‘पुन्हा हिंगणघाट मुळीच नाही’ अशी घोषणा सार्थ करण्यासाठी पुरुषांना जास्त वेगाने बदलण्याची गरज आहे!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 17 February 2020
  • पडघम कोमविप हिंगणघाट अॅसिड हल्ला एकतर्फी प्रेम नकार लैंगिकता पुरुषप्रधानता विवाहसंस्था

एका शेतकरी कुटुंबात मुलगी झाली; ते या लेखाचे निमित्त. या कुटुंबाचे मूळगाव दारोडा. ते आहे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या तालुक्यात. काळ पुढे सरकत होता. मुलगी मोठी होऊ लागली. मुलीने शिकावे असे आई-वडिलांना वाटले. तिला शाळेत घातले. ती शिकू लागली. बघता बघता तिने विज्ञान शाखेतील पदवी आणि पुढे तर चक्क पदव्युत्तर पदवी म्हणजे एम.एस.सी. मिळवली. याही पुढे जाऊन ती हिंगणघाट येथील कॉलेजात प्राध्यापिका झाली. फार मोठी कर्तबगारी तिची. या यशाची तुलनाच करायची झाली तर ती मुंबई महानगरीतील पिढीजात श्रीमंताघरी जन्मल्याने काळ्या मातीला हातही न लागलेल्या कुटुंबातील तरुणाने स्वतःचा शाही बंगला सोडून दारोड्यासारख्या गावात स्थलांतर करून उन्हातान्हात बैल जुंपत स्वतः नांगर चालवण्यासारखी शेतीची कामे करू लागण्याच्या चमत्काराशीच करावी लागेल. मुलीच्या या यशाची बातमी झाली नाही. मात्र कुणा विवाहित तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची आणि आठवडाभरात तिची मृत्यूशी चाललेली झुंज संपल्याची ११ फेब्रुवारी, २०२० रोजी वृत्तपत्रात बातमी होणे साहजिक होते. बातमी कळल्यावर कुटुंबाने आक्रोश केला. मृतदेह घरी आणला गेला, तेव्हा भाजून विद्रूप झालेली निपचित मुलगी पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला.

स्वतःच्या गावातील तरुणीचे होरपळलेले शरीर पाहून दारोडा गाव संतापले. तरुणांनी दगडफेक केली आणि मृतदेह आणणारी रुग्णवाहिका गावाच्या वेशीवरच अडवली. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी हैदराबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. व्यथित मुख्यमंत्र्यांनीदेखील खटला वेगाने चालवण्याचा शब्द दिला. इतर मंत्र्यांनी स्त्रियांना सन्मान देणाऱ्या आपल्या संस्कृतीची उजळणी केली. काहींनी त्या तरुणास ‘नराधम’ म्हटले. या देशात पंतप्रधानपद भूषवलेली स्त्री झाली होती, याचा उल्लेख काहींनी केला. महाभारत काळात स्त्रियांचा सन्मान होत असल्याचे कुणी सांगितले. आता पोलीस तपास होईल. दिल्या शब्दानुसार न्यायालयाचा निवाडा लवकर होईल. आरोप सिद्ध होऊन कदाचित त्या तरुणास देहदंडाची शिक्षा होईल. कुणी सांगावे शिक्षा झाल्यानंतर पिडीत स्त्रीचे कुटुंब ‘न्याय मिळाल्याचे समाधान’ व्यक्त करेल.

न्याय म्हणजे नक्की काय?

आरोप सिद्ध होऊन ‘गुन्हेगाराला योग्य शिक्षा झाली’ म्हणजे खरंच न्याय होतो का? गुन्हे करू पाहणाऱ्यांवर दहशत बसते का? गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते का? का न्याय म्हणजे सूड असतो? संशोधन सांगते की, शिक्षांच्या भीतीने गुन्हे थांबत नाहीत, की कमीदेखील होत नाहीत. हा मानवाचा ऐतिहासिक आणि जागतिक अनुभव आहे. परिणामी गुन्हेगारांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना सुधारण्याच्या संधी देण्याकडे आणि तोवर इतरांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना समाजापासून चार हात अंतरावर ठेवण्याचा अनेक देशांचा प्रयत्न चालू आहे.

हिंगणघाट गावातील व्यथित करणाऱ्या घटनेचा जनक आहे एकतर्फी प्रेमात पडलेला तरुण. “मला तुम्ही आवडता. तुम्हाला प्रेमाची मागणी घालतोय. तुमचा विचार काय आहे, ते सांगाल का? वाटल्यास वेळ घेऊन सांगा”, असे संभाषण न करू शकणारा आणि बहुधा मिळालेला अथवा मिळू शकणारा नकार न पचवू शकणारा हा तरुण असणार. स्वतःच्या प्रेमापायी दुसऱ्याचे जगण्यापासून सर्व अधिकार न जुमानण्याची वृत्ती कशी बळावते हे माहीत असो अथवा नसो, ही वृत्ती समाजात बरीच बळावली आहे खरी. त्या वृत्तीने उचल खाल्ली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता अ‍ॅसिड हल्ला केला.

आधी मनात दुसऱ्याचे सगळे अधिकार मी पायदळी तुडवू शकतो असे विचार घोंगावत राहतात, नंतर मनाची घुसमट होते आणि नंतर कृती होते. कृती कधी संपूर्ण शुद्धीवर असताना, तर कधी नशापाणी करून केली जाते. जगाचे माहीत नाही, परंतु हा तरुण आरोपी बहुसंख्याक भारतीय तरुणांपेक्षा वेगळा नाही. त्याला फाशी दिली, तर मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल का? कुणी सांगावे कदाचित कुटुंब दु:खातून सावरले असेल, तर त्यातील एखादी व्यक्ती म्हणेल, “त्याला फाशी देऊन आम्हाला आमची मुलगी काही परत दिसणार नाही. आणखी एका हत्येचे पातक कशाला न्यायाधीशांच्या पदरी बांधायचे? जमले तर त्याला सुधारायची संधी देऊया.”

ही पायवाट अशी असेल?

गेल्या चार-पाचशे वर्षांपर्यंत माणसाचे असणे-नसणे ईश्वराच्या मर्जीवर आहे, अशी माणसांची धारणा होती. तेच विविध धर्मांनी वेगळाल्या भाषेत सांगितले होते. ती धारणा आता बदलली आहे. माणूस केंद्रस्थानी आला आहे. माणसाचे चांगले-वाईट गुण याच समाजातून व्यक्तीपर्यंत पोहोचतात. म्हणून नागरिकांच्या वतीने निवाडा करणाऱ्या न्यायव्यवस्थेला माणूस नष्ट करणारी शिक्षा देणे अवघड होते आहे. परिणामी देहदंडाची शिक्षा देणे आता समाज आणि देशांच्या सुसंस्कृत वर्तनात बसत नाही. परिणामी, गुन्हे मुळातच होऊ नयेत, किमान ते कमी संख्येने असावेत म्हणून काय करता येणे शक्य आहे, याचा अभ्यास जास्त मानवी आणि श्रेयस्कर आहे. नजरेत आलेले समाजातील काही दोष आपण कमी करू शकलो, तर काही गुन्हे आणि प्राण वाचतील. त्यासाठी सारे पूर्वग्रह दूर ठेवून प्रेम, लैंगिकता, मानवी हक्क, स्वतःला जगाचे केंद्र मानण्याची वृत्ती यांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यातून वर्तन सुधाराचे कार्यक्रम आखले गेले पाहिजेत. ते ‘दुरितांचे तिमिर जावो’ अशी मागणी करणाऱ्या ‘पसायदाना’च्या धर्तीवर होईल.

वास्तविक प्रेम या भावनेची अनेक रूपे निरागस वयापासून लहान मुलांच्या अनुभवांचे भाग बनत असतात. कशाची तरी भीती वाटताच आई-बाबाला बिलगणारे मूल, चालायला शिकणारे आणि त्याच्या चालण्याचे कौतुक करणारे आई-वडील, लाडाने आई किंवा बाबाचे होणारे स्पर्श, त्यांच्याशी केलेल्या गप्पा, त्यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी, त्यांच्या सोबतचे भटकणे, खेळणे, चित्रे काढणे, खाणे-पिणे, चित्रपट पाहणे, हट्ट करणे अशा अनेक गोष्टींतून आई-बाबा आणि मुलांचे प्रेम साकारते, व्यक्त होते आणि मुलायम सायीप्रमाणे दाट होते. हे प्रेम मुलाचे जगात येण्याचे, त्याने एकेक करत अनेक गोष्टी शिकण्याचे स्वागत करते. धाकट्या भावाची अथवा बहिणीची काळजी घेणारी भावंडे यांच्यात प्रेम असते, म्हणून तर धाकटे भावंड मोठ्यापेक्षा पटापट शिकते. आई-बाबा खूप पूर्वी आपल्याप्रमाणे लहान होते, हे कळल्यावर त्याला आई-बाबा जास्त चांगले समजतात. आपणही मोठे होणार आहोत याचे भान येते. आई-बाबा आपले कौतुक करताना आनंदतात, कधी प्रेमाने जवळ घेतात, कधी रागावतात, ते आपले असतात, म्हणूनच आपल्याला ते आवडतात. ही प्रेमाची उन्नत अवस्था असते. ही आणि अशी इतर अनेक प्रेमाची रूपे आपण अनुभवत असतो. ‘ढाई अख्खर प्रेम का’ म्हणत प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या कबीराच्या मनातील प्रेमाचा झरा किंवा आविष्कार वेगळाच आहे. प्रेमाच्या प्रत्येक आविष्काराची नजाकत अनुभवायचा आनंद मुलांच्या वाट्याला येईल हे पालकांना पाहता आले, तर नाते किती तरी सुंदर होईल!

लैंगिकतेची चंदेरी किनार असणारे तरुण-तरुणींचे प्रेम हा मानवी प्रेमभावनेचा आणखीन एक आगळा-वेगळा पोत आहे; आविष्कार आहे. तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज प्रत्येक जोडीनुसार भिन्न असते. ‘लैला को मजनू की आँखोसे पाहिलं पाहिजे’, असं म्हणतात. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. माणसागणिक असणाऱ्या प्रेमाच्या विविधतेमुळे कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट, शिल्पे, पेंटिंग्ज यांनी हजारो वर्षे जन्म घेतलेले आढळतात. वयात येताना हुरहूर लावणारे ते आकर्षण कुठल्याशा निमित्ताने खुणावत असते. तरुण वयातील मुला-मुलींना परस्परांबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे, हे समाजाला स्वीकारता आले तर त्यांचा प्रतिसाद मनमोकळा असेल. नाही तर त्यात लपवालपवी असेल. स्वतःचा तरुणपणीचा काळ बारकाव्यांनिशी आठवून काही व्यक्ती छातीवर हात ठेवून असले ‘आकर्षण स्वाभाविक नाही’ असेही म्हणू शकतील. ती मंडळी कॉलेजात जाणाऱ्या आपल्या पोरां-पोरींना ‘कॉलेजात शिकायला जातोस (जातेस), का प्रेमाची थेरं करायला?’ असे उच्चस्वरात झापतीलही. काही ‘पुण्यवंत मनांना’ या आकर्षणाचा स्पर्शही होत नसेल. असे अपवाद एक वेळ नजरेआड करता येतील. परंतु इतर अनेकांचे ‘मी त्यातील नाही’ छापाचे दांभिक वागणे तरुण मुला-मुलींच्या बोलण्या-भेटण्यावर अजूनही अगणित बंधने घालते. परिणामी, लग्नाची वचने दिल्याखेरीज तरुण-तरुणींची साधी मैत्री होणेदेखील अनेकदा दुरापास्त होते. प्रेमात पडल्यावर एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी काही काळ बोलण्यासाठी मामुलीसा एकांत देऊ शकणाऱ्या जागादेखील गजबजलेल्या शहरांत नसल्यात जमा आहेत. त्या वाढल्या तर समाज जास्त सुसंस्कृत होईल.

बदलाच्या मार्गावरील अडथळे

मैत्रीच्या कोणत्या टप्प्यावर आपले प्रेम व्यक्त करावे, ते कसे व्यक्त करावे, व्यक्त केल्यावर नकार मिळाला तर तो कसा पचवावा, हे मुलां-मुलींना नेहमी जमतेच असे नाही. तेच तर ‘दिल की धडकन’चे कारण असते. यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा नकाराचा हक्क मान्य करून मनातील भावना सुसंस्कृतपणे व्यक्त करणे अवघड बनते. वरील प्रकारच्या प्रश्नांची सार्वकालिक आणि व्यक्तिनिरपेक्ष उत्तरे प्रेमाच्या बाबतीत असू शकत नाहीत. वय वाढताना मुला-मुलींची सर्वांगीण समज-उमज वाढावी, असे वातावरण आजूबाजूला असावे, आणि ते तरुणांपर्यंत त्यांच्या वाढीनुसार पोहोचावेदेखील लागते. परंतु त्यासाठी समाजात प्रयत्नपूर्वक बदल घडवावे लागतात.

यातील एक अडसर सध्याची विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था ईश्वरदत्त किंवा निसर्गदत्त असल्याची सामाजिक भावना हा आहे. नीट विचार केला तर ही भावना तर्कसंगत नाही असे पटेल. परंतु असा विचार करता येण्यासाठी या संस्थांचा इतिहास जवळपास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

फार प्राचीन काळी माणूस साधारणपणे ३०-४० व्यक्तींच्या कळपांनी जगत असे. हे कळप वेधी-वेची प्रकारातील असत. प्रत्येक टोळीकडे जमिनीच्या विशिष्ट तुकड्याचा ताबा असे. पहिल्या टोळीला दुसरी एखादी टोळी कधी तेथून हुसकावूनही लावी. काही जण कळप बदलत. अन्नासाठी ते शिकार साधणे आणि फळे, मुळे, कंद वेचत फिरत असत. या काळात अन्नाची साठवणूक आठवड्यापेक्षा जास्त काळ करणे अशक्य असे. कळपात मोजके नर आणि बाकी माद्या व पिल्ले असत. पिल्ले लहान असेपर्यंत आया त्यांची काळजी घेत. नंतर आई-बापाची गरजच नाहीशी होई. थोडक्यात ‘नाते’ हा शब्दच त्या काळाच्या ‘शब्दकोशा’त नव्हता.

विवाहसंस्थेचे वय

माणसाला सुमारे दहा-बारा हजार वर्षांपूर्वी शेतीचे पुन्हा पुन्हा शोध लागत राहिले. हळूहळू वेधी-वेची कळपांची जागा शेतीमुळे स्थिरावलेल्या समाजाने घेतली. माणसाची वणवण संपली. वस्त्या, पाडे, गावे, नगरे वसली. अन्नधान्याची साठवणूक सुरु झाली. शेतीमुळे अनेक कारागिरी कौशल्यांना वाव मिळाला. शेतीसाठी जमीन आणि पाळीव जनावरे गरजेची. या दोन्ही रूपांत संपत्ती आणि तिची मालकी यांची गरज निर्माण होऊ लागली. नगरराज्ये उभारली गेली. अशा वेळी जमीन कसण्यासाठी आणि संपत्ती वाटून घेण्यासाठी ‘आपल्या’ माणसांची गरज निकडीची झाली. त्यातून विवाह ही संकल्पना उमलली. एक स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहविधीचा सर्वात प्राचीन पुरावा मेसोपोटेमिया संस्कृतीकाळातील (सध्याचा इराक) आहे. तो गृहीत धरता विवाहसंस्था सुमारे ४५०० वर्षांची जुनी आहे असे म्हणता येते. या विवाहांना एकपत्नित्व आणि एक पतित्व यांचे मुळीच सोयर-सुतक नव्हते. जन्मलेले प्रत्येक मूल हे टोळीची सभासद संख्या वाढवू शकणारे मूल असे. त्या काळचे विवाह कुणी तरी कुणाची तरी पत्नी किंवा पती आहे एवढेच म्हणत. भारतीय उपखंडात प्राचीन काळी विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहे. त्यातील गांधर्व आणि राक्षस विवाह यांची नावे अनेकांच्या कानावरून गेलेली असावीत. महाभारतात अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन मुली धनुष्याच्या जोरावर भीष्माचार्य पळवून आणतात. भीष्म त्यांच्याशी लग्न करणार नाहीत, हे समजल्यावर त्यातील एक मुलगी ‘पुढच्या जन्मी मी तुझ्या वधाचे कारण होईन’ असा भीष्ममहर्षींना कडकडीत शाप देऊन आत्मदहन करते. ही शिखंडीची कथा पाच पती असूनही कर्णाचा मोह झालेल्या पंच पतीव्रतांमधील द्रौपदीइतकीच आपल्या परिचयाची आहे. महाभारताच्या शांतिपर्वात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग यातील विवाहसंस्थेची वर्णने भीष्म कथन करतात. तोच धागा पकडून विवाहसंस्थेचा इतिहास लिहिणारे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, स्त्री-पुरुषांनी विवाहबाह्य संग न करण्यास सामाजिक मान्यता ही कलियुगाची देणगी आहे. अलीकडे आणखीन एक महत्त्वाचा बदल होतो आहे. तो म्हणजे विवाह जुळवताना अनेकदा मुलीच्याही इच्छेला महत्त्व दिले जाते आणि मुला-मुलींना परस्परपूरकता तपासून पाहण्यास अनेक कुटुंबे संधीदेखील प्राप्त करून देतात.

बदलत्या कुटुंबव्यवस्थेचे भान

अलीकडे सत्तरी पार केलेली अनेक माणसे आजूबाजूला दिसतात. त्यापैकी ग्रामीण भागातील खाऊन-पिऊन सुखी घरांत आई-वडील आणि फक्त सख्खी भावंडेच राहत नसत. आजी, आजोबा, अनेक काका-काकू, त्यांची मुले, काही नातेवाईक, एक-दोन विध्वा स्त्रिया, ओळखीच्या कुटुंबातील कुणी पोरे जोडीला रहात असत. कायम लग्नाची गडबड आणि एखाद्या तरी स्त्रीचे बाळंतपण घरी चालू असे. जिचे लग्न ठरवायचे, तिला काय त्यात विचारायचे, अशीच वृत्ती साधारणपणे असे. बाळंतपणासाठी घरात एक स्पेशल अंधारी खोली असे. बरेचसे पुरुष शेतीची कामे बघत. काही जण शाळेत शिक्षक, दुकान चालविणे, सावकारी, क्वचित सरकारी नौकरी, अशी काही कामे करत असत. स्त्रिया मात्र फक्त घरकाम आणि मुले वाढवणे एवढेच करत. घरकामात जमीन आणि चुली सारवणे, अंगणात सडे घालणे, रांगोळ्या काढणे, जात्यावर धान्य दळणे, स्वयंपाक करणे, मुलांना खाऊपिऊ घालून मोठे करणे, संध्याकाळी स्तोत्रे-प्रार्थना-पाढे संस्कार म्हणून म्हणवून घेणे हे सारे गृहीत असे. घराशेजारील गोठ्यात दोन-चार पाळीव जनावरे असतील, तर त्यांचीही कामे कुणाला तरी करावी लागत. हे असे कुटुंब आजच्या कुटुंबाच्या तुलनेत जंगी मोठे असे. अशा एकत्र कुटुंबांचे काही फायदे आणि बरेच तोटेही असत.

अशा या कुटुंबातील पुरुषसत्ता भक्कम होती. लग्नं जुळवणे, वाटण्या करणे आणि घरातील भांडणे सोडवणे अशा महत्त्वाच्या बाबींचे अधिकार वयोवृद्ध कर्तबगार कुटुंबप्रमुख पुरुषालाच असत. चुकांना शिक्षा फार्मावण्याचा अधिकारही त्याचाच. सारी मालमत्ता अशा पुरुषांच्या नावे असे. तो म्हणजे एकत्र कुटुंबाचा राजा. त्याला एकापेक्षा जास्त पत्नी असणे किंवा त्याचे विवाहबाह्य संबंध गृहीत धरलेले असत. तेव्हा लग्नात अन्नदान किंवा गोदान याप्रमाणे वधूपिता विधिवत कन्यादान करत. कन्यादानाप्रमाणे पुत्रदान सर्रास होत असल्याचे मात्र ऐकिवात नाही. मुलीचे आडनाव तर सर्रास आणि नावही अनेकदा बदलले जाई. हा पायंडा भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात अजूनही पाळला जातो. आडनाव बदलण्याच्या दुज्याभावाचे खापर भारत खंडात होऊन गेलेल्या एकट्या मनु नावाच्या ऋषीवर किंवा स्वर्गाची दारे उघडणाऱ्या कन्यादानाच्या प्रथेवर नाही फोडता येत. जगभरच्या अनेक भिन्न भिन्न प्राचीन संस्कृतींमध्ये हा स्त्री-पुरुष दुजाभाव दिसतो. तसेच, जगभरातच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या नावे स्थावर मालमत्ता कमी असते, अशी काही कूट कोडी स्पष्टीकरण मागत राहतात. जगभरातील पुरुषप्रधानता हे त्यांचे उत्तर आहे का, याचा विचार किमान पुरुषांनी करणे आवश्यक आहे. भारतात अशी एकत्र कुटुंबे आणि त्यांची कुटुंबव्यवस्था गेल्या पन्नास एक वर्षात वेगाने संपत आली आहे.

परंतु ‘सुंभ जाळला तरी पीळ जात नाही’; या उक्तीप्रमाणे पुरुषसत्ताकतेचा पीळ मनामनाला अजून पिरगाळतो आहे. स्वयंपाक करायला मी काय ‘बांगड्या भरल्यात का?’ असा प्रश्न पुरुषी मनात अनेकदा उमटतो. अनेक स्त्रियांनादेखील स्वयंपाक घरात पुरुषांची लुडबुड नको असते. पैसे कमावणे ही अजूनही मुख्यतः पुरुषांची जबाबदारी मानली जात असली, तरी नोकरी, लहान मुले वाढवणे, घराची स्वच्छता, अशा अनेक गोष्टींकडे आता स्त्रिया लक्ष देत आहेत. त्यांच्यावरील श्रमाचा बोझा सर्वसाधारणपणे पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे.

माणसाचे मूल फार परावलंबी असते. त्याला आई-वडील आणि इतर मोठ्यांचे संरक्षण आणि प्रेम पूर्वी ते कदाचित टोळीतील मोठ्यांकडून मिळतही असेल. जन्मणाऱ्या ‘औरस’ मुलांसाठी कुटुंब आणि विवाह संस्थांचा सामाजिक स्वीकार फार उपकारक ठरला असला पाहिजे. त्याच कारणापायी तथाकथित अनौरस मुलांचे आणि घटस्फोटीत पतीपत्नीच्या मुलांचे मात्र फार हाल झाले आणि होत आहेत.

लैंगिकता

असे अनेक अडथळे असूनही लैंगिकतेचा भावनिक आणि शारीरिक पसारा आवरण्याच्या शिक्षणाच्या संदर्भात बहुतांश मुले अनाथ असतात. त्यातल्या त्यात मुलगे तर मुलींच्या तुलनेत कमालीचे अनाथ असतात. मुलां-मुलींच्या परस्पर आकर्षणाचे लैंगिकता हे मूळ कारण आहे. मानवी लैंगिकतेमध्येच तर मानवी अस्तित्वाचे शाश्वत गमक आहे. मुलगे आणि मुली यांची लैंगिकता जरूर भिन्न आहे. पुरुषांतील कामेच्छा फक्त त्याच्या वयाशी निगडीत आहे. वाढत्या वयानुसार ती कमी होते. स्त्रियांमधील कामेच्छेचा संबंध त्यांच्या पाळीच्या चक्राशी, आणि रजोनिवृत्तीच्या काळाशी निगडीत आहे. अर्थात मानसिक ताण-तणाव यांच्यावर अवलंबून असणारी कामेच्छा हा घटक दोघांच्याही बाबतीत लागू पडतो; त्यातही स्त्रीच्याबाबतीत बराच जास्त. संग एकांतात होतो, स्त्रीला मूल झाल्याची मात्र बातमी होते. त्यापायी पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला जास्त मानसिक ताण असतो. बाळंतपण, त्याच्या कळा, झालेले मूल वाढविणे याचा भार आणि त्या भाराचा ताणदेखील स्त्रीवरच जास्त असतो. हे पुरुषांच्या कितीसे लक्षात येते, हा आणखीन एक कूट प्रश्न. कामेच्छा उत्पन्न करणारे स्त्री-पुरुषांतील घटक वेगळे असूनही कामेच्छा आणि लैंगिकता परस्परांसाठी आनंददायीदेखील असू शकते. नव्हे, तशी ती प्रयत्नाने घडवताही येऊ शकते.

मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी परस्परांबद्दल आदर, प्रेम, नकोशी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य उपायांचा वापर आवश्यक आहे. ही गुंतागुंत सांभाळणे न जमल्याने स्त्री-पुरुषांच्या कामेच्छेतील फरक मोकळ्या मनाने स्वीकारणे आजवर अनेकांना अवघड गेले आहे. अजूनही अवघडच जात आहे आणि कदाचित भविष्यातही अवघड जात राहील.

काही शाळांमधून लैंगिकतेचे शिक्षण देण्यासाठी डॉक्टर मंडळींना ‘जबाबदार’ व्यक्ती म्हणून खास बोलावतात. याचा अर्थ, अगणित पालक या संदर्भात बेजबाबदार आहेत असा नाही का होत? अशा पालकांच्या मानसिक प्रगतीची तशी सोयही सहज उपलब्ध नाही. याचे एक कारण आपण लैंगिकतेला ‘न टाळता येणारी अपवित्र गोष्ट’ म्हणून स्वीकारले आहे, हे आहे का? तसे नसते, तर मुलांशी भावनिक नाते जडायला आई-वडिलांना मोठा वाव असल्याने लैंगिक शिक्षण देण्यासाठी ज्ञानी डॉक्टरांपेक्षा पालक जास्त जबाबदार ठरले असते. मोजके अपवाद वगळता असले लैंगिक शिक्षण म्हणजे मानवी ‘पुनरुत्पादन’ या ज्ञानशाखेची डॉक्टरांनी दिलेली कोरडी शास्त्रीय माहिती ठरते. या शिक्षणात अशा शास्त्रीय माहितीपेक्षा मानवी भावनांना कैकपटींनी जास्त महत्त्व जाणीवपूर्वक दिले पाहिजे. असे शिक्षण मुला-मुलींना देण्याकडे एकंदर समाजाचा सध्यादेखील कल दिसत नाही.

काळाप्रमाणे कुटुंब जसे बदलले आहे, तसे विवाहदेखील बदलत आले आहेत. सध्या एकत्र कुटुंबांचे प्रमाण वेगाने कमी होते आहे. शिकताना मुले-मुली अनेकदा एकत्र शिकतात. नौकरीच्या ठिकाणी मुलगे-मुली एकत्र काम करतात. सहाजिकच प्रेम विवाहाचे प्रमाण वाढले आहे. सासू-सासरेही आर्थिकदृष्ट्या परवडत असेल तर स्वतंत्र राहणे पसंत करतात. हे विवाह अनेकदा आंतरभाषिक, आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि काही वेळा तर अंतरराष्ट्रीय असतात. या विवाहातील मान-पान, आहेर-हुंडे यांना मोठी कात्री लागली आहे. प्रमाण कमी आहे परंतु विधिवत धार्मिक लग्नांचे प्रमाणदेखील कमी होते आहे. पती-पत्नी वेगळे घर करून अनेकदा रहातात. ‘सासुरवास’नामक प्रकरण कमी होते आहे. पुरुषही घरातील कामे जास्त प्रमाणात करताना आढळतात. पुरुषप्रधानता थोडी कमी होते आहे. क्वचित प्रसंगी मुली लग्नानंतर स्वतःचे नाव आणि आडनाव बदलत नाहीत. थोडक्यात कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था बदलत आहेत. स्त्रियांदेखील पुरुषप्रधान कुटुंबात जन्मत आणि वाढत असल्याने स्त्रियांच्या मनात पुरुषप्रधानता मुरलेली दिसते. ती देखील सावकाशीने कमी होते आहे. त्याबाबत पुरुषांना बदलणे तुलनेने जास्त अवघड जाते आहे.

या व्यवस्थांचा इतिहास मुला-मुलींपर्यंत पोहोचून लैंगिकता आकळण्यासाठी आणि पुरुषप्रधानता कमी होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. हे शिक्षण औपचारिक असण्याची गरज काही अंशी आहे. परंतु ते अनौपचारिकपणेसुद्धा घराघरांतून होऊ शकते. सतीप्रथेला प्रथम विरोध राजाराम मोहन रॉय या पुरुषाने केला होता; जोतीबा फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पहिला पाठ गिरवला होता; विधवाविवाहांना मान्यता मिळावी आणि मुलींना शिक्षण मिळावे म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अपार कष्ट उपसले होते; आणि ‘हा विवाह मान्य नाही’, असे म्हणत अनेक स्त्रियांनी घटस्फोटास मान्यता मिळवली आहे. माणसाचे आयुष्य कधीच प्रश्न विरहित नसते. अनेक गुंतागुंतींना तोंड देत प्रत्येक पिढीची परिपक्वता वाढत आणि बदलतही असते. त्यात घरांतील वातावारण, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि साहित्य, कला, मनोरंजन, समाजमाध्यमे यांची संस्कृती अशा अनेक मार्गांनी देखील परिपक्वता घडत असते. ती मनात उतरली तर आताही पुरुषांना मनातील पुरुषप्रधानता घालवणे शक्य आहे. त्यामुळे मुलींच्या ‘नकाराच्या अधिकाराची’ जपणूक होईल. मुलगी झाल्याचा मुलगा झाल्याइतकाच आनंद होईल. तिचे अधिकार जपले गेले, तर मुलगी, बहिण, पत्नी यांना कोणी जाळणार नाही, की अ‍ॅसिड टाकून विद्रूप आणि जखमीही करणार नाही. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’, या घोषणेप्रमाणे ‘पुन्हा हिंगणघाट, मुळीच नाही’ अशी घोषणा सार्थ करण्यासाठी पुरुषांना जास्त वेगाने बदलण्याची गरज आहे. ते जमले नाही, तर मात्र आहेच ‘येरे माझ्या मागल्या’ छापाच्या बातम्यांचा क्रूर रतीब. तो हिंगणघाट घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून चालू आहेच. मुलीच्या पालकांनादेखील मुलगी झाली-गेली विसरून आयुष्य पुढे रेटणे भाग पडते आहे, पडणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......