जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी (उत्तरार्ध)
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
किरण लिमये
  • जल्लिकट्टूमधील वळूला आवरताना तरुण
  • Sun , 22 January 2017
  • jallikattu जल्लिकट्टू Tamil Nadu तामिळनाडू Pongal पोंगल बुल फायटिंग Bullfighting

समाजाला संस्कृतीचा, धर्माचा, भक्कम विचारांचा पाया हवाच असं नाही, असं काहीजण म्हणतील. आणि असं म्हणून ते धोरणांचा आधार तर्कशुद्ध, उपयुक्ततावादी का असावा असा प्रश्न करतील. पण आपण या प्रश्नाच्या कधीच पुढे गेलेलो आहोत. आज जे संस्कृतीवादी किंवा श्रद्धावादी आहेत, त्यांची मांडणी हीच अपरिहार्यपणे उपयुक्ततावादी आहे, म्हणजेच विचारांच्या पायावरच आहे. (त्यातल्या काहींना हे कळतंय, पण ते तसं उघड मानत नाहीत आणि काहींना कळतच नाहीये.) मानवाला स्वर्ग मिळावा किंवा उत्तम पारलौकिक जीवन मिळावं म्हणून आपल्याला आजच्या काळातही संस्कृती किंवा श्रद्धा हवी अशी सामाजिक भूमिका श्रद्धा किंवा संस्कृतीवर आधारित राजकीय बाजूंचे प्रणेते अजिबात घेत नाहीत. देशाच्या विकासासाठी, व्यक्तींच्या भौतिक समृद्धीसाठी, देश ऐहिक जगात थोर व्हावा म्हणून आपल्याला समाज म्हणून श्रद्धा किंवा संस्कृतीचा आधार आवश्यक आहे, हीच मांडणी आज केली जाते. त्यामुळे विचारांच्या पायावरच आपण समाज रचना करू पाहतो आहोत. पण काही जण हे थेट म्हणू शकतात आणि काही जणांना असं थेट म्हणायचं धैर्य नाही एवढीच बाब आहे.

तुरुंगातील कैद्यांना आपण किमान स्तराची वागणूक देतो, मग प्राण्यांना का नाही असा मुद्दा काही जण मांडतील. पण तुरुंगातील कैदी हे मानव आहेत आणि त्यामुळेच त्यांना किमान वागणूक देण्याचा मुद्दा येतो. प्राणी पाळीव, समजदार आणि प्रसंगी मदतीला येणारे आहेत, भोगवस्तू आहेत. ते सजीव असल्याने कदाचित त्यांच्याशी केल्या जाणाऱ्या क्रूरतेचा आपल्यातल्या अनेकांना त्रास होऊ शकतो, ही बाब खरी आहे. असा त्रास होत असल्याने अशा वागणुकीवर बंदी आणण्याचा प्रयत्न करणं, अशा भूमिकेचा प्रसार करणं हे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून करताही यायला हवं. पण अशा क्रूर वागणुकीवर शासन, समाज म्हणून बंदी आणण्याचा निकष ‘क्रूर वागणूक न दिल्याचे फायदे हे दिल्याहून जास्त असणं’ हाच असला पाहिजे. उदाहरणार्थ, प्रयोगशाळांत असणाऱ्या प्राण्यांना हायजिनिक वातावरण मिळावं हे योग्य आहे. कारण त्यामुळे प्राणी आनंदात राहतील म्हणून नाही तर हायजिनिक वातावरण न मिळाल्याने संशोधनावर आणि सरतेशेवटी मानवी हितावर वाईट परिणाम होईल.

हा निकष जल्लिकट्टूला लावला तर काय दिसेल? जल्लिकट्टूमुळे अनेक व्यक्तींना काहीएक सुख मिळणार आहे व थोड्या प्राणीमित्रांना दुःख. त्यावर बंदी आल्याने मात्र नेमकं याच्या उलट होणार आहे. हा फायदा-तोट्याचा युटिलिटेरिअन हिशोब अगदी सोप्पा आहे. जल्लिकट्टू घडणं अधिक नक्त सुखावह आहे. त्यावरील बंदी उठवावी हीच भूमिका विचारी माणसाची भूमिका असणं योग्य आहे!                      

प्राण्यांबाबत असावयाच्या सामूहिक भूमिकेबाबत वर व्यक्त केलेली मतं कदाचित आपल्याला फारच अप्पलपोटी आणि टोकाचं मानवकेंद्री वाटण्याचा संभव आहे. पण आपल्या साऱ्याच सामाजिक भूमिका मानवकेंद्री असणं हेच सुसंगत आहे. आज अनेक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची आपल्याला काळजी वाटते. का? एखाद्या व्यक्तीला एखादा प्राणी पाळावा असं वाटतं, तेव्हा प्राण्याला असं वाटतं का नाही याचा विचार न करता ती व्यक्ती केवळ आपल्याच सुखाचा विचार करते. पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी हे प्राथमिक वर्गीकरण मानवाला कोण उपयोगी पडतं यावरच निर्भर आहे. वैचारिक सुसंगतीचा हात जवळपास सोडलेल्या संस्कृतीवाद्यांमध्ये जे थोडे पूर्ण राजकीय न बनलेले श्रद्धाळू आहेत, ते आपल्या परंपरा उपयुक्ततेवर जस्टीफाय करण्याची गमतीशीर भूमिका घेतात. गाय उपयुक्त आहे म्हणून ती परंपरेनं पवित्र मानलेली आहे, म्हणून ती मारू नका. ही भूमिका काय आहे?

आपल्या साऱ्या सामाजिक भूमिका, मग त्या भूतकाळातील असोत, आजच्या असोत किंवा भविष्याच्या असोत, या मानवांच्या हितासाठी आहेत. त्यात काही गैरही नाही. त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवं की, प्राणी हे मानवाच्या सुखासाठी असलेल्या भौतिक जगाचा एक भाग आहेत, या भूमिकेचा अर्थ असा नाही की, प्राण्यांशी क्रूर वागणं हीच शासनाची भूमिका व्हावी किंवा शिकारीलाही परवानगी मिळावी. प्राण्यांबद्दल भूमिका घेताना व्यक्तीस्वातंत्र्य आणि उपयुक्तता यांचे निकष लावून निर्णय घ्यावा. यातील कशाशीही संगती न लागणारी भूतदयेची भूमिका घेऊ नये एवढंच.

जल्लिकट्टूचं जे उपयुक्ततावादी समर्थन केलं गेलेलं आहे, त्यातल्या काही विसंगती दाखवणं आवश्यक आहे.

जल्लिकट्टूमध्ये बैलाची प्रजनन क्षमतेची गुणवत्ता ठरते, विजयी बैलाला मान दिला जातो, पुढे देवळात ठेवून अशा बैलाची विशेष काळजी घेतली जाते, उत्तम प्रजनन क्षमतेचा बैल असेल तर त्यातून देशी गाय-बैल वाढतील आणि त्यांचं अधिक सकस दूध आपल्याला मिळेल, असे शंखनाद आपण सोशल मीडियावर वाचले असतीलच. काही ठिकाणी एखाद्या रिसर्च पेपरचाही संदर्भ असेल. पौष्टिक दूध मिळावं यासाठी प्रजनन आणि प्रजननाच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं सर्वोत्कृष्ट बैल निवडणं या उद्दिष्टासाठी जर जल्लिकट्टू घडत असेल तर समजा केवळ बैलांच्या रक्ताचं परीक्षण करून किंवा अन्य कोणत्याही मार्गानं हेच उद्दिष्ट पूर्ण करणारी पद्धत विकसित केली तर जल्लिकट्टू बंद करायला हवा. मग सोप्पं आहे. असा पर्याय सापडला तर आणि तो जल्लिकट्टूहून कमी खर्चात होत असेल तर जल्लिकट्टू बंद करावा. उपयुक्ततेच्या आधारावर जल्लिकट्टू चालू ठेवा म्हणणारे ज्ञानी हीच उपयुक्तता अन्य मार्गानं आणि कमी खर्चानं साधता आली तर जल्लिकट्टू बंद करा, या मागणीला समर्थन देतील का?

अर्थात तामिळनाडूमध्ये रस्त्यावर आलेले समर्थक हे काही अशा उपयुक्ततावादाने भारलेले नाहीत. त्यांच्या जल्लिकट्टूवरील बंदी उठवण्याच्या मागणीचा मुख्य आधार स्थानिक परंपरा आहे आणि त्यात हस्तक्षेप नको हाच आहे. बाकी फायदे वगैरे संस्कृतीवाद्यांच्या तर्कदुष्ट झालरी आहेत.

परंपरामध्ये हस्तक्षेप करावा का नाही याचा कुठलाही नॉर्म भारतात आजवर रुजू शकलेला नाही. पण परंपरा असतील तर त्यांना ९० टक्के किंवा अन्य प्रचंड बहुमताशिवाय बदललं जाऊ नये, असा एकदम थेट कायदाच करण्याचं धाडसही कोणी दाखवेल असं वाटत नाही. सरकार त्याच्या कलाप्रमाणे कमी-जास्त दांभिक, पण राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेतं. या अवघड जागच्या दुखण्याला आपल्या सोयीनं कसं वापरायचं हीच राजकीय पक्षांची नीती आहे. आधुनिक मूल्यांचा झगा पांघरायचा आणि मतं मिळवायला परंपरांचे कासरे ओढत रहायचे, हा राजकीय खेळ अजून बदललेला नाही.

आता एक उरलेली आणि महत्त्वाची बाजू. प्राण्यांना क्रूरतेने वापरून, त्यांना घाबरवून खेळ खेळण्याचा आनंद मिळवणं हे हीन आहे, असं आपण म्हणू शकतो. माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका हीच आहे. पण त्याच वेळी कोणी कशा प्रकारे आनंद मिळवावा हे काही समाज ठरवू शकत  नाही. आपल्यातल्या काही जणांना क्रूर, पाशवी आनंद हवे असतात, ही बाब आपण काही ठिकाणी स्वीकारलेली आहेच, ती इथंही स्वीकारावी. अशा आनंदाच्या कृतींवर सहभागी व्यक्तींना सुख, आनंद मिळत असताना अन्य कोणत्याही व्यक्तीला त्याच्या होकाराशिवायचा धोका निर्माण होणार नाही, एवढाच निर्बंध आपण घालू शकतो. हा निर्बंध वाढवून त्यात प्राणी आणावेत ही या भूमिकेत व्यापक मानवी हित असेल तरच घ्यावी, अन्यथा घेऊ नये. जल्लिकट्टूमध्ये असा निर्बंध आणण्याची काही गरज नाही. प्राणीमित्रांनी या खेळात प्राण्यांना काय त्रास होतो याविषयीची भूमिका मांडावी. जल्लिकट्टूच्या समर्थकांकडून प्राणीमित्रांच्या मतप्रदर्शन आणि प्रसारावर रोख येणार नाही, याची काळजी प्रशासनानं घ्यावी. अर्थात या स्वप्नवत अपेक्षा आहेत. पण याच समजदार लोकशाहीच्या निर्देशक आहेत.

मुळात मानवाच्या दृष्टिकोनात मानव हा केंद्रस्थानी असणं हे चूक नाही. मानवी विचारांच्या रचनेत मानव केंद्रस्थानी आहे, ही स्वयंसिद्ध प्रकारची बाब आहे. सारी प्राणीसृष्टी एकाच नैतिक स्तरावर आणू पाहणं हे आध्यात्मिक उन्नयन दर्शवत असलं तरी ते भौतिक जगाच्या व्यवहाराचं पोषक तत्त्व नाही. प्राणी हे सजीव आहेत, त्यांच्यात व मानवांमध्ये एक प्रकारचं नातं निर्माण होऊ शकतं. त्यामुळे प्राण्यांबद्दल त्यांच्या सहवासात येणाऱ्या मानवांना अनुकंपा वाटू शकते. पण ही अनुकंपा कोणावर लादून चालणार नाही. कारण अशी अनुकंपा कोणावर लादणं, हा मानवाच्या स्वाभाविक वर्तनाचा संकोच होईल. अशी अनुकंपा निर्माण करावी लागेल.

मुळात भांबावून गेलेल्या बैलाच्या वशिंडाला, मानेला, शिंगाला लटकणं आणि काही काळ तसं राहायचा प्रयत्न करणं, या अशा खेळात जाऊ पाहणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस घटत जाणार आहे. हे विधान ‘बैलगाडी चालवू शकणारे लोक हे १९७० पेक्षा २०१६ मध्ये घटलेले असणार आणि १९९० पेक्षा २०१६ मध्ये बैलगाडी चालवू शकणारे लोक संख्येनेही घटलेले असण्याची शक्यता आहे’ या विधानासारखं आहे. पाशवी किंवा क्रूड म्हणता येतील असे काही आनंद अगदी उघडपणे घेणं, हे आधुनिकतेच्या दबावानं घटणारच आहे. पण ही प्रक्रिया व्यक्तीच्या निर्णयप्रक्रियेत स्वाभाविक घडणं आवश्यक आहे. कायदा, शासन यांनी समूहाच्या आकांक्षा काही काळ दाबता येतात, पण मग त्या आकांक्षा योग्य मानणारा राजकीय गट उदयाला येतो आणि त्या आकांक्षाना मुद्दामहून खतपाणी घातलं जातं. जल्लिकट्टूचं आत्ता नेमकं हेच व्हायची शक्यता आहे.

संवाद साधून माणसं बदलण्याचा रस्ता खडतर आहे. पण त्याला पर्यायही नाही. मानवी वर्तनाबाबतच्या चुकीच्या गृहीतकांवर आधारित कायदा, करिष्मा असलेला नेता, असे शॉर्टकट आगीतून फुफाट्यात घालण्याचीच शक्यता जास्त असते.

जल्लिकट्टूचा सर्वांत मोठा धडा हाच आहे!

(समाप्त)

लेखक मुंबईस्थित एन.एम.आय.एम.एस. विद्यापीठाच्या सरला अनिल मोदी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

kiranlimaye11@gmail.com

Post Comment

ADITYA KORDE

Mon , 23 January 2017

नुकत्याच हाती आलेल्या वृत्त नुसार जल्लीकत्टूच्या पहिल्याच दिवशी मेलेल्या ३ जणांना हिंदू धर्मवीर हि पदवी व हुतात्म्याचा दर्जा, मरणोपरांत परमवीरचक्र(जमल्यास) तसेच जखमी झालेल्या २७ जणांना महावीर चक्र आणि श्रेष्ठ क्रांतिकारक ह्या पदव्या देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा पूर्ण खर्च आयुष्यभर उचलला जाणार आहे... --एक हिंदू धर्माभिमानी कार्यकर्त्याकडून समजलेल्या खात्रीलायक अफवेनुसार.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......