खरंच का शरद पवार पद्मविभूषण पुरस्कारासाठी १०० टक्के पात्र नाहीत?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
राम जगताप
  • शरद पवारांची एक मुद्रा
  • Fri , 27 January 2017
  • शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Nationalist Congress Party पद्मविभूषण Padmvibhushan

शरद पवारांचे नाव पद्मविभूषण पुरस्कारांच्या यादीत आल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविषयी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषत: मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये जी तिरस्काराची भावना उफाळून आली, त्याची तुलना दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराशीच करावी लागेल! काही वृत्तवाहिन्यांनी तर ‘शरद पवार यांना पद्मविभूषण देणे योग्य आहे का?’ यावर चर्चाही घडवून आणली. पवारांच्या पुरस्काराचे समर्थन करणारा बहुधा एकमेव लेख दै. प्रहारचे संपादक मधुकर भावे यांनी लिहिला आहे. त्याला त्यांनी ‘शरद पवार यांच्या मोठेपणासाठी नेहमीच उदगारचिन्ह’ (दै. प्रहार, २६ जानेवारी २०१७, http://epaper.eprahaar.in/26012017/Mumbai/Page4.jpg) असे समर्पक शीर्षक दिले आहे. पवारांचे इतक्या तत्परतेने समर्थन करणारा महाराष्ट्रात आजघडीला केवळ एकच पत्रकार संपादक असावा, ही पवारांच्या उत्तरायुष्याची शोकांतिका नक्की आहे. पण तो मराठी पत्रकारितेमध्येही मनाचा उमेदपणा फारसा शिल्लक राहिला नसल्याचेही लक्षण आहे!

अलीकडच्या काळात पवारांविषयी महाराष्ट्रातील मध्यमवर्गामध्ये प्रचंड संताप, तिरस्कार निर्माण झाला आहे, तो सोशल मीडियावर त्यांच्याविषयी जी टीका सतत होत आहे, त्यावरून दिसतेच आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना, मनसे यांच्यापेक्षाही पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वाधिक गुंड, भ्रष्टाचारी, कलंकित पुढाऱ्यांनी भरला आहे, ही त्रिवार सत्य गोष्ट आहे, याबाबत काहीच शंका नाही. अलीकडच्या काळातील पवारांची धोरणे, काम, राजकारण, वक्तव्ये ही अगतिकतेची आणि त्यामुळेच काही प्रमाणात केविलवाणी वा वावदूक आहेत, हेही तितकेच खरे. पण म्हणून पवार पद्मविभूषण पुरस्कारासाठी १०० टक्के अ-पात्र नाहीत, याचे भान किमान प्रसारमाध्यमातल्या मंडळींनी तरी सोडायला नको होते. त्यामुळे अशा चर्चा घडवून आणणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे वर्तन निखालसपणे वावदूकपणाचे ठरणारे आहे. सोशल मीडिया आपली भडास कशी काढावी याचे संपादकीय संस्काररहित व्यासपीठ असल्याने तिथे अशा बेजबाबदारपणे टीका व्हावी, यात फारसे काही नवल नाही.

पवार केवळ पद्मविभूषण पुरस्कारासाठी १०० टक्के पात्र आहेत, असे नाही तर ते राष्ट्रपतीपदासाठीही तितकेच पात्र आहेत. पण दुर्दैवाने ते त्यांना मिळण्याची शक्यता बरीचशी धूसर आहे. ते दिल्लीत आणि महाराष्ट्रात सर्व पक्षातल्या नेत्यांचे मित्र असले तरी त्यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे ते कुणालाच विश्वासार्ह वाटत नाहीत. शिवाय राष्ट्रपतीपदासाठीची व्यक्ती सर्वपक्षीय संमतीची असावी लागते. पवारांचे सर्व पक्षात मित्र असले तरी त्यांना राष्ट्रपतिपदासाठी सर्वांची संमती मिळेल, याचीही शक्यता कमी आहे. असो.

गेल्या काही वर्षांत पवार आणि त्यांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचे सर्वाधिक तिरस्काराचे विषय झाले आहेत. ते का झाले आहेत, त्यामागची कारणे काय, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळे त्यात आता जायला नको.

पवारांची आत्ताच पद्मविभूषण पुरस्कारासाठी का निवड झाली असावी? याची दोन संभाव्य कारणे असू शकतात. एक, दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. दोन, पुढच्या महिन्यात त्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ही झाली तात्कालिक कारणे. पण पवार या पुरस्काराचे १०० टक्के हक्कदार आहेत, ते कसे हे समजून घेण्यासाठी त्यांची राजकीय कारकिर्द जरा उमदेपणाने समजून घ्यावी लागेल. केवळ त्यांच्याविषयी आता आपल्याला तिटकारा वाटतो, म्हणून ते पात्र ठरत नाहीत, असे कुणाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये आणि पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध करणाऱ्यांमध्ये फारसा फरक राहत नाही. दोघेही तितकेच जातीयवादी आणि द्वेषाची कावीळ झालेले आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे पवारांना पद्मविभूषण त्यांच्या गेल्या दहा वर्षांतील राजकारणासाठी दिलेला नाही. पद्म पुरस्कार हे त्या व्यक्तीच्या आयुष्यभराची कारकीर्द लक्षात घेऊन दिले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत पवारांचा प्रवास महाराष्ट्रातील मध्यमवर्गाच्या दृष्टीने ‘डार्लिंग ते सर्वाधिक तिरस्करणीय’ असा झाला असला म्हणून त्यांची त्या आधीची कारकीर्द तितकीच तिरस्करणीय आहे असे नाही.

१२ डिसेंबर २०१५ रोजी पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा झाला. १० डिसेंबर रोजी दिल्लीत पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विज्ञानभवनात भव्यदिव्य कार्यक्रम झाला. त्याला राष्ट्रपती, पंतप्रधान, मनमोहनसिंग, सोनिया-राहुल गांधी, लालूप्रसाद-नीतीशकुमार, सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला यांच्यापर्यंत सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर हजर होते. ज्या विधानभवनात एरवी फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे कार्यक्रम होतात, तिथे पवारांचा अमृतमहोत्सव साजरा होणे, हे पुरेसे सूचक आणि बरेचसे बोलके मानायला हरकत नसावी. यातून पवारांची पॉवर आणि वावर किती सर्वदूरपर्यंत पसरलेला आहे याची पुन्हा प्रचिती आली. याच कार्यक्रमात ‘प्रतिमेची पर्वा न करता जे योग्य वाटेल ते करा’ असा सल्ला पवारांनी आपल्याला दिला होता याचीही आठवण मोदींनी करून दिली, तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘उत्तम नेटवर्किंग असलेले उत्कृष्ट राजकारणी’ अशा शब्दांत पवारांचा गौरव केला. कर्तबगारी, धडाडी, दूरदृष्टी, व्यापक समाजहित आणि खिळाडूवृत्ती अशा सर्वच बाबतीत शरद पवार यांच्या आसपासही पोहचू शकेल असा नेता आजघडीला महाराष्ट्रात नाही, हे सत्य मान्य करावेच लागेल. दुसरे म्हणजे पवारांचे राजकारण घराणेशाहीच्या खानदानी परंपरेतून घडलेले नाही. सामान्य राजकीय कार्यकर्त्यापासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. मग आमदार, उपमंत्री, मंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय कॅबिनेटमंत्री अशी क्रमाक्रमाने ते एकेक पायऱ्या चढत गेल्याने त्यांच्यातील राजकारणी तावूनसुलाखून निघाला आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणाच्या मर्यादा त्यांना कधी पडल्या नाहीत. महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांच्याइतकी उत्तम आणि सखोल जाण आजघडीला महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही. महाराष्ट्राचा विकास (शेती, उद्योग, पायाभूत सोयीसुविधा अशा सर्व पातळीवरील) कशा प्रकारे व्हायला हवा, याची व्हिजनही आजघडीला फक्त त्यांच्याकडेच आहे. महाराष्ट्राची नाडी त्यांना अचूकपणे उमगलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे व्हिजन आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जो व्यावहारीक शहाणपणा लागतो तोही आहे. सरकार व प्रशासन दोहोंवर त्यांची उत्तम पकड आहे. कधी कधी काही कटुनिर्णय लोकभावनेची पर्वा न करता व्यापक दृष्टिकोनातून रेटून नेणे गरजेचे असते, ती समजही पवारांकडे आहे. एवढेच नव्हे तर जनमत घडवण्याचेही सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. 

यशवंतराव चव्हाण यांचे वारस म्हणून पवारांकडे सुरुवातीपासून पाहिले गेले. त्यामुळेच कदाचित त्यांची चव्हाणांशी अनेक बाततीत तुलनाही केली गेली, अजूनही जाते. कामाचा उरक, विषय समजावून घेण्याची आणि तो आत्मसात करण्याची क्षमता, तात्काळ निर्णय घेण्याची धडाडी, राजकारणातल्या व्यक्तीला अतिआवश्यक असलेले उत्तम संघटनकौशल्य आणि प्रसंगी पक्षातीत मैत्रीसंबंध राखण्याची चतुराई ही पवारांच्या राजकारणाची प्रमुख वैशिष्ट्ये राहिलेली आहेत. धोरणीपणा आणि सुस्वभावी समंजसपणा हे त्यांचे गुणही त्यांची लोकप्रियता वाढण्याला सहाय्यभूत ठरले. ‘चाहत्यांचे आणि अनुयायांचे भले करणारा नेता’ हे समीकरण यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तर आयुष्यातच महाराष्ट्रात जन्माला आले. त्यातून महाराष्ट्राची शुगरलॉबी तयारी झाली. नंतर शिक्षणसम्राट, सहकारसम्राट तयार झाले. काँग्रेसी राजकारणाने या नव्या बेटांच्या प्रभाव क्षेत्रांच्या कुशलतेने व्होटबँका केल्या. त्यामुळे ही बेटे प्रत्येकाची जहागिरी झाली आणि त्यांचे हित जपणाऱ्यांची स्तुतिपाठक झाली. पवारांनीही आपल्या राजकारणासाठी त्याचा कुशलतेने वापर करून घेतला. आधी काँग्रेसमधील आणि गेली सोळा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवारांचे राजकारण पाहिले तर हे सहजपणे दिसून येईल. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखेच पवारांनीही केवळ मराठाकेंद्रीत राजकारणाचा ‘बहुजनसमाजाचे राजकारण’ असा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.

यशवंतराव चव्हाण यांनी साहित्यिक-विचारवंत यांचा योग्य तो आदर केला; त्यांच्यावर अनेकविध जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्यही दिले. पवारांनी हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तर त्यांना रॉयवादी विचारवंतांचा पाठिंबा, मार्गदर्शन आणि सहकार्यही लाभले. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, किल्लारी भूकंप, लक्ष्मण माने यांच्या संस्थेसाठीचे, रयत शिक्षणसंस्थेचे काम, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ तळागाळात नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतीसाठीची त्यांची मेहनत आणि कष्ट अशी पवारांच्या विकासात्मक राजकारणाची अनेक उदाहरणे देता येतील. 

१९७६पासून २०१४पर्यंत विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा असा १४ निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने निवडून दिलेले आणि सलग पन्नासेक वर्षे राजकारणात असलेले पवार हे महाराष्ट्रातले एक दुर्मीळ उदाहरण आहे. पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवले. ७८ साली वसंतदादा पाटील यांना आव्हान देऊन पुलोदची स्थापना करून ते वयाच्या ३८व्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ‘सर्वात तरुण मुख्यमंत्री’ होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यानंतर १९८८ आणि १९९० असे दोनदा मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेले. १९९१ साली राजीव गांधी यांच्या दु:खद अंतानंतर पवार राष्ट्रीय राजकारणात गेले. काँग्रेसची अवस्था निर्णायकी झाली होती. त्यामुळे पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. मात्र पर्दापणातच वाजवीपेक्षा जास्त यशाचा वाटा मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना त्यावेळी त्यांना अपयश आले. शिवाय या भलत्या साहसाचा फटका बसून पक्षांतर्गत त्यांचे हितशत्रू वाढले. मात्र त्यानंतर काही वर्षांनी एका पत्रकाराकडे त्यांनी कबुली दिली की, ‘त्यात वावगे ते काय? ज्या देशात चंद्रशेखर यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतात, तिथे मी का नाही?’ त्यांचे म्हणणे बरोबरच होते. राजकारण हे संधीच्या शोधात असलेल्यांचे आणि तिच्यावर झडप घालून तिचे सोने करणारांचेच असते. त्यामुळे पवारांच्या अपेक्षेत तेव्हा आणि त्यानंतरही काहीच वावगे नव्हते. पण त्यांना ते साध्य मात्र झाले नाही.

दिल्लीत नीट पाय रोवता न आल्याने पवार १९९३ साली महाराष्ट्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. या शेवटच्या टर्ममध्ये मुंबई बॉम्बस्फोटांची मालिका घडली. त्यातून मुंबईला सावरण्याचे काम त्यांनी धडाडीने केले. दरम्यान १९९१-९२ या काळात त्यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपद सांभाळले. १९९६ साली खासदार होऊन पवार केंद्रीय राजकारणात गेले. पण १९९७च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवार यांचा सीताराम केसरी यांनी दमदणीत पराभव केला. त्याआधीही त्यांचा केसरी यांनी असाच पराभव केला होता. ९८मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली. पण वर्षभरातच काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. २००४ आणि २००९ या मनमोहनसिंग यांच्या काळात त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षाही जास्त धडाडी पवारांकडे होती, आहे. पण तरीही दुर्दैवाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात चव्हाण यांच्याइतकेही यश मिळवता आले नाही, ही सत्य गोष्ट नाकारता येणार नाही.

१९७८ साली वसंतदादा पाटील सरकारमधून बाहेर पडून पवार पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात देशातही असा समज निर्माण झाला होता की, आता नेहरू-गांधी कुटुंबाची राजकीय घराणेशाही संपून भारतीय राजकारणाला वेगळे वळण मिळेल. देशात जनता पक्षाचे सरकार आले. पण त्याचा अंतर्गत सुंदोपसुंदीने दोन वर्षात धुव्वा उडाला. आणि पुढच्या निवडणुकीत इंदिरा गांधी ३५० हून अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या. मग पवार लवकरच पुन्हा काँग्रेसवासी झाले. १९९५ साली महाराष्ट्रात पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची धूळधान झाली, ९६च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. पुढे सोनिया गांधी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यामध्ये इंदिरा गांधी पाहणाऱ्या पवारांनी ९९मध्ये पुन्हा बंड करून काँग्रेसचा त्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नेहरू-गांधी कुटुंबाच्या राजकीय घराणेशाहीला त्यांनी दुसऱ्यांदा आव्हान दिले, पण २००४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसशीच घरोबा केला. 

पवारांच्या या राजकारणामुळे त्यांच्याविषयी महाराष्ट्रात, दिल्लीत आणि काँग्रेसमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले. राजकारणातल्या व्यक्तीविषयी जनमानसात तसेही अनेक गैरसमज असतात. त्यातील काही राजकीय अपरिहार्यतेतून निर्माण होतात, काही वैचारिक भूमिकेतून होतात आणि काही लाडक्या म्हणवणाऱ्या नेत्याकडून असलेल्या वारेमाप अपेक्षांमुळे निर्माण होतात. पवार यांच्याविषयीही जनमानसात असे अनेक गैरसमज आहेत. आणखी एक असे की, आपल्या सहकाऱ्यांना, चाहते-समर्थकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी मनमोकळे करण्याचा पवारांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे ते चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. अनेकदा ते बोलतात एक आणि करतात भलतेच. ‘कात्रजचा घाट’ हा शब्दप्रयोग केसरीतल्या वि. स. माडीवाले यांनी जन्माला घातला असला तरी त्याचा मूर्तीमंत वापर पवारांनी अनेक वेळा केला आहे. अशा गोष्टींमुळे पवारांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. पण त्यांनी त्याचा कधी खुलासा केला नाही. ‘आतल्या गाठीचे’ हा आरोप अनेक वेळा होऊनही त्याला उत्तर देण्याचे टाळले, त्यामुळे त्यांचे हितशत्रू पक्षाबाहेर आणि पक्षात दोन्हीकडे वाढले. आताही त्यांच्यासोबत असलेले अनेक नेते त्यांच्यासमोर, प्रसारमाध्यमांसमोर जो आदरभाव, निष्ठा व्यक्त करतात, ती खाजगीत बोलताना करत नाहीत.

असे का व्हावे? त्याला कारण पवारांचे बेरजेचे राजकारण. त्यांना याचे भान नाही, असे अजिबातच नाही. पण त्यांना ते करता आले नाही हे मात्र खरे. राजकारणात बेरजेपेक्षा अनेकदा वजाबाकी, गुणाकार, भागाकारही करायचा असतो हेही पवारांना जमले नाही. ‘निवडणुकीत कामी येतात तीच माणसे आपली’, या व्यूहनीतीचा तोटा असा असतो की, त्यामुळे नवे नेतृत्व, कार्यक्षम कार्यकर्ते घडत नाहीत. कारण आपला फायदा आहे म्हणून आपल्याला महत्त्व आहे हे कार्यकर्त्यांना माहीत असते. त्यामुळे असे लोक आपला स्वार्थ साधण्यापुरते नेत्याचा शर्ट पकडून राहतात. या प्रकारात नीतिमत्ता, सदसदविवेक आणि व्यापकहित यांची हकालपट्टी होते. विचारांच्या अधिष्ठानाला जागा राहत नाही. उलट काहीएक विचार असलेल्यांचा उपहास, उपमर्द केला जातो वा त्यांचे तोंडदेखले कौतुक केले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांनंतर सगळा आनंदीआनंद आहे, याचे हेच कारण आहे. अर्थात असे असले तरी पवारांकडे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी आहे आणि राज्याला पुढे नेण्याची व्हिजनही आहे. पण राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांना त्याचा पूर्ण सक्षमतेने वापर करता आलेला नाही. 

‘राजकारणात टिकून राहण्याला मी समजत होतो, त्यापेक्षा जास्त महत्त्व असते’ असे रूढार्थाने राजकारणी नसलेले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले होते. पवार तर पन्नासेक वर्षे महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणात खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या पॉवर आणि वावरचा करिश्मा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र पाहायला मिळतो. (पण त्यात सत्तेत असल्यामुळे किंवा सत्ताधाऱ्यांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या उपद्रवमूल्याचा भाग अधिक असतो. त्यात निखळ प्रेमाचा भाग कमी आणि स्वार्थाचा अधिक असतो. यशवंतराव चव्हाण यांच्या काही भूमिकांवरून त्यांच्याविषयीही महाराष्ट्रात टीका झाली. पण चव्हाणांच्या विश्वासार्हतेविषयी कधी कुणी शंका घेतली नाही. अगदी त्यांच्या कडव्या विरोधकांनीही नाही.) यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर हे पवार यांना साध्य होऊ शकले आहे. आणि त्यांच्यानंतर निदान येत्या काही दशकांत तरी हे इतर कुणा महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याला जमेल असे वाटत नाही. पण तरीही ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर म्हणत, त्याप्रमाणे पवारांना ‘महाराष्ट्राचे ज्योती बसू’ होता आले नाही आणि ‘देशाचे प्रति- यशवंतराव चव्हाण’ही!

पण याचा अर्थ असा नव्हे की, पवार पदमविभूषण पुरस्कारालाही पात्र नाहीत. ते नक्कीच पात्र आहेत, किंबहुना त्याचे हक्कदारच आहे. तो त्यांचा हक्क मोदी सरकारने चाणाक्षपणे हिरावून घेतला नसेल किंवा सदसदविवेकबुद्धीने त्यांना दिला असेल, यापैकी कोणतेही कारण असले तरी पवार या पुरस्कारासाठी १०० टक्के पात्र आहेत, हे नक्की! पुढील महिन्यात पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होतील. आजघडीलाच काय पण आजवर कोणत्याही महाराष्ट्रातील राजकारण्याला आपल्या संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव पाहता आलेला नाही. एवढी एक गोष्ट त्यांची पुरस्कार निवड सार्थ करणारी आहे. त्यांच्या कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. तेव्हा आपण मनाचा जरा उमदेपणा दाखवायला हवा आणि आपल्या ‘नावडत्या’ माणसाच्या योग्य पात्रतेबाबत खिळाडूपणा दाखवायला हवा. मनाचा मोठेपणा हे माणुसकीचे एक श्रेष्ठतम मूल्य आहे. किमान त्याच्याशी तरी आपण फारकत घेऊ नये.

editor@aksharnama.com

Post Comment

Ambrish Dongre

Fri , 27 January 2017

Dear Editor, Appreciate the thought expressed in this piece. But I think, the question is still a relevant one - why Mr Pawar or Mr. Murli Manohar Joshi or for that matter, any individual, not just politicians, be given a civilian honor? When it comes to other professions - sports, medical, business to give a few examples, the contribution of an individual seem to be clear. But one always wonders: what contribution does a politician make? And this is not specific to Mr. Pawar. In some sense, this reflects our ignorance. But keeping that aside, one must also explain what distinguishes one politician who is regarded as award-worthy, from the other. Is it just longevity? Or ability to win elections? I am sure there are bunch of politicians who have won elections consecutively. Is it the fact that he graced the CM position multiple times? Or the individual heads multiple organisations in widely different fields? To summarize, it might be useful to clearly demonstrate how Mr. Pawar was different compared to others and how his presence made a difference? Unless that is done convincingly, the question will remain...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......