‘फेक न्यूज’चा सामना करणारे केरळ आणि तेलंगणामधील दोन जबरदस्त उपक्रम
पडघम - माध्यमनामा
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 15 January 2020
  • पडघम माध्यमनामा फेक न्यूज Fake news फेसबुक Facebook ट्विटर Twitter सोशल मीडिया Social Media व्हॉटसअ‍ॅप WhatsApp अल्ट न्यूज Alt News

‘फेक न्यूज’ हे सध्याचं भीषण वर्तमान आहे. काही लोक केवळ करमणूक म्हणून, काही लोक आपल्या विरोधकांची बदनामी करण्यासाठी, काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, काही लोक आपला प्रोपोगंडा राबवण्यासाठी, काही लोक जाणीवपूर्वक समाजात दुही माजवण्यासाठी तर काही लोक फारसा विचार न करता वेगवेगळ्या प्रकारच्या ‘फेक न्यूज’ बनवण्याचे, त्या पसरवण्याचा कुटिरोद्योग करत आहेत. व्हॉटसअ‍ॅप यासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे आणि सोयीचे माध्यम आहे. इंग्रजीत ‘https://www.altnews.in’ हे पोर्टल अशा ‘फेक न्यूज’चा पर्दाफाश करण्याचे काम करते. पण ‘फेक न्यूज’चा कारखाना इतका मोठा आहे की, त्याचा संघटितपणे वेगवेगळ्या पातळ्यांवर सामना करण्याची गरज आहे. दक्षिण भारतातल्या केरळ आणि तेलंगणामध्ये यासाठी दोन अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थी, पोलीस आणि जनसामान्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांचं प्रबोधन केलं जात आहे. त्याविषयीच्या या दोन बातम्या. या दोन्ही बातम्या https://thelogicalindian.com या इंग्रजी पोर्टलवरून मराठीमध्ये अनुवादित केल्या आहेत.

.............................................................................................................................................

केरळ : १५० सरकारी शाळा मुलांना बनावट बातम्या कशा ओळखायच्या हे शिकवत आहेत

Shraddha Goled

23 Aug 2018

“बनावट बातम्या म्हणजे लोकांना गोंधळात टाकण्यासाठी, समूहात घबराट निर्माण करण्यासाठी, हिंसेला चिथावणी देण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी हेतुपूर्वक निर्माण केलेली आणि पसरवलेली संपूर्णपणे खोटी माहिती, फोटो आणि व्हिडिओ.” बीबॉमच्या रिपोर्टनुसार कन्नूर येथील अमृत विद्यालयम् या शाळेत पॉवर पॉइंट प्रझेन्टेशनच्या एका स्लाईडवर ही माहिती लिहिलेली आहे. अमृत विद्यालयम् ही केरळमधील १५० सरकारी शाळांपैकी एक आहे. बनावट बातम्यांच्या विरोधात या शाळेने रणशिंग फुंकले आहे. हा ‘सत्यमेव जयते’चा पुढाकार कन्नूर जिल्हाधिकारी मीर मुहम्मद अली यांनी घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांत मुले पळवण्याच्या संशयावरून जमावाने अनेक माणसांच्या हत्या केल्या  आहेत. लोकांना वाटणारा हा संशय आणि त्यातून उद्भवणारी भयग्रस्तता व्हॉटसअ‍ॅपवरच्या बनावट फॉरवर्डसमधून निर्माण केली गेली आहे. तसंच अलीकडील केरळच्या पुरासंबंधीच्या अनेक बनावट बातम्या फिरत राहिल्या आहेत. अशा बनावट बातम्यांचा उच्छाद थांबवण्यासंदर्भात फारशी प्रगती झालेली नसताना केरळच्या कुन्नूर जिल्ह्याने या दिशेने फारच स्पृहणीय पाऊल उचलले आहे.

सत्यमेव जयते

कन्नुरचे जिल्हाधिकारी मीर मुहम्मद अली यांनी या ‘सत्यमेव जयते’बाबत पुढाकार घेतला आहे. त्यांचे ध्येय शालेय मुलांना बनावट बातम्या म्हणजे काय, त्या कशा धोकादायक असतात आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत शिक्षित करणे, हे आहे.

“मुळात हा विद्यार्थ्यांमध्ये काही वैशिष्ट्ये बिंबवणे, त्यांच्यात काही मूल्ये रुजवण्यासाठी एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीविषयी त्यांनी शंका घ्यावी, आणि काय खरे, काय खोटे, यातला फरक कसा करावा यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो,” अली यांनी जुलैमध्ये ‘द लॉजिकल इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

‘निपा’ या व्हायरसची साथ पसरली असताना एका माणसाला त्या संदर्भात बनावट बातम्या पसरवल्याबद्दल अटक झाली, यावरून कन्नूर बनावट बातम्या किती गंभीरपणे घेते हे लक्षात येते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

लोकांनी सत्यावरच विश्वास ठेवला पाहिजे असे अलींचे सांगणे आहे. “येथे आम्हाला बाजू घ्यावी लागते आणि जेव्हा तुमच्या आसपासचे लोक बनावट बातम्या पसरवत असतात, तेव्हा तटस्थ राहणे हा पर्याय नसतो. जर तुम्ही तटस्थ असाल तर त्याचा अर्थ आपोआप तुम्ही असत्य कथनाच्या बाजूचा आहात असा होतो.”

मागच्या वर्षी जेव्हा रुबेला लसीची मोहीम चालू होते आणि बनावट बातम्यांमुळे पालक आपल्या मुलांना ती लस टोचायला नकार देत होते, तो प्रसंग आठवून ते म्हणाले, “त्या वेळी एक खोटा संदेश पसरवला जात होता की, जर पालकांनी आपल्या मुलींना ती लस टोचली तर पुढे त्यांना गर्भधारणा होणार नाही. खरे तर सत्य उलटे आहे. जर तुम्ही लस टोचून घेतली नाहीत, तर मृत बालक जन्माला येण्याचा धोका वाढतो.”

इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम बनवला आहे. “याचे उद्घाटन १३ जूनला झाले. जिल्ह्यातल्या १५० सरकारी शाळांमधील प्रत्येक शाळेतून एक शिक्षक यासाठी येतो. त्यांना महिनाभराचे प्रशिक्षण दिले जाते. आपल्या विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण देतात. खरे तर आम्ही अर्ध्या दिवसाचे प्रशिक्षण आधीच शिक्षकांना दिले आहे.” हा कार्यक्रम जुलैमध्ये राबवण्यात आला.

बनावट बातमी ओळखण्याचे महत्त्व पुन्हा सांगणे

हा कार्यक्रम मुलांना दोन गोष्टी शिकवतो, “आम्ही त्यांना ‘फिल्टर बबल’ची संकल्पना स्पष्ट करतो. त्यांना सांगतो की, तुम्ही जर पुष्कळ वेळ इंटरनेटवर घालवत असाल, तर तुमच्या दृष्टिकोनाला पुष्टी देणाऱ्या बातम्या तुमच्यासमोर येत राहतील. उदा. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दलच्या सर्व चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे तुमचा कल असतो आणि नावडत्या व्यक्तीबद्दलच्या सर्व खोट्या बातम्यांवर तुमचा विश्वास बसतो. आम्ही याचा वापर मुलांना हे शिकवण्यासाठी करतो की, लोक या भावनेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू शकतात.”

दुसरी गोष्ट हा कार्यक्रम समजावून सांगतो. ती म्हणजे क्लिक बेट (clickbait) {लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही मजकूर देणे आणि विशिष्ट वेब पेजवर जाण्यासाठी लिंक देणे}. “क्लिक बेट  म्हणजे काय आणि ते कसे हानिकारक असते हे आम्ही शिकवतो.”

हे मुद्दे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवले जातात. अली म्हणाले, “आमचे काही सराव असतात. आम्ही विद्यार्थ्यांना एका बनावट बातमीचे उदाहरण देतो आणि विचारतो की अशी बातमी मिळाल्यावर तुम्ही काय कराल?”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी करण्यासाठी काही गोष्टींकडे बोट दाखवणारे मुद्दे असतात. “त्यांना माहितीचा स्त्रोत तपासण्यास सांगितला जातो. ज्यांनी ती माहिती पाठवली आहे, त्यांना नम्रपणे तिचा स्त्रोत विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. जर पाठवणाऱ्याने त्याबद्दल काही सांगितले नाही, तर आम्ही विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळवून ती तिथे पोस्ट करायला सांगतो. अशा रीतीने आम्ही तिथे तरी बनावट बातमी धसास लावू शकतो.

कसलीही अधिकृतता न तपासता लोकांच्या नवीन किंवा थरारक माहिती पाठवण्याच्या उत्साहाबद्दल अली बोलले. “एका सत्रात मी एका विद्यार्थ्याला बोलावले आणि वर्गाला विचारले की समजा अशी बातमी आहे की, हा मुलगा जिल्हाधिकाऱ्याशी भांडला आहे, तर तुम्ही काय कराल? विद्यार्थी म्हणाले की, ते हा संदेश पुढे पाठवतील. मग मी त्यांना विचारले की, जर तुम्ही त्याच्या जागी असाल तर तुम्ही तसेच कराल का? तर ते नाही म्हणाले. लोकांनी त्याची सत्यता पडताळून बघावी असे त्यांना वाटत होते. मग मी त्यांना विचारले, हा दुटप्पीपणा का?”

भविष्यात या योजनेत काही आणखी शाळाही येतील. याबाबतीत पालकांनाही शिक्षित करण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे. “आम्ही सर्व मल्याळम् भाषेत आणणे सुरू केले आहे, जेणेकरून ते अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.”

अलींच्या या उत्तम पुढाकाराचे ‘द लॉजिकल इंडियन’ कौतुक करतो. आम्हाला आशा आहे की, बनावट बातम्यांनी घातलेल्या धुमाकुळाचा सामना करण्यासाठी असे कार्यक्रम ठिकठिकाणी योजले जातील.

................................................

मूळ इंग्रजी बातमीसाठी क्लिक करा -

https://thelogicalindian.com/exclusive/kannur-govt-school-fake-news

................................................................................................................................................................

तेलंगणा : बनावट बातम्यांच्या धोक्याविरोधात हे आयपीएस अधिकारी आयुष्ये वाचवत आहेत

Sromona Bhattacharyya

22 Jun 2018

भारतातील शहरे, गावे आणि खेडी व पाडे बनावट बातम्यांशी झुंजत आहेत. समाजमाध्यमे आणि फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या गप्पांच्या चावड्या यांनी आपल्या आयुष्यात खोलवर प्रवेश केला आहे. त्यामुळे बातम्या पसरवण्याचे एक नवीनच युग अवतरले आहे. समूहात गोंधळ माजवू इच्छिणारे गुन्हेगार बनावट बातम्या तयार करतात आणि त्या तिथे पसरवतात. आज कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ते एक आव्हानच होऊ पाहात आहे.

समाजमाध्यमांवर बनावट बातम्या पुढे ढकलण्याच्या सतत वाढत्या समस्येचा अंत दिसत नसला, तरी तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक रेमा राजेश्वरी यांनी एक उत्कृष्ट यंत्रणा तयार केली आहे, जिचा उद्देश बनावट बातम्यांचे संकट कमी करणे हा आहे.

मार्च २०१८मध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाल्यावर लवकरच मुलांप्रती हिंसा दाखवणाऱ्या आणि स्थानिकांना घाबरवून टाकणाऱ्या खोट्या संदेशांबद्दल रेमा राजेश्वरींना सांगण्यात आले.

‘द लॉजिकल इंडियन’शी बोलताना रेमा यांनी जेव्हा अशा प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश त्यांच्या लक्षात आले, त्या दिवसाचे स्पष्ट वर्णन केले. त्या म्हणाल्या, “मला आठवतंय की तो २७ मार्च हा दिवस होता. गुव्वाल्ड्दिन या खेड्यातल्या माझ्या एका अधिकाऱ्याने माझ्या लक्षात आणून दिले की, त्या खेड्यातील लोकांमध्ये काही अस्वस्थता होती. त्याचे कारण होते त्या भागात मुले पळवणाऱ्या लोकांबद्दल फिरणारा व्हॉट्सअ‍ॅप संदेश.”

स्थानिक पोलिसांनी मग अत्यंत भयानक आणि अगदी स्पष्ट असणारे ते फोटो परत मिळवले. त्या फोटोंवरून असे वाटत होते की, मुले पळवणारी टोळी जिल्ह्यात मोकाट फिरत आहे. त्यामुळे गावकरी घाबरून गेले आहेत. त्या म्हणाल्या की, जे खेडूत एरवी आपल्या घराबाहेर झोपायचे ते या संदेशांमुळे असे करेनासे झाले. रेमांना लगेचच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आणि ते वाढू नये म्हणून त्या लगेच कामाला लागल्या. “हा सीमेवरील जिल्हा आहे आणि तो कायमच संवेदनशील राहिलेला आहे. यासारख्या बनावट बातम्यांमुळे सहज हिंसा होऊ शकते आणि आम्हाला ते लवकरात लवकर थांबवायचे होते.” त्या म्हणाल्या.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमांनी खेड्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हाभर वेगवेगळ्या खेड्यात त्यांनी संकल्पिलेली समूहाने मिळून जागरूकता निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली.

पोलीस अधिकाऱ्यांनी जागरूकता राखण्याचे कार्यक्रम तयार केले

रेमा यांनी खेड्यात सात वर्षांपूर्वी पोलीस आणि लोक यांमधील अंतर कमी करण्यासाठी खेड्यांमध्ये पोलिसिंग करण्यासाठी पुढाकार घेतला. खेड्यातील पोलीस जे एरवी लोकांना बालविवाह आणि वेठबिगारी यांच्या दुष्परिणामांबद्दल सांगत होते, त्यांना बनावट बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी जनजागृतीचे महत्त्वाचे, मोठे काम देण्यात आले.

बनावट बातम्याविरोधी मोहिमा नेहमी चालवूनही रेमांच्या लक्षात आले की, त्यांची यंत्रणा फारशी सक्षम ठरत नाहीये. जिल्ह्यातील समाजमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या चमूने मे महिन्यात खेड्यातील लोकांचे फोन तपासले, तेव्हा हेच कळले की तो धोका अजून आहेच.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

इथे मग रेमा यांनी लोकांना गाणी आणि नाटके या सर्जनशील माध्यमांतून शिकवायचे ठरवले. “या लोकांमध्ये साक्षरता कमी आहे आणि आम्ही ज्या काही मोहिमा राबवल्या त्या वाया गेल्या कारण कोणालाच त्यात रस नव्हता,” असं त्या म्हणाल्या.

“आम्ही गावांमधून ढोल वाजवणारे स्थानिक लोक आणले जे महत्त्वाची बातमी सांगण्यासाठी डप्पू (ढोल) वाजवायचे. काय सांगायचे याचे आम्ही त्यांना शिक्षण दिले. हे संदेश येणे थांबले नव्हतेच, तेव्हा आम्ही लोकांना विनंती करायला सुरुवात केली की, ते तुम्ही पुढे न पाठवता काढून टाकत जा.”

त्या म्हणाल्या की, ही युक्ती गावकऱ्यांमध्ये पुष्कळ प्रभावी ठरली कारण त्याला एक भावनिक साद होती आणि त्यांना मुद्दा सांस्कृतिक रूपात थोडक्यात समजावून सांगितला जात होता. शिवाय रेमांचा सांस्कृतिक चमू ज्यात पोलीस आणि स्त्रिया होत्या, त्या गाण्यात अगदी चोख होत्या. तो चमू स्वतः बनावट बातम्यांचे धोके सांगणारी स्थानिक भाषेतील गीते रचू लागला.

स्वस्त स्मार्ट फोन्स आणि सिम कार्डस

सहज उपलब्ध असलेले स्वस्त स्मार्ट फोन आणि माफक दरात जलद इंटरनेट जोडणी, यामुळे बनावट बातम्यांचा फैलाव होणे शक्य झाले आहे. रेमांना ही जाणीव आहे की त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमधील लोकांना खऱ्या आणि खोट्या बातमीतील फरक कळत नाही. “त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे भयानक फोटो आणि स्थानिक भाषेतील आवाजाच्या फिती त्यांचे लक्ष वेधतात. आपल्या मुलांना धोका आहे या भीतीने स्थानिक तरुण स्वयंसेवक न्याय देण्याच्या हेतूने गट करतात आणि कोणीही गावात आला की, त्याची तपासणी सुरु करतात” असं रेमा म्हणाल्या.

अनेक ठिकाणी अशा समूह न्यायदानातून हिंसक घटना घडल्या ज्यातून मृत्यूही झाले. खेड्यातील लोकांसाठी स्मार्ट फोन्स हाच त्यांच्या माहिती आणि मनोरंजनाचा एकमेव स्त्रोत बनतो.

ही समस्या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी रेमांनी गावतील अनेक नेत्यांशी विचार विनिमय केला. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर काय मजकूर येत राहतो यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये गावातील अधिकाऱ्यांनाही घेतले आहे.

पुष्कळ प्रयत्नांनंतर रेमा यांच्या लक्षात आले आहे की, बनावट बातम्यांचा प्रसार पूर्णपणे थांबलेला नसला तरी गावकरी आता जागरूक झाले आहेत. शिवाय आपापल्या जिल्ह्यात अशा मोहिमा सुरू करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनीही त्यांच्याकडे यासंबंधी विचारणा केली आहे.

................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी बातमीसाठी क्लिक करा -

https://thelogicalindian.com/exclusive/ips-officer-rema-rajeshwari

अनुवाद - माधवी कुलकर्णी

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा