...हा अनुवाद केला नसता तर पुढे स्वतंत्र गद्यलेखनाचं धाडस मी कधीच केलं नसतं!
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • ‘रजई’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika लैंगिकता Sexuality इस्मत चुगताई Ismat Chughtai रजई Rajai

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख. कविता महाजन यांनी इस्मत चुगताई यांच्या उर्दू कथांचा ‘रजई’ या नावाने मराठी अनुवाद केला. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण...

.............................................................................................................................................

पारंपरिक शेतीमध्ये आजच्याप्रमाणे एकच एक पीक घेतलं जात नसे. एकाच वेळी तीन-चार पिकं घेतली जात. त्यातही काही वर्षांनी पीक-बदल केला जाई. बांधावर झाडं-फळझाडं असत. एखादा कोपरा भाजीपाल्यासाठी राखला जाई. ही सर्व पिकं एकमेकांना पूरक असत आणि या पद्धतीनं जमिनीचा कसदेखील टिकून राही. लेखनाकडे शेती म्हणून पाहिलं तर हीच प्रतिमा विविध प्रकारात लेखन करणाऱ्या लेखकांच्या दृष्टीनं अत्यंत समर्पक ठरते. खासकरून प्रत्येक क्षेत्रात छोटे छोटे विभाग केले जाऊन ‘स्पेशलायझेशन’चं युग आलं व स्थिरावलं. त्या काळात तर ती महत्त्वाचीही ठरते. तसाही शेतीप्रमाणेच लेखनदेखील आतबट्ट्याचाच व्यवहार आहे. पण हाडाचा शेतकरी शेतीशिवाय दुसरं काही करू शकत नाही, त्याप्रमाणे हाडाचा लेखकही लेखनाखेरीज दुसरं काही करू शकत नाही. महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या संख्येनं आत्महत्या करत आहेत, तशा अजून लेखकांच्या आत्महत्या सुरू झालेल्या नाहीत, इतकंच.

त्या न होण्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण आहे — अनुवाद.

मी पूर्ण वेळ लेखन करते. कवी ही माझी पहिली ओळख आहे. कादंबरीकार ही दुसरी. अनुवादक ही तिसरी व संपादक ही चौथी. याखेरीज मी अधूनमधून पेंटिंग्जही करते. पूर्ण वेळ लेखन करत लेखक म्हणून स्थिरावलेली असताना मी अनुवादाकडे का वळले, हे आज मी तुम्हांला सांगणार आहे.

(अ.) ज्या काळात मी हौशी लेखन सुरू केलं, त्याच काळात मी कवितांच्या अनुवादाला सुरुवात केली. हे अनुवाद स्वत:साठी होते, ते कुठे छापता येतात याची माहितीही मला नव्हती. आपल्या भाषेत लेखन वाचलं की, ते अधिक सखोलतेनं समजतं, इतकंच मला त्या विद्यार्थिदशेत कळलं होतं आणि त्यामुळे हिंदी-उर्दू या भाषांमधील अनेक कविता मी अनुवादित केल्या. कवितेच्या अनुवादामुळे कविता या रूपबंधाविषयीचं माझं आकलन वाढलं, हे ध्यानात आल्यावर मी कथांचाही अनुवाद सुरू केला.

माझ्या मनात गद्यलेखनाची धास्ती होती. तो आपला प्रांत नाही असं वाटत होतं. त्यामुळे जे आपल्याला जमत नाही आणि इतरांना जमलं आहे, ते कसं जमलं असेल या कुतूहलापोटी मी कथांचे अनुवाद करू लागले. याच काळात मी वेगानं सामाजिक कार्य सुरू केलं. स्त्रियांच्या समस्यांवर आम्ही संघर्षात्मक कार्य करत होतो आणि काही विधायक कामंही करत होतो. या कामाचा एक भाग म्हणून अनेक वैचारिक व माहितीपर लेख वृत्तपत्रं - मासिकांसाठी अनुवादित करण्याचा मी धडाका लावला. त्यामुळे लेखनासाठी जे एका जागी स्थिर बसून काम करावं लागतं, ती चिकाटी माझ्यात निर्माण झाली. मी कोशांचा वापर करण्यास शिकले. या काळातील स्वतंत्र लेखन व अनुवाद म्हणजे माझ्या दृष्टीनं सामाजिक कार्याचाच एक भाग होता. मनात विद्रोह आणि बंडखोरी होती, जोडीला तरुण वयात असतेच, ती रोमँटिक वृत्तीही होती.

याच सुमारास मी इस्मत चुगताई यांच्या कथा वाचल्या आणि माझं भावनिक - वैचारिक आयुष्यच बदलून गेलं. माझ्या आजीच्या वयाची बाई, मुस्लीम समाजातली, त्या काळात जर इतकं धाडस तिच्या भाषेत करते; तर आजच्या काळात माझ्या भाषेत हे धाडस मी का करू शकत नाही, असा प्रश्न माझ्या मनात उगवला. इस्मत चुगताई यांच्या कथांच्या अनुवादानं मला नवा जन्म दिला. हा अनुवाद मी केला नसता तर पुढे स्वतंत्र गद्यलेखनाचं धाडस मी कधीच केलं नसतं आणि मराठीतील कादंबरीचा वाङमय प्रकाराला पूर्णत: नवे वळण देणारी कादंबरीकार म्हणून माझी जी ओळख बनली, ती कधीच तयार झाली नसती.

१. अनुवादानं वाङमय प्रकाराची जाण वाढते.

२. स्वतंत्र लेखनासाठी बैठक तयार होते.

३. नव्या विषयांवर धाडसानं लेखन करण्याचं बळ मिळतं.

— हे तीन व्यक्तिगत फायदे मी इथं सांगितले.

दोन कवितासंग्रह, एक आदिवासी लोकगीतसंग्रह आणि एक कथासंग्रह अशी अनुवादाची केवळ चार पुस्तकं माझ्या नावावर आहेत आणि पुढील पुस्तकाचं काम सुरू आहे. माझे अप्रकाशित अनुवादही पुष्कळ आहेत, जे मी माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून दिले आहेत.

(ब.) अनुवादासंदर्भातील माझ्या अजून एका कामाविषयी मी आज इथं सांगू इच्छिते. विविध चर्चासत्रं, कवीसंमेलनं यांतून भारतातील अनेक लेखिकांशी माझी ओळख व मैत्री झाली. त्यांच्याशी बोलताना प्रत्येक भारतीय भाषेत किती वेगवेगळे विषय हाताळले जाताहेत आणि किती नवीन वाङमय प्रकारांत लेखन होत आहे, हे ध्यानात आलं. भारतीय लेखिका हा ४० अनुवादित पुस्तकांचा प्रकल्प मी यातून आखला. लेखिकांची निवड, त्यांच्या पुस्तकांची निवड आणि योग्य अनुवादकांची निवड करणं, हे मोठं कसोटीचं काम होतं. अनुवादाच्या क्षेत्रातील गैरप्रकार, दोष आणि तुटी या प्रकल्पामुळे माझ्या ध्यानात आल्या.

१. जुनी, दोन-तीन पिढ्या आधीची पुस्तकं अनुवादासाठी निवडली जातात; समकालीन क्वचितच दिसतं.

२. लोकप्रिय लेखक वा लोकप्रिय पुस्तकंच निवडली जात होती. अभिजात पुस्तकं बाजूला राहतात.

३. कविता या वाङमय प्रकाराकडे तो अनुवादास अवघड असल्यानं आणि प्रकाशक छापण्यास उत्सुक नसल्यानं दुर्लक्ष होत आहे.

४. अनुवादासाठीच्या पुरस्कारांची संख्या वाढल्यानं, अनुवादाबाबत पुरेसं गांभीर्य नसणाऱ्या व काम कसबसं एकाच ड्राफ्टमध्ये उरकून टाकणाऱ्या हौशी अनुवादकांची संख्या वाढते आहे.

५. परिचित अनुवादकांकडून लेखक स्वत: पैसे देऊन अनुवाद करून घेतात. त्यामुळे अत्यंत सुमार दर्जाच्या साहित्याचे अनुवाद होत असताना दिसतात.

६. अनुवादाबाबत काही निश्चित आर्थिक धोरण नसल्यानं अनुवादाच्या कामाचे दर सर्वत्र वेगळे दिसतात.

७. अनुवाद हे दुय्यम दर्जाचं काम मानलं जात असल्यामुळे स्वतंत्र लेखन करणारे उत्कृष्ट लेखक अनुवादाकडे कमी वळतात. अनुवादालादेखील निराळी प्रतिभा आणि कौशल्य लागतं, याची जाणीव खूप कमी लेखकांकडे आहे. माझ्या दृष्टीनं तर अनुवाद ही एक स्वतंत्र अभिव्यक्तीच असते. अनुवादाची व्यावसायिक कामं मी करत नाही... तर जे लेखन आपलंच असल्यासारखं वैचारिक जवळिकीचं वाटतं, त्याचाच फक्त मी अनुवाद करते. स्वतंत्र लेखनाचा विषय जसा सहज सुचतो, त्याचप्रमाणे अनुवादित लेखनाची निवडही माझ्याकडून आपोआप होते.

‘भारतीय लेखिका’ या प्रकल्पातील १४ पुस्तकं आता प्रकाशित झाली असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. संपादनाच्या या प्रक्रियेत अनेक लेखक अनुवादकांशी संवाद साधल्यानं माझी समज निश्चितच वाढते आहे. कारण प्रत्येक पुस्तक अनुवादातील नव्या समस्या व नवी कौशल्यं दाखवणारं असतं.

(क.) अनुवादासंदर्भातील माझा तिसरा अनुभव म्हणजे माझ्या लेखनाचा इतर भाषांमध्ये झालेला — होत असलेला अनुवाद. या वेळी स्वत: अनुवादक असल्याच्या अनुभवाकडे माझ्या साहित्याच्या अनुवादकांना मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि आवश्यक तिथं सहकार्यही केलं. कारण आदिवासी जमातींची माहिती, बोलीभाषेचा वापर यामुळे अनुवादकासमोरच्या समस्या वाढतात. स्वत:च्या कवितेचा दुसऱ्या भाषेतील अनुवाद ऐकताना कशी मन:स्थिती होते, याविषयी मी लिहिलेली एक कविता तुम्हांला ऐकवते.

दुसऱ्या भाषेत अनुवाद केलेली स्वत:ची कविता ऐकताना काही असं वाटतं :

परक्या घरात, कुणा अनोळखी बाईला

आई म्हणून हाक मारत

सांगतेय माझी मुलगी काहीबाही...

... खूप भूक लागलीये, लवकर वाढ.

... कशी दिसते मी हा फ्रॉक घातल्यावर?

... सांग ना, चांदण्यांना आभाळ कुणी दिलं?

... बघ, मला चालता येतं तुझे बूट घालून!

आणि मी निमूट, पाहुण्यागत

पाहतेय नुसती कौतुकानं, खुर्चीवर बसून;

उत्तरांची जबाबदारी माझी नसते म्हणून...

‘अनुवाद’ या शब्दाचा इतका चांगला प्रभाव माझ्यावर पडला की, माझ्या नव्या कादंबरीत देवचाफ्याच्या फुलाचं वर्णन करताना मी लिहिलं की, ‘हे फूल म्हणजे जणू उजेडाचा अनुवाद आहे!’ अनुवादानं मिळणारं समाधान आणि बळ साहित्य अकादेमीच्या या पुरस्काराच्या निमित्तानं तुमच्यासोबत वाटून घेता आला, याचा आनंद वाटतो.

धन्यवाद!

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा