रिया चक्रवर्तीला ‘चेटकीण’ ठरवणारे आणि ‘सती’ देऊ पाहणारे उतावीळ लोक
पडघम - देशकारण
ऋतिका पांडेय
  • सुशांतसिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती
  • Thu , 10 September 2020
  • पडघम देशकारण सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajpu रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty

रिया चक्रवर्ती व सुशांतसिंग राजपूत एकमेकांच्या प्रेमात होते आणि सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीपर्यंत ते त्याच्या घरात ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. हे दोघंही बॉलिवूडमधून आलेले आहेत. शंभर वर्षांपासून हिंदी चित्रपट हेच दाखवत आले आहेत की, प्रेम आणि भांडणं, रुसणं आणि मनवणं, मीलन आणि विरह हे रोमँटिक नात्यात होतंच असतं. अशा एका म्हणजे रिया-सुशांत या रोमँटिक जोडप्यादरम्यान काय घडलं असेल, हे कोणालाही नीट ठाऊक नाही, तरीही प्रत्येकानं त्याविषयीच्या मनगढंत चित्रपटकथा रचल्या आहेत.

या संपूर्ण विषयावरील माध्यमांच्या अनियंत्रित आणि बेजबाबदार वार्तांकनामुळे समाजातील सनातनी विचारसरणीच्या लोकांना एक प्रकारे उत्तेजनच मिळालं आहे. एकतर हा समाज स्वत:च्या इच्छेनं एखाद्या पुरुषाबरोबर राहणाऱ्या महिलेचा आदर करत नाही. त्यामुळे जेव्हा त्याला अशा स्वतंत्र विचाराच्या महिलेविरुद्ध बोलण्याची संधी मिळते, तेव्हा तिला तो ‘चेटकीण’ ठरवून टाकायला मागेपुढे पाहत नाही. अशा लोकांची चलती असेल तर ते आरोप सिद्ध होण्याआधीच अशा महिलेची चिता पेटवून त्यात तिला जिवंत जाळूनही टाकतील. शेकडो वर्षांपूर्वी कितीतरी संघर्षानंतर ज्या जुन्या कु-प्रथा मोडीत काढल्या गेल्या होत्या, त्यांची मुळे अजूनही या बुरसटलेल्या विचारांच्या रूपात आपल्या समाजामध्ये जिवंत असल्याचं दिसतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या भारतातील सर्वांत मागासलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमधून येऊन सुशांतने आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या बळावर आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यानंतर कुटुंबियांसोबतचं त्याचं नातं कसं राहिलं हे आपल्याला माहीत नाही, परंतु रियासोबत त्याचं ‘लिव्ह-इन’ नात्यात राहणं त्यांना खटकलं. रिया आणि सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं, हे त्यांच्या आताच्या वर्तनावरून सिद्ध होतं. पण या प्रतिभावान अभिनेत्याच्या दुःखद अंतानंतर त्याच्या कुटुंबातील संबंध अजूनच बिघडत गेले आहेत. त्यांनी सुशांतच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेंड रिया या केवळ एकाच व्यक्तीला थेटपणे जबाबदार ठरवलं आहे.

बिहारमध्ये जेडीयू नेते महेश्वर हजारी यांनी रियाला ‘विषकन्या’ असं म्हटलं. ते पुढं म्हणाले की, “रियाला सुनियोजित कट करून सुशांतला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी पाठवलं गेलं. त्याचा काय परिणाम झाला हे आपण सगळे पाहतच आहोत.” बंगाली महिलांवर लैंगिक भेदभावासोबतच प्रांतिक भेदभावाचे आरोप करणाऱ्या टिपण्यांचा तर सोशल मीडियावर महापूरच आलेला आहे. बिहारसहित सगळ्या गरळपंथाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या, इंग्रजी बोलणाऱ्या, लग्नाआधी लैंगिक संबंधांना पाप न मानणाऱ्या आणि मोठ्या आवाजात स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या तमाम बंगाली महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. त्या म्हणे ‘काळी जादू’ करून उत्तर भारतातील तरुणांना बिघडवतात!

..................................................................................................................................................................

हेही वाचा : चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…

..................................................................................................................................................................

