टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी आणि त्यांची आई, मायावती आणि आनंदकुमार, कॅशलेस विवाह, मोदी, मुलायमसिंग यादव
  • Wed , 11 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मायावती Mayawati आनंदकुमार Anand Kumar मुलायमसिंग यादव Mulayam Singh Yadav

१. आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार आहेत. : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची खंत.

नेताजी, ही खंत आहे की टाकला डाव सफल झाल्याचा आनंद? तुम्ही अशी विधानं केलीत, तर आता जे बोटावर मोजण्याइतके सोबत आहेत, तेही इथे काही खरं नाही म्हणून तिथेच जातील ना? की तीच नेपथ्यरचना आहे?

…………………………………….

२. ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीयांना इशारा

कसली पात्रता? निवडणूक जिंकण्याचीच ना? ती ठरवणार कोण? अमित शाहच ना? मग ठीक आहे. तुमच्याकडेही कुटुंबाकुटुंबांनी ती पात्रता कमावलेली आहेच. त्यामुळे हा इशारा सतरंजी उचलणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उद्देशून आहे बहुतेक. कारण, निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टोरल 'मेरिट' असलेल्या बाहेरच्या पक्षाच्या आयात उमेदवारांना हा निकष लावला जाताना दिसत नाही.

…………………………………….

३. नियमित योगासने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी या नियमाला छेद देऊन गुजरातेत आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. 

म्हाताऱ्या-कोताऱ्यांना लायनीत उभे करण्याचा उद्योग थांबल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही, असा आईने दम दिला होता की काय? ती माऊली बिचारी आताही धास्तावली असेल, आता लेकासाठी फोटो काढून घ्यायला कुठे जावं लागतंय याचा नेम नाही म्हणून.

…………………………………….

४. मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात वर्षांत सात कोटींवरून थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

ती मुळात शून्यातून सात कोटींवर किती वर्षांत पोहोचली, याचीही माहिती खरंतर मिळायला हवी. बहीण सत्तेबाहेर असताना एवढी प्रगती होत असेल, तर सत्तेत असतानाचा उत्कर्ष किती असेल? व्यवसायात यशस्वी होण्याचं तंत्र या विषयावर खरंतर राजकारणी उद्योजकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुस्तकं लिहायला हवीत. लोक उगाच कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यांच्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत बसतात.

…………………………………….

५. पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाच वेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह पार पडला. लग्नाच्या काही तास आधी वधु-वर पक्षांनी एकत्र येऊन नवरदेवाच्या घरात शौचालय बांधलं आणि एका पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला.

यांच्यात ते मेहुणीने जोडे लपवणं, मुँहदिखाई वगैरे नसतं का? तेही पेटीएमनेच केलं असेल. आता नवरदेव हनीमून संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतील, तेव्हा कोथिंबीर, मिरच्याही कॅशलेस खरेदी करतील, यात शंका नाही. हे लग्न होतं की सरकारी जाहिरातपटाचं शूटिंग?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......