करोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ‘वर्क फ्रॉम होम’ या सगळ्यांना कारणीभूत असलेली मूळ समस्या
संकीर्ण - व्यंगनामा
अरुण टिकेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 April 2020
  • संकीर्ण व्यंगनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

१.

वीस-एक वर्षांपूर्वी ‘व्हॉट लाइफ मीन्स टु मी’ या नावाचे एक पुस्तक वाचनात आले होते. पंधरा-सोळा महनीय व्यक्तींकडून त्यांच्या दृष्टिकोणातून जीवनाचा अर्थ काय आहे व असावा, या प्रश्नाला उत्तर म्हणून लेख मागवले होते. त्या लेखांचे ते संकलन होते. ते पुस्तक वाचताना सतत जाणवत होते की, त्या प्रत्येकाचे जीवन वेगवेगळ्या प्रकारे व्यक्तीत झाले होते, तरी प्रत्येकाला एकमेकांशी जोडणारा एक समान धागा होता. तो म्हणजे निश्चित ठरवलेली अशी प्रत्येकाची विशिष्ट जीवनपद्धत होती आणि नेमक्या त्याच जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यामागे प्रत्येकाची जीवनविषयक विशिष्ट म्हणता येईल अशी वैचारिक भूमिका होती. वैचारिक भूमिका आधी बनवली गेली आणि नंतर विशिष्ट प्रकारचे जीवन व्यतीत केले होते, असे म्हणणे योग्य होणार नाही. पण कळावयास लागण्याच्या वयापासून ते जीवनात स्थिरस्थावर होईपर्यंतच्या कालखंडात या सर्वांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान निश्चित झाले होते.

प्रार्थना-समाजाचे अध्वर्यू असलेल्या रानडे यांनी स्वत: एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, तरीही मूर्तिपूजेचे अवडंबर मान्य केले. भागवत धर्माचे श्रद्धापूर्वक आचरण केले, तरीही देवळात मन:शांती शोधण्याचाही प्रयत्न त्यांना करावासा वाटला नाही. तरीही ते संपूर्णपणे परमेश्वराचे चराचर अस्तित्व मानणारे होते. त्यांच्या मतानुसार नास्तिकवाद म्हणजे वैचारिक पंगुत्व. बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकरांना ही भूमिका अजिबात मानवली नाही. त्यांच्या मते मानवतावादी मूल्यातच तथाकथित परमेश्वरी अस्तित्व असते. ही मूल्ये मानवनिर्मित असल्याने प्राणिमात्र हा आपल्या कर्माने देवत्व पावतो. रानडे आणि आगरकर यांच्या दोन टोकाच्या वैचारिक भूमिकांत वरवर फरक जाणवला तरी आधुनिक विचारांच्या दृष्टिकोणातून साधर्म्यही आहे. देव माना अथवा न माना, आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात म्हणजे जीवनधारणेत मूल्यांचे अधिष्ठान दोघांनाही मान्य आहे. जीवनमूल्यांचे अधिष्ठान एकदा मान्य केले की, जीवनविषयक तत्त्वज्ञानाची जीवनशैली बनते आणि एखादी जीवनशैली स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या कृतिउक्तीवर मोठाच प्रभाव पडतो.

आज आपल्या अवती-भवतीच्या व्यक्तींकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते ते हे की, बहुतेकांना आपल्या जीवनविषयक विचारांची निश्चितीच करता आलेली नसते. असे जीवन अशा पद्धतीने का कंठावयाचे, हा प्रश्नही अनेकांना पडत नाही. तो तसा पडला तरी त्या प्रश्नाचा विचार करण्याइतकी फुरसत कोठे आहे, असा प्रतिप्रश्न करून प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे टाळण्याकडे बहुतेकांची प्रवृत्ती आहे. योग्य जीवनशैलीचा अभाव हाच बहुतेकांच्या दिशाहीन जगण्याला कारणीभूत ठरत आहे. एखाद्या गरीब व्यक्तीने आपल्या परिस्थितीबद्दल पूर्ण विचार करूनही आपण होऊन निश्चित केलेल्या मूल्यांशी तडजोड केली नसेल, तर त्याला गरिबीचे काटेही फारसे बोचत नाहीत, कारण ती परिस्थिती त्याने जाणीवपूर्वक स्वीकारलेली असते. उलट एखादा सुसंस्कृत गर्भश्रीमंतही आपल्यासाठी काही ‘उसूल’ ठरवून त्यानुसार वागतो, त्याच्या उक्तीत आणि कृतीतही विशिष्ट जीवनशैलीच्या स्वीकृतीमुळे आलेली निर्व्याजता आढळते. त्या जीवनशैलीच्या स्वीकृतीमुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची मानसिक शक्तीही त्याला मिळत असते. त्याची अशी जीवनधारणा त्याला मानसिक शक्ती देत असते. सामाजिक मूल्ये व्यक्तिगत आयुष्यात आचरणात आणली गेली की, तीच त्या व्यक्तीची जीवनधारणा बनते आणि त्या व्यक्तीच्या जीवनशैलीत रूपांतरित होते.

जीवन-धारणा निश्चित केलेल्या जीवनशैलीचा अभाव हा आपला आजच्या परिस्थितीत मोठाच सामाजिक दोष ठरत आहे. त्यासंबंधीही विचार सुरू झाला आहे. सर्व समाजासाठी एकच एक जीवनशैली असणार नाही, हे तर उघडच आहे. कारण व्यवसायानुरूप जीवन-धारणा बदलू शकते. अर्थात ती कितीही बदलली तरी काही शाश्वत मूल्ये सर्व प्रकारच्या जीवन-धारणेत कायम असणार, यात शंका नाही. आपल्या समाजाचे एकविसाव्या शतकात संक्रमण होईल, तेव्हा समाज-घटकाला आपापल्या जीवन-धारणेवर आधारलेल्या जीवनशैलीचा विचार करावाच लागेल. केवळ बाह्यात्कारी शैलीत बरेवाईट बदल होणे म्हणजे जीवनशैली बदलणे नव्हे, याचाही अनुभव येऊ शकेल. तेव्हाच प्रत्येकाला विशिष्ट जीवनशैलीची आवश्यकता वाटावयास लागेल. तोपर्यंत स्वैराचरण सुरू राहील आणि त्या स्वैराचरणाचे परिणामही सामाजिक पातळीवर, तसेच व्यक्तिगत पातळीवर भोगावे लागतील.

व्यवसाय-विशिष्ट जीवनशैलीच सामाजिक आणि वैयक्तिक शिस्तीचा अंमल आणू शकेल. पण त्यासाठी ‘व्हॉट लाइफ मीन्स टु मी’ हा प्रश्न प्रत्येकाला पडावयाची आवश्यकता आहे.

२.

जीवनशैली तत्त्वचिंतनाच्या बैठकीमुळे बनते. व्यवसायानुरूप जीवनशैली बनवावी लागते, हे मान्य केले तरी योग्य मानसिकता बाणवल्याखेरीज त्या जीवनशैलीत जान येत नाही. केवळ तत्त्वचिंतन करत बसणाऱ्याला ‘अंगाला राख फासून हिमालयावर जा’ असाच उपदेश केला जाईल. तत्त्वचिंतनाच्या बैठकीला व्यवहाराच्या पातळीवर आणणे म्हणजेच विशिष्ट जीवनशैलीचा आग्रह धरणे. तत्त्वचिंतनाला व्यवहाराच्या पातळीवर आणण्यासाठी भाव-भावनांचा ओलावा हा लागणारच. म्हणजे प्रेमभरित अव्यवहार्यता जशी योग्य नाही, तशीच प्रेमरहित व्यवहार्यताही योग्य नाही. दोन टोकाच्या भावनांना एका पातळीवर आणण्याचे कार्य जी मानसिकता करू शकेल, तीच जीवनशैली बनवू शकेल.

जीवनशैली बनवण्यासाठी योग्य मानसिकतेची आवश्यकता असते. याचे कारण ती तशी असल्यास जो काल-परवापर्यंत आपल्याबरोबर होता तो आपल्यापुढे का गेला, त्याच्याकडे असे काय आहे की, जे आपल्यात नाही, हा विचार तटस्थ राहून आपल्याला करता येईल. आणि समजा, एखाद्याने गैरमार्ग अवलंबून वरचे पद मिळवले असेल, मोठी माया जमा केली असेल, तर तसे करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याची मनोमन जाणीव होऊन त्याच्या ‘प्रगती’मुळे आपल्या पोटात दुखणार तरी नाही. उलट ही ‘प्रगती’ नव्हे, ही तर ‘अधोगती’ – ‘घसरगुंडीवर असलेली श्रीमंती’ असा आपला विश्वास वाढीला लागेल आणि त्या मार्गाने आपल्याला जावयाचे नाही, असा मनाचा निग्रह अधिक पक्का होईल.

योग्य मानसिकता ही मत्सर, द्वेष आदी अवगुणांपासून आपल्याला वाचवते, इतरांच्या यशात आनंद मिळवावयास शिकवते. हे कठीण वाटले तरी एकदा ते जमले की, आपले व्यक्तिगत जीवन अनेक पद्धतीने उजळून निघते. तसे झाल्यास आपल्याला जीवनानंद महत्त्वाचा वाटतो की, व्यावहारिक यश हा प्रश्नसुद्धा मनात उभा राहत नाही. एकेक करून यशाच्या पायऱ्या चढणे याचाच अर्थ शेवटच्या पायरीनंतरच्या अपयशाच्या एकेक पायऱ्यांच्या जवळ जाणे हे ध्यानी येते आणि व्यावहारिक यशापयश हे जीवनानंदाशी तितकेसे संबंधित नाही, हे मनाला पटून अनुभवालाही येते.

‘व्यवसायानुरूप जीवनशैली’ हा आधुनिक जीवनाचा महामंत्र आहे. अपेक्षा एवढीच आहे की, ‘व्यवसायानुरूप’ बनवलेली ‘जीवनशैली’ ही आत्मानुभवाने सिद्धसाकार झाली असली पाहिजे. मी हे असे का करतो याची कारणमीमांसा आपल्याच मनाला पटवून देता आली पाहिजे. आणि हे जे करत आहे ते मीच निश्चित केलेल्या जीवनशैलीच्या अनुरूप आहे का, असा प्रश्न अधूनमधून स्वत:ला विचारत आपणच निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे आपला जीवनक्रम चालला आहे, याची मनाला खात्री पटवता आली पाहिजे. अनावश्यक गरजांना फाटा देणे हा कोणत्याही जीवनशैलीचा आधार असला पाहिजे. कोणत्या गरजा अनावश्यक आहेत, हेही ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. ते एकदा ठरवल्यानंतर दुसरा आपल्या निकषांच्या विरुद्ध वर्तन करत आहे, याचा आपल्याला त्रास होत नाही, हीच मानसिकता योग्य म्हणावी लागेल. योग्य मानसिकता अंगी बाणवून निश्चित केलेली जीवनशैली अंगीकारल्यानंतर प्रत्येक कृती-उक्ती त्या व्यक्तीला स्वत:साठी मोठाच नैतिक आधार देत असते. आणि अन्यांच्या दृष्टिकोणातून त्या व्यक्तीची विश्वासार्हता वाढवत असते. ही विश्वासार्हता त्या व्यक्तीला खोट्यानाट्या आरोपांपासून वाचवत असते, कारण खोटेनाटे आरोप त्या व्यक्तीला चिकटतच नाहीत. म्हणून इतरांनी केलेल्या खोट्यानाट्या आरोपांनी उन्मळून पडण्याचे कारण योग्य मानसिकतेवर आधारलेली जीवनशैली आचरणाऱ्या व्यक्तीला उरत नाही. योग्य व सुदृढ मानसिकेतवर आधारलेली विशिष्ट व व्यवसायानुरूप जीवनशैली ही अभिमान मिळवून देते. तो अभिमानच त्या व्यक्तीला विश्वासार्हतेला तडा जाईल अशा कृती-उक्तीपासून वाचवतो. स्वत:चा असा ‘वेगळा रंग’ ठेवणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाला विशेष झळाली प्राप्त होते, ते वेगळेच.

योग्य मानसिकता नाही म्हणून जीवनाला तत्त्वचिंतनात्मक बैठक नाही. तत्त्वचिंतनात्मक बैठक नाही म्हणून विश्वासार्हता नाही. विश्वासार्हतेच्या कमतरतेपायी जीवनशैलीला खास अर्थ नाही, अशा अवस्थेत तर सध्या आपण भरकटत नाही ना?

३.

आत्मविश्वास डळमळीत झाला की, परमतसहिष्णुतेचा अंत होऊ लागतो, उदारमतवादाचा मुखवटा गळून पडतो आणि मताग्रह-दुराग्रहाचे आविष्कार पाहावयास मिळतात. आपले मत सच्चे असल्याचा आत्मविश्वास जेव्हा वाटू लागतो, तेव्हा इतरांनी ते ग्राह्य मानावे हा आग्रह वा दुराग्रह बाळगावयाचे कारण नसते. आज आपले मत मान्य करणे इतरांना वा समाजाला अवघड वाटत आहे, तरी एक काळ असा येईल की, आपले मत ग्राह्य होईल, इतका उदंड आत्मविश्वास असलेली व्यक्ती आग्रह वा दुराग्रह या जोडगोळीची बंदिवान होत नाही. आपले मत ग्राह्य न धरणाऱ्यांबद्दल तुच्छता किंवा कुत्सितभावही राखत नाही. सुदृढ आणि सुयोग्य जीवनशैलीचाच हा भाग.

मताचा आग्रह धरण्याने वा दुराग्रह करण्याने वैचारिक बदल होत नसतात, हे पटावयास योग्य व सुदृढ दृष्टिकोण लागतो. असा दृष्टिकोण योग्य वैचारिक बैठकीमुळे म्हणजे योग्य जीवनशैलीमुळेच येतो.

मित्राच्यासुद्धा गैरकृत्यावर कोरडे ओढण्याची शक्ती येण्यासाठी प्रत्येकाकडे ज्याची-त्याची जीवनधारणा पक्की असावी लागते. मित्राच्या गैरकृत्यासाठी त्याच्यावर दोषारोपण करणे आणि सत्कृत्यासाठी त्याची पाठ थोपटणे हेच खरे मितकर्तव्य ठरेल. असे करणारे एखाद्या समाजात कमी असतील किंवा अजिबात नसतील, तर त्या समाजातील घटकांकडे जीवनदृष्टीचा आणि जीवनशैलीचा अभाव आहे, असाच निष्कर्ष काढावा लागेल.

४.

निष्ठा हे एक मोठेच मूल्य असल्याचे आपण मानतो. एखादी व्यक्ती वर्षानुवर्षांच्या अथक परिश्रमानंतर सफल जिणे जगू लागते, त्या वेळी आपण तिच्या श्रमसाफल्याला ‘निष्ठेचे फळ’ म्हणून संबोधतो. साधकाप्रमाणे तपश्चर्या केली, म्हणून अमुक एकाला निष्ठेचे फळ चाखावयास मिळाले, असे म्हणतो. निष्ठा म्हणजे एक प्रकारची तपश्चर्या. तपश्चर्येमध्ये सातत्याचा गुण अंतर्भूत आहे. पण केवळ सातत्य राखल्याने निष्ठावंत होता येते का? तर नाही. कारण निष्ठेमध्ये कशाबद्दल तरी वा कोणाबद्दल तरी आदराची भावना सातत्याने राखण्याचा भाव आहे.

निष्ठा हा व्यक्तिसापेक्ष गुण खरा, पण त्या गुणांत व्यक्तीच्या गुणांची पूजा अनुस्यूत आहे, अवगुणांची नाही. निष्ठावंत हा व्यक्तीच्या गुणांची पूजा करतो, केवळ व्यक्तीची नाही.

जीवनशैलीत निष्ठेला अपार महत्त्व आहे. आपल्याच विचारांशी निष्ठा बाळगण्याची जशी जीवनशैलीत सोय आहे, तशीच आपल्या गुणपूजनी स्वभावामुळे आदरस्थानी असलेल्या जिवंत वा मृत व्यक्तींबद्दल निष्ठा बाळगण्याची सुविधा आहे. आपल्या सुनिश्चित जीवनशैलीचा खरे तर निष्ठा हा एक अविभाज्य घटक असला पाहिजे. जीवनशैलीच सुनिश्चित करण्याचे आपण मनावर घेत नाही मग निष्ठाविचार हा तर फारच दूर राहिला. आपण सारेच भावनिक भक्तिमार्गप्रदीप शोधत आहोत.

५.

महान व्यक्तीच्या कृतीतील किंवा उक्तीतील विसंगती या त्या व्यक्तीतील माणूसपण दाखवणाऱ्या असल्याचे मानले जाते. त्या महामानवालाही विसंगतीरहित जगता येत नाही, तर आपल्यासारख्या सामान्यांच्या कृती-उक्तीतील विसंगतीबद्दल आपल्याला कितपत दोषी धरता येईल, असे म्हणत आपण आपली सुटका करून घेत असतो. म्हणजेच आपण आपल्या विसंगतीपूर्ण व्यवहारांचे एका अर्थाने अप्रत्यक्ष समर्थन करत असतो. पण ते करताना आपण एक बाब विसरतो. ती ही की महान व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यातील विसंगतींचे प्रमाण हे आपल्यातील विसंगतींपेक्षा अत्यल्प असते. त्यामुळे खरे तर, महनीय व्यक्तींच्या जीवनातील विसंगतींकडे अंगुलिनिर्देश करत आपल्याला आपल्यातील विसंगतीचे समर्थन करता येणार नाही. तसे करणे योग्यही ठरणार नाही.

व्यवसायानुरूप आणि स्वभावानुरूप वागण्याच्या अपेक्षा आपण बाळगत असतो. त्या अपेक्षांचा भंग झाला तर मात्र आपल्याला ते वागणे विसंगत वाटते. नाठाळाचा नाठाळपणा विसंगत वाटत नाही, पण सुस्वभावी व्यक्तीचा अपवादात्मक नाठाळपणाही आपल्याला रुचत नाही.

स्वत: कठोर शिस्तपालन करणारा इतरांच्या थोड्याबहुत शिस्तशैथिल्याला क्षमा करण्याकडे प्रवृत्ती दाखवत असेल, तर त्याच्यात उदारमतवाद पुरेपूर भिनला आहे असे म्हणता येईल. समाजात असेही काही महाभाग असतात की, जे स्वत:साठी अत्यंत कडक शिस्तीचे नियम आखतात आणि ते पाळतात, पण इतरांना तेच नियम पाळता आले नाहीत तरी ते न पाळणाऱ्यांची कड घेऊन त्यांना ते का पाळता आले नाहीत, याचा विचार करून त्यांचे समर्थन करतात. पण असाही एक वर्ग असतो की, जो इतरांकडून शिस्तपालनाची अपेक्षा करत स्वत:च्या शिस्तभंगाचे समर्थन करत राहतो. अशा वर्गाच्या कृती-उक्तीत विसंगती आढळते, ती आक्षेपार्ह असते.

विसंगत वर्तनाचे प्रसंग जितके कमी, तेवढी त्या व्यक्तीची नैतिक उंची मोठी. योग्य जीवनशैली अंगीकारली तरच विसंगत वर्तनाचे धोके कमी होतात. आपल्या अधिकृत मिळकतीपेक्षा अधिक खर्च करणाऱ्याने आपल्या मुलामुलींना स्वच्छ चारित्र्याचे धडे दिले, तर त्या धड्यांना नैतिकतेचे पाठबळ कसे येईल? योग्य जीवनशैली सुरुवातीपासूनच अंगीकारली तर आपल्या मुलामुलींसमोर विसंगत आचार-विचारांचे दर्शन अवश्य टाळता येईल.

एखाद्या व्यक्तीच्या कृती-उक्तीतील विसंगतींचे प्रमाण हे त्या व्यक्तीने निश्चित केलेल्या जीवनशैलीशी संबंधित असलेल्या निष्ठांवर अवलंबून आहे. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर भावनेचे अधिराज्य आहे की विचारांचे, यावरही ते प्रमाण अवलंबून आहे. त्या व्यक्तीच्या बहुतांश प्रतिक्रिया भावनात्मक असतील, तर विसंगतीचे प्रमाण वाढण्याचीच शक्यता अधिक. कित्येकदा भावनातिरेकी व्यक्तीला ‘अहं’ची बाधा होते आणि ही बाधाच त्या व्यक्तीला सारासार विवेकापासून परावृत्त करते. तसे झाले तर पदसिद्ध अधिकाराचा वापर करून निर्णय रेटण्याचा मोह व्यक्तीला होतो.

याच्या नेमके उलट भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे आहे. विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या व्यक्तीकडून विसंगत कृती-उक्ती होण्याचे प्रमाण कमी असते. भावनाप्रधान व्यक्तीला आपल्या कृती-उक्तीतील विसंगती ध्यानी येण्यातच अडचणी निर्माण होतात, त्यामुळे विसंगती ध्यानी आली तरी ती नाहीशी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न होत नाहीत. भावनाप्रधान निर्णय प्रक्रिया ही त्वरित निर्णय देणारी असली तरी त्या निर्णयाच्या साधक-बाधकतेबद्दल विचार त्या निर्णय-प्रक्रियेत नसतो. विचारी व्यक्तीच्या निर्णय-प्रक्रियेत तसा विचार असतो. विचारी व्यक्तीच्या निर्णयावर त्या व्यक्तीच्या जीवननिष्ठांचा प्रभाव असतो. स्वत:च्या जीवननिष्ठेचा विचार त्या व्यक्तीला विसंगत निर्णय घेण्यापासून वाचवतो.

अतिरेक टाळण्याबाबत कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. भावनेचा ओलावा असल्याशिवाय विचारांना मानवतावादाची बैठक मिळणार नाही. ज्या विचारात मानवतावाद नाही, अशा विचार-प्रणालीला आधुनिक काळात महत्त्व तरी कसे मिळणार? म्हणूनच भावनाविवशता आणि अतिविचार हे दोन्ही टाळण्याचीच शिकवण योग्य जीवनशैली देते.

.............................................................................................................................................

करोना व्हायरसच्या निमित्ताने आपल्या देशासह जगभरच हलकल्लोळ माजला आहे. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. आपल्या देशातही २५ मार्चपासून २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. त्याआधी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’ पाळला गेला. सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. एक प्रकारची सक्तीची नजरकैद असावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप इ.) वर जे विनोद, मीम्स, भाष्य, निरीक्षणे, अनुभव लोक मांडत आहेत आणि जे या गंभीर संकटाच्या काळातही फेक न्यूज, द्वेष, घबराट, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून गंभीर संकटाच्या काळात आपल्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी, व्यवस्थेविषयी, सरकारकडून असलेल्या अपेक्षांविषयी, नैतिक आणि सामाजिक जबाबदारीविषयी, किमान शिस्त व स्वावलंबनाविषयी अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. या प्रश्नांची मुळं आपल्या एकंदर जीवनशैलीत दिसतात. आणि त्याविषयी आपण गाफील असल्याचेच दिसून येत आहे.

दिवंगत ज्येष्ठ संपादक अरुण टिकेकर यांचं ‘सारांश’ (श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २००१) या नावाचं एक छोटंसं पण अतिशय उत्तम पुस्तक आहे. या पुस्तकाला टिकेकरांनी ‘समकालीन समाजाच्या संस्कृतीविषयी सात निबंध’ असे उपशीर्षक दिले आहे. या पुस्तकातील ‘जीवनशैलीचा अभाव’ या सहाव्या प्रकरणाचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......