ज्या मानसिकतेमुळे प्रश्न निर्माण झालेत, त्याच मानसिकतेच्या मदतीने ते सोडवता येणे शक्य नाही.
पडघम - तंत्रनामा
प्राजक्ता पांचाळ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 May 2020
  • पडघम तंत्रनामा ऑनलाईन शिक्षण Online education करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

प्रश्न सोडवायचा आहे की नाही यावर एकमत झाले की, पुढचा टप्पा येतो मानसिकता बदलण्याचा. शिक्षण हे खरे तर कोणत्याही प्रश्नावरचा उपाय असणं अपेक्षित असताना आज शिक्षण हाच एक प्रश्न होऊन बसलेला आपल्याला दिसतोय. प्राथमिक उपचार म्हणून सध्या जे काही चालू आहे, ते ठीक असले तरी पुढच्या काळासाठी ते पुरेसे नक्कीच नाही. त्यात भर म्हणजे आधीच्या ‘शाळा आहे पण शिक्षण नाही’ या परिस्थितीतून आपण आता ‘शाळाही नाही!’ या वळणावर आलो आहोत.

शाळेच्या उपयुक्तते\मर्यादेबद्दल काहीही मत असले तरी बऱ्याच मुलांना पद्धतशीरपणे (systematically) शिक्षित होण्यासाठी, किमान औपचारिक शिक्षण मिळावे यासाठी शाळेला पर्याय नाही, हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे ‘शाळा आहे’ यातून शिक्षणाची जी संभाव्य हमी मुलांना मिळू शकते, तीसुद्धा या काळात धोक्यात येत आहे.

तसे आपल्याला ‘एकमेकांची’ ऑनलाइन शाळा घेणे नवीन नसले तरी मुळात शाळा ऑनलाइन आणणे, हे तितकेसे सोपे नक्कीच नाही. कारण त्यात सर्व मुलांना समाविष्ट करणे, सर्वांना सहभागाची समान संधी मिळणे हे अभिप्रेत असेल तर ते कठीण आहे (अशक्य नसले तरीही). पण आम्हाला कागदोपत्री जशी बडी बडी बांधकामे करायची सवय आहे, तशी फक्त तत्त्वतः शाळा ऑनलाइन आणणे काही कठीण नाही! 

समूह म्हणून विचार करतानाची आपली एक सवय आहे- चालक-मालक यांची सोय पाहणे. प्राथमिक उपचारही तितकेच केले जातात, जितके स्वतःत काही बदल न करता, स्वतःला काही एक त्रास न देता करता येतील. शिक्षणाच्या बाबतही हेच होताना दिसत आहे.

सगळ्यात आधी आपण झेप घेतली ती ‘ऑनलाइन वर्ग/लेक्चर’कडे. छोट्या-मोठ्या शहरातल्या कित्येक खाजगी शाळा या पहिलीपासूनच कॉम्प्युटरवर, मोबाईलवर भरू लागल्या... म्हणजे शिक्षक, संस्थाचालक म्हणून मी माझे विद्यादानाचे काम, कर्तव्य पूर्ण करत आहे... आता ब्रॉडबँड/मोबाईल डेटामधून जाताजाता विद्या ही कॉलसारखी ड्रॉप होत गेली, तर माझा त्याच्याशी काय संबंध!?

शिकवण्याची हमी आम्ही देतो, मूल शिकेलच याची नाही. आमचे बोलून/दाखवून झाले तर गुण मिळवण्याचा सगळा नैतिक भार मुलांवर तसाच जसा. आम्ही बोललेले आणि दाखवलेले ‘डिकोड’ करत राहण्याचा भारही त्यांचाच!

निव्वळ ऑनलाइन येऊन ‘शिकवणे’ किंवा निव्वळ व्हिडिओ पाहून ‘शिकण्या’च्या मर्यादा हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे, परंतु ‘गुणवत्ता’ हा चिंतेचा विषय आधीपासूनचाच आहे. तो आता निर्माण झाला आहे आणि आमची वर्ग प्रक्रियाही त्या आधी एकदम समृद्ध होती, अशातलीही काही बाब नाही. 

अपवाद आहेतच, होते आणि राहतीलही. पण या अपवादांचे, नावीन्यपूर्ण उदाहरणांचे, प्रारूपांचे सार्वत्रिकीकरण कधी होणार, ते का होत नाही याविषयी आम्ही आत्मपरीक्षण कधी करणार, हे खरे प्रश्न आहेत. जे हाताळायची, त्यावर प्रामाणिक उत्तर शोधण्याची ही संधी आहे...

शिक्षण व्यवस्थेतील बदल करताना आपण पहिली आपली म्हणजे ‘शिकवणाऱ्यां’ची धोरणकर्त्यांची सोय बघतो, हे जितके खरे आहे; तितकेच हेही खरे आहे की, आपण ‘सिलॅबस कव्हर’ केल्यासारखे मुले कव्हर करत जातो. ‘Unto the Last’ हा आपला शेवटचाही विचार नसतो. आधीच आपण हार मानतो (की आळस करतो, की पुन्हा सोय बघतो?) की, सर्व मुलांचा विचार करून एकच एक निर्णय, त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही, तेव्हा चला, जितक्यांना शक्य आहे तितक्यांना आणू ‘ऑनलाइन मुख्य प्रवाहात’.

अर्थात सुरुवात म्हणून हा असा विचार वाईट नक्कीच नाही, नसावा. पण आपल्या प्रयत्नांना इथेच पूर्णविराम लागून जातो. पुढे याच प्रयत्नांनी कशी क्रांती आणली, या आवेशात आपण उरलेल्या मुलांना सहजच ‘नॉट रिचेबल’ म्हणून घोषित करून टाकतो... सार्वजनिकरित्या नाही तरी किमान आपल्या दृष्टीने स्वतःलाच निर्दोष मुक्त करण्यासाठी का होईना!

मुद्दा फक्त इंटरनेट वा स्मार्ट फोनचा नाही, तर सध्याच्या काळात साधं जगण्याची उसंतही ज्यांच्याकडे नाही, त्यांना नुसता शिक्षणाचाच नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क आपण पापणीची उघडझाप करावी इतक्या सहजपणे नाकारायचा का, हा आहे.

नेहमीच्या वर्गात प्रत्येक मूल एकाच पद्धतीने शिकत नाही, ते समजेच्या एकाच स्तरावर असते असेही नाही. शिवाय विशेष गरजा असणाऱ्या मुलांकडे तर आम्ही नेहमीच्या वर्गातही कळत-नकळत दुर्लक्ष करतो. मग त्यांचे आताच्या काळात काय होणार किंवा आपण काय करणार?

भौतिक सोयीसुविधांचा अभाव, मुलांच्या शिकण्याच्या विविध पद्धती, शिकवणे ते सुलभक असा प्रवास झालेला किंवा करत असणारा आपला शिक्षकवर्ग, या काळात आवश्यक कौशल्ये शिकण्याची गरज, त्यासाठी लागणारा कालावधी आणि अवकाश, मुलं-पालक-शिक्षकवर्ग यांच्या मानसिक स्थितीचा विचार, तंत्रज्ञानाच्या व्याप्ती आणि प्रसाराचा विचार... हे आणि असे अनेक पैलू चाचपणे सध्या गरजेचे आहे.

अर्थातच हे प्रकरण वेळखाऊ असेल. यात आपली प्रचंड ऊर्जा लागणार आहे. आधीच्या आलबेल जगाच्या चित्रावर हे आधारित नसेल. आपल्याला नव्या जगाच्या शक्यतांचा विचार करून सगळे ठोकळे पुन्हा रचावे लागतील किंवा संपूर्ण रचनाच नवी करावी लागेल... विचारांच्या मुळापर्यंत जावे लागेल, तेव्हा कुठे या सगळ्या वेबिनार्स, चर्चा, भाषणे, लेख इत्यादीला अर्थ उरेल.

‘डिझाइन थिंकिंग’ या वरवर पाहता उत्पादनाशी संबंधित वाटणाऱ्या विचार प्रक्रियेत ‘Extreme Users’चा विचार करून संबंधित प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची एक पद्धत आहे. यात आत्यंतिक टोकाच्या वाटणाऱ्या वापरकर्त्यांचा विचार केल्याने उत्पादनाबद्दलच्या विचारांच्या कक्षा रुंदावत जातात. उदाहरणार्थ, सांधेदुखीचा (Arthritis) त्रास असणाऱ्या वापरकर्त्यांना पकडण्यासाठी, हाताळण्यासाठी सोपी पडावीत अशी स्वयंपाकाची साधने Oxo Good Grips नावाच्या कंपनीने तयार केली. तेव्हा सर्वसाधारण वापरकर्त्यांसाठीसुद्धा ही साधने अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांना आढळले. आधीच्या साधनांच्या हँडल्समध्ये ग्रीपचा/‘पकडी’चा इतका विचार केला जात नसे. यातून एकूणच उत्पादनाचा वापर सहजपणे करू शकणाऱ्या लोकांचा आवाका वाढला हे नक्कीच, पण सर्व साधारण वापरकर्त्यांच्या दृष्टीनेही त्यात Value addition झाली, त्याची उपयुक्तता वाढली. Extreme Usersचा विचार केल्याने मूळ विचार अधिक समावेशक होतो.

याच धर्तीवर आज आणि इथून पुढे शिक्षणासंबंधी व्यापक, सर्वसमावेशक विचार आपल्याला करावा लागेल. शिक्षण व्यवस्थांच्या बदलाचा विचार करताना नेहमीप्रमाणे कृती आरखाड्यांचा तोच तो प्राधान्यक्रम आपण ठेवला तर बदल तर लांबचीच गोष्ट आहे, पण सध्याचा ‘स्टेटस-को मेंटेन’ करणेही आपल्याला शक्य होणार नाही!

पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गरजांच्या अगदी टोकांवरच्या उदाहरणांचा विचार करून जेव्हा विचार केला जाईल, तेव्हा जिथे ऑनलाइन शिक्षण, शिक्षक/शिक्षिका पोहोचू शकत नाहीत, तिथे काही देशांत कार्यरत असणाऱ्या Student Support Groupsसारख्या काही संकल्पना गाव पातळीवर राबवता येतील का, आता गावाकडे परत गेलेल्या तरुण-तरुणींचा यात सहभाग घेता येईल का, अशा शक्यता धुंडाळून पाहता येऊ शकतील. 

इतकेच नाही तर मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीमध्ये अडचणी आल्यावर मुलींच्या शिक्षणाला तिलांजली दिली जाऊ शकते. अशा लक्षात असूनही लक्षात न येणाऱ्या गोष्टींचा सहानुभूतीने विचार करावा लागणार. तो आपण करणार का?

डॉ. अभय बंग यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर युवावर्गाला केलेल्या एका आवाहनात डॉक्टर तरुण-तरुणींना उद्देशून असे म्हटले आहे की, या काळात करोना रुग्णांसाठी प्रॅक्टिस करणे हे एका अर्थाने इतिहास जगल्यासारखे आहे. हे सगळे नंतर पुस्तकांमधून शिकण्यापेक्षा आताच हा इतिहास जगून त्यातून शिकणे हे जास्त श्रेयस्कर आहे.

हे या काळात जगणाऱ्या आपल्या प्रत्येकांस लागू आहे.

मुळात आपण जगणे आणि शिकणे इतके वेगळे करून टाकले आहे की, आपल्याला पुस्तकातूनच शिकता येते ही धारणा वाढत गेली. निव्वळ साधन म्हणून असणाऱ्या ज्या पाठ्यपुस्तकाला आपण सर्वेसर्वा करून टाकले, ती पाठ्यपुस्तके आता मुलांकडे असली काय किंवा शिक्षकांकडे असली काय किंवा ऑनलाइन उपलब्ध असली काय, शिक्षणासाठी आता त्यावर अवलंबून राहता येईल, त्यावरच फक्त विसंबून राहता येईल, अशी परिस्थिती नाही, ही पाठ्यपुस्तकांची मर्यादा तरी किमान आपल्या कायम लक्षात राहील ही अपेक्षा... जिथे अजिबातच लिखित/प्रकाशित पुस्तके बघायलाही मिळत नाहीत, तिथे किमान पाठ्यपुस्तकांची तरी मुलांना साथ आहे, हे नाकारता येणार नाहीच, पण शिक्षणाचे जीवनापासून विलगीकरण करून ते पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित करणे, या धारणेची मात्र फेरतपासणी होणे गरजेचे आहे.

शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आमचा छंद जोपासण्याचा काळही आता गेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. फार फार तर सद्यस्थितीत आहे त्या अभ्यासक्रमातील काय काय संबंधित (relevant) आहे, कोणता असा भाग आहे जो पूर्ण करणे गरजेचे आहे, हे आपण शोधायला हवे.

NCERT मधील प्रा. अनुपम अहुजा यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, अभ्यासक्रम हा ‘कव्हर’ करण्यापेक्षा ‘अनकव्हर’ करणे अपेक्षित असते. सध्याच्या काळात तर हे अगदीच खरे आहे की, अभ्यासक्रमातील काय तपासता येईल ते ‘कव्हर’ म्हणजेच पूर्ण करण्याच्या मागे लागण्यापेक्षा काय संयुक्तिक ठरेल ते ‘अनकव्हर’ म्हणजेच उलगडण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आहे त्या अभ्यासक्रमातील आताचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेलच, पण त्याचबरोबर त्यात गरजेनुसार भर घालावी लागेल, बदल करावे लागतील.

अर्थात हे सगळे करायचे तर स्वतःला पुन्हा हे बजावून सांगायला लागेल की, ज्या मानसिकतेमुळे प्रश्न निर्माण झालेत, त्याच मानसिकतेच्या मदतीने ते सोडवता येणे शक्य नाही.

..................................................................................................................................................................

लेखिका प्राजक्ता पांचाळ प्राथमिक शिक्षणाशी संबंधित NGO मध्ये काम करतात.

prajaktahpanchal@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा