जीव तपशिलांच्या नजरकैदेत तळमळतो... (कादंबरीअंश)
पडघम - साहित्यिक
प्रशान्त बागड
  • कादंबरीकार प्रशान्त बागड
  • Thu , 31 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 नवल Naval प्रशान्त बागड Prashant Bagad

प्रशान्त बागड यांच्या ‘नवल’ या कादंबरीचा अंश. ही कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे.

.............................................................................................................................................

होस्टेलच्या दिशेने चालताना तो म्हणतोय : ‘upper’ म्हणजे ऊपर, ‘hideous’ म्हणजे हिडीस, ‘name’ म्हणजे नाम, ‘neat’ म्हणजे नीट.

आणि तो म्हणतोय : तुकारामांची ती प्रसिद्ध ओळ, ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण?’, म्हणजे तुकारामांच्या काळी—सतरावं शतक ना?—‘साबण’नामक वस्तू होती, तुकाराम साबण वापरत होते, साबणाचा दृष्टांत श्रोत्यांना सहज समजत होता, कशापासून बनवत असतील तो साबण? एखाद्या म्युझिअममधे असेल त्याचा नमुना?

याला जोडून तो म्हणत चाललाय, वहीतल्या पानावरच्या तुकाराम-उक्तीच्या शेजारी असलेल्या लहान बिळातून खालच्या साबणविषयक पानावर उतरल्यासारखा म्हणत चाललाय : ‘साबणाची वडी’ असं पुस्तकांमधे असतं ते का? साबण वडीएवढा लहान नसतो, एखादा असेलही, साबण वडीसारखा असतो हेही तसं खरंच, पण ‘साबणाची वडी’ असं प्रत्यक्षात कुणी म्हणतं आजकाल?

शिवाय तो म्हणतोय : या हवेत श्लेष आहे. रस्ता दिसतो प्रकाशाचा पाट. लालसा वाटते आणि लांब जावंसं वाटतं, लाल जावंसं वाटतं, लाही लाही जावंसं वाटतं. पण रस्ता, चाल, उलघाल दूर लोटतात. अभिलाषेचा विरह होतो. जीव तपशिलांच्या नजरकैदेत तळमळतो.

तो विचारासारखा वाहतोय.

नदीचा वळसाच रानमानवांचा तांडेल होतो, ढगच पक्ष्यांचा सुकाणू होतो, म्हणून तो पायवाट न पाडता या कुरणात, या कुराणात फिरतोय. फिरस्तीच्या ओघातून, रेतीतून, पल्लवीतून वल्हवत नवीन वळण-वाकण धुंडतोय.

धक्का बसल्यासारखी कशाची तरी आठवण होते. घाम फुटतो. आपला मोहरा तो माहीत नसलेल्या डिप्लोमा कॉलेजकडे वळवतो. सुदैवाने यादीत शोधायचा नंबर वहीच्या मागच्या पानावर लिहिलेला आहे. नाहीतर तेवढ्यासाठी होस्टेलला जाऊन परत इकडे यावं लागलं असतं. तोवर कॉलेज कदाचित बंद होऊन गेलं असतं. असो. आता नंबर यादीत बघून घेऊ, अ‍ॅडमिशन कधी घ्यायची वगैरे माहिती एखाद्या अधिकाऱ्याला विचारून घेऊ आणि रात्री एस.टी.डी. लावून त्यांना कळवून टाकू. मग सुटका. आज काय तारीख आहे? यादी कधी लागेल, नंबर कसा बघायचा, हे त्यांनी कळवलंच नाही. असो. कॉलेज प्रशस्त असून शेतांत विखुरलेलं, पुतळे पण इकडे तिकडे, पावसाच्या पाण्याचं डबकं, दगडी खांबांच्या पडवीत म्हणे याद्या लागतात, तिथे खरंच मोठमोठे फळे आणि त्यांच्यावर जुन्यापान्या याद्यांच्या निशाण्या, तिथे पोट सुटलेले काही इच्छुक विद्यार्थी आणि पालक अशी गर्दी, पण सगळं आटोक्यात आणि कारकुनांचा वावर, त्यांचे चष्मे, वरचष्मे, तेवढ्यात कुणीतरी अ‍ॅडमिशनचे सोपस्कार, खाचाखोचा समजावून सांगतं, मग कोरडे उपडे माठही दिसून येतात. पिशवीतून वही काढून उघडून नंबर दोनदा वाचून तो याद्या बघायला लागतो, तेव्हा एक पाल्य ब्रीफकेस उघडून फाईल बाहेर काढताना खाली पडतो तर पालक त्याला उचलून उठवतो. नंबर सापडत नाही. नंबर जिथे असण्याची शक्यता आहे तो फळा, त्यावरच्या सगळ्या याद्या तो बारकाईने वाचतो. याद्यांवरचे तीन नंबर्स तो नमुन्यादाखल तपासतो. प्रत्येक नंबरात सुरुवातीला एक इंग्रजी अक्षर आहे आणि नंतर एकूण नऊ अंक आहेत. वहीत टिपलेल्या मनोज शिंदेच्या नंबरातही इंग्रजी आद्याक्षर आणि नऊ अंक आहेत, म्हणजे नंबर बिनचूक आहे. निदान बिनचूक प्रकारचा आहे. म्हणजे खुद्द नंबर आपण चुकीचा उतरवून घेतल्याची एक शक्यता आहेच. वैताग. किती नंबर्स आज लागले असतील? एक हजार? दोन हजार? एक-दोन हजार नंबर्स आपण वाचून काढू. तो पहिल्या फळ्यापासून सुरुवात करतो. लोक ढकलायला लागतात. नंतर एक जण म्हणतो, तुम्ही किती वेळ बघताय? तो म्हणतो, बघावं लागतं. पहिला फळा बघून होतो, पण दुसरा फळा बघताना कंटाळा यायला लागतो. एका कोपऱ्यात महात्मा फुलेंचा पुतळा दिसतो, त्यांची पगडी दिसते. तो थकून खाली बसतो. आजूबाजूला लोक करिअरची चर्चा करतात. काहींनी ‘फिशरीज’लाही नंबर लावून ठेवला आहे. तिथे लागला तर तिथे. काहींच्या मते शेतकी कॉलेजमधे काय वाईट आहे? काहींच्या ओळखीतल्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी सरळ बी.सी.एस. करायचं ठरवलंय. बारावीनंतर डिग्रीलाही जाता येतं, डिप्लोमालाही जाता येतं, डिग्री डिप्लोमापेक्षा मोठी, तर डिप्लोमाला जाण्याची आकांक्षा लोक धरतातच का? मार्क कमी पडले तर डिप्लोमाला जावं लागतं असं म्हणावं तर डिप्लोमाच करायचा या भावनेने एवढी गर्दी इथेच झाली आहे पुणे केंद्रावर. आपल्याशी संबंध नसलेले हे विचार तो बाजूला ठेवून देतो न देतो तोच मुलींची एक फौज येते. या मुलीसुद्धा डिप्लोमात रस घेतात असं म्हणत तो परत याद्या बघायला लागतो. भरपूर ट्यूबलाइट्स दिवसाच पेटलेल्या, कोपऱ्यात शिपाई बसलेल्या एका ऑफिसात जाऊन तो अधिकाऱ्याला आपली अडचण सांगतो. अधिकारी म्हणतो, आज नंबर सापडला नाही तर चोवीस तारखेला या, तेव्हा तिसरी यादी लागेल. कुणीतरी म्हणतं, म्हणजे आज दुसरी यादी लागलीहे का? अधिकारी उत्तरतो, साहेब, प्रत्येक फळ्यावर टायटल लिहिलंय ना आम्ही! मनोज शिंदेच्या नावाने चडफडत तो बाहेर येतो. नंबर शोधणं खरं म्हणजे इतकं कठीण नाहीये. मनोज शिंदेचा नंबर लागलाच नसेल. नाहीतर त्यांनी चुकून रिसीटवरचा दुसराच नंबर कळवला असेल. आपण त्याच्या वडलांना सरळ ‘नाही’ म्हणून टाकायला पाहिजे होतं. पण ‘मी पुण्यात नवखा, माझंच बस्तान बसायला वेळ लागेल, मला जमणार नाही’ असं मुखदुर्बळपणामुळे म्हणता आलं नाही. मुखदुर्बळपणा किंवा ‘व्यावहारिक हुशारी’चा अभाव. साला मनोज शिंदे. तो परत व्हरांड्यात खाली बसतो आणि निरुद्देश होऊन जातो आणि कफल्लक होऊन जातो आणि झाडीतून येणारे बेसुमार लोक बघतो तर त्याच दाटीतून मनोज शिंदे आणि त्याचे पांढरा शर्ट घातलेले वडील इकडेच चालत येताना दिसतात. शिंदे वडलांना त्याच्याबद्दल सांगतो. वडील दखल घेतात पण दुर्लक्ष करतात, राग दाखवतात. शिंदे कसाबसा हसतो. याला दुःख होतं. हे प्रकरण ताबडतोब मिटवावं, निसटावं, अदृश्य व्हावं असं त्याला होऊन जातं. शिंदेचे वडील तारांना लावलेल्या मातकट पडद्यांच्या ऑफिसमधे कागदपत्रं घेऊन जातात त्या मोकळेपणात तो शिंदेला सर्व सांगतो: त्याला आजच आठवलं. कॉलेज, होस्टेल, पुणं यांच्या नादात तो विसरून गेला. त्यात शहराची काहीच माहिती नाही. आज आठवलं तसा तडकाफडकी तो इथे येऊन थडकला. केव्हापासून याद्या बघतोय. नंबर सापडत नाही. रात्री एस.टी.डी. करून कृष्णाकाकांकडे कळवणारच होतो. तेवढ्यात तुम्ही दोघं दिसलात. तर शिंदेची गोष्ट थोडक्यात अशी असते: त्याचं नाव पहिल्याच यादीत लागलं. पंधरा तारखेला. सतरा तारखेपर्यंत याच्याकडून फोन, निरोप, कार्ड, चिठ्ठी काहीच नाही. काहीच माहीत पडलं नाही. अठरा तारखेच्या दुपारपर्यंत वाट पाहिली. मग काकूंच्या माहेरी निगडीला फोन केला. त्यांनी कुणाला तरी धाडून चौकशी करून महाळगावला कळवलं. मग मुलगा आणि वडील निघाले. आज अ‍ॅडमिशन झाली. शिंदेचे वडील बाहेर येतात. शिंदेला जरबेने ऑफिसात काय झालं ते सांगतात. सगळी नवीन माहिती नीट ध्यानात घे असं बजावतात. मुद्दाम वेळ लावून फाईल उघडून कागदपत्रं जुळवून उलगडून पुन्हा जुळवून लावतात. मग त्याच्याकडे बघून म्हणतात, तुझं सगळं व्यवस्थितहे ना भो? कॉलेज-बिलेज? आणि नूतन क्षितिजाकडे बघितल्यासारखं दूर बघतात. तो म्हणतो, मी मनोजला सगळं सांगितलंहे. तुमची मनीऑर्डर वेळेवर आली होती. मी जातो.

ताड ताड चालत तो निघतो. रसवंती दिसते, रस प्यायची इच्छा होते, खिशात पैसे असतात, पण तो थांबत नाही, कारण मनोज शिंदे आणि त्याचे वडील इथेच आसपास आहेत, तो पुढे जातो. का पर्वा करायची आपण?—असं म्हणत तो दोनेक चौक ओलांडल्यावरही मागे वळतो, रसवंतीत येतो, रस पितो, रसात आलं वगैरे घातलेलं असतं, रस पिऊन डिप्लोमा कॉलेजात प्रवेशणारा अंधार बघून चालायला लागतो.

खोलीला कशाचं भान नाही.

त्याचं असं झालं होतं. तो पुण्याला जाणार असं कळल्यावर कृष्णाकाकांच्या दुकानात नेहमी येणारे शिंदेचे वडील तिथे बसल्या बसल्या त्याला म्हणाले होते, आपल्या मनूचा नंबर पाह्यजो मग डिप्लोमाचा, एक फोन इथेच कृष्णाभाऊकडेच करून कळव, लिस्टी लागायला लागल्याहेत म्हणे, तू कधी निघतोहे? माझं नक्की नाही, पण बघतो, असं मोघम आशावादी व मनुष्यांच्या देवाणघेवाणीला साजेसं तो म्हणून गेला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी लिस्टमधे बघायचा नंबर टिपूनच दिला, तेव्हा तो प्रकार बऱ्यापैकी वास्तविक होऊन गेला होता. तरी ते आपल्यावर विसंबून आहेत असं काही त्याला वाटलं नव्हतं. गेल्या आठवड्यात मात्र होस्टेलच्या पत्त्यावर त्याच्या नावाने त्यांची चाळीस रुपयांची मनीऑर्डर आली होती. मनीऑर्डर फॉर्मवरच्या लिहायच्या जागेत पुन्हा नंबर कळवला होता आणि येण्याजाण्याची आर्थिक तोशीस विद्यार्थ्याला पडू नये म्हणून पैसे पाठवल्याचं लिहिलं होतं. पोस्टमन त्याच्या नावाचा खाकी पुकारा करत आला होता. जिन्याच्या पायऱ्यांवरची मुलं विचारायला लागली होती, कितीची मनीऑर्डर? कितीची? खांद्यावर नॅपकीन, हातात दाढीचं सामान, ब्रश-रेझर वगैरे घेऊन चाललेला मनीष म्हणाला होता, चाळीस रुपये रे फक्त? घरून? एका मित्राने कामासाठी पाठवले आहेत असं म्हणून मुलांना पिटाळलं होतं. तरी एक जण म्हणाला होता, फक्त चाळीस? पुरे पन्नासबी नाही? भल्ता चिक्कूहे मित्र!   

खोलीत आल्यावर तो ती मनीऑर्डर शोधून फाडून तुकडे तुकडे करून फेकून देतो. शिंदेचा नंबर लिहिलेला वहीतल्या पानाचा भाग फाडून टाकून देतो. जिना दोनदा चढतो-उतरतो. काहीतरी निश्चय करावा असं त्याला प्रकर्षाने वाटतं. काय ठरवावं? नकळत काहीतरी ठरवलं गेलं पाहिजे. ‘जिना इसी का नाम है’ म्हणत जिना उतरणाऱ्या हास्यवादी मनीषला तो चिटोरे चिटोरे दाखवत सांगतो, तोडला मी करार, हा बघ, ही परवाची मनीऑर्डर. आता खुलेआम तळमळत तो बेलाशक म्हणतो: आता आपण आपले आपण; आता आपलं पोट अप्पलपोट.

आता तो आळंदीला चाललाय. एकदा शनिवारवाडा ओलांडल्यावर लागलेल्या पुलाचे आणि पुलावरच्या दिव्यांचे ब्रिटिशकालीन वाटतील किंवा ब्रिटिश राजवटीवरच्या सिनेमातले वाटतील असे रंगढंग बघत; स्वस्त अननसांच्या, विक्रेत्यांच्या, ग्राहकांच्या गर्दीतून, आरोळ्यांतून मार्ग काढत; डावीकडच्या पानं पडलेल्या, उपाख्यानासारख्या, सुशागाद पायऱ्या उतरत; तो महापालिकेच्या, ‘कॉर्पोरेशन’च्या या बसस्थानकाशी आला होता. आणि एका सायंकाळी सुधीर काळेबरोबर आला होता. केव्हातरी आळंदीला जाणारी बस की ‘आळंदी’ नावाची बसची पाटी दिसली होती. म्हणून आज मेसवर जेवल्यावर तो थेट इकडेच गुपचूप आलाय.

आळंदीच्या फलाटावर एकच बस उभी. आत एक-दोन चेहरे. तेवढ्यात एक पायजमा-सदरा घातलेला माणूस चढतो. हा थोडा वेळ खालीच थांबतो. बाकावर टेकतो. ड्रायव्हर-कंडक्टर अजून कुठे दिसत नाहीत. इतर अनेक ड्रायव्हर-कंडक्टर इकडे तिकडे दिसतात, पण या बसचे दिसत नाहीत. ते दिसल्या दिसल्या ओळखू येणार आहेत जणू. पण असं असतंच. शिवाय बसला पाटी लावलेली नाही. ही आळंदीचीच बस हे कशावरून? आणि नावाची पाटी लागलेली बस आळंदीलाच जाईल हे कशावरून? क्लिशेड आणि क्लासिक. बसमधे चढून बघतो तर मघाशी बाहेरून न दिसलेला, लाल मुंडासं घातलेला एक माणूस एका कोपऱ्यात बसलेला दिसतो. आणखीन एक जण खात बसलेला. हा परत खाली उतरून सावलीत उभा राहतो. शाळेतली चिक्कार मुलं-मुली लगबगीने आपापल्या फलाटांकडे जातात. समोर नदी आहे यावर विश्वास बसत नाही. धनूचा पुणेरी मित्र परवा म्हणत होता, नदीला कधीचाच मुडदूस झालाय. पुलाखालून बसेस निर्विकारपणे निघतात, धडधडत थांबतात. हा शेवटचा थांबा. तुरळक लोक हळूहळू उतरतात. शेवटच्या स्टॉपपर्यंत कशाला जायचं असं म्हणत कैक लोक अगोदरच्याच लहान लहान स्टॉप्सवर उतरून गेले जणू. हा शेवटचा स्टॉप पोरका. एकदा वनखात्याने आयोजित केलेल्या निबंधस्पर्धेसाठी पाठवलेल्या निबंधात वृक्षतोडीमुळे प्राणी ‘पोरके’ होतात असं म्हणण्याऐवजी ‘पोरकट’ होतात असं त्याच्या हातून लिहिलं गेलं होतं. डोक्यावर शेकडो कबुतरं. कबुतरांची चढाओढ लावणारे खेळत असावेत. सोनगीरकर कालच सांगत होता. कबुतरं मागे-पुढे करतात, फेर धरतात, सूर मारतात, गोताखोर होतात, ढगांवर त्यांचा वहीम आहे. कंट्रोल रूमपाशी ड्रायव्हर-कंडक्टर लोकांचा ताफा, खाकीवर स्टीलचे बिल्ले. ते सगळेच उच्चरवात बोलतात. बसेसचा, रहदारीचा, पुलावरच्या खरेदीविक्रीचा, प्रवाशांच्या बोलण्याचा, हालचालींचा आणि थांबून राहिलेल्या, वाट बघणाऱ्या सर्वांच्या सुप्त तक्रारींचा आवाज चेंगरून टाकण्यासाठी ते असे मोठ्याने बोलताहेत. वास्तव आहे ते फक्त बसेसच्या येण्याजाण्याचं, थांबण्याचं, वेळापत्रकाचं, बसच्या टाकीत भरायच्या पाण्याचं, टपांचं, मासिक पासच्या खिडकीचं, सांडलेल्या पेट्रोल-डिझेलचं असं तो आवाज सांगत राहतोय. एकदा ते सारे खळखळून हसतात.

तो न राहवून बसमधे चढतो. मागे-पुढे करत एका सीटवर बसतो. उंचावरून नदीकाठ सपशेल दिसू लागतो. बसेस मधे येतात, तुकडे पाडतात.

इकडे तिकडे बघत तो बसमधल्या एका मोठ्या माणसाला विचारतो, “ही बस आळंदीला जाईल ना?”

तो मनुष्य याला आपादमस्तक न्याहाळत म्हणतो, “तुम्हाला कुठं जायचं?”

“आळंदीला.”

“मग जाईल ना आळंदीला.”

हा हसतो.

“कोणत्या आळंदीला जायचं तुम्हाला?”

“आळंदीला.”

“कोणती आळंदी?”

“म्हणजे?”

“चोराची आळंदी का देवाची आळंदी?”

तो सभ्यपणे हसत, विचार केल्यासारखं करत, ठाम सुरात, सामील झाल्यागत म्हणतो, “देवाची आळंदी.”

विचारणारा, परीक्षा घेणारा मनुष्य मस्त हसतो, म्हणतो, “बसा मग निवांती.”

एकतारी हाती असलेलं एक जोडपं येतं. शाळेतली आगाऊ मुलं येतात. बोचकं घेतलेले येतात. एका क्षणी बस जवळजवळ पूर्ण भरते नि सुस्कारा सोडत निघते.

कंडक्टर म्हणतो, “बस लाँग रूटचीहे, जवळजवळच्ये बसू नका.”

प्रवासी दुर्लक्ष करतात. एक जण मुद्दाम जवळच्या कोणत्यातरी स्टॉपचं तिकीट मागतो.

कंडक्टर खवळतो : “मी कानडीत सांगतोहे का मघासपास्नं?”

मुद्दाम जवळचं तिकीट मागणारा चिडत नाही : “तिकीट फाडा.”

शहर मागे पडल्याचा भास होतो पण पुणं पुसटत नाही. उलट शहराच्या नव्या नव्या शाखा-प्रशाखा, उभ्या-आडव्या वस्त्या, चौक, पुतळे, कारंजे, कंपन्या उलगडल्यासारख्या दिसत राहतात. गावभाग संपून मोकळं मैदान लागेल, टेकड्या-बिकड्या लागतील, मोठ्ठ्या पटावर टिटव्या-बिटव्या दिसतील, तंद्री लागेल, असं काही होत नाही.

मधेच कंडक्टर म्हणतो : “इथं टाकसाळहे का मालक? पाय आतमधं घ्या.”

या कंडक्टरला आदर्श राज्य किंवा आदर्श नागरिक असा ग्रंथराज लिहायला सांगितलं पाहिजे. तरच त्याचं काही खरं आहे.

एक भारदस्त कॉलेज दिसतं. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. इथे कोण शिकत असेल?

शेजारचा माणूस जास्त जास्त जागा बळकावण्याचा प्रयत्न करतो. आळंदीचं बसस्टॅंड येतं. बस मागेपुढे करत, गोल फिरत, ड्रायव्हरचं समाधान होईपर्यंत एका खांबाला वळसा घालून थांबते. शहाणेसुरते अगोदरच उतरते झाले. वैताग.

मघाचा परीक्षक माणूस याला गाठून म्हणतो, “दर्शनाला ह्या सरळच्या रस्त्यानं जा.”

त्या इसमाला चुकवत, शेवटची बस कधी निघते याची चौकशी करत, थोडं अडखळत तो त्या समोरच्या रस्त्याने चालायला लागतो.

मोहाडीला, फागण्याला, तरवाड्याला पाहिलेल्या घरांसारखी घरं, काळे खांब, नक्षीच्या खिडक्या, वरच्या मजल्यावर पोपट-बिपट, सारवलेलं अंगण, कुठे उघडी गटार, माश्या, गल्लीबोळ. एका दाटीवाटीतून बुक्का लावलेली, टोप्या घातलेली लहान लहान मुलं बाहेर पडतात. एक वारकरी पाठशाळा दिसते. व्हरांड्यातल्या बंगळीवर एक बुवा बसलेले. वरच्या माळ्यावरच्या खिडकीत गादीच वाळत टाकलेली. नंतर वाट चिंचोळी होत जाते. दुकानं दुकानं लागतात. मधेच फिल्मी संगीत. आशिकी? चहाची अनंत दुकानं. चहा कुणाला चुकत की चुकवत नाही. एक माणूस ओट्यावरूनच सर्वांदेखत चूळ भरतो. ठीक. टाळ, चिपळ्या, समया, ज्ञानेश्वरांचे फोटो, हरिपाठाचे अभंग, विठ्ठलमूर्तीचे फोटो, रेवड्या, पेढे, फुलं विकायला. विक्रीच्या सामानाची लांब ओळ. मधेच कुंकवाचा डोंगर. मुख्य मंदिर कुठे असेल? दोन दुकानांच्या फटीतून नदीचं पाणी चमकतं. आधी तिकडे जावं का? समाधी कुठे आहे? पुस्तक लिहून झाल्यावर समाधी घेतली या विचाराचं त्याच्यावर दडपण यायला लागतं. हा कार्यकारणभाव आपण उगीच जोडला असं म्हणत तो चरफडतो. भजनी लोक, दुकानं, फुलांच्या माळा, झेंडे, लाऊडस्पीकर टाळून तो इंद्रायणीकडे येतो. घाट बऱ्यापैकी स्वच्छ आहेत. नदी पाण्याच्या पावलांनी चालत गेली आहे. तो राह्यला तो डोंगर, कुणीतरी म्हणतं. काठावर लहानसहान मंदिरं आहेतच. एक गाइडसारखा माणूस एका गटाला सांगतो, चांगदेवाची भिंत इथून काही मैलांवर फक्त आहे. पाण्याला आकाश फुटतं. तो माघारी फिरून मुख्य स्थानाकडे येतो. लहानसंच, कोंदट देऊळ असतं. आत तो फार वेळ थांबत नाही. एका झाडाखाली बरेच लोक शांत बसलेले. कुणी पोथी पुटपुटत वाचतंय. हाच अजानवृक्ष. नजिकान्वय. सावलीच्या घागरीत भाविक बसलेले. जाताना कमीत कमी किंमतीची ज्ञानेश्वरी घेऊ. पुन्हा दगडी महिरपी खुणावतात. घाटाच्या दगडांतही कणांचं, शितांचं दाट पाणी दिसतं. हा संपूर्ण किनारा अखंड चालून पाहिला पाहिजे. एक जवान माणूस बुलेट उडवत घाटावरच चक्क येतो. गावकरी असावा. पलीकडच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसलेले लोक दिसतात. समाधी कल्पनेसारखी नाही. तिच्या ठायी जराही मोकळेपणा नाही. एक अन्वेष्टी पक्षी पाण्याचा पृष्ठभाग चोचीने चादरीसारखा वर ओढून घेऊ पाहतो. कधीतरी सिनेमात पाहिलेला समाधीचा प्रसंग, राऊळ, शिळा मनात नीरव गर्दी करतात. वारा पाणी विंचरतो. कुणीतरी हाक मारतं. नवकवी वाटावा असा माणूस.

“माचीस मिळेल का?”

“नाही.”

“माचीस?”

“नाही.”

मग हा मुद्दाम म्हणतो, “त्या देवळात विचारून बघा.”

तो माणूस हसून, खांदे उडवून, सिगरेटशी खेळत, चंडोल-चालीने चालायला लागतो.

समोरच्या एका मंदिराचा पडका संसार ओझरता बघून तो चारदोन गल्लीबोळ लक्षात घेतो. एका ठिकाणी तीन मुलं चिंचोक्या खेळतात. ऐन बाजारात येऊन तो एका दुकानातून चार पेढे विकत घेतो. पुन्हा नदी, काठ, घाट, जळातल्या पायऱ्या. चांगली जागा शोधून प्रवाहाकडे, गंगाजमनी ढगांकडे पाहत पेढे खात बसतो. चवीचे इमले नसतात पण चवीला पैलू असतात. पेढे लगेच चुटपूट लावून संपतात. कुठल्याशा फुलाचा मंथर वास आल्यासारखं वाटतं. महाळगावची गणपती मंडळं रोज रात्री नाटकं करतात. त्याला ‘डेकोरेशन’ म्हणतात. चुकूनही ‘नाटक’ म्हणत नाहीत. एकदा गावहोळी चौकातल्या प्रसिद्ध मंडळात त्याचा एक वर्गमित्रच ज्ञानेश्वर झाला होता. तलम सोवळं नेसून कुटीबाहेर तो मित्र उभा आहे आणि त्याच्या खांद्यावर एक शुभ्र कबुतर येऊन बसतं. लोक टाळ्या वाजवतात. क्षितिजापासून हूल उठते. पिक्चरमधला समाधीचा प्रसंग परत आठवतो. सर्वांत स्वस्त ज्ञानेश्वरीची प्रत वीस रुपयांना मिळते. पाय दुखेस्तोवर तो पुस्तकं चाळत उभा राहतो. टाळ हाती घेऊन बघतो. उतरत्या प्रकाशातल्या अर्धपरिचित गल्ल्या पार करत बसस्टॅंडवर येतो.

हे काळसर-निळसर-गेरुसर पुणं आपणच आळंदीला जाऊन तयार केलं असं उद्गगारत तो खोलीवर येतो.

धनू म्हणतो, “या, माऊली! सोनगीरकर म्हणे, तो एकटाच गेला!”

“ह्ह्होय्य्य्य.”

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा