विघातक शक्तींना नैतिक अधिष्ठान
पडघम - सांस्कृतिक
अवधूत परळकर
  • भारतीय राष्ट्रध्वज
  • Mon , 02 January 2017
  • राष्ट्रगीत national anthem जन मन गण Jana mana gana सर्वोच्च न्यायालय Supreme Court देशभक्ती Patriotism

विलास वंजारी हा माझा एक सरळमार्गी मित्र. निर्व्यसनी माणूस. दंगा, मारामारी सोडा, पण घरातही कधी कुणावर हात न उगारणारा. गेली वीस वर्षे तो सरकारी नोकरी चोख करतो आहे.  एका पैशाचाही भ्रष्ट आचार नाही, इतरांच्या मदतीला तत्परतेने धावणारा असा हा सज्जन. आदर्श भारतीय नागरिक म्हणा ना. विलास वंजारी थिएटरमध्ये किंवा इतरत्र राष्ट्रगीत लागले की उभा राहतो. पण समजा एखाद्या वेळी तो नाही उभा राहिला तर आपण त्याला ‘देशद्रोही’ म्हणायचे का? नीट विचार करा. 

राष्ट्रगीताला कोण उभे राहतो कोण नाही यावर व्यक्तीची ‘राष्ट्रनिष्ठा’ ठरवणे किती वेडेपणाचे आहे, हे या वरून लक्षात येईल. पण या देशातल्या समाजाच्या आणि राज्यकर्त्यांच्या राष्ट्रभक्ती मापण्याचा वेगळ्याच पद्धती आहेत. 'भारतमाता की जय' असे उच्च स्वरात बोलणे, राष्ट्रगीत चालू असता उभे राहणे हे राष्ट्रप्रेम तपासण्याचे दंडक बनून गेले आहेत. 
राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय हेच आपल्याला नीटपणे कळलेले नाही हेच यावरून दिसून येते. राष्ट्रगीतासारख्या गोष्टी राष्ट्रचिन्हे आहेत. त्यांचा उचित मान राखला जावा हे ठीक. पण राष्ट्रगीताचा मान राखावा अशी सक्ती कोणावर कशी काय करता येईल? राष्ट्रगीत चालू झाले असता उभे राहिला नाहीत तर शिक्षा होईल अशी ताकीद देणे म्हणजे कानशीलाला पिस्तूल लावून  ‘करतोस की नाही या देशावर प्रेम?’ असे दरडावून सांगण्यासारखे नाही काय?

खोट्या राष्ट्रभावनेच्या आहारी न जाता याचा विचार व्हावा. जीवाच्या भयाने मी भारतावर प्रेम करतो असे कुणीही बोलेल, पोलिसांच्या ताब्यात सापडलेला एखादा दहशतवादीही बोलेल, ‘मी भारतावर प्रेम करतो’. राष्ट्रभक्त ठरवण्याची ही कसोटी फसवी आहे. देशातले भ्रष्ट राजकीय नेते, गुंड, बलात्कारी, स्मगलर हे राष्ट्रध्वज चालू झाले की, उभे राहतात म्हणून तेवढ्यावरून ते राष्ट्रप्रेमी ठरतात का?

या देशातील प्रत्येक शांतताप्रिय नागरिक राष्ट्रप्रेमी आहे. त्याचे समाजातले शिस्तमय वर्तन आणि त्याचे प्रामाणिक व्यवहार यातूनच त्याचा राष्ट्राविषयीचा आदर व्यक्त होतो. विशिष्ट कर्मकांड करायला लावून वा विशिष्ट घोषणा द्यायला लावून त्याचे राष्ट्रप्रेम तपासण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. 

‘दंगल’ या सिनेमात कॉमनवेल्थ गेमचे दृश्य आहे. या स्पर्धेत ज्या देशाच्या क्रीडापटूला सुवर्णपदक मिळते त्या देशाचे राष्ट्रगीत पारितोषिक वितरणाच्या वेळी वाजवले जाते. 'दंगल' मध्ये भारताला सुवर्णपदक मिळाल्याचे दृश्य असल्याने भारताचे राष्ट्रगीत लावले जाते. थिएटरमधले प्रेक्षक यावेळी कोणत्याही फतव्याविना उत्स्फूर्तपणे उभे राहतात. ‘दंगल’ सिनेमाच्या पडद्यावर दिसणाऱ्या दृश्यात कॉमनवेल्थ स्पर्धाच्या स्टेडियममध्ये हजर असलेले  प्रेक्षक आणि सर्व देशाचे क्रीडापटूही त्यावेळी उभे राहतात. राष्ट्रगीताला उभे राहणे हे राष्ट्राभिमान दर्शविण्याची कृती असेल तर त्यावेळी उभ्या राहणाऱ्या सगळ्यांना सर्व देशांचाही अभिमान असतो असे म्हणावे लागेल. आणि तो तसाच असायला पाहिजे. आपल्याच देशावर प्रेम करायचे हे ठीक आहे, पण आपल्याच देशावर प्रेम का करायचे? इतर देशांवर आणि पर्यायाने संपूर्ण पृथ्वीवर प्रेम का करू नये? 'हे विश्वचि माझे घर' आळवणारी आपली संस्कृती. आचार्य विनोबा तर नेहमी ‘जय-जगत’चा उच्चार करत. तेव्हा आदर सर्व देशांच्या राष्ट्रगीतांबद्दल का असू नये?

याचा अर्थ थिएटरमध्ये आपले राष्ट्रगीत वाजवले जात असता उभे राहण्याची गरज नाही असा नाही. पण एखादा बसून राहिला तर ओरडा करून त्याच्या देशप्रेमावर शंका घेणे गैर आहे. मी स्वत: राष्ट्रगीताच्या वेळी थिएटरमध्ये काहीशा नाराजीनेच उभा राहतो. राष्ट्रगीताविषयी आदर असण्या-नसण्याशी याचा संबंध नाही. प्रत्येक सिनेमाच्या शोला राष्ट्रगीत लावणे हाच मला राष्ट्रगीताचा उथळ आणि बिनडोक वापर आणि एकापरीने अवमानच वाटतो.

थोडक्यात, राष्ट्रगीताला उभे राहण्यावरून देशप्रेम तोलू नये. तशी कुणावर सक्ती तर अजिबात करू नये. राष्ट्रगीताला उभे राहणे म्हणजे देशनिष्ठा, देशावरील प्रेम व्यक्त करणे असे एखाद्याला वाटत असेल तर ते समजू शकते, पण देशप्रेमाची भावना देशवासीयांवर बळजबरी करून निर्माण करायची भावना आहे असे त्याला वाटते काय?

आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत. पण प्रश्न विचारणे हे अशिष्ट समजणारा हा देश आहे. विद्यार्थ्याने शिक्षकाला, शिष्याने गुरूला, मुलाने वडिलांना प्रश्न विचारणे हे या देशात आगाऊपणाचे उद्धटपणाचे मानले जाते. प्रगत पाश्चात्य देशात शिक्षण आणि इतर क्षेत्रातही प्रश्न विचारणे ही कृती मोलाची मानली जाते. तिथल्या बड्या विद्यापीठात नोबेल विजेते पंडित हे प्राध्यापक असतात. वर्गातल्या नवोदित विद्यार्थ्याने एखादा प्राथमिक किंवा अगदी मूर्ख प्रश्न विचारला तरी हे नोबेल विजेते न त्रासता त्याचे शंका निरसन करतात.

विलास वंजारीची कामावरील निष्ठा, परसेवेची तत्परता, अहिंसक वर्तन ही खरी राष्ट्रनिष्ठा मानली पाहिजे. अशा व्यक्तिच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे, तो राष्ट्रीय चिन्हाना मान देतो की नाही यावर त्याची राष्ट्रभावना मोजणे हा त्याचा व्यक्ती म्हणून अवमान आहे. हे उघड अडाणीपणाचे धोरण आहे.
मध्यंतरी रस्त्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला रोखून 'भारत माता की जय' वदवून घेण्याचे प्रकार बोकाळले होते. विशेष नमूद करायची गोष्ट म्हणजे रस्त्यावर उतरून दगडफेक करणारी, बसगाड्या जाळून आंदोलन करणारी टोळकी हे उद्योग करत होती. राष्ट्राविषयी काडीची प्रेमभावना नसलेली, सतत या ना त्या कारणावरून दंगेधोपे घडवून सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात अडथळे निर्माण करणारी ही मंडळी शहरातल्या शांतताप्रिय निरपराध लोकांच्या राष्ट्रप्रेमाची तपासणी करत होती. त्यांना सक्तीने ‘भारत माता की जय’ बोलायला लावत होती.

नागरिकांनी राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी उभे राहावे असा आदेश, या देशात न्यायालयाला काढावा लागणे हेच मुळात लांच्छनास्पद आहे. एकापरीने विचित्रही आहे. कारण आई-वडील आणि शिक्षक यांच्याविषयीच्या आदराप्रमाणेच राष्ट्राविषयीचा किंवा राष्ट्रगीताचा आदर ही सक्ती करण्याची गोष्ट नाही. पोलीस कस्टडीत थर्ड डिग्रीचा वापर करून जबर शिक्षेची भीती दाखवून आपण समाजमनात या देशाविषयी प्रेमभावना निर्माण करू पाहतोय की दहशत?

मुळात सिनेमागृहात प्रत्येक सिनेप्रक्षेपणाआधी राष्ट्रगीत लावायची सक्ती थिएटर मालकावर करणे हीच गैर गोष्ट आहे. राष्ट्रभावनांचे हे सवंगीकरण आहे. ही उथळ देशभक्ती आहे. मूल्यात्मक विचार केला तर भ्रष्ट आचारशून्य व्यवहार असणे देशातील कायदेकानू पाळणे हे मूल्य कोणत्याही दिखाऊ राष्ट्रीय कर्मकांडापेक्षा अधिक मोलाचे. आंतरिक भाव-भावनांपेक्षा आपल्या देशात भावनेचे सार्वजनिक प्रदर्शन घडवणाऱ्या व्यवहाराला महत्त्व येत चालले आहे. 'भारत माता की जय' अशा आरोळ्या ठोकत सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले करणारे समाजातले गुंड मवाली गट त्याचा फायदा उठवून सर्वत्र दहशत निर्माण करू पाहता आहेत. वास्तविक देशातले खरेखुरे देशद्रोही या समाजगटात मोठ्या प्रमाणावर आहेत

‘पण लक्षात कोण घेतो?’ या सवालापाशी आपल्या समाजातले सर्व प्रश्न अंतिमतः: येऊन ठेपतात. देशाच्या मानचिन्हाचा शस्त्राप्रमाणे वापर करून स्वत:चे वर्चस्व टिकावू पाहणाऱ्या दुष्ट समाजशक्तींना नैतिक अधिष्ठान देणे ही ठीक नाही. नकळत का होईना राष्ट्रगीतासंबंधीच्या आदेशाने समाजकंटकांच्या विध्वंसक वृत्तीला उत्तेजन देण्याचे काम देशातली न्यायव्यवस्था करते आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे.

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

awdhooot@gmail.com