करोना व्हायरसच्या संसर्गापासून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना दूर कसे राखायचे?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अतुल गवांदे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 26 March 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

अमेरिकेतील प्रसिद्ध सर्जन, प्रसिद्ध लेखक आणि ‘न्यू यॉर्कर’चे स्टाफ रायटर डॉ. अतुल गवांदे यांचा ‘Keeping the Coronavirus from Infecting Health-Care Workers’ हा लेख ‘न्यूयॉर्कर’च्या पोर्टलवर २१ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. त्याचा हा मराठी अनुवाद.

............................................................................................................................................................

सगळीकडे हाच संदेश आहे – ‘घरी रहा’. करोना व्हायरसच्या या सुरुवातीच्या टप्प्यात वाढत्या संख्येने तपासण्या होत असताना तपासणी न झालेल्या केसेसमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणे चिंताजनक आहे. पण असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या कामाची देशाला गरज आहे- किराणा मालाचे दुकानदार, आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वांत प्रथम प्रतिसाद देणारे, अत्यावश्यक उत्पादन करणारे कामगार इत्यादी. आपल्याला वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांची अत्यंत गरज आहे, हे उघड आहे. मात्र त्यांना त्यांच्या कामामधून रोगाचा सर्वाधिक धोका असतो. तेच स्वतः पेशंट न बनता इतर पेशंट्सची सेवा करू शकतील, यासाठी काय करता येईल?

वूहानमधील संसर्ग साथीत वैद्यक सेवेतील तेराशे लोकांना संसर्ग झाला. सर्वसामान्य लोकांना संसर्ग होण्याच्या शक्यातेपेक्षा त्यांना ती शक्यता तिप्पट होती. ते जेव्हा आपल्या कुटुंबात परतले, तेव्हा ते संसर्गाच्या फैलावाचे प्रमुख वाहक बनले. शहरातील डॉक्टर्स आणि नर्सेस कमी पडू लागल्या. आजाऱ्यांवर उपचार करण्यासाठी दुसरीकडून बेचाळीस हजाराहून अधिक लोक बोलवायला लागले. नवीन आलेल्या या वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांसाठी एक पद्धत शोधली गेली, ज्यामुळे सुदैवाने अगदी एकालाही संसर्ग झाला नाही.

पण त्या पद्धती अत्यंत कडक होत्या. जेव्हा शहर पूर्णपणे बंद करण्यात आले आणि बाहेरच्या लोकांपासून तोडण्यात आले. तसेच धोकादायक पेशंट्सवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या लोकांना आपल्या कुटुंबांपासून दूर ठेवण्यात आले. त्यांना संपूर्ण शरीर सुरक्षित राहील असा वेष, गॉगल्स, डोके संपूर्ण झाकले जाईल असे आच्छादन, N-95 मास्क, अत्यंत धोकादायक प्रदूषणात काम करताना घालायचा पूर्ण सूट (hazmat style suit) दिला गेला.

आम्ही इथे हे करू शकतो? शक्यताच नाही. आरोग्य सुविधांमध्ये प्रत्येक पेशंटला तपासताना स्टाफला देण्यासाठी या सर्व सुविधा असण्याची शक्यता अजिबातच नाही. मी जिथे शस्त्रक्रिया करतो, त्या मॅसॅच्युसेट्समधे हा व्हायरस चौदापैकी किमान अकरा परगण्यांत फैलावला आहे, आणि केसेस जलद गतीने वाढत आहेत. तर मग जर तुमच्यासमोर करोनाचा पेशंट असला आणि तुमच्याकडे वुहानसारख्या सुविधा नसल्या तर काय होईल?

माझ्या हॉस्पिटल व्यवस्थापनाने अगोदरच शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना १४ दिवसांच्या स्व-विलगीकरणासाठी घरी पाठवले आहे, कारण ते संपूर्ण सुरेक्षेशिवाय करोनाला सामोरे गेले होते.  कोविड-१९च्या पेशंटच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक आरोग्यसेवकाला जर आम्हाला घरी पाठवावे लागले, तर आमच्याकडे कोणी आरोग्यसेवकच शिल्लक राहणार नाही.

तरीही ज्यांनी आमच्या आधी करोनाचा सामना केला आणि त्याचा फैलाव रोखण्यात ते यशस्वी झाले, अशा दोन ठिकाणांहून आम्हाला शिकता येण्यासारखे आहे- हाँगकाँग आणि सिंगापूर. माझ्या राज्याइतकाच त्यांचा आकार आहे. जानेवारीच्या उत्तरार्धात त्यांच्याकडे पहिली केस उघडकीला आली आणि ती संख्या वेगाने वाढत गेली. प्रशासनाने मोठ्या गॅदरींगना मज्जाव केला, लोकांना घरून काम करण्यास सांगितले आणि माणसांत अंतर राखण्यावर (social distancing) भर दिला. तपासण्या शक्य तितक्या तातडीने केल्या गेल्या. पण जर सुविधा आणि आरोग्यसेवकांद्वारे व्हायरस वाढत राहिला तर हे उपायही अजिबात पुरेसे ठरणार नव्हते.

युनायटेड स्टेट्सप्रमाणे या दोन देशांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व हॉस्पिटल्समध्ये पुरेसे गाऊन, N-95 मास्क उपलब्ध नव्हते, तसेच सुरुवातीला तपासण्यांचीही सोय कमी होती. मात्र सहा आठवड्यांनंतर त्यांना साथीच्या उद्रेकावर काबू मिळवता आला. हॉस्पिटल्समध्ये भरभरून पेशंट येणे बंद झाले. आतापर्यंत उद्योगधंदे व सरकारी कार्यालये पुन्हा सुरू होऊ लागली आहेत आणि देशात येणाऱ्या इतर केसेस नियंत्रणात आणण्याकडे लक्ष वळवण्यात आले आहे.

त्या प्रत्येक ठिकाणच्या आरोग्य सेवा अग्रणींशी चर्चा केल्यावर आणि अधिकृत माहितीवर आधारित कळलेले कळीचे मुद्दे असे आहेत- सर्व आरोग्यसेवकांनी सर्व पेशंटच्या संपर्कात येताना नेहमीचे सर्जिकल मास्क, ग्लोव्हज घालणे आणि हाताची योग्य स्वच्छता राखणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक पेशंटला तपासल्यानंतर सर्व ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. ज्या पेशंटना तशी लक्षणे आहेत, (थोडा ताप आणि खोकला, श्वसनसंबंधी तक्रारी, थकवा आणि स्नायू दुखणे) किंवा जे व्हायरलचा फैलाव झालेल्या देशातून प्रवास करून आले आहेत वा ज्यांच्या रोगाची तपासणीनंतर निश्चिती झाली आहे, अशांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना इतर पेशंटपासून अलग करण्यात येते आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे ठिकाणच्या वेगळ्या श्वसन तक्रारी विषयक दालनात आणि क्लिनिकमधे वेगळ्या टीमकडून उपचार केले जातात.

क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये माणसामाणसात अंतर राखले जाते (social distancing), वेटिंग रूममधील खुर्च्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असते, क्लिनिकमधील सर्व कर्मचाऱ्यांमधील थेट आदानप्रदान एका विशिष्ट अंतरावरून करतात. तपासणीव्यतिरिक्त डॉक्टर आणि पेशंट एकमेकातील अंतर सहा फुटांचे राखतात.

ते काय करत नाहीत हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तिकडे N-95 मास्क, चेहऱ्याचे संरक्षण करणारे मास्क, गॉगल्स आणि गाऊन हे विशिष्ट प्रक्रियांसाठी राखीव ठेवण्यात येतात. जिथे श्वसनेंद्रियातील स्त्राव काढला जेतो (उदा. पेशंटला अनेस्थेशियासाठी नळी घालताना) आणि संशयित किंवा निश्चित झालेल्या कोविड-19 पेशंट तपासणीसाठीच हे राखीव असतात. त्यांच्या विलगीकरणाच्या धोरणातही सूक्ष्म फरक आहे. अनपेक्षितपणे जर एखादा पेशंट तपासणीत पॉझिटिव्ह निघाला तर काय होते- म्हणजे हॉस्पिटलमधील एखादा सह-कर्मचारी, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वा इमर्जन्सी रूममधील एखादा पेशंट?

हाँगकाँग आणि सिंगापूरमधे ते लोक ते ठिकाण पूर्ण बंद करत नाहीत किंवा प्रत्येकाला घरी विलगीकरणासाठी पाठवत नाहीत. ते प्रत्येक संपर्काचा माग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि फक्त संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेच विलगीकरण करतात. हाँगकाँगमध्ये ‘जवळचा संपर्क’ म्हणजे सहा फुटांपेक्षा कमी अंतरावरून सर्जिकल मास्कशिवाय झालेला पंधरा मिनिटांचा संपर्क. सिंगापूरमध्ये हा कालावधी तीस मिनिटांचा ठरवला गेला आहे. या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी काळासाठी संपर्क झाला असेल, पण तो दोन मिनिटांहून अधिक व सहा फुटांच्या आतला असेल, तर कर्मचारी सर्जिकल मास्क घालून काम करणे चालू ठेवू शकतात आणि दिवसातून दोनदा ताप मोजतात. ज्या लोकांचा अगदी थोडा वेळ आणि प्रासंगिक संपर्क झाला असेल त्यांना आपल्या लक्षणांबद्दल दक्ष राहण्यास सांगितले जाते.  

कोविड-19चा चढता आलेख रोखण्यात हे उपाय यशस्वी झाले, यातच काही आशादायक चित्र अंतर्भूत आहे. एक म्हणजे, फ्लूपेक्षा तो अधिक संसर्गजन्य दिसत असला तरीसुद्धा तो सर्वसाधारण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थित सांभाळले तरी नियंत्रणात राहू शकतो. लोकसंपर्क टाळणे, हाताची आणि सर्वसाधारण स्वच्छता, बाधित व्यक्तींना पूर्ण वेगळे ठेवणे (isolation) आणि आजारी व ज्यांना या संसर्गाचा मोठा धोका उद्भवलेला आहे, त्यांचे विलगीकरण (quarantine), आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढवणे (पुरवठा, तपासण्या, कर्मचारी वर्ग, वॉर्ड्स) आणि समन्वय साधून  सुस्पष्ट, पारदर्शक, अद्ययावत आकडेवारी व मार्गदर्शनासह केलेले सर्वंकष जनसंबोधन.

आमची सरकारी यंत्रणा याबाबतीत अक्षम्यपणे अत्यंत धीमी ठरली आहे. आम्ही त्यांच्या मागच्या फळीतून काम करणारे लोक आहोत. पण आता आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत असे दिसते, आणि आशियातील अनुभव असे दर्शवतो की, साथ थांबवण्यासाठी वाजवीहून अधिक सावधगिरीची आवश्यकता नसावी. आमच्यापैकी ज्यांना बाहेर जावेच लागते आणि लोकांमध्ये वावरणे आवश्यकच असते, अशांच्या जर लक्षात आले की करोनाने बाधित व्यक्ती आपल्याच खोलीत होती किंवा काही क्षण आवश्यकतेपेक्षा अधिक जवळ उभी राहिली होती, अशांनी भयभीत होण्याची गरज नाही. प्रामुख्याने मूलभूत सुरक्षितता न पाळता बराच काळ बाधित व्यक्तीशी संपर्क राहिला किंवा स्त्रावांशी संपर्क झाल्यानंतर हातांची स्वच्छता पाळली गेली नाही तर संसर्ग होताना दिसतो.

काही आकडेवारीकडे लक्ष द्या. सिंगापूरमध्ये करोना संबंधित आरोग्य सेवा देणाऱ्या एकाही व्यक्तीच्या मृत्यूची आतापर्यंत नोंद नाही आणि तेही अशा शेकडो केसेस हाताळत असताना. यामध्ये या आठवड्यातील अशा एका केसचा अंतर्भाव आहे, जी व्यक्ती न्यूमोनियाने गंभीर आजारी होती, परंतु तोपर्यंत तिचा कोविड-19 निश्चित झाला नव्हता. त्या व्यक्तीला चार दिवसांच्या कालावधीत एक्केचाळीस आरोग्यसेवक सामोरे गेले. यामध्ये संसर्गाचा धोका पुष्कळच होता, ज्यामध्ये नळी आत घालताना (intubation) आणि अति दक्षता विभागात काम करताना होणाऱ्या संसर्गाचाही  समावेश आहे. सेवा कर्मचाऱ्यांपैकी ८५ टक्के लोकांनी केवळ सर्जिकल मास्क घातले. तरीही, हातांची योग्य स्वच्छता राखली गेल्यामुळे कोणालाही संसर्गाची बाधा झाली नाही.

आमचे सुरुवातीचे यु.एस.मधील अनुभव आत्तापर्यंत तरी तसेच आहेत. मर्यादित माहिती असल्यामुळे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी आशियापेक्षा अधिक कडक सावधानता बाळगण्याबद्दल सूचना दिल्या. आरोग्यसेवकांचा जर मास्क, गॉगल्स व इतर सुरक्षाकवच नसताना एखाद्या बाधित व्यक्तीशी अगदी काही मिनिटे जरी संपर्क झाला, तर त्याला चौदा दिवसाच्या स्व-विलगीकरणासाठी पाठवले गेले. हे धोरण यु. सी. डेविस मेडिकल सेंटरमध्ये राबवले गेले, जिथे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात संसर्गाचा समाजात फैलाव झालेली पहिली केस आली. पेशंटची काळजी घेणाऱ्या ८९ आरोग्यसेवकांना स्व-विलगीकरणासाठी पाठवले गेले. असे दिसून आले की, त्यांच्यापैकी कोणालाही संसर्गाची बाधा झाली नाही. सॅक्रॅमेंटो, सिएटल आणि सॅनफ्रान्सिस्को हे करोनाबाधितांची मोठी ठिकाणे झाली, पण आत्ता हे लिहीपर्यंत, व्यवसायजन्य संसर्ग फार  दिसला नाही.

दरम्यान सर्व इमर्जन्सी डिपार्टमेंट्स बंद करण्यासंदर्भात एक कठोर धोरण येऊ पाहात आहे. त्यामुळे गरज आणि आधीच्या अनुभवावर आधारित, सॅनफ्रान्सिस्कोमधील सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांनी निर्बंध थोडे सैल केले आहेत. त्यांनी बाधितांना सामोरे गेलेल्या कर्मचाऱ्यांना काही लक्षणे उद्भवली नसतील तर सर्जिकल मास्क घालून काम चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सिएटलमधील एक हॉस्पिटल तरी आता राज्य सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहाय्याने हेच धोरण अवलंबत आहे. देशातील इतर हॉस्पिटल्स लवकरच हे धोरण अवलंबतील. आरोग्यसेवकांना रोगापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे अत्यंत दक्षतेने हाताचे आरोग्य आणि  स्वच्छता पाळणे, क्लिनिक आणि हॉस्पिटल्समधे केवळ आवश्यकता असलेल्याच पेशंटना प्रवेश, शक्य तितकी काळजी आभासी चॅनल्सद्वारे (उदा. फोन व्हिडिओ) घेणे आणि श्वसनासंबंधी तक्रारी असलेल्या पेशंटच्या संदर्भात स्त्रावांपासून संरक्षणाच्या प्रमाणित पद्धती (सर्जिकल मास्क, ग्लोव्हज आणि गाऊन) पाळणे.

जे घरी राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी असा धडा आहे की, धोका असला तरी ते काम करूनही  करोना मुक्त राहू शकतात. यु.सी.एस.एफ. मेडिकल सेंटर येथील रोग परिस्थिती विज्ञान आणि संसर्ग प्रतिबंध हॉस्पिटलच्या डायरेक्टर डेबरा योको यांनी मला सांगितले की, सुरक्षित राहण्यासाठीचे हॉस्पिटलचे नियम बघता कर्मचाऱ्यांना तिथे संसर्ग होण्यापेक्षा घरी होण्याचा धोका अधिक आहे. या तथ्यानुसार सॅनफ्रान्सिस्कोमधील सार्वजनिक आरोग्य अधिकारी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना सांगत आहेत की, सर्वच आरोग्यसेवकांनी  (केवळ बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनीच नाही) दररोज काम सुरू करण्याअगोदर त्यांना ताप किंवा फ्लूची लक्षणे जाणवतात का, याचा  अहवाल द्यावा.

द. कोरियामध्ये रोगाच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी समूह तपासण्या केल्यामुळे मिळालेले यश ही शक्यता दर्शवते की, लक्षणे नसलेले रोगवाहक हे उद्रेक होण्यास कारणीभूत होते. पण सिंगापूर व हाँगकाँगमधील एक अनुभव असा आहे की, केवळ काही शास्त्रज्ञ म्हणतात तसे या करोनाच्या न दिसणाऱ्या केसेसमुळेच गंभीर संसर्गाचा आकडा वाढत नसावा. तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संसर्ग झालेले लोक शोधण्यासाठी लक्षणे न दिसणाऱ्या लोकांच्या समूह तपासण्या केल्या नव्हत्या. त्यांनी लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींचाच वा ज्यांना समाजात धोकादायक संसर्ग झाला असण्याची शक्यता अधिक आहे, अशांचाच आक्रमकपणे शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले. ज्यांना काहीच जाणवत नाहीये त्यांच्यात व्हायरसचा प्रसार कदाचित होईल, हे त्यांनी स्वीकारले. तरीही त्यांच्या योजनेने केसेस नियंत्रणात आल्या.

याला अनेक स्पष्टीकरणे असू शकतात. एक म्हणजे कधीच लक्षणे न दिसल्यामुळे ज्यांचे मूल्यमापन करावे असे न वाटणाऱ्या केसेस वाटतात त्यापेक्षा कमी असाव्यात. वूहानमध्ये जिथे अनेकांच्या तपासण्या झाल्या आणि ७२ हजारांहून अधिक करोना केसेस पुढे आल्या, त्यातील केवळ एक टक्का लोकांना कधीच लक्षणे नव्हती. डायमंड प्रिन्सेस क्रूझवर रोगाच्या उद्रेकानंतर तीन हजारांहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी वर्गाचे विलगीकरण केले गेले आणि सर्वंकष तपासण्या झाल्या. सहाशे चौतीस लोकांमध्ये व्हायरस होता. तपासणीच्या वेळी बहुतेकांमध्ये  काहीच लक्षणे नव्हती, पण ते लक्षणपूर्व टप्प्यात होते असे दिसले : अनेक दिवसांनी रोगाची जाणवण्याजोगी लक्षणे दिसून आली. केवळ १८ टक्के लोक नेहमीच लक्षणविरहित राहिले.

ज्यांना लक्षणे नाहीत ते कमी संक्रामक असतात हे आपल्याला माहीत आहे, पण किती कमी असतात हे माहीत नाहीये. ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांच्या तपासण्या केल्यामुळे सिंगापूर व हाँगकाँगमध्ये मिळालेल्या यशावरून असे अनुमान काढता येते की, लक्षण न दिसणाऱ्या वाहक व्यक्ती आपल्याला वाटल्या, त्यापेक्षा बऱ्याच कमी असू शकतात. केवळ आरोग्य सेवेतच नाही, तर जिथे जिथे करोना व्हायरसचा प्रसार झाला आहे आणि तरी कामाला जावे लागत आहे, अशा सर्व ठिकाणी काय केले पाहिजे यासाठी हा अनुभव आपल्याला मार्गदर्शक करू शकतो. जसजसे तपासण्या वाढत जातील तसतशी अधिक माहिती मिळत जाईल आणि आम्ही आपले डावपेच बदलू शकू. तथापि आम्ही आमचा मार्ग शोधत आहोतच.

जेव्हा तुमच्या आसपास रोगाच्या केसेस वाढत असतात आणि तुम्हाला घर सोडून कामावर जाण्यावाचून पर्याय नसतो, तेव्हा भीती न वाटणे अशक्य आहे. पण जगभरातल्या आमच्या सहकाऱ्यांच्या अनुभवांवरून आम्ही शिकू शकतो. जशी महामारी जागतिक आहे, तसेच तिच्यापासून घेतलेले धडेही जागतिक आहेत.

............................................................................................................................................................

मराठी अनुवाद - माधवी कुलकर्णी

............................................................................................................................................................

डॉ. अतुल गवांदे यांचा ‘न्यूयॉर्कर’च्या पोर्टलवर २१ मार्च २०२० रोजी प्रकाशित झालेला मूळ इंग्रजी लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा