राज ठाकरेंविषयी सहानुभूती भाबडेपणा ठरेल
पडघम - राज्यकारण
विनोद शिरसाठ
  • राज ठाकरे, मनसेचा ध्वज आणि बाळासाहेब व उद्धव ठाकरे
  • Mon , 27 January 2020
  • पडघम राज्यकारण पडघम राज्यकारण राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना Maharashtra Navnirman Sena बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shiv Sena काँग्रेस Congress राष्ट्रवादी NCP

डिसेंबर २००५मध्ये राज ठाकरे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला सोडचिट्ठी दिली, उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आणि दैवत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना अडचणीत आणलं. शिवाय नव्या स्वतंत्र पक्षाची घोषणाही केली. तेव्हा म्हणजे आजपासून १४ वर्षांपूर्वी ‘साधना’ साप्ताहिकाच्या ३१ डिसेंबर २००५च्या अंकात प्रकाशित झालेला राज ठाकरेंच्या भावी राजकारणाविषयीचा हा संपादकीय लेख... हा लेख तेव्हा ‘युवा अतिथी संपादक’ म्हणून विनोद शिरसाठ यांनी लिहिला होता. परवाच राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महाअधिवेशनात पक्षाचा ध्वज बदलला आणि आपलं राजकारणही. त्याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. पण त्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. का? हा लेख वाचल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं...

.............................................................................................................................................

“हे सगळं मी तुम्हाला अनेकदा परिस्थिती विशद करून सांगितली आहे; परंतु तुम्ही ते मनावर कधीच घेतलं नाही. अनेक प्रेशर्स तुमच्यावर आहेत, हे उघडच आहे. वेळोवेळी मी केलेल्या सूचनांचा तुम्ही आणि उद्धवने अव्हेर केला. इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या एकूण सगळ्या ‘प्रोसेस’मधून मला रीतसर दूर ठेवण्यात आलं. गेली काही वर्षं तुम्ही उद्धव ठाकरेंवर सगळी खैरात केली… कशासाठी हे सगळं? निर्णय तुम्ही घ्यायचाय. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्याकडे लागून राहिलंय. ‘युवर टाइम स्टार्टस नाऊ’!”

या ओळी आहेत २५ डिसेंबर २००५ रोजी लिहिल्या गेलेल्या पत्रातील. ‘ऐतिहासिक मूल्य’ प्राप्त होऊ शकेल असं हे पत्र लिहिलंय राज ठाकरे यांनी, शिवसेनाप्रमुख असलेले आपले काका बाळासाहेब ठाकरे यांना! मूळ पत्रातील या दहा वाक्यांत काय नाही? बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल स्पष्ट नाराजी आहे, अन्याय केल्याची तक्रार आहे, पक्षपात केल्याचा आरोप आहे, आणि त्याहीपुढे जाऊन बाळासाहेबांना कमजोर असल्याची जाणीव करून देऊन निर्वाणीचा इशाराही आहे. वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या, गेली ४० वर्षे इतरांना इशारे देण्याची सवय असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अंगा-खांद्यावर खेळवलेल्या राज ठाकरेंचं पत्र, हा आत्तापार्यंतचा सर्वाधिक घणाघाती हल्ला वाटला असावा; म्हणूनच तर त्यांनी त्यानंतरच्या महिनाभरात अवाक्षरही उच्चारलं नाही.

पत्र पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २७ नोव्हेंबरला राज ठाकरेंनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर १८ डिसेंबरला शिवसेनेतून बाहेर पडल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि जानेवारीमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणाही केली. गेली काही वर्षे उद्धव आणि राज या बंधूंमधील संबंध ताणले जात होते. अलीकडच्या काळात तर त्यांचा संवादही थांबला होता. दोघेही परस्परांच्या मनातून उतरले होते. ‘मनोवृत्ती’ आणि ‘कार्यशैली’ भिन्न असल्यामुळे दोघांनाही परस्परांपासून सुटका हवी होती. तशी सुटका झाल्यानंतर दोघांनीही आपापल्या स्वभावानुसार प्रतिक्रिया दिल्या. राज ठाकरेंनी उद्धव यांचे नाव उघडपणे घेऊन कडवट टीका केली, तर उद्धव यांनी आपल्या दरबारी राजकारणाच्या शैलीत बेरकी पद्धतीने आनंद व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांची मात्र गोची झाली. कोणत्याही प्रश्नावर ‘आर या पार’ भूमिका मांडण्याचा ‘ठाकरी बाणा’ त्यांना दडवून ठेवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात राज आणि बाळासाहेब पूर्णत: गोंधळलेले होते. राज अपरिहार्यतेच्या दिशेने निघाले होते, तर बाळासाहेब हतबल होऊन घडतंय ते सहन करत होते. नियती आपल्याशी फार क्रूरपणे वागली, असं त्या दोघांनाही वाटत असेल…

पण…पण, त्या दोघांविषयी सहानुभूती निर्माण होणं, हे भाबडेपणाचं लक्षण आहे. नियती त्या दोघांशी क्रूरपणे वागली असेल; पण ते दोघेही त्यांच्याजवळच्या लोकांशी किती कठोरपणे वागले आहेत; महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी किती बेजबाबदारपणे खेळले आहेत आणि यातून सावरल्यावर पुन्हा खेळणार आहेत, हे ध्यानात घेतलं तर सारासार विचार करू शकणारा कोणताही माणूस त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगू शकणार नाही!

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात लाखो मुंबईकरांची मराठी अस्मिता फुलवली गेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एखाद्या संघटनेची गरज होतीच. ‘मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी’ असं घोषवाक्य घेऊन शिवसेना उभी राहिली. शिवसेनेला धर्मांध, जातीयवादी, फॅसिस्ट असं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं, त्या सुरुवातीच्या काळात शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस आणि समाजवादी पक्षाचे नेतेही, शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावून आले होते… पण लवकरच शिवसेना पूर्णत: बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभुत्वाखाली आली आणि मग ‘विध्वंसात्मक कार्यशैली’ आणि ‘नकारात्मक बळ’ ही त्या संघटनेची मुख्य वैशिष्ट्ये बनली. (त्यामुळे मराठी माणसांना मुंबई शहरात काही प्रमाणात आधार मिळाला, पण ते ‘बायप्रॉडक्ट’ होतं)

ही वैशिष्ट्ये असणाऱ्या कोणत्याही संघटनेला उभे राहण्यासाठी, दबदबा निर्माण करण्यासाठी भरपूर पैशांची गरज असते आणि सत्ताधारी वर्गातील एखाद्या गटाचा छुपा पाठिंबाही आवश्यक असतो. विध्वंसक कृत्यं घडवून आणण्यासाठी आपल्या समर्थकांवर पैसा उधळावा लागतो आणि त्यातून उदभवणारी पोलीस कारवाई वा न्यायालयीन खटल्यातून सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असावा लागतो. सत्ताधारी वर्गाचा वा त्यातील एखाद्या गटाचा छुपा पाठिंबा असेल तर अनेक मोठे व्यावसायिक आणि उद्योगपती अशा संघटनांना आर्थिक रसद पुरवण्यास तयार असतात… सत्ताधारी व उद्योगपती आपापले हितसंबंध जपण्यासाठी उघडपणे आपल्याला करता येत नाही, किंवा करणं धोक्याचं आहे, ते काम अशा संघटनांकडून करवून घेतात. म्हणजे हे दोन वर्ग आणि अशा संघटना परस्परांचा उपयोग करून घेत असतात. ते व्यावहारिक राजकारण असतं. संघटनेचा चालक जर कुशल संघटक असेल, व्यक्तिगत करिश्मा असणारा असेल, तर ती संघटनाच नंतरच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पर्याय म्हणून उभी ठाकते… आणि मग त्यांच्यात हातघाईची लढाई सुरू होते…

महाराष्ट्रात शिवसेनेचं असंच झालं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या विध्वंसक कार्यशैलीचा, राडा संस्कृतीचा उपयोग आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी, विशेषत: मुंबईतील कम्युनिस्ट व समाजवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी केला. १९६६ ते १९८५ ही सुरुवातीची २० वर्षे शिवसेना फक्त मुंबईपुरतीच होती. काँग्रेसचे सर्वच मुख्यमंत्री मुंबईबाहेरचे असल्याने त्या मुख्यमंत्र्यांना ना मुंबईचे प्रश्न कळले, ना मुंबईकरांचं अंत:करण. शिवसेना मुंबईत वाढली, टिकून राहिली याचं कारण सत्ताधारी काँग्रेसचं मुंबईकडे झालेलं दुर्लक्ष हेच होतं. म्हणजे शिवसेनेच्या वाढीला हा नकारात्मक घटकच पोषक ठरला.

१९९०च्या दशकात इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या झालेल्या हत्या, काँग्रेसची देशभर होत असलेली पिछेहाट, महाराष्ट्रातील ४० वर्षांच्या काँग्रेस राजवटीला वैतागलेली जनता, मुख्यमंत्री शरद पवारांवर अण्णा हजारे, गो. रा. खैरनार, यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या नकारात्मक घटकांमुळे १९९५ साली शिवसेना सत्तेवर येऊ शकली. अर्थात तीदेखील भाजप आणि अनेक अपक्षांच्या साहाय्यानेच! म्हणजे सत्ताधारी काँग्रेसने अती केलं आणि तिसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून सेना-भाजपकडे महाराष्ट्रातील जनता वळली, हे ‘नकारात्मक’ राजकारण लक्षात घेतलं पाहिजे.

राज ठाकरे आपले काका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच दिसतात, बोलतात व व्यंगचित्रे काढतात, एवढंच फक्त खरं नाही तर ते बाळासाहेबांसारखंच वागू इच्छितात. ज्या प्रवृत्तीच्या तरुणांना धरून ठेवण्याची क्षमता बाळसाहेबांपाशी होती, तीच क्षमता राज यांच्यामध्येही आहे. बाळासाहेबांचीच कार्यशैली राज यांना अवलंबायची आहे, किंबहुना तीच एकमेव शैली राज यांना अवलंबता येणार आहे. रचनात्मक पद्धतीने काम राजसाहेबांना करताच येणार नाही, ‘शिव-उद्योग-सेने’चा फसलेला प्रयोग तेच सांगतोय! ‘बाळासाहेब हेच आपलं दैवत आहे’ असं सांगून त्यांनी आपली दिशा आणि उद्दिष्टंही ध्वनित केली आहेत.

१८ डिसेंबरला शिवसेनेतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर आपल्या समर्थकांसमोर राजसाहेबांनी दोन मिनिटांचं भाषण केलं… ‘कोणतीही अप्रिय घटना करू नका’ असं सांगितलं. म्हणजे राजसाहेबांचे पोस्टर्स काढले म्हणून पुणे महापालिकेच्या कार्यालयाची केलेली नासधूस किंवा ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांच्या गाडीची केलेली मोडतोड असे प्रकार आज करू नका. समर्थक तरुण त्यांचं हे म्हणणं ऐकायला तयार नव्हते, तेव्हा राजसाहेब म्हणाले, ‘तुमच्या मनगटातील रग केव्हा आणि कुठे दाखवायची हे मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन!’ राजसाहेबांच्या या सूचक वक्तव्यानंतर उपस्थित तरुणांच्या गर्दीने टाळ्या पिटल्या; शिट्ट्या मारल्या आणि ‘राजसाब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देऊन ढोल-ताशे वाजवून आसमंत दणाणून सोडलं…

या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं राजकारण उद्याच्या महाराष्ट्राला घातक ठरणार आहे, असाच निष्कर्ष काढावा लागतोय. ‘अखिल भारतीय विद्यार्थी सेने’चं प्रभावी नेतृत्व राज ठाकरेंनी केलं, असं काही लोकांना वाटतंय. विद्यार्थी सेनेने शिवसेनेच्या वाढीला हातभार लावला, पण शिवसेनेची वाढ ही महाराष्ट्राचं नुकसान करणारीच ठरली असल्याने राज ठाकरेंची कर्तबगारी महाराष्ट्राला परवडणारी नाही! म्हणून त्यांच्याविषयी आणि त्यांच्या नव्याने येणाऱ्या पक्षाविषयी सहानुभूती बाळगणं फार-फार महागात पडणार आहे! ‘शिवसेनेची वाताहत होत आहे, सेनेचे पूर्ण खच्चीकरण करण्यासाठी राजचा उपयोग करून घेऊ’, असा व्यावहारिक (खरं तर संकुचित) विचार करणारे काही महाभाग काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आहेत. ते राज ठाकरे यांना आर्थिक रसद पुरवतील आणि पोलिसांना ‘दमानं’ घ्यायला सांगायचा विचार करतील. त्यांचा हा संकुचित विचार महाराष्ट्राचं अहित करणारा आहे.

‘शिवसेना’ ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या तरुणांना एकत्र बांधून ठेवणं, त्यांच्यात संख्यात्मक वाढ करणं आणि त्यांना आपल्या इशाऱ्यावर खेळवणं, ही तीन कामं राज ठाकरेंना आपलं दैवत आणि काका असलेल्या बाळासाहेबांप्रमाणे करायची आहेत. त्यासाठी त्यांना गरज आहे, आवश्यक तो पैसा उभारण्याची आणि समर्थकांनी केलेले राडे निस्तरण्याची क्षमता प्राप्त करण्याची. पैसा पुरवण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे येऊ शकतील, पण त्याअगोदर सत्ताधारी वर्गाचा छुपा पाठिंबा मिळवणं हे राज ठाकरेंपुढे खरं आव्हान आहे. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांपैकी कोणाचा वरदहस्त राज ठाकरेंवर असणार हे येणारा काळच ठरवणार आहे. कोणाचाच वरदहस्त नसेल तर राज ठाकरे व त्यांची संघटना नीट उभीच राहू शकणार नाही!

.............................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......