सूरज आणि प्रभाकर : दोन भिन्न अर्थ
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
जयदेव डोळे
  • डावीकडे राम भोगले, विनय सहस्त्रबुद्धे, प्रभाकर मांडे आणि उजवीकडे सूरज येंगडे
  • Thu , 18 July 2019
  • पडघम कोमविप प्रभाकर मांडे Prabhakar Mande हिंदुत्व Hindutva सूरज येंगडे Suraj Yengde कास्ट मॅटर्स Caste Matters राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh रा. स्व. संघ RSS

चार दिवसांच्या अंतराने औरंगाबाद शहरात दोन पुस्तके प्रकाशित झाली. एकाचे लेखक होते सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. प्रभाकर मांडे आणि दुसऱ्याचा लेखक होता डॉ. सूरज येंडगे. नावात दोघांच्याही सूर्य विराजमान. परंतु दोघांचीही किरणे विरुद्ध दिशांनी जातात. प्रभाकर मावळतीला निघालेला, तर सूरज नुकताच तळपू लागलेला! मांडेसरांच्या पुस्तकाचे नाव ‘हिंदुत्व’, तर सूरजच्या ‘कास्ट मॅटर्स’.

पहिल्या पुस्तक प्रकाशनात मांडेसरांसह राम भोगले व विनय सहस्त्रबुद्धे सारे ब्राह्मण, दुसऱ्या पुस्तक प्रकाशनात येंडगेसह उमेश बगाडे, राहुल कोसम्बी व उत्तम अंभोरे हे प्राध्यापक सारे दलित! मांडेसरांचे अवघे आयुष्य लोकसाहित्याचा साठा करण्यात आणि त्यावर संशोधन, अध्यापन यांत गेलेले. सूरज जात, दलित, उपेक्षित, वंचित यांचा आफ्रिका, इंग्लंड व अमेरिका येथे अभ्यास व संशोधन करणारा एक विद्यार्थी. जेमतेम तिशी ओलांडलेला. एकही केस पांढरा न झालेला विद्वान. मूळचा नांदेडचा. जात, भाषा, वर्ग, देश यांपलीकडे जाऊन कीर्ती कमावलेला. मांडेसर विद्यापीठीय अभ्यासक्रमापलीकडे अज्ञात. हिंदुत्ववाद्यांच्या वर्तुळात मान्यताप्राप्त. स्वत: एक प्रकाशनगृह चालवतात. सूरजची प्रकाशनसंस्था पेंग्विन ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.

खासदार विनयराव यांनी ब्राह्मण्य व हिंदुत्व अशी सांगड चुकीच्या आणि निषेधार्ह पद्धतीने घातली जाते असे सांगून म्हटले की, त्याने प्रगल्भ जीवनशैली व विचारशैली यांचा उपमर्द होतो. आंबेडकरांनीही ब्राह्मण्य व हिंदुत्व अशी सांगड घातली नव्हती. हिंदूंमध्ये कोणी जन्मजात वर्चस्वाची भाषा करू नये, इतका हिंदू समाज बदलतोय. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण्य असा खोटा प्रचार करणारे लोक आंबेडकर विचारांशी प्रतारणा करतात. नवदलित साहित्याने त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. एकूण ज्यांचे हिंदुत्वाबद्दलचे गैरसमज फार, ते त्यांनीच दूर करावेत, असा तिन्ही वक्त्यांचा आग्रह होता.

सूरज म्हणाला की, जात संपल्याचा कांगावा वाढलाय. वास्तव तर जातीबद्धच आहे. किंबहुना दलितांत अभिजन वाढलेत. त्याच वेळी दलितांवर अत्याचार प्रचंड वाढलेत. दलित भांडवलदार, दलित राष्ट्रवादी अशी नवी श्रेणी पोकळ वाटते. कारण ज्याला जमीन अथवा संपत्ती नाही, त्याला काही किंमत नाही. पण जात संपवायची असल्यास ज्यांनी जाती निर्माण केल्या ते ब्राह्मण आणि जे भरडले जातात ते सारे दलित एकत्र यायला हवेत. ब्राह्मणशाहीविरुद्ध ब्राह्मणच दलितांच्या साथीला आले पाहिजेत वगैरे वगैरे.

सूरज दलितांच्या आत्मटीकेविषयी बोलला. हिंदुत्वावर बोलणाऱ्या ब्राह्मणांनी तसे काही केले नाही. किंबहुना जातीव्यवस्थेविषयी हिंदू धर्मातील विकृती असेच वर्णन तिथे झाले. जाती मोडल्या असे कोणी म्हणू शकले नाही. त्या आपोआप जात आहेत असेच सुचवले गेले. सूरज त्या उलट बोलत होता. त्या अजून समाज संचालन करतात असा त्याचा व इतरांचा अनुभव राहिला.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

संघपरिवार बदलला असे म्हणणाऱ्यांना मांडेसरांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाने चांगली अद्दल घडवली. त्याची फक्त भाषा बदलली, पण तो ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ची मागणी कधी करत नसतो, हे सिद्ध झाले! खासदार विनयराव यांनी ‘हिंदुत्व’ या देशातील ‘आध्यात्मिक लोकशाही’ असल्याचे सांगून लोकशाहीला लगडून येणाऱ्या बंधुता-समता-स्वातंत्र्य या गोष्टीही आध्यात्मिक आहेत, असे अप्रत्यक्ष सांगून टाकले! म्हणजे त्या प्रत्यक्षात आणायचे कोणाचे काम नाही!!  संघाचे तर मुळीच नाही, असे त्यांचे आडून आडून सांगणे!!!

खासदार विनयराव यांनी तर जातीसंहार, भेदभाव, अस्पृश्यता यांचा विचार देशापुढे कमी लेखला. समाजविघटनाचे व देशविघातकांचे आव्हान उभे असताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. हा खरा संघाचा चेहरा! जेव्हा जाती, विषमता, भेदभाव यांवर आघात करायची वेळ येते, तेव्हा संघ ‘देश बचाव’ची पळवाट शोधतो आणि वेळ मारून नेतो. औरंगाबादेत तेच झाले. यांचे हिंदुत्व अपरिवर्तनीय आहे, नव्हे तसे ठेवलेले आहे.

सूर्याला सविता, रवी, दिनकर, आदित्य अशी खूप नावे आहेत. प्रभाकर त्यापैकी एक. मात्र तेही आता मावळतीला चालले. तळपणाऱ्या अन लख्ख उजेड पाडणाऱ्यांपैकी सूरज हे एक. त्याच्या उष्णतेने जात जळून जायला हवी. वातावरण स्वच्छ होईल…

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा