‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध कला यांचा मिलाफ आहे!
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • ‘कुहू’चं मुखपृष्ठ
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika ब्र Bra भिन्न Bhinna ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम Thaki ani Maryadit Purushottam कुहू Kuhu

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. महाजन यांची ‘कुहू’ ही मराठीतली पहिलीवहिली मल्टिमीडिया कादंबरी. त्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीचं हे पुनर्प्रकाशन...

.............................................................................................................................................

‘कुहू’ या मल्टिमीडिया कादंबरीच्या वेगळेपणाविषयी काही सांगाल का?

- ‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध कला यांचा मिलाफ आहे. जे सांगायचे आहे, ते शब्द, सूर, रंग, अ‍ॅनिमेशन अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून अनेकांच्या सोबतीने सांगितले आहे. इ-बुक किंवा साउंडबुकमधला कंटाळवाणा तोचतोचपणा विविध माध्यमांच्या वापरामुळे गायब होऊन जातो. ही कादंबरी डीव्हीडीवर आहे आणि तिला छापील पुस्तकाचाही पर्याय दिलेला आहेच. आर्टपेपरवरील रंगीत छपाई आणि थ्रीडी मुखपृष्ठ ही छापील पुस्तकाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. डीव्हीडीवरील पुस्तक हे बघत-बघत ऐकण्याचे पुस्तक आहे. एखाद्या पुस्तकात छायाचित्रे, रेखाटने, आकृत्या असतात; ते पूरक म्हणून. पण इथे कोणताही घटक उपरा नाही. एखाद्या गणितात जसे काही आकडे असतात, काही चिन्हे असतात आणि काही शब्द असतात; त्यातले काही वगळले तर अर्थ बदलतो आणि अपूर्णत्व येते. त्याचप्रमाणे इथे शब्द, संगीत, चित्रे, छायाचित्रे, कॅलिग्राफी, व्हिडिओ क्लिप्स आणि अ‍ॅनिमेशन हे सारे घटक एकत्र आले आहेत. एखाद्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगळे व्यक्तिमत्त्व असलेली असूनही त्या कुटुंबातील म्हणून ओळखू येत असतेच. तसेच विविध कलांच्या या सगळ्या वाटा एका ठिकाणाहून निघतात आणि परत आपापल्या तऱ्हेने एकाच मुक्कामावर पोहोचतात. माझी या मागची फँटसी अशी आहे की, एक दिवस लोक आपली आवडती पुस्तके थिएटरमध्ये जाऊन पाहतील, ऐकतील, अनुभवतील. घरच्या टीव्हीवर वा संगणकावर ‘कुहू’ अनुभवणे ही त्याची सुरुवात आहे.

लेखन या प्रमुख भूमिकेच्या पलीकडे झेप घेत तुम्हांला मल्टिमीडिया कादंबरीसाठी अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या, त्याविषयी...

 - जबाबदाऱ्या मला आवडतात. भरपूर काम असले की मजा वाटते. एकटीने टेबलाशी बसून काहीतरी काम करणे हा माझा स्वभाव नाही; टीमवर्क मला आनंद देते. ‘कुहू’मुळे मी निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सपासून ते अनेक तऱ्हांच्या कामांबद्दल बरेच काही शिकले. साउंड रेकॉर्डिंग, अ‍ॅनिमेशन, फोटोग्राफी... किती कामे कशी केली जातात, ते पहिल्यांदाच पाहिले, अनुभवले, केले आणि तब्बल ४० जणांच्या टीमचे कोऑर्डिनेशन करत करूनही घेतले. लेखन, पेंटिंग्ज या क्रिएटिव्ह गोष्टींसोबत वेगवेगळ्या लोकांची मोट बांधून काम करवून घेणे, एक प्रॉडक्ट तयार करणे आणि त्याचे मार्केटिंग करणे हे काम देखील होते; कारण हे पुस्तक मी स्वत: प्रकाशित करत आहे. यात महत्त्वाचे हे आहे की, या टीममधल्या आम्हा सगळ्यांना एकमेकांविषयी विश्वास आणि आदर वाटतो. आपापल्या तऱ्हेने काम करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते. भरपूर चुका झाल्या. कधी वेळ व पैसा वाया गेला. पण प्रत्येकाला हे काम आपले वाटणे, त्यांनी ते उत्साहाने, प्रयोगशीलता राखून, कामातला आनंद अनुभवत करणे घडत गेले. नादिष्ट आणि झपाटून काम करणारी टीम आहे. यातले खूप काम आम्ही सगळ्यांनी आपापल्या जागी केले. वेगवेगळ्या देश-प्रदेशात राहणाऱ्या या सहकाऱ्यांना इंटरनेटमुळे जोडून घेता आले. इ-मेल, वेबकॉन्फरन्स, फोन याद्वारे बहुतेक कामे झाली. यातील अनेकांना मी अजून प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करता येतो याचे ‘कुहू’ हे उत्तम उदाहरण आहे.  आरती अंकलीकर व चैतन्य कुंटे यांचे संगीत, समीर सहस्त्रबुद्धेचे कलानिर्देशन, मनीष गव्हाणेचा इंग्लिश अनुवाद ही टीममधील प्रमुख जबाबदारीची कामे होती. डॉ. अविनाश टिळक यांचे व्यवस्थापनाबाबतचे मार्गदर्शन या साऱ्या प्रवासात मोलाचे ठरले.

तुमच्या आजपर्यंतच्या कादंबऱ्या या वास्तवदर्शी, सामाजिक जीवनावर बेतलेल्या होत्या. ‘कुहू’ ही कादंबरी त्यांच्याहून खूपच वेगळी आहे. ‘कुहू’ ही एक रूपककथा आहे. त्याविषयी...

- ‘कुहू’ रूपककथा आहे, मात्र ती व्यक्तिकेंद्रित नाही. जंगलाचे आणि माणसांचे नाते हा तिचा विषय आहे. प्रेम असामाजिक आणि सार्वजनिक समस्या सामाजिक असे काही असते का? आज सगळ्या गोष्टी इतक्या एकमेकांत मिसळलेल्या आहेत की, अशी लेबले लावणे विनागरजेचे बनलेले आहे. ‘कुहू’ ही वास्तवावर आधारित फँटसी आहे. ज्यांची आपण कधीच कल्पना केलेली नसते अशी अनेक वास्तवं निसर्गात अनुभवायला मिळतात. ही वास्तवं कल्पनेहून अधिक अद्भुत असतात. आम्ही अशा अनेक गोष्टी दिसल्या तरी त्याकडे पाहणे विसरून गेलो आहोत. जे नैसर्गिक आहे, ते सभ्यतेच्या अतिरेकी कल्पनांमुळे हळूहळू आम्हांला अनैसर्गिक वाटू लागले आहे. प्रेम करणाऱ्या लोकांना मनोरुग्ण समजले जाईल, प्रामाणिक माणसांकडे संशयाच्या नजरा रोखल्या जातील, भ्रष्टाचार-गैरव्यवहार न करणाऱ्यांना तुरुंगाच्या वाटा दाखवल्या जातील; असे टोकाचे भय वाटण्याचे दिवस आले आहेत. या विपरितातूनच चांगले ते शोधणे, योग्य ते जोपासणे, सुंदर ते वाढवणे गरजेचे बनले आहे; असा विचार या लेखनामागे आहे.

मध्यंतरी तुम्ही लेखनसंन्यास घेतला आहे, असे वाचकांना वाटले होते. त्यानंतर या कादंबरीच्या निमित्ताने तुमच्यातील एक वेगळी लेखिका वाचकांच्या भेटीला आली. त्याविषयी...

- ‘कुहू’ पूर्वीच, म्हणजे ‘भिन्न’ लिहून झाली आणि मी ‘भिन्नचे’ संपादन करत होते, तेव्हाच २००७ साली लिहून ठेवली होती. दोनेक वर्षं ती पडूनच होती. खरे तर माझ्यासाठी जगण्याची आणि लिहिण्याची सांगड घालणे मुश्किल बनलेले आहे. मी ज्या पद्धतीचे लेखन करत आले, त्याची संशोधन ही गरज आहे. हे भरपूर खर्चाचे काम असते. आता ‘कुहू’साठीही मी मोठे कर्ज काढले आहे. ती जोखीम स्वीकारायचे धाडस केले, म्हणून एक कल्पना प्रत्यक्षात उतरली. केवळ पैसाच नव्हे, तर वेळ, बळ सारेच मुबलक खर्च करावे लागते. अशा वेळी निदान प्राथमिक गरजा तरी भागतील इतकी अनुकूलता असावी; ही माझ्यासारखीची किमान अपेक्षा असते. पण ते घडत नाही. साहित्यक्षेत्रातील वातावरणदेखील उबगवाणे आहे. या सततच्या प्रतिकूलतेने थकून ‘भिन्न’ प्रकाशित झाल्यानंतर मी लेखन ठरवून थांबवले. हा रायटर्स ब्लॉक नव्हता; मला पुष्कळ सुचत असते. पण परवडत नाही म्हणून लेखन थांबवावे लागले. खेरीज मनात काही भावनिक आणि वैचारिक गोंधळ तयार झाले होते. त्यातून बाहेर कसे पडायचे ते कळत नव्हते. याच काळात मी कुमार केतकर यांचे ‘लोकसत्ता’मधील त्रिकालवेध हे सदर वाचत गेले आणि आपण जे विचार करतो आहोत ते चुकीचे नाहीत, अशी जाणीव झाली. त्याच सुमारास विचार करण्याच्या पद्धतीत बदल केले तरी आपले अर्धे प्रश्न सुटू शकतात, हे एका मित्राशी संवाद साधताना कळत गेले. मग फेसबुक, ब्लॉग ही साधने मी व्यक्त होण्यासाठी निवडली. त्यानंतर बाजूला सारलेले ‘कुहू’चे स्क्रिप्ट पुन्हा हाती घेतले आणि नवे लेखन करणे जुळले नाही तरी निदान जे आधी लिहून ठेवले आहे ते तरी प्रकाशित करू असे ठरवले. त्यातली ‘ग्राफिटी वॉल’, ‘मृगजळीचा मासा’ ही पुस्तके राजहंस प्रकाशनाकडून आली आणि ‘कुहू’ मी स्वत: दिशा क्रिएटिव्हज तर्फे प्रकाशित करते आहे.

‘कुहू’च्या निमित्ताने तुमची चित्रकलाही वाचकांसमोर आली. या आधीच्या तुमच्या पुस्तकांची मुखपृष्ठे वगैरेच्या निमित्ताने ही कला या आधी का दिसली नाही?

- माझ्या ‘ग्राफिटी वॉल’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ / मांडणी मी स्वत: केली आहे. त्यात मी घेतलेली छायाचित्रेही आहेत. पण हे व्यावसायिक काम झाले. चित्रं करायची तर मनाचा खूप मोकळेपणा लागतो. माझी मधली अनेक वर्षं आक्रसलेल्या मनाची गेली. आता हळूहळू स्वत:ला काय हवे आहे, काय करायचे आहे, याचा प्राधान्यक्रम ठरवू शकतेय. तर तब्बल अठरा वर्षांनी पुन्हा ऑईल पेंटिंग्ज सुरू केली. लेखन थांबवल्यानंतर जी घुसमट झाली, तिच्यातून बाहेर पडायला चित्रांनीच मदत केली. निर्हेतुक कामाचा सहज आनंद  लाभला.

या मल्टिमीडिया कादंबरीला प्रतिसाद कसा मिळतोय?

- उत्सुकता खूप आहे. फेसबुकवर, ‘कुहू’च्या वेबसाइटवर त्याचे प्रतिबिंब दिसते. बरेच उलटसुलट प्रश्न विचारले गेले; टीका केली गेली. हा वेडेपणा आहे, असे म्हटले गेले. वेडे म्हणवून घ्यायला माझी हरकत नव्हती; हा मूर्खपणा आहे असे जोवर कुणी म्हणत नाही, तोवर मला काळजी नाही. प्रत्यक्षात या प्रश्नांचा, चर्चेचा मला फार चांगला उपयोग झाला. टीकेतून जे मुद्दे उपस्थित झाले, त्यातून माझे विचार अधिक स्पष्ट व ठाम बनले आणि काही संभाव्य चुकाही टळल्या. पुस्तकाची ‘कुहू डॉट इन’ ही स्वतंत्र वेबसाईट असणे, ब्लॉग, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगचा उपयोग करून घेणे, ऑनलाईन बुकिंगची सोय यांमुळे चांगला फरक पडला.

या वेगळ्या प्रयोगातून नेमके काय साध्य झाले?

- चांगल्या हेतूने माणसे एकत्र येऊन एखादे काम व्यवस्थित पार पाडू शकतात, हे समजले. नवी पिढी किती स्पष्ट विचारांची आणि भरपूर मनसोक्त काम करणारी आहे हे ध्यानात आले. तंत्रज्ञानाचा कलात्म वापर कसा करता येऊ शकतो, या विचारासह कृतीच्या शक्यता खुल्या झाल्या. स्वच्छ हेतूने, अथक प्रामाणिक कष्टांनी, योग्य रीतीने केलेल्या कामाला दाद मिळते, न्याय मिळतो हे जाणवले.

‘कुहू’ या कादंबरीची वेगळी बालआवृत्तीही येते आहे. त्याविषयी...

- ‘कुहू’मधील फक्त गोष्ट बाजूला काढून, ती मुलांसाठी सोप्या भाषेत लिहिली. पुस्तकाची चित्रांसह छायाचित्रे वापरून वेगळी मांडणी केली. मूळ पुस्तकातला गंभीर भाग, मृत्यूसारखे विषय बालआवृत्तीत वगळले. पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज; शरयू दाते, मयुरी अत्रे या लहान मुलींनी गायलेली गाणी आजच्या टेक्नोसॅव्ही मुलांना एका वेगळ्या जगात घेऊन जातील. पर्यावरणासारखे विषय त्यांच्या अभ्यासामाचा भाग आहेत. ‘कुहू’मुळे या विषयांकडे मुले आनंदाने पहायला शिकतील.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा