करोना विषाणूमुळे पसरलेली महामारी ही नागरिकतेची एक मोठी चाचणी आहे
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
युव्हाल नोआ हरारी
  • करोना विषाणूचे एक प्रातिनिधिक चित्र आणि जगप्रसिद्ध इतिहासकार युव्हाल नोआ हरारी
  • Wed , 25 March 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus युव्हाल नोआ हरारी Yuval Noah Harari

‘सेपियन्स’, ‘होमो ड्यूस’ आणि ‘२१ व्या शतकातील २१ धडे’ या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आणि जगविख्यात इतिहासकार युव्हाल नोआ हरारी यांनी ‘the world after coronavirus’ या नावानेफायनान्शिअल टाइम्स’मध्ये २० मार्च २०२० रोजी एक लेख लिहिला आहे. प्रत्येकाने वाचलाच पाहिजे अशा या लेखाचा हा मराठी अनुवाद.

.............................................................................................................................................

संपूर्ण जगाला सध्या ‘करोना’ या विषाणूने विळखा घातला आहे. समस्त मानवजातीला करोनाच्या या जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आपल्या पिढीपुढचे हे सर्वांत मोठे असे संकट आहे. याचा सामना करताना येत्या काही आठवड्यांत लोक आणि सरकार जे निर्णय घेतील, ते निर्णय पुढच्या काही वर्षांसाठी जगाला आकार देतील. हे निर्णय केवळ आपल्या आरोग्य व्यवस्थेवरच नव्हे, तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृतीवरही परिणाम करतील. म्हणूनच या जीवघेण्या संकटाचा सामना करताना आपण निर्णायक ठरतील, अशी पावले झपाट्याने उचलायला हवीत. त्याचबरोबर आपल्या कृतींचा दीर्घकालीन परिणामही आपल्याला लक्षात घ्यायला हवा. कोणतेही पर्याय निवडताना या संकटाला त्वरित मात कशी द्यायची, तसेच हे वादळ शमल्यावर कोणत्या प्रकारचे जग मागे उरेल, हे प्रश्न आपण स्वत:लाच विचारले पाहिजेत. हो, हे वादळ नक्कीच शमेल, मानवजातीचे अस्तित्वही टिकेल, आपल्यातील अनेक जण उद्याही जिवंत असतील. पण आपण एका वेगळ्याच जगात असू.

अल्प मुदतीचे बरेच आपत्कालीन उपाय हे जीवनात स्थिरता मिळवून देतील. आणीबाणीचे हे स्वरूपच आहे असे म्हणा ना. ते ऐतिहासिक प्रक्रिया पुढे/जलद करून टाकतात. इतर वेळी अनेक वर्षे विचार-विमर्श करून घेतले जाणारे निर्णय आणीबाणीच्या अशा प्रसंगात अगदी काही तासांत घेतले जातात.

अपरिपक्व आणि अगदी धोकादायक असे तंत्रज्ञान सेवेमध्ये दाखल करून घेतले जाते. कारण काहीच न करण्याची जोखीम ही अधिक मोठी असते. या काळात संपूर्ण देश मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रयोगांमध्ये ‘गिनीपिग’ म्हणून काम करतो. जेव्हा प्रत्येक जण घरून काम करू लागतो आणि काही अंतर राखून संवाद साधतो तेव्हा काय होते? जेव्हा सगळ्या शाळा आणि विद्यापीठे ऑनलाइन होतात तेव्हा काय होते? जनजीवन सामान्य असताना म्हणजेच एरवी शासन, उद्योगधंदे आणि शैक्षणिक संस्था असे प्रयोग करायला राजी होत नाहीत, पण ही सामान्य वेळ नाही.

संकटाच्या या काळात आपल्यासमोर प्रामुख्याने दोन पर्याय आहेत. एक म्हणजे जनतेवर निरंकुश पाळत ठेवणे आणि नागरिकांचे सबलीकरण करणे. तर दुसरा पर्याय म्हणजे देशाला अलग करून जागतिक एकता राखणे.  

जनतेवर पाळत ठेवणे

या रोगाची साथ पसरण्यापासून थांबवण्यासाठी, देशातील सर्व जनतेला काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसे करायचे तर दोन मुख्य मार्ग आहेत. नागरिकांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा देणे. आज मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदाच तंत्रज्ञानामुळे प्रत्येक वेळी सर्वांवर पाळत ठेवणे, लक्ष ठेवणे शक्य आहे. ५० वर्षांपूर्वी रशियातील सुरक्षा यंत्रणा- ‘केजीबी’लासुद्धा दिवसाचे २४ तास रशियन नागरिकांवर देखरेख करणे शक्य नव्हते किंवा जमा केलेल्या सर्व माहितीवर ‘केजीबी’ प्रभावीपणे प्रक्रिया करू शकत नव्हती. त्यावेळी ‘केजीबी’ मानवी गुप्तहेर (एजंट्स) आणि विश्लेषकांवर अवलंबून होती आणि प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवण्यासाठी मानवी एजंट नेमू शकत नव्हती. पण आता हाडामांसाच्या माणसांऐवजी सर्वव्यापक सेन्सर (उपकरणे) आणि शक्तिशाली अल्गोरिदम (सूत्रे) वर सरकारे अवलंबून राहू शकतात.

करोना विषाणूमुळे पसरलेल्या रोगाचा सामना करण्यासाठी अनेक देशांतील सरकारांनी जनतेवर लक्ष ठेवण्याची अनेक साधने यापूर्वीच तैनात केली आहेत. या सर्वांत उल्लेख करावा लागेल, तो चीनचा. लोकांच्या स्मार्टफोनचे बारकाईने निरीक्षण करून चेहरा ओळखणारे कोट्यवधी कॅमेरे वापरणे आणि लोकांना त्यांच्या शरीराचे तापमान आणि वैद्यकीय स्थिती तपासून अहवाल देण्यास भाग पाडण्याचे काम ते चोखपणे पार पाडत आहेत. चीनी अधिकारी केवळ संशयित करोना विषाणूचा वाहक (बाधित) त्वरित ओळखतात. एवढेच नाही, तर या बाधितांच्या हालचालींचा मागोवा घेतात आणि या बाधित व्यक्ती इतर कुणाकुणाच्या संपर्कात आल्या होत्या, त्यांची ओळख पटवण्याचे कामही पार पाडतात. तेथील अनेक मोबाइल अॅप्स हे चीनी नागरिकांना त्यांच्या आसपासच्या करोना संक्रमित रुग्णांच्या उपस्थितीबद्दल माहिती देऊन सावध करताना दिसतात.  

या प्रकारचे तंत्रज्ञान केवळ पूर्व आशियापुरते मर्यादित नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी राखून ठेवलेले पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान करोनाबाधित रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी तैनात करण्याचे आदेश इस्त्रायल सुरक्षा एजन्सीला दिले. संसदीय उपसमितीने या उपायाला अधिकृतरित्या मान्यता देण्यास नकार दिल्यावर नेतान्याहू यांनी आपत्कालीन वटहुकूमाद्वारे हा निर्णय घेतला.

या सर्व बाबींमध्ये नवीन काही नाही, असा मुद्दा तुम्ही मांडू शकता. अलिकडच्या काही वर्षांत सरकारे आणि नगरपालिका हे दोघेही लोकांचा माग काढण्यासाठी, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. तरीही जर आपण सावधानता बाळगली नाही, तर मानवी अस्तित्वाला नष्ट करू शकणारा, हा एक मोठा भयंकर जीवघेणा साथीचा रोग ठरू शकतो. आतापर्यंत अनेक देशांमध्ये नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या साधनांचा वापर वाढवण्यात आला आहे. अशा प्रकारे जनतेवर लक्ष ठेवण्याच्या पर्यायाला ज्यांनी ज्यांनी नाकारले होते, त्यांनाही आता हा प्रकार अवलंबण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. कारण करोना विषाणूने आता तळागाळापासून सगळ्यांनाच ग्रासले आहे. त्यामुळे बाधितांना शोधण्याबरोबरच या रोगाला संक्रमणापासून रोखणे भाग झाले आहे. 

आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपण बोटाने आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श केला आणि एखाद्या लिंकवर क्लिक केले, तेव्हा आपले बोट नेमके कशावर क्लिक करते, आपल्याला कशात रस आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. पण आता करोना विषाणूमुळे सरकारचा आपल्या जनतेवर लक्ष ठेवण्याचा उद्देश बदललेला पाहायला मिळतो. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बोटाचे तापमान, तुमच्या स्पर्शाद्वारे तुमचा रक्तदाब आदी गोष्टी सरकारला माहिती करून घ्यायच्या आहेत.

आणीबाणी आणि पुडिंग

काम करत असताना आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यापैकी एक म्हणजे आपल्यापैकी कोणालाही हे माहीत नाही की, आपल्यावर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहे आणि येणाऱ्या काळात आपल्यापुढे कोणते ताट वाढून ठेवलेले आहे. लोकांवर पाळत ठेवण्याचे हे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि दहा वर्षांपूर्वीच्या ज्या विज्ञान-कल्पित गोष्टी होत्या, त्या आज जुन्या बातम्या बनल्या आहेत.

एक प्रयोग म्हणून एका काल्पनिक सरकारचा विचार करून पाहा. या सरकारने अशी मागणी केली की, प्रत्येक नागरिकाने दिवसाचे २४ तास शरीराचे तापमान आणि हृदयाची गती नियंत्रित करणारे बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे. या ब्रेसलेटद्वारे प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते (सरकारी अल्गोरिदम). या माहितीच्या आधारे (अल्गोरिदम) आपण आजारी असल्याचे आपल्याला समजण्यापूर्वीच सरकारला समजेल आणि आपण कोठे होतो, आपण कोणाकोणाला भेटलो ही माहितीदेखील त्यांना समजेल. या माहितीच्या आधारे रोग संक्रमणाची साखळी अत्यंत लहान करता येऊ शकते आणि अगदी कापलीही जाऊ शकते. अशी प्रणाली काही दिवसांतच करोनासारख्या महामारीला नक्कीच रोखू शकते. हे ऐकून छान वाटले ना?

पण याची दुसरी बाजूही आहे, ती आपण लक्षात घ्यायला हवी. अशा प्रणालीला मान्यता मिळाल्यास नागरिकांच्या खाजगी जीवनावर नजर ठेवणाऱ्या यंत्रणेला कायदेशीर मान्यता मिळेल. उदाहरणार्थ, मी ‘सीएनएन’ऐवजी ‘फॉक्स न्यूज’वर क्लिक केले, तर माझा राजकीय दृष्टिकोन तसेच कदाचित माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला बरेच काही जाणून घेता येईल. मी व्हिडिओ क्लिप पाहताच माझ्या शरीराचे तापमान, रक्तदाब आणि हृदयाची गती यात काय बदल होतो, हे तुम्हाला पाहता येईल. कोणत्या गोष्टींमुळे मला हसू येते, काय झाल्यावर मला रडू कोसळते आणि कशामुळे मला राग येतो आदी गोष्टी या यंत्रणांमुळे समजतील.

हे लक्षात ठेवयाला हवे की राग, आनंद, कंटाळा आणि प्रेम या ताप, खोकला यांसारख्याच जैविक घटना आहेत. खोकला ओळखणारे हेच तंत्रज्ञान हसणेदेखील ओळखू शकते. जर नगरपालिका आणि सरकारने आमचा बायोमेट्रिक डेटा काढणे सुरू केल्यास आम्ही स्वतःला ओळखण्यापेक्षा अधिक पटीने ते आम्हाला चांगले ओळखू शकतात आणि मग ते आमच्या भावनांचा अंदाज लावू शकतात, भावनांना हाताळू शकतात आणि त्यांना पाहिजे ती कोणतीही वस्तू आपल्याला विकू शकतात. मग ते उत्पादन असेल किंवा राजकारणी.

जनतेवर अशा पद्धतीने पाळत ठेवण्याच्या (बायोमेट्रिक देखरेख) पद्धतीमुळे केंब्रिज अ‍ॅनालिटक्सची डेटा हॅकिंगची युक्ती पाषाण युगातील युक्तीसारखी भासते. २०३० मध्ये उत्तर कोरिया कसा असेल याची कल्पना करा, जेव्हा प्रत्येक नागरिकाला २४ तास बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे लागेल. जर आपण महान नेत्याचे भाषण ऐकले आणि त्याच्या सांगण्यानुसार रोगाची लक्षणे सांगणारे ब्रेसलेट परिधान केले तर संपलेच म्हणायचे!

आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते उपाय म्हणून आपण निश्चितपणे बायोमेट्रिक पाळत ठेवू शकतो. एकदा का आणीबाणी संपली की, अशा पद्धतीने पुढे नजर ठेवणेही बंद होईल. परंतु तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये आपत्कालीन परिस्थितीची सवय दडून राहिलेली असते, विशेषत: क्षितिजावर नेहमीच नवीन आणीबाणीची चाहूल लपून राहिलेली असते. माझ्या इस्त्राईल देशाने, उदाहरणार्थ, १९४८ साली स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी आणीबाणीची परिस्थिती घोषित केली होती. त्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये प्रेस सेन्सॉरशिप आणि जमीन जप्त करण्यापासून ते पुडिंग बनवण्यापर्यंत विशेष निर्बंध घालून देण्यात आले होते. स्वातंत्र्ययुद्ध जिंकून बराच काळ लोटला आहे, पण त्यानंतर इस्त्रायलवर कधीही आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याची वेळ आली नाही. परिणामी, १९४८ मधील अनेक ‘तात्पुरते उपाय’ रद्द करण्यात इस्त्रायल अपयशी ठरला (आणीबाणीच्या काळात पुडिंग बनवण्यावर असणारे निर्बंध २०११ मध्ये मोठ्या उदारपणाने वटहुकूमाद्वारे हटवण्यात आले).

करोना विषाणूपासून होणारा संसर्ग शून्य इतका खाली आलेला असतानाही, काही डेटा भुकेल्या सरकारांना बायोमेट्रिक पाळत ठेवणारी यंत्रणा अजूनही कार्यरत ठेवायची आहे. याबाबत बचाव करताना ही सरकारे ‘करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो किंवा मध्य आफ्रिकेत नवीन इबोला विषाणूचा संसर्ग वाढत आहे,’ असा युक्तिवाद करतात किंवा  इतरही अजून काही... तुम्ही याची कल्पना करू शकता. गेल्या काही वर्षांपासून आमच्या खाजगी जीवनातील गोपनीयतेसाठी आमचा मोठा लढा चालू आहे. करोना विषाणूचे संकट या लढ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. जेव्हा लोकांना गोपनीयता आणि आरोग्यामध्ये निवड करण्याचा पर्याय दिला जातो तेव्हा ते सहसा आरोग्य निवडतात.

साबणरूपी पोलीस

लोकांना गोपनीयता आणि आरोग्य यापैकी एक पर्याय निवडायला सांगणे, हेच समस्येचे मूळ आहे. कारण ही एक चुकीची निवड आहे. आम्ही गोपनीयता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकतो आणि आम्हाला हा दोन्ही प्रकारचा आनंद मिळायला हवा. निरंकुश पाळत ठेवणारी यंत्रणा स्थापित करून आम्ही आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकत नाही. करोना विषाणूमुळे पसरणाऱ्या महामारीपासून बचाव करायचा आणि आपले आरोग्य जपायचे, तर नागरिकांना सक्षम बनवणे गरजेचे आहे.

गेल्या काही आठवड्यांत करोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराला साथीचा रोग ठरवण्यासाठी जर कुणी यशस्वी प्रयत्न केले असतील, तर ते म्हणजे द. कोरिया, तैवान आणि सिंगापूर यांनी. या देशांनी ट्रॅकिंग अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर तर केलाच. पण त्याचबरोबर व्यापक चाचण्या, प्रामाणिकपणे अहवाल देणे आणि योग्य ती माहिती देण्यासाठी तयार असलेल्या सुजाण लोकांचे सहकार्य, यावर या देशांचे यश अधिक अवलंबून आहे.

हितकारक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी केंद्रीकृत देखरेख आणि कठोर शिक्षा हाच एक मार्ग नाही. जेव्हा लोकांना वैज्ञानिक वास्तव सांगितले जाते आणि जेव्हा लोक सार्वजनिक अधिकाऱ्यांनी त्यांना हे वास्तव सांगावे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा आणखी मोठ्या यंत्रणेने लक्ष न ठेवताही सामान्य जनता योग्य गोष्ट करू शकते. स्वयंप्रेरित आणि चांगली/योग्य माहिती असणारी जनता पोलीस आणि अज्ञानी लोकसंख्येपेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि प्रभावी असते.

उदाहरणार्थ, साबणाने आपले हात धुण्याचा विचार करा. ही छोटीशी कृती मानवी स्वच्छतेमध्ये आजपर्यंतची सर्वांत मोठी प्रगती ठरली आहे. या साध्या क्रियेमुळे दरवर्षी लाखो लोकांचे जीव वाचतात. हात धुण्याची ही क्रिया आपण गृहित धरलेली असली, तरी १९ व्या शतकात शास्त्रज्ञांना साबणाने हात धुण्याच्या क्रियेचे महत्त्व समजून आले आहे. याआधी अगदी डॉक्टर आणि नर्सेसही (परिचारिका) हात न धुता एका शस्त्रक्रियेनंतर दुसरी शस्त्रक्रिया करायचे. आज दररोज कोट्यवधी लोक पोलीसरूपी साबणला घाबरतात म्हणून नव्हे, तर वस्तुस्थिती समजल्यामुळे आपले हात धुतात. मी साबणाने माझे हात धुतो कारण मी विषाणू आणि जीवाणूंविषयी ऐकले आहे. मला समजले आहे की, या छोट्या जीवांमुळे आजार होतात आणि साबण त्यांना काढून टाकू शकतो, हे मला माहीत आहे.

परंतु अशा स्तरावर मान्यता आणि सहकार्य मिळवण्यासाठी तुमचा विश्वास असणे आवश्यक आहे. आताच्या घडीला लोकांनी विज्ञानावर विश्वास ठेवण्याची, सार्वजनिक अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याची आणि माध्यमांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बेजबाबदार राजकारण्यांनी विज्ञानावर, सार्वजनिक प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर विश्वास ठेवणे जाणीवपूर्वक कमी केले आहे. योग्य गोष्टी करण्यासाठी आपण फक्त जनतेवर विश्वास ठेवू शकत नाही, असा युक्तिवाद करत याच बेजबाबदार राजकारण्यांना यानिमित्ताने आपल्या एकाधिकारशाहीचा मार्ग प्रशस्त करण्याचा मोह होऊ शकेल.

सामान्यत: वर्षानुवर्षे नष्ट झालेला विश्वास एका रात्रीत पुन्हा कमावता येत नाही. परंतु ही सामान्य वेळ नाही. संकटाच्या एखाद्या क्षणी आपली मनेसुद्धा पटकन बदलू शकतात. आपण अनेक वर्षांपासून आपल्या भावंडांशी कटु वाद घालत असतो, परंतु जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेव्हा आपल्याला अचानक भावंडांबद्दलचा लपलेला विश्वास आणि प्रेमळपणा पुन्हा गवसतो आणि आपण एकमेकांना मदत करण्यासाठी धावतो. जनतेवर पाळत ठेवण्याची व्यवस्था तयार करण्याऐवजी विज्ञानावर, सार्वजनिक अधिकाऱ्यांवर आणि माध्यमांवर लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यास उशीर होणार नाही.

आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहिजे, परंतु या तंत्रज्ञानाने नागरिकांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. मी स्वत: माझ्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांच्यावरील देखरेखीच्या बाजूने आहे, परंतु त्या माहितीचा वापर सर्व-शक्तिशाली सरकार तयार करण्यासाठी करण्यात येऊ नये. जमा करण्यात आलेल्या या माहितीच्या आधारे मला अधिक माहितीपूर्ण वैयक्तिक निवड करण्यास सक्षम करण्यात आले पाहिजे आणि सरकारला त्याच्या निर्णयांसाठी जबाबदार धरता आले पाहिजे.

जर मी दिवसाचे २४ तास माझ्या स्वतःच्या वैद्यकीय स्थितीवर लक्ष ठेवू शकलो, तर मी इतर लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय की नाही हे माझे मलाच समजेल. तसेच माझ्या आरोग्यावर कोणत्या सवयींचा परिणाम होतो, हेसुद्धा जाणून घेणे शक्य होईल. जर करोना विषाणूच्या प्रसाराबद्दल विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध झाल्यास आणि त्याचे विश्लेषण मी करू शकलो, तर सरकार मला सत्य सांगत आहे की नाही आणि साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी योग्य धोरणे अवलंबत आहेत की नाही हे मी ठरवू शकेन. लोक जेव्हा पाळत ठेवण्याबद्दल बोलतात, तेव्हा समान पाळत धोरण म्हणजे केवळ सरकारने प्रत्येक नागरिकावर नजर ठेवायची असे नाही, तर प्रत्येक व्यक्तींकडून सरकारचे निरीक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले पाहिजे.

करोना विषाणूमुळे पसरलेली महामारी ही अशा प्रकारे नागरिकतेची एक मोठी चाचणी आहे.  पुढील दिवसांमध्ये, आपल्यापैकी प्रत्येकाने निराधार षडयंत्र सिद्धांत आणि स्वत:ची टिमकी वाजवणाऱ्या राजकारण्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहिती आणि आरोग्य सेवा तज्ज्ञांवर विश्वास ठेवायला हवा. योग्य निवड करण्यात आपण अपयशी ठरलो, तर आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असा विचार करून आम्ही कदाचित आपल्यासाठी सर्वात मौल्यवान असणाऱ्या स्वातंत्र्यावरच जणू स्वाक्षरी करतो आहोत.

आम्हाला जागतिक योजनेची आवश्यकता आहे

आपण सामना करत असलेल्या गोष्टींपैकी दुसरी महत्त्वाची निवड म्हणजे राष्ट्रवादी अलगाव आणि जागतिक एकता. रोगाची साथ आणि यामुळे उद्भवणारे आर्थिक संकट या दोन्ही जागतिक समस्या आहेत. केवळ जागतिक सहकार्याने या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण केले जाऊ शकते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषाणूचा खात्मा करण्यासाठी आम्हाला जागतिक स्तरावर माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे माहितीची देवाण-घेवाण विषाणूचा सामना करताना मनुष्यासाठी फायद्याची ठरू शकते. चीनमधील करोना विषाणू आणि अमेरिकेतील करोना विषाणू मानवांना संक्रमित कसे करावे, याबद्दलची माहितीची देवाणघेवाण करू शकत नाहीत. परंतु चीन अमेरिकेला करोना विषाणूबद्दल आणि या विषाणूला कसे सामोरे जायचे, याबद्दल अनेक मौल्यवान धडे देऊ शकते. करोना विषाणूवर एका इटालियन डॉक्टरने पहाटे मिलानमध्ये केलेल्या संशोधनामुळे कदाचित संध्याकाळपर्यंत तेहरानमध्ये कुणाचा जीव वाचवणे शक्य होईल. जेव्हा यूके सरकार अनेक धोरणांपैकी नेमके कोणते धोरण राबवायचे याबाबत साशंक असते किंवा का-कू करत असते, तेव्हा ते एक महिन्यापूर्वी अशाच समस्येशी झुंजणाऱ्या कोरियावासियांशी सल्लामसलत करू शकतात. परंतु असे होण्यासाठी जागतिक सहकार्य आणि विश्वासाच्या भावनेची आपल्याला गरज आहे.

जगातील विविध देशांनी उघडपणे या विषाणूबद्दलची माहिती एकमेकांना दिली पाहिजे आणि नम्रपणे सल्ला घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे. वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी आणि या उपकरणांच्या वितरणासाठी जागतिक प्रयत्नांचीदेखील आपल्याला आवश्यकता आहे, विशेषत: तपासणी (टेस्टिंग) आणि श्वसन यंत्रांची. प्रत्येक देशाने या उपकरणांची निर्मिती स्थानिक पातळीवर करण्याऐवजी आणि मिळणारी कोणतीही उपकरणे जमा करण्याऐवजी समन्वयित जागतिक प्रयत्न केल्यास अशा उपकरणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता येईल. तसेच या जीवनावश्यक उपकरणांचे वितरण अधिक सुयोग्यपणे होईल, याची खातरजमा करून घ्या. एखाद्या युद्धाच्या वेळी कोणतेही देश जसे प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयकरण करतात, त्याचप्रमाणे कोरोनाविरुद्ध मानवी युद्धासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण उत्पादने ‘मानवीय’ करण्याची आवश्यकता असू शकते. करोनाची काही प्रकरणे असणाऱ्या श्रीमंत देशांनी ज्या गरीब देशात या रोगाचे अनेक रुग्ण आहेत, त्यांच्या मदतीसाठी मौल्यवान उपकरणे पाठवण्यास तयार असले पाहिजे. असा विश्वास हवा की, नंतर जेव्हा त्या देशाला मदत हवी असेल, तेव्हा इतर देश त्याच्या मदतीला येतील.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य करोनाबाधित देशांना पुरवण्याच्या अशाच एका जागतिक प्रयत्नावर आपण विचार करू शकतो. या रोगाने सध्या कमी प्रभावित असणारे देश आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अशा बाधित देशांना मदत करण्यासाठी आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मौल्यवान अनुभव मिळवता यावा यासाठी तिथे पाठवू शकतात. नंतर जर या रोगाची साथ अशा देशांमध्येही पसरली, तर ही वैद्यकीय मदत उलट दिशेने वाहू शकते.

आर्थिक आघाडीवरही जागतिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळ्यांचे जागतिक स्वरूप पाहता, जर प्रत्येक सरकार स्वत:चे काम इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून करत असेल तर त्याचा परिणाम अनागोंदी माजून एक गंभीर आर्थिक संकट उभे राहण्यात होईल. आम्हाला जागतिक कृती योजनेची आवश्यकता असून आम्हाला त्याची तातडीने गरज आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे जागतिक प्रवास. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास काही महिन्यांकरिता थांबवणे हे प्रचंड त्रासदायक असून करोनाविरुद्धच्या युद्धात बाधा आणेल. करोनाग्रस्त देशांनी कमीत कमी आवश्यक प्रवाशांना सीमा ओलांडू देण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, जसे की- वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी, व्यावसायिक इत्यादी. प्रवासी त्यांच्या मूळ देशाद्वारे पूर्व-तपासणी करूनच जागतिक प्रवासावर निघू शकतात. जर आपल्याला माहीत असेल की, काळजीपूर्वक स्क्रीनिंग केलेल्या प्रवाशांनाच विमानात परवानगी आहे, तर आपण त्यांना आपल्या देशात स्वीकारण्यास तयार असू.

दुर्दैवाने, सध्या करोनाबाधित देश यापैकी फारच मोजक्या गोष्टी करताना दिसतात. हा विषाणू म्हणजे जणू काही एका सामूहिक पक्षाघाताने आंतरराष्ट्रीय समुदायाला वेढले आहे. या प्रकरणात कोणीही जबाबदार नेतृत्व असल्याचे पाहायला मिळत नाही. जगावर ओढवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसाधारण कृती योजना सादर करणारी जागतिक नेत्यांची आणीबाणी बैठक आठवड्यांपूर्वीच पार पडायला हवी होती. ‘जी-७’ नेत्यांनी या आठवड्यात केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली, पण त्याची परिणती कोणत्याही प्रकारच्या ठोस योजनेत झालेली पाहायला मिळाली नाही.

२००८ साली उद्भवलेले आर्थिक संकट आणि २०१४ मधील ‘इबोला’ साथीच्या काळात अमेरिकेने जागतिक नेतृत्वाची भूमिका स्वीकारली. परंतु करोनाच्या बाबतीत सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने नेत्याची भूमिका सोडून दिलेली दिसते. मानवतेच्या भविष्यापेक्षाही अमेरिकेच्या महानतेची त्यांना अधिक काळजी आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.

या प्रशासनाने अगदी जवळचे मित्रपक्षही सोडले दिसतात. जेव्हा अमेरिकेने युरोपीयन युनियन (EU) मधून सर्व प्रवासावर बंदी घातली, तेव्हा EU ला आगाऊ सूचना देण्याची तसदीही घेतली नाही. कठोर उपायांबद्दल फक्त EUचा सल्ला घ्या. नवीन कोविड -१९ लसीवरील मक्तेदारी हक्क विकत घेण्यासाठी जर्मन औषधनिर्माण कंपनीला एक बिलियन डॉलरचे आमिष देत त्यांनी जर्मनीची बदनामी केली आहे. सध्याचे प्रशासन अखेरीस बदल घडवून आणत असेल आणि जागतिक कृती योजना घेऊन येत असेल, तरी जो नेता कधीही जबाबदारी घेत नाही, चुका मान्य करत नाही आणि सर्व दोष इतरांवर टाकून श्रेय स्वत: घेतो, अशा नेत्याचे अनुसरण करणारेही काही जण आहेत.

अमेरिकेने सोडलेले नेतृत्वाचे हे अधिकारपद इतर कोणत्या देशाने भरले नाही, तर या साथीला अटकाव करणे कठीण तर होईल, शिवाय पुढील अनेक वर्षं जागतिक स्तरावर सर्वांनाच याचा त्रास होईल. प्रत्येक संकट ही एक संधी असते, असे आपण समजायला हवे. आपण आशा बाळगली पाहिजे की, सध्याच्या साथीच्या रोगामुळे समस्त मानवजातीस जागतिक मतभेदांमुळे उद्भवणाऱ्या तीव्र धोक्याची जाणीव होईल.

आता मानवतेने निवड करणे आवश्यक आहे. आपण मतभेदांच्या मार्गावरून प्रवास करायचा की, जागतिक एकतेचा मार्ग स्वीकारायचा यातून योग्य ती निवड मानवतेला करायला हवी. आपण मतभेद निवडल्यास, हे संकट आणखी लांबणीवर पडेल, परंतु भविष्यात कदाचित आणखी वाईट आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागेल. पण जर आम्ही जागतिक एकता निवडली, तर केवळ कोरोना विषाणूच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि २१ व्या शतकातील मानवजातीला त्रास देणाऱ्या संकटांवरही विजय ठरेल!

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - मिताली तवसाळकर

.............................................................................................................................................

युव्हाल नोआ हरारी यांचा मूळ इंग्रजी लेख ‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये २० मार्च २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 27 March 2020

करोना विषाणू अंगात सापडणे म्हणजे रोगाची लागण होणे नव्हे. उगीच घबराट पसरवली जात आहे.
-गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Wed , 25 March 2020

निव्वळ निव्वळ अप्रतिम!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा