आजच्या काळात छ. शिवाजी महाराजांच्या योग्यतेचा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी?
पडघम - देशकारण
अशोक नामदेव पळवेकर
  • जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 14 January 2020
  • पडघम देशकारण आज के शिवाजी नरेंद्र मोदी Aaj Ke Shivaji Narendra Modi जयभगवान गोयल Jay Bhagwan Goyal नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर सध्या देशभरात बरेच वादंग सुरू आहे! कारण केवळ पदाने मोठ्या असलेल्या एका व्यक्तीची दुसऱ्या एका प्रवृत्ती आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या महापुरुषाशी त्या पुस्तकात केली गेलेली तुलना लोकांना मान्य होणे शक्यच नाही. आणि तशी तुलना मान्य होण्याचे काही कारणही नाही! लोकांची भूमिका अगदी बरोबर आहे.

परंतु ‘ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी हेसुद्धा तसेच काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या नावे केला असल्याचे’ गोयल यांचे म्हणणे आहे. या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते ‘गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणीही वाली नव्हता.’ आणि ‘शिवाजी महाराज ज्याप्रमाणे प्रत्येकाची, राज्यातील माता, बहिणींची चिंता करायचे, तसेच मोदी देशातील माता, बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला आहे,’ असे स्पष्टीकरण देताना ते दिसतात.

गोयल यांच्या या सर्व बाबींमध्ये काडीचाही अर्थ नाही. किंबहुना, ऐतिहासिक सत्याचा व वास्तवाचा विपर्यास करणारेच ते स्पष्टीकरण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी, त्यांचे चारित्र्य व त्यांची कार्यशैली आणि पं. मोदी यांची दृष्टी, त्यांचे चारित्र्य व त्यांची कार्यशैली यांत कोणतीही तुलनाच होऊ शकत नाही. ही दोनही चरित्रे व चारित्र्ये लोकांना पक्की ठाऊक आहेत. म्हणूनच लोकांनी या तुलनेच्या विरोधात प्रखर भूमिका घेतलेली आहे. ती रास्त आहे.

परंतु आपल्याकडे काही लोक असे आहेत की, ते ऐतिहासिक किंवा कोणतेही सत्य वा वास्तव नेमके काय आहे? याचा अजिबात विचार न करता किंवा त्या बाबी लक्षात न घेता ‘मला तसे वाटते, म्हणून मी म्हटले!’ अशी अविवेकी व बेबंद भूमिका घेतात; आणि अशा कामाच्या भरीस पडत असतात. हे असे करणे ‘चूक’ असते, हे  त्यांच्या गावीही नसते. त्यामुळेच मग ते त्यांच्या विधानाचे किंवा त्यांच्या भूमिकेचे निरर्थक समर्थन करत असतात.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ याही तुलनेच्या बाबतीत गोयल यांनी ही अशीच भूमिका घेतलेली आहे. ती वास्तवाचा विपर्यास करणारी आहे. म्हणूनच, आपण ‘केवळ मला वाटते, म्हणून...’ या सबबीखाली वास्तवाचा विपर्यास करणाऱ्या प्रवृत्तींचा कायमच प्रखर विरोध केला पाहिजे; आणि सत्य मुखर केले पाहिजे! कारण ‘मला वाटते म्हणून…’ या भूमिकेपोटी अभ्यासाची रीत नाकारून असत्याची बाजू उचलून धरणारी, सत्याचे हनन करणारी वाच्यता किंवा कृती ही कधीही समर्थनीय ठरू शकत नाही. म्हणूनच बेबंदशाहीला सदैव विरोध केलाच पाहिजे!

दुसरी बाब अशी की, भाजप हा पक्ष गोयलसारख्या काही प्रवृत्तींना हाताशी धरून त्यांना मोदींचे उदात्तीकरण करण्यासाठी प्रवृत्त करतो. कारण राजकारणातील मोदींची डागाळलेली प्रतिमा पुसून टाकण्याचा त्यांचा तो एक खटाटोप असतो. आणि त्यासाठी ते अशा लोकांना त्यांचे पाठबळ पुरवत असतात. म्हणूनच या पुस्तकाच्या संदर्भात सगळीकडे निषेधाचे तीव्र उमटू लागलेले असताना भाजपने एक पाऊल मागे येऊन हे पुस्तक मागे घेण्याची भूमिका जाहीर केली आहे. ती राजकीय सुरक्षिततेची खेळी असते. पण त्याच वेळी संबंधित लेखक मात्र या पुस्तकाच्या अनुषंगाने ‘मी माफी मागणार नाही किंवा पुस्तकही मागे घेणार नाही,’ अशी भूमिका घेतो. हे बळ कुठून येते? तर निश्चितच ते बळ राजकीय पक्ष पातळीवरचेच असते!

म्हणूनच या पुस्तकावर जर बंदी घातली गेली नाही, तर या देशातल्या प्रत्येक ग्रंथालयात हे पुस्तक पोहोचल्यानंतर नव्या पिढीच्या वाचकांपर्यंत एक चुकीचा संदेश त्यातून जाईल. तो म्हणजे या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या योग्यतेचा एक माणूस आजच्या काळात अस्तित्वात होता; आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी! नव्या पिढीला अशा चुकीच्या वाचन संस्कारापासून वाचवायचे असेल तर हे असे प्रकार आणि प्रयोग तत्क्षणीच हाणून पाडणे गरजेचे असते. कारण वास्तवात एखाद्या गोष्टीशी किंवा बहुतांश गोष्टींशी विरोधी असलेल्या खोट्या प्रतिमांच्या उदात्तीकरणामुळे खऱ्या प्रतिमांच्या विकृतीकरणाचा धोका संभवत असतो. त्यातून असत्य संदेश नव्या पिढीकडे संक्रमित होत जातो. म्हणूनच ऐतिहासिक महापुरुषांच्या प्रतिमांचे योग्य जतन करण्यासाठी आणि इतिहासाच्या अभ्यासाचे यथार्थ भान राखण्यासाठी अशा कृतींना मोडून काढले पाहिजे! त्यासाठी या पुस्तकावर बंदी घातली जाणे अत्यंत गरजेचे आहे.

.............................................................................................................................................

लेखक अशोक नामदेव पळवेकर आंबेडकरी साहित्यिक व समीक्षक आहेत.

ashokpalwekar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vividh Vachak

Wed , 15 January 2020

पळवेकर, लेखात मांडलेले विचार मुळीच पटण्यासारखे नाहीत आणि विशेषतः मोदींच्या नावाने स्वातंत्र्याची गळचेपी होते अशी ओरड करताना आपण त्याच स्वातंत्र्याचे गळे घोटायला बिनदिक्कत सांगत आहात हा महान विरोधाभास आहे. मुळात, अगोदर हे नमूद केले पाहिजे की मी स्वतः मोदी-समर्थक आहे परंतु या पुस्तकाच्या शीर्षकाशी सहमत नाही. परंतु ज्याला जे लिहायचे आहे ते त्याने लिहावे, ह्यालाच प्रगल्भ लोकशाही म्हणतात. ह्याच लोकशाही स्वातंत्र्याचा उपयोग जेव्हा आपले विरोधक करतात तेव्हा आरडाओरडा करायचा, बंदीची मागणी करायची आणि इतर वेळी निर्लज्जपणे ह्याच स्वातंत्र्याचा फायदा घेऊन विधाने करायची, ह्या दुटप्पीपणात आपल्याला नैतिक खोटारडेपणा दिसत नाही का? कारण तो दिसायला हवा. दुसरा मुद्दा आपण उपस्थित केलेल्या "चुकीच्या संस्कारांचा". तरुण पिढीला जर संस्कार हे असे एखाद्या नळीतून पाजावे लागत असतील तर तिथेच काहीतरी गडबड आहे. आपल्याला कदाचित संस्कार नाही, ब्रेनवॉश म्हणायचे असावे. संस्कार हे विविध विरोधी विचारधारांच्या संपर्कात येऊन, आपली बुद्धी वापरून त्यातून एका मूल्याचा स्वीकार करणे ह्या स्वरूपाचे असतात. मग यात आपली संस्कृती, परंपरा, इतिहास हे सर्व घटक आपण कुठली मूल्ये स्वीकारतो हे आडून आडून ठरवत असतात. आपण सांगता तसे एकाच विचारधारेची बाटली तोंडाला लावून घटाघटा पिऊन, दुसऱ्या कुठल्याही विचारांना झापडे लावून दार ठेवून नव्हे. (हेही सांगितले पाहिजे की इंटरनेट युगात ती संस्कारांची रीत आता मागे पडली कारण प्रत्येक इच्छुकाला हवी ती माहिती स्वतंत्रपणे आणि मूळ स्वरूपात उपलब्ध आहे त्यामुळे कुणाचीही बाटली तोंडाला लावायची गरज नाही). कुठल्याही तरुण व्यक्तीने हे पुस्तक वाचून, स्वतंत्रपणे मोदी आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचा शोध घेतला आणि स्वतःचे निष्कर्ष काढले तर लोकशाहीचे सार्थक झाले. मग भले आपल्यासारख्या लोकांना ते निष्कर्ष पटोत वा न पटोत. तेच लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे यश म्हणावे लागेल. असो. तात्पर्य असे की आपली लोकशाही आता बाल्यावस्थेत नाही राहिली आणि आपण सर्वांनी तिला प्रगल्भतेने वागवणे आवश्यक आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा