जर्मनीने करोनाबाबतचे अनेक निर्णय वेळेत घेतल्यामुळे ही लढाई आटोक्यात आल्याचं जाणवतंय. कदाचित एक ‘रिसर्च सायंटिस्ट’ महिला देशाच्या प्रमुख पदावर असण्याचा हा फायदा असावा!
पडघम - विदेशनामा
प्रगती नाईक-देवळे
  • जर्मनीमधील लॉकडाउन
  • Tue , 09 June 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

आम्ही - मी, स्वप्नील आणि आमची पाच वर्षांची अस्या - जर्मनी या देशांत वास्तव्यास आहोत. सुरुवातीला स्वप्नीलशी लग्न करून मी या अनोळखी देशात, अनोळखी लोकांमध्ये राहायला आले आणि आता इथेच रमलेय. मी जर्मनीला यायचं ठरलं तेव्हा जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली होती, कारण भाषेशिवाय सगळं आत्मसात करणं कठीणच असणार हे माहीत होतं आणि जर्मनांना त्यांच्या भाषेविषयी किती आत्मीयता आहे, हेही माहीत होतं. मलाही जर्मन भाषा आवडायला लागली होती.

सांगायचा मुद्दा असा आहे, की मी जर्मनीला यायच्या आधीपासून जर्मन भाषेशी परिचित होते. त्यामुळे इथे आल्यावर एकदम अनकम्फर्टेबल वाटलं नव्हतं. आम्ही राहतो, ते हेसन (Hessen) हे जर्मनीतील महत्त्वाचं राज्य आहे. याच राज्यांत जर्मनीची आर्थिक राजधानी मानलं जाणारं फ्रँकफुर्ट हे शहर आहे. स्वप्नील ज्या कंपनीत काम करतो, ती फ्रँकफुर्टमध्ये आहे. हे जगातील इतर मेट्रो शहरांसारखं गजबजलेलं शहर आहे. आम्हा दोघांनाही गजबजलेल्या शहरात राहण्यापेक्षा छोट्याशा लहान ठिकाणी राहायचं होतं आणि युरोपातील कंट्रीसाईड जगण्याविषयी खूप पाहिलं आणि ऐकलं होतं. म्हणून सुरुवातीपासून आमचा शांत ठिकाणी घर शोधण्याकडे कल होता. आम्हाला फियर्नहाइम (Viernheim) हे छोटंसं गाव सापडलं. आम्ही तिथेच राहायचा निर्णय घेतला. २०१३मध्ये तिथं शिफ्ट झालो.

फियर्नहाइम हे अतिशय छोटंसं, रम्य गाव आहे. इथली लोकसंख्या जेमतेम ३२ हजार आहे. सुरुवातीला कुणीही ओळखीचं नाही आणि आजूबाजूला सगळे मुख्यतः जर्मन्स, तेव्हा आपलं मन इथे करमेल का? आवडलं म्हणून आलो आहोत पण इथल्या जीवनात आपण रमू का? इथले लोक आपल्याला आपलंसं करतील का? किंवा आपल्याला त्यांना आपल्यात सामावून घेणं शक्य होईल का? असे एक ना अनेक प्रश्न होते. पण लवकरच या लोकांमध्ये भाषेसह रुळलो. लोकही आमच्या जिव्हाळ्याची झाले. सुरुवातीचा परकेपणा गळून गेला आणि छानसा कम्युन आत्मबंध तयार झाला.

असं रुटीन सुरू झालं. अस्या तर अगदी लहानपणापासून इथेच वाढली असल्यामुळे ती या गावाचा अधिक जवळचा भाग आहे. आमच्या दोघांच्याही नोकऱ्या, अस्याची शाळा असं सगळं सरळ रेषेत सुरू होतं. या वर्षीच्या जानेवारीत असंच कानावर आलं की, करोना नावाचा व्हायरस चीनमध्ये थैमान घालतोय. हा व्हायरस अत्यंत संसर्ग करणारा आहे. तोवर युरोपमध्ये सगळं सुशेगात चाललं होतं. फेब्रुवारीमध्ये जर्मनीत मोठा सण, कार्निव्हल असतो आणि त्याच्या तयारीत सगळे गुंतले होते. अत्यंत आनंदात तो साजरा झाला. त्यानंतर एक आठवडाही उलटत नाही की, २५ फेब्रुवारीला जर्मनीच्या नॉर्दरायिनवेस्टफालन (Nordrhein-Westfallen) या राज्यातील एका छोट्या, हैन्सबर्ग (Heinsberg) या गावात करोना व्हायरसचा एक रुग्ण सापडलाय ही बातमी धडकली.

चीनमधला व्हायरस थेट युरोपातच येऊन धडकेल याची कुणालाही कल्पना नव्हती, परंतु तो रुग्ण चिनी व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे, त्याला संसर्ग झालाय असं मागोमाग प्रसारित झालं. त्यानंतर धडाधड ४१ लोकांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हा हैन्सबर्ग (Heinsberg) आठ दिवसांसाठी सील करण्यात आलं. हळूहळू या राज्यातून त्या राज्यात असा तो पसरत गेला. नॉर्दरायिनवेस्टफालन या राज्याची रुग्णसंख्या ८०००च्यावर गेली. त्यानंतर स्टुटगार्ड, फ्रँकफुर्ट व म्युनिकमध्येही रुग्ण सापडायला लागले. एव्हाना हा व्हायरस चिनी व्यक्तीपासून की युरोपिअन देशांमधून येतोय, अशीही चर्चा सुरू झाली होती.

स्वप्नीलची नोकरी फ्रँकफुर्टमध्ये आहे, तर माझी मानहाइम (Mannheim) मध्ये. माझं नोकरीचं शहर स्वप्नीलच्या तुलनेत जवळ आहे. आम्ही प्रवासासाठी बस, ट्राम आणि ट्रेनचा वापर करतो. आमचं रुटीन सुरळीत सुरू होतं. ऑफिसमध्येही तीच अवस्था होती. एकीकडे काही काळजी करण्याचं कारण नाही असं आश्वस्त केलं जात होतं आणि दुसरीकडे महत्त्वाची कामं पुढे ढकलली जात होती. करोनाचा कहर सुरू झाला होता, पण कुणी तो मान्य किंवा स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. तसंही जर्मनीत वातावरण बदलामुळे फेब्रुवारी ते मे या महिन्यांत सर्दी, खोकल्याची साथ असतेच. त्याचप्रमाणे हेही असावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि हा व्हायरस त्याच जातकुळीतील असावा अशी साधारण सगळ्यांची धारणा होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर अशी आणीबाणीची परिस्थिती जर्मनीत कधी आली नव्हती. त्यामुळे लोकांनी असं काही होऊ शकतं याची कल्पनाही केली नव्हती. पण भराभर परिस्थिती बदलत गेली. मार्केटमधील हँडवॉश, सॅनिटायझर आणि मास्क संपायला लागले. आम्हीही वीकेंडला शॉपिंग करायला गेलो तर या तिन्ही बाबी गायब होत्या. सगळी मेडिकल्स आणि शॉपिंग मॉल्स पालथे घातले, पण कुठेच काही मिळेना. हळूहळू टॉयलेट पेपर्स व रेडी टू इटची पॅकेट्स मॉल्समधून गायब झाली. सरकारने आश्वासन देऊनही लोकांनी सुपर मार्केटमध्ये रांग लावून भरमसाठ खरेदी करायला सुरुवात केली. यामध्ये वयस्क लोक मात्र भरडले गेले. तरुणाईच्या अति शॉपिंगमुळे त्यांना गरजेच्या गोष्टीही मिळेनाशा झाल्या. आम्ही १ मार्चपासून स्वतःहून घरातून क्वचितच बाहेर पडायचं असं ठरवलं. ‘वर्क फ्रॉम होम’ हळूहळू सुरू केलं आणि अस्याचं किंडर गार्टनला जाणं थांबवलं.

१३ मार्चला जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी जाहीर केलं की, करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आपल्याला किंडर गार्टन, शाळा, विद्यापीठं, हॉटेल्स, मॉल्स सगळं बंद करावं लागेल. ऑगस्टपर्यंत सर्व उन्हाळी कार्यक्रम, सोशल गॅदरिंग्ज रद्द करावी लागतील. फक्त मेडिकल आणि जे अत्यावश्यक सेवेमधील बाबी आहेत तेच सुरू राहील. सर्वांनी घरी राहणं अनिवार्य असेल. जर्मनीच्या चॅन्सेलर स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून शास्त्रशुद्ध पद्धतीनं नागरिकांना मार्गदर्शन केलं. करोना व्हायरस अधिक संसर्गजन्य असल्यामुळे तो गांभीर्यानं घ्या, वयस्कांच्या फार संपर्कात राहू नका. वयस्कांना या संसर्गाचा धोका अधिक आहे. तेव्हा अधिक सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.

जर्मनीमध्ये आरोग्यसेवाही खूप चांगली आहे, म्हणजेच संपूर्ण लोकसंख्या सरकारी आरोग्यसेवेवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय विमा उतरवला जातो. विम्यासंदर्भात प्रत्येक नागरिकाबाबत समान धोरण व अधिकार आहेत. करोना पीडित रुग्णांसाठी बेड्सची क्षमता वाढवली गेली आणि वाढत्या संख्येला विचारात घेऊन अतिदक्षता विभाग तयार केले गेले. संसदेत (जर्मन, Bundestag) पारित झालेल्या ‘कोविड-१९ रुग्णालय मदत’ कायद्यात रुग्णालयांना अर्थसहाय्य्य मिळवून देण्यासाठी आणि ते तगून राहतील, याची खात्री करण्यासाठी अनेक उपाय अमलात आणले गेले. जर एखाद्याला फ्लूसदृश लक्षणं दिसली तर आपल्या फॅमिली डॉक्टरला प्रथम फोन करायचा. लगेच रुग्णालयात जायचं नाही, अशा नागरिकांना सूचना दिल्या गेल्या. डॉक्टरांकडूनच कोविड-१९ चाचणी केली जाईल. स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं.

तोवर मानसिकदृष्ट्या आम्ही घरी राहण्यासाठी तयार झालो होतो. आता अजून बराच काळ, कदाचित महिने घरातच बसून काढावे लागतील, याचीही तयारी करत होतो. जर्मनीत संध्याकाळचं जेवण बहुधा बाहेरून मागवतात. घरी फारसा कुणी स्वयंपाक करत नाही. आता नवीन नियमांमुळे रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं बंद असणार होतं. होम डिलिव्हरी किंवा टेक-अवे सुरू होतं. वाढत्या रुग्णसंख्येचा  विचार  करता, प्रत्येक घरातून एकाच व्यक्तीला बाहेर जाण्याची मुभा असणार होती. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. प्रति दिन ती ६९०० वगैरे झाली. या सर्व काळात रेस्टॉरंट्स, फूल विक्रेते, ऑटो मॅन्यु फॅक्चरिंग, आयटी सगळ्याच क्षेत्रांना मोठा फटका बसला. करोना संकटाच्या संदर्भात फेडरल एम्प्लॉयमेंट एजन्सीने आकडेवारी जाहीर केली. बेरोजगारांची संख्या १,६९,०००ने वाढली होती आणि गतवर्षीच्या तुलनेत बेरोजगारीचा दर ५.१ वरून ६.१ टक्के झाला होता.

येऊ घातलेल्या अपरिहार्य आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी जर्मनीमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्या योजनेला ‘अल्पवेळेचं काम’ (जर्मन, kurzarbeit) असं म्हणतात. या योजनांनुसार कंपन्यांनी त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांचे कामकाजाचे तास कमी करून कोणालाही कामावरून काढून टाकलं नाही. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कंपन्यांना त्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचं आर्थिक ओझं पेलणं शक्य झालं. याव्यतिरिक्त अल्पवेळेच्या कामाच्या फायद्यासाठी मालकाचं अनुदान मोठ्या प्रमाणात करमुक्त राहतं. जर्मनीमध्ये नवीन लोकांना कामावर रुजू करणं खूप अवघड असल्यामुळे, या योजनेचा बऱ्याच कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाभ झाल्याचा २००८च्या मंदीतील यशस्वी इतिहास सर्वांना ज्ञात होता. कॅटरिंग क्षेत्रातील खाद्यपदार्थांवरील कर जुलै २०२०पासून वर्षभरासाठी १९ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. करोनासंकटात बालसंगोपनामुळे काम करण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना दीर्घ कालावधीसाठी सरकारकडून पैसे मिळतील असाही निर्णय फेडरल कौन्सिलने दिला आहे.

जर्मनीमध्ये मार्च ते सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या बेरी, स्पारगेल, मका इत्यादीचे पीक घेतलं जातं. या कामासाठी लागणारे शेतमजूर युरोपभरातून बोलावले जातात. परंतु या वर्षी जर्मनीने या कामासाठी आपल्या देशातील मजुरांनाच काम द्यायचं ठरवलं, जेणेकरून बेरोजगारी कमी होईल. याचा अर्थव्यवस्थेला खूप फायदा झाला. त्यानंतरही असंच चालू राहिलं. जर्मन लोक नियम पाळण्यात तत्पर आणि स्वयंशिस्तीचे आहेत.

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात आम्हाला कुटुंबासाठी भरपूर वेळ मिळाला. खाद्यपदार्थांचे वेगवेगळे प्रयोग करणं, बेकिंग करणं, मुलीसोबत वेळ घालवणं, पेंटिंग, स्केचिंगसारख्या नवीन कला शिकणं यात वेळ घालवला. भारतातील नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणी यांना व्हिडिओ कॉल्स करणं, नेटफ्लिक्सवर सिनेमा, वेबसिरीज बघणं सुरू झालं. घरात बसूनही क्वालिटी टाइम घालवता येतो, नवनवीन गोष्टी शिकता येतात, याचा आगळा साक्षात्कार झाला.

लोकांच्या स्वयंशिस्तीमुळे आणि शासनाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे जर्मनमधील संसर्ग आटोक्यात आल्यासारखा वाटत आहे, मृत्यूसंख्याही तुलनेनं कमी आहे. २७ एप्रिलपासून काही दुकानं (८०० किंवा त्याहून कमी क्षेत्रफळाची) सुरू करण्यात आली आहेत. गर्दी टाळणं आणि मास्क घालणं अनिवार्य केलं गेलंय. ११ मे पासून सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, लहान मुलांच्या बागा व दहावी-बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची दर दोन आठवड्यांनी कोविड-१९ चाचणी करण्यात येत आहे. पुन्हा २ जूनपासून सर्व शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत. शक्य तितक्या लोकांनी अजूनही घरून काम करावं असे निर्देश आहेत, जेणेकरून नवीन रुग्ण सापडले तर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणं शक्य होईल. युरोपातील आंतरसीमा १५ जून पासून उघडल्या जाणार आहेत. आता दिवसाला ३०० रुग्ण इतकी रुग्ण संख्या कमी झाली आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरण करणं, या दोन्ही गोष्टींचं पालन करणं दैनंदिन जीवनाचा भाग असणार आहे. सुपर मार्केटसारख्या ठिकाणी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही. शॉपिंग बास्केट सॅनिटाईझ करून दिली जातेय. १.५ मीटरचं किमान अंतर ठेवूनच सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. शाळा व किंडर गार्टनमध्ये एका वर्गात १५ हून अधिक विद्यार्थी नाहीत. एखादा पॉझिटिव्ह निघाला तर तेवढ्याच मुलांना आयसोलेट करता येईल ही त्यामागे भूमिका आहे.

जर्मनीने करोनाबाबतचे अनेक सर्वसमावेशक निर्णय विहित वेळेत घेतल्यामुळे ही लढाई आटोक्यात आल्याचं जाणवत आहे. कदाचित एक शास्त्रशुद्ध विचार करणारी, रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केलेली महिला देशाच्या प्रमुख पदावर असण्याचाही हा फायदा असावा, असं  मानण्याला जागा आहे.

आम्ही बाहेर पडायला, कामावर जायला सुरुवात केलीय, अस्याही किंडर गार्टनला जात आहे. तिचे मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे खूष आहे. पण मनात करोनाचा किंतु अजूनही दबा धरून बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरण या आयुधांसह त्याचा सामना करायला हवा. करोनाची लस येईपर्यंत इतर कुठलाही पर्याय नाही. करोनानं शाळा-महाविद्यालयात न शिकवलेले अनेक नवीन धडे शिकवले.

आता सगळं सुरळीत व्हायची वाट बघायला हवी.

..................................................................................................................................................................

लेखिका प्रगती नाईक-देवळे जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम करतात.

pragati.naik27@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा