यंदाच्या ‘ऋतुरंग’च्या दिवाळी अंकामध्ये वाचण्यासारखे काय आहे?
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • ‘ऋतुरंग’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 19 November 2019
  • पडघम साहित्यिक ऋतुरंग अरुण शेवते दिवाळी अंक दिलीप माजगावकर मंगेश पाडगावकर दुर्गा भागवत अंबरीश मिश्र सयाजी शिंदे गुलज़ार अमृता सुभाष श्रीकांत बोजेवार

मराठीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन-चारशे दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत. या सर्वच अंकांची ओळख करून देणं शक्य नाही. किंबहुना कुठल्याही एका अंकाचीही सविस्तर ओळख करून देणं शक्य नाही. त्यामुळे ‘टीम अक्षरनामा’ने काही निवडक दिवाळी अंकातल्या काही निवडक लेखांची ओळख करून द्यायचं ठरवलं आहे. तर यंदाच्या ‘निवडक दिवाळी अंकां’ची ओळख करून देणारी ही लेखमालिका आजपासून….

.............................................................................................................................................

अरुण शेवते हे अतिशय कल्पक, धडपडे आणि उत्साही संपादक आहेत. त्यांच्या ‘ऋतुरंग’चं यंदाचं २७वं वर्ष आहे. या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य असं असतं की, तो एकाच विषयाला वाहिलेला असतो. यंदाचा ‘ऋतुरंग’चा ‘नमस्कार विशेषांक’ आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपलं आत्मबल वाढलं, ज्यांनी आपल्याला समजून घेतलं-आधार दिला, त्या व्यक्तींविषयी आदरभाव व्यक्त करणारे तब्बल ५२ लेख या अंकात आहेत. अर्थात यातले अर्ध्याहून अधिक लेख हे जेमतेम ५०० शब्दांचे आहेत. सुरुवातीचे १९ लेख मात्र १५०० ते ५००० अशा शब्दमर्यादेचे आहेत.

‘नमस्कार विशेषांक’ हे नावच पुरेसं बोलकं, आकर्षक आहे आणि वाचनीयतेची ग्वाही देणारंही आहे. त्यामुळे अंक वाचनीय आहे, आणि तब्बल १९ लेख पुरेसे सविस्तर असल्यानं तो खिळवूनही ठेवतो. शिवाय या अंकासाठी लेखकांची निवड अरुण शेवते यांनी ज्या कुशलतेनं, चौकसपणानं आणि विचारपूर्वक केली आहे, ती दाद देण्याजोगी आहे.

या अंकातले सर्वोत्तम पाच लेख –

पहिला

‘प्रिय मंगेश पाडगावकर’ हा ‘राजहंस प्रकाशना’चे प्रकाशक दिलीप माजगावकर यांचा लेख यंदाच्या ‘ऋतुरंग’मधला सर्वोत्तम लेख आहे. हा लेख पत्ररूप आहे. ३० डिसेंबर २०१५ रोजी पाडगावकरांचं निधन झालं, तेव्हापासून त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांपैकीही हा सर्वोत्तम लेख आहे. किंबहुना या लेखातून जे पाडगावकर उलगडतात, ते आजवर त्यांच्याविषयी बरंच काही ऐकून असलेल्यांनाही फारसे परिचित नसतील असे आहेत. आयुष्यभर माणसांवर प्रेम करणाऱ्या, माणूस समजून घ्यायच्या प्रयत्न करणाऱ्या आणि तो अजूनही आपल्याला पूर्ण समजलेला नाही, हे प्रांजळपणे सांगणाऱ्या पाडगावकरांच्या ‘माणूस’प्रेमाचं अतिशय विलोभनीय दर्शन या लेखातून माजगावकरांनी घडवलं आहे. सच्चा अनुभव माजगावकरांनी सच्चेपणानं सांगितलेला आहे. त्यासाठी त्यांनी कुठलीही पोझ घेतली नाही किंवा शब्दांची आतषबाजी केलेली नाही. उपमा, प्रतिमा यांचा सोस न बाळगता आणि उगाचच शैलीबाज लिहिण्याचा प्रयत्न न करताही कसं आणि किती उत्कट लिहिता येतं, याचंही माजगावकरांचा हा लेख उत्तम उदाहरण आहे. अतिशय प्रांजळ, उत्कट, प्रत्ययकारी असं हे व्यक्तिचित्र आहे पाडगावकरांचं.

दुसरा

‘दुर्गाबाई’ या लेखात पत्रकार अंबरीश मिश्र यांनी दुर्गाबाई भागवत यांच्याविषयी लिहिलं आहे. मिश्र हे स्वत:ची स्वतंत्र शैली असलेले लेखक आहेत. त्यांच्या लेखात उदाहरणं, प्रतिमा, अलंकार आणि संदर्भांची नेमकी आणि योग्य ठिकाणी केलेली पखरण असते. थोडक्यात लेख सजवलेला असतो, पण त्यातून प्रतिपाद्य विषय खुलवून सांगण्याची असोशी असते. दुर्गाबाईंवरच्या या लेखातही मिश्र यांची सारी वैशिष्ट्यं उत्तमरीत्या जुळून आली आहेत. त्यामुळे या लेखातून होणारी दुर्गाबाईंची ओळख लोभस आणि लाघवी आहे. दुर्गांबाईंविषयी खूप वाचलेल्यांनाही हा लेख आवडेल इतका तो उत्कट झालेला आहे, हे नक्की.

तिसरा

गुलज़ार आणि ‘ऋतुरंग’ हे आता एक समीकरण झालेलं आहे. त्यामुळे गुल़ज़ारांच्या नुकत्याच बंगालीमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा अनुवादित अंश या अंकात आहे. ‘त्यांना माझा नमस्कार’ या लेखात गुलज़ारांनी सत्यजित राय, हेमंतकुमार, पंडित रविशंकर, पंडित भीमसेन जोशी, सलिल चौधुरी यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. गुलज़ारांचं लेखन आवडणाऱ्यांना त्यांच्या या आठवणी नक्की आवडतील. कारण त्यांचा प्रांजळपणा, सच्चेपणा लुभावणारा आहे.

चौथा

अनिल साबळे यांचा ‘साबरवाडीची शांताबाई’ हा एक विलक्षण लेख आहे. खरं तर एखाद्या शैलीदार लेखकानं हा लेख लिहिला असता तर तो ड्रॅमॅटिक आणि सिनेमॅटिक पद्धतीनं सांगितला असता. पण साबळे यांनी अतिशय साधेपणानं लिहिलं आहे. शांताबाई या आदिवासी स्त्रीनं ग्रामीण भागातील दोन-तीन हजार स्त्रियांची बाळंतपणं किती कौशल्यानं, सहजपणे केली, त्याची गोष्ट या लेखात सांगितली आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातल्या कितीतरी लेकीबाळींची ‘सुटका’ झाली. इतका मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या शांताबाईंचं प्रत्यक्ष जगणं, वागणं किती साधं, सरळ आणि निर्मळ आहे, हे साबळे यांनी उलगडून दाखवलं आहे. ‘इतरांसाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तरच मेलास’ या सिद्धान्ताचं मूर्तिमंत रूप म्हणजे शांताबाई.

पाचवा

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांचा ‘झाड तुमचं भलं करो’ हा लेख खूप भारावून टाकणारा किंवा फार उत्कट अनुभव देणारा नाही. पण जे काही शिंदे यांनी सांगितलं आहे, ते त्यांनी अतिशय निर्मळपणे, प्रांजळपणे सांगितलं आहे. आणि हेच त्यांच्या लेखाचं बलस्थान आहे.

उरलेल्यापैकी

छोट्या लेखांमध्ये अमृता सुभाष, श्रीकांत बोजेवार, सतीश भावसार यांचे लेख उत्तम आहेत. त्याची दोन-तीन कारणं आहेत. एक तर त्यात ‘मी’पण नाही, ज्यांना नमस्कार करावासा वाटतो, त्यांच्याविषयीच लिहिलं आहे, स्वत:चं मोठेपण उगाचच उगाळलेलं नाही. सच्चा अनुभव सच्चेपणानं सांगितला आहे, त्यामुळे हे लेख वाचावे असे आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा