लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन राहण्याचा अतिरेक झालाय. सतत ऑनलाईन राहणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.
पडघम - तंत्रनामा
सोपान मोहिते
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 29 June 2020
  • पडघम तंत्रनामा फोन अ‍ॅडिक्शन Phone addiction ऑनलाईन online addiction इंटरनेट अ‍ॅडिक्शन Internet addiction व्हॉटसअ‍ॅप WhatsApp ट्विटर Twitter सोशल मीडिया Social media

लॉकडाऊनच्या काळात सर्वांनी घरीच राहावे, यासाठी सरकारी पातळीवरून सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. काही नियम, अटी घालण्यात आल्या. त्याचे पालन करत असताना घरीच राहून काय करावयाचे, असा प्रश्न सर्वांना पडला. काहींना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश होते, त्यांनी काम करत दिवस काढले. तरीसुद्धा जो काही वेळ शिल्लक राहत होता, त्यात काय करावे असा प्रश्न होताच. काहींनी वाचन केले, आवडीचे छंद जोपासले. प्रत्येकाने वेळ कसा खर्च करावयाचा याचे नियोजन करूनसुद्धा वेळ शिल्लक राहतच होता. अशा वेळी हाताशी असणारा स्मार्टफोन उपयोगी पडू लागला. एकमेकांशी गप्पा मारणे, खुशाली कळवणे, नवनवीन माहिती मिळवणे यासाठी त्याचा नेहमीप्रमाणे वापर झाला. नंतर मात्र जसजसा वापर वाढत गेला, तसतशी नकळत ‘ऑनलाईन’ राहण्याची सवय लागली. काही गॅझेटस, अ‍ॅप्स, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमांतून प्रत्येक जण इतरांशी जोडला गेला.

आता हळूहळू अनलॉक होत आहे, पण या तीन महिन्यांत किंवा पूर्वीपासूनच लागलेली सवय मात्र चिंता निर्माण करणारी आहे. मुलांच्या ऑनलाईन वापरासंदर्भात काही संशोधने झाली आहेत. भारतात टीसीएस कंपनीने जुलै २०१४मध्ये एक सर्वेक्षण केले. त्यासाठी भारतातील १४ शहरांची (बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, मुंबई, कोचीन, अहमदाबाद, भुवनेश्वर, कोइमतुर, इंदोर, लखनौ, नागपूर, पुणे) निवड केली. यात त्यांनी १२ ते १८ वयोगटातील १२,३६५ मुलांचे सर्वेक्षण केले. या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आले. ७२ टक्के मुले स्मार्टफोनचा वापर करतात, ८५ टक्के मुले सोशल नेटवर्किंगचा वापर करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या मित्रांच्या संपर्कात राहतात. मुलींच्या तुलनेत मुले ऑनलाईन राहण्यात अग्रेसर आहेत. ८९ टक्के मुले-मुली फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टेड राहतात, अशी माहिती मिळाली.

गेल्या सात-आठ वर्षांत ऑनलाईन राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा अतिरेक लॉकडाऊनच्या काळात झाला आहे. सतत ऑनलाईन राहणे हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. हे एक प्रकारचे व्यसन तरुण मुलांपासून सर्व वयोगटातल्यांना लागलेले आहे.

याची काही लक्षणे जाणवतात. जसे की, स्वतःच्या तंद्रीत राहणे, वास्तवाचे भान नसणे, एकलकोंडे होणे, फोनकडे पाहून एकटेच हसणे, जागरण करणे, स्वतःच्या समस्यांचे आकलन न होणे, चिडचिडा स्वभाव होणे, वेगवेगळ्या अंगाने स्वतःचा सतत सेल्फी घेणे, नवीन अॅप्सच्या माध्यमातून व्हिडिओ, छायाचित्रं तयार करून सोशल मीडियावर अपलोड करणं, व्हॉटसअ‍ॅपचं स्टेटस सतत बदलत राहणं, आपल्या पोस्टला किती लाइक आल्या? कॉमेंट किती? कोणी केल्या? कोणी केल्या नाहीत?, हे मिनिटा-मिनिटाला पाहत राहणं.

कमी वयाची मुलं पॉर्न साइट शोधणं, पॉर्न व्हिडिओ पाहणं, प्रौढांसाठी असणारं साहित्य वाचणं आदी प्रकार करताना दिसतात. कळस म्हणजे काही वेबसाईटवर जाऊन सट्टा, जुगार लावत आहेत. चोरी कशी करावी? आत्महत्या कशी करावी? याचे व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे कृती केल्याच्याही बातम्या आहेत.

समाजहिताच्या दृष्टीकोनातून हे आकलनाच्या पलीकडे गेले आहे. अनेक गुन्हेगारीच्या मुळाशी याची कारणं दडलेली आहेत. तरुण मुलं अधिक संवेदनशील असल्यामुळे मागचा-पुढचा विचार न करता आपल्या मनात आलेले विचार चटकन सोशल मीडियावर व्यक्त करतात. आपल्या लिखाणामुळे काय होईल याचं त्यांना तारतम्य नसतं. तरुण मुलं सोशल मीडियाचा बेसुमार वापर करतात.

सतत ऑनलाईन राहण्याच्या प्रवृत्तीतून काही सकारात्मक बदलही झालेले आहेत. नवीन पुस्तकांचे ग्रंथालयीन कॅटलॉग पाहता येतात, शासकीय संख्याशात्रीय आकडेवारी पाहता येते, विविध देशांचे नकाशे, शहराची ठिकाणे पाहता येतात, वर्तमानपत्र वाचता येते, चालू घडामोडी कळतात, वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती मिळते. अलीकडे बरेसशी सर्वेक्षणे ऑनलाईन होत आहेत. त्यामध्ये भाग घेता येतो. ई-क्लास होऊ लागलेत, ऑनलाईन शिक्षण, परीक्षा चालू झाल्या आहेत. विविध प्रकारचे फॉर्म, माहिती ऑनलाईन भरावी लागत आहे. माहितीचा शोध, निवड, संघटन असे अनेक बदल सकारात्मक असले तरी आपण त्याचा वापर कसा करतो, हे बरेसचे महत्त्वाचे आहे.

भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० साली करण्यात आला आणि २००८ साली कायदेविषयक काही तरतुदी करण्यात आल्या. त्यातील कलम ६६ अ, क, ड, इ व कलम ६७ नुसार एखाद्यास बदनामीकारक, खोटी माहिती पसरवणे, त्यामुळे अडचण, धोका, त्रास, मानहानी, इजा, आकस, शत्रुत्व संभवत असेल तर; एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची माहिती वापरली, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी भागाचे विनापरवानगी छायाचित्रण करणे व प्रदर्शित करणे, यासाठी ३ वर्ष कैद व ५ लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.

त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याबद्दलचे कायदेदेखील माहीत असणं गरजेचं आहे. जेणे करून टोकाच्या हिंसात्मक विचारांना आळा बसेल आणि कुठे काय व्यक्त झाले पाहिजे, याची समज येईल. कारण सतत ऑनलाईन राहण्यामुळे आभासी जगात राहण्याची, कल्पनेत रंगून जाण्याची  सवय लागते. याचाच अतिरेक होऊन काही मानसिक विकार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेळीच जागे होऊन त्यावर उपाययोजना केली, तर यातून बाहेर पडता येऊ शकेल.

बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की, माझा मुलगा/ मुलगी स्मार्टफोनची मागणी करतो, गेम खेळतो, अभ्यास करत नाही, कोणाशी बोलत नाही, हट्टी बनलाय. मग आम्हाला त्याला फोन दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा वेळी ही सवय कशी कमी करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. अचानक फोन काढून न घेता, टप्प्याटप्प्याने सवय कमी करता येऊ शकते. रोज थोडा वेळ कमी करत गेलो तर हळूहळू त्याचा वापर कमी करता येतो. वयोगट कोणता आहे, याच्यावरही हे अवलंबून असते.

मुलाचे नकारात्मक मूल्यमापन न करता त्याला योग्य पर्याय दिले तर मुलांचा ‘स्व’ विकसित होत असतो. उदा. ‘तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो’, ‘जर तू जास्त कष्ट करशील तर परीक्षेत उत्तम यश मिळेल’, ‘स्मार्टफोन मुळे वेळ खूप जातो, डोळ्यावर परिणाम होतो’, ‘कधीतर कंटाळा आला तरच फोन घेत जा’ अशा सकारात्मक गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवता येतात.

ड्वेक (१९९५) या संशोधकानं मुलांबद्दलचा पालकांचा दृष्टीकोन आणि मुलांची स्व संकल्पना यांचा संबंध अभ्यासला आहे. त्यातून त्यांना असं आढळून आलं की, पालकांच्या अभिवृत्तीचा मुलांच्या विकासावर परिणाम होतो. म्हणून मुलांविषयी तक्रार करण्यापेक्षा त्यांना समजावून घेऊन पर्याय देणं गरजेचं आहे. कुटुंबाच्या बाहेर मित्र, शिक्षक यांच्याकडून मिळणारं प्रतिभरणही महत्त्वाचं असतं. वैवाहिक जोडीदारांनी एकमेकांना दिलेलं प्रतिभरण दोघांच्या ‘स्व’ विकासाला उपकारक ठरतं.

मुलं अनुकरणशील असतात. घरातील मोठ्या व्यक्तींचं निरीक्षण करून त्याप्रमाणे आपल्या वर्तनात बदल करत असतात. पालकच जर सतत हातात स्मार्टफोन घेत असतील, ऑनलाईन राहत असतील तर मुलांनाही फोन वापरावासा वाटतो. म्हणून पालकांनीही फोनचा कधी, कोठे, किती वेळ वापर करावयाचा, हे ठरवलं पाहिजे.

मानसशास्त्रातील काही उपचार पद्धतीचा उपयोग करून या सवयींना पायबंद घालणं शक्य आहे. अशा लोकांमध्ये पहिला महत्त्वाचा बदल करावा लागतो तो म्हणजे, त्यांना वास्तवाची जाणीव करून देणं. सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे आपल्या समोर काय चाललं आहे, आसपासचे लोक काय बोलत आहेत, घरी कोणती चर्चा चालू आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, याकडे त्यांचं बिलकूल लक्ष नसतं. अशा व्यक्तींना न रागावता जे काही आजूबाजूला चाललं आहे, त्याची जाणीव करून देणं, त्यांच्या अहमला धक्का न पोहचवता, कमजोरीवर बोट न ठेवता, रागराग न करता, सकारात्मक विचारांकडे त्यांना लक्ष केंद्रित करावयास लावणं, विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्राप्त परिस्थितीत वास्तवाची जाणीव निर्माण झाली की, योग्य-अयोग्य यातील फरक समजून घेऊन अनुकूल वर्तन विकसित होतं.

अल्बर्ट एलिस हे मानसतज्ज्ञ तर्कभाव उपचार पद्धतीमध्ये असं म्हणतात की, व्यक्तीचा विश्वास वाढवणं आणि त्याच्या विचारातील अतार्किक भाग काढून टाकणं महत्त्वाचं असतं. आपल्या वर्तनात बिघाड होण्यामागे आपलेच अयोग्य विचार कारणीभूत असतात. तर्काचा उपयोग करून वास्तवाशी सुसंगत असे आपले विचार ठेवता येऊ शकतात. विचारांचा व्यक्तीच्या भावनिक वर्तनावर परिणाम होत असतो. स्मार्टफोनच्या अति वापरानं आपल्या श्रद्धा, मूल्य अवास्तव व आदर्शवादी होतात. त्यामुळे आपण स्वतःकडूनच अवास्तव अपेक्षा करतो. तर्काला सोडून वागतो व स्वतःचं अवमूल्यन करू लागतो.

अशा वेळी व्यक्तीचा विश्वास व तिचं स्वयंमूल्यमापन यातील अतार्किक भाग काढून टाकणं महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यक्तीला वास्तवाची जाणीव करून द्यावी लागते. स्वतःला स्वतःचा विचार करण्यास सक्षम बनवणं, हे सल्ला किंवा उपदेश देण्यापेक्षा अधिक चांगलं. कारण सल्ले आवडत नसतात, तर प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे काही चांगले गुण आहेत, त्याचा नेमकेपणाने शोध घेतल्यास आवडीच्या घटकाकडे लक्ष जाईल आणि त्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवता येतं.

स्वतःविषयी चुकीच्या कल्पना बाळगणाऱ्या माणसाचं मनस्वास्थ्य पटकन बिघडतं. स्वतःचे जीवन अर्थपूर्ण वाटण्यासाठी स्वतःची मूल्यं समजणं गरजेचं असतं. बऱ्याचदा समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. परंतु वास्तव परिस्थितीनुसार त्याचं उत्तर मिळेलच असं नाही. अनेकदा इथेच फसगत होते.

मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक क्षमता विकसित होणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी माणसाला समस्या परिहार करण्याची कौशल्यं आत्मसात करता आली पाहिजेत. भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, इतरांशी समाधानकारक संबंध प्रस्थापित करता आले पाहिजेत. जर अशा प्रकारची कौशल्यं व्यक्तीत विकसित करण्याची संधी उपलब्ध झालेली नसेल तर आयुष्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक चांगल्या प्रकारे करता येत नाही. परिणामी अशा व्यक्तीचं मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. ऑनलाईन राहत असल्या कारणाने आणखी त्यामध्ये वाढ होत जाते. सर्व काही रेडीमेड मिळत असल्यामुळे संघर्ष करण्याची ऊर्मी कमी होत जाते. काही वेळ हाताशी फोन नसला की, जीवाची घालमेल होते, उदासीनता वाढते.          

व्यक्ती आणि समाज हे एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परातील नातेसंबंध एकमेकांना पूरक असावे लागतात. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगायचं असतं, ते समाजाच्या चौकटीत राहून. परंतु सामाजिक वातावरण जर व्यक्ती हिताला पोषक नसेल तर रिकामा वेळ कुठे खर्च करावा हा प्रश्न पडतो. समाजात मानसन्मान मिळत नसेल, सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात नसेल, तर अशा व्यक्ती स्मार्टफोनमध्ये गढून जातात. अशा व्यक्तींना कुटुंबाकडून आधार मिळणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये अत्यंत घनिष्ठ सामाजिक नातेसंबध असतात. ज्यामध्ये भावनिक नातेसंबंधांची वीण घट्ट असते.

बालपणापासून व्यक्तीच्या विकासावर कुटुंबाचा प्रभाव पडत असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे (मर्फी, बीनेट २००४). मुलं कुटुंबाकडून अनेक प्रकारच्या सवयी, वर्तन, कल्पना शिकत असतात. अशा व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींनी समजावून घेतलं, मोकळेपणाने चर्चा केली, तर ती समाज, कुटुंब यांच्याशी एकरूप होतात. स्वतःचं मनस्वास्थ्य राखण्यासाठी आपण क्षणभंगुर जगात वावरत आहोत, याची जाणीव असते, परंतू यातून बाहेर कसं पडावं हे न उमगल्यामुळे ते अडकून पडतात. अशा वेळी त्यांच्यावर जबरदस्ती न करता वास्तवाची जाणीव करून दिल्यास सकारात्मक बदल दिसून येतात आणि आपल्या भावना व कृती यावर निश्चित नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

..................................................................................................................................................................

लेखक सोपान मोहिते बार्शीमधील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

profshmohite@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा