आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू शकतो. आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू.
पडघम - देशकारण
नरेंद्र मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sat , 16 May 2020
  • पडघमदेशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi आत्मनिर्भरत भारत Aatmanirbhar Bharat करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी रात्री आठ वाजता भारतीय नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणाचं हे शब्दांकन आणि मूळ हिंदी भाषणाचा काहीसा संपादित अनुवाद. 

..................................................................................................................................................................

सर्व देशवासियांना नमस्कार. गेले चार महिने जग करोनाचा सामना करत आहे. या काळात अनेक देशांमधील ४२ लाखांपेक्षाही जास्त जणांना करोनाची बाधा झाली आहे. पावणे तीन लाख या रोगाला बळी पडले आहेत. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले सदस्य गमावले आहेत. मी त्या सर्वांविषयी अनुकंपा व्यक्त करतो

मित्रांनो, एका विषाणूने जगाला तसनस करून टाकलेय. जगभरातली लाखो आयुष्ये संकटाचा सामना करत आहेत. एक प्रकारे सारे जगच स्वत:ला वाचवण्याच्या मागे लागलेय. असे संकट याआधी आपण कधी पाहिले नाही, त्याविषयी ऐकलेही नाही. मानवजातीसाठी हे सगळे नक्कीच कल्पनेपलीकडचे आहे. हा संघर्ष अभूतपूर्व आहे. पण थकणे, हरणे, तुटणे, मोडणे माणसाला मान्य नसते.

सतर्क राहून, या युद्धाचे सगळे नियम पाळून आपल्याला यातून वाचायचे आहे आणि पुढेही जायचेय. सगळे जग संकटात असताना आपल्याला आपला संकल्प आणखी दृढ करायला हवा. आपला संकल्प या संकटातही विराट असायला हवा. आपण मागच्या शतकापासून सतत ऐकत आलो आहोत की, २१वे शतक भारताचे असेल. आपल्याला करोनाआधीचे जग, जागतिक व्यवस्था यांच्याकडे सविस्तरपणे पाहण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली आहे.

करोनामुळे जगभर जी परिस्थिती निर्माण झालीय, ती आपण पाहत आहोत. जेव्हा या दोन्ही कालखंडाकडे भारताच्या नजरेतून पाहतो, तेव्हा वाटते की २१व्या शतकातला भारत हे केवळ आपले स्वप्न नाही, तर जबाबदारीही आहे. पण यावर उपाय काय? जगाची आजची अवस्था आपल्याला सांगते की, यावर एकच मार्ग आहे – ‘आत्मनिर्भर भारत’. आपल्या शास्त्रात सांगितलेय की, एश: पंथ:. म्हणजे हाच रस्ता आहे - ‘आत्मनिर्भर भारत’. एक देश म्हणून आज आपण महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत. करोनाचे महासंकट आपल्यासाठी एक संकेत, संदेश घेऊन आले आहे, एक अवकाश घेऊन आले आहे.

एका उदाहरणासह मी माझे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा करोनाचे संकट सुरू झाले, तेव्हा भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्क यांचे नाममात्र उत्पादन होत होते. आजघडीला भारतात रोज दोन लाख पीपीई किट आणि दोन लाख एन-९५ मास्क बनवले जात आहेत. हे आपण यामुळे करू शकलो आहोत की, भारताने संकटाला संधीमध्ये बदलवले.

आपली हीच दृष्टी ‘आत्मनिर्भर भारता’साठी प्रभावी ठरणार आहे. आज जगात ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. अर्थकेंद्रित जागतिकीकरणाऐवजी मानवकेंद्रित जागतिकीकरणाची चर्चा जोरावर आहे. भारताचे मूलभूत चिंतन जगाच्या तुलनेत एक आशेचा किरण आहे. भारताची संस्कृती, भारताचे संस्कार आत्मनिर्भरतेविषयी सांगतात. मी त्या आत्मनिर्भरतेविषयी सांगतो आहे, ज्याचा आत्मा ‘वसुधैव कुटुम्बकम’ आहे. जग हेच कुटुंब. भारत जेव्हा आत्मनिर्भरतेविषयी बोलतो, तेव्हा आत्मकेंद्रित व्यवस्थेची वकिली करत नाही.

भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये जीवनातल्या सुख-शांतीची चिंता आहे. जी ‘संस्कृती चिरायू होवो’ यावर विश्वास ठेवते, जी प्राणीमात्रांचे कल्याण चाहते, जी संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानते, जी ‘माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या’ या दृष्टीची आस्था ठेवते, जी पृथ्वीला आई मानते. ती संस्कृती, ती भारतभूमी जेव्हा आत्मनिर्भर होईल, तेव्हा सुखी जगाची शक्यताही साकार होईल.

भारताच्या प्रगतीमध्ये नेहमीच जगाची प्रगती अनुस्यूत राहिली आहे. भारताच्या उद्दिष्टांचा, त्याच्या कामाचा प्रभाव विश्वकल्याणावर पडतोच. भारत ‘उघड्यावर संडास’मुक्त झाला, तेव्हा जगाची छबी बदलली. टीबी, कुपोषण, पोलिओ… भारताच्या अभियांनाचा परिणाम जगावर होतोच. इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही भारताने ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात जगाला दिलेली भेट आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन ही मानवाला तणावापासून मुक्ती मिळव‌ण्यासाठीची भारताने दिलेली देणगी आहे.

जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या जगासाठी भारताची औषधे नवी आशा घेऊन येत आहेत. त्यामुळे जगभर भारताचे कौतुक होत आहे. त्याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जगाला असा विश्वास वाटतो आहे की, भारत अधिक चांगले करू शकतो. मानवजातीच्या कल्याणासाठी भारत बरेच काही करू शकतो.

प्रश्न असा आहे की – कशा प्रकारे? या प्रश्नाचेही उत्तर आहे – १३० कोटी देशवासीयांचा ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प. आपला इतिहास गौरवास्पद राहिलेला आहे. भारत जेव्हा समृद्ध होता, सोन्याची चिमणी म्हटला जात होता, संपन्न होता, तेव्हा विश्वकल्याणाच्या वाटेवरून चालत राहिला. काळ बदला, भारत गुलामगिरीच्या साखळदंडात अडकला. आपण विकासाचे भुकेले राहिलो. आज पुन्हा भारत विकासाच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करतो आहे. विश्वकल्याणाविषयी ठाम आहे.

आठवून पहा, या शतकाच्या सुरुवातीला Y2Kचे संकट आले होते, भारताच्या तंत्रज्ञांनी जगाला त्यातून बाहेर काढले होते. आज आपल्याजवळ साधन आहे, सामर्थ्य आहे, आपल्याजवळ जगातले सर्वोत्तम टॅलेंट आहे, आपण उत्तम उत्पादन बनवू. आपली गुणवत्ता अजून सुधारू. पुरवठासाखळी आधुनिक करू. हे आपण करू शकतो आणि जरूर करू.

मी माझ्या डोळ्यांनी कच्छमधल्या भूकंपाचे दिवस पाहिले आहेत. सगळीकडे राडारोडा होता. सगळे काही उदध्वस्त झाले होते. असे वाटत होते की, जणू काही कच्छवर मृत्युची दाट छाया पसरली आहे. तेव्हा कुणी कल्पनाही करू शकत नव्हते की, ही परिस्थिती कधी बदलेल. पण पाहता पाहता कच्छ उभा राहिला, चालू लागला, पुढे आला. ही आपणा भारतीयांची शक्ती आहे. आपण ठरवले तर कुठलेही लक्ष्य, कुठलाही रस्ता कठीण नाही. आज तर इच्छाही आहे आणि मार्गही आहे. भारताला आत्मनिर्भर करणे हा तो मार्ग आहे. भारताच्या संकल्पशक्तीमुळे तो आत्मनिर्भर होऊ शकतो.

‘आत्मनिर्भर भारता’ची भव्य इमारत पाच स्तंभावर उभी आहे.

पहिला स्तंभ - इकॉनॉमी. अशी अर्थव्यवस्था जी टप्प्याटप्प्यांच्या बदलापेक्षा उडी घेईल.

दुसरा स्तंभ - इन्फ्रास्ट्रक्चर. असं इन्फ्रास्ट्रक्चर जे आधुनिक भारताची ओळख बनेल.

तिसरा स्तंभ - आपली व्यवस्था. एक अशी व्यवस्था जी मागच्या शतकाची पद्धती नाही तर २१व्या शतकाची स्वप्ने साकार करणारी, तंत्रज्ञानाधारित असेल.

चौथा स्तंभ – आपली डेमोग्राफी. आपल्या जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशातली ‘व्हायब्रंट डेमॉग्रफी’ ही आपली ताकद आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या ऊर्जेचा स्त्रोत आहे.

पाचवा स्तंभ आहे – डिमांड. आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी-पुरवठ्याची जी साखळी आहे, जी ताकद आहे, ती पूर्ण क्षमतेनिशी वापरण्याची गरज आहे. देशातली मागणी वाढवण्यासाठी, ती पूर्ण करण्यासाठी आपल्या पुरवठासाखळीतील प्रत्येक भागधारकाला सशक्त करण्याची गरज आहे. आपली वितरणव्यवस्था, आपली मागणीव्यवस्था यांना आपण मजबूत करू, ज्यात आपल्या देशाच्या मातीचा सुगंध असेल, मजुरांच्या घामाचा सुगंध असेल.

करोनाचा सामना करण्यासाठी मी नव्या संकल्पासह विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो आहे. हे पॅकेज ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’चा महत्त्वाचा मार्ग म्हणून काम करेल. अलीकडच्या सरकारच्या करोनासंकटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा होत्या, जे आरबीआयचे निर्णय होते ते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे ते जवळ जवळ २० लाख कोटी रुपयांचं आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळजवळ १० टक्के एवढे आहे. यातून वेगवेगळ्या आर्थिक वर्गाला आर्थिक बळ मिळेल. २० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज २०२०मधल्या भारताच्या विकाययात्रेला, ‘आत्मनिर्भर भारता’च्या अभियानाला गती देईल. ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प साकार करण्यासाठी जमीन कामगार, तरलता आणि तोटा सर्वांवर भर दिला गेला आहे.

हे आर्थिक पॅकेज कुटिरोद्योग, गृहउद्योग आणि मध्य स्वरूपाच्या उद्योगांसाठी आहे, ज्यावर लाखो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. ते आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा सशक्त आधार आहेत. हे आर्थिक पॅकेज देशातल्या कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आहे, जे कुठल्याही स्थितीत, कुठल्याही मौसमात देशवासीयांसाठी रात्रंदिवस मेहनत करतात. हे आर्थिक पॅकेज आपल्या देशातल्या मध्यमवर्गासाठी आहे, जो प्रामाणिकपणे कर भरतो, देशाच्या विकासात आपले योगदान देतो. हे आर्थिक पॅकेज उद्योगजगतासाठी आहे, जे भारताचे आर्थिक सामर्थ्य उंचीवर नेण्यासाठी संकल्पबद्ध आहे. उद्यापासून काही दिवस अर्थमंत्र्यांच्याद्वारा आर्थिक पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. ‘आत्मनिर्भर भारता’साठी बदलांच्या वचनबद्धतेबरोबरच भारताचे पुढे जाणे अनिवार्य झालेले आहे.

तुमच्या लक्षात आले असेल की, गेल्या सहा वर्षांत ज्या सुधारणा झाल्या, त्यामुळे या संकटातही भारताची व्यवस्था जास्त सक्षम असल्याचे दिसते. कुणी कल्पना तरी करू शकत होते का, की भारत सरकार जो पैसा देईल तो सगळ्याच्या सगळा थेट गरीब आणि शेतकऱ्यांच्या खिशात पोहचेल. हे तेव्हा झाले जेव्हा सरकारी कार्यालये, वाहतूकव्यवस्था बंद होती. ही जनधन, आधार, आणि मोबाईल या त्रिशक्तीशी जोडलेली एक सुधारणा होती, तिचा परिणाम आपण पाहिला आहे. आता सुधारणेची ती चौकट व्यापक करायची आहे.

या सुधारणा शेतीशी संबंधित सर्व पुरवठासाखळीत होतील. त्यामुळे शेतकरी सशक्त होतील आणि भविष्यात जेव्हा करोनासारखी संकटे येतील तेव्हा त्याचा शेतीवर फारसा परिणाम होणार नाही. या सुधारणा करव्यवस्था, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, समर्थ मानवसंसाधन आणि मजबूत आर्थिक व्यवस्था यांच्या निर्मितीसाठी असतील. या सुधारणा व्यवसायांना प्रोत्साहित करतील. गुंतवणूक वाढवतील आणि ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पाला मजबूत करतील.

आत्मबळ आणि आत्मविश्वासाच्या आधारावरच आत्मनिर्भरता शक्य आहे. आत्मनिर्भरता जागतिक पुरवठ्यासाखळीतही कडव्या स्पर्धेसाठी देशाला तयार करेल. आजाच्या काळाची गरज आहे की, भारत प्रत्येक स्पर्धेत जिंकेल, जागतिक पुरवठासाखळीत महत्त्वाची भूमिका निभावेल. हे लक्षात घेऊन आर्थिक पॅकेजमध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्या क्षेत्रांची कार्यक्षमता वाढेल आणि गुणवत्ता सुधारेल.

हे संकट इतके मोठे आहे की, मोठमोठ्या व्यवस्थाही हादरून गेल्या आहेत. पण याच काळात आपण, आपल्या देशाने, आपल्या गरीब बहीण-भावांनी आपल्या संघर्षशक्तीचा, संहनशीलतेचा  आविष्कार उजागर केला आहे. खासकरून घरोघर वस्तू विकणारे, हातगाडीवाले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामान विकणारे यांनी खूप कष्ट सहन केले. जे घरून काम करणारे बंधू-भगिनी आहेत, त्यांनी खूप कष्ट सहन केले आहेत. तपश्चर्या केली आहे, त्याग केला आहे. असे कुणी नसेल ज्याला त्यांची अनुपस्थिती जाणवली नसेल. आता त्यांना पुन्हा समर्थ करणे, त्यांच्या आर्थिक हितासाठी काही मोठी पावले उचलणे, हे आमचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन संघटित-असंघटित क्षेत्रातील गरीब, श्रमजीवी, स्थलांतरित मजूर, पशूपालक, मच्छिमार, सर्वांसाठी आर्थिक पॅकेजमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

करोना संकटाने आपल्याला लोकल उत्पादन आणि लोकल बाजारपेठ यांचे महत्त्व समजावून दिलेय. या संकटात स्थानिकांनीच आपली मागणी पूर्ण केली आहे. आपल्याला या लोकल व्यवस्थेनेच वाचवले आहे. लोकल ही फक्त गरज नाही तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. काळाने आपल्या लक्षात आणून दिलेय की, लोकल गोष्टींना आपल्या जीवनमंत्र बनवावा लागेल. आजचे ग्लोबल ब्रँड कधीकाळी लोकलच होते. जेव्हा तेथील लोकांनी त्याचा वापर आणि प्रचार सुरू केला, तेव्हा ते ‘ग्लोबल’ बनले. त्यामुळे आपल्या लोकलसाठी भारतवासीयांना मौखिक बनण्याची गरज आहे.

केवळ लोकल उत्पादने विकत घ्यायची नाही तर त्यांचा प्रचारही करायचा आहे. आपला देश असे करू शकतो. तुमच्या प्रयत्नांनी तुमच्याविषयीची माझी श्रद्धा अजून वाढवली आहे. जेव्ही मी देशाला खादी वापरण्याविषयी सांगितले, तेव्हा खूप कमी वेळात खादी आणि हातमाग यांना तुम्ही रेकॉर्डब्रेक विक्रीवर नेऊन पोहचवले. त्यांना ब्रँड बनवले. याचा मला गर्व आहे.

मित्रांनो, सर्व वैज्ञानिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, करोना बराच काळपर्यंत आपल्या जीवनात हिस्सा राहिल. पण करोनामुळे आपले आयुष्य विखुरले जाईल असे आपण होऊ देऊ शक नाही. आपण मास्क वापरू, दोन फूट अंतर पाळू, पण आपल्या लक्ष्यापासून विचलित होणार नाही. त्यामुळे लॉकडाउनची चौथी पायरी नवे रंग-रूप आणि नवे नियम असलेली असेल. राज्यांकडून आम्हाला ज्या सूचना मिळाल्या आहेत, त्यानुसार लॉकडाउनच्या चौथ्या पायरीबद्दलची माहिती तुम्हाला १८ मेच्या आधी दिली जाईल.

मला पूर्ण विश्वास आहे की, नियमांचे पालन करत आपण करोनाशी लढू आणि पुढेही जाऊ. असे म्हटले गेलेय की, सर्वम आत्मवशं सुखम. म्हणजे जे आपल्या कब्जात आहे, नियंत्रणात आहे, तेच सुख आहे. आत्मनिर्भरता आपल्याला सुख आणि दिलासा देण्यासोबतच समर्थही करते. २१व्या शतकाला भारताचे शतक बनवण्याचा आपला संकल्प ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पातूनच पूर्ण होईल. याला १३० कोटी देशवासीयांच्या प्राणशक्तीतूनच ऊर्जा मिळेल. आत्मनिर्भर भारताचे हे युग आपल्यासाठी नवा पण असेल, नवे पर्व असेल. नवी संकल्प शक्ती घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. आपला आचार-विचार, प्रयत्नांची पराकाष्ठा असेल; कर्तव्यभाव पुरेपूर असेल; कौशल्य विपुल असेल; तर आत्मनिर्भर भारत बनवण्यापासून कोण रोखू शकतो!

आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू शकतो. आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू.

मी तुम्हाला खूप शुभकामना देतो, तुम्ही तुमच्या स्वास्थाची, कुटुंबीयांची काळजी घ्या.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा