विद्या बाळ : ‘प्रेरणा आणि आधार’ देणारी व्यक्ती
संकीर्ण - श्रद्धांजली
संध्या टाकसाळे
  • विद्या बाळ (१२ जानेवारी १९३७ - ३० जानेवारी २०२०)
  • Sat , 01 February 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली विद्याताई आणि...Vidyatai Aani…विद्या बाळVidya Bal मिळून साऱ्याजणी Miloon Saryajani स्त्री मासिक Stri Masik

कॉलेजचं वय म्हणजे पटकन प्रभाव पडण्याचं वय. कुणालातरी हिरो मानायचं वय. 

पहिल्याच दर्शनात  हिरो म्हणून जी व्यक्ती मनावर ठसली तिचं हिरोपण जराही न ढळता ते पार ‘अंत्यदर्शना’पर्यंत टिकलं, असं किती दुर्मीळ वेळा घडतं नाही? अगदीच विरळा. विद्याताईंबद्दल मात्र ते घडलं. काल त्यांचं शेवटचं दर्शन घेताना, मला त्यांचं पहिलं दर्शन आठवलं. 

४२ वर्षांपूर्वी, मी लकडीपुलाच्या जवळ उभी होते. एक साडीवाली, भर्रकन वेगानं आणि डौलात टिळक रोडकडे स्कूटरवरून गेली. काय जबरदस्त झपाटा, तडफ त्या जाण्यात होती. मी मान मोडेपर्यंत तिकडे बघत बसले. जवळ उभी असलेली पटकन म्हणाली, “त्या ना, विद्याताई बाळ. ‘स्त्री’ मासिकाच्या संपादक.” अगदी त्या क्षणी, हिरो म्हणून ठसल्याच त्या मनावर! ‘स्त्री मासिक’, ‘संपादक’ आणि ‘स्कूटर’ या तीनही गोष्टींना प्रचंड वलय होतं ७७ सालात. 

पुढे मग एक दिवस, थेट त्यांच्या ऑफिसात त्यांच्या समोरच जाऊन उभी राहिले आणि म्हणाले, “माझं जर्नालिझमचं शिक्षण पूर्ण झालंय. मला ‘स्त्री’ मासिकात काम करायचंय.” नेहमीसारख्या त्या गोड हसल्या आणि म्हणाल्या, “मासिकातर्फे एक महिला उद्योजक शिबिर भरवतो आहोत, दोन दिवसांचं. त्याला ये आणि त्याचा वृत्तांत तयार कर. मग बघू.”

पुढच्या काही महिन्यांतच मग मी ‘स्त्री’ मासिकात उपसंपादक म्हणून रुजू झाले. “मुकुंदराव किर्लोस्करांनी तुझ्या नेमणुकीला मान्यता दिली आहे.” हे त्यांच्या सुंदर वळणदार हस्ताक्षरातलं पत्र आजही एक ठेवा म्हणून मी जपून ठेवलं आहे. 

तेव्हापासून विद्या बाळ आणि किर्लोस्कर मासिकं यांच्याशी पुढची दहा वर्षं मी जोडले गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा मोठा पगडा माझ्यावर पडला. पहिल्याच नोकरीचे अतिशय हृद्य दिवस होते ते! कामासाठी समोर विस्तीर्ण पट दिसत होता. दलित आणि बंडखोर साहित्य, तेंडुलकरांची नाटकं, विषमता निर्मूलन सारख्या बाबा आढावांच्या चळवळी, युक्रांद यांनी वातावरण ढवळून निघालेलं होतं.

विद्याताई त्यावेळी ‘स्त्री’ मासिकात असणं यालाही महत्त्व होतं. स्त्री-पुरुष समानता आणि स्त्रियांची चळवळ यासाठी १९७५ ते १९८५ हा कळीचा कालखंड होता. कारण महिला दशक म्हणून ते जाहीर झालं होतं. स्त्री आणि किर्लोस्कर ही मासिक मुळात पुरोगामी होती. विद्याताई स्वतः या काळात खूप बदलल्या. परिवर्तनवादी विचारांकडे त्या पूर्णपणे ओढल्या गेल्या ते याच दशकात. आगरकरांचे विचार, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी केलेलं काम, यातून त्यांच्या स्त्री-मुक्तीच्या कल्पना आकार घेत होत्या. त्यात महिला दशकाच्या निमित्तानं झालेल्या, नैरोबीसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे जागतिक संदर्भ या विचारांना मिळाले. त्यांच्या भूमिका पक्क्या होत गेल्या. मला आठवतंय, १९८०मध्ये नैरोबीहून आल्यावर तिथला वृत्तांत त्यानी रंगवून सांगितला होता आणि आम्हीही आधाशासारखा तो कानात साठवला होता. 

विद्याताईंचं वैशिष्ट्यं आणि वेगळेपण हे की, बाहेर जे काही घडत होतं किंवा त्यांच्या वाचनामधून जे विकसित होत होतं, ते सगळं त्यांनी मासिकात आणलं. त्याला आकार दिला, दिशा दिली. त्या काळात हे काम खूप महत्त्वाचं होतं. ‘स्त्री’ मासिक अधिक समृद्ध झालं. नव्या आकांक्षा आणि भरारी घेण्याची स्वप्न बघणाऱ्या  स्त्रियांसाठी ‘स्त्री’ मासिक ‘आपलं माणूस’ झालं. काचणाऱ्या जुनाट रूढी आणि प्रथा यामुळे अनेकींची घुसमट होत होती. त्यांना वेदना आणि अनुभव मांडण्यासाठीही व्यासपीठ मिळालं. एकमेकींशी जोडून घेण्याची संधी मिळाली आणि श्वास मोकळा झाला. 

स्त्रियांचे अनुभव अतिशय महत्त्वाचे आहेत असं विद्याताई नेहमी म्हणायच्या. त्या अनुभवांना, अनुभवांतून उमललेल्या कथांना त्यांनी  स्त्री काय किंवा मिळून साऱ्याजणी काय, याठिकाणी आवर्जून स्थान दिलं. त्यातली वाचनीयता, काळाची गरज त्यानी अधोरेखित केली. अशा वेळी, या कथांचं साहित्यिक मूल्य काय हा प्रश्न त्यांनी वरचढ होऊ दिला नाही. कारण तो अनुभव म्हणून सच्चा असे. असं व्यासपीठ मिळणं हे स्त्री चळवळीला घसघशीत योगदान होतं. 

विद्याताई स्वतः अत्यंत चाकोरीबद्ध, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या होत्या. त्यांना या स्त्रिया काय म्हणू बघतायत ते जाणवत होतं. म्हणूनच त्यांना त्या समजून घेऊ शकल्या, आधाराचा हात देऊ शकल्या. किती जणींना त्यानी प्रेरणा दिली त्याची गणतीच नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच, ‘प्रेरणा आणि आधार’ देणारी व्यक्ती गेल्याची भावना कित्येक जणांनी बोलून दाखवली; समाज माध्यमांवर लिहिली ते काही उगाच नव्हे. 

मासिकामधून, पत्रातून, सभांमधून, प्रत्यक्ष भेटीतून किती किती जणींना त्यांनी हा भक्कम आधार दिला. आश्वस्त करणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. स्वतः भोवतीचा कोष फोडून, त्यातून बाहेर येऊन काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांनी दिली असं सांगणारेही प्रचंड हात वरती येतील याची मला खात्री आहे. महाराष्ट्रबाहेरही त्यांचा हा लौकिक होता. इतर भाषांमध्ये लिहिणाऱ्या कित्येक लेखिका पुण्यात आल्या की, त्यांना आवर्जून भेटत, हे मी स्वतः बघितलेलं आहे. काही वेळा त्यांना विद्याताईचं घर दाखवायलाही घेऊन गेले आहे. 

विद्याताई अनेक गोष्टींसाठी ओळखल्या जातात. मोठं काम त्यानी उभं केलंय. त्या सगळ्याच्या मुळाशी बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांचे हरतऱ्हेचे प्रयत्न होते. पण त्यातली मुख्य आणि गाभ्याची गोष्ट कोणती? तर त्यांची संवाद साधण्याची आस. संवाद साधणं, समजून घेणं आणि आपल्याला पटलेल्या गोष्टी समजावून सांगणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कळीचा गाभा होता. त्यांच्या संपादकीयाचं नाव ‘संवाद’ असणं हा काही योगायोग नव्हे. ‘स्त्री’मध्ये असताना त्या नेहमी म्हणायच्या की रोज येणारं टपाल आणि पत्र हा माझा प्राणवायू आहे (ई-मेलचा जन्मच काय पण ती कल्पनाही अस्तित्वात नव्हती तेव्हा.) त्या वेळी ही पत्रं नीट वाचून त्यांना जिव्हाळ्यानं आणि सविस्तर उत्तर देणं हा त्यांच्या आनंदाचा भाग असे. आज कित्येकांकडे विद्याताईंच्या हस्ताक्षरातली अशी खास पत्रं असतील. विविध प्रकारची पत्रं येत त्यांना! कथा, लेख याविषयीची तर होतीच पण बाजूचं वास्तव, आपल्यातले बदल, स्वतःचे अनुभव असं वाचक लिहून कळवत. पत्रलेखक आपलं मन मोकळं करत.

‘नारी समता मंच’च्या स्थापनेनंतर त्यांच्यातल्या संपादकाला कार्यकर्त्याची जोड मिळाली आणि हा संवाद नुसता लेखानापुरता न राहता प्रत्यक्ष सुरु झाला. ‘बोलत्या व्हा’ हे स्पीक-आऊट सेंटर आणि नंतर ‘पुरुष-संवाद’ची स्थापना ही मोकळ्या संवादासाठी सुरु झालेली केंद्र विद्याताईंचा संवादावरचा असलेला विश्वास अधोरेखित करणारीच आहेत.

त्यांचं लिहिणं, बोलणं, गप्पा मारणं, सगळंच प्रभाव पाडणारं. व्यासपीठावरून तर अशा बोलायच्या की, त्यांचा युक्तीवाद पटायचाच.

स्त्रीवाद स्त्रीमुक्ती याविषयी समजापेक्षा गैरसमजच अधिक होते त्या वेळी. (आत्ताही काही फार बदल झालेला नाही). स्त्री-प्रश्न, कुटुंबातली लोकशाही, समानता अशा चर्चा विद्याताई शांतपणे करायच्या. माणूसपणावर त्यांचा अफाट विश्वास होता, हेही त्यामागचं एक कारण आहे. त्यांच्या बोलण्यात, लेखनात भाषणात विलक्षण ठामपणा होता विचारांची स्पष्टता होती पण कर्कशपणा आणि एकारलेपणा यांचा लवलेशही नव्हता.

संवाद हा त्याचा खरा बालेकिल्ला होता तो असा. 

स्त्रीवाद, लिंगसमभाव यांची सैद्धांतिक मांडणी करणाऱ्यांची एक फळी महाराष्ट्रात उभी राहत होती. विद्याताईंनी त्यांच्याशी जोडून घेतलं. एका बाजूला वाचक आणि एका बाजूला अभ्यासक अशा दोन्ही बाजूंना जोडत त्यांचा प्रवास होता. मात्र आपली स्वतःची भूमिका ही कार्यकर्त्यांची आणि संपादकाची आहे, ती अभ्यासकाची किंवा अकॅडेमिक मांडणी करणाऱ्याची नाही, हे त्या नेहमी म्हणत असत. 

ऑगस्ट महिन्यामध्ये ‘मिळून साऱ्याजणी’चा वर्धापन दिन साजरा होतो. आजवरचे अनेक कार्यक्रम खरोखरच संस्मरणीय. केवळ बोलावलेल्या पाहुण्यांमुळे नाही तर विद्याताईंच्या व्यक्तिमत्त्वाची छाप या कार्यक्रमावर असे म्हणून! परस्पर जिव्हाळा आणि सौहार्द यांनी वातावरण ओतप्रोत भरलेलं असायचं. असं एकमेकांशी जोडलेपण खूप कमी समारंभात दिसतं. इथे मात्र पहिल्यापासून तो अविभाज्य भाग होता. खचाखच भरलेल्या सभागृहात लेखक-वाचक,वितरक, सुहृद, शहरी आणि ग्रामीण बाया सगळे विद्याताई नावाच्या एका अद्भुत रसायनानं जोडलेले असत. कार्यकर्त्यांची फळीही तेवढीच तगडी. विषेशतः अलीकडे दिसणारा तरुण पिढीचा वावर खूप सुखद होता. चळवळींकडे तरुण फिरकत नाहीत या पार्श्वभूमीवर तर विशेषच.

आरपार पारदर्शीपणा, साधेपणा आणि बोलावे तसे चालावे हा त्यांचा बाणा होता. 

आयुष्यभर त्या तशा वागल्याच पण शेवटाकडे अत्यंत अवघड वाटणारीही गोष्ट त्यांनी करून दाखवली. 

‘सन्मानाने मरण्याचा हक्क’, ‘सुखान्त’ या गोष्टींचा त्यांनी खूप वर्षांपासून पुरस्कार आणि पाठपुरावा केला. 

तसा कायदा आपल्या हयातीत होणार नाही याची जाणीव त्यांना होती. मात्र केवळ औषधं आणि विविध नळ्या यांच्या आधारानं गुणवत्ता नसलेलं जीवन जगणं त्यांना मान्य  नव्हतं. 

याविषयी बोलणं तसं सोपं असतं पण प्रत्यक्षात वेळ आली की तसा निर्णय घेणं कठीण असतं. विद्याताईंनी आयुष्यभर ज्या निर्धारानं अनेक लढाया लढल्या, त्याच धैर्यानं त्यांनी उपचार नाकारले. किंबहुना त्याचा आग्रह धरून  त्यांनी आपला हक्क शाबूत ठेवला.  

बोलावे तसे चालावे हे स्वतः बाबत त्यांनी खरं केलं. 

‘बोलत्या व्हा’, ‘लिहित्या व्हा’ अशा आवाहनातून कितीतरी मूक शब्दांना त्यांनी आवाज मिळवून दिला.  

पण यापुढे खुद्द विद्याताईंचा आश्वासक आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. 

त्याचे प्रतिध्वनी मात्र सतत उमटतच राहतील. ज्या हजारो जणांना (नुसत्या जणींना नव्हे) त्यांच्यामुळे ‘आवाज’ मिळाला त्यांच्याकडून हा संवाद अखंड चालू राहील.

.............................................................................................................................................

‘विद्याताई आणि... : संवादातून उलगडलेला गृहिणी ते विचारसंपन्न कार्यकर्ती हा प्रवास’ हे अंजली मुळे व आशा साठे यांचं पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5169/Vidyatai-ani

.............................................................................................................................................

लेखिका संध्या टाकसाळे ‘साप्ताहिक सकाळ’च्या माजी संपादक आहेत.

sandhyataksale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......