‘पाकिस्तान’ आशियातला सगळ्यात ‘आनंदी देश’(?!)... आणि मग ‘भारत’?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
नितीन अदवंत
  • युएनच्या रिपोर्टचं मुखपृष्ठ आणि आशियातील पहिल्या सात आनंदी देशांची क्रमवारी
  • Mon , 20 July 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भारत पाकिस्तान World Happiness Index आशियातील आनंदी देश जगातील आनंदी देश

‘द युनायटेड नेशन्स’(UN)च्या ‘World Happiness Report २०२०नुसार दक्षिण आशियातील सगळ्यात आनंदी देश म्हणून ‘पाकिस्तान’ची निवड झाली. पूर्वी भूतानला हा बहुमान मिळाला होता. आपण जेव्हा पाकिस्तानकडे बघतो, तेव्हा नक्कीच प्रश्न उपस्थित होतो की, धार्मिक कट्टरता असलेला, लष्कराने पोखरलेला, गरिबीने त्रस्त असलेला, आतंकवाद्यांची जागतिक प्रयोगशाळा असलेला अगतिक देश ‘आनंदी देश’ कसा असू शकतो?

आणि याउलट मोठी बाजारपेठ म्हणून जगाचं लक्ष असणारा, लोकशाही मूल्य बऱ्यापैकी रुजलेला, सर्व धर्मांना समान वागणूक या तत्त्वावर विश्वास ठेवणारा, दरवर्षी एखाद्या छोट्या देशाच्या लोकसंख्येएवढा मध्यमवर्ग तयार करणारा आणि एकूणच जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणारा आपला भारत देश ‘आनंदी देश’ का नाही? निराशेची बाब म्हणजे आपला नंबर आनंदी देशाच्या यादीत प्रत्येक वर्षी घसरत आहे.

आनंदी देश म्हणून निवड करण्यासाठी निकष जरी वेगळे असले तरी मी सध्याच्या परिस्थितीत मानवी आयुष्यातील आनंदावर परिणाम करणाऱ्या दोन्ही देशांतील दोन गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो.

पहिली गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यातील विनोदाचं स्थान.

भारतीय प्रसारमाध्यमं खऱ्या अर्थानं स्वतंत्र कधीच नव्हती. माध्यमांचा एक मोठा वर्ग सातत्यानं सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच राहिलेला आहे. आजच्या काळात त्याचं पूर्ण नैतिक अधःपतन झालं आहे एवढंच. प्रसारमाध्यमं आणि सरकार यांनी मिळून एक नवा ‘राष्ट्रवाद’ जन्माला घातला आहे. ही प्रसारमाध्यमं चिरक्या आवाजात दररोज आजचा ‘राष्ट्रवादी कोण?’ याची खमंग चर्चा करत बसलेली असतात. गेल्या वर्षभरात टीव्हीवरील चर्चा पाहिल्या तर ‘स्थलांतरित कामगार’ या विषयावर झालेली चर्चा वगळता बहुतेक सगळ्या चर्चा या भारत, पाकिस्तान, हिंदू, मुसलमान, काश्मीर या भोवतीच फिरताना दिसतात.

२०१४ नंतर तर सरकारला प्रश्न विचारायचे असतात हेच माध्यमं विसरून गेली आहेत. उलट विरोधी पक्षांनाच प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा नवीन पायंडा माध्यमांनी पाडला आहे. आज निष्पक्ष म्हणावा असा एकही पत्रकार राष्ट्रीय पातळीवर दिसत नाही. पत्रकारांचं साधं सोपं वर्गीकरण करायचं झाल्यास ‘मोदी आवडणारे पत्रकार’ आणि ‘मोदी न आवडणारे पत्रकार’ एवढेच दोन वर्ग सध्या शिल्लक आहेत. रोजच्या रोज उन्माद पेरणाऱ्या माध्यमांनी भारतीय लोकांचा बराचसा ‘आनंद’ हिरावून घेतला आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf

..................................................................................................................................................................

पाकिस्तानी माध्यमांना बरंचसं स्वातंत्र्य मिळालं परवेज मुशर्रफ यांच्या काळात (त्यांची सत्ता कुमकुवत करण्यात माध्यमांचा मोठा हात होता). अल्लाह, लष्कर आणि भारत (प्रामुख्यानं काश्मीर) हे तीन विषय वगळता पाकिस्तानी माध्यमं भारतीय माध्यमांपेक्षा चांगल्या बातम्या देतात. पाकिस्तानी माध्यमांवर जास्तीत जास्त वेळा देशांतर्गत प्रश्नांची चर्चा होते- ज्याचा भर अर्थव्यवस्था, बेरोजगारी, गरिबी आणि सरकारचं धोरणात्मक अपयश या मुद्द्यांवर असतो. पाकिस्तानी माध्यमांवर होणाऱ्या चर्चा शांत आणि संयमी असतात, चर्चेसाठी जास्तीत जास्त चार लोकांना बोलावतात. बऱ्याच चॅनलवर राजकीय प्रवक्त्यांना बोलावत नाहीत. बातम्या अतिरंजित करून सांगत नाहीत. सरकारला रोज प्रश्न विचारतात.

हसन निसार, कामरान शाहिद, आफ्रिन उल नूर, हमीद मिर, नसीम जायरा, नजम सेठी, कमर चीमा, मोना आलम आणि खूप पत्रकार आहेत, जे देशांतर्गत प्रश्नावर खूप चांगलं बोलतात. भारताबरोबर शत्रुत्व परवडणार नाही, काश्मीरवरचा हक्क सोडून द्यावा, हे विषयही माध्यमं हाताळतात. ओरया जान मकबूल, जायद हमीद यांच्यासारखे कट्टरपंथीसुद्धा माध्यमांत दिसतात, पण त्यांना समाजात फारसं स्थान नाही. मारवी सरमद, परवेज हुडभोय यांच्यासारखे हिंदूंसाठी भांडणारे विचारवंतदेखील आहेत.

ट्यूबवर पाकिस्तानी माध्यमं कधी तरी अभ्यास म्हणून पहा, ती आपल्या माध्यमांसारखा रोजच्या रोज ‘उन्माद’ पसरवत नाहीत, हे नक्की.

दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनात असणारं विनोदाचं स्थान. पाकिस्तान विनोदाच्या बाबतीत आपल्या खूप पुढं आहे. तिथला विनोद अतिशय शालीन आणि उच्च अभिरुची असलेला आहे. तुम्हाला पाकिस्तानी विनोद किती उच्च दर्जाचा आहे याची दोन उदाहरणं देतो.

सलीम जुनेद नावाचा पत्रकार ‘दुनिया न्यूज’ या चॅनलवर ‘हसब-इ-हाल’ म्हणून एक कार्यक्रम करतो. त्यात अझिझी नावाचा कलाकार रोज एका वेगळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या वेशात असतो आणि त्याला विचारलेल्या प्रश्नांची तो व्यंगात्मक उत्तरं देतो.

अजून एक कार्यक्रम म्हणजे अन्वर मसूद आणि मोईन अख्तर यांचा ‘लूज टॉक’.

हे दोन्ही कार्यक्रम एकदा तरी पहा. त्यांतील विनोदाची उंची अफलातून आहे. शिवाय एक शब्दसुद्धा ओंगळवाणा आढळणार नाही.

या उलट आपल्याकडे लोक उगाचच गंभीर राहतात. गंभीर चेहरा करून बोलणारी माणसं म्हणजे जबाबदार माणसं असा एक समज आहे. त्यामुळे भारतीय लोकांची सारासार विनोदबुद्धी अतिशय सुमार दर्जाची आहे. आपल्याकडील स्टँडअप कॉमेडी करणारे पहा. संपत सरल आणि काही उत्तर भारतीय कवी वगळता प्रत्येक कॉमेडियनची कॉमेडी शिव्या दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत जवळपास एकाच धर्तीची. कुणाल कामरा, जाकिर खान, वरुण ग्रोवर यांच्यासारखे चांगले स्टँडअप कॉमेडीयनसुद्धा शिव्या देत कॉमेडी करतात, तेव्हा विनोदाचा घसरलेला दर्जा दिसतो. याच्या जोडीला आपला कशावरूनही भावना दुखावून घेणारा समाज. यांमुळे चांगल्या विनोदाला आपण दिवसेंदिवस पारखे होत आहोत.

आज भारताच्या मोठ्या शहरातील प्रत्येक सातव्या नागरिकाला मानसिक उपचाराची गरज आहे. इतका प्रचंड ताण आपल्या जीवनावर पडत आहे. ज्याला शेवट नाही, अशा भौतिक सुखाच्या मागे पळण्यात आपलं आयुष्य संपत आहेत. अशा वेळी आयुष्यात थोडा तरी आनंद भरण्यासाठी विनोदाला आपल्या जीवनाचा भाग करा.

तळटीप : पाकिस्तानातील माध्यमात भारताच्या प्रगतीची खूप स्तुती होते, याची नोंद घ्यावी.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vividh Vachak

Tue , 21 July 2020

खरंतर या अशा मानांकनात भारताचा नंबर पहिला असता तरीही यातली निरर्थकता लक्षात आलीच असती. अशा अहवालांकडे लक्ष देण्याचे कारण नाही. असो. पाकिस्तानी माध्यमे कदाचित भारतीय माध्यमांपेक्षा प्रगल्भ असतील यांवर विश्वास बसू शकतो कारण आपल्या माध्यमांनी गाठलेली आचरटपणाची कमाल पातळी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा