राम जेठमलानी : बिग मॅन, बिग इगो
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • राम जेठमलानी (१४ सप्टेंबर १९२३ - ८ सप्टेंबर २०१९)
  • Tue , 10 September 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली राम जेठमलानी Ram Jethmalani अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee भाजप BJP

प्रख्यात पण वादग्रस्त वकील राम जेठमलानी यांचं परवा म्हणजे ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं. बुद्धिमान, (अति)उत्साही आणि वादग्रस्त ही जेठमलानी यांच्या आयुष्याची त्रिसूत्री म्हणावी इतक्या या गोष्टी त्यांना चिकटलेल्या होत्या. वकिलीच्या क्षेत्रात जवळपास सहा-सात दशके, तर राजकारणात जवळपास पाच दशके ते कार्यरत होते. या प्रदीर्घ काळात सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया जेठमलानी यांनी साध्य केली होती. ही काहीशी अदभुत म्हणावी अशीच गोष्ट आहे. कारण केवळ वादग्रस्तपणाच्या जोरावर इतका प्रदीर्घ काळ कुणालाही राजकारणात, समाजकारणात आणि आपल्या पेशात टिकून राहता येत नाही. त्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता, चातुर्य आणि प्रचंड मोठ्या आकाराचा ‘इगो’ असावा लागतो. या तिन्ही गोष्टी जेठमलानी यांच्याकडे होत्या. त्यांनी लढवलेले खटले, ते लढवताना त्यांनी केलेले युक्तिवाद हे जितके वादग्रस्त ठरले, तितकेच त्यांचे राजकारण, त्यात त्यांनी केलेले आरोप-प्रत्यारोपही वादग्रस्तच ठरले. अर्थात प्रत्येक वेळीच त्यांना जहरी टीकेला सामोरे जावे लागले असे नाही, कधी कधी त्यांच्या भूमिकेचे कौतुकही झाले.

जेठमलानी यांचे घराणे सिंधमधले. शिकारपूरचे राज्यपाल हे जेठमलानी यांचे खापरपणजोबा. ब्रिटिशांबरोबरच्या लढाईत पराभव होऊन ते अफगाणिस्तानात पळून गेले. पुढे तेथील राजकारणात मंत्री झाले. या जेठमलानी यांचा मुलगा नोतनदास. तो महत्त्वाकांक्षी नव्हता. वडलांच्या संपत्तीवर त्याने ऐषोरामात दिवस घालवले. पुढे तो शिकारपूरला परत आला. जिल्हा दंडाधिकारी झाला. नोतनदासचा थोरला मुलगा गुरमुखदास हा आपला सर्व वेळ दरबारात बसून न्यायनिवाडा ऐकण्यात घालवत असे. पुढे ते न्यायाधीश झाले. गुरमुखदास यांना बूलचंद नावाचा मुलगा होता. त्याने वडलांच्या पावलावर पाऊल टाकून कायद्याचा अभ्यास केला. पुढे ते वकील झाले. गुरमुखदासने त्याचे लग्न सीता नावाच्या मुलीशी लावून दिले. १९२२ मध्ये हे लग्न झाले. या दाम्पत्याला १४ सप्टेंबर १९२३ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव राम जेठमलानी. या मुलाची कुंडली सांगणाऱ्या जोतिषाने हा मुलगा आपल्या खापरपणजोबांप्रमाणे कीर्तीमान होणार हे सांगितले. आणि तसेच घडलेही.

लहानपणापासूनच बुद्धिमान असल्याने रामने १९३९मध्ये कराचीमधील प्रसिद्ध विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एप्रिल १९४१मध्ये कायद्याचा पदवीधर झाला. पण सिंध बार कौन्सिलच्या नियमानुसार वकील म्हणून नोंद होण्यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण व्हावी लागत होती. राम होता १७ वर्षांचा. म्हणजे त्याला अजून चार वर्ष वकील होण्याची वाट पाहावी लागणार होती. रामने त्याविरुद्ध दाद मागण्याचे ठरवले. सिंध न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तो गेला. त्याचा युक्तिवाद ऐकून खूश झालेल्या न्यायाधीशांनी अपवाद करत त्याला १८ वर्षं पूर्ण होताच त्याला वकिली करण्याची परवानगी दिली. १९४२ साली रामचे लग्न झाले. पण तासनतास आपल्या कामात गढून गेलेल्या रामकडे संसारासाठी वेळ नव्हता. शिवाय देशात स्वातंत्र्याचे आंदोलन जोर धरत होते. राम त्यात ओढला गेला. स्वातंत्र्य आंदोलनात रामचा सहभाग किरकोळच होता.

फाळणीनंतर १९४८ साली जेठमलानी कुटुंब मुंबईला आले. घरदार, संपत्ती, ऐश्वर्य, नोकरचाकर सोडून विपन्नावस्थेत मुंबईला यावे लागले. पण रामने हिंमत न धरता आली वकिली चालू ठेवली. १९६० दशकात नानावटी खटल्यामुळे राम जेठमलानी पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. हळूहळू वकील म्हणून त्यांची कीर्ती पसरू लागली. काही काळाने ते बार कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले.

आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतली. आणीबाणी जाहीर केली गेली तेव्हा जेठमलानी केरळमध्ये होते. त्यांना कळताच त्यांनी इंदिरा गांधी आणि आणीबाणीच्या विरोधात जोरदार भाषण केले. त्यामुळे पोलीस स्थानबद्धतेचा आदेश व पकड वॉरंट घेऊन पोलीस जेठमलानींच्या मागे लागले. इकडे जेठमलानी यांच्या काही मित्रांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर २०० वकिलांनी सह्या केल्या होत्या. मूळ विषय किंवा जेठमलानी यांचा निर्णय यापेक्षा २०० वकिलांनी जेठमलानी यांच्या बाजूने केलेल्या सह्या, ही असामान्य घटना होती, असा उल्लेख विख्यात वकील फली नरिमन यांनी एके ठिकाणी केला आहे.

जेठमलानी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध जसा संघर्ष केला, तसेच त्यांनी अनेक गुन्हेगारांचे खटलेही न्यायालयात लढवले. त्यामुळेच त्यांना ‘तस्करांचे वकील’ अशी पदवी दिली गेली होती. जेठमलानी हे आपल्या व्यवसायाच्या बाबतीत विशुद्ध भूमिका घेत, तर राजकारणी म्हणून नैतिक भूमिका घेत. त्यामुळे ‘कुणालाही गृहीत धरू न देणारा अत्यंत बेभरवशाचा माणूस’ अशी त्यांची प्रतिमा होती. शेअर व्यवहार घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहता व केतन पारेख यांचेही ते वकील होते. २००१मध्ये संसदेवर हल्ला झाला. त्या प्रकरणातील एक आरोपी एस. ए. आर गिलानी आणि जेसिका लाल खून प्रकरणातील आरोपी मनू शर्मा यांचेही वकीलपत्र जेठमलानी यांनीच घेतले होते. हवाला प्रकरणात लालकृष्ण अडवाणी यांचे, सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अमित शहा यांचे, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांचे, चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांचे, खाण गैरव्यवहार प्रकरणात येडियुरप्पा यांचे, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांचे, टु-जी प्रकरणात कनिमोळी यांचे, लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी ठरलेले आसारामबापू यांचे, मुंबईचा एकेकाळचा डॉन हाजी मस्तान यांचे, अशा अनेक खटल्यांचे वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते.

नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशींच्या समर्थनार्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेले युक्तिवादही गाजले. फौजदारी कायद्याची घटनादत्त अधिकारांशी सांगड घालणारा अभ्यासू वकील, आपल्या अशिलाच्या न्यायासाठी भरपूर मेहनत घेणारा वकील आणि ‘आपला अशील निर्दोषच आहे’ या वकिलीपेशातल्या व्यावसायिक निष्ठेवर प्रचंड विश्वास ठेवणारा वकील, हीसुद्धा जेठमलानी यांचीच प्रतिमा आहे. गुन्हेगारांचे किंवा वादग्रस्त प्रकरणांचे वकिलपत्र घेतल्याने जेठमलानी यांना जशी प्रसिद्धी मिळाली, तसेच सर्वाधिक मानधन घेणारा वकील म्हणूनही ते ओळखले जात.

१९७७ व १९८०मध्ये जेठमलानी भाजपकडून मुंबईतून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक मारेकरी, केहरसिंगचे वकील म्हणून ते न्यायालयात उभे राहिले, तेव्हाही ते टीकेचे धनी झाले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना भाजपचे उपाध्यक्ष पदही सोडावे लागले. पुढे भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत आले, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. तेव्हा जेठमलानी केंद्रात मंत्री झाले. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री झाले म्हणून आपल्या सरकारचीच तळी उचलून धरतील, ते जेठमलानी कसले! त्यांनी वाजपेयी सरकारवरच टीका करायला सुरुवात केली.

वाजपेयींच्या मंत्रिमंडळात जेठमलानी यांच्याकडे जून १९९९मध्ये विधी, न्याय व कंपनी व्यवहार खात्याचा कारभार सोपवण्यात आला. त्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी जेठमलानी यांनी मार्च २०००मध्ये एक जाहीर घोषणा केली होती – ‘येत्या दोन वर्षांत मी आपल्या कायदेपद्धतीला लागलेला काळाकुट्ट कलंक, लाज वाटण्याजोगे बिलंब पुसून टाकू शकलो नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा त्याग करेन.’

वाजपेयी मंत्रिमंडळातला जेठमलानी यांचा काही दिवसांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर बेछूट आरोप करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. कारण जेठमलानी हा ‘अस्तनीतला निखारा’ होता. त्यांच्या बेछूट आणि बेलगामपणामुळे लवकरच वाजपेयींना त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. त्यामुळे जेठमलानी भडकले. जेठमलानीचा प्रचंड मोठा ‘इगो’ प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर ‘बिग इगोज, स्मॉल मेन’ नावाचे खळबळजनक पुस्तकच लिहिले. ए‌वढेच नव्हे तर २००४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लखनौमधून वाजपेयींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला खरा, पण निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांनी भाजप आणि वाजपेयी यांच्यावर आरोप करायलाही मागेपुढे पाहिले नाही.

त्यातील काही नमुने पाहण्यासारखे आहेत –

१) वाजपेयीजी, तुम्ही अलीकडेच गुजरातला गेला होतात. त्या दौऱ्यात तुम्ही जाहीरपणे गुजरातच्या मुस्लिमांकडे क्षमायाचना केलीत, तेव्हा नरेंद्र मोदी तुमच्या शेजारी उभे होते. क्षमायाचना करण्याचे काम तुम्ही नरेंद्र मोदी यांच्यावर का सोपवले नाही? किंबहुना जातीय तेढ आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेष कायम ठेवून त्या बळावर मते खेचण्याची मोदी यांची भूमिका आजही कायम असल्यामुळेच आपण मोदी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले नाही की काय?

२) वाजपेयीजी, नरेंद्र मोदी यांच्या बळावर राज्यसभेवर गेलेल्या अरुण जेटली यांना दूर करण्यात तुम्हाला रस आहे काय? याच कायदामंत्री जेटलींनी ताज कॉरिडॉर प्रकरणात मायावती यांना अटक न करण्याचा सल्ला तुम्हाला दिला होता. म्हणजेच निवडणुकीतील राजकीय लाभासाठी त्यांनी तपासाच्या कामात हस्तक्षेप केला होता. म्हणूनच जोवर तुम्ही जेटली यांनी दूर करत नाही, तोवर हिंसेची झळ बसलेल्या गुजरातमधील मुस्लिमांना न्याय मिळूच शकत नाही.

३) वाजपेयी यांचा सत्तेवर असलेला पक्ष हा देशाच्या ऐक्याला असलेला धोका आहे.

४) मी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की, मी पंतप्रधानांचा मित्र आहे, ते माझे मित्र नाहीत.

पण पुढे हेच जेठमलानी २०१०मध्ये भाजपकडूनच राजस्थानमधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. पण २०१३मध्ये त्यांच्यावर शिस्तभंगामुळे निलंबनाची कारवाई केली गेली.

थोडक्यात परस्परविरोधी भूमिका, परस्परविरोधी वर्तन आणि परस्परविरोधी वक्तव्ये यांनी जेठमलानी यांचे व्यक्तिमत्त्व ओतप्रोत म्हणावे असे भरलेले होते. सुरुवातीला शिवसेनेच्या बाजूने न्यायालयात उभे राहिलेल्या जेठमलानी यांनी त्याच पक्षावर नंतरच्या काळात तिखट टीकाही केली होती.

‘बिग इगोज, स्मॉल मेन’ या जेठमलानी यांच्या पुस्तकाला विख्यात वकील फली एस. नरिमन यांची प्रस्तावना आहे. जेठमलानी यांचे ते अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यामुळे त्यांनी विनंती करताच नरिमन यांनी सांगितले की, ‘पुस्तकात काय लिहिलंय ते वाचायची सक्ती नसेल तरच मी या पुस्तकाला प्रस्तावना लिहीन.’ त्याला जेठमलानी यांनी मान्यता दिली. त्या छोट्याशा प्रस्तावनेत नरिमन म्हणतात – “तो तुमच्या आमच्यापासून वेगळा नाही, नव्हताही कधी. ‘विनाकारण धिटाई दाखवायला जाऊन, नको त्या संकटांना आमंत्रित करणे शहाणपणाचे नाही…’ असे जे म्हणतात ते दुटप्पी व भित्रे असतात यावर त्याचा फार मोठा प्रामाणिक विश्वास आहे. रामसारखे लोक मुळातच ‘शूर वीरां’च्या मुशीत घडलेले असतात. त्याच्यापाशी असलेले धैर्य नेपोलियनच्या ‘पहाटे चार वाजता आलेले धैर्य’ या उक्तीला साजेलसे होते. त्याला झोपेतून केव्हाही उठवा, तो सिद्धच असेल संघर्षाला.”

पुण्याच्या ‘महाराष्ट्र हेरॉल्ड’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या माजी संपादक नलिनी गेरा यांनी जेठमलानी यांचे अभ्यासपूर्ण चरित्र लिहिले आहे. (त्याचा मराठी अनुवाद विदुला देशपांडे यांनी केला आहे. चिनार पब्लिशर्स यांनी हे चरित्र प्रकाशित केले असून ते २००५मध्ये प्रकाशित झाले आहे.) जेठमलानी यांचे केवळ भलावण करणारे हे पुस्तक नाही, तर त्यांचे सामर्थ्य आणि मर्यादा, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा विक्षिप्तपणा, त्यांचे आयुष्य आणि राजकारण यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. (‘बिग इगोज, स्मॉल मेन’ या पुस्तकाचाही त्याच नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला असून तोही मेहता प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)

जेठमलानी हा कायम संघर्षाला, वाद घालायला तयार असलेला; आपल्या व्यक्तिमत्त्वासारखाच प्रचंड मोठा ‘इगो’ असलेला ‘बुद्धिमान माणूस’ आता कायमचा शांतावला आहे. काळाच्या चिरनिद्रेत विसावला आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......