं आहे.

.............................................................................................................................................

लेखक संदीप जगदाळे हे तरुण कवी व कथाकार आहेत.

sandipjagdale2786@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

parmeshwar jadhav

Sun , 05 February 2017

sandip very nice artical , it is political reading of novel and role of writer in the age of neo-libral era thanks againt


Bhagyashree Bhagwat

Sat , 04 February 2017

well said & matured writing.


SACHIN PATIL

Sat , 04 February 2017

खूप आवडलं..... माणुसकीला साद घातल्या सारखं होतं


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......