लोकमान्य टिळक आधुनिक भारताचे ‘राजकारणी महन्त’ होते!
पडघम - सांस्कृतिक
त्र्यं. वि. सरदेशमुख
  • लोकमान्य टिळक
  • Thu , 01 August 2019
  • पडघम सांस्कृतिक लोकमान्य टिळक Lokmanya Tilak बाल गंगाधर टिळक Bal Gangadhar Tilak Gita Rahasya

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

.............................................................................................................................................

समर्पणाचे सहा संस्कृत श्लोक, प्रत्येकी दोन चरणांचे. त्यात लोकमान्य म्हणतात, “गीतार्थ किती गंभीर, समुद्रासारखा गहन... प्राचीन कवींनी, आचार्यांनी तो विशद करून दाखवला आहे. तरीदेखील तो गीतार्थ मी पुन्हा सांगू पाहात आहे, शास्त्रांना सन्मुख ठेवून. कार्याकार्याची विचक्षणा असणाऱ्या साऱ्यांनी तो ऐकावा अशी माझी विनंती. नवे उचित प्रयत्न मी केले आहेत. कालिदासाच्या मधुर अक्षरांनी मी विनवणी करीत आहे...(एवं विज्ञाप्य सुजनान् कालिदासाक्षरैः प्रियैः|)” गीतेचा नवा अर्थ आत्मप्रत्ययाने शोधला टिळकांनी. (शोध घेण्याचा आदेश रामदासांचा) असा अर्थशोध हा ‘creative criticism’च आहे. हे निव्वळ पंडिती भाष्य नव्हे. ही निर्माणशील समीक्षा आहे, ‘गीता’ या काव्यग्रंथाची, तशीच समग्र मनुष्यजीवनाची.

अर्थ सापडला नाही तर, म्हणजे शोधला नाही तर कोणतीही उक्ती काय, व्यक्ती - वस्तू किंवा घटना काय फोलकट, भाकड आणि नीरस वाटू लागते. (‘अर्टिक होम इन वेदाज्’ वेदातील एका ऋचेचा अर्थ जाणवताच टिळकांची ती पहाट स्वानंदाने भरून गेली!) ‘अर्थ’ हे जाणिवेचे अत्तर होय. ते गवसले नाही तर सर्व काही कळाहीन, चैतन्यहीन, नीरस होऊन जाते. मार्टिन ब्यूबर या विख्यात जर्मन तत्त्ववेत्त्याने ‘Meaning’विषयी अतिशय उद्बोधक उद्गार दिला आहे. तो म्हणतो - “We don't find meaning lying in things nor do we put it into things : but between no and things it can happen!”

‘अर्थ हा एक योग आहे. सन्मुखता, संचरण आणि संचिंतन. अर्थ हे आपणातील आणि वस्तू-व्यक्ती - घटना यातील संबंधार्थ ‘Relationship’चे ज्ञान आहे. ‘Relationship is all’ असे जे.कृष्णमूर्ती सांगून गेले. शेक्सपिअर म्हणाला, ‘Ripeness is all’. Relationship is way to Ripeness : Ripeness is Meaningfulness.

प्रा.न.र. फाटक यांनी आपल्या लोकमान्य चरित्रात उद्धृत केले आहे (गोविंद तळवलकर ‘बाळ गंगाधर टिळक’ या पुस्तकात त्याचा संदर्भ देतात) टिळक म्हणतात, “मी ज्या शतकात जन्मलो, त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ लिहिणार आहे” (प्राचीन ग्रंथाला नवा उचित अर्थ दिला) फाटक ‘गीतारहस्या’ला ‘अ क्रिएटीव्ह वर्क’, एक विधायक निर्माणकृती म्हणत, यांचे मला आश्चर्य वाटत नाही.

इमर्सनने म्हटले, ‘या पृथ्वीने युगायुगातून तीन सुपुत्र जन्माला घातले आहेत. सुपुत्रांच्या तीन जाती म्हणा ना!

The Knower (ज्ञाता, ज्ञानयोगी)

The Doer (कर्ता, कर्मयोगी)

The Sayer (वक्ता, भावयोगी)

मानवी अनुभवाचेच हे तीन प्रधान घटक आहेत. एखाद्या महापुरुषाला आपण तत्त्वज्ञ, द्रष्टा म्हणून ओळखतो. एखाद्याला कर्मवीर तर एखाद्याला कवी, मनीषी म्हणून. हे ओळखणे त्या त्या पुरुषांच्या अनुभवप्रक्रियेच्या प्राधान्यावरून झालेले असते.

१. ज्ञानवान ऋषी कर्मशील असतो, भावसंपृक्तही... महर्षी अरविंद

२. कर्मयोगी वीर ज्ञानवान असतो, संवेदनशीलही... लोकमान्य टिळक

३. महाकवी ज्ञानवान योगी असतो, कर्मसंपन्नही... रवीन्द्रनाथ

टिळकांचे ‘कर्मयोगीपण’ तत्कालीन भारताच्या डोळ्यांत, कानांत आणि मनात किती भरून गेले! त्याने आधुनिक इतिहासाची पाने मंडित झाली आहेत. त्यांची ज्ञानसाधना आयुष्यभर अखंड चालू होती. ग्रंथरूपाने ती प्रकट झाली. ‘गीतारहस्य’ हा त्यांच्या या साधनेचा उत्कर्षबिंदू होय. त्यांचे भावसंवेदन तसे उघड्यावर प्रकट व्हावे, अशी त्यांच्या एकंदर चारित्र्याची रीत नव्हती.

कर्मयोगात टिळक कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ मानतात (गीतारहस्य, पृ.४६१) ती बुद्धी शुद्ध आणि सम होणे अवश्य. हिलाच ‘साम्यबुद्धी’ म्हटले जाते. तशी ती होण्यास परमेश्वर सर्वव्यापी आहे, (साम्यबुद्धी ही ‘जाणती कळा’, ज्ञानयुक्त बुद्धी) तो सर्वभूतान्तर्गत आहे. त्यामुळे सर्वभूतांचे आत्मैक्य होते याचे ज्ञान आवश्यक. (याला ‘ज्ञानविज्ञानं’ म्हटले आहे)

कर्म करण्यास लागणारी बुद्धी निष्काम झाली म्हणजेच करावे ते कर्म मोक्षाआड येत नाही.

प्रपंच नेटका करण्यासाठी विहित कर्मे निष्काम बुद्धीने करावी : फलासक्ती न धरता.

कर्मे करण्याने परमेश्वरनिर्मित सृष्टीव्यापार धर्मन्यायाने चालवण्यास पुरुषाचा हातभारच लागतो.

विरक्ताचा हा कर्मयोग इतरांना आदर्श कित्ता होतो.

कर्मयोग जरी मुख्य विषय तरी त्याबरोबरच मोक्षधर्माचे मर्मही त्यांनी सुंदर रीतीने निरुपिले आहे. कर्मयोग आणि मोक्षधर्म यात विसंवाद वा वैमनस्य टिळकांनी पाहिलेले नाही. “आत्मनाः मोक्षार्थ जगद् हितायच” असा दुहेरी बाणा त्यांनी आपल्या विचारात अखंड अनुस्यूत ठेवला. (गीतारहस्य, पृ. ४६७)

ज्ञानी असो, योगी असो, भक्त असो... त्याला लोकसंग्रहासाठी, लोकसंस्थेच्या रक्षणासाठी, धर्मप्रतिष्ठेसाठी, अखंड धर्मप्रवर्तनासाठी सत्कर्मांचे आचरण कर्मफलांच्या अनपेक्षेने करणे प्राप्त आहे. ज्ञानदेव म्हणतात, “बहुरूप्यांची नाटके चालतात. त्यात राजाराणीची सोंगे येतात. त्यांना पाहणारे विचार-भावनांचा कल्लोळ अनुभवतात, जो त्या सोंगांनी केवळ प्रदर्शित केलेला असतो. ही ‘लोकसंपादणी’ साधत असताना त्या सोंगांच्या अंतःकरणांत मूलतः स्त्री-पुरुष भाव नसतो.” तसे निष्काम कर्मयोग्याचे आचरण असतो /असावे.

असा कर्मयोगी वागतो कसा, राहतो कसा? तर देहाभिमान सांडलेला, देही असून साक्षीभूत झालेला, चित्तवृत्ती आत्मलक्ष्यी असलेला, उचित कर्मे ईश्वरार्पण करणारा... अनीती-अन्यायाविरुद्ध, असत्याविरुद्ध संघर्ष या जीवनात सर्वकाळ, सर्वस्तरांवर करावाच लागतो. कारण प्राणिमात्र त्रिगुणात्मक आहेत. सर्व काही सत्त्वस्थ, निरागस आणि शुभंकर नाहीत. संघर्ष करायचा तरी निर्विकार निर्मम, निर्द्वेष वृत्तीने केला तरच तो लोककल्याणकारी, हे तत्त्व टिळकांनी कोठेही अपसारिले नाही.

१९३९ ला महायुद्ध सुरू झाले. हिटलरने अनेक देश पादाक्रांत केले. त्यावेळचा गांधींचा एक उद्गार संस्मरणीय आहे - ‘I cannot hate Hitler. I hate his acts.’ जुलै १९४४चे अल्बेर कामूचे एका जर्मन मित्राला लिहिलेले पत्र आहे. जर्मन बॉम्बहल्ल्यांनी फ्रान्स जर्जर झाला. ‘याचा आम्ही बदला घेऊ’ असे कामू मित्राला लिहितो, पण पुढे म्हणतो, “We still feel no hatred for you. प्रतिकार करताना आमचे मरणही ओढवेल, तसे झाले तरी आम्ही द्वेष करणार नाही. कारण We want to destroy you in your power without mutilating you in your soul.” (तुमच्या बाळाचा नाश करायचा आहे, तुमचा आत्मा विरूप करायचा नाही, तुमचे चैतन्य विस्कटायचे नाही!)

टिळक-गांधी यांचे असामान्यत्व हे की, त्यांनी शत्रूची गय केली नाही, तरी त्यांचा द्वेष करण्याचे त्यांच्या नीतीत नव्हते. त्यांचे राजकारण हे व्यापक धर्मकारणाचे एक अनिवार्य अंग होते. ‘राजकारणाच्या झंझटात नसतो सापडलो तर गणिताचा प्रोफेसर म्हणून मी आयुष्य वेचले असते. ज्योतिर्गणित, वेदऋचा यांतल्या संशोधनात मला गोडीने काळ कंठता आला असता’ असे शब्द टिळक का काढतात? यात अतथ्य किंचित तरी असेल काय? पण स्वानंदसाम्राज्यात मग्न होऊन आयुष्य घालवणे हा त्यांना ‘ऋषिप्रणित’ मोक्ष वाटतच नाही. समाजाचे ऋण न फेडता मोक्षाचे अधिकारी होता येत नाही, ही त्यांची धारणा आहे.

टिळकांचे ‘केसरी’चे संपादन, जनहितकारी चळवळींचे पुढारीपण, राष्ट्रीय सभेतील वर्चस्वाचे यत्न, साम्राज्याचे सानथोर अधिकारी व त्यांची तळी उचलणारी एतद्देशिय प्रतिष्ठित मंडळी यांच्या अन्याय्य वर्तनाचा सतत केलेला प्रतिकार, शेतकरी-मजूर-कामगार यांच्या कल्याणचिंतेच्या त्यांच्या हालचाली, या सर्वांमधून आणि या सर्वांमागे एक प्रखर आणि उदात्त धर्मनिष्ठा आहे. तिचे एक सूत्र असे आहे की, आपला सर्वसामान्य गृहस्थधर्मविहित प्रपंच करत असताही आपल्या भोवतीच्या समुदायाचा, म्हणजेच अव्यक्त समाजपुरुषाचा संसार सुखा-समाधानाचा व परिणामी आनंदाचा कसा होईल यासाठी झटत राहावे.

रामदास विचक्षणपणे ‘प्रपंच’ आणि ‘संसार’ हे शब्द उपयोजतात. ‘प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थविवेका’ यातला ‘प्रापंचिक’ आणि ‘आजि संसार सुफळ जाला गे माये’ (ज्ञानेश्वरी) यातला सांसारिक एकाच पातळीवर वा एकाच सामर्थ्याचा ते मानत नाहीत. संसारचिंता करणारा हा देहस्वी अहंभावी असत नाही, तो मनस्वी आत्मबुद्धी असतो. ‘जिकडे जग तिकडे जगन्नायक’ हे त्याने मनोमन जाणलेले असते. टिळक  आपला ग्रंथ ‘श्रीशाय जनतात्मने’  अर्पण करतात.

.............................................................................................................................................

लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)’ या डॉ. सदानंद मोरे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4416/Lokmanya-te-Mahtma--Marathi-Bhag-1-ani-2

.............................................................................................................................................

टिळकांचे असामान्यत्व - त्यांच्या ठायी असलेली ज्ञाननिष्ठा, त्यांची ज्ञाधसाधना याबरोबरच त्यांचे श्रेष्ठ वाङमयनिर्माण कर्तृत्व यात आहे. रामदासांच्या ‘महन्त’ परिभाषेत बोलायचे तर टिळक हे आधुनिक भारताचे राजकारणी महन्त. त्यांच्या समकालात विवेकानंदांसारखा धर्मकारणी महन्त आपल्यात वावरून गेला. युरोप-अमेरिकेत आपल्या सत्त्वसंपन्न इतिहासाची ध्वजा त्याने मिरवली. या उभयतांच्या जोडीला क्रांतिकारी स्वातंत्र्य चळवळीत ज्याने पूर्ववयात भाग घेतला आणि उत्तरायुष्यात भारताच्याच नव्हे तर अखिल मानवविश्वाच्या उद्धरणासाठी तीन तपे योगसाधना केली ते महर्षी अरविंद हे आध्यात्मिक महन्त.

असे तिघे महन्त होऊन गेले. यांच्या जोडीने आपण महाकवी रवींद्रनाथ आणि महात्मा गांधी यांची आठवण केली तर १८५०-१९५० हे शतक भारताच्या राजकीय, धार्मिक व आध्यात्मिक चळवळीचा एक प्रसन्न असा भाग्यकाळ आहे.

'सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे

परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे |'

या रामदासांच्या अम्लान कीर्तीवचनातील मर्मस्थान या पाचही महापुरुषांच्या वाणीत आणि करणीत भरभरून ओसंडते आहे. ते मर्मस्थान ‘भगवंताच्या अधिष्ठानात’ आहे, हे आपण कधी विसरता कामा नये, हे सांगण्याचा दुर्धर काळ आता भराला आला आहे.

चळवळीला कमतरता नाही, राजकारणाला खंड नाही. बोलघेवड्या समाजकारणाला ऊत आला आहे, पण त्यात ‘शाश्वताचा निश्चय’ नाही, सद्सद्विवेकाला थारा नाही, भूतमात्रांच्या कल्याणाची चिंता नाही. त्यामुळे ‘भगवंताचे अधिष्ठान’ नाही. टिळक ज्या परमेश्वराला ‘गीतारहस्य’ अर्पण करतात तो अखिल जनबांधवांच्या अंतःकरणातला परमेश्वर आहे. ‘श्रीशाय जनतात्मने’. ‘तितुके देह तितुकी देवळे | तयांमाजी राहिले राऊळे’ अशी रामदासांची धारणा आहे. ‘जनी जनार्दन आहे | परी तो सज्जनी वसे’. ज्ञानदेव म्हणतात ( १८ व्या अध्यायाच्या शेवटी ) -

भरोनि सद्भावाची अंजुळी
मियां वोवियाफुले मोकळी
अर्पिली आंघ्रियुगुली | विश्वरूपाच्या ||
टिळकांचे पुण्यस्मरण त्या ‘विश्वरूपास’ मनोमन वंदन करून करूया...

.............................................................................................................................................

कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख लोकमान्य टिळकांवर दोन वेळा बोलले. पहिल्यांदा २ ऑगस्ट ९४ या दिवशी वृत्तपत्रकार ल.गो. काकडे समाजशास्त्रीय संशोधन केंद्राने डॉ. नी. त्र्यं. पुंडे यांचे ‘लोकमान्यांचे असामान्यत्व’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले. सरदेशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. दुसऱ्या वेळी १ ऑगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या वर्धापनदिनात सरदेशमुख प्रमुख अतिथी होते, त्यावेळी. या दोन्ही भाषणासाठी केलेली ही टिपणे आहेत. - नीतिन वैद्य.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा