सूर्यकांता पाटलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’ नेतृत्व...
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह
  • Sat , 30 May 2020
  • पडघम राज्यकारण सूर्यकांता पाटील Suryakanta Patil काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजप BJP

सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतल्याचं वाचनात आलं. त्या भाजपच्या राजकारणातून निवृत्त झाल्या की एकूणच राजकारणातून, हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही. अलीकडच्या दीड-दोन वर्षात सूर्यकांता पाटील यांच्याशी ज्या काही भेटी झाल्या, त्यातून त्यांची झालेली घुसमट जाणवत होती. त्यामुळे भाजपच्या गोटातून तरी त्या आज-ना-उद्या बाहेर पडणार हे दिसत होतं. त्यामुळे हा निर्णय काही अनपेक्षित आहे, असं म्हणता येणार नाहीच. सूर्यकांता पाटील यांचा ‘राजकीय डीएनए’ काँग्रेसचा आहे आणि अस्सल काँग्रेसी कधी राजकारणातून निवृत्त होत नाही, हा तर इतिहास आहे! त्यामुळे सूर्यकांताबाई काँग्रेसमध्ये परत जातील की, आणखी काही नवं उभं करतील हे आज तरी सांगता येत नाही.

सूर्यकांता पाटील आणि माझ्यातलं मैत्र सख्ख आहे, नितळ आहे आणि या मैत्राला ‘अरे-तुरे’ची भरजरी झालर आहे. (आमच्या मैत्रीबद्दल ६ ऑक्टोबर २०१९ला लिहिलेल्या स्तंभातील मजकूर उत्सुकता असणाऱ्यांनी आवर्जून वाचावा म्हणजे आमच्या मैत्रीची जात आणि कूळही समजेल!) माझे आणखी काही सख्खे मित्र विविध पक्षांच्या राजकारणात आहेत. नुसते राजकारणात नाहीत तर, अविरत संघर्ष करून सत्ता आणि पक्षात एक विशिष्ट उंची प्राप्त केलेले हे मित्र आहेत, पण त्यांचं राजकारण आणि माझी पत्रकारिता यासंदर्भात आम्हा परस्परांत आजवर कधीच चर्चा, वाद, मतप्रदर्शन झालेलं नाही. त्यांनी त्यांचं राजकारण सुखनैव करावं आणि मी माझी पत्रकारिता, पाहिजे तशी करावी अशी आमची त्यामागची अलिखित धारणा आहे. आमच्यातल्या निखळ मैत्रीवर त्याची छाया पडू न देण्याचं भान आम्ही कटाक्षानं आम्ही पाळलेलं आहे. हे सांगायचं एवढ्यासाठी की, स्वत:च्या यशस्वी नेतृत्वाचा झेंडा एकहाती रोवणाऱ्या ‘राजकारणी’ सूर्यकांता पाटील यांच्याविषयी आज प्रथमच लिहितो आहे.

सूर्यकांता पाटील यांना राजकारणात येऊन आता सुमारे साडेचार दशकं होतील. नगरपालिकेची सदस्य ते केंद्रात मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. एक महिला म्हणून कोणतंही आरक्षण आणि संरक्षण न घेता सूर्यकांता पाटील यांनी राजकारणात मारलेली भरारी थक्क करणारी आहे. अशी भरारी मारण्यासाठी आवश्यक असणारी नजर, धमक, धाडस हे गुण आणि सुडाचं राजकारण न करण्याचा उमदेपणा त्यांच्यात आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी असणारा त्यांचा थेट संपर्क काँग्रेस वर्तुळात कायम असूया आणि जरबेचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेण्यापूर्वी काँग्रेस नेते विचार करत असत. ‘वाचन संस्कृतीचा होणारा संकोच’ आणि ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला का नाही’ हे आपल्या साहित्य, स्त्रीमुक्ती आणि राजकारणाच्या दालनातले कायम तेवत असलेले चर्चेचे दिवे आहेत. मधला एक काळ असा होता की, यातल्या, महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत सूर्यकांता पाटील यांचं नाव हमखास असायचं.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुकारली गेलेल्या आणीबाणीपूर्व, आणीबाणीनंतर, जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर आणि नरेंद्र मोदी यांचा उदय, असे आपल्या देशातील १९७५ नंतरच्या राजकारणाचे महत्वाचे टप्पे लक्षात घेतले तर सूर्यकांता पाटील आणि त्यांच्यासारख्या बाजूला फेकल्या जाणाऱ्या किंवा गेलेल्यांच्या राजकारणाकडे नीट बघता येईल. इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचं राजकारण व्यक्तीनिष्ठ झालं तरी कार्यकर्ता दुर्लक्षित राहिला नाही. नंतर मात्र राजकारणाचा घाट बदलत गेला. हळूहळू काँग्रेसला तुल्यबळ पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाचा उदय झाला आणि डावे क्षीण होत गेले. राजकारण केवळ सत्ताप्राप्तीसाठी हा मूलमंत्र झाला. निवडणुका ‘इव्हेंट’ झाल्या. सहकार सम्राट लयाला जाऊन स्वत:चं हित जपणारे शिक्षण सम्राट, उद्योगपती राजकारणात उदयाला आले. राजकारण ‘कॉर्पोरेट’ झाल्यानं नवे धनवंत निर्माण झाले. कार्यकर्त्याला दणकट ‘रोजी’ मिळू लागली. लोकांशी असणारा संपर्क, काम बाजूला पडलं आणि निवडणुका जिंकवून देणारा एक नवा वर्ग राजकारणात निर्माण झाला. ‘इलेक्शन स्पेशालिस्ट’ नावाची एक ‘पेड’ जमात जन्माला आली. पैसा, जात आणि धर्माची गणितं धंदेवाईक पद्धतीनं जुळवत उमेदवार व पक्षाला ब्रॅंड म्हणून विकत हे स्पेशालिस्ट निवडणुका जिंकवून देऊ लागले. सत्तेत येणारे याच वर्गाच्या नजरेतून सत्तेकडे एक व्यवसाय म्हणून बघू लागले. पाहता, पाहता राजकारणातले लोक, अगदी साधा नगरसेवक कोट्याधीश झालेला दिसू लागला.

एकदा का धंदा म्हटलं की, साहजिकच लोकहित, निष्ठा आणि मूल्य वगैरे बाबी दुय्यम ठरतात; केलेली गुंतवणूक वसूल करणारी एक नवी जमात व व्यवस्था अस्तित्वात येते. अगदी तसंच आपल्या देशातील राजकारणाच्या बाबतीत घडलं. परंपरागत राजकारण आणि राजकारणी बाजूला पडून एक नवी घराणेशाही आणि ‘उदो-उदो’चं नवा घोष उदयाला आला. नवे ‘शिशुराजे’, ‘बाळराजे’, ‘शहजादे’ आणि त्यांचे नवे शागीर्द यांचं प्रस्थ वाढलं. अलीकडच्या काही वर्षांतले बहुसंख्य राजकारणी आणि त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ बघा, पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या या पठडीतल्या एखाद्या राजकारण्याच्या मुलगा किंवा मुलीच्या संपत्तीचे आकडे बघा, म्हणजे या म्हणण्यातील तथ्यांश लक्षात  येईल. हे चित्र एकजात नसलं तरी व्यापक आहे यात शंकाच नाही.

राजकारणाच्या या नवीन व्यवस्थेत बसू न शकणारे नेते–कार्यकर्ते सर्वच पक्षात आहेत. आपण त्यापैकी एक आहोत याची जाणीव सूर्यकांता पाटील यांना अलीकडच्या काही व्हायला सुरुवात झालेली होती. त्यातच त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता तिथे त्यांची (अपेक्षित) घुसमट सुरू झालेली होती. लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी देण्याबद्दल पक्षाने अनुकूलता दर्शवणे तर लांबच राहिलं, पक्षातही सूर्यकांता पाटील यांना ना मोक्याचं कोणतं स्थान देण्यात आलं, ना कोणत्या निर्णिय प्रक्रियेतील समिती/मंडळावर त्यांना सामावून घेण्यात आलं. राज्य वा राष्ट्रीय पातळीवरचे तर सोडाच स्थानिक पातळीवरचे नेते-पदाधिकारीही अशाच प्रकारचे वर्तन करत आहेत हे स्पष्टच दिसत होतं. अगदी खरं सांगायचं तर, पक्षांतर करून आलेल्यांना जशी दुय्यम/तुच्छ वागणूक प्रस्थापित पक्षात मिळते, तसं सूर्यकांता पाटील यांचं जिणं भाजपमध्ये झालेलं होतं आणि अशी वर्तणूक वाट्याला येणं त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं.

सूर्यकांता पाटील यांच्या चार राजकीय चुका झाल्या. पहिली चूक म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जायला नको होतं. हे म्हणजे सागरातून डबक्यात उडी घेण्यासारखं होतं. देशव्यापी असणाऱ्या काँग्रेसचं राजकारण सर्व जाती-धर्मांना जोडून घेणारं, तर राष्ट्रवादीचा सर्व जाती-धर्म समभाव मराठ्यांपासून सुरू आणि मराठ्यांपाशी समाप्त अशा पद्धतीचा. दुसरी, काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला असणारी राजकीय विश्वसनीयता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे नाही. या मर्यादा माहिती असूनही शरद पवार यांच्याविषयी सूर्यकांता पाटील यांना (बऱ्यापैकी अंधत्वाकडे झुकणारी) अपार श्रद्धा आहे, या पक्षानं खासदारकी, केंद्रात मंत्रीपद दिलं याची कृतज्ञ जाणीव आहे. तरी शरद यांनी संवाद खंडित केल्याची व्यथा सूर्यकांता यांच्या पदरी पडलीच. तिसरी चूक राष्ट्रवादी सोडणं, आणि भाजपमध्ये जाणं ही तर भयंकर मोठ्ठी चौथी चूक होती. भाजप तेव्हा केंद्र आणि राज्यात सत्तेत होता तरी, लोकांना मात्र सूर्यकांता पाटील यांचं या पक्षात जाणं मुळीच रुचलेलं नव्हतं आणि ही ‘ना’रुची, खरं तर नाराजी, सूर्यकांता पाटील यांच्या लक्षात का आलीच नाही, हे एक कोडंच आहे.     

जर आपण वर उल्लेख केलेल्या नवीन संस्कृतीत बसू शकत नसू तर आपली गरज पक्षाला पडावी असं स्थान निर्माण करायला हवं, याचं भान बहुसंख्य नेत्यांना नसतं; म्हणजे मतदारसंघाच्या बाहेर त्या नेत्याची पाळंमुळं रोवलेली असावी लागतात. अलीकडच्या चार दशकात मराठवाड्यातून चार मुख्यमंत्री झाले, केंद्र आणि राज्यात मंत्री झाले, अनेक आमदार झाले, खासदार झाले, पण त्यापैकी शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्याचे नेते कोण तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेच! मतदारसंघाच्या बाहेर पूर्ण राज्यात या दोन्ही नेत्यांचा प्रभाव होता, लोकसंपर्क आणि त्यांचा जनाधार मोठा होता होता, कार्यकर्त्यांची फौज होती. कोणत्याही सभागृहाचं सदस्य असो वा नसो, त्यांच्याकडे सत्ता असो वा नसो, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय वजन कधी कमी झालं नाही!

अशोक चव्हाणांपासून ते सध्या मराठवाड्यात राजीव सातव, पंकजा मुंडे, राजेश टोपे, अतुल सावे, अमित देशमुख, संभाजी पाटील निलगेकर, अर्जुन खोतकर, हेमंत पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे... असं नेत्यांचं दमदार पीक आहे आहे, पण (विलासराव आणि गोपीनाथ मुंडे वगळता) हे सर्व नेते त्यांच्या मतदार संघ किंवा जिल्ह्यापुरते कथित प्रभावशाली आहेत. स्पष्ट सांगायचं तर हे सर्व एका बिळापुरते मर्यादित नेते आहेत. इथे उल्लेख केलेल्या काहींची राजकीय कारकीर्द अशातली आहे, पण सूर्यकांता पाटील यांचं तसं नाही. युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. देश पातळीवर इंदिराजी ते मनमोहनसिंग, राज्य पातळीवर मुख्यमंत्री म्हणून अब्दुल रहेमान अंतुले ते देवेंद्र फडणवीस असा सत्तेचा व्यापक पट सूर्यकांता पाटील यांनी पाहिला आहे. संघटना आणि लोकसंपर्काचा विशाल घनदाट महावृक्ष असलेल्या शरद पवार यांच्या छायेत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे.

पण, कटू वाटलं आणि त्यांच्यासकट त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक यांना आवडणार नसलं  तरी मैत्रीधर्म बाजूला ठेवून सांगायलाच  हवं- धमक, धाडस, राजकीय आकलन आणि व्यापक दृष्टी असूनही सूर्यकांता पाटील यांचं नेतृत्व नांदेड जिल्हा आणि हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या बाहेर रुजलं नाही; त्यांनी त्यासाठी कधी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत असं जाणवलं नाही. मराठवाड्याच्या राजकारणातील एक अपरिहार्यता म्हणून सूर्यकांता पाटील प्रस्थापित झाल्याच नाहीत. त्यांचे वयानं कमी-अधिक समकालीन असणारे अशोक चव्हाण, माधव किन्हाळकर, चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे यांचीही अशीच राजकीय शोकांतिका आहे. मंत्रीपदासोबतच वृत्तपत्राची ढाल हातात असूनही राजेंद्र दर्डा हेही याबाबतीत यशस्वी झाले नाहीत.

तरी सूर्यकांता पाटील यांच्यासारख्या धमक आणि धाडस असलेल्या उमद्या नेत्याची निवृत्ती मनाला पटणारी नाही, मग ती स्वीकारार्ह असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. परत आल्या तर, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचं ‘दिल से’ स्वागतच आहे. तरी हा निर्णय ठाम असेल तर आता लेखनाचे राहिलेले प्रकल्प सूर्यकांता पाटील यांनी पूर्ण करावेत अशी एक सख्खा मित्र म्हणून कळकळीची विनंती आहे. नाही तरी, राजकारण करण्याच्या नादात सूर्यकांता पाटील यांच्यातील पत्रकार, कवी, लेखक इतकी वर्ष अंधारातच राहिला आहे, या नवीन इनिंग्जसाठी सूर्यकांता पाटील यांना मन:पूर्वक शुभेछा!  

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......