इतिहासाच्या मध्ययुगीन काळातही अशाच प्रकारे ‘काळ्या जादू’चा आरोप करून महिलांना लक्ष्य केलं जात असे. घराबाहेर खेचून आणत भररस्त्यावर त्यांची विटंबना केली जात असे. कधी दगड मारून, तर कधी सुळावरून चढवून शिक्षा दिली जात असे. आज रियालाही त्याच वधस्तंभावर चढवलं जात आहे. भारतासहित जगभरातल्या समाजानं न्यायव्यवस्थेला डावलून कधी आपल्या फायद्यासाठी, तर कधी आपल्या अतृप्त वासनांसाठी तमाम महिलांना चेटकीण, चुडैल ठरवून त्यांचा अपमान केल्याची आणि नंतर कठोर शिक्षा ठोठावल्याची अनंत उदाहरणं आहेत.

काही लोकांना महिलांवर प्रत्यक्ष अत्याचार करण्यापेक्षा त्यांच्यावर होणारा अत्याचार पाहताना जास्त मजा येते. त्याचे पुरावे मोकळ्या मैदानात जमलेल्या लोकांपासून आजकाल गावांमध्ये महिलेला चुडैल ठरवून, दोरखंडानं बांधून, तोंड काळं करून, कपडे फाडून आणि शेवटी झाडाला बांधून मरेपर्यंत मारण्याच्या घटनांवरून स्पष्टपणे दिसतात. महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेवर बनवल्या गेलेल्या जुन्या सिनेमांपासून या वर्षी आलेल्या ‘बुलबुल’सारखे सिनेमे पाहिल्यावर हे सहजपणे दिसून येतं. त्यात महिलांवरील हिंसा आणि अत्याचार तपशीलवार दाखवले जातात. असं वाटतं की, सिनेमे बनवणारेही त्याचा एकेक क्षण फुरसतीनं दाखवून इच्छितात. कारण प्रेक्षकांमध्येही ते पाहण्याची जबर उत्कंठा असते. शेवटी महिला किंवा तिच्या भूताच्या हातून अत्याचाऱ्यांची हत्या करवून कहाणी संपवली जाते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या (किंवा कथित हत्या!) आणि विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’

..................................................................................................................................................................

सध्या माध्यमांमध्ये जी कहाणी रियाविषयी रचली गेली आहे, तसाच प्रकार काही दशकांपूर्वी अभिनेत्री रेखाविषयी घडला होता. १९७० आणि ८०च्या दशकांमध्ये रेखा स्वतंत्र आणि आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखली जात असे. अचानक तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. इतक्या मोठ्या वैयक्तिक संकटामुळे कुणाचं आयुष्य बदलून जातं हे समजण्यासारखं आहे. पण त्या वेळीही माध्यमांनी रेखाचं चारित्र्यहनन केलं होतं. तिच्या नवऱ्याच्या, मुकेश अग्रवालच्या आईने रेखाला ‘माझ्या मुलाला खाणारी चेटकीण’ ठरवलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध रेखाने जगापासून स्वत:ला तोडून घेत आपलं आयुष्य एकट्याने जगण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर केवळ काही महिन्यांमध्येच नवऱ्याला गमावून बसलेल्या रेखाविषयी सहानुभूती दाखवण्याऐवजी तिला चेटकीण, चुडैल आणि काय काय म्हटलं गेलं! आता रियाबाबत तेच होताना दिसत आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हे सत्य आहे की, घराच्या चार भिंतीतून बाहेर पडून काहीतरी करून दाखवणाऱ्या प्रत्येक महिलेवर असं संकट घोंघावत राहतं. सिनेनट्या तर खूप सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर हे संकट जास्त असतं. आपली पितृसत्ताक समाजव्यवस्था महिलांकडे रांधा, वाढा, उष्टा काढा एवढ्याच चष्म्यातून पाहते. पण एखादी महिला ते करत नसेल तर तिला ‘जेवणातून विष कालवणारी’ ठरवलं जातं. मुलांचा जन्म आणि त्यांचा सांभाळ यासाठीचं केवळ साधन म्हणून ज्या महिलेकडे बघितलं जातं, तिने आई व्हायला नकार दिला तर तिला ‘चुडैल’ ठरवलं जातं. कारण अशी महिला समाजव्यवस्थेनं ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये न बसणारी म्हणजे ‘मिसफिट’ असते!

सुशांतच्या कुटुंबाचं दु:ख समजण्यासारखं आहे, पण जे लोक या प्रकरणात रियाच्या जीवावर उठलेत, ते नेमके कुठल्या थराला जाऊन पोहचलेत, याचा त्यांनी एकदा विचार करायला हवा!

मूळ हिंदी लेखाचा मराठी अनुवाद कॉ.भीमराव बनसोड

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.dw.com या पोर्टलवर ७ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा