इस्लामविषयी सर्वत्रच गैरसमज आहेत!
पडघम - सांस्कृतिक
अब्दुल कादर मुकादम
  • अब्दुल कादर मुकादम यांच्या नागरी सत्कार सोहळ्याची निमंत्रणपत्रिका
  • Mon , 29 July 2019
  • पडघम सांस्कृतिक अब्दुल कादर मुकादम Abdul Kader Mukadam इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात Islam - Dnyat Aani Adnyat

इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा ‘मुस्लीम अकादमी’, ‘सलोखा मंच’, पुणे आणि ‘दक्षिणायन’ यांच्या वतीने आज (२९ जुलै) पुण्यात नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं त्यांचं मनोगत...

.............................................................................................................................................

१९४२च्या मे महिन्यात मी राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत दाखल झालो. तिथं स्वातंत्र्यसंग्रामाची उद्दिष्टं, समाजवादी विचारप्रणाली, समता, न्याय अशा पुरोगामी मूल्यांच्या व विचारांच्या संस्कारातच मी लहानाचा मोठा होत गेलो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे परकीय सत्तेबरोबरचा संघर्ष आणि या नव्यानं स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या एकात्मतेचा आणि विकासाचा विचार सुरू झाला होता. लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था, आर्थिक आणि सामाजिक न्याय व प्रगती ही या नव्या व्यवस्थेची पायाभूत मूल्यं म्हणून स्वीकारली गेली होती.

एका अर्थानं भारतात एका नव्या मन्वंतराची सुरुवात झाली होती. या नव्या युगाचं स्वरूप व आवश्यकता, सनातनी परंपरेत अडकून पडलेल्या भारतीय समाजाला विशेषत:, मुस्लीम समाजाला समजावून सांगणं आवश्यक होतं, पण तसं घडलं नाही. मुस्लीम समाजाच्या धार्मिक नेतृत्वानं तर परिवर्तनवादी विचारांना विरोध करण्याची भूमिका स्वीकारली होती.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुसलमानांच्या एक गठ्ठा मतांचं राजकारण सुरू झालं होतं. या राजकारणाला त्यांच्यातील पृथकतेच्या भावनेचाही पदर होता. उर्दू भाषेचा सर्वच भारतीय मुसलमानांनी धरलेला अनाठायी आग्रह आणि त्यामुळे स्थानिक मुख्य प्रवाहापासून त्यांची झालेली फारकत; आपल्या वेगळेपणाची जपवणूक करण्याचे प्रयत्न, मध्ययुगीन इतिहासाचा अवास्तव अभिमान, आपण या देशाचे राज्यकर्ते होतो, असा अनाठायी अहंकार, हे भारतीय मुस्लीम राजकारणाचे प्रमुख घटक होते. साहजिकच एकीकडे धर्मपरंपरेशी किंवा त्या विरोधात संघर्ष, तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रवाहांशी समरस होण्याचा अडथळा निर्माण करणारं सत्तेचं राजकारण, अशा श्रृंगापत्तीत भारतीय मुस्लीम समाज अडकून पडला होता. या राजकीय परिस्थितीतूनच ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ या पुरोगामी चळवळीचा जन्म झाला.

.............................................................................................................................................

सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media?fbclid=IwAR1Fa3_2jO7gy5f-tvrrrGJupZCxtsVVHc_uhdIS608hrd2ufcEtxCP3nK0

.............................................................................................................................................

मी या चळवळीत दाखल झालो, तेव्हा तिचं उद्दिष्ट मला माहीत होतं. पण तिच्या वैचारिक बैठकीविषयी मी काहीसा अनभिज्ञ होतो. काळाच्या ओघात वाढत्या अभ्यासाबरोबरच ही अनभिज्ञता हळूहळू दूर होत गेली. या काळात हमीद दलवाई, प्रा. अ. भि. शहा, नरहर कुरुंदकर यांचं लिखाण आणि विचार हेच माझ्या अभ्यासाचं प्रमुख साधन होतं. या आणि इतरही काही पुरोगामी विद्वानांचं तत्कालीन मुस्लीम राजकारणाचं विश्लेषण वस्तूदर्शी होतं, पण त्या प्रमाणात शहा आणि कुरुंदकर यांची इस्लामी इतिहास व परंपरा यांची चिकित्सा आणि विश्लेषण काहीसं एकांगी आणि पूर्वग्रहदूषित होतं.

धर्मचिकित्सा ही सर्व चिकित्सेची सुरुवात असते, हा मार्क्सचा सिद्धान्त एव्हाना समजू लागला होता. पण चिकित्सा म्हणजे धार्मिक परंपरातील कालबाह्य रूढी आणि विचार किंवा मूल्यं लोकांसमोर मांडणं, हे समीकरण मला संकुचित वाटत होतं. कारण सर्वच पारंपरिक समाजाच्या इतिहासात अन्याय, शोषण, गुलामगिरी असतेच; पण त्याच बरोबर या समाजाचं मानवी संस्कृतीत काही ना काही विधायक योगदान असतं. तेव्हा धार्मिक किंवा सामाजिक परंपरांची चिकित्सा करताना या दोन्ही घटकांचं भान ठेवलं पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. अजूनही वाटतं. त्यामुळे धर्मचिकित्सा करताना त्या परंपरेतील कालबाह्य आणि कालातीत किंवा चिरंतन बाबींचा विवेक बुद्धीनं विचार करून अशा अन्यायकारक किंवा कालबाह्य रूढी-परंपरांचा त्याग करणं आणि कालातीत किंवा चिरंतन बाबींचं जतन करत नवी मूल्यं, नवे विचार किंवा नव्या परंपरांशी त्यांचा सांधा जोडून घेणं हाच समाजाला आर्थिक बौद्धिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा मार्ग असतो. त्यातूनच त्याचा आर्थिक विकासही होत असतो. या मार्गाचा अवलंब आपण केला नाही तर धर्मचिकित्सा संकुचित आणि नकारार्थी होते.

मी मुस्लीम सत्यशोधक मंडळात दाखल झालो, तेव्हा तिथं मला वरील गोष्टींचा सतत अनुभव येत होता. ज्या समाजात आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असतं, त्या समाजाची मानसिकता किंवा वैचारिक भूमिका घडवण्यात धार्मिक संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि सामाजिक परिवर्तनासाठी ही मानसिकता बदलणं अपरिहार्य असतं. दुसरा मुद्दा असा की, वैश्विक संस्कृतीच्या क्षेत्रात इस्लामचं काही योगदान आहे का? आणि असल्यास त्याचं स्वरूप काय आहे, हे जाणून घेण्यासाठी धर्माचा किंवा धार्मिक परंपरांचा चिकित्सक पण विधायक दृष्टीनं अभ्यास होणं, हेही तितकंच आवश्यक असतं, अशी माझी भूमिका होती आणि अजूनही आहे. अर्थात या विचारांवर जाहीर चर्चा करण्याची बौद्धिक प्रगल्भता तेव्हा तरी माझ्यापाशी नव्हती.

याच सुमारास इस्लामचे संशोधक-अभ्यासक दिवंगत डॉ. असगरअली इंजिनियर यांची आणि माझी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ओळख झाली. त्यांच्याशी झालेल्या मैत्रीतून मला इस्लामचा अभ्यास करण्याची नवी दिशा मिळाली. केवळ दिशाच नव्हे तर अभ्यासाची अनेक साधनंदेखील उपलब्ध झाली. त्यांचं अरबी भाषेवर प्रभुत्व होतं. त्यामुळे कुरआन, हदीस आणि या विषयावरच्या अनेक दुर्मिळ ग्रंथाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. माझे गुरू या नात्यानं मलाही त्यांच्या अभ्यासाचा फायदा होत होता. त्यांच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज’ या संस्थेत इस्लाम आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेक विषयांवर सतत संशोधन होत असे. त्याची माहिती या संस्थेतर्फे दरमहा ‘इस्लाम अँड मॉडर्न एज’ या नावानं प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तिकेतून प्रसिद्ध होत असे. या पुस्तिकांचे अनेक वर्षाचे अंक आजही माझ्या संग्रही आहेत. इस्लामच्या अभ्यासाच्या दृष्टीनं या पुस्तिका फार मोठी साधन-सामग्री आहे.

डॉ. असगरअली यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाबरोबर आणखी दोन गुरुजनांचं अप्रत्यक्ष मार्गदर्शन मला लाभलं. अबुल कलाम आजाद हे त्यापैकीच एक, तर डॉ. मुहंमद इक्बाल हे दुसरे. मौलाना आझादांचे ‘तर्जुमन अल् कुरआन’ या भाष्य ग्रंथातून इस्लामच्या विविध आध्यात्मिक पैलूंचं दर्शन घडलं, तर डॉ. इकबाल यांच्या विचारातून इस्लामच्या अंगभूत गतिशीलतेचं स्वरूप आणि व्याप्ती मी समजून घेऊ शकलो. मुस्लीम समाजातील परिवर्तनाच्या चळवळीला इकबालच्या या गतिशीलतेचा सिद्धान्त व त्यांचे अन्य विचार समजून घेणं आवश्यक आहे, अशी माझी धारणा आहे.

या सर्व आधुनिक संशोधक विद्वानाच्या आणि त्याच बरोबर फिलीप हिट्टी रॉम लँडो, बनार्ड लुईस, मॅक्झिम रॉडिन्सन, ग्रॅहम फुल्लर या पाश्चात्त्य विद्वानांच्या अप्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे मी इस्लामवर एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहू शकलो. इस्लामविषयी सर्वत्रच गैरसमज आहेत. तसंच त्याच्या परंपरांचा आणि विकास इतिहासाचा बराच भाग अजूनही अज्ञात आहे, असे म्हटले जाते. या अज्ञाताचा वेध मी यशस्वीतेनं घेऊ शकलो का, हे अर्थात वाचकांनी ठरवायचं आहे. मी मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, एवढंच म्हणू शकतो.

.............................................................................................................................................

अब्दुल कादर मुकादम यांचे 'इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4907/Islam---Dnyat-ani-adnyat

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा