साहिर लुधियानवी - गरीब, शोषितांबद्दल भाष्य करताना, त्यांची दु:ख-वेदना शब्दबद्ध करताना त्याची कडवाहट व शब्दांचे फटकारे धारदार होतात!
पडघम - साहित्यिक
लक्ष्मीकांत देशमुख
  • साहिर लुधियानवी, त्यांची ताजमहलवरील कविता आणि ताजमहल
  • Mon , 09 March 2020
  • पडघम साहित्यिक साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi ताजमहल Taj Mahal

प्रसिद्ध उर्दू शायर साहिर लुधियानवी यांचं जन्मशताब्दी वर्ष कालपासून सुरू झालं. साहिर जरी विचाराने प्रगतिशील लेखक चळवळीच्या तत्त्वज्ञानाच्या जवळ असले तरी ते कधीच कम्युनिस्ट पक्षात सामील झाले नाहीत. त्यामुळे त्यांची शायरी प्रबोधनपर व प्रचारी कधीच झाली नाही. उलट स्वत:च्या ‘नजरे’नं जगाकडे पाहत जे उत्कटतेनं वाटलं ते त्यांनी अभिव्यक्त केलं. पण प्रगतिशील विचारधारा व प्रखर मानवतावाद ही त्यांच्या ‘दिल’ व ‘दिमाग’ दोन्हींनी स्वीकारलेली जीवनमूल्ये होती. ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व अंतरंगात दुधात सारख विरघळावी तशी विरघळलेली होती. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

‘ले दे के अपने पास फक्त इक नजर तो है,

क्यों देखे जिंदगी को किसी नजर से हम’

साहिरचा हा प्रसिद्ध शेर केवळ चमकदार कल्पना नाही, तर त्याची ती खास अशी स्वत:ची साहित्याकडे-कलेकडे पाहण्याची नजर आहे. खरं तर प्रत्येक कलावंताचं कलेबाबतचं तत्त्वज्ञानच या दोन ओळीत साहिरनं प्रभावीपणे मांडलं आहे. मानवी जीवनाची सुख-दु:खं व सामाजिक वास्तव प्रत्येक संवेदनक्षम कलावंताला जाणवत असतं, पण त्याचं मोठेपण तो हे अनुभव कसे स्वत:मध्ये मुरवून घेत त्याला चिंतनाची जोड देत आविष्कृत करतो यावर ठरतं. साहिर मोठा शायर त्याच्या स्वतंत्र वेगळ्या ‘नजरे’मुळे आहे. त्यानं जीवनात जे भोगलं (ते फार तीव्र संघर्षाचं होतं), अनुभवलं (जे फार कमी लोकांच्या वाट्याला येतं), तसंच त्याला प्रतिभेतून स्फुरलं आणि चिंतन व पुरोगामी-माक्सवादी विचारधारेनं पक्व व विशाल सामाजिक झालं, त्यामुळे अवघ्या २३व्या वर्षी प्रकाशित झालेला त्याचा ‘तलखियां’ विलक्षण लोकप्रिय झाला. त्याच्या शायरीनं तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावलं!

‘तलखियां’कडे अनेक अभ्यासक त्याच्यावर पडलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स मुव्हमेंटच्या सर्वहारा वर्गासाठी कलेचा लेखकांनी-कलावंतांनी वापर करावा, या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे व त्याच्या ‘तलखियां’ची समीक्षा केली आहे.

मोहंमद करमान अहसान (येल युनिव्हर्सिटी फुलब्राईट फेलो २०११-१२) यांच्या ‘Prism of Marginalisation : Sahir Ludianvi’s Poetry’ या लेखात त्यानं प्रगतिशील लेखक चळवळीचा पाया साहित्य व एकूणच कलेत सामाजिक वास्तवता (Social Realism) असावा हा होता असं म्हटलं आहे. त्यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे प्रगतीवादी साहित्य हे शोषित, समाजानं नाकारलेले व निम्न स्तरावर व्यवस्थेने ढकललेल्या वंचित, पीडितांच्या जीवनाला उजागर करणारं असलं पाहिजे, तसेच आर्थिक विषमतेचे बळी असणार्‍या ‘नाही रे’ वर्गाच्या लोकांना क्रांतीप्रवण करणारं व लढायला शिकवणारे असलं पाहिजे. हे प्रागतिक साहित्य अभिजन वर्गाचे रंजन करणे या प्रधान हेतू असणार्‍या (तथाकथित) अभिजात साहित्यापेक्षा वेगळे असते. अहसान यांनी लीला गांधींच्या ‘Post Colonial Theory : A Critical Introduction’ या कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेसने १९९८ साली प्रकाशित केलेल्या ग्रंथाचा संदर्भ देत खालीलप्रमाणे साहिरच्या काव्याबाबत सटीक सार्थपणे म्हटलं आहे,

“Sahir’s poetry can be viewed as in the post-colonial prespective as “Intellectual history of post-colonial theory is marked by dialectic between Marxism on one hand, and post structural / post modernism, on the other.”

(“साहिरचे काव्य हे वसाहतोत्तर दृष्टिकोनातून पाहिलं तर तो वसाहतोत्तर सिद्धान्ताचा बौद्धिक इतिहास आहे, जो एका बाजूने मार्क्सवाद तर दुसर्‍या बाजूने आधुनिकोत्तर वादाचे द्वंद्वात्मक उदाहरण ठरेल.’’)

मोहमद करमान अहसाननी असेही निरीक्षण नोंदवले आहे की, साहिरच्या काव्यात साम्राज्यवाद, तळागाळातील लोकांचे संघर्षपूर्ण जगणे, स्त्रीवाद आणि नव वसाहतवादाबाबतचे प्रखर पडसाद उमटलेले दिसतात. साहिरचं काव्य समाजातील वंचित-शोषित व तळागाळाच्या कामगार-शेतकर्‍यांच्या जीवन संघर्षाचे विविध पैलू दाखवतो. त्याचा हा प्रगतिशील अंदाज सुखासीन अभिजात वर्गासाठी निर्माण होणार्‍या रंजन व पलायनवादी साहित्याला धीटपणे आव्हान देताना म्हणतो,

‘मुझ को इसका रंज नही है, लोक मुझे फनकार न माने

फिकर-ओ-सुखन के ताजिर मेरे शेरों को अशआर ना माने’

निदा फाजली यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये साहिरनं म्हटलं होतं,

‘The sublime poetry is that which is reflection of poet’s own ideas and personality. Infact, literature is the expression of reality, that is psychological process. If a poet writes against his own nature, for a particular label, he cann’t be satisfied.’

(“उदात्त काव्य हे कवीच्या कल्पना व व्यक्तिमत्त्वाचे शब्दरूप प्रतिबिंब असते. वास्तविक, साहित्य हे वास्तवांचे प्रकटीकरण असते, व ती एक मानसिक प्रक्रिया असते. जर कवी त्याच्या स्वभावाविरुद्ध एखाद्या लेबलासाठी लिहित असेल तर तो कधीच समाधानी असू शकत नाही.”)

साहिर जरी विचाराने प्रगतिशील लेखक चळवळीच्या तत्त्वज्ञानाच्या जवळ असला तरी कैफी आझमी वा सरदार अली जाफरीप्रमाणे तो कधीच कम्युनिस्ट पक्षात सामील झाला नव्हता. त्यामुळे त्याची शायरी ही प्रबोधनपर व प्रचारी कधीच झाली नाही. उलट स्वत:च्या ‘नजरे’नं जगाकडे पाहत जे उत्कटतेनं वाटलं ते त्यानं अभिव्यक्त केलं. पण प्रगतिशील विचारधारा व प्रखर मानवतावाद ही त्याच्या ‘दिल’ व ‘दिमाग’ दोन्हींनी स्वीकारलेली जीवनमूल्ये होती. ती त्याच्या व्यक्तिमत्त्वात व अंतरंगात दुधात सारख विरघळावी तशी विरघळलेली होती. पण त्यामुळे त्यानं प्रत्येक कवितेत काही त्यानं प्रगतिशील चळवळीच्या जाहीरनाम्याप्रमाणे विचार  व भावना मांडल्या नाहीत, तर मानवी भावनांचंही प्रभावीपणे प्रकटीकरण केलं. काही समीक्षक तर त्याच्या काव्यातील तीक्ष्ण बोचकता, कडवाहट व माणसाची संघर्षपूर्ण बिकट अवस्था यावर अधिक भर असल्याचे तक्रारवजा निरीक्षण नोंदवतात. अशा टीकाकारांसाठी साहिरचं खालील उत्तर किती बिनतोड आहे -

‘हम गमशदा है लाये कहां से खुशी के गीत

देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम’

तरीही त्याच्या शायरीत व फिल्मी गीतांमध्ये प्रगतिशीलता व विशाल मानवतावाद ठसठशीतपणे आढळतो, हे नाकारता येत नाही. खास करून जे गरीब, शोषित आहेत, त्यांच्याबद्दल भाष्य करताना व त्यांची दु:ख-वेदना शब्दबद्ध करताना त्याची कडवाहट व शब्दांचे फटकारे धारदार होतात. त्यामुळेच त्याच्या ‘तलखियां’ हा तरुण प्रेमी व प्रेमभंग झालेल्या तरुणाईप्रमाणेच सामान्य कष्टकर्‍यांनाही प्रिय होता, आपल्या जीवन संघर्षाशी तो जोडला गेला आहे अशीच त्यांनी भावना होती.

ज्या कवितेनं त्याला कवी म्हणून ठसठशीत ओळख दिली ती कविता म्हणजे ‘ताजमहल’ होय. ती ‘तलखियां’मध्ये समाविष्ट आहे. लाहोरला असताना त्यानं १९४०-४१ या कालखंडात ती केव्हा तरी लिहिली असावी. ती ‘आजकल’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाली. त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर ताजमहालचं सुरेख चित्र होतं, मात्र आतील पानावर त्या प्रेमाच्या दंतकथेच्या भोवती असलेल्या मोहक वलयाचं भंजन करणारी साहिरची नज्म होती. ज्यांनी ताजमहल निर्मिला त्या गरीब अनाम मजुरांच्या दृष्टीकोनातून साहिर ताजमहाल पाहतो व त्याला ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक नाही तर एका बादशहानं पैशाच्या मस्तीत गरिबांच्या सच्च्या पवित्र प्रेमाची जीवघेणी थट्टा केली, असं सांगत कवी आपल्या प्रेयसीला ‘कही और मिला कर मुझसे’ असं विनवतो.

ही नज्म प्रसिद्ध झाली आणि तिनं तरुण, गरीब, प्रेम करणार्‍या तरुणाईच्या मनावर जादू केली व ती हजारोंना त्या काळी कंठस्थ झाली. पण त्याच वेळी जुन्या कर्मठ परंपरावादी लोकांना साहिरचा ताजमहालकडे पाहण्याचा दृष्टीकोन तीव्रपणे खटकला. त्यांनी साहिरविरुद्ध एक मोहिमच उघडली. अनेक वृत्तपत्र-मासिकांत शाहीरच्या विरोधात टीकात्मक लेख व संपादकीय पण प्रसिद्ध झाले. पण त्यानं साहिरला एकप्रकारे खुशी होत होती. कारण त्याची ही नज्म लोकांच्या मनाला भिडली होती. बहुसंख्य प्रतिक्रिया अनुकूल पसंतीदर्शक होत्या, तर मूठभरांची नकारात्मक. पण त्यामुळे साहिर हां हां म्हणता अल्पावधीतच ‘स्टार पोएट’ झाला व देशभरातून त्याला मुशायर्‍यासाठी निमंत्रणे येऊ लागली. ‘तलखियां’ प्रसिद्ध झाल्यावर तर विचारूच नका. उर्दू काव्यसृष्टीत पंचविशीच्या आतल्या साहिरची अव्वल शायरात गणना होऊ लागली.

‘ताजमहल’ ही नज्म साहिरच्या प्रगतिशील काव्यप्रकारातली पहिला मैलाचा दगड ठरली. या कवितेत त्यानं प्रभावीपणे रसिकांचं लक्ष प्रेमाचं प्रतीक म्हणून जगतविख्यात असणार्‍या वलयांकित ताजमहल वास्तूच्या दंतकथेकडून ज्यांनी घाम, रक्त आणि अश्रू गाळून ही कब्र बांधली व हात तोडून घेतले व गुमनामीत मिटून गेले, त्या कामगारांकडे व त्यांच्या भावनेकडे लक्ष वळवलं. त्याद्वारे साहिरची कष्टकरी लोकाबद्दलची करुणा व सहवेदना प्रकट करत आपल्या प्रेयसीला हे प्रेममंदिर खचितच नाही म्हणून ‘मेरे मेहबूब, कही और मिला कर मुझसे’ असे सांगत सामान्य गरीब जनतेच्या साध्या पण पवित्र प्रेमाचा जो उद्घोष केला, आणि त्याद्वारे प्रत्ययास येणार्‍या त्याच्या काव्यप्रतिभेला तोड नाही.

‘अनगिनत लोगों ने दुनिया मे महोब्बत की है

कौन कहता है की सादिक न थे जज्बे उनके?

लेकिन उनके लिए तशहिर का सामान नाही

क्यों की वो लोग भी अपनी तरह मुफलिस थे....’

(“जगात असे असंख्य लोकांनी प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमभावना का पवित्र - प्रामाणिक नव्हत्या? पण त्यांच्याजवळ जाहिरात करायला साधनं नव्हती. कारण ते तुमच्या व माझ्यासारखे गरीब, कफल्लक होते...”)

‘ये चमन जार ये जमना का किनारा, ये महल

ये मुनक्कश दर-ओ-दिवार ये महराव ये ताक

इक शहनशाहने दौलत का सहारा लेकर

हम गरिबोंकी महोबत का उडाया है मजाक

मेरे मेहबूब कही और मिला कर मुझसे’

(“जमुनेच्या किनारी असलेला हा बगिचा, हा महल, हे सुशोभित घुमट व कमानी, दारे, छते... एका शहेनशाहने आपल्या संपत्तीच्या आधाराने आम्हा गरिबांच्या प्रेमाची थट्टा केली आहे. म्हणून हे प्रिये मला दुसरीकडे कुठे तरी भेट!”)

प्रेम ही केवळ श्रीमंत व उच्च वर्गाची मिरासदारी नाही, हा या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं व साहिर हा लोकांचा खराखुरा जनकवी झाला. ही कल्पना आजही लोकप्रिय व जनभावनेला फुलारणारी आहे. ‘दिल ही तो है’ या १९६३च्या राजकपूर-नूतन अभिनित सिनेमात तिचा श्रीमंत बाप नायकाला जेव्हा ‘माझ्या मुलीपासून दूर राहा’ अशी चेतावणी देतो, तेव्हा राजकपूर ‘ताजमहल’ कवितेची ‘इक शहेनशाहने दौलत का सहारा लेकर हम गरिबोंकी महोबत का उडाया है मजाक’ ही पंचलाईन वापरून सडेतोड उत्तर देतो.

‘महान’ या १९८३ च्या सिनेमात अमिताब बच्चन झिनत अमनचा नवरा निवडण्याच्या कृतीवर ‘इक औरत ने दौलत का सहारा लेकर, हम मर्दोंकी इज्जत का उडाया है मजाक’ असं उपरोधानं म्हणतो. ‘गझल’ या १९६४ च्या सुनील दत्त-मीनाकुमारी अभिनित सिनेमात ‘ताजमहल’ ही नज्म गीत म्हणून वापरली आहे.

अशा प्रकारे या कवितेनं भारतीय मनमानसावर जबरदस्त स्वरूपाची भूरळ पाडली आहे. मकरंद टिल्लूची भाऊसाहेब पाटकरांची मराठी शायरी वाचनाची सीडी आहे, त्यात ‘ताजमहल’ ही नज्म टिल्लू मोठ्या बहारदारपणे पेश करतात, तेव्हा ही कविता अगदी उर्दू न जाणणार्‍या सामान्य मराठी माणसांच्या मनात किती घर करून बसलीय याची जाणीव होते.

‘ताजमहल’ कवितेची जन्मकथा मोठी रंजक व अफलातून आहे. साहिर तेव्हा लाहोरला राहत होता व त्यानं आग्र्याचा ताजमहल आजवर कधीच पाहिला नव्हता. खरं तर त्या काळात त्याला लाहोरमध्ये जिची कबर आहे, त्या नूरजहांवर कविता लिहायची होती. ही मुघल बादशहा जहांगीरची रूपसुंदर पत्नी होती. तिनं आपली संगमरवरी कबर आपल्या हयातीच बांधली होती. ती आता भग्नावस्थेत आहे. तिचं दर्शन घेतल्यावर साहिरला ‘नूरजहां के मजार पर’ ही नज्म लिहायची होती, पण त्या वेळी त्याची प्रतिभा त्याच्यावर रूसून बसली होती. तेव्हा त्याऐवजी ‘ताजमहल’ ही कविता त्यानं लिहिली. त्याच्या शब्दांत सांगायचं झालं तर, त्यासाठी त्याला आग्र्याला जायची गरज नव्हती. त्यानं मार्क्सचं तत्त्वज्ञान पचवलं होतं व त्याचा भूगोल व इतिहास पक्का होता. त्याला ताजमहाल शहाजहाननं जमुनेच्या किनारी प्रिय दिवंगत पत्नी मुमताज महलसाठी बांधला होता, हे माहीत होतं. तेवढं त्याला पुरेसं होतं!

यातला विनोदाचा भाग सोडला तरी साहिरच्या मनात ताजमहालची निर्मिती कामगारांच्या रक्त व घामातून झाली आहे व त्यांनी पुन्हा अशी बेजोड कलाकृती निर्माण करू नये म्हणून बादशहाने त्यांचे हात तोडले होते. त्यामुळे साहिर इतरांप्रमाणे ताजमहालकडे प्रेमाचं भव्य व अजरामर प्रतीक म्हणून पाहत नव्हता. पण कवितेतून त्यानं जी भावना व्यक्त केली होती, तशीच भावना त्याच्या नज्मच्या आधी त्याच्या कथाकार मित्र कमांडर सय्यद अन्वरनं ‘उफ्क के सीने पर’ या कथेत व्यक्त केली होती. त्यातला विचार होता की, ताजमहल ही वास्तू बादशहाच्या प्रेमाचं प्रतीक नाही, तर गरिबीच्या प्रेमाची थट्टा आहे, जे आपल्या प्रेयसीसाठी पैशांअभावी काही करू शकत नव्हते. साहिरला त्याचा हा विचार मनस्वी आवडला होता आणि तो मनात घर करून बसला होता. हा तोच कालखंड होता, ज्या वेळी साहिर मार्क्सवादानं झपाटून गेला होता. कम्युनिस्टांच्या सहवास व चर्चेनं सोव्हिएट युनियन त्याला समतेचा स्वर्ग वाटत होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्याला ही कविता लिहाविशी वाटली. सय्यद अन्वरच्या भावना आपल्याशा करीत साहिरनं गोटीबंद स्वरूपात सुरेख शब्दकळांच्या सामर्थ्यावर ही अजरामर कविता लिहिली. ती त्याची जन्मभराची ओळख ठरली गेली.

पण हिंदी सिनेसृष्टीत आल्यावर साहिरनं ‘ताजमहल’ या १९६३ च्या प्रदीप कुमार - बीना रॉय अभिनित चित्रपटासाठी गाणी लिहिली. ‘जो वादा किया वो....’, ‘पाव छू ले नो दो....’, ‘जो बात तुझमे है तेरी...’ सारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर त्यातील उत्कट प्रेमभावना व्यक्त करणार्‍या साहिरच्या शब्दकळेमुळे आहेत. त्यानं शहेनशाह शहाजहां व मुमताज महलच्या उत्कट व समर्पित प्रेमाला गीतांद्वारे खूपच सुंदर रीतीने प्रकट केलं आहे. २० वर्षांपूर्वीच्या नौजवान तरणाबांड साहिरला ताजमहलमध्ये कष्टकर्‍यांचे घाम व रक्त गाळलेले दिसत होते, तर वीस वर्षांनी प्रौढवस्थेत त्याला ताजमहल मागचं बादशहाचं प्रेम जाणवत होतं, जे या तीन फिल्मी गीतातून प्रत्ययास येतं. जर तटस्थपणे विचार केला तर ही साहिरच्या विचार व भावनेतील टोकाच्या स्वरूपाची विसंगती नाही का?

पण गौहर रजा या उर्दू कवी व शास्त्रज्ञाला तसं वाटत नाही. साहिरची ‘ताजमहल’ कविता त्या अजोड शिल्पकलेवरची टीका वा प्रेमाच्या प्रतीकाचं भंजन करणारी आहे असं ते मानत नाहीत. त्यांनी एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘‘असं कोण होशोहवासमधला माणूस ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक असणारी शिल्पकृती नाही आणि माझ्या प्रेमाचा त्याच्याशी काही संबंध नाही असं म्हणू शकेल? साहिरनं ही नज्म ताजमहल या भव्य संगमरवरी शिल्पाकृतीच्या पलीकडे नेली आहे. त्यानं वर्णजाणीवेचा विषय या निमित्ताने मांडला आहे व सामाजिक विषमता व शोषणाचा पैलू उजागर केला आहे. कविता जर नीट बारकाईने वाचली तर साहिरनं ताजमहल विरुद्ध एक शब्दही लिहिलेला नाहीय, तर शोषित जनमानसाच्या साध्या पवित्र प्रेमाला ताजमहल बांधण्यासाठी झालेला अफाट खर्च खुपतो व त्याच्या प्रेमाची शहेनशहानं थट्टा केली असं वाटतं...’’

हा साहिरचा ‘तलखियां’मधला ट्रेडमार्क ठरलेला कडवा टीकात्मक आत्मस्वर आहे. त्याला ‘ताजमहल’ ही कविता तरी कशी अपवाद असेल? १९४०च्या सुरुवातीच्या काळात साहिर सभोवतालच्या परिस्थितीनं त्रस्त होता, अस्वस्थ होता. म्हणून त्याला गोड गुलाबी प्रेमाच्या कविता स्फुरत नव्हत्या. दोन असफल प्रेम-प्रकरणं व गरिबीमुळे प्रेमभंगाचा अंतरीचा उदास स्वर आणि जमिनदार बापाच्या जुलूमामुळे गरिबांबद्दलची कणव व मार्क्सवादानं झपाटून जाणं यामुळे लागलेला सामाजिक स्वर या दोहोमुळे तो निखळ प्रेमकविता लिहू शकत नव्हता. तेवढं आर्थिक व मानसिक स्वास्थ्यपण त्याच्याजवळ त्या काळात नव्हतं. (ते जेव्हा हिंदी फिल्मी दुनियेत जम बसला तेव्हा लाभताच ‘ताजमहल’ सिनेमात काही अस्सल निखळ प्रेमगीतं लिहिली.) साहिर म्हणूनच ‘मै चाहू भी तो ‘वाब आवर तराने गा नही सकता’ अशी आपली भूमिका मांडत होता. तोच ‘तलखियां’चा प्रमुख आत्मस्वर होता - ‘ताजमहल’ कवितेसह.

जाता जाता मला एक वैयक्तिक संदर्भ द्यायचा मोह आवरत नाही. मी कॉलेजला असताना या कवितेच्या प्रभावाखाली ‘कही और मिला कर मुझसे’ ही कथा लिहिली होती. त्या कथेत प्रियकराला ताजमहाल परिसरात तिला भेटायचं नव्हतं, पण तिचा आग्रह तिथेच भेटायचा असतो; म्हणून तो तिची तिथे वाट पाहत थांबलेला असतो. पण ती येत नाही. दुसर्‍या दिवशी त्याला कळतं की, ती त्याच्याकडे अधीर मनानं येत असताना, एका ट्रकखाली येते व मरते.... त्याला त्याच्या ‘कही और मिला कर मुझसे’ या विनंतीप्रमाणे तिथं भेटत नाही... आज माझ्याजवळ ही कथा नाहीये. तशी ती नवथर वयातली कच्ची कथा होती. मात्र मी त्या काळी साहिरच्या ‘ताजमहल’सह ‘तलखियां’नं किती झपाटून गेलो होतो, हे सांगण्यासाठी हा वैयक्तिक संदर्भ दिला.

जेव्हा मी पत्नीसह प्रथम ताजमहाल पाहिला, तेव्हा त्याचं सौंदर्य व शहेनशाहचं पत्नीवरचं प्रेम आठवलं, तसंच साहिरच्या या कवितेमुळे ही वास्तू बांधणारे कष्टकरी ‘अनसंग’ हिरो आठवले. माझी साहिरप्रमाणे ताजमहाल न पाहताच लिहिलेली (व फसलेली) कथा आठवली... तसंच ‘ताजमहल’ सिनेमाचं अजरामर गाणं ‘जो वादा किया वो, निभाना पडेगा’ आठवलं. ही प्रेमभावना श्रीमंत - गरीब भेद जाणत नाही, तर केवळ सच्चं प्रेम मागते. तरीही शेवटी मनाला साहिरची मीही लाखो लोकांप्रमाणे ‘आम’ असल्यामुळे अंतिमत: मला उदास भावनाच स्पर्शून जाते.

.............................................................................................................................................

लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

laxmikant05@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा