‘स्पॅनिश फ्ल्यू’ने पहिल्या महायुद्धाच्या काळात जगाला ‘करोना व्हायरस’सारखेच वेठीस धरले होते!
पडघम - विदेशनामा
आदित्य कोरडे
  • पहिल्या महायुद्धाच्या काळात ‘स्पॅनिश फ्ल्यू’पासून बचावासाठी मास्क लावलेले सैनिक
  • Mon , 30 March 2020
  • पडघम विदेशनामा स्पॅनिश फ्ल्यू Spanish Flu पहिले महायुद्ध First World War स्वाईन फ्ल्यू Swine Flu महामारी साथ रोगराई Pandemic

१.

सध्या जगभर करोना व्हायरसचे थैमान चालू आहे. देशच्या देश आपल्या सीमा एकमेकांना बंद करत आहेत. आतापर्यंत साधारण सव्वातीन लाख लोकांना याचा संसर्ग झालाय आणि पावणेतेरा हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. आजच्या घडीला या आजाराचा मृत्युदर साधारण पाच टक्के आहे.

१०२ वर्षांपूर्वी अशाच एका रोगाने जगभर धुमाकूळ घातला होता. त्या आजाराचे नाव होते - ‘स्पॅनिश फ्ल्यू’. हा आजार जगभर पसरला तो पहिल्या महायुद्धामुळे. पहिले महायुद्ध आणि त्यात समावेश असलेले जवळपास सगळे जग हे या आजाराच्या साथीची तीव्रता आणि संहारकता वाढवण्यास कारणीभूत ठरले हे नि:संशय. हे महायुद्ध चालले चार वर्षे चार महिने (जुलै १९१४- नोव्हेंबर १९१८) आणि त्यात साधाणरण १.८ ते २ कोटी मृत्युमुखी पडले. त्यापेक्षाही अधिक लोक या आजारामुळे मृत्यु पावले. तेव्हा जगाची लोकसंख्या होती जवळपास १८० कोटी. त्यापैकी ६० कोटी म्हणजे एक तृतीयांश लोकांना या आजाराने ग्रासले होते आणि पाच ते दहा कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. अर्थात हा केवळ अंदाज आहे. तेव्हा नक्की किती लोक मेले असावेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. पण तरीही ५ कोटी ही मृतांची संख्या किती महाभयंकर आहे! इतकी माणसे केवळ १८ महिन्यांत गेली.

साभार - https://www.theguardian.com/world/2018/sep/09/spanish-flu-pandemic-centenary-first-world-war

या आजाराला ‘स्पॅनिश फ्ल्यू’ हे नाव का पडले? फेब्रुवारी १९१७पासून युद्ध आघाडीवरील सैनिक या आजाराने मरू लागले होते. पण सर्वसामान्य जनतेला आणि लढणाऱ्या सैनिकांना या आजारापासून अनभिज्ञ ठेवले गेले. वर्तमानपत्रे, नियतकालिके यांच्यावर कडक निर्बंध घातले गेले. जनतेबरोबरच शत्रूलादेखील याची खबर लागता उपयोगाची नव्हती. मात्र हा आजार सुट्टी घेऊन घरी गेलेल्या सैनिकांपासून त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेत पसरू लागला. रजा घेऊन माद्रिद, स्पेन इथं मौजमजा करायला गेलेल्या अमेरिकन सैनिकांपासून तो स्पेनमध्ये पसरला. आणि तेथील वृत्तपत्रांनी या आजाराच्या बातम्या अगदी पहिल्या पानावर द्यायला सुरुवात केली. स्पेन तटस्थ देश. त्यामुळे तिथे वृत्तपत्रांवर निर्बंध नव्हते. जसजशा या स्पॅनिश वृत्तपत्रातून फ्ल्यूच्या बातम्या येऊ लागल्या, तसे जगाचे लक्ष तिकडे वेधले गेले. निर्बंध घातली गेलेली वृत्तपत्रे मग स्पेनमधल्या वृत्तपत्रांचे संदर्भ देऊन बातम्या द्यायला लागली आणि या नव्या आजाराला ‘स्पॅनिश फ्ल्यू’ हे नाव दिले. त्यातून पुढे असा गैरसमज निर्माण झाला की, हा आजार तिथेच प्रथम उद्भवला.

या आजाराची सुरुवात कशी झाली? कुठे झाली? तो नक्की कसा पसरला? याबाबत अनेक अंदाज व्यक्त गेले आहेत. पहिल्या महायुद्धात चीन (इथेपण!) हे तटस्थ राष्ट्र होते. तेथे नुकतीच प्रजासत्ताकाची स्थापना झाली होती. तेथे अनेक युरोपियन देशांच्या वखारी-व्यापारी बाजारपेठा होत्या. पण दोस्तांच्या बाजूने युद्धात उतरलेल्या जपानने चीनवर हल्ला केला आणि चीनच्या मुख्य भूभागावर सैन्य घुसवले. म्हणून मग जपानवर खेळी म्हणून चीनने दोस्तांच्याच बाजूने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. पण दोस्त्नाच्या युद्ध प्रयत्नात प्रत्यक्ष सहभाग न घेता फक्त इतर कामाकरता मजूर पाठवायचे चीनने मान्य केले. हे मजूर निरनिराळ्या दोस्त देशांत कारखान्यात काम करणे, लोहमार्ग व रस्ते, पूल, इमारती बांधणे अशा कामाकरता पाठवले जात. अशीच चीनी मजुरांची एक तुकडी कॅनडात पोहोचली. त्यांना आगगाड्यांत भरून हेलिफॅक्स येथे घेऊन जाण्यात आले. तेव्हा त्यातील काही मजूर फ्ल्यूने ग्रासलेले होते. हा असा आजार मागील वर्षी उत्तर चीनच्या काही भागात उद्भवला होता.

आजाराने पछाडलेले मजूर आल्यावर कॅनडाच्या सरकारने त्यांच्यातील जे खूप आजारी होते, त्यांना वेगळे (quarantine) केले आणि आजारी नसणाऱ्यांना जहाजात भरून फ्रान्सला पाठवले. हा संसर्गजन्य आजार आहे हे त्यांना माहिती नव्हते अशातला भाग नाही, पण तोपर्यंत विषाणू हा प्रकार काय असतो हे माहिती नव्हते. वरकरणी निरोगी दिसणारा माणूस आजाराने ग्रस्त असू शकतो हेही माहिती नव्हते. असो. तर हे मजूर फ्रान्समध्ये युद्धआघाडीच्या अगदी जवळ कामाला जुंपले गेले आणि तिथून त्यांनी हा आजार सैनिकांत पसरवला, असं म्हणतात.

२.

कॅम्प फन्स्टन, कान्सास इथे अमेरिकेतला मोठा लष्करी तळ होता. इथे ५६००० नव्याने भरती झालेले सैनिक प्रशिक्षण घेऊन युरोपात निरनिराळ्या आघाड्यांवर पाठवले जात होते. असे अमेरिकेत १००च्यावर सैनिकी तळ होते. त्यापैकी ३६ मोठे तळ होते. त्याचबरोबर आधीच तैनात असलेल्या सैनिकांच्या तुकड्यांची अदलाबदली, नवीन जागी नियुक्ती, सैनिकांच्या रजांचे नियोजन- व्यवस्था, आजारी सैनिकांची देखभाल, त्यांची योग्य त्या इस्पितळात रवानगी, सैनिक तसेच युद्धसामग्रीचे परिवहन अशा गोष्टीदेखील इथूनच कार्यान्वित होत असत. जिथे असे नवीन-जुने सैनिक जिथे मोठ्या संख्येने एकत्र येत, तिथे लहान-मोठे साथीचे आजार पसरत असत. त्यामुळे ४ मार्च १९१७ रोजी सकाळी सकाळी जेव्हा एका सैनिकाने आपण आजारी असल्याचे सांगितले, तेव्हा डॉक्टरला त्याचे फार काही विशेष वाटले नाही. दुपार होईपर्यंत १०७ सैनिक आपण आजारी असल्याचे सांगू लागले, तर आठवड्यभरात हा आकडा ११००च्या वर गेला. दोन आठवडे होईपर्यंत तळावरचे १० टक्के म्हणजे ६००० सैनिक आजारी झाले होते. ‘ठीक आहे! तळावर साथ पसरली आहे. त्याला काबूत आणता येईल,’ असा विचार डॉक्टरांनी केला.

पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली नव्हती. फेब्रुवारी १९१८ मध्ये टेक्सास राज्यातील हक्स्फुल काउंटी इथे अगदी असाच एका साथीचा उद्रेक झाला होता आणि त्यात ३८ सैनिक दगावले होते. हा आजार आधीच्या सर्वसामान्य फ्ल्यूप्रमाणे नसून तो लगेच पसरतो, मुख्यत: धडधाकट, निरोगी तरुण लोकांना ग्रासतो आणि काही समजून उमजून उपचार करायच्या आत जीव घेतो, असे तेथील एका डॉक्टरच्या लक्षात आले होते. त्याने त्याप्रमाणे त्याच्या अधिकाऱ्यांना सांगून सावधही केले होते, पण अधिकाऱ्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. वर्तमानपत्रात त्याची बातमीही आली खरी, पण तेव्हा त्यात युद्धाच्या बातम्या इतक्या असत की, हिच्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हक्स्फुल काउंटी इथे येऊन नव्याने भरती होणारे, तसेच आपल्या रजा संपवून परत आघाडीवर जाणारे सैनिक आधी कॅम्प फन्स्टन इथे जात आणि मग तिथून फ्रान्समध्ये. (त्याचप्रमाणे फ्रान्समधून येणारे सैनिक आधी कॅम्प फन्स्टन इथे येत आणि मग पुढे जात.)

मार्च संपेपर्यंत ३६ पैकी २४ तळावर या साथीचा प्रादुर्भाव झाला होता. तरीही त्याकडे कुणी फारशा गांभीर्याने बघितले नाही.

LEFT - Influenza victims in an emergency hospital near Camp Funston (now Fort Riley) in Kansas in 1918. AP Photo\National Museum of Health. RIGHT - emergency hospital's

डॉ. व्ही. एच. वेल्श १९१८ साली सैन्याच्या वैद्यकीय विभागाच्या संचालक मंडळावर होते. त्यांनी सैन्य विभागाला सावध करायचा प्रयत्न केला, पण फ्ल्यूच्या साथी वारंवार येत आणि थोडा आराम व जुजबी औषध घेऊन सैनिक बरे होत, देवी-कॉलराप्रमाणे या साथी जीवघेण्या नसत. शिवाय देवी-कॉलराप्रमाणे यावर प्रभावी लस सापडलेली नव्हती. युद्ध आता शेवटच्या निर्णायक अवस्थेत होते आणि क्षुल्लक फ्ल्यूच्या साथीमुळे घाबरून जायचे कारण आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांना वाटत नव्हते. त्यांना पूर्वानुभवावरून सैनिकांत देवी-कॉलरा असे रोग पसरू नये याची काळजी जास्त होती. त्यामुळे अमेरिकेतून इतर निरोगी सैनिकांबरोबर फ्ल्यू झालेले सैनिक खच्चून भरलेल्या जहाजातून फ्रान्सच्या दिशेने जाऊ लागली.

हे सैनिक युरोपच्या किनाऱ्यावर उतरू लागले, तिथून निरनिराळ्या आघाड्यांवर पाठवले जाऊ लागले. आणि एप्रिलपर्यंत अमेरिकन व फ्रेंच सैनिकांत हा आजार पसरू लागला. ताप, डोकेदुखी असली लक्षणे टायफस, मलेरिया, मेंदूज्वर अशा इतर आजारातही दिसून येत. त्यामुळे आधी कुणाचे लक्ष गेले नाही, पण युद्ध आघाडीवर, खंदकात कमालीच्या अस्वच्छ वातावरणात, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेले सैनिक दाटीवाटीने राहत असल्याने या रोगाचा विषाणू लवकरच उत्क्रांत होऊन अधिक जीवघेणा बनला.

मे महिना उजाडेपर्यंत तो इंग्लिश सैनिकातही पसरला. महिना संपेपर्यंत ३६००० इंग्लिश सैनिक आजारी पडले. आणि मग मात्र तो सैन्याच्या युद्ध करण्याच्या क्षमतेवर आघात करू लागला. फ्रेंच सैनिकांपैकी ७० टक्के आणि ब्रिटिश सैनिकांपैकी १० टक्के आजारी पडले.

३.

जर्मनी आणि अक्ष राष्ट्रे अजून तरी या आजारापासून वाचलेली होती. नुकतीच रशियाला युद्धात हरवून आणि त्यांच्याशी तह होऊन रशियन आघाडीवरचे ६० डिव्हिजन सैन्य जर्मन सेनापती ल्युडेनडॉर्फकडे आले होते. त्यांना पुरेसा आराम आणि प्रशिक्षण देऊन १९१८च्या वसंतात जर्मनांनी त्यांची शेवटची निकराची लढाई -‘कैसरश्लाख्त’ - सुरू केली. सुरुवातीला त्यांना चांगले यश मिळाले. जर्मनीने जवळपास सगळा उत्तर फ्रान्स काबीज केला.

पश्चिम आघाडीवर खंदकात गेली चार वर्षे टिकलेला स्टेलमेट अखेर उखडला जातोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण अजूनही महत्त्वाची बंदरे आणि रेल्वे स्टेशन्स दोस्त राष्ट्रांकडेच होती आणि अमेरिकेतून मदतीचा ओघ सुरू झाला होता. दिवसाला ८४,००० सैनिक आणि युद्धसामग्री या बंदरावर येत होती आणि रेल्वेच्या साहाय्याने आघाडीवर पोहोचत होती.

कैसरश्लाख्तच्या दुसऱ्या चरणात ही बंदरे आणि रेल्वे स्टेशन्स काबीज करणे हेच मुख्य उद्दिष्ट होते. हा दुसरा चरण जुलैमध्ये सुरू होणार होता, पण पहिल्या चरणात जे ब्रिटिश आणि फ्रेंच युद्धकैदी जर्मनांनी पकडले, त्यातले अनेक फ्ल्यूने आजारी होते. त्यांच्यापासून लवकरच हा रोग जर्मन सैन्यात पसरला. एक-दोन नाही तर ५ लाख जर्मन सैनिक या आजाराने ग्रासले. काही तुकड्यात तर फक्त २५ टक्के जवानच युद्धालायक उरले. आधीच पहिल्या चरणात जर्मनांनीनी बरेच मनुष्यबळ गमावले होते, त्यात हा नवीन फटका जीवघेणा होता. जर्मन सैन्याधिकाऱ्यांनी ल्युडेनडॉर्फला हल्ला पुढे ढकलणे गरजेचे आहे, त्याशिवाय पर्याय नाही, हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण हा आजार किती गंभीर आहे आणि त्याचे काय परिणाम होताहेत, हे नीट न समजल्याने त्याने फक्त पाच दिवसांनी हल्ला पुढे ढकलला. पाच दिवसांनी काय होणार होते?

दुसऱ्या चरणात फ्ल्यूने जर्जर झालेल्या जर्मन सैन्याचा धुव्वा उडाला, कैसरश्लाख्त पूर्णपणे फसले. या पराभवाचे खापर फक्त फ्ल्यूच्या साथीवर फोडणे बरोबर नाही. पण ऐन निर्णयाच्या क्षणीच उद्रेक होऊन त्याने जर्मनीचा पराभव जवळ आणला हे नक्की. ऑक्टोबर संपेपर्यंत जर्मनीचा पराभव निश्चित झाला होता. कैसरश्लाख्त यशस्वी झाले असते तरी दोस्त राष्ट्रांनी हार पत्करली नसती पण युद्ध अजून कमीत कमी वर्ष दीड वर्ष नक्की लांबले असते.

हे सगळे होईपर्यंत आजारानेही दोस्त सैनिकांतून माघार घ्यायला सुरुवात केली. ऑगस्ट संपेपर्यंत ब्रिटिश सैनिकांतून हा आजार पूर्णपणे गायब झाला. जणू देवानेच जर्मनीला पराभूत करायला हा आजार पाठवला होता.

पण तसे नव्हते. या आजाराचा विषाणू परत एकदा उत्क्रांत होत होता. त्यासाठी काही जण युद्धात वापरलेल्या विषारी वायूकडे बोट दाखवतात. मस्टर्ड गॅस हा विषारी वायू त्या वेळी दोन्ही बाजूंकडून विपुल प्रमाणात वापरला गेला. त्यामुळे विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल होण्याचा वेग वाढला, असे काहींचे मानणे आहे, तर काहींच्या मते युरोपातील प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये आधीच असलेल्या एखाद्या विषाणूशी या विषाणूचा संयोग होऊन माणसाला फारसा त्रास न देणारा नवा विषाणू तयार झाला असावा.

पण एक मात्र नक्की, हा विषाणू आधीच्या जुन्या सर्वपरिचित विषाणूहून एका बाबतीत वेगळा होता. ते म्हणजे तो निरोगी धडधाकट आणि तरुण लोकांना लक्ष्य करत होता. आधीचे फ्ल्यू विषाणू आजारी, वृद्ध आणि वयाने लहान अशा लोकांना मुख्यत्वे जखडत असत. शिवाय याचा जीवघेणा रोग बनण्याचा वेग फार जास्त होता. संसर्ग झाल्यापासून २४ ते ३६ तासांत माणूस गारद होत असे. रोगाचे निदान होऊन उपचार सुरू करण्याची संधीही मिळत नसे. असो. तर ही त्या विषाणूची पहिली लाट होती, जी विरली होती...

ऑगस्ट १९१८मध्ये फ्ल्यूचे प्रमाण कमी होत होत तो जवळपास नाहीसा झाला. ऑगस्टच्या सुमारास युद्धही अंतिम टप्प्यात आल्याचे सगळ्यांना कळले होते. आता काही आठवड्यांतच जर्मनी लोळणार आणि युद्ध संपणार हे दिसू लागले होते. पण सप्टेंबर १९१८च्या सुमारास डेव्हन-मेसाच्युसटस इथल्या लष्करी तळावर परत एकदा स्पॅनिश फ्ल्यूचा उद्रेक झाल्याच्या खबरा आल्या. रुग्णांनी लष्करी इस्पितळ अगदी भरून गेले. सगळेच मरणासन्न होते. ताप, डोकेदुखी, शरीरे हिरवी-निळी पडलेली, खोकून खोकून बेजार झालेले. छाती अन फुप्फुसात पाणी झाल्याने श्वास घेता येत नव्हता. खोकला तर इतका येई की, त्याने पोटात मुरडा येई आणि पोटाच्या स्नायूंना दुखापत होई. फुप्फुसातले पाणी आणि हवा एकमेकांत मिसळून फेस तयार होई. त्यात ऑक्सिजनचे बुडबुडे अडकून बसत. त्यामुळे रुग्ण जरा हलला, कुशीवर वळला की, बबल रॅप फोडल्यावर येतो, तसा पॉप-पॉप असा आवाज येई.

वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसपैकी निम्मे आजारी होते, काही तर आजाराचे कोणतेही लक्षण न दिसण्या आधीच आजारी पडत, काम करत असतानाच कोसळत आणि मरत. काहींना संसर्ग झाल्यापासून १२ तासात मृत्यू ओढवे. जे मरत नसत त्यांना तीव्र स्वरूपाचा न्युमोनिया होई. हे काय चालू आहे, कुणाला कळत नव्हते. सगळे स्तंभित झाले होते.

डॉ. वेल्श यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि सर्जन जनरल गोर्गसला फोन करून सर्व सैन्य कवायती, ने-आण, तैनाती-नियुक्ती सर्व थांबवायला सांगितले. मुख्य म्हणजे जे सैनिक युरोपातून घरी जाण्यासाठी परत आले आहेत, त्यांना जाऊ न द्यायला सांगितले.

एक फार मोठी आणि जीवघेणी साथ आहे, हे डॉ. वेल्श यांच्या लक्षात आले होते. आता या संकटाचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागणार होता. एक, रोगाचा फैलाव रोखणे, शासनाला-लोकांना आणि रुग्णांना संकटाची जाणीव करून देणे, पण त्याच वेळी त्यांच्यात घबराट न माजेल, हे पाहणे. दोन, औषध शोधणे आणि मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करणे. दोन्ही कामे करणे डॉ. वेल्श यांच्या एकट्याच्या क्षमतेत नव्हते. त्यांनी डॉ. ओस्वाल्ड अवेरी या एका तरुण संशोधकाला पाचारण केले. तो रॉकफेलर संस्थेत संशोधक होता. लग्न, संसार, मित्रपरिवार अशा गोष्टींपासून अलिप्त राहून आपल्या वैद्यकीय संशोधानात गढलेला माणूस. तो कामाला अगदी योग्य होता. त्याने या आधी मेंदूज्वर आणि न्युमोनियावर प्रभावी औषध शोधण्याच्या कामी मदत केली होती. डॉ. वेल्श आणि त्यांच्या चमूबरोबरच न्यूयॉर्क इथली डॉ. विल्यम पार्क व आना विल्यम ही जोडी कामाला लागली होती. त्यांना आधी पोलिओ, डिप्थेरिया आणि क्षयावर औषध तयार करण्याचा अनुभव होता. या कामाचा त्यांचा अनुभव गेल्या २५ वर्षांचा होता.

स्पॅनिश फ्ल्यूविरुद्धच्या युद्धातले बिनीचे शिलेदार - डावीकडून अनुक्रमे डॉ. वेल्श, डॉ ओस्वाल्ड अवेरी, डॉ. आना विल्यम, डॉ. विल्यम पार्क्स

त्यांच्याकडून सुरुवातीला घाईघाईत आणि अंदाजपंचे तयार केलेल्या लसी कूचकमी ठरल्या आणि त्यांची मेहनत वाया गेली. पण म्हणून त्यांना सपशेल अपयश आले असे नाही. त्यांनी केलेल्या संशोधन व प्रयोगातून पुढे बरेच फायदे झाले. उदा. आधी बनवलेली न्यूमोनियाची लस अधिक प्रभावी करता आली. प्रत्यक्ष विषाणू जरी शोधता-मारता आला नाही, तरी रुग्णांचे जे हाल होत, ते कमी करता आले. फ्ल्यूमुळे छातीत पाणी भरून माणूस मरायचा, पण ते पाणी बाहेर काढून त्याला वाचवता येऊ लागले. कमी डॉक्टर, कमी औषधे आणि जास्त रुग्ण असताना रुग्णांना शक्य ती मदत पुरवणे महत्त्वाचे होते. ते काम नर्सेसनी उत्तम केले. त्यामुळे नर्सेसचे महत्त्व सगळ्यांना नीट समजले. त्यांना मान दिला जाऊ लागला. त्यांच्याकरता योग्य प्रशिक्षाणाची गरज ओळखली गेली.

पण या सगळ्या धामधुमीचा आणि कामाचा ताण डॉ. वेल्श यांच्यावर आला आणि ते आजारी पडले. रुग्णांच्या सतत संपर्कात राहून राहून त्यांनाही संसर्ग झाला. पुढे ते अनेक आठवडे आजारी होते. अमेरिका या रोगाच्या दुसऱ्या आणि सगळ्यात जीवघेण्या लाटेत असतना त्याविरुद्ध लढणारा सेनापतीच गारद झाला.

सप्टेंबर १९१८मध्ये महायुद्ध शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होते. आता जर्मनीवरचा दबाव हल्ले रोखून चालणार नव्हता. अमेरिका कोणतीही कसूर करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. लिबर्टी बाँड हे सरकारने काढलेले कर्जरोखे जनतेने भरभरून घेऊन सरकारला पैशाची मदत करावी म्हणून फिलाडेल्फिया इथे एक परेड आयोजित केली होती. दिवस होता २८ सप्टेंबर १९१८. आरोग्य विभागाने ही परेड रद्द करावी असा सल्ला दिला, पण सरकारने ऐकले नाही. परेडला लाखो लोक आले. त्यांच्यासमोर सैन्य कवायती, संचालन, विमानांचे उड्डाण, प्रात्याक्षिके, लुटूपुटूच्या लढाया, सगळे आयोजित केले गेले. आपले सैनिक कसे मृत्युच्या छायेत झुंज देत आहेत, त्यांना मदत करणे आपले कसे कर्तव्य आहे, हे ठासून सांगितले गेले. पण जनतेला हे माहीत नव्हते की, तेही मृत्युच्या सावटाखाली आलेले आहेत.

त्यानंतर तीनच दिवसांनी लोक आजारी पडू लागले. एका दिवसात ५००, आठवड्यात १०००च्यावर आणि पंधरवड्यात ५००० लोक आजारी पडून मेले. फक्त इस्पितळ नाही तर शवागारात जागा उरली नाही, स्मशानात जागा संपली, लाकूड संपले, शवपेट्या बनवता येईनात, लोक मृतांना गोण्यांत भरून आणू लागले, शव स्वीकारायला नकार दिला जाऊ लागला, मृतदेह रस्त्यात पडून राहू लागले. अनेक घरांत आजारी लोक आपल्या मेलेल्या आप्तांच्या शवाबरोबर राहू लागले. घरंच्या घर फक्त आणि फक्त मृतांनी भरून गेली. अनेक कुटुंबच्या कुटुंबं-घराणी नामशेष झाली. मृताची नोंद करणे सोडून दिले, इस्पितळात रुग्ण हिरवा-निळा पडू लागला की, त्याला मृत घोषित करून बाहेर काढण्यात येऊ लागले. रस्त्यावर पडलेल्या प्रेतांतून वाहणाऱ्या हिरवट-निळसर द्रवाचा चिखल, रस्त्यावरच सडलेल्या प्रेतांची दुर्गंधी आणि त्यावर घोंघावणाऱ्या माशा असे चित्र सर्वत्र दिसू लागले.

नोव्हेंबर सुरू होईपर्यंत ५ लाख लोक आजारी पडले. शासन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. मग शहरातले धडधाकट लोक एकत्र आले, त्यांनी त्याचे गट स्थापून निरनिराळी कामे हाती घेतली. पैसा गोळा करून सामूहिक कबरी खणून त्यात प्रेते पुरली गेली. शहराची साफसफाई केली गेली, खाजगी गाड्या रुग्णवाहिका वा शववाहिकात रूपांतरीत केल्या गेल्या. अर्थात त्याला थोडा वेळ लागला आणि मधल्या काळात जनतेने प्रचंड हाल भोगले. आरोग्य विभागाने दिलेला इशारा न ऐकण्याची फार जबर किंमत निरपराध जनतेला भोगावी लागली.

४.

हेच अमेरिकेतही सुरू होते. तेथील सरकारने या आजाराचे वर्तमान दडपायचे ठरवले असल्याने आगगाड्या आजारी लोकांना घेऊन जात-येत होत्या. त्यामुळे लवकरच हा आजार सर्व अमेरिकाभर पसरला. सरकार जरी खुलेपणे जनतेला काही सांगत नव्हते, तरी बातम्या हळूहळू झिरपत होत्याच. त्यामुळे अफवांना उत आला. कुणी म्हणाले- कुत्र्यामुळे हा आजार पसरतो. मग अॅरिझोनातल्या हजारो भटक्या कुत्र्यांना यमसदनी धाडले गेले. कुणी सांगितले- कापूर या आजारावर गुणकारी आहे. झाले, लगेच कापडात बांधलेल्या कापराच्या वड्या लोक गळ्यात ताईतासारख्या लटकावू लागले. त्यातून अनेकांनी पैसा कमावला. कुणी साधा शिंकला तरी लोक पळ काढू लागले. अमेरिकेत साधारण दीड कोटी लोकांना हा रोग झाला आणि त्यात अंदाजे सात लाख लोक मृत्यू पावले.

नंतर कृष्णवर्णीय, आशियाई लोक या रोगाचे खरे जनक आणि वाहक आहेत, अशी अफवा पसरली आणि आधीच काळे-गोरे अशा भेदाने पोखरलेले समाजमन अजून दुभंगले. काळ्या लोकांना कामावरून काढायला, त्यांना गोऱ्यांच्या वस्त्यांतून हाकलायला सुरुवात झाली. कुणी फ्ल्यूचा आजार झटक्यात बरा करायचे मशीन काढले आणि पैसे कमावले. काय काय वेडेपणा लोक करत होते याला सीमा नाही.

शेवटी सरकारला जाग आली. औषध अजूनही सापडले नसल्याने आज करोनाविषयी आपण जे करतो आहोत तेच त्यांनीही केले. म्हणजे संचारबंदी करणे, लोकांना एकत्र जमायला बंदी घालणे, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना वेगळे करणे. सभा-समारंभ-मेळावे रद्द करणे इत्यादी इत्यादी.

पण युद्ध प्रयत्न आणि तयारी याबाबतीत मात्र सरकार ढिम्म होते राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी सैनिकांची भरती आणि तैनाती सैनिकांची ने-आण चालूच ठेवली. त्यामुळे फ्ल्यूचे थैमानही चालू राहिले. असा हाहा:कार उडाला असताना ऑक्टोबर १९१८ संपेपर्यंत हा आजार अचानक पुन्हा मागे हटला. म्हणजे पुरता गेला नाही, पण नव्याने आजारी पडणारे आणि मरणारे यांच्या संख्येत लक्षणीयरीत्या घट झाली.

सैनिकांनी/ सामानांनी  भरलेली जहाजे जशी अमेरिकेतून युरोपात जात होती, तशीच इतर देशांतूनही जात होती आणि येताना सुटीवरच्या किंवा आजारी/जखमी, जायबंदी सैनिकांना मायदेशी घेऊन येत होती. ही जहाजे म्हणजे बंदिस्त परीक्षानळ्याच जणू. त्यामुळे त्यात एखादा सैनिक या आजाराने बाधित असला की, थोड्याच काळात त्या जहाजावरचे सगळे जण ग्रासले जात.

अमेरिकन किनाऱ्यावरून निघणारे प्रत्येक जहाज - मग ते लष्करी असो व व्यापारी, युरोपकडे निघालेले असो वा इतरत्र - हा रोग जगाच्या कानाकोपऱ्यात इमानेइतबारे पोहोचवत होते. युरोपच्या किनाऱ्यावरून निघणारी जहाजेदेखील रोग प्रसारातला आपला वाटा उचलत होती. लवकरच बंदरातून हा रोग आगगाड्या, मोटारी आणि मालवाहतूक करणाऱ्या इतर साधनांमार्फत आतील भागात पसरत असे. एक अंटार्क्तिका खंड सोडला तर हा रोग सर्व जगभर पसरला.

५.

दक्षिण आफ्रिकेत आधीच असलेल्या गोरे-काळे वर्णभेदाची दरी त्याने अधिकच वाढवली. काळे लोक अस्वच्छ आणि रोगाचे वाहक असा शिक्का मारून त्यांच्यावर अत्याचार केले गेले. आजारी असो व नसो शंका आली तरी त्यांना तुरुंगात डांबले गेले. वैद्यकीय उपचार, सुविधा, मदत देणे तर दूरच. आफ्रिकेने या साथीत ५० लक्ष लोक मृत्युमुखी पडले.

जपानमध्ये या साथीला ‘सुमो रोग’ म्हणून ओळखले गेले. कारण याची साथ एका सुमो कुस्ती सामन्यानंतर उसळली.

जावा द्वीप्समूहात या रोगाने ४० लक्ष बळी घेतले. रशिया, मेक्सिको, चीन या देशांमध्येही बळी घेतले. अलास्कासारख्या दुर्गम भागातही थैमान घातले. फिजी, टोंगा, वानुआतु, पागो पागो ही प्रशांत महासागरातली बेटे जगापासून तुटलेली, पण तिथेही हा रोग पसरला. तेथील काही गावांत तर ९० टक्के लोक मृत्युमुखी पडले. या बेटांवरचे लोक अशा कुठल्याच आजाराला यापूर्वी सामोरे गेलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात बळी पडले. त्यांच्याबरोबर जवळपास विसेक स्थानिक भाषा लुप्त झाल्या.

सामोआ ही न्यूझीलंड जवळची बेटं म्हणजे जर्मन वसाहती होत्या. महायुद्ध सुरू झाले, तेव्हा न्यूझीलंडने दांडगाई करून ती जिंकून घेतली. त्यातील पूर्वेकडचे बेट अमेरिकेच्या ताब्यात होते. फ्ल्यूची साथ आधी अमेरिकेत आणि नंतर जगभरात, तसेच न्यूझीलंडमध्ये पसरल्याचे समजताच या पूर्व सामोआ बेटाच्या अमेरिकन गव्हर्नरने बेट बाहेरील जगाला बंद केले. कोणतेही जहाज बंदरापर्यंत यायला मनाई केली. पण न्यूझीलंडच्या ताब्यातील पश्चिम सामोआवासी एवढे नशीबवान नव्हते. त्यांना या रोगाने ग्रासले आणि जवळपास एक तृतीयांश लोक मृत्युमुखी पडले. पूर्व सामोआ बेटांचे विलगीकरण १९२० पर्यंत चालू राहिले आणि तेथे एकही माणूस आजारी पडला नाही की, मेला नाही. अख्ख्या जगात हा एकच भूभाग असा होता, जेथे फ्ल्यू पोहोचू शकला नाही!

११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले आणि मुख्यत: म्हणजे अमेरिका आणि युरोपने सुटकेचा नि:श्वास टाकला. लोक विजयोत्सव साजरा करायला घराबाहेर पडून रस्त्यावर आले. निरनिराळ्या शहरांत मिरवणुका आणि सैनिकांचे सत्कार सोहळे आयोजित केले गेले आणि फ्ल्यू परतला. ही फ्ल्यूची तिसरी आणि शेवटची लाट होती. पुन्हा नव्याने उद्रेक झालेला असला, लोक आजारी पडत आणि मरतही असले, तरी आता रोग तितका भयानकरीत्या जीवघेणा आणि घातक राहिलेला नाही हे हळूहळू लक्षात आले. शरीर हिरवे-निळे पडून मरण्याचे प्रमाणही कमी झाले, विशेष म्हणजे माणूस वाचण्याचे प्रमाण वाढले. ही लाट १९२० च्या मार्चपर्यंत जोरात होती आणि नंतर हळूहळू विरत जाऊन जून-जुलैपर्यंत रोग नाहीसा झाला.

६.

भारतात हा आजार प्रथम मुंबईत आला. मे १९१८ मध्ये मुंबई बंदरात आलेल्या जहाजातून सहा आजारी खलाशांना इस्पितळात भरती केले गेले. लवकरच या आजाराने ग्रस्त लोक मुंबई बंदर, बंदरालगतचे इलाखे आणि नंतर सगळ्या शहरात सापडू लागले. तिथून हा रोग भारतभर पसरला. मध्य भारत, पश्चिम महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तर प्रदेशात या रोगाने अक्षरश: थैमान घातले. नदीकाठी प्रेते जाळून राख व अस्थी नदीत सोडायची आपली जुनी परंपरा, पण उत्तर प्रदेशात, वाराणसीत लोक इतक्या संख्येने आणि इतक्या पटापटा मरू लागले की, चितेला लाकूड मिळेना. गंगेच्या काठावर-आसपास एक झाड शिल्लक राहिले नाही. लोक अर्धवट जळालेली किंवा तशीच प्रेतं नदीत फेकून देऊ लागले. गंगेतल्या सुसरी आणि डॉल्फिन्स हे मास खाऊ लागले. पण प्रेते इतकी जास्त होती की, तेही फार काही करू शकले नाहीत. गंगेचे विस्तीर्ण पात्र प्रेतांनी भरून गेले. परिणामस्वरूप रोगराई काठावरच्या इतर गावांत पसरली.

हिंदुस्तानी जनतेला रोगराई, साथ, महामारी, दुष्काळ काहीच नवे नव्हते, पण मृत्यूचे इतके भयानक तांडव तिने आधी कधी पाहिले नव्हते. दोन दशकांपूर्वीच प्लेगच्या साथीने हाहाकार माजवला होता. त्या वेळी इंग्रजांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली होती, त्यामुळे लोकांच्या मनात संशय, भीती आणि रागच होता. पुण्या-मुंबईसारख्या शहरात त्यांनी आजारी आणि संशयित आजारी लोकांना घराबाहेर काढून वेगळे करणे, त्यांचे कपडेलत्ते-सामानसुमान जाळून टाकणे, त्यांची घरे कार्बोलिक अॅसिडने निर्जंतुक करून सील करणे, स्त्री-पुरुषांची रस्त्यात कपडे काढून तपासणी करणे, असले अघोरी प्रकार करून ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी अवस्था केली! याउलट ग्रामीण भागात काहीच उपाय केले नाहीत. त्यातून रोग कसे होतात आणि फैलावतात, याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा पगडा भारतीयांच्या मनावर जास्त होता.

त्यामुळे जेव्हा ही साथ पसरली, तेव्हा भारतीय लोकांनी इंग्रजांकडे, त्यांच्या प्रयत्नांकडे संशय आणि रागानेच पहिले. इंग्रजांकडेही या साथीच्या रोगाचा सामना करण्याची एखादी ठोस योजना आणि यंत्रणा होती, असे दिसत नाही. त्यामुळे थोडेफार उपाय, थोडीफार मदत त्यांनी दिली आणि त्यातील फार कमी मदत भारतीयांनी स्वीकारली. इंग्रजांनी या बाबतीतले वर्तमान शक्यतो दाबायचाच प्रयत्न केला (आणि त्याला बऱ्याच प्रमाणात यशही आले!)

७.

या स्पॅनिश फ्ल्यूचा इतिहास म्हणजे फक्त मृत्यू, वियोग आणि आजारपणाचा इतिहास नाही. या रोगाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली. त्यानिमित्ताने जगाला आपण या क्षेत्रात अजून खूप मागे आहोत हे जाणवले. परिणामी सरकार वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनाला मदत पुरवू लागले. अशा रोगांना, साथींना तोंड द्यायला सामाजिक पातळीवर प्रयत्न करावे लागतात, फक्त वैद्यकीय तंत्रज्ञानावर विसंबून चालत नाही हेही समजले. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. डॉ. ओस्वाल्ड अवेरीने आपले काम पुढे सुरूच ठेवले. पुढे डीएनएचा शोध आणि संरचना, तसेच जनुक शास्त्रात त्याने भरीव योगदान दिले. डॉ. विल्यम पार्क आणि आना विल्यम यांनी जी लस तयार केली, त्यावरून पुढे अनेक रोगांना एकत्र प्रतिबंध करणाऱ्या लसी तयार करण्याचे तंत्र विकसित झाले. आज आपण ज्या ट्रिपल पोलिओसारख्या दोन-तीन रोगांच्या लसी एकत्रित देतो, त्यांच्या शोधाचे मूळ इथे आहे.

अशा साथीच्या रोगाचे जीवाणू/ विषाणू हुडकणे आणि त्यावरचे उपाय शोधण्याच्या कामी अनेक तरुण शास्त्रज्ञ लागले. त्यातीलच एक अलेक्झांडर फ्लेमिंग. त्याने १९२८ साली पेनिसिलीन या प्रतिजैविकाचा शोध लावला. वैद्यकशास्त्रात या शोधाने क्रांती घडवली. विसाव्या शतकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या शोधातला तो एक शोध गणला जातो.

जॉन हुल्तीन १९५१ साली आणि १९९७ साली अलास्काच्या बर्फाळ प्रदेशात

अलास्काच्या बर्फाळ वातावरणात जे रुग्ण पुरले गेले, त्यांची प्रेते अति शीत वातावरणात जशीच्या तशी राहिली असतील म्हणून जॉन हुल्तीन या तरुण शास्त्रज्ञाने १९५१ साली त्या कबरीतून फुप्फुसाचे नमुने मिळवून स्पॅनिश फ्ल्यूचे विषाणू अलग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. मात्र त्याने हार मानली नाही. पुढे ४६ वर्षांनी म्हणजे १९९७ साली परत एकदा त्याने प्रयत्न केले. या वेळी त्याला यश आले. हा विषाणू म्हणजेच २००९ साली आलेला कुप्रसिद्ध H1N1 किंवा स्वाईन फ्ल्यू. 

आज १०२ वर्षानंतरही साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यात मानव जात सक्षम आहे का, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असे देणे अवघड आहे. अशा रोगांचा मुकाबला फक्त औषधे, उपचार या मार्गाने शक्य होत नाही. त्याकरता मानवसमूह आणि देशादेशांतला सहकार जास्त निर्णायक भूमिका बजावतो.

विषाणू जात, धर्म, भौगोलिक परिस्थिती, वंश, वर्ण, काही पाहत नाही, पण मानवसमूह मात्र आजाराला सामोरे जाताना या सगळ्या गोष्टींची जळमटं डोक्यात घेतात. स्वार्थ आणि भीती जेव्हा समूहाची मानसिकता बनते, तेव्हा आजाराशी लढण्याऐवजी एकमेकांतच धुमश्चक्री सुरू होते.

सध्या आपण करोनाच्या निमित्ताने हे पाहतोच आहोत. शिवाय अंधश्रद्धा आणि अफवा आहेतच. तेव्हा आज आपण साथीच्या आजाराचा मुकाबला अधिक चांगल्या प्रकारे करू शकत असलो, तरी अजून सुधारणेची खूप गरज आहे, वावही आहे.

.............................................................................................................................................

संदर्भ

१. The 1918 Flu Pandemic - Extra History  Part 1 to 6 You tube documentary series

२. 1918 Spanish Flu historical documentary _ Swine Flu Pandemic _ Deadly plague of 1918 - YouTube documentary

३. https://www.cdc.gov/flu/pandemic-resources/index.htm

४. The 1918 Spanish Flu Pandemic : The History and Legacy of the World’s Deadliest Influenza Outbreak by Charles River Editors Kindle E book

.............................................................................................................................................

आजवर चार कोटी चवऱ्याण्णव लाख पाच हजार एकोणऐंशी लोकांनी पाहिलेला ‘स्पॅनिश फ्ल्यू’विषयीचा एक लघुपट

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......