आमच्या ‘उत्कट’ जगण्याला बाबांच्या ‘उत्तुंगते’ची किनार आहे! 
पडघम - साहित्यिक
भक्ती चपळगावकर
  • नरेंद्र चपळगावकर
  • Mon , 28 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 नरेंद्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar

माजी न्यायमूर्ती आणि मराठीतील प्रसिद्ध लेखक नरेंद्र चपळगावकर यांचं त्यांच्या मुलीनं रेखाटलेलं हे व्यक्तिचित्र...

.............................................................................................................................................

माझ्या आई-बाबांना चार मुलं. आम्ही चौघंही स्वभावानं अगदी वेगळे आहोत. पण तरीही आम्हा मुलांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. आम्ही माणसांमध्ये रमतो, आमच्या आजुबाजूला असलेल्या लोकांना काही अडचणी असतील तर आम्ही त्या आमच्याच अडचणी आहेत, असं मानून चालतो. (बऱ्याचदा फुकटचे सल्ले देतो!). आम्हाला कला, साहित्य, संगीत, सिनेमे इत्यादी गोष्टींमध्ये रस आहे, पण आम्ही कर्मकांड मानत नाही वगैरे वगैरे. त्यातल्या त्यात माझा भाऊ शांत आहे, आणि आपल्याच जगात गुंतलेला आहे, पण आम्हा तिघींचा पसारा मोठा आहे. या पसाऱ्याला जबाबदार आहेत आमचे आई-बाबा. त्यांनी कधी आम्हांला पांढरपेशा राहायला शिकवलंच नाही. उलट जगणं जितकं उत्कट, (पॅशनेट) जगता येईल तितकं जगायचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. या उत्कट जगण्याला किनार आहे बाबांच्या उत्तुंगतेची.  

वडील म्हटलं की फार वेगळ्या कल्पना असतात. पण बाबा कधी सामान्य वडील कधी नव्हते, ना नवरा, ना आजोबा. माझ्या जन्मापूर्वीचे राजकारणी बाबा, पत्रकार बाबा, नंतरचे वकील बाबा आणि मी शाळा-कॉलेजात असतानाचे न्यायाधीश बाबा आणि सध्याचे लेखक बाबा, या सगळ्या रूपांमध्ये त्यांचं करिअर बदलत राहिलं तरी त्यांची प्रत्येक कारकीर्द अतिशय यशस्वी झाली. ती यशस्वी करण्यासाठी ते दिवस-रात्र झटत होते आणि त्याचबरोबर एक मोठा कुटुंबकबिला सांभाळत होते. या सगळ्या लटांबरात (हा खास माझ्या आईचा मराठवाडी शब्द) मी एका कोपऱ्यात होते. तीन मुलींपैकी सगळ्यात धाकटी मुलगी. माझ्यापाठोपाठ एक भाऊ.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बाबांचा जन्म आणि बालपण बीड या आमच्या गावी गेलं. ‘आठवणीतले दिवस’ या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या लहानपणी बीड कसं होतं, याचं फार सुंदर वर्णन आलं आहे. गाव छोटं होतं, टुमदार होतं. मोजकी घरं होती. सामाजिक, आर्थिक प्रश्न होते, पण आयुष्य गुंतागुंतीचं नव्हतं. गावात चपळगावकरांचा एक वाडा होता, ज्यात काही कुटुंबं एकत्र राहत. बाबा लहान होते, तेव्हा निजामाच्या अन्यायी राजवटीच्या विरोधातला संघर्ष निकरावर आला होता. त्यांचे वडील या लढाईत सामील होते. बऱ्याचदा आजोबा तुरुंगात असत. बाबांचा शाळेत प्रवेश झाला, तेव्हाही ते तुरुंगात होते. त्यामुळे त्यांची जन्मतारीख शिक्षकांनी अंदाजानं लावली. बाबांना शाळेत प्रवेश तर लवकर मिळाला, पण ते नोकरीतून जवळपास १५ महिने आधी निवृत्त झाले. ते त्यांच्या सख्याचुलत भावंडांमध्ये सगळ्यात मोठे. त्यामुळे ते जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला, असा उल्लेख त्यांच्याच ‘आठवणीतले दिवस’मध्ये आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजोबांनी राजकारणात प्रवेश केला, पण फार लवकर त्यांचा भ्रमनिरास झाला. इतका की त्यांनी पुढच्या आयुष्यात कधीच राजकारणात भाग घेतला नाही. आयुष्यभर वकिली केली आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालयासारख्या संस्थांसाठी काम केलं. पुढे त्यांनी गावाबाहेर एक बंगला बांधला. मग आजोबांचे कुटुंब गावातल्या वाड्यातून बंगल्यात राहायला आलं. घर मोठं असावं, त्यात घरातल्या सगळ्या सदस्यांची सोय व्हावी आणि त्याचबरोबर घरी भेटायला, राहायला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था असावी, हा विचार आजोबांनी केला होता. बाबांनी पुढे स्वतःचं घर बांधलं, तेव्हा त्यांनीही हात आखडले नाहीत.

बाबांच्या लहानपणाबद्दल किंवा त्यांच्या भावविश्वाबद्दल फारशी माहिती मला नाही. म्हणजे वरवरची आहे. ते कुठे राहिले, त्या वेळी गावातली परिस्थिती कशी होती, वाड्यावर कोणकोणती कुटुंबं राहात होती. जुन्या चालीरीती कशा होत्या वगैरे. पण सतत वडील तुरुंगात असल्यामुळे ते लहान असताना त्यांना त्यांची आठवण यायची का, अतिशय श्रीमंत चुलत्यांच्या बाजूला अत्यंत हलाखीत दिवस काढत असताना त्यांना काय वाटत असेल, गरिबीमुळे त्यांना कधी अवहेलना सहन करावी लागली का, अशा प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ते शाळेत असताना काही दिवस अमरावतीला शिकायला होते. त्या काळात काय झालं याचे तपशील मला माहीत नाहीत. त्यांचं खाजगी विश्व त्यांच्या सामाजिक विश्वात दडपलं गेलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांत मराठवाड्याचा सामाजिक इतिहास विस्तारानं आला आहे. निझामी राजवट, संस्थानातली माणसं आणि निझामकालीन सामाजिक जीवन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. मला नेहमीच कुतूहल वाटतं, त्यांच्याबद्दल. पण थोड्या विस्कळीत आठवणी सोडल्या तर ते फार बोलत नाहीत. त्यांची आई आणि आजी त्यांचे खूप लाड करत. अगदी लहानपणी ते बऱ्याचदा रात्री रडत रडत उठत. त्यांच्या दिमतीसाठी दोघीजणी दहीदुधसायभात तयार ठेवत, असे माझी आई सांगते. दही, दूध, साय, भात या चार गोष्टी त्यांना अती प्रिय आहेत त्या तेव्हापासून. अजून एक गोष्ट आम्हाला माहीत आहे, ती म्हणजे ते लिहायला-वाचायला फार लहानपणी शिकले, अगदी शाळेत जायच्या आधीच. तेही सिनेमाचे पोस्टर लावून गावात फिरणाऱ्या गाडीवरील अक्षरं वाचता वाचता. पण हे काही उल्लेख सोडले तर प्रथमपुरुषी एकवचनी लिहिण्याचा त्यांचा स्वभाव नाही.

सायली, मेघना आणि मी

बाबांबरोबर आम्ही सुरुवातीला आमच्या गावी, बीडला राहिलो, नंतर थोडा काळ मुंबईला आणि मग औरंगाबादला स्थायिक झालो. बीडच्या आठवणी फार थोड्या आहेत, कारण मी जेमतेम दोन-अडीच वर्षांची असताना आम्ही बीडमधून बाहेर पडलो. एक आठवण आहे. ती माझी पहिली आठवण. त्यात बाबा आहेत. मी जेमतेम चालायला लागली आहे. मला गोवर झालाय. तापानं मी फणफणली आहे. कदाचित त्या वेदनांमुळे ती आठवण टिकून राहिली आहे. त्या तापात बाबांनी मला कडेवर घेतलंय आणि ते घराला जोडून असलेल्या त्यांच्या कचेरीत मला घेऊन पंख्याखाली उभे आहेत. आतून आई काहीतरी बोलतेय, तिला ते सांगताहेत, पंख्याखाली हिला जरा बरं वाटेल. माझं रडणं थांबलंय आता. ते त्यांच्या कचेरीच्या बाहेर येतात. बाहेर दाराच्या उजव्या बाजूला एक मोठं काटेरी, गावठी गुलाबाचं झाड आहे. त्या गुलाबाला एक टपोरं फूल फुललंय. बाबा मला ते फूल दाखवतात. माझ्या अडीच वर्षांच्या आयुष्यातली ती सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझे डोळे विस्फारलेले असावेत. माझ्या नजरेसमोर अजून तो टपोरा गुलाब आहे!

आई-बाबांचं लग्न झालं, तेव्हा आई अवघी सोळा वर्षांची होती. बाबा वकील होते आणि सामाजिक कामांमध्येही गुंतलेले होते. वयातलं अंतर या गोष्टीला त्या काळी फार महत्त्व नव्हतं. एकेकाळी अतिशय श्रीमंत असलेल्या आईच्या माहेरी त्यांच्या लग्नाच्या वेळी गरिबी होती. आजोबांना गरिबी-श्रीमंती असे भेद मान्य नव्हते आणि त्यांनी त्या काळी एक रुपयाही हुंडा न घेता किंवा पत्रिका न बघता आई-बाबांचं लग्न लावलं. इतकंच नाही तर लग्नाला लागणारा खर्च मुलीच्या वडलांना झेपणार नाही, असं लक्षात आल्यावर तो खर्चही त्यांनीच केला. आजी-आजोबा सश्रद्ध होते, पण कर्मकांड आणि अनावश्यक चालीरीती यांना त्यांनी सुरुवातीपासूनच सोडून दिलं होतं. या लग्नानंतर आजोबांना एक लहान मुलगी आपल्या घरी आली आहे, तिची काळजी घेतली पाहिजे, असं वाटायचं. त्यामुळे आई स्वयंपाकघरात गेली की, ते हळूच दाराबाहेर उभे राहून म्हणत, ‘बाळ, स्वयंपाक करताना पदर नीट खोच, नाही तर तुला चटका बसेल’. आजोबांच्या स्वभावातला हा हळूवारपणा बाबांमध्येही आहे. आता आम्हा तिन्ही बहिणींनी चाळिशी पार केली आहे, पण आजही ते माझ्याकडे आले की म्हणतात, ‘भक्ता तुला किती काम पडतं!’ रात्री उशिरा येऊनही सकाळी मुलांना तयार करून शाळेत पाठवून स्वतः ऑफिसला जाणारा माझा नवरा, ते असं काही बोलले की, माझ्याकडे थक्क होऊन बघतो!  

आई-बाबांच्या लग्नानंतर काही वर्षांतच आईचे आई-वडील वारले, काही घरं सोडली तर तिला माहेर असं उरलं नाही. बाबा, आजी-आजोबा आणि आम्ही, हे तिच्या जगाच्या केंद्रस्थानी होते. पण असं असलं तरी आई आधीपासून खूप स्वतंत्र वृत्तीची आहे. एखादी गोष्ट बाबा म्हणतात म्हणून ‘हो’ ला ‘हो’ करणारातली नाही. एखादं मत पटलं नाही, तर लगेच मोकळेपणानं आपलं मत मांडण्याचा तिचा स्वभाव. त्याला बाबांनीही कधी आडकाठी आणली नाही. तिनेही बाबांच्या समाजकार्यात, सतत माणसांच्या घोळक्यात राहण्याच्या स्वभावाला आपलंसं केलं. तीही नेहमी माणसांमध्ये रमली. घरी सतत माणसांचा राबता, येणाऱ्या-जाणाऱ्यासाठी सतत चहा करायचा, घरी जेवायला रोज किती जण असतील, याचा काही हिशेब नाही, या सगळ्या गोष्टी तिनं सहज स्वीकारल्या.

आणीबाणी जाहीर झाली तेव्हा आई-बाबा बीडलाच राहत होते. आणीबाणीच्या विरोधात गावोगावी सभा होत होत्या. त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता, पण सायली चार साडेचार वर्षांची, तर मेघना काही महिन्यांची होती. आणीबाणीच्या विरोधात बीडमध्ये सभा, गुप्त बैठका होत होत्या. त्यासाठी राज्यभरातून एसेम जोशी, मृणाल गोरे, ग.प्र. प्रधान यांच्याबरोबरचे अनेक नेते बीडमध्ये येत. अटक टाळण्यासाठी त्यांच्या आगमनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाई. पदरी काही महिन्यांची लहान मुलगी असून आई पदर खोचून या सगळ्यांची खातरदारी करत असे.

आणीबाणी संपली, पुढे जनता पक्षाची हवा सुरू झाली. हा काळ बाबांसाठी फार निर्णायक होता. पुढे वकिली व्यवसाय करावा की राजकारणात झोकून द्यावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. इतरांच्या कारभारात कधीही लक्ष न घालणाऱ्या किंवा स्वतःहून कधी सल्ला न देणाऱ्या माझ्या आजोबांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून या वेळी त्यांना एक सल्ला दिला- ‘वकिली कर. राजकारण हे क्षेत्र तुझ्यासाठी नाही. राजकारणात तुझा निभाव लागणार नाही.’ आजोबांचा सल्ला बाबांनी मानला. पदरी चार मुलं आणि वयाची चाळिशी पार केली असताना त्यांनी हायकोर्टात वकिली करण्यासाठी मुंबई गाठली. बीडसारख्या शांत ठिकाणी राहिल्यानंतर आता ते मुंबईच्या गर्दीत सापडले. सुरुवातीला काही वर्षं ते एकटे राहिले, नंतर काही काळासाठी आम्ही मुंबईत आलो. मुंबईतल्या वास्तव्याचा फायदा त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नक्कीच झाला. पुढे उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ औरंगाबादला आलं आणि बाबांनी लगोलग आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. आता ते मराठवाड्यातच आणि बीडच्या अगदी जवळ आले.

आम्ही ८०च्या दशकात औरंगाबादला आलो. इथं बाबांना त्यांची कर्मभूमी सापडली. अतिशय तल्लख बुद्धीची साथ असल्यानं वकिली जोरात चालायला वेळ लागला नाही. हायकोर्टातल्या आघाडीच्या वकिलांमध्ये त्यांचं नाव होतं. त्यावेळी आम्ही भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावर राहत असू. त्यांची कचेरी सतत पक्षकारांनी भरलेली असे. त्यांच्याबरोबर एका वेळी डझनभर ज्युनियर वकील काम करत असत. काही काही वेळा कचेरीत एवढी गर्दी होई की, पक्षकार पायऱ्यांवर बसत आणि बाबांचे ज्युनियर्स त्यांच्याबरोबर पायऱ्यांवर बसून ब्रीफ लिहून घेत. या काळात केलेलं अर्थार्जन त्यांना बराच काळ पुरलं. त्यांनी एक घर बांधलं. आपल्या मोठ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम राहता आलं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न होता. मुलांसाठी वेगळ्या खोल्या, खोल्यांना लागून असलेल्या बाथरूम्स, बाथटब असलेलं एक भलंमोठं बाथरूम, गेस्ट रूम्स, प्रशस्त लायब्ररी, अशा गोष्टींनी युक्त असलेलं हे घर होतं. आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी घर बांधताना त्यांनी प्रत्येकाचा किती विचार केला होता याची कल्पना येईल. औरंगाबादसारख्या मुंबई-पुण्याच्या तुलनेत लहान गावी असं घर लोकांसाठी अप्रूप होतं. कामानिमित्त मोठ्या गावात वावरणाऱ्या बाबांना उत्तम जगायला आवडतं आणि त्यांची याच दृष्टीनं घर डिझाईन केलं.

डावीकडे आई-बाबांच्या लग्नातलं एक छायाचित्र, तर उजवीकडे बाबा एका कार्यक्रमात भाषण करताना

आम्ही नव्या घरात राहायला आलो आणि थोड्या काळानंतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून बाबांची नियुक्ती झाली. खरं तर अपेक्षापेक्षा फार उशिरा ही नियुक्ती झाली होती, पण बाबा गंमतीनं म्हणत, ‘बरं झालं, उशीर झाला. या काळात मी वकिली करून जे पैसे मिळवले त्यात मला घर बांधता आलं. न्यायाधिशाच्या पगारात ते शक्य झालं नसतं.’ त्यांचं म्हणणं खोटं नव्हतं. इतके दिवस व्यवसायात मिळणारं उत्पन्न बंद झालं आणि काटकसरीचे दिवस सुरू झाले. राहायला मोठं घर, येणारे-जाणारे लोक, चार मुलं, म्हातारे आई-वडील आणि नातेवाईक या सगळ्यांना सांभाळणं फार अवघड होतं. हा काळ पैशांच्या तंगीचा होता. बाबांचे एक मदतनीस होते. त्यांना नेहमी प्रश्न पडे, हा महिना कसा जाईल? पण बाबांनी खर्चासाठी आईला पैसे देणं जवळपास बंद केलं. त्यांच्यात वाद होऊ लागले. आई म्हणे, भाजीवाला आलाय, मला पैसे द्या आणि ते म्हणत- मी घराबाहेर येतो आणि देतो. भाजीतून उरलेली किरकोळ चिल्लरसुद्धा आईच्या हातात जाऊ द्यायची त्यांची तयारी नसायची. शेवटी तंगीला कंटाळून तिने अनेक व्यवसाय केले. कधी साड्या विकल्या, कधी महिलांची अंतर्वस्त्रं. एकदा सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचा कारखाना सुरू केला घरी. शेवटी एका मैत्रिणीच्या साहाय्यानं सुरू केलेलं पोळी भाजी केंद्र चांगलं चालायला लागलं आणि तिला घरखर्चाला हक्काचे पैसे मिळू लागले. या सगळ्या गोंधळात ‘युवर ऑनर’ मात्र शांतपणे आपलं काम करत होते. त्यांच्याकडे बघून यांच्या घरी इतकी हलाखीची परिस्थिती आहे, याची कल्पनाही कुणाला आली नसेल! आज मी हे उघड व्यक्त करतेय, हे त्यांना बिलकूल आवडणार नाही, पण हरकत नाही.

याच काळात मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. आई-बाबांनी त्याला पाठिंबा दिला. पण तिथलं वास्तव्य सोपं नव्हतं. पैशांची चणचण असायची. बाहेर राहायचं म्हणजे, खोलीचं भाडं, मेसचे पैसे द्यावे लागत. हायकोर्ट जजची मुलगी म्हणजे हिला काय अडचण असेल असं सगळ्यांना वाटायचं. आतली परिस्थिती कुणाला माहीत नव्हती! त्या काळात एकदा आईनं एक पत्र आणि काही पैसे माझ्या मित्रांकरवी पाठवले. त्यात लिहिलं होतं, ‘मेसचे पैसे पाठवतेय, पण पूर्ण महिन्याचे पैसे नाहीत, अर्ध्या महिन्याचे पैसे सध्या भर’. काही करून मुलीनं बाहेरगावी शिकावं ही आईची तळमळ त्या वेळी मला समजली नाही. पत्र सील न केल्यामुळे आपली तंगी मित्रांना कळेल, या गोष्टीचा भयंकर राग मात्र आला.

पण पैसा हाच आयुष्याच्या केंद्रभागी नसतो, नसावा. उलट आहे त्या परिस्थितीत नेकीनं राहता आलं पाहिजे हा धडा बाबांनी आमच्यासमोर गिरवला. नव्या घरातल्या गाण्याच्या मैफली, गप्पांचे फड, जेवणाच्या टेबलावर झालेल्या चर्चा, मित्रमैत्रिणींबरोबर रात्र रात्र मारलेल्या गप्पा, तासनतास लायब्ररीत बसून वाचलेली पुस्तकं, यामुळे आयुष्य फार सुंदर झालं! बाबांच्या लायब्ररीत उत्तमोत्तम पुस्तकं होती. आणि कुठलंही पुस्तक वाचायला त्यांनी कधी मनाई केली नाही. माझ्या मोठ्या बहिणीला कवितांचा नाद होता, तर मधल्या बहिणीला आणि धाकट्या भावाला चरित्र आणि कादंबऱ्यांचा. मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असे. सहावीत असताना मी ‘शांतारामा’ हे व्ही. शांतारामांचं आत्मचरित्र वाचलं. भलं मोठं पुस्तक. त्यातले संदर्भ कळण्याचे माझं वयही नव्हतं. ते वाचत असताना बाबा तिथं आले. इतर कुणी असतं, तर हे कशाला वाचत आहेस, वगैरे म्हणाले असते, पण त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. त्यांच्याकडे कुणीतरी आलं होतं, त्यांनाही ‘माझी मुलगी बघा किती वाचते’ असं म्हणाले. ज्या साहित्यिकांचं साहित्य, कथा – कविता वाचून भारावून जात होतो, ते लेखक, कवी औरंगाबादला आले की, बाबा त्यांना आवर्जुन घरी बोलावत. त्यांच्या कवितांच्या, वाचनाच्या मैफली होत. या थोर लोकांची थोरवी कळण्याचं वय नव्हतं, पण आपण काहीतरी अदभुत अनुभवतो आहोत असं नक्कीच वाटायचं.

बाबांच्या व्यासंगाला अतिशय बुद्धिमान आणि तल्लख मित्रांची साथ होती. कर्मयोगी पत्रकार अनंतराव भालेराव हे बाबांना वडलांसमान, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीचं होतं. रोज संध्याकाळी त्यांच्या घरी होणाऱ्या गप्पाटप्पांत अनेक विद्वान, साहित्यिक सहभागी होत. आई त्याला गंमतीनं ‘चावडी’ म्हणे! संध्याकाळी बाबा अण्णा आजोबांकडे (अनंत भालेरावांना सगळेजण ‘अण्णा’ म्हणत), निघाले की, आई म्हणे- ‘निघालात का चावडीवर!’ पण या चावडीवर सगळ्यांना मुक्त प्रवेश होता. अगदी आमच्यासारख्या लहानमुलांनादेखील. त्यांच्याबरोबर मी काही सहलींना गेल्याचं आठवते. त्यांच्या गप्पा कळण्याचे ते वय नव्हतं, पण सगळ्यांना बरोबर ठेवण्याचा अण्णा आजोबांचा स्वभाव होता. त्यामुळे हास्यविनोदात आमचाही चिऊकाऊचा सहभाग असायचा. अण्णांचा आणि इतर मित्रांचा सहवास बाबांना फार काही देऊन गेला.

जेवण आणि खाद्यपदार्थ हा बाबांचा अतिशय आवडीचा विषय. आस्वादाचा आणि चर्चेचा. एखादी गोष्ट त्यांना क्वचितच आवडते. अगदी साधं वरणात गूळ कमी आहे आणि हिंग जास्त आहे, अशा प्रकारची टीका ते करतात. माझी आई अतिशय सुगरण आहे. पण तिला एखादा पदार्थ चांगला झाला आहे, अशी दाद बाबांकडून फार कमी वेळा मिळते. त्यांनी फार पूर्वी लग्नाच्या जेवणाचा मेन्यू काय असावा, या विषयावर एक लेख लिहिला होता. तो लेख फार गाजला. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी त्यांनी लग्न समारंभांत उत्तम, सुग्रास, सौम्य पण चविष्ट जेवण कसं असलं पाहिजे, याबद्दल स्वप्नरंजन केलं होतं. ज्या गोष्टीकडे आजही फारसं कुणी लक्ष देत नाही. जेवणावळींना आलेल्या पंजाबी रूपाचा त्यांना फार राग येतो. त्यांचं म्हणणं, हे खरं चविष्ट पंजाबी जेवणही नाही, त्याचं भ्रष्ट रूप आहे. वातड रोट्या, तेलकट भाज्या, फडफडीत भात वगैरे समोर दिसलं की, त्यांच्या रागाचा पारा चढतो. आमच्याकडच्या समारंभांना जे जेवण दिलं जातं, त्याबद्दल इतका खोलवर विचार क्वचितच दुसऱ्या घरी होत असेल. आम्हा मुलींच्या लग्नात त्यांनी बीडहून आचारी आणले होते. याला दोन कारणं होती. माणसी पर प्लेटनुसार पैसे द्यायचे म्हणजे खर्च फार होणार, आणि दुसरं म्हणजे आचाऱ्याकडून आपण हवा त्या प्रकारचा स्वयंपाक करून घेऊ शकतो. शिवाय प्रत्येक लग्न समारंभाला सरासरी अडीच हजार लोक आले होते. माझी मोठी बहीण- सायली कधीकधी गमतीनं म्हणते, ‘इतर ठिकाणी मुलीला काय द्यावं, जावयाला काय द्यावं, लग्नात किती दागिने करावे अशा चर्चा होतात. आपल्याकडे फक्त किती लोक जेवायला येतील आणि मेन्यू काय असावा एवढीच चर्चा होते!’

गेल्या वर्षी आई-बाबांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल आम्ही एक छोटासा समारंभ केला. त्यातही मेन्यू काय असावा याबद्दल बराच वेळ चर्चा झाली. शेवटी आम्ही पर्याय सुचवला, जो मेन्यू तुमच्या लग्नात होता तोच ठेवूयात. बाबा म्हणाले, अतिशय चविष्ट अळूची भाजी होती. प्रत्येक वाटीत ओल्या नारळाचे पातळ तुकडे आणि शिजलेले शेंगदाणे येतील असं प्रमाण साधलं होतं. यावर आईने ही भाजी नव्हतीच असं सुनावल्यावर बाबांना काही उत्तर देता आलं नाही. आता पन्नास वर्षांपूर्वी काय घडलं, हे आम्हाला समजणं शक्य नसल्यानं तो विषय तेवढ्यावरच थांबला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आई-बाबांचं वैवाहिक आयुष्य मला आई करते त्या आंबटगोड वरणासारखं वाटतं. चविष्ट आणि खमंग. पण दोन्ही चवी इतक्या एकजीव झाल्या आहेत की, गूळ कुठे आणि चिंच कुठे हे कळायला मार्ग नाही. त्याचबरोबर तिखट, मीठ, हिंग, मसाल्याचं प्रमाण इतकं योग्य आहे की, प्रत्यक्ष बाबांनासुद्धा त्यात खोड काढता येणार नाही!

बाबांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणं मनापासून आवडतं, पण हा सहभाग तयारीनिशी असतो. अतिशय रसाळ आणि माहितीपूर्ण बोलणं हे त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य. कित्येकदा ही भाषणं उत्स्फुर्तपणे केलेली असतात, तर अनेक वेळा ते पूर्ण तयारी करूनच भाषण करतात. पण कागद समोर ठेवून तो वाचणं त्यांना जमत नाही. जोपर्यंत ते मनापासून बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांचं भाषण रंगत नाही. मी शाळेत असताना त्यांच्या व्याख्यानांची चर्चा शाळेत होत असे, विशेषतः शाळेतल्या बाई एकमेकींना रंगवून रंगवून सांगत असत. मी नववीत असताना अचानक वक्तृत्व स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मला त्यात रूची निर्माण झाली. बऱ्याच जणांना वाटे- हिचे बाबा हिला भाषणं लिहून देत असतील, पण उलट होतं. आपण कधी काही विचारायला जावं, तर त्यांनी म्हणावं, ‘लायब्ररीत जा, अमूकतमूक पुस्तक काढ. त्यात तुला चांगली माहिती मिळेल’. त्यामुळे स्वतः विचार करायची, त्यासाठी संदर्भ शोधायची सवय लागली. बऱ्याचदा त्यांना मी कोणत्या स्पर्धेत गेले होते, बक्षिस मिळालं आहे, याचा पत्ताही नसे. मी औरंगाबाद सोडल्यानंतर त्यांना एकदा माझी प्रमाणपत्रं सापडली. आपली मुलगी फार हुशार आहे, अशी मी शाळा सोडल्यानंतर दहाएक वर्षांनी त्यांना जाणीव झाली. आणि मग ती सगळी प्रमाणपत्रं व्यवस्थित एका फाईलला लावून त्यांनी मुंबईला माझ्याकडे पाठवून दिली!

अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टी करण्याचा माझा स्वभाव असल्यानं त्यांना कधीकधी माझी काळजी वाटे. माझी दहावीची परिक्षा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी त्यांनी मला लायब्ररीत बोलावलं. मुलांशी काहीही गंभीर बोलायचं असेल तर लायब्ररीत बोलावलं जायचं! (माझी अतिशय गोड दिसणारी मधली बहrण तितक्याच क्यूट मुलाच्या प्रेमात पडली. या प्रकाराकडे आमच्या घरी इतक्या गंभीरपणे बघितलं गेलं की, काय विचारता सोय नाही! तिची रवानगी बऱ्याचदा लायब्ररीत व्हायची. अशा वेळी मुलांशी बोलताना बाबांचा चेहरा इतका करुण होत असे की, मुलंच त्यांची कीव करत!). मी लायब्ररीत गेल्यानंतर बाबांनी लायब्ररीचा दरवाजा ओढून घ्यायला सांगितला. मला समोर बसवलं आणि अत्यंत करुण चेहऱ्यानं मला त्यांनी विचारलं, ‘बाळा, उद्याच्या परीक्षेत पास होशील ना?’ मी त्यांना काही आश्वासन देण्याऐवजी म्हणाले, ‘गणिताची खात्री नाही, बाकी विषयांत नक्की पास होईन’. यावर इतर पालक संतापले असते, पण बाबा म्हणाले, ‘पास होण्याचा प्रयत्न कर’. पुढे मला दहावीत बरे गुण मिळाले. माझी कीर्ती इतकी पसरली होती की, आजोबांनी सांगितलं, ‘आताच पेढे आणू नका, कित्येकदा पुढे किंवा मागे बसलेल्या विद्यार्थ्याचे गुणमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याच्या नावानं छापले जाऊ शकतात. आधी गुणपत्रिका हाती येऊ द्या, मगच पेढे आणा’. मी शाळेत कधीही अभ्यास, घरचा अभ्यास केला नाही. अतिशय वेंधळी म्हणून मी प्रसिद्ध होते (आहे). पण या गोष्टी आई-बाबांनी नैसर्गिकपणे स्वीकारल्या. आता माझ्या मुलांत मी आणि माझा नवरा इतके गुंतलेले बघून कधी कधी बाबा म्हणतात, ‘आम्ही तुमच्याकडे कधी इतकं लक्ष दिलं नाही.’ ते असं म्हणाले की मला वाटतं, ‘तुम्ही जे आम्हांला भरभरून दिलं, ते देत असताना तुम्हाला त्याची जाणीव नव्हती, ना आम्हांला जाणीव होती!’

त्यांच्या मुलांबद्दल त्यांच्या ठोस समजुती आहेत, त्या बदलायचा मी बऱ्याचदा प्रयत्न करते, पण त्या बदलल्या जात नाहीत. शाळेत असताना आम्ही कोणत्या यत्तेत आहोत, याची साधारण कल्पना त्यांना असे, त्यापुढे नाही. कित्येकदा सांगावं लागे, मी आठवीत नाही, नववीत आहे वगैरे. पण याला अपवाद सायली. ती आमची सगळ्यात मोठी बहीण. अभ्यासाकडे, घरकामाकडे लक्ष देणारी आणि मोठा मित्रपरिवार असणारी सर्वगुणसंपन्न मुलगी. बाबांचं म्हणणं होतं, सायली खूप हुशार आहे, तिनं चांगलं करिअर केलं पाहिजे. तिने कसं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे याकडे त्यांचं बारिक लक्ष असे. फार लहान वयात सायली घर सांभाळायला शिकली आणि आजही उत्तम प्रकारे घर सांभाळते आणि व्यवसाय करते. सायलीनं ज्या प्रकारे आपला ब्रॅंड विकसित केला त्याचा त्यांना अतिशय अभिमान आहे.

दुसरी मेघना स्वभावानं फार गरीब आहे असं त्यांचं मत. (माझे आणि तिच्या नवऱ्याचं, सिद्धार्थचं मत मात्र वेगळं आहे!). मेघना वकील आहे, जिल्हा बालकल्याण समितीची सदस्य आहे. स्वतःचं घर उत्तम चालवते, पण तरीही आजही त्यांना काळजी असते- ती जेवली असेल का, तिला फार काम पडलं असेल का वगैरे. काही दिवसांपूर्वी बाबांना कामानिमित्त नाशिकला जायचं होतं. त्यांना सोबत व्हावी म्हणून तीही त्यांच्याबरोबर नाशिकला गेली. तिकडे संध्याकाळी ती त्यांना म्हणाली, ‘मी जरा चालून येते.’ त्यावर ते तिला म्हणाले, ‘काळजी घे, फार लांब जाऊ नको.’ पंचेचाळीस वर्षांच्या मेघनाला हसावं की रागवावं हे कळेना!

मी आणि बाबा

माझे आणि बाबांचे संबंध फार गंमतशीर आहेत, आणि काळानुसार बदलत आहेत. लहानपणी मी खूप एकटी एकटी राहायचे. स्वतःमध्ये रमायचे. बीडच्या घराच्या मागे मोठी बाग होती. त्या बागेत मी तासनतास फिरत असे. माझ्या एकलकोंड्या स्वभावाला आळसाची साथ होती. कोणतीही गोष्ट फार तत्परतेनं मी करत नसे, करत नाही. आम्ही मुलं आई-बाबा एकत्र असलो, की बाबा एक अॅक्ट करत असत. त्याची थीम अशी होती की, घराला आग लागली आहे आणि सगळे जण पळापळ करत आहेत. या गोंधळात मी कशी वागीन? मग बाबा आळोखेपिळोखे देत आणि म्हणत, ‘आग होय, कुठे? इथपर्यंत आली आहे का? हो का?’ मग पुन्हा आळोखेपिळोखे देत आणि अजून काहीतरी बोलत. त्यांचा भक्ती अॅक्ट मुलांमध्ये हिट होता. कोर्टाचं काम सुरू असताना बाबांना वेळ फार कमी मिळे, पण सुट्यांचा वेळ आमच्यासाठी असे. मग अशा काही गमतीजमती होत.

बाबांना विनोदाची उत्तम जाण आहे. बाहेर गंभीर विषयांवर बोलणारे बाबा घरी मुलाबाळांमध्ये अतिशय मोकळे असतात. मुलांच्या नकला करत आम्हांला हसवणारे बाबा फक्त आम्हा चौघांतच नाही, तर आमच्या इतर भावंडांमध्येही, आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये लोकप्रिय होते. योगायोग असा की, काही वर्षांपूर्वी मी जिथं राहते त्या इमारतीला आग लागली. मी पहिल्या मजल्यावर राहते आणि आग अगदी बाजूला लागली. मला अंदाज आल्यावर तीन मिनिटांच्या आत दोन्ही मुलं, घराची किल्ली, गाडीची किल्ली, पर्स आणि पाण्याची बाटली घेऊन घराबाहेर पडले. आम्ही सुखरूप बाहेर पडलो, पण इतर अनेक जण अडकले. नंतर घरी राहण्यासारखी परिस्थिती नसल्यानं आठवडाभर औरंगाबादला राहिले. त्यावेळी बाबांचा अॅक्ट आठवून आठवून हसले!

त्यांच्या सायलीप्रेमाचा मात्र मेघनाला फार वैताग यायचा. मेघना सायलीपेक्षा चार वर्षांनी लहान, तिला पण सगळ्या गोष्टींत मत व्यक्त करायचं असायचं, पण बाबांचं लक्ष सायलीकडेच. मग मेघना चिडायची. गंमत म्हणजे नंतर एक काळ असा आला की, मी मजेत आहे, माझी काळजी कमी करत जा, असं म्हणायची वेळ मेघनावर आली. मी सुरुवातीला बाबांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे बाबांकडे कुणी महत्त्वाचे पाहुणे आले की, त्यांच्याशी सायलीशी ओळख करून देणं बाबांना आवडायचं. मग अशा वेळी मी मुद्दामून तिथं जाऊन बसे. मला वाटे, आता त्यांनी माझी ओळख करून द्यावी, नंतर द्यावी. कधी कधी ती व्हायची. कधी मी खट्टू व्हायचे. पण मला कधी न्यूनगंड आला नाही. माझी आणि सायलीची लहानपणापासून खूप गट्टी होती. मी तिचं अगदी शेपूट होते. तिच्या आणि माझ्या वयात सहा वर्षांचं अंतर आहे. तिनं लहानपणापासून माझी खूप काळजी घेतली होती. शिवाय आईला माझे कौतुक. तिचा धोशा एकच, काही तरी वेगळं करिअर कर. मी काहीही करायचं म्हटलं तरी त्याला आई-बाबांनी कधी विरोध केला नाही. अर्थातच बाहेरच्या जगाशी झालेली ओळख त्यांच्याच चष्म्यातून झाली असल्यानं त्यांच्या आवडीच्या गोष्टीच मी केल्या. त्यामुळे विरोधाचा प्रश्न आला नाही. कधी कधी वाद व्हायचे, पण किरकोळ.

बाबांनी एखादा सल्ला दिला की, मी सरळ सरळ ‘हो’ म्हणत नाही, उलट त्याविरुद्ध काही तरी करते असं बऱ्याचदा होतं. बाबाही त्याकडे दुर्लक्ष करतात. मी म्हणते, ‘दोष तुमचा आहे. तुमच्या समाजवादी पक्षाचं नुकसान झालं, कारण पक्षात सर्व जण नेते होते, कार्यकर्ते कुणीच नाही. तसंच आपल्या घराचं झाले आहे. प्रत्येक जण नेता आहे, दुसऱ्याचं ऐकत नाही. स्वतःची मतं ठासून बोलतो आणि त्यानुसार वागतो. इतकंच नाही तर आपल्या घरातल्या व्यक्तीबद्दल उघडपणे चारचौघांत नाराजी व्यक्त करतो. आपल्या माणसांचं ऐकण्याऐवजी बाहेरच्या माणसाचं ऐकतो. मग मी तुमचं ऐकत नाही, याच चुकीचं काय आहे?’

मी वरवर असं म्हणाले तरी बाबांच्या मताला माझ्या लेखी सर्वोच्च स्थान आहे. मी कॉलेजमध्ये असताना मराठवाडा वर्तमानपत्रात काम करत असे. एकदा मला वरिष्ठांनी एका पुस्तकाचं परीक्षण करायला सांगितलं. माझ्या मते ते पुस्तक वाईट होतं. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याचं परीक्षण केलं आणि मोठ्या उत्साहानं बाबांना दाखवलं. त्यांनी त्याच्यावर एक नजर टाकली आणि मला सांगितलं, ‘तुला परीक्षण लिहिता येत नाही.’ माझं लिखाण वाईटच असणार, पण त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मी निराश झाले. आपल्याला लिहिता येत नाही, असा विचार करत मी माझा लेख केरात टाकला. इतकंच नाही तर माझं कोणतंही लिखाण फार उत्साहानं कधी त्यांना दाखवलं नाही.

या घटनेला बरीच वर्षं झाली. मुलांना घेऊन आम्ही कर्नाटकातल्या काबिनी इथं एका कौटुंबिक सहलीला गेलो होतो. त्यावेळी तिथं बाबांचा फोन आला. ऐकू येत नव्हतं म्हणून मी माझ्या कॉटेजच्या बाहेर आले. माझा एक लेख त्यांना कोणीतरी वाचायला दिला होता. तो लेख वाचून त्यांनी फोन केला होता. लेख फार उत्तम होता असं नाही, पण त्यांना तो फार आवडला होता. ते म्हणाले, ‘इतकी वर्षं तू मला घरातलं चैतन्य वाटायचीस. सगळ्यांना हसवणारी, गप्पा मारणारी विनोदी मुलगी. पण तुझी बुद्धिमत्ता मला कळाली नाही याचं वाईट वाटतंय.’ अनपेक्षितरीत्या बाबांनी मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दाद दिली होती.

माझ्या लग्नात बाबांसह

माझ्या तथाकथित बुद्धिमत्तेबद्दल त्यांनी बोलणं म्हणजे कौतुकाचाच भाग आहे, याची जाणीव मला होती, पण तरीही... मी त्या दिवशी त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारी पाचवीतली मुलगी झाले होते! बाबांच्या एका वाक्यानं माझी कॉलर टाईट झाली होती. काबिनीच्या जंगलातल्या आमच्या कॉटेजला लागून एका छोटी बाग आणि स्विमिंग पूल होता. त्या चांदण्या रात्री मी तिथं चकरा मारत मारत, रातकिड्यांची किरकिर ऐकत बाबांशी बोलत होते. तिकडे त्यांच्या डोळ्यांत आणि इकडे माझ्या डोळ्यांत पाणी ओथंबून आलं होतं! 

आई-वडलांनी मुलांचं कौतुक करणं यात आज काही विशेष वाटत नाही. मुलांनी कागदाचा बोळा कचऱ्यात टाकला तरी आज आम्ही ते करतो, पण आमच्या आई-बाबांनी केलेलं कौतुक आमच्यासाठी विशेष आहे. नाहीतर वादविवाद हीच आमच्या घराची स्वभावप्रकृती आहे. बहुदा हे सगळे वाद खेळीमेळीनं होतात. कुटुंबातली जी व्यक्ती या चर्चांना उपस्थित नसते, तिच्या वागण्याबोलण्यातल्या अनंत चुका हजर व्यक्ती बोलून दाखवतात. (मी म्हणते, ‘जजसाहेबांच्या घरातले लोक फारच ‘जजमेंटल’ आहेत!’). पण विरोध असला तर तो फक्त बोलून दाखवायचा, प्रत्यक्ष विरोध करायचा नाही, हीच पद्धत आहे. स्वतःचं मत मुक्तपणे मांडायची पद्धत इतक्या टोकाला गेली आहे की, जी भीती पितृसत्ताक कुटुंबात पित्याबद्दल असते, ती आमच्या घराच अजिबात नाही. प्रत्येक जण अगदी मुक्तपणे तुम्ही कसे चुकतात हे त्यांनाच सांगत असतो. ते हळूच त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, पण ती ऐकली जात नाही. मग ते स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडत नाहीत आणि स्वतःला हवा तो निर्णय घेतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आम्हा चौघांपैकी प्रत्येक जण लहानपणापासूनच स्वतःच्या मर्जीनं राहत आला आहे. अगदी घट्ट विणलेलं कुटुंब असं आमच्या घराबद्दल म्हणता येणार नाही. त्यात आम्ही शिकत असताना घरी आमच्याबरोबर अनेक जण राहत होते. त्यामुळे काही वर्षं, विशेषतः बाबा जज झाल्यानंतर अशी गेली, ज्या वेळी आम्हांला कधी आई-बाबा एक्सक्लुजिव मिळाले नाहीत. आज आमच्या वागण्यांत याचं नकळत प्रतिबिंब पडत असणार. पण आई-बाबा ते जाणवू देत नाहीत. कधी कधी आमचा सूर उद्धटपणाच्या जवळ जाणारा असतो. पण आई-बाबा शांत असतात, उलट शक्य तितकं आमच्या कलानं घेतात. तटस्थपणे विचार केला तर वाटतं की, जसे डबे भरून द्यायला आई नव्हती किंवा शाळेत सोडायला बाबा नव्हते, तसे आपणही कधी आई-बाबांना चहा करून दिलाय, पाण्याचा पेला आणलाय असं झालं नाही. म्हणजे कुटुंब सार्वजनिक झाल्याचा तोटा आपल्यालाच नाही झाला, त्यांनाही झाला. असामान्य कारकीर्द असणारे बाबालोक कधी सामान्य बाबालोक नसतात, याची जाणीव आता झाली आहे.

बाबांचं मोठेपण दरदिवशी अधिकाधिक जाणवतं. त्यांचा व्यासंग, त्यांची सामाजिक प्रश्नांबद्दलची आस्था, त्यांचा उदारमतवाद भारून टाकतो. एकेकाळी त्यांना समाजवाद आपला वाटे. पण आज ते राजकीय पक्षांच्या फार पुढे गेले आहेत. जी गोष्ट समाजासाठी हितकारक आहे, जी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसून कल्याणकारी आहे, त्या गोष्टीला ते पाठिंबा देतात. सतत काम करत राहणं, सतत पुस्तकांचं लिखाण त्यांच्या आयुष्यांच्या केंद्रभागी आहे. आपल्या पुस्तकांतूनही ते महाराष्ट्राच्या उदारमतवादी सामाजिक परंपरेची नोंद घेतात. वेळोवेळी आपली मतं ते सामाजिक व्यासपीठांवरून निर्भीड स्वरूपात मांडतात. अनेकदा त्याला माध्यमं राजकीय रंग देतात. ते त्यांना आवडत नाही. राजकारण किंवा राजकारणी हा त्यांचा प्रांत नाही. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या तराजूत तोलणं त्यांना आवडत नाही. त्यांच्या लिखाणामागे एक व्यापक भूमिका असते. ती माध्यमांनी समजून घ्यावी, अशी त्यांची इच्छा असते.

मी त्यांना हळूच सांगायचा प्रयत्न करते की, समाजाला जागृत करण्याची आता माध्यमांची भूमिका राहिलेली नाही, आता फक्त मनोरंजन हाच माध्यमांचा उद्देश आहे. ते त्यांना मान्य नाही. आजही ते वर्तमानपत्रांना समाजाच्या केंद्रस्थानी मानतात. पुस्तकांच्या गराड्यात उभं राहून वाचन, मनन, चिंतन करणारे बाबा एखाद्या योग्यासारखे भासतात! तेव्हा त्यांच्या इतकं जवळ असून आपण किती सामान्य राहिलो याची जाणीव होते!

आज वयाची ऐंशी वर्षं पार केल्यानंतरही ते निवृत्त झाले नाहीत. ते त्यांच्या, तर आई तिच्या कामात व्यग्र असते. त्यांचा दिनक्रम काटेकोर आहे. आणि त्यामुळेच ते अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकतात. रोज सकाळी दोन तास त्यांचे टंक लेखनिक सुरेश पाटील आमच्याकडे येतात. त्या वेळी  संदर्भ ग्रंथ, नोंदी वगैरे बाबांनी तयार ठेवलेले असतात आणि पुढचे दोन तास बाबा काम करतात. या वेळी कोणताही व्यत्यय त्यांना चालत नाही. आमचा फोन आला तर एकतर आईकडे दिला जातो किंवा थोड्या वेळानं फोन करतो असं सांगण्यात येतं. मग त्यांचे मदतनीस देशमाने काका त्यांना वेगवेगळ्या विषयांबद्दल अपडेट देतात. बाबा त्यांना अनेक सूचना देतात आणि मग ते तासाभरासाठी घराबाहेर पडतात. संध्याकाळी ते त्यांचे परमप्रिय मित्र, सुधीर रसाळ (बापूकाका) यांच्याकडे जातात. बापूकाका आणि बाबा यांचे स्वभाव ज्याला इंग्रजीत ‘चॉक अँड चीझ’ म्हणता येईल इतके वेगळे आहेत. पण दररोज त्यांना एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. बहुदा बाबा बापूकाकांच्या घरी जातात. कधीकधी काका आमच्या घरी येतात. ‘आहेत का नानासाहेब?’ अशी बापूकाकांची आरोळी ऐकली की, आम्हीही गप्पा मारायला दिवाणखान्यात येतो. या दोघांमधील चर्चा ऐकणं आम्हा मुलांसाठी पर्वणी असते! त्यांच्यातल्या चर्चा अतिशय माहितीपूर्ण असतात. कविता, कथा, कादंबऱ्या, समीक्षा अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचं रसग्रहण जेव्हा दोघं करतात, तेव्हा मी भारावून जाते. हे दोन विद्वान एकमेकांची रेवडी पण उडवतात, पण तीही इतक्या नजाकतीनं की, जणू काही लखनौच्या नवाबांनीच यांना ट्रेनिंग दिलं आहे! एकदा त्यांच्याशी बोलता बोलता मी विचारलं, ‘तुमची मैत्री होऊन किती वर्षं झाली?’ तर ते त्यांच्या मैत्रीचं साठावं वर्षं होतं. यावरून मला कल्पना सुचली की, त्यांच्या ‘मैत्रीची साठी’ साजरी का करू नये. मग आम्ही एक छोटा कार्यक्रम केला, ‘मैत्रीची साठी’. त्यात बाबा आणि बापू काकांनी ज्या गप्पा मारल्या त्यात मराठवाड्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यविषयक घटनांचा आलेख उभा राहिला.

‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार बापूकाकांच्या हस्ते स्वीकारताना बाबा

बाबा सगळ्यांचे बाबा आहेत. आमच्या घरी काम करणारी रचना, भाग्यश्री, मामी (ज्यांचं वय बाबांपेक्षा पाचेकवर्षांनी कमी असेल), भाग्यश्री मावशींचा नातू करण, ड्रायव्हर अनंत... सगळ्यांसाठी ते बाबा आहेत. सगळ्यांना ते आपले वाटतात आणि आपलेपणाच्या अधिकारानं ही मंडळी बाबांची काळजी घेतात. आमच्या घरी एके काळी कामाच्या शोधात मंडळी येत असत आणि नोकरी लागेपर्यंत घरी राहत, काम करत. त्यापैकी मुशीर भाई म्हणून एक होते, त्यांना कोर्टात नोकरी लागली. एकदा ते घरी आले आणि त्यांच्या मते घराला रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी लगोलग बाजारात जाऊन रंग आणला आणि घराला रंग दिला. आम्ही सुटीत घरी आलो तर संपूर्ण घर जांभळ्या रंगाचं झालं होतं. पण बाबांना अशा गोष्टी मान्य असतात.

आम्ही चौघेजण घराबाहेर पडलो असलो तरी या त्यांच्या मुलाबाळांमुळे त्यांना ‘एम्टी नेस्ट सिंड्रोम’ आला नाही. बाबांसारखंच आमचं औरंगाबादचं घर हवी तेव्हा थंडगार आणि हवी तेव्हा उबदार सावली देणाऱ्या वृक्षासारखं झालं आहे. वर्षाकाठी दीड-दोन दिवसांसाठी मी त्या सावलीत राहायला जाते. बाबा सारखे विचारतात- अजून का रहात नाहीस, पण माझ्या मागे असंख्य (अनावश्यक) कटकटी असतात. त्या मला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ तिथं राहू देत नाहीत. माझा जाण्याचा दिवस उजाडतो. मला निरोप द्यायला आई-बाबा सकाळी सकाळी घराबाहेर येतात. आई थोडी मागे उभी राहते. बाबा दोन पावलं पुढे येऊन उभे राहतात. मी ते दृश्य डोळाभर साठवते. मुंबईतल्या माझ्या गोंधळात ते दृश्य मला सोबत करतं. रोज सकाळी आईचा फोन येतो. बाबांचा फोन कधी तरी येतो. आता मी चाळीशी पार केली आहे आणि बाबांनी वयाची ऐंशी वर्षं पार केली आहेत. पण त्यांचा आवाज ऐकला की, मी पुन्हा अडीच वर्षांची मुलगी होते. गोवरातल्या फणफणलेल्या अंगाला पंख्याचा वारा लागावा इतका त्यांचा आवाज मुलायम असतो आणि माझ्या सगळ्या anxieties अचानक दूर होतात. दिवसभरात झालेल्या गंमतीजमती आम्ही एकमेकांना सांगू लागतो. चाळीस वर्षांपूर्वी बीडच्या घराच्या दारासमोर उमललेला तो गुलाबी गुलाब मला समोर दिसतो. माझं जगणं सुगंधीत होतं!  

..................................................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhalwankarb@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा