फादर दिब्रिटोंच्या साहित्याची मुळे त्यांच्या जन्मगावाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या मातीत आहेत. त्यांची मराठी भाषेची ओज त्यांच्या सुपीक वालुकामय जमिनीच्या पोतात आहे!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
फा. फ्रान्सिस कोरिया
  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Wed , 08 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रांन्सिस दिब्रिटो Father Francic Dbrito अ. भा. मराठी साहित्य संमेलन

९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याविषयी सात लेखांचा अंतर्भाव असलेली ‘सप्तरंगी इंद्रधनुष्य’ ही पुस्तिका संमेलनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे. या पुस्तिकेतील मजकुराचा हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

१.

१०, ११ व १२ जानेवारी २०२० दरम्यान उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी वसई तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांची बिनविरोध निवड झाली, ही मराठी सारस्वताला भूषणावह ठरणारी बाब आहे, असेच म्हटले पाहिजे. योगायोग म्हणा, की ईश्वरी योजना म्हणा, यंदाच्या वर्षी रेव्हरंड फादर दिब्रिटो यांचे नाव पुढे येणे क्रमप्राप्तच होते. ‘ख्रिस्तपुराणकार’ रेव्ह. फादर थॉमस स्टीफन्स यांची या वर्षी चतुर्थस्मृतिशताब्दी (१६१९) आहे, ‘ख्रिस्तायन’कार कविवर्य रेव्हरंड ना.वा. टिळक यांची स्मृति-शताब्दीदेखील (१९१९) आहे. या दोन शताब्दी संपन्न होत असताना ‘सुबोध बायबल’ या ग्रंथराजाचे सुरेख लेखन करणारे ‘बायबल’चे आणखीन एक उपासक व तज्ज्ञ फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांना  साहित्यक्षेत्रात मिळणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे ख्रिस्ताठायी समर्पित जीवन जगणारे तीन रेव्हरंड, यांचा ‘गंगा-यमुना-सरस्वती’ यांच्यासारखा त्रिवेणी-संगमच जणू!

फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी बालपणापासून आपली उभी हयात साहित्यिक उपासनेत घालवली आहे. ‘नाही मी एकला’ हे त्यांचे आत्मचरित्र काही मूलभूत प्रश्न वाचकांच्या पुढे उभे करून जाते.

पहिला प्रश्न असा : १८९२ या वर्षी नागपूर ते राजनांदगाव या रेल्वेच्या प्रवासात एक आंग्ल ख्रिस्ती मिशनरी, नारायण वामन टिळक या तरुण कवींना भेटले नसते व त्यांची धार्मिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा जर झाली नसती; व त्यांनी दिलेली ‘बायबल’ची प्रत सत्यशोधक टिळकांच्या घरी जर गेली नसती तर ना.वा. टिळक यांनी धर्मांतराऐवजी जीवनात शेवटी कोणता पर्याय निवडला असता?

दुसरा प्रश्न असा : १९०९ या वर्षी बडोदा येथे कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकार या समर्थ व विद्वान साहित्यसम्राटाच्या अध्यक्षतेखाली ‘सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ संपन्न झाले. त्याप्रसंगी त्यांनी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे व रेव्हरंड ना. वा. टिळक यांची एकमेकांशी गाठ घालून दिली. त्या ओळखीच्या भांडवलावर बालकवी ठोमरे ना.वा. व लक्ष्मीबाई टिळक या कविवर्यांच्या घरी अहमदनगर येथे १९१०मध्ये वास्तव्यास गेले नसते आणि तेथे त्यांना टिळकांच्या काव्यस्फूटांचे घबाड जर का चाळायला मिळाले नसते तर निसर्गाविषयी व दिव्यत्वाविषयी इतके प्रभावी काव्यभांडार मराठी सारस्वताला देणारे ‘बालकवी’ महाराष्ट्राला लाभले असते का?

तिसरा प्रश्न असा : धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारताच फा. दिब्रिटो विद्येचे माहेरघर म्हणून संबोधिलेल्या पुणे येथे फा. मॅथ्यू लेदर्ले या जर्मन धर्मगुरूंच्या निमंत्रणाला मान देऊन काही काळापुरता का होईना त्या साहित्य नगरीत ‘स्नेहसदन’ येथे जर वास्तव्यास गेले नसते तर या साहित्यिक हिऱ्याला साजेसे कोंदण मिळाले असते का?....

हे तिन्ही प्रश्न जरी ‘जर-तर’चे असले तरी त्यांतून सर्वसामान्यांना ईश्वरी संकेताविषयी तसेच देव वाकड्या ओळीत सरळ कसे लिहितो, याविषयी बरेच काही सांगून जातात...

फा. दिब्रिटो यांची आगामी साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड म्हणजे गेल्या ४०० वर्षांत ख्रिस्ती समाजाने मराठी सारस्वताला जे मोलाचे योगदान दिले आहे, त्या शारदा-मंदिरावर मराठी साहित्यसारस्वताने चढवलेला जणू सुवर्णकळसच!

२.

फा. दिब्रिटो यांचे नाते वसईतील लोकप्रिय ‘सुवार्ता’ मासिकाशी कायमचे जोडले जाईल, हे निश्चित. गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत या दर्जेदार मासिकाला जे कार्यक्षम संपादक लाभले, त्यापैकी या मासिकाची सर्वांत जास्त काळ सेवा करण्याचे भाग्य फादर दिब्रिटो यांना लाभले. जवळजवळ दोन-अडीच दशकांहून अधिक काळ ‘सुवार्ता’ मासिकाची जडणघडण करण्याचे परमभाग्य त्यांना लाभले. त्या कालावधीत त्यांचे आध्यात्मिक वरिष्ठ व मुंबई धर्मप्रांताचे आर्चबिशप सायमन कार्डिनल पिमेंटा या मराठी भाषेच्या चाहत्यांनी ‘सुवार्ता’ मासिक अधिक वाचकाभिमुख करण्यास त्यांना प्रवृत्त केले, त्यांना प्रोत्साहन दिले व तशी मुभाही दिली. त्यांच्या या संपादकीय प्रवासात रसिकांसाठी छोटी-मोठी व्याख्याने आखणे, हौशी वाचकांची व उदयोन्मुख लेखकांची शिबिरे आयोजित करणे, सभा-संमेलने भरवणे, मोठ-मोठ्या लेखकांची व सर्वसामान्य वाचकांची जवळीक घडवून आणणे, वैचारिक आंदोलने करणे, आदी उपक्रम हाती घेण्यास मुक्तहस्ते परवानगी दिली. असे विविध उपक्रम करीत असताना सदर शब्दप्रभू मराठी भाषेच्या उपप्रवाहातून संपूर्णतया मुख्य प्रवाहाच्या गोतावळ्यात शिरू शकले. ‘ख्रिस्ती साहित्यिक हे मराठी भाषेच्या मूळ प्रवाहात नाहीत’, असे तत्पूर्वी काही साहित्यिकांकडून म्हटले जात असे. त्यावर एक उपाय म्हणून त्यांनी होतकरू मराठी ख्रिस्ती साहित्यिकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधन करायला व प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांना मराठी साहित्यिकांच्या मूळ प्रवाहात प्रविष्ट होण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. त्यांतल्याच काहींना लेखक, काहींना कवी, तर काहींना स्व-सामर्थ्यावर संपादक होण्यासाठी प्रवृत्तही केले. त्यांच्या नेतृत्वाखाली वसई पंचक्रोशीचा मराठी भाषिक ख्रिस्ती समाज लिहू लागला. इतकेच नव्हे तर तो मुख्य मराठी साहित्यप्रवाहात आपल्या पाऊल-खुणाही स्पष्टपणे उमटवू लागला.

‘सुवार्ता साहित्य मेळावा’ या नावाखाली प्रतिवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचा विचारही त्यांच्याच डोक्यात डोकावून गेला व गेली ४० वर्षे तो प्रतिवर्षी साजरा होत आहे. सुमारे ७०० ते ८०० साहित्यप्रेमी प्रतिवर्षी एका सभागृहात एकत्र येतात व साहित्यिक विषयांवर मेजवानी झोडीत खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण दिवस साहित्यिक गप्पा-गोष्टी करण्यात घालवतात. गेल्या दोन-तीन पिढ्या वसईत संपन्न होणारा हा एक अद्वितीय वार्षिक साहित्य-जल्लोष!

जून १९८३पासून जून २००७ पर्यंत सलग २४ वर्षे ते ‘सुवार्ता’चे संपादक होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना त्या काळात एकच ध्यास होता. ‘सुवार्ता’ घरोघर पोहोचवणे. ‘सुवार्ता’चा अंक ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या घरी जसा आदराने स्वीकारला जातो, तसाच तो ख्रिस्तीतर बांधवांच्या घरीही कसा स्वीकारला जाईल, या बाबतीत दक्षता घेणे. त्याच्या जडणघडणीत ख्रिस्ती बांधवांचा जसा सहभाग असतो, तसा ख्रिस्तीतर बांधवांचाही सहभाग असणे, प्रत्येक अंकात ख्रिस्ती व ख्रिस्तीतर बांधव या दोघांचे लेख असणे, ही सद्भावना त्यांच्या अंतर्यामी निर्माण करणे.

हळूहळू ‘सुवार्ता काय बोलतो’, याची वाचकवर्ग वाट पाहू लागला. दरम्यान वसईवर एक संकट कोसळू पाहत होते. वसईतील नागरिकांच्या वडिलोपार्जित जमीनजुमल्यावर काही स्वार्थी लोकांच्या वक्रनजरा वळू लागल्या. बिचारा स्थानिक अल्पभूधारक संकटात आला. ‘आपल्या जमिनीचा तुकडा विकण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही’ असा त्या अल्पभूधारकांचा परोपरीने समज करून देण्यात येऊ लागला. वसईचा जमीनमालक पांगळा होऊ लागला.

वसईकरांच्या जमिनीवर वैयक्तिक बिल्डरची जशी नजर गेली तशी पुढे सरकारच्या योजनेची कुऱ्हाडही वसईकरांच्या जमीनजुमल्यावर उगारली गेली. ही राक्षसी कुऱ्हाड होती ‘सिडको विकास आराखडा’ नामक शासकीय नियोजनाची. या बाबतीत ‘सुवार्ता’ने ठाम व ठोस भूमिका घ्यावी, असा तगादा येऊन थडकला. त्याला पर्याय शोधणे गरजेचे होते. लोकांना मार्गदर्शन करणे आवश्यक होते. प्रसंगी निर्भीड मतप्रदर्शन करणेही गरजेचे होते.

लेखणीची तलवार ही नेहमी संपादकांच्या हातात असते. ती तलवार पोलादी तलावारीपेक्षा अधिक प्रभावी असते. ‘सुवार्ता’ने आपली तलवार परजण्यास सुरुवात केली आणि मोठमोठ्यांचे धाबे दणाणले. होता होता ‘सुवार्ता’ हे एका धर्मप्रांताचे धार्मिक मुखपत्र आहे, हे पालूपद बाजूला राहून “सुवार्ता’ ही एक चळवळ आहे’, हे पालूपद पुढे आले.

३.

फा. दिब्रिटो हे मूळचे विरारजवळील नंदाखाल गावचे रहिवासी. ४५० वर्षांची मराठमोळी परंपरा असलेल्या नंदाखाल चर्चच्या सावलीत उभ्या असलेल्या सेंट जोसेफ हायस्कूल, नंदाखाल या मराठी शाळेत त्यांनी त्यांच्या बालपणीच अव्वल व दर्जेदार मराठी भाषेचे धडे गिरवले.

शाळेतील दोन शिक्षकांमुळे आमची शाळा झाली सर्वांना परिचित. दोघे शिक्षक जवळजवळ समवयस्क. दोघे सातवी पास. मच्याद गुरुजी शाळेत लवकर रुजू झाले म्हणून ते झाले ‘हेडमास्तर’. पॉल रुमाव नंतर आले म्हणून ते झाले असिस्टंट. दोघांना मुंबईला नोकऱ्या मिळत होत्या; पण गावाच्या प्रेमाखातर त्यांनी शहरातील नोकरीवर पाणी सोडले व ते गावाच्या सेवेला लागले. गणिताच्या विषयात मच्याद मास्तरांचा हात धरणारा कोणी नव्हता. हातात पट्टी व टेप घेऊन ते गणित व भूमिती हे विषय विद्यार्थ्यांना पटांगणावर - थेट शाळेच्या क्रीडांगणावर - शिकवायचे. पॉल गुरुजी मराठीचे शिक्षक. त्यांच्या मराठीचा प्रभाव पडला दिब्रिटोंच्या भाषेवर.

पुढे गोरेगावच्या गुरुविद्यालयात धर्मगुरुपदासाठी शिक्षण घेत असताना तरुण वयातील त्यांचे काही लेख ‘सुवार्ता’ मासिकातच नव्हे; तर ‘लोकसत्ता’ या दैनिकातही प्रसिद्ध होऊ लागले. धर्मगुरू झाल्यानंतर वर्षा-दोन वर्षांनी मराठी भाषेची साधना करण्यासाठी पुणे येथे ‘मराठीच्या माहेरघरी’ साहित्यिकांच्या सहवासात शनिवारपेठेत वावरण्याचे भाग्य त्यांना लाभले. तेथे पुणे ‘सकाळ’ या दैनिकात स्तंभलेखन करत असताना त्यांची ओळखदेख ‘सकाळ’च्या संपादकाशी तर झालीच, शिवाय, त्या साप्ताहिक लेखांच्या माध्यमांतून ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांचे लक्ष त्यांच्या तजेलदार लेखणीने वेधून घेतले. ‘राजहंस प्रकाशन’ने त्यांची एकामागून एक पुस्तके प्रकाशित करण्याचा धडाका लावला. त्यात ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’, ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘पोप दुसरे जॉन पॉल’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘सुबोध बायबल’ व ‘नाही मी एकला’ ही त्यांची काही पुस्तके त्याची साक्ष देतात.

४.

आगामी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची निवड का व कशी झाली, याविषयी वेगवेगळे लोक सध्या वेगवेगळी मते प्रदर्शित करत आहेत. कारण ‘त्यामध्ये काहीतरी गौडबंगाल असले पाहिजे’, असे त्यांना वाटते. त्यांना सुरुवातीला केलेल्या उठावामुळे अध्यक्षांना अप्रत्यक्षपणे अधिक प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न तर ते करत नाहीत ना? ’ते ‘फादर’ आहेत, म्हणून अध्यक्ष झाले’, असे काहींचे मत आहे. त्यांचे लेखन, त्यांचा साहित्यिक दर्जा आपल्याला मान्य असो वा नसो, ते भाषांतरित आहे... त्याला उत्तर एकच : त्यांचे लेखन हे कोणत्याही गुणवत्तेचे असो, ‘फादर दिब्रिटो हे एक जातिवंत व तजेलदार साहित्यिक आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक दिंडीत तब्बल सहा दशके साहित्य शारदेचे वारकरीच नव्हे; तर त्याच्या पालखीचे ते भोई आहेत. त्यांची साहित्यनिर्मिती अव्याहत चालू आहे. त्यांच्या दिलखेचक शैलीला विशेष अशी एक रूपेरी किनार आहे. महाराष्ट्राची प्रमाण मराठी व वसईची बोली यांचा वैशिष्ट्यपूर्ण सुंदर मिलाफ त्यांच्या लेखनशैलीत आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मराठी साहित्यक्षेत्रातील तपस्या तशी प्रदीर्घ आहे. ती आजकालची नाही. ती सुरू झाली ते धर्मगुरू होण्यापूर्वीपासून. त्याला आता जवळजवळ ६० वर्षे झाली. धर्मगुरू झाल्यानंतरही या साधनेला ते चिटकून राहिले.

‘साहित्यक्षेत्र’ फादर दिब्रिटोंना आवडते, त्या क्षेत्रात ते रमतात. फादर दिब्रिटो यांची साहित्यिक जडणघडण काही अंशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत - पुण्यात - झाली. पुणेरी भाषेचे संस्कार त्यांच्यावर झाले. वसईत आल्यावर त्यांनी मूळ प्रमाणभाषेला स्थानिक बोलीभाषेच्या माध्यमातून अधिक प्रगल्भ केले. वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वत:ची लेखनशैली त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांचे लेखन वाचकांना विशेष आवडू लागले. भाषेतील लालित्य, मनन-चिंतन, त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनांत दिसून येऊ लागले. जाणीवपूर्वक जोपासलेल्या व्यासंगामुळे त्यांच्या लेखनाला वैचारिक खोलीही आली. त्यामुळे त्यांना अनेक ‘साहित्यिक पुरस्कार’ही प्राप्त झाले.

‘पथिकांची नामयात्रा’ या एका आध्यात्मिक पुस्तकाचे भाषांतर त्यांनी चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी प्रथम केले. ही त्यांची पहिली साहित्यकृती. त्यानंतर एकामागून एक २०-२२ साहित्यकृती त्यांच्या हातून लिहून प्रसिद्ध झाल्या.

दिब्रिटोंच्या साहित्याची मुळे जर शोधायची असतील तर ती जेलाडी या त्यांच्या मूळ जन्मगावाच्या पश्चिमेला समुद्रकिनाऱ्यालगतची आहे माती तिथे शोधावी लागतील. त्यांची मराठी भाषेची ओज, तिची तरलता शोधायची असेल तर त्यांच्या ‘राना’वरच्या सुपीक वालुकामय जमिनीचा पोत पाहावा लागेल. ज्या भूमीत त्यांचा जन्म झाला ती भूमी आजवर आहे वेगवेगळ्या फुला-फळांच्या बागायतीने भरगच्च भरलेली, कुणब्याच्या पुताने पिढ्यान् पिढ्या सहजगत्या नांगरलेली आहे.

.............................................................................................................................................

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla

............................................................................................................................................................

लेखक फादर फ्रान्सिस कोरिया हे वसईहून प्रकाशित होणाऱ्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे सहसंपादक आहेत.

suvartavasai@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 10 January 2020

फ्रान्सिस कोरिया,

तुम्ही करवून दिलेली फ्रान्सिस दिब्रिटो यांची व वसईच्या सांस्कृतिक अंगाची ओळख आवडली. वाईट याचं वाटतं की एव्हढे गुणसंपन्न दिब्रिटो पोपची चमचेगिरी करतात. ज्या हिंमतीने ते माफियांच्या विरुद्ध उभे राहिले अगदी तश्शीच हिंमत दाखवून पोपला व चर्चला नाकारून दाखवावं.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा