कबीरांनी ‘ढाई आखर प्रेम का’ म्हटलंय, पण गेल्या काही वर्षांत आपण द्वेषाची अडीच अक्षरं जवळ केलीयत की काय असं वाटू लागलंय!
पडघम - साहित्यिक
जयप्रकाश सावंत
  • साहित्य अकादमी आयोजित युवा लेखक संमेलन
  • Sat , 16 November 2019
  • पडघम साहित्य अकादमी Sahitya Akademi युवा लेखक संमेलन Yuva Lekhak Sanmelan जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant

काल १५ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमी आयोजित युवा लेखक संमेलनाचं उदघाटन झालं. आज या संमेलनाचा दुसरा व शेवटचा दिवस. याज्ञवल्क्य सभागृह, कल्याण इथं भरलेल्या या संमेलनाचे उदघाटक म्हणून प्रसिद्ध अनुवाद जयप्रकाश सावंत यांनी केलेलं हे भाषण… आज या संमेलनात पहिले सत्र कथावाचनाचे, तर दुसरे व तिसरे सत्र कवितावाचनाचे आहे. या तिन्ही सत्रांत शिल्पा कांबळे, प्रसाद कुमठेकर, गणेश वसईकर, महेश लीलापंडित, संदीप जगदाळे, वाल्मिक वाघमारे, अविनाश उषा वसंत, गीतेश शिंदे, महेश लोंढे, अमृत तेलंग, स्वनील शेळके, नितीन भरत वाघ, संतोष पावरा या तरुण कथाकार व कवींचा समावेश आहे.

.............................................................................................................................................

या संमेलनाचे अध्यक्ष, कवी व दिग्दर्शक रवींद्र लाखे; निमंत्रक, साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने; इथे उपस्थित असलेले तरुण साहित्यिक, इतर नामवंत, आणि सर्व साहित्य-रसिक, या साऱ्यांना अभिवादन करून, मी सुरुवात करतो. 

तरुण लेखकांच्या या मेळाव्यात सहभागी व्हायला मला आनंद वाटतोय. मात्र दुसरीकडे खूप संकोचही  वाटतोय. कारण, मी अनुवाद करायला सुरुवात केली ती वयाच्या पन्नासाव्या वर्षी. त्यानंतर गेली काही वर्षं मी पाश्चात्त्य पुस्तकं, लेखक, प्रकाशक यांच्याविषयी लिहितोय, त्याचीही सुरुवात साठीच्या आसपास झाली. त्यामुळे कोणत्या निकषांवर साहित्य अकादमीने मला या युवा लेखकांच्या मेळाव्याचं उद्घाटन करायला बोलावलंय हे माझ्या लक्षात येत नाहीय. पण किंबहुने म्हणाले की, हा राष्टीय पुस्तक सप्ताहसुद्धा आहे. आणि मी मुळात एक पुस्तकवेडा माणूस आहे, तेव्हा एक निखळ वाचक या नात्याने  मी हे करतोय, असं मी धरून चालतो.

या इथे मी थोड्या वैयक्तिक आठवणींमध्ये जाऊ पाहतोय, त्याबद्दल मला माफ कराल. मला माझ्या दीडएक वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या आईविषयी थोडं सांगावंसं वाटतंय. तिच्याकडून वारशाने मला दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या. एक संगीताचा कान आणि दुसरी वाचनाची दृष्टी. ती खूप वाचायची. मृत्यूपूर्वीच्या आजारातले सहा महिने सोडले, तर नव्वदीपर्यंत ती सतत वाचत होती. खांडेकर-कुसुमाग्रज ते नारायण सुर्वे, दया पवार असं सर्व काही तिने वाचलं होतं. त्यावर ती चर्चाही करत असे. आमच्या घरातल्या तिच्या विशिष्ट जागेवर बसून ती दिवसभर वाचताना दिसत असे. तिला आठवड्याला किमान एक पुस्तक लागायचं. तिच्यासाठी मी लायब्ररी लावावी लागली होती. चवथी शिकलेली माझी आई सत्तर वर्षांपूर्वी कोकणातल्या एका दुर्गम खेड्यातून आली होती. अजूनही या गावातून एसटी पकडायला नदी ओलांडावी लागते, पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या माझ्या वडलांशी लग्न करून ती मुंबईत आली. आणि नायगावच्या बीडीडी चाळीतल्या पोलीस लायनीत राहू लागली. तिथे राहत असताना तिने एक काचेचं कपाट घेतलं होतं. त्यात ती त्यावेळच्या फॅशनप्रमाणे स्टेनलेस स्टीलच्या कपबशा, ग्लास, अत्तरदाणी, फुलदाणी, चांदीचे पेले  वगैरे ठेवायची. नंतरच्या काळात मी या कपाटाचा एक-एक कप्पा पुस्तकांसाठी काबीज करत गेलो. त्यानंतर मी आणखी दोन पुस्तकांची कपाटं घेतली, पण ते आईचं कपाट आज आमच्या घरातलं सर्वांत आकर्षक पुस्तकांचं कपाट आहे.

तिने त्या काळात वडलांकडून जी दुसरी गोष्ट घेतली होती, तिचं मात्र मला अजूनही फार अप्रूप वाटतं. आमच्याकडे एक HMVचा ग्रामोफोन होता. त्याला चावी देऊन त्यावर आम्ही साडेतीन मिनिटांच्या रेकॉर्ड्स वाजवत असू. त्या ग्रामोफोनसोबत काही दुर्मिळ रेकॉर्ड्स होत्या. १९४७ मधल्या ‘जुगनू’ सिनेमातलं, महमद रफी आणि नूरजहान यांनी गायलेलं, ‘यहां बदला वफा का / बेवफाई के सिवा क्या है’ हे मधुर गाणं होतं. हे त्या दोघांचं पहिलं ड्युएट. ‘मशाल’ सिनेमातलं मन्ना डे यांचं ‘उपर गगन विशाल’ होतं. अशी बरीच सुंदर गाणी होती. वडलांच्या अकाली निधनानंतर  आम्हाला घरं बदलावी लागली, त्यात हा फोनो आणि रेकॉर्ड्स, सर्व नाहीसं झालं. ती गाणी मात्र अगदी चालींसहित आणि शब्दांसहित माझ्या आठवणींत आहेत. 

पण आईकडून/मला जी सर्वांत मोलाची गोष्ट मिळाली, ती होती : कुठल्याही माणसाकडे त्याची जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा विचार न करता पाहता येणं. यातल्या कुठल्याही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजगटाचा द्वेष न करणं.

ही किती मौलिक देणगी आहे, हे आजच्या वातावरणात मला विशेषत्वाने जाणवतंय. हेही जाणवतंय की, ही एक देणगी नसती तर बाकीच्या दोन गोष्टी निरर्थक ठरल्या असत्या. मग मीसुद्धा एकीकडे रफी-नूरजहान किंवा गुलाम अली-मेहदी हसन ‘एन्जॉय’ करत दुसरीकडे ‘मुसलमानांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे’ असं सांगत राहिलो असतो किंवा हिंदी कथा-कवितांचे अनुवाद करत, ‘भय्ये कसे माजलेयत’ याचा सोशल मीडियावर प्रसार करत फिरलो असतो.

मित्रहो, कबीरांनी ‘ढाई आखर प्रेम का’ म्हटलंय, पण गेल्या काही वर्षांत आपण द्वेषाची अडीच अक्षरं जवळ केलीयत की काय असं वाटू लागलंय. वीसेक वर्षांपूर्वी मी अनुवाद करू लागलो, तो याच बेचैनीतून. मला हिंदी भाषेत विद्वेषाला छेद देणारं जे काही लेखन सापडलं, ते मराठीत आणावं, या भावनेतून.

नंतर माझ्या लक्षात आलं की, अनुवादकाचं अस्तित्वच मुळात या उद्देशासाठी आहे. मला साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार मिळाला, त्या वेळी बोलताना मी ‘बायबल’मधल्या ‘टॉवर ऑफ बॅबल’च्या कथेचं उदाहरण दिलं होतं. या कथेनुसार, जलप्रलय होऊन गेल्यानंतर जे लोक उरले, त्या एकच भाषा बोलणाऱ्या लोकांनी शिनार इथे वस्ती केली. नंतर त्यांनी तिथे एक उंचच उंच मनोरा बांधायला सुरुवात केली. हा मनोरा पूर्ण झाला तर माणसाचे हात स्वर्गाला लागतील, अशी नेहमीप्रमाणे आकाशातल्या देवांना भीती वाटली. मग त्यांनी अनेक भाषा निर्माण केल्या. देवांच्या या कारस्थानामुळे माणसांमधला परस्पर-संवाद नष्ट झाला, त्यांच्यात द्वेषाच्या भिंती उभ्या राहिल्या आणि मनोऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही.

माझ्या मते, या भाषांमध्ये पुन्हा प्रेमाचे संबंध निर्माण करणं हे अनुवादकाचं एक प्रमुख कार्य असतं. 

या दृष्टीने मी काही साध्य करू शकलो का? किंचित करू शकलो असं मला वाटतं. माझं पहिलं भाषांतरित कथांचं पुस्तक होतं, उदय प्रकाशांचं ‘तिरिछ आणि इतर कथा’. ते वाचून एका मित्राने केलेला फोन आठवतो. त्याने आवाजातला तिरस्कार न लपवता विचारलं होतं, ‘भय्यांच्या भाषेत इतकं चांगलं लिहिणारे आहेत?’ मला अजून त्या वाक्याच्या वेदना होतात. कालांतराने मी ‘मुक्त शब्द’ मासिकासाठी अनेक वेगवेगळ्या हिंदी कथाकारांच्या कथा अनुवादित केल्या. त्यांचं पुस्तक झालं तर त्याला ‘भय्यांच्या भाषेतल्या कथा’ असं नाव द्यायचं मी ठरवलं होतं. नंतर अचानक अरुण प्रकाश यांची ‘भय्या एक्सप्रेस’ नावाची एक अप्रतिम कथा मिळाली. तिचा अनुवाद केल्यानंतर तेच नाव संग्रहासाठी ठरलं. पुढल्या वर्षांत बहुदा हा संग्रह येईल. पण सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन करणारा मित्र हल्ली फणीश्वरनाथ रेणु वाचतोय आणि रेणुंच्या काळात मराठीत त्यासारखं काहीच का लिहिलं गेलं नाही, याची चर्चा करतो.

आज महाराष्ट्रातले अनेक तरुण साहित्यिक मूळ हिंदी भाषेतले उदय प्रकाश वाचू लागले आहेत, हेसुद्धा या संदर्भात मला मोलाचं वाटतं.  

पण ज्यासाठी मी अनुवाद करायला उद्युक्त झालो होतो, त्या परिस्थितीत काही बदल झाला का, असा विचार केला, तर मात्र निराश व्हायला होतं. आज वीस वर्षांनंतर आपल्यासमोर जे द्वेषाचं आणि क्रूरतेचं साम्राज्य पसरलंय, त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे हा राक्षस आज शब्दशः लक्षावधी तोंडांनी आपला घास घेऊ पाहतोय. या साम्राज्याच्या विरोधात तोंडातून ‘ब्र’सुद्धा बाहेर पडू नये यासाठी असंख्य डोळे व कान आपल्यावर नजर ठेवून असतात.  

त्यात आज आणखी एका दुःखदायक गोष्टीची भर पडलीय. मी सुरुवातीला ज्या रफी-नूरजहानच्या गाण्याचा उल्लेख केला, त्यातल्या दोन ओळींचा लहानपणी न कळलेला अर्थ आता चरचरून लक्षात येतोय. ‘तमन्नाओं की बस्ती में / अंधेरा ही अंधेरा है / किसे अपना कहे कोई, / जो अपना था, / पराया है’ या त्या ओळी हल्ली सतत मनात घोळत असतात. अनेक वर्षं आपली मानलेली माणसं आज अचानक परकी भासू लागलीयत. ज्यांच्या सोबत मी वाढलो, आयुष्य वाटून घेतलं असे माझे अनेक जवळचे मित्र आणि आप्त या क्रूरतेचे भक्त झाले आहेत. ते तिचं समर्थन करताना पाहतो तेव्हा आपण एकटे पडत असल्याची भावना होते.

हिंदी कवी कुमार अंबुज यांची ‘क्रूरता’ शीर्षकाची एक कविता आहे. ही वीस वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे. मी तिचा त्या वेळी अनुवादही केला होता. ती आजही तशीच्या तशी लागू पडते. इथे मला विंदा करंदीकरांची आठवण येते. ते अखेरच्या दिवसांत, कविता वाचनाच्या कार्यक्रमांत ‘धोंड्या न्हावी’ ही त्यांची कविता वाचत तेव्हा सांगत की, ‘त्या कवितेत केशवपनाशी संबंधित असलेल्या ओळी आजकालच्या मुलांना समजत नाहीत; त्या कालबाह्य ठरल्यायत, आणि याचा मला आनंद होतो.’

ही कविताही कालबाह्य व्हावी अशी प्रार्थना करावीशी वाटते. असो, तिच्यातल्या काही ओळी इथे उद्धृत कराव्याशा वाटतात : 

धीरे-धीरे क्षमाभाव समाप्त हो जाएगा

प्रेम की आकांक्षा तो होगी मगर जरुरत न रहेगी

 ...... ...... ......

तब आएगी क्रूरता

पहले हृदय में आएगी और चेहरे पर न दिखेगी

..... ..... ......

फिर वह जनता का आदर्श हो जाएगी

निरर्थक हो जाएगा विलाप

दुसरी मृत्यु थाम लेगी पहली मृत्यु से उपजे आंसू

पडोसी सांत्वना नहीं एक हथियार देगा

तब आएगी क्रूरता और आहत नहीं करेगी हमारी आत्मा को

फिर वह चेहरे पर भी दिखेगी

लेकिन अलग से पहचानी न जाएगी

सब तरफ होंगे एक जैसे चेहरे

..... ...... ......

कोशिश सिर्फ यह होगी कि किस तरह वह अधिक सभ्य

और ऐतिहासिक हो

यांतल्या शेवटच्या दोन ओळी मात्र कालबाह्य ठरल्या आहेत. आता क्रूरतेच्या पुरस्कर्त्यांना सभ्यता दर्शवण्याचीही गरज उरलेली नाही. त्यांना आपला पाशवी चेहरा उघड होईल, याची आता फिकीर वाटत नाहीये. गोैरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्याविषयी जे काही गलिच्छ आलं, ते त्यांच्या खुनाइतकंच निर्दय होतं. 

आणि हे जगभरात चाललंय. अलीकडेच केव्हातरी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांच्या वेळी, ‘होय, आम्ही फॅसिस्ट आहोत’ असं मुठी वळवून/टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर सांगणारे गोरे इंग्रज मी पाहिलेयत. 

हिटलरचं ‘अडॉल्फ’ हे नाव लोक जेव्हा पुन्हा एकदा, सहजपणे, आपल्या मुलांना देऊ लागतील, त्यावेळी त्या नावामागचं, आणि दुसऱ्या महायुद्धातलं क्रौर्य आपण मागे टाकलं असेल, ते कालबाह्य झालेलं असेल, असं एक कुतूहलजनक विधान मी हॅरी म्युलिश यांच्या ‘असॉल्ट’ या कादंबरीत वाचलं होतं. दुर्दैवाने म्युलिश यांचं हे विधानच उलट्या दिशेने कालबाह्य केलं गेलंय. आता युरोपमधले काहीजण, त्या नावामागची भीषणता न विसरता, आपल्या मुलांची नावं अभिमानाने अडॉल्फ ठेवू लागलेयत, असं नुकतंच वाचायला मिळालं.

हे सर्व फार विषण्ण करणारं आहे. पण माझी ही विषण्णता मी तुमच्यापुढे का मांडतोय?

कारण या सतत डाचणाऱ्या दोन गोष्टी मला ग्लोबल वॉर्मिंगइतक्याच विश्वाचा विनाश करणाऱ्या वाटतात. आणि आम्ही जरी पराभूत झालो असलो, तरी हे हीन निपटून काढू शकतील अशा ज्या शक्ती आहेत, त्यात साहित्याचा क्रम फार वरचा आहे, यावर  माझा विश्वास आहे. जगभरातले सर्व सत्ताधीश त्यांना खुपणाऱ्या साहित्यावर बंदी आणू पाहत असतात, हे त्या ताकदीचं निदर्शक आहे. त्यामुळे इथे जमलेले तरुण कवी व कथाकार यांच्याकडे मी आशेने पाहतोय. या आयोजनात आणखी एक महत्त्वाचा घटक राहून गेलाय, असं मला वाटतं. काही तरुण अनुवादक अतिशय मोलाचं, माणसांना जोडणारं इतर भाषांतलं साहित्य मराठीत आणताना दिसतायत. त्यांचंही एक सत्र या युवा मेळाव्यात असावं, असं मी साहित्य अकादमीला सुचवू इच्छितो.

इथे आलेल्या कथाकारांनी मला माफ करावं की, मी या पिढीतील कथेपेक्षा कवितेशी जास्त जोडला गेलोय, ती जास्त वाचलीय. लोकवाङ्मय गृहात काम करत असताना आम्ही अतिशय आस्थेने त्या-त्या काळातल्या नव्या कवितेच्या संपर्कात राहिलो. आणि शक्य झाले ते संग्रह छापले. गणेश वसईकर, फेलिक्स डिसोझा, नामदेव गवळी, अगदी हल्ली-हल्ली ज्यांचे संग्रह आले, ते अनिल साबळे आणि संदीप जगदाळे, तसंच लोकवाङ्मय बाहेरचे विनायक येवले, सुचिता खल्लाळ, सत्यपालसिंह राजपूत असे अनेक कवी, यांची आजची कविता वाचताना जाणवतंय की हा अंधार अभेद्य नाहीय. त्यातून निश्चित मार्ग निघेल. विनोबांचं एक दिशादर्शक वाक्य आपल्या सोबतीला आहे. त्यांनी म्हटलंय, ‘एखाद्या लहानग्या दिव्याला तरी अंधार दिसला आहे काय?’

या वाक्यानिशी या संमेलनाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 November 2019

जयप्रकाश सावंत,

ती भय्यांची भाषा वगैरे जाउद्या. अनेक दशके मुंबईत राहून मराठीबद्दल तुच्छता बलागान्रे कोण आहेत त्याचा शोध घ्या म्हणून सुचवेन. हिंदीतलं साहित्य मराठीत आणण्याचा तुमचा उपक्रम स्तुत्य आहे हे निर्विवाद. त्याच सोबत मराठीचे घरभेदी कोण आहेत आणि त्यांचा कसा बंदोबस्त करायला हवा, यासंबंधी काही चिंतन असल्यास ते कृपया कळवा.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा