बाईंचं कौतुक करताना त्यांची जीभ थकत नाही. त्यांचा नवरा असल्याचा अभिमान आड येत नाही. उलट बाईंच्या प्रतिभेचं त्यांना कौतुक आहे!
पडघम - साहित्यिक
नम्रता फलके
  • ‘कदाचित अजूनही’ या संग्रहाचं मुखपृष्ठ, अनुराधा पाटील आणि कौतिकराव ठाले पाटील
  • Thu , 26 December 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस कदाचित अजूनही Kadachit Ajunhi अनुराधा पाटील Anuradha Patil कौतिकराव ठाले पाटील Kautikrao Thale Patil

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

‘बाई फटकळ, पण बुवा ठीक आहे’, असं या दाम्प्त्याबद्दल सहसा ऐकायला मिळतं. तेव्हा मी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रात नुकतीच जॉईन झाले होते आणि अनुराधाबाईंच्या कवितांचं ध्वनिमुद्रण करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. ‘जरा सांभाळून’ हे पालुपद डोक्यात होतंच. त्यामुळे कसंबसं ते रेकॉर्डिंग संपवलं आणि सुटले एकदाचं म्हणून सर्व विसरून गेले.

पुढे दीड-दोन वर्षांनी अनुराधाबाईंची कविता आकाशवाणीच्या राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवडली गेली. तेव्हा बाईंची कविता आणि तिचं हिंदी व इंग्लिशमधील भाषांतर मिटिंगमध्ये अनेकदा वाचलं गेलं आणि मी बाईंच्या कवितेशी जोडले गेले. ‘सर्वत्र भीती वाटते माणूस नावाच्या प्राण्याची’ या त्या कवितेतील ओळींनी तर माझा पिच्छा आजवर सोडलेला नाही. मी त्या कवितेशी इतकी जोडली गेले की, नकळत अनुराधाबाईंची चाहती झाले!

आणि नंतर कोणत्याही साहित्यिकाला भेटल्यानंतर ‘तुम्ही बाईंच्या कविता वाचल्या का?’, ‘कशा वाटतात?’, ‘त्या फारशा कार्यक्रमांत दिसत का नाहीत?’, ‘त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकांत का नाहीत?’ अशा प्रश्नांनी भंडावून सोडायचे. या प्रश्नांतून मला एक कळालं की, अनुराधाबाईंची कविता ही शुद्ध कवितेच्या (pure poetry) प्रांतातील आहे.

बाईंच्या कवितेसोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा मागोवा मी घेत राहिले. त्यानंतर एनकेनप्रकारे बाईंना आग्रह करून ‘आमचं सहजीवन’ या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. अत्यंत भावनिक आणि संसाराचा चढउतार सांगणारी ती मुलाखत होती. अनुराधाबाई हे सांगताना अजिबात कचरल्या नाहीत की, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नवऱ्याची- ठाले पाटील यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे नवरा म्हणून तर आहेतच, पण त्यांच्या साहित्यिक आयुष्यालासुद्धा रूढ अर्थानं पुढे आणण्याचं काम पाटील यांनी केलं आहे.

ही मुलाखत झाल्यानंतर मी विचार करू लागले. म्हणजे लग्नानंतर बायकोचं पहिलं नाव बदलणारी माणसं, आकाशवाणीवर नवऱ्याच्याच आडनावानं कार्यक्रम प्रसारित व्हावा म्हणून आपल्या शिक्षित बायकोकडे हट्ट करणारी माणसं, स्त्रीनं काय लिहावं आणि लिहू नये, हे ठरवणारी माणसं आणि कौतिकराव ठाले पाटील?

लग्न ठरल्यावर बाई पाटलांना पत्र लिहायच्या. त्यात कविता असायची. पाटलांनी त्या कवितेला खतपाणी घातलं. त्यांना प्रोत्साहन दिलं. बाईंच्या प्रत्येक कवितेचा पहिला श्रोता तेच असतात आणि बाई नि:संकोचपणे त्यांना कविता वाचून दाखवतात. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते.

आजही अनेक कवयित्री काही बोल्ड विषयावर कविता लिहू शकत नाहीत. कारण नवरा आणि समाज काय म्हणेल ही भीती त्यांच्या मनात असते. याउलट अनुराधाबाईंना प्रसिद्धीची थोडीही इच्छा नसताना केवळ उत्तम साहित्य लोकांपुढे यावं म्हणून पाटलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. जेव्हा अनुराधाबाईंच्या कवितेबद्दल सामान्य माणूस बोलतो, तेव्हा त्याचा दुसरा प्रश्न असतो बाईंचे पती लिहीत नाहीत का? म्हणजे पाटील लेखक असूनसुद्धा सहजपणे आपल्या बायकोच्या मागे जातात आणि कौतुकाची थाप घेण्यासाठी जेव्हा त्यांची बायको मंचकावर जाते, तेव्हा त्यांना त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘first class’ वाटतं!

कौतिकराव ठाले पाटील हे साहित्यक्षेत्रातील नावाजलेलं प्रस्थ असतानादेखील आपल्या बायकोच्या प्रतिभेसाठी त्यांनी त्याचा वापर करून घेतला नाही, हे उघड सत्य आहे. आणि बाईंचा स्वभावही लुडबूड करण्याचा नाही. साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा अनेकांना अनुराधाबाई आणि ठाले पाटील हे दाम्पत्य आहे, हे ठाऊक नव्हतं.

विशेष म्हणजे बाई एखाद्या मुलाखतीदरम्यान जे बोलतात, त्यावर या दोघांची चर्चा होते. ज्यात पाटलांकडून बाईंचं सकारात्मक समीक्षण केलं जातं. वर्षभरापूर्वी बाईंची खास मुलाखत आकाशवाणीनं आयोजित केली होती. ती साधारणतः तासभर चालली. ठाले पाटील आणि मी काचेच्या दुसऱ्या भागात बसून मुलाखत ऐकत होतो. बाईंनी एखादा चांगला मुद्दा मांडला तर सर मनापासून दाद देत होते. मी त्यांना विचारलं- ‘बाईंचं शिक्षण काय?’ ते म्हणाले, ‘ती बी. ए. पण नाही...’ मग मी म्हणाले, ‘त्या इतकं चिकित्सक आणि सत्य कसं काय बोलतात?’ त्यावर ते अभिमानानं उत्तरले, “बाईंचं वाचन, आकलन आणि मनन प्रचंड आहे.’ एक तास तन्मयतेनं त्यांनी मुलाखत ऐकली. (फार कमी नवरे त्यांच्या बायकांच्या मुलाखतीसाठी थांबताना मी पाहिलंय!)

मुलाखत संपल्यावर बाई बाहेर आल्या आणि नेहमीप्रमाणे त्यांनी ठाले पाटलांना विचारलं, ‘कशी झाली?’ ते मनापासून स्मित करत म्हणाले - ‘firstclass’. नंतर बराच वेळ ते बाईंना सांगत होते- ‘हा मुद्दा छान होता, हा त्याहून छान होता… आणि हा त्याहून...” असे हे पाटील!

बाईंचं कौतुक करताना त्यांची जीभ थकत नाही. त्यांचा नवरा असल्याचा अभिमान आड येत नाही. उलट बाईंच्या प्रतिभेचं त्यांना कौतुक आहे.

बाई मधल्या काळात आजारी असताना पाटलांनी त्यांची छोट्या मुलाची आईनं करावी तशी शुश्रूषा केली. पाटलांशी वैचारिक मतभेद झाल्यास बाई सडेतोडपणे बोलतात... आणि बाई बोलतात तेव्हा पाटील एखाद्या श्रोत्यासारखी भूमिका बजावतात. त्या दोघांमधले वैचारिक वाद बघताना मजा येते!

बाईंच्या लेखणीचं कौतुक करणाऱ्या अनेक स्त्रिया बोलत नसल्या तरी त्यांना पाटील सरांबद्दल मनातून आदर वाटत असेल. कारण आजही आपल्या पुरुषप्रधान समाजात बायको कितीही हुशार असली तरी तीनं दुय्यम स्थानच घ्यावं, असाच अघोषित नियम आहे. बाईंसारखी प्रतिभा असलेल्या स्त्रिया आपल्याकडे असतीलही, पण ठाले पाटलांसारखे किती पुरुष असतील?

आजही या वयात बाई आणि पाटील यांची पहिलीच इनिंग सुरू आहे असं वाटतं. परस्परांबद्दलचा विश्वास, कुतूहल, कौतुक आणि प्रोत्साहन, थट्टा आणि रागवणं या वैशिष्ट्यांनी त्यांचा संसार भरलेला आहे. त्यात कधीमधी आम्ही डोकावत असतो. त्यातूनच मला हे जाणवलं की, बाईंना पुरस्कार आणि प्रसिद्धीचं जास्त महत्त्व नसलं तरी त्या रूढ अर्थानं आज प्रसिद्ध आहेतच. त्यासाठी त्यांच्या माणसानं त्यांना दिलेली साथ मला स्त्री म्हणून कौतुकास्पद वाटते!

.............................................................................................................................................

‘कदाचित अजूनही’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4612/Kadachit-ajunahi

.............................................................................................................................................

लेखिका नम्रता फलके आकाशवाणी औरंगाबाद इथं कार्यक्रम अधिकारी आहेत.

namafalke@yahoo.com

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा