माझ्या मना बन दगड
पडघम - साहित्यिक
विंदा करंदीकर
  • विंदा करंदीकर
  • Thu , 07 November 2019
  • पडघम साहित्यिक विंदा करंदीकर Vinda Karandikar माझ्या मना बन दगड

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी चाललेला सत्ताकांक्षेचा (पोर)खेळ पाहून विंदा करंदीकर यांची कविता ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता कुणाला आठवल्यास नवल नाही. ज्यांनी मतदान करून सेना-भाजप युतीला निवडून दिले, त्या महाराष्ट्रातील जनतेची अवस्था या कवितेप्रमाणे झाली आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात कसलेही आश्चर्य नाही. काहीतरी होईल, कुणाचे तरी सरकार येईल, कुणाच्या तरी तोंडचा घास पळवला जाईल, पण महाराष्ट्रीय जनता मात्र आहे तिथेच राहील. म्हणून या कवितेचे वाचन अनिवार्य आहे...

............................................................................................................................................................

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळ्याला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, “कर हिंमत,
आत्मा विक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य!”
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!

बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दुःख तेच फार;
माझ्या मना कर विचार;
कर विचार : हास रगड;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐका टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
त्याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!

(४ नोव्हेंबर १९४९, रत्नागिरी)

............................................................................................................................................................

‘संहिता’ या मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेल्या आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने १९७५ साली प्रकाशित केलेल्या संग्रहातून साभार

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा