अनिलकुमार साळवे : पुस्तकांपेक्षा माणसे वाचत आलेला नाटककार
पडघम - सांस्कृतिक
संदीप बनसोडे
  • डावीकडे अनिलकुमार साळवे, उजवीकडे पुरस्कार सोहळा
  • Mon , 16 January 2017
  • सांस्कृतिक अनिलकुमार साळवे Anilkumar Salve महाराष्ट्र फाउंडेशन maharashtra foundation रा. शं. दातार पुरस्कार १५ ऑगस्ट 15 August शिरमी Shirmi

महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा रा. शं. दातार नाट्य पुरस्कार यंदा अनिलकुमार साळवे यांना नुकताच पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आला. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात नाट्यशास्त्र शिकवणारे साळवे यांना ‘ग्लोबल आडगाव’, ‘शेख मुहम्मद’ आणि ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ या तीन एकांकिका लेखनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांची ओळख करून देणारा हा विशेष लेख…

अनिलकुमार साळवे यांचा प्रवास माजलगावच्या झोपडपट्टी म्हणवणाऱ्या भीमनगर नावाच्या मोहल्ल्यातून सुरू झाला. हा प्रवास आता महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारापर्यंत पोहचला आहे. पण त्यासाठी तेवढेच कष्टही उपसावे लागले आहेत.

१९८७-८८मध्ये साळवे यांचे मोठे बंधू राजेश साळवे यांनी माजलगावात नाट्यकलेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्याकडून नाट्यकलेचे बाळकडून अनिलला मिळाले. पुढे मोठे बंधू राजकारणात गेल्यामुळे हा वारसा अनिलकडे आला. तो त्यांनी सांभाळला, किंबहुना ते तो आजही यशस्वी रीतीने चालवत आहेत. मुंबई-पुण्याची नाटके कधीही पाहण्यास मिळाली नाहीत तरी त्यांच्या जवळपास तरी आपल्याला नक्कीच जाता येईल, असा ध्यास मनाशी बाळगून माजलगावच्या बसस्थानकावर वर्तमानपत्रांतून येणाऱ्या नाटकाच्या बातम्या, चित्रपटक्षेत्रातील काही जुनी नियतकालिके कमीत कमी किमतीत विकत घेऊन साळवे यांनी अधाशासारखी वाचून काढायची. बऱ्याच वेळा साप्ताहिके, वर्तमानपत्रे विकत घेण्यासाठी पैसे नसायचे. अशा वेळी साळवे एखाद्या गवंड्याच्या हाताखाली काम करायचे.

काही झाले तरी नाटकात यश मिळवायचेच, चित्रपटासारख्या रंगीत दुनियते दाखल व्हायचेच, असे उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण होईल का, याबद्दलची भीती अनिलला कायम सतावत असे. कारण घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. बाहेर शिक्षण घ्यायला जावे तर परिस्थितीचा रेटा. त्यात वडिलांचे छत्र हरवलेले, आईवर संसाराचा गाडा हाकण्याचा भार आलेला. मोठा भाऊ बसस्थानकातल्या गाड्या धुवायचा. एका गाडीला दोन रुपये मिळायचे. तेवढीच आईला मदत व्हायची. तुटपुंज्या पैशात आई बाजार करायची. त्या आठवडी बाजारातून किमान आज तरी काही खाऊ खायला मिळेल का, असा विचार डोक्यात येण्याचे ते बालवय. पण अनिलच्या डोक्यात विचार यायचे की- माझा जिल्हा अठराविश्वे दारिद्रयातला. ऊसतोड कामगारांचा जिल्हा. ऊसतोडीला जाण्यासाठी निघालेल्या मायबापांची धाय मोकलून रडणारी ही मुलं कधीतरी रडायची थांबतील का? ते विचार त्याला अस्वस्थ करून टाकायचे. ऊसतोड कामगारांच्या मुलांचा टाहो पाहून त्यांच्या काळजाला तडे जायचे. परिस्थितीने थोराड झालेली पण प्रत्यक्षात बालवयातील बहीण माईच्या माघारी आपल्या भावडांना सांभाळायची.

या सर्व घटना, स्वत:च्या आईचा आपल्या लेकरांसाठी चाललेला जगण्या-जगविण्यासाठीचा संघर्ष अनिल पाहत होते. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनांतून त्यांना लेखणीचे बळ मिळत गेले. ऐशोरामात जगणाऱ्या उच्चभ्रू समाजाचे चित्रण नाटक, चित्रपटात येत होते. ते पाहताना आपण काही वेगळे केले पाहिजे हे मनाशी ठरवून अनिलने वेगळ्या धाटणीच्या लेखनाला प्रारंभ केला. सुरुवातीला ‘आम्ही बंधिस्त पाखरे’ नावाची एकांकिका लिहिली. गुरू कल्याणराव बोठे व उजगरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन पुरस्कार मिळवला. त्यानंतर अनिल थांबले नाही. माजलगावमध्ये नाट्यसंघाची निर्मिती करून अक्षय साळवे, रणजित ससाणे, नितीन, भागवत गाडेकर, अशोक मगर, संघपाल कांबळे, काळुराम सातपुते, स्वप्नील सोनवणे, मयुर प्रधान, सिद्धार्थ, अशोक आदिंना सोबत घेऊन अनेक एकांकिका केल्या. पुढे पुणे, मुंबई, नागपूर इथल्या स्पर्धकांवर मात करून विविध पुरस्कार मिळवले.

त्यांच्या एकांकिकेची शीर्षके बरेच काही सांगून जातात. जसे ‘शांतता दंगल चालू आहे’, ‘मृत्यूच्या छायेत अग्निकुंड’, ‘आक्रोश’, ‘वेदना’ अशा सामाजिक भान व्यक्त करणाऱ्या त्यांच्या अनेक एकांकिकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयीन जीवनात युवक महोत्सवाच्या निमित्ताने नाटकांच्या लिखाणाबाबतची प्रगल्भता वाढत होतीच. अशात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण नाट्यशास्त्रातच घ्यायचे असा निश्चय करून अनिलने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. तिथेच शिक्षण घेत असलेल्या संजीवनी दिपके नावाच्या मुलीशी त्यांची भेट झाली. पुढे तिच्याशी प्रेम, लग्न झाले. संजीवनीने नाट्यशास्त्र विभागात प्रेवश घेण्यापूर्वी पत्रकारितेची पदवी संपादन केली होती. अनिलनी केलेल्या लेखनाची चर्चा तिच्यासोबत व्हायची. त्याचा अनिलला फायदा झाला.

पुढे अनिलनी ‘कथा खैरलांजी’, ‘गांधीजींचा चष्मा हरवला आहे’, ‘ग्लोबल आडगाव’, ‘शेख मुहम्मद मराठी माध्यम’, ‘ओयासिस’ अशा एकंदर ४० एकांकिका व नाटके लिहिली. नुकताच त्यांनी ‘१५ ऑगस्ट’ या नावाचा लघुचित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यात एका वेश्येच्या मुलाची मर्मस्पर्शी कथा आहे. या लघुपटाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नवी मुंबईच्या शाखेचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. माय मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी नामांकन झाले आहे, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही निवड झाली आहे. प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होण्याचा बहुमानही मिळाला आहे. याशिवाय लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही हा लघुपट निवडला गेला आहे.

आजपर्यंत अनिलने एकंदर २८१ विविध पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या ‘शिरमी’ नावाच्या जातपंचायतीवर आधारित लघुपटाला आठ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कोचिन येथे दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा सन्मानही झाला आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशातील ६० नामांकित दिग्दर्शकांमध्ये त्यांना गौरवण्यात आले आहे.

ग्रामीण भागापासून सुरू झालेला अनिलचा लेखनप्रवास आज महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारापर्यंत पोहचला असला तरी ‘हा केवळ माझ्या एकट्याच्या बहुमान नसून तो स्वयंस्फूर्तीने धडपडणाऱ्या सर्व कलावंतांचा बहुमान आहे’ असे अनिल मानतात. या प्रवासात सिद्धार्थ तायडे आणि महाविद्यालयीन जीवनात सोबत असलेल्या आणि पत्नी संजीवनी हिचाही मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात. ‘नाटक व चित्रपट हे माझे पॅशन नसून मिशन’ आहे असे ते म्हणतात. परिस्थितीमुळे पुस्तकांपेक्षा माणसे वाचत आलेल्या आणि मराठी चित्रपट निर्मितीच्या कामात झोकून देत मराठवाड्यातील कलावंतांसाठी काही भरीव करण्याची धडपड करणाऱ्या अनिलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

लेखक र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे मराठी विभागप्रमुख पदावर कार्यरत आहेत.

sandeepabansode07@gmail.com