विसाव्या शतकाच्या मध्यात आपल्या राजकीय व्यवस्थेने अंगिकारलेली लोकशाही मूल्यव्यवस्था छ. शिवाजीमहाराजांनी १७व्या शतकातच आपल्या स्वराज्याचा अविभाज्य भाग बनवली होती!
पडघम - राज्यकारण
व्ही. एल. एरंडे
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याचे एक संग्रहित चित्र
  • Thu , 04 June 2020
  • पडघम राज्यकारण शिवाजी महाराज Shivaji Maharaj शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala

६ जून हा छ. शिवाजीमहाराजांचा स्वराज्यभिषेक दिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

परकीय राजवटीविरुद्ध प्रखर लढा देऊन छ. शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, याच अंगाने त्यांच्या विचार व कार्याची अधिक चर्चा होते. बहुतांश इतिहासकारांनीही जुलमी मुस्लीम राजवटीविरुद्ध संघर्ष करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, याच अंगाने मांडणी केली. पर्यायाने महाराज केवळ लढवय्ये होते; युद्ध, आक्रमणे, यातच त्यांनी आपली सर्व शक्ती खर्ची घातली, असाच इतिहास समोर मांडला जातो. मात्र हे अर्धसत्य आहे.

जेमतेम ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या महापुरुषाने मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात एक आदर्श राज्यकर्ता म्हणून आपले नाव सप्रमाण सिद्ध केले. एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्यांनी आपली प्रतिमा समाजात निर्माण केली होती. उदारमतवाद, परधर्मसहिष्णूता, पर्यायाने धर्मनिरपेक्षता ही राजकीय मूल्ये आपल्या संविधानाने अंगीकृत करण्यापूर्वी तीन शतके आधी महाराजांनी ती आपल्या स्वराज्यात पेरली होती. व्यक्तिमात्राची प्रतिष्ठा, त्याचे जीवित स्वातंत्र्य व रयतेचे कल्याण हे महाराजांच्या स्वराज्याचे सार होते. महाराज खऱ्या अर्थाने ‘जाणता राजा’ होते. त्यांनी बहुजन समाजातील अठरापगड जातीसमूहांना एकत्र करून स्वराज्याची पायाभरणी केली. जुलमी राजवटींच्या जाचाला व गुलामगिरीला त्रासून गेलेल्या सर्वसामान्य जनतेला जगण्याचा व धैर्याने मुकाबला करण्याचा अदभुत असा पराक्रम त्यांनी साध्य करून दाखवला आणि एक नीतीमान, लोकशाहीवर्धक, धर्मनिरपेक्ष व्यवस्थेची पायाभरणी केली, हे आपल्याला विसरता येणार नाही.

उदारमतवादी राज्यकर्ता

उदारमतवादी विचारसरणी हे महाराजांचा विचार व कार्याचे मुख्य सूत्र होते. राजेशाहीतदेखील लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करता येतो, हा नवा आदर्श या महाराजांनी १७व्या शतकात निर्माण केला. रयतेचे कल्याण हाच स्वराज्याचा पाया असतो आणि तेच राज्यकारभाराचे मूळ प्रयोजन असते, या राजकीय मूल्यावर आधारित व्यवस्था त्यांनी स्वराज्यात रुजवली, प्रामाणिकपणे राबवली.

जगात अनेक महान राजे होऊन गेले आहेत. उदा. अलेक्झांडर, नेपोलियन इत्यादी. कुणाकडे शौर्य होते, पण औदार्य नव्हते; कुणाकडे शौर्य व औदार्य दोन्ही होते, परंतु चारित्र्य व नीतीमत्तेचा अभाव होता. काही नीतीमान होते, मात्र सहिष्णुता, शौर्य याबाबत कमालीचे असहिष्णू होते.

या पार्श्वभूमीवर महाराजांचा इतिहास व कार्यकर्तृत्व वादातीत आहे. एक छत्रपती किती उदारमतवादी असू शकतात, याचे महाराज मूर्तीमंत प्रतीक होते. यासंदर्भात काही घटना व उदाहरणे सांगता येतील. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झाला, तेव्हा भयभीत झालेल्या त्याच्या मुलांना महाराजांसमोर उभे करण्यात आले. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले, त्यांना अभय देऊन, त्यांच्या उदरनिर्वाहाचीही व्यवस्था केली. ‘अफजलखान गेला, वैर संपले’ असे जाहीर करून आपण राजकीय लढाया करतो, धार्मिक नाही हे सिद्ध करून परधर्मसहिष्णूता या उदारमतवादी मूल्याची प्रतिष्ठापना केली.

दुसरी घटना राजकीय शत्रू असलेल्या आदिलशाही संदर्भात आहे. हा आदिलशहा स्वराज्याचा कट्टर शत्रू असतानादेखील जेव्हा त्याच्या राज्यात दुष्काळ व प्रचंड अन्नधान्य टंचाई निर्माण झाली, तेव्हा महाराजांनी त्याच्या प्रजेला अन्नधान्याची प्रचंड मदत केली.

परधर्मसहिष्णूता

महाराजांच्या राज्यकारभाराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अंगिकारलेली आणि प्रत्यक्षात आणलेली परधर्मसहिष्णूता. त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही, तसेच राज्यातला कुणाला करूही दिला नाही. एका बाजूने मुस्लीम राज्यकर्ते हिंदूंच्या धर्मस्थळावर प्रखर हल्ले करत असताना त्यांनी परधर्मसहिष्णूतेचा आदर्श निर्माण केला.

महाराजांची धर्मनिरपेक्ष वृत्ती आजच्या काळात किती कालसंगत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या अनेक दशकांपासूनची या देशातली वाढती धर्मांधता लक्षात घेता महाराजांच्या सहिष्णू विचारांची प्रस्तुतता पदोपदी जाणवते. महाराजांनी इतर धर्मियांच्या भावना कधी दुखावल्या नाहीत, उलट त्यांचा सतत यथोचित सन्मानच केला. शत्रूची धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ यांचे रक्षण करावे असा दंडक त्यांनी आपल्या सैनिकांना घालून दिला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी रायगडावर आपल्या महालासमोर मशीद बांधली होती. एवढे औदार्य व परधर्मसहिष्णूता हिंदुस्थानच्या इतिहासात क्वचितच एखाद्या राजाने दाखवली असेल.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अस्तित्वात आलेल्या संविधानात परधर्मसहिष्णूता हे लोकशाही मूल्य आपण अंगीकृत केले, त्याची पायाभरणी शिवरायांनी १७व्या शतकातच केली होती. त्यांनी विरोधकांच्या धर्मस्वातंत्र्याचीही जपवणूक करून या देशात धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्थेचा पाया घातला. पुणे, फुरसुंगी येथील मशिदींच्या बांधकामात ढवळाढवळ करणाऱ्या मराठा सरदाराला सक्त ताकीद देऊन मुस्लिमांचे धार्मिक स्वातंत्र्य स्वराज्याचे एक मूल्य म्हणून जपले.

महाराजांच्या अनेक पत्रांत मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी सापडतात. औरंगजेबाने जेव्हा प्रजेकडून जिझिया कर सक्तीने वसूल करण्याचे फर्मान काढले, त्यास महाराजांनी विरोध करून औरंगजेबाला पत्र पाठवले होते. त्या पत्रातील काही मजकूर पुढीलप्रमाणे  – “कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे, ते अस्मानी किताब आहे. त्यात ईश्वरास ‘जगाचा ईश्वर’ म्हटले आहे, ‘मुस्लिमांचा ईश्वर’ असे म्हटलेले नाही.”

आज अशा आचार-विचारांची देशाला व महाराष्ट्राला नितांत गरज आहे.

नीतीमान राजकीय व्यवहार

नीतीमत्ता, चारित्र्य व महिलांप्रती आदरभाव या मूल्यांचीही बैठक महाराजांच्या स्वराज्याला होती. राजकारण-सत्ताकारणात नीतीमत्तेला काही स्थान नसते. चारित्र्याबाबतही अत्यंत बेफिकीर वर्तनशैली (काही सन्माननीय अपवाद वगळता) घेऊन वावरणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांनी महाराजांचा हा आदर्श घेतला पाहिजे. केवळ महाराजांना आदर्श मानून आम्ही राज्यकारभार करतो, अशा वल्गना करण्यात काही अर्थ नसतो. महाराजांचा पाईक म्हणून स्वत:ला मिरवून घेणाऱ्यांनी त्यांचा इतिहास नीटपणे अभ्यासला पाहिजे.

महाराजांनी अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नैतिकता व मानवी मूल्यांची जोपासना केली. आपले अष्टप्रधान मंडळ व सैनिकांसाठी तसे आदेश काढले जात असत. या संदर्भात महाराजांचा एका पत्रातील मजकूर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे – “दौडीत बाया-बापड्यावर हात न टाकणे. या बाबीने जर गैरबाना बर्ताव केल्यास हात कलम केले जातील, जी चिजवस्तू लागेल ती बाजारी रोख देऊन खरीदने, कुणब्यांना नाडवण्याचा संबंध नाही.”

महिलांप्रती आदरभाव आणि त्यांचा सन्मान

महिलांचा प्रचंड आदर व सन्मान करणारा राजा म्हणून महाराजांची वर्तनशैली वादातीत होती. खरे पाहता त्या काळात गोरगरीब, सर्वसामान्य महिलांच्या अब्रुला काहीच किंमत नव्हती. वतनदार, सरदार, पाटील, देशमुख यांच्या दृष्टीने गरिबांच्या लेकी-सुना म्हणजे केवळ उपभोगाच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या महिलांची अब्रु लुटली जात होती. अब्रूवर घाला घालणारेच कारभारी होते, त्यामुळे दाद मागण्याची सोय नव्हती. रांझ्याच्या पाटलाने असेच कृत्य केले. महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. सकूजी गायकवाड या त्यांच्याच किल्लेदाराने सावित्राबाई या किल्लेदारणीची अब्रू लुटली. महाराजांनी सकूजीचे डोळे काढण्याची शिक्षा दिली.

या संदर्भात कॉ. गोविंद पानसरे म्हणतात – “ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांची सुद्धा गय न करण्यास न्यायावरची एक जबरनिष्ठा लागते. ती शिवाजीमहाराजाजवळ होती. म्हणूनच रयतेला हा राजा आपला वाटत होता. अनेक मावळे त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावून गेले. आज जनता आणि राज्यकर्ते यांच्यात पडत चाललेले अंतर लक्षात घेता महाराजांप्रती रयत का एकनिष्ठ होती, हे आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. खरे शिवाजीमहाराज व खोटे शिवभक्त यात फरक करायला आपण या चरित्रातून शिकले पाहिजे.”

महाराजांनी कर्तबगार महिलांचाही (त्या शत्रूपक्षाच्या असल्या तरी) सन्मान केला. मोगलाच्या बाजूने लढणारी रायवाघिण देशमुख स्वराज्यातील सैनिकांच्या तावडीत सापडली, तेव्हा महाराजांनी तिला अभय दिले. तिच्या साहसाचे भरदरबारात कौतुक केले. किल्लेदार सावित्रीबाईचाही सन्मान केला. सकूजी गायकवाडाने जिंकलेला तिचा प्रदेश सन्मानाने परत केला. एक मोगल इतिहासकार म्हणतो – “शिवाजीराजे स्त्रियांशी बोलताना आई किंवा बहिणीशी बोलतात असे वाटते.”

गुलामगिरीविरोधात पाऊल

महाराज गुलामगिरी प्रथेच्याही विरोधात होते. महाराजांच्या काळात स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. १७व्या शतकात ही प्रथा समाजमान्य होती. महाराजांनी डच कंपनीसोबत एक व्यापारी करार केला होता. त्यातील एक कलम पुढीलप्रमाणे होते – ‘मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला महिला व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी करण्यास परवानगी होती, परंतु माझ्या राज्यात तसे करण्याचा प्रयत्न केला तर माझे लोक तुम्हाला प्रतिबंध करतील. व हे कलम कटाक्षाने पाळावे.’

महाराजांचे नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांनी त्यांच्यातील नैतिक मूल्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. स्वराज्य म्हणजे केवळ स्वकियांचे राज्य ही परिभाषा त्यांच्या स्वराज्यास लागू पडत नाही, तर लोककल्याणकारी राज्य हेच खरे स्वराज्य, असाच त्यांच्या स्वराज्याचा अर्थ होता. परकीय सत्तेप्रमाणे स्वकीय जुलमी लोकांपासून रयतेची मुक्तता हे त्यांच्या स्वराज्याचे सार होते. सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून रयतेची सुटका झाली पाहिजे, हा त्यांचा विचार त्यांचे असामान्यत्व सिद्ध करतो.

स्वराज्यातील वतनदारी त्यांनी नष्ट केली. महाराजांनी वतनदारांना वेतनदार बनवले. सर्वसामान्य रयतेची त्यांच्या गुलामगिरीतून व जाचातून मुक्तता केली. आज मात्र शिवरायांचे नाव घेऊन नवे वतनदार लोकशाही व्यवस्थेत उदयास आले. ते शिवरायांचे नाव घेऊन आपल्या वतनदाऱ्या चालवत आहेत. त्यांना ‘खोटे शिवभक्त’ म्हटले पाहिजे.

बहुजन समाजाताली पोरासोरांना सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प करणारा हा राजा १७व्या शतकातील एक विलक्षण घटना समजली पाहिजे. वास्तविक पाहता महाराज आपले ‘मर्मस्थान’ होण्याऐवजी ‘स्फूर्तिस्थान’ झाले पाहिजेत. स्वराज्यावर आलेल्या सर्व संकटांचे संधीत रूपांतर करणारे महाराज आपले मार्गदर्शक ठरावेत. यासाठी तरुणांनी त्यांचे चरित्र व त्यांचा खरा इतिहास संशोधकवृत्तीने अभ्यासला पाहिजे.

राज्यशास्त्राच्या परिभाषेत एक आदर्श राज्यकर्ता म्हणून ज्या ज्या गुणांची आवश्यकता व्यक्त केली जाते, ते सर्व गुण महाराजांच्या ठायी होते. विसाव्या शतकाच्या मध्यात आपल्या राजकीय व्यवस्थेने अंगिकारलेली लोकशाही मूल्यव्यवस्था छ. शिवाजीमहाराजांनी १७व्या शतकातच आपल्या स्वराज्याचा अविभाज्य भाग बनवली होती!

..................................................................................................................................................................

लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

vlyerande@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा