अयोध्येला सांप्रदायिक राजकारणाने ‘धर्मसंघर्षाचे केंद्र’ म्हणून पुढे आणले आहे. पण मुळात या शहराचा इतिहास ‘बहुसांस्कृतिक’ आहे!
पडघम - देशकारण
सरफराज अहमद
  • अयोध्या शहराचे प्रवेशद्वार
  • Thu , 12 September 2019
  • पडघम देशकारण अयोध्या Ayodhya राम जन्मभूमी Ram Janmabhoomi अमीर खुसरो Amir Khusrow बाबर Babur बाबरनामा Baburnama सरफराज अहमद sarfraj Ahamad

बाबरी मसजिद आणि रामजन्मभूमी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जमीन वादाचा निकाल महिन्याभरात येण्याची अपेक्षा आहे. बाबर आणि त्याचा इतिहास या प्रकरणाशी संबधित आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा इतिहास चर्चिला जाणार आहे. त्यानिमित्ताने बाबर आणि बाबरी मसजिदच्या अनुषंगाने ही पाच लेखांची मालिका. त्यातील हा चौथा लेख... पुढचा लेख येत्या गुरुवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

‘वैश्विक सभ्यतेचे केंद्र’ म्हणून जगभर जेरुसलेमची ओळख आहे. या शहराला जगातील तीन प्रमुख धर्मांचे तीर्थस्थान मानले जाते. ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु धर्मीयांची श्रद्धास्थाने या शहरात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या शहराची ओळख संस्कृती आणि सभ्यतांची जन्मभूमी म्हणून आहे. अयोध्या वगळता जगातील कोणत्याही अन्य शहराला जेरुसलेमप्रमाणे सभ्यतांचे केंद्र म्हणवण्याचा सन्मान मिळालेला नाही. अयोध्येने जेरुसलेमहून अधिक सभ्यतांच्या इतिहासाला आपल्यात सामावून घेतले आहे.  सभ्यता आणि संस्कृतीच्या वैविध्यतेने अयोध्येला जेरुसलेमपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. हे शहर जैनांच्या तीर्थंकरांचे, बौद्धधम्माच्या भिक्खुंचे आणि हिंदूंच्या प्रमुख दैवताची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या तीन गुरूंचा पदस्पर्श या शहराला लाभला आहे.

भारतात इस्लामच्या प्रसारातदेखील या शहराने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे भारतीय इस्लामच्या इतिहासाच्या साधनांमध्ये त्याचा उल्लेख थेट ‘मक्का खुर्द’ म्हणून केला जातो. सुफी इतिहासाच्या काही साधनांमध्ये त्याचा उल्लेख ‘मदिनतुल अवलिया’ म्हणजे (सुफींचा मदिना) असा करण्यात आला आहे. या शहाराला इस्लाम धर्मातील दोन तीर्थक्षेत्रानंतरचे शहर म्हणून ख्याती मिळाली आहे. तर जागतिक पातळीवरील अनेक अभ्यासकांनी ‘जेरुसलेम द्वितीय’ म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. अयोध्या प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी या शहराला ‘गंगा जमनी संस्कृतीची जन्मभूमी’ म्हटले आहे. दुर्दैवाने अनेक धर्मांच्या इतिहासाला आपल्या हृदयात सामावून उभ्या असलेल्या या शहराला आज सांप्रदायिक राजकारणाने ‘धर्मसंघर्षाचे केंद्र’ म्हणून पुढे आणले आहे. पण मुळात या शहराचा इतिहास बहुसांस्कृतिक आहे.    

अयोध्या शहराचा इतिहास

अयोध्येची प्राचीन, मध्ययुगीन काळातील इतिहासाच्या साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तब्बल २० हून अधिक नावे आढळतात. अयोध्या प्रश्नाचे अभ्यासक शितला सिंह यांनी ही नावे त्यांच्या पुस्तकात नोंदवली आहेत. उदा. ‘अयोज्झा, अयुज्झापुर, अजोदह, अ-यु-ज, उज्झा, अयुधा आणि अवध इत्यादी. याशिवाय साकेत, शोगेद, श-कि (साकेत), श-कि-त ही नावेदेखील आहेत. त्याचबरोबर विनिता आणि विणिता, विसाखा, कोसल, कोसल नगर, कोसलपुरी, कोसला नगरी, इक्खाभूमी, रामपुरी, पदमपुरी अशीही अनेक नावे आहेत. शिवाय महाभारतात पुष्य, लक्षणा, नन्दीनीदेखील म्हटलेले आहे. अयोध्येची स्थापना मनुने केल्याचे मानले जाते. इस्लामी इतिहासाचे काही अभ्यासक या शहराला प्रेषित नुह (अ.) यांच्याशी जोडतात, तर काही अभ्यासक नुह (अ.) यांचाच हिंदू ग्रंथात मनु म्हणून उल्लेख असल्याचे सांगतात. हा वादाचा विषय असला तरी हिंदू, इस्लाम आणि बौद्ध धर्मांचा या शहराशी असणारा संबंध प्राचीन आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यापूर्वी झालेल्या काही इस्लामी प्रेषितांचा या शहराशी संबंध आला आहे.

बौद्ध धम्म आणि अयोध्या   

भारत ही बौद्ध धम्माची जन्मभूमी आहे. बौद्ध धम्म ज्या वेळी उत्कर्षाला पोहोचला होता, त्या वेळी अयोध्या बौद्ध धम्माच्या प्रमुख केंद्रापैकी एक होते. आजही या शहरात अनेक बौद्ध आहेत. प्रख्यात चिनी प्रवासी आणि विद्वान ह्युएन त्संग हा भारतात आला होता. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात भारतातील अयोध्या हे शहर बौद्ध धम्माचे एक केंद्र असल्याचा उल्लेख केला आहे. त्याने अयोध्येत जवळपास ३ हजार बौद्ध भिक्खु राहतात आणि अयोध्या बौद्ध धम्माचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी अयोध्येत १०० बौद्ध मठ आणि दहा मोठी मंदिर अस्तित्वात असल्याची माहिती त्याने दिली आहे.

ह्युएन त्संगप्रमाणे अन्य काही चिनी प्रवासीदेखील भारताच्या भेटीवर आले होते. त्यापैकी फाहियान (काहिन) हा चिनी प्रवासी ह्युएन त्संग इतकाच विख्यात आहे. तो साधारण पाचव्या शतकात भारतात आला होता. त्याने अयोध्या शहरात असलेल्या एका बौद्ध कुंडाचा उल्लेख केला आहे. आज त्याचे स्वतंत्र अस्तित्व कुठेच पाहायला मिळत नाही. कारण कालातंराने ब्राह्मणांनी त्याला ‘दातन कुंड’ हे नाव देऊन आपल्या ताब्यात घेतले. अयोध्या शहाराशी बौद्ध धम्माच्या सहसंबंधांवर समाधानकारक संशोधन होऊ शकलेले नाही.

इतिहासलेखनातील प्राप्त तथ्यांनुसार अयोध्येचा इतिहास मुळात बौद्धकाळापासून मानला जातो. पाली साधनांमध्ये साकेत आणि श्रावस्ती म्हणून ज्या शहराचा उल्लेख आहे, ते शहर अयोध्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात अयोध्या एक व्यापारी नगरी असल्याचे म्हटले जाते. पण मौर्य काळातील इतिहासाच्या त्रोटक साधनांवरून कोणतेच ठाम निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल. पुष्यमित्र ष्युंग, गुप्त वंशाच्या राजवटीतील अयोध्येविषयीची उपलब्ध माहिती तथ्यापर्यंत पोहचण्याइतकी समाधानकारक नाही. बौद्ध धम्माप्रमाणेच जैन धर्माच्या इतिहासात अयोध्येचा उल्लेख आढळतो.

जैन धर्म आणि अयोध्या

जैन धर्म हा भारतात जन्माला आलेल्या धर्मांपैकी एक आहे. जैन धर्माचा भारतातील उदय व त्याचा विस्तार यांच्यामध्ये अयोध्येची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जैन धर्मातील पाच प्रमुख  तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) ऋषभदेव, २) अजीतनाथ, ३) अभिनंदननाथ, ४) शुक्तनाथ आणि ५) अनंतनाथ. जैन धर्माच्या उत्कर्षाच्या काळात अयोध्या शहरामधून धर्मप्रसाराचे कार्य करण्यात आले होते.

जैन आणि बौद्ध या भारतीय धर्मांप्रमाणे शीख धर्माचा जन्म भारतात झाला आहे. आणि या धर्माच्या इतिहासाशीही अयोध्या शहराचा संबंध येतो. शरयु नदीच्या किनारी असलेले गुरुद्वार ब्रह्मकुंड साहेब अयोध्या आणि शीख धर्मांच्या सहसंबंधाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक हे १५५७ मध्ये अयोध्येत आले होते. त्यांच्यानंतर १७२५ मध्ये गुरू तेगबहादुर आणि १७७२ मध्ये शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग अयोध्येला आले होते. त्यामुळे शीख इतिहासात भारतातील ज्या प्रमुख शहरांना महत्त्व दिले जाते, त्यामध्ये अयोध्येचा समावेश होतो. बौद्ध, हिंदू, जैन, शीख या धर्माव्यतिरिक्त इस्लाम भारतातील प्रमुख धर्म आहे. इस्लामच्या इतिहासातील अयोध्येचे महत्त्व याविषयी उर्दूमध्ये मोठ्या प्रमाणात लिखाण करण्यात आले आहे. या विषयावरचे काही साहित्य फारसी भाषेमध्येही उपलब्ध आहे.   

इस्लाम आणि अयोध्या

इस्लामी श्रद्धेनुसार आदम (अ.) हे पहिले मानव आणि इस्लामी प्रेषित परंपरेतील पहिले प्रेषित आहेत. त्यांचे चिरंजीव हजरत शिस (अ.) हे इस्लामी प्रेषित परंपरेतील दुसरे प्रेषित मानले जातात. त्यांची कब्र अयोध्येत आहे. इस्लामी श्रद्धावंतासाठीची ती प्रेरणाभूमी आहे. मात्र काही इस्लामी अभ्यासकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. लोकजीवनात रूढ इतिहासाला आव्हान देणारे तथ्य या प्रकरणी अद्याप समोर आलेले नाही. कुरआनमध्ये ज्या इस्लामी प्रेषितांचा उल्लेख आला आहे, त्यापैकी हजरत नुह (अ.) हे उल्लेखनीय आहेत. हजरत नुह (अ.) यांना अनेक धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी इश्वराच्या आदेशाने महाप्रलयातून जगातील जीवसृष्टी वाचवल्याचे कथा अनेक धर्मग्रंथात आढळते.

ही कथा हिंदू धर्मसंस्कृतीत मनुच्या नावाने नोंदवलेली आहे. या नुह (अ.) यांच्या नावाचा एक परिसर आजही अयोध्येत आहे. त्याला ‘नबी नुह का मोहल्ला’ म्हटले जाते. तर एका लोककथेप्रमाणे हजरत नुह (अ.) यांनी महाप्रलयकाळात वापरलेल्या जहाजाचे काही तुकडे अयोध्येत सापडल्याचा दावा केला जातो. आणि त्यावरच हजरत नुह (अ.) यांची दर्गाह बांधली असल्याचे मत काही अभ्यासकांनीही मांडले आहे.

सुफी परंपरेतही अयोध्येला मोठे महत्त्व प्राप्त आहे. शारदा दुबे यांनी अलिकडे अयोध्येच्या बहुसांस्कृतिकतेचा अभ्यास केला आहे. त्या म्हणतात, रामभक्तीच्या केंद्राच्या स्वरूपात उदयास येण्यापूर्वीच अयोध्या आणि त्याच्या परिसरात १०० सुफींनी निवास केल्याचा इतिहास समोर आलेला आहे. आपल्या नैतिक एकेश्वरवादावर आधारीत प्रेम आणि करुणेच्या संदेशाने त्यांनी मोठ्या संख्येनं लोकांना आपल्याकडे आकर्षित केले. त्यामध्ये मोठी संख्या त्या जातींच्या लोकांची होती, जे ब्राह्मणांकडून त्रासले होते.

अन्य शब्दांत सांगायचे तर, इस्लाम आणि अयोध्येचा संबंध १६ व्या शतकातील बाबरी मसजिदीच्या निर्मितीच्या कितीतरी आधीचा आहे. त्याला स्थानिक मुस्लिमांची मान्यता आहे. ते अयोध्येला ‘मक्का खुर्द’ मानतात. कारण मोठ्या संख्येत इस्लामी पैगंबर इथे दफन आहेत. स्थानिय परंपरादेखील हेच सांगते. त्यात दोन पैगंबर, आदमचा मुलगा, आणि नूह यांचा समावेश होतो.

मोहम्मद आरिफ इक्बाल यांनी बाबरी पूर्व अयोध्येवर लिहिलेल्या लेखात, अयोध्येच्या सुफी इतिहासाविषयी विस्ताराने लिखाण केले आहे. त्यांनी तब्बल १०० सुफी अयोध्येत होते असे म्हटले आहे. त्यापैकी किदवाई वंशपरंपरेतील काजी कुदवद्दीन अवधी हे मध्य आशियातून भारतात आले होते. त्यानंतर ते अयोध्येत निवासास होते. इस्लामचे विद्वान म्हणून त्यांना ख्याती मिळाली होती. त्याप्रमाणेच एक अन्य सुफी शेख बद्रुद्दीन मध्ययुगीन काळात अयोध्येत राहत होते. १५ व्या शतकात फिरदोसिया सुफी परंपरेतील महत्त्वाचे सुफी शेख जमाल कजरवी अयोध्येत येऊन स्थायिक झाले होते.

१४ व्या शतकातील महत्त्वाचे सुफी ख्वाजा निजामुद्दीन औलीया यांच्या पंथाचा वारसा चालवणाऱ्या अनेक खलिफांचे निवासस्थान अयोध्येतच होते. त्यांचा अध्यात्मवारसा चालवणाऱ्यांमध्ये शेख नसिरुद्दीन चिराग दहेलवी हे प्रमुख आहेत. ते अयोध्येत जन्मले होते. त्याशिवाय नक्शबंदी, चिश्तिया, कादरी परंपरेतील सुफी अयोध्येत आल्याचीही माहिती इतिहासाच्या साधनांमध्ये पाहायला मिळते. अयोध्येमध्ये आजही अनेक दर्गाह आहेत. त्यापैकी १) दर्गाह नुह (अ.) अथवा मोगजी पीर, २) सय्यद मोहम्मद इब्राहिम यांची दर्गाह, ४) तीन दरवेशांची दर्गाह, ५) बिजली शहिद यांची दर्गाह, ६) शहीद मर्दताबा यांची दर्गाह, ७) शेख सुमन शाह बाबा की दर्गाह, ८) नन्हे शाह बाबा दर्गाह, ९) शहिद बाबा दर्गाह, १०) पैगंबर शीस ( अ.) यांची दर्गाह, ११) शेख शम्सुद्दीन फर्यादर्स यांची दर्गाह, १२) बडी बुआ यांची दर्गाह, १३) मख्दुम शाह फतेहउल्लाह यांची दर्गाह, १४) सय्यद शाह मुकद्दस दर्गाह, १५) शाह जमाल कजरवी दर्गाह महत्त्वाच्या मानल्या जातात.  

याशिवाय अयोध्या शहरात पन्नासहून आधिक दर्गाह आहेत. हिंदू मंदिरांच्या जवळपास या दर्गाहची संख्या आहे. अयोध्या शहरात १०० हून अधिक मसजिदी, कब्रस्तान आणि मोहरमचे अशरखाने आहेत. १८१९ मध्ये जन्मलेल्या मौलवी अ. करिम अवधी यांनी ‘गमगुश्ता हालात ए अज्योध्या’ हा ग्रंथ लिहिला आहे. बाबरी मसजिदीचे इमाम मौलवी अ. कादर साहेबांचे सुपुत्र मौलवी अ. गफ्फार यांनी त्याचे उर्दू भाषांतर केले होते. या ग्रंथाच्या सुरुवातीला लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना लेखकाने अयोध्येत शेकडो दर्गाह आहेत. पण दर्गाह प्रचंड संख्येमुळे येणाऱ्या भाविकांना दर्गाहविषयी नेमकी माहिती मिळावी म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले होते. मौलवी अ. करीम अवधी या ग्रंथात एके ठिकाणी लिहितात, ‘‘आमचे शहर अज्योध्या एका काळात विश्वासपूर्वक सांगता येईल की, उलेमा, फकीर, सुफी संत आणि धर्मपंडीतांचे आश्रयस्थान होते. त्याला मक्का खुर्द म्हटले जायचे. त्याचे हे नाव अद्याप प्रसिध्द आहेत. कुतुब ए तवारीख, शेर ए निजामी, अरब ए अनासिर आणि अखलाक ए जाफरी या ग्रंथात हेच नाव आढळते.’’ 

खुसरोची अयोध्या

अयोध्या ही मानवी संस्कृतीच्या विकासाची साक्षीदार असणारी नगरी. इतिहासातल्या बऱ्या-वाईट प्रसंगाच्या खाणाखुणा घेऊन अयोध्या नगरी उभी आहे. इतिहासावर श्रद्धा लादून मानवी समाजाने केलेल्या नरसंहाराचादेखील वाईट अनुभव अयोध्येने घेतला आहे. मात्र मध्ययुगीन काळात प्रेमाचा संदेश घेऊन आलेल्या अनेक कवींनी अयोध्येच्या आत्म्याचा आवाज शब्दातून मांडला. अमीर खुसरो अयोध्येच्या मिलीजुली, गंगाजमनी संस्कृतीचे वाहक होते. ते बराच काळ अयोध्येत वास्तव्यास होते. त्यांनी अयोध्येत राहून अनेक कविता लिहिल्या. काही ग्रंथांचा भागदेखील त्यांनी अयोध्येतच पूर्ण केला. ते त्यांच्या कवितेत जे म्हणतात, त्याची आज भारताला गरज आहे. अयोध्या द्वेषाचे केंद्र बनण्यापेक्षा ‘खुसरोंची प्रेमनगरी’ म्हणून पुढे आली पाहिजे आणि भारत हा खुसरो म्हणतात त्याप्रमाणे माणसांना राहण्यासाठीचा ‘स्वर्ग’ बनला पाहिजे.

‘हस्त मेरा मौलीद व मावा वतन’

(हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे.)

दुसऱ्या एका कवितेत खुसरो म्हणतात-

‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन’

(भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे.)

देशावर प्रेम करणं हीदेखील धर्मनिष्ठा ठरली तर अयोध्येच्या नावाने झालेल्या नरसंहराला भारतीय समाजात कोणतेच स्थान राहणार नाही.

‘दीं ज रसूल आमदाहे काई ज मरा दीन’

(देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे.)

हिंदीचे प्रख्यात कवी लक्ष्मी शंकर वाजपेयी हे खुसरोंच्या परंपरेतील कवी आहेत. ते अयोध्येची आजची अवस्था पाहून अस्वस्थ होतात. राममंदिरासाठीचा हा संघर्ष पाहून ते थेट रामालाच साद घालतात. वाजपेयी लिहितात, 

लाशें जिसकी नींव में, खुनी हर दिवार

वह मंदिर हे राम, तुम कभी मत करना स्विकार

खुसरो आणि वाजपेयींची ही दृष्टी हिंदू-मुस्लिमांनी स्वीकारायला हवी.   

.............................................................................................................................................

संदर्भ

१) शितला सिंह, रामजन्मभूमी बाबरी मसजिद का सच, पृष्ठ क्र. २३७, फैजाबाद, २०१८

२) मोहम्मद आरिफ इक्बाल, ‘बाबरी मसजिद शहादत से कब्ल’ या संपादित पुस्तकातील  खलिक अहमद खाँ, यांचा लेख ‘अयोध्या मुख्तलिफ मजाहीब का मर्कज’  भाग – २, पृष्ठ क्र. २६०, २००४, नवी दिल्ली.

३) दुबे, शारदा, अयोध्या कि तस्वीरें, वर्तमान भारत का अंतर्विरोध, पृष्ठ क्र.२३, दिल्ली, सन २०१३  

४) मौलवी अ. करिम अवधी, ‘गमगुश्ता हालात ए अज्योध्या’ पृष्ठ क्र. ६ (प्रस्तावना), उद्‌धृत, तनवीर हाशमी यांचा लेख, ‘अज्योध्या जो कभी मदिनतुल अवलिया कहलाता था’, ‘दावत’, बाबरी मसजिद, विशेषांक, ४ जानेवारी २००११. पृष्ठ क्र. १९२१

५) सरफराज अहमद – मध्ययुगीन मुस्लिम विद्वान – खंड – १, मुंबई - २०१८

.............................................................................................................................................

या मालिकेतील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा, तसा मात्र मांडला गेला!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3574

२) बाबरच्या ‘बाबरनामा’मधून दिसणारा भारत नेमका कसा आहे?

https://www.aksharnama.com/client/article_detail/3589

३) औदार्य हा बाबरच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा घटक होता!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3606

.............................................................................................................................................

लेखक सरफराज अहमद हे टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आणि गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूरचे सदस्य आहेत.

sarfraj.ars@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 12 September 2019

सरफराज अहमद,
अयोध्येतला हिंदूमुस्लिम संघर्ष केवळ रामजन्मभूमीपुरता मर्यादित आहे. बाबरी नावाची कोणतीही मशीद कधीही अस्तित्वात नव्हती. कारण की गैरइस्लामी पूजास्थळी मशीद बंधने हा इस्लामचा घोर अपमान आहे. तर मग रामजन्मभूमीवरून हिंदू व मुस्लिमांचं भांडण व्हायलाच नको ना?
ही अक्कल बाबरी मशीद अॅक्शन कमिटीला कोण शिकवणार!
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......