“कथा’ हा अभावग्रस्त माणसांनी तगवलेला वाङ्मयप्रकार आहे” : आसाराम लोमटे
संकीर्ण - मुलाखत
मुलाखत - राम जगताप
  • कथाकार आसाराम लोमटे आणि ‘आलोक’चं मुखपृष्ठ
  • Mon , 26 December 2016
  • आसाराम लोमटे आलोक इडा पिडा टळो साहित्य अकादमी

अलीकडे साहित्यिकांचं लेखन न वाचताच ‘हे कोण?’ असा उद्धट प्रश्न विचारण्याची आणि आपल्याला माहीत नसलेल्या साहित्यिकाच्या निवडीची, त्याला मिळालेल्या पुरस्काराची खिल्ली उडवण्याची तुच्छतावादी मानसिकता प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया या ठिकाणी प्रबळ होताना दिसते आहे. मात्र ‘आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ला २१ डिसेंबर रोजी यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘हा कथासंग्रह आम्ही वाचलेला नाही, पण आता जरूर वाचू’, असा प्रांजळपणा फेसबुकवर काही जणांनी दाखवला आहे. लोमटे यांच्या स्वभावासारखंच त्यांचं कथालेखनही निगर्वी, ओढूनताडून क्लायमॅक्स घडवण्याचा प्रयत्न न करणारं असतं. तळातल्या माणसांच्या वेगवगेळ्या प्रकारे होत असलेल्या शोषणाचे पापुद्रे लोमटे अतिशय साध्या पद्धतीने उलगडून दाखवतात. त्यामुळे त्यांची कथा संवेदनशील माणसाच्या मनाचा तळ ढवळून टाकते. त्याच्या मनाच्या तळाशी सुरुंग लावते.

साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सहसा कादंबरी किंवा कवितासंग्रहालाच मिळतो. ‘ताम्रपट’, ‘तणकट’, ‘बारोमास’, ‘झाडाझडती’ इत्यादी. पूर्वी जी.ए. कुलकर्णी यांना ‘काजळमाया’साठी साहित्य अकादमी मिळालं होतं, पण दुर्दैवानं त्याची शोकांतिका झाली. त्यानंतर जयंत पवार यांना मिळालेलं साहित्य अकादमी हेच खऱ्या अर्थानं कथेला मिळालेलं पहिलं साहित्य अकादमी. २०१२ साली पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहाला साहित्य अकादमी मिळालं, तेव्हा वाटलं की, ‘आता कथा हा दुय्यम वाङ्मयप्रकार राहिलेला नाही. तो दखलपात्र वाङ्मयप्रकार झालेला आहे’. जयंत पवारांपेक्षा आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’मधली कथा अतिशय वेगळ्या वातावरणातली कथा आहे. तिची साहित्य अकादमीने चार वर्षांनी दखल घेणं हे खूप मोलाचं आहे. इतर भाषेतल्या कथेला साहित्य अकादमी मिळणं यात फार नावीन्य राहिलेलं नव्हतं, पण मराठीत ‘कथेला’ साहित्य अकादमी मिळू शकतं, ही गोष्टच नवीन होती. जयंत पवार यांच्या कथासंग्रहाने त्याला वाट मिळाली. पवारांची महानगरी पर्यावरणातली कथा आणि आसाराम लोमटे यांची अ-नागर पर्यावरणातली कथा या दोन्ही प्रकारच्या कथांना साहित्य अकादमी मिळाल्याने एक गोष्ट नक्की घडेल- आता मराठी कथेकडे दुय्यमपणाने पाहिलं जाणार नाही.

जयंत पवार ते आसाराम लोमटे या गेल्या चार-पाच वर्षांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. मराठी कथा सगळ्या न्यूनगंडांमधून बाहेर आल्याचं हे लक्षण आहे. गांभीर्याने कथालेखन करणाऱ्या मंडळींसाठी ही नक्कीच आश्वासक गोष्ट आहे!

यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक आसाराम लोमटे यांची ही खास मुलाखत…

प्रश्न : ‘इडा पिडा टळो’ या तुमच्या पहिल्या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आणि परवा दिल्लीत ‘आलोक’ या तुमच्या दुसऱ्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होत असतानाच पुण्यात महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर होत होते. ‘इडा पिडा टळो’मध्ये सहा दीर्घकथा आहेत आणि ‘आलोक’मध्येही सहाच दीर्घकथा आहेत. यातला योगायोगाचा भाग बाजूला ठेवू या; पण साहित्य अकादमीसारखा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

लोमटे : पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहत होतो. मी व्हॉटसअॅपच्या कुठल्याही ग्रुप्समध्ये नाही, पण फेसबुकवर आहे. त्यावर अनेक लोकांनी पोस्ट, छायाचित्रं टाकून माझ्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला मिळालेल्या पुरस्काराचं उत्स्फूर्त स्वागत केलं.

प्रश्न : केवळ सोशल मीडियाच नाही, तर महाराष्ट्रभरच्या साहित्यविश्वामध्ये तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं गेलं. त्याला तुमचा जनसंपर्क हे एक कारण असेलही, पण त्यापेक्षाही तुमचं मोजकं, पण दर्जेदार लेखन जास्त कारणीभूत आहे, असं वाटतं. कथालेखक म्हणून तुमची कथेकडे पाहण्याची नेमकी काय भूमिका असते? तुम्ही कथा लिहिताना नेमकं कसं पाहता?

लोमटे : मी विद्यार्थिदशेत म्हणजे अकरावी-बारावीला असताना छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या होत्या. ‘इडा पीडा टळो’ या संग्रहात शेवटी असलेली ‘होरपळ’ ही कथा मी एम.ए.च्या पहिल्या वर्षाला असताना लिहिली. १९९६मध्ये लिहिलेली ही कथा गावातल्या दलित-सवर्ण संघर्षाची कथा आहे. अशा प्रकारचा संघर्ष आपल्याकडे भडक किंवा बटबटीत दाखवला जातो. मी ठरवून, तटस्थपणे फक्त माणूस समजून घेण्याचा प्रयत्न या कथेत केला. ‘दोन्ही बाजूंचा आवेश किंवा दोन्ही बाजू काळ्या-पांढऱ्या रंगात न पाहता दोन्ही बाजूंच्या माणसांच्या मनाचा तळ शोधणं’, ही गोष्ट मी या कथेत केली आहे. दुसरं म्हणजे माझ्या कथांमधल्या खलनायकाबद्दलही मला एक आस्था, सहानुभूती असते. त्याचं वागणं, त्याची धारणा या सगळ्या गोष्टी मी कमालीच्या आस्थेने समजून घेतो. एकाच कथेत जर दोन पात्रं असतील, तर त्यातलं एक पात्र हे नकारात्मक वाटू शकतं, पण त्या पात्राबद्दलसुद्धा माझी तितकीच आत्मीयता असते. कारण मुळात माणूस समजून घेणं ही लेखक म्हणून मला मोठी गोष्ट वाटते आणि तोच प्रयत्न मी करतो. मुळात ‘कथेत काहीतरी अद्भुत असलं पाहिजे’, अशी आपल्याकडे एक धारणा आहे. याला मराठीमध्ये ‘जादुई वास्तववाद’ म्हणतात. तो पहिल्यांदा हिंदीमध्ये उदय प्रकाश यांनी आणला. त्यांच्या माध्यमातून नंतर तो मराठीत आला; पण मला वाटतं की, आपण जे वास्तव पाहतो, तेसुद्धा कधीकधी अद्भुत असतं. अर्थात, मी कधीच जसंच्या तसं वास्तव मांडत नाही. मग माझ्या कथेत वेगळं म्हणून काय असतं? माझी कथा सरधोपट किंवा सरळ रेषेतली गोष्ट नसते. तिला अनेक अदृश्य कंगोरे असतात. मी जी कथा लिहितो, तिचं पर्यावरण भलेही अ-नागर, ग्रामीण असेल, पण ती ग्रामीण कथा नाही. हे मी याआधीही अनेक वेळा सांगितलेलं आहे. आपल्याकडे ‘ग्रामीण कथा’ ही संज्ञा बऱ्यापैकी बदनाम केली गेलेली आहे. त्या बदनामीत आधीच्या काही लेखकांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण जगण्याचं खरंखुरं जग दाखवण्यापेक्षा किस्से, इरसाल भानगडी असं चित्रण करणारा ग्रामीण लेखकांचा एक वर्ग होता. त्यामुळे ‘मी ग्रामीण कथा लिहितो’, असं मी म्हणणं म्हणजे त्या इतिहासाचा उपमर्द केल्यासारखं होईल. मी माणसांची गोष्ट लिहितो. माझ्या कथेत येणारं वास्तव दलित, ग्रामीण, अमक-तमुक अशा प्रकारची सगळी वर्गवारी पार करून येतं. एखाद्या कोरडवाहू शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या भूमिहीन शेतकऱ्याच्या जगण्यातले बारकावे असतील मी सारख्याच उत्कटतेने समजून घेतो; त्यांचं जगणं समजून घेतो.

ग्रामीण लेखकांनी गावकुसाबाहेर पाहायचंच नाही, अशी आपल्याकडे जुन्या काळात पद्धत होती. मला तसं वाटत नाही. मला वाटतं, लेखक म्हणून आपल्या आस्थेचा परीघ विशाल असला पाहिजे. सगळ्या प्रकारची वर्गवारी टाळून आपल्याला माणसाच्या अंत:करणापर्यंत जाता आलं पाहिजे. ही धारणा मनाशी असल्यामुळे मी त्या पद्धतीने लिहीत राहतो.

माझ्या कथेत गुंतागुंत असते, पण ती फक्त वास्तवाच्या चित्रणाजवळ थांबत नाही. वास्तवाचं जसंच्या तसं दर्शन घडवणं हे मला कधीच महत्त्वाचं वाटत नाही. मला वाटतं, साहित्यानं त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. एखाद्या संवेदनशील वाचकाच्या मनात काही प्रश्न उपस्थित होणं, त्या वाचकाने अस्वस्थ होणं किंवा तो आतून हलणं हे लिहिण्यातून घडलं पाहिजे. केवळ वास्तवाची कार्बनकॉपी मारण्याला काही अर्थ नाही.

प्रश्न : बरोबर आहे. तुमच्या सगळ्याच कथा - मग त्या ‘इडा पिडा टळो’मधल्या असतील किंवा ‘आलोक’मधल्या असतील - संवेदनशील माणसाची झोप उडवणाऱ्या, त्याच्या मनाच्या तळाला सुरुंग लावणाऱ्याच आहेत.

लोमटे : पठारे यांनी त्यासाठी ‘स्वास्थ्यहारक’ असा शब्द वापरला होता. ‘‘इडा पिडा टळो’मधली कथा स्वास्थ्यहारक आहे’, अशी पठारे यांची प्रतिक्रिया हाती. या कथासंग्रहात अस्वस्थ करणाऱ्या बऱ्यापैकी कथा आहेत. ‘आलोक’चा पोत वेगळा आहे. आयुष्यभर आपण एकच गोष्ट लिहू नये, असं मला वाटतं. ‘इडा पिडा टळो’मध्ये मी जो असेन, तो ‘आलोक’मध्ये असता कामा नये आणि ‘आलोक’मध्ये मी जो आहे, तो माझ्या पुढच्या पुस्तकात असता कामा नये. आयुष्यभर एकच गोष्ट वेगवेगळ्या अंगाने सांगण्यात काही अर्थ नाही. ते आपल्याला भेदता आलं पाहिजे. ‘इडा पिडा टळो’मधलं जग भयंकर अस्वस्थ करणारं आहे, ‘आलोक’मध्येही अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पण या पुस्तकातल्या कथांसाठी मी भाषेवर जास्त मेहनत घेतलेली आहे. पूर्णपणे ग्रामीण ढंगाची भाषा मी कधीच वापरत नाही. मी माझ्या वकुबाप्रमाणे भाषेची बऱ्यापैकी मोडतोड करण्याचा प्रयत्न करतो. ‘आम्हाला तुमची भाषा समजत नाही’, असं सांगणारे वाचक भेटत असल्याचा काही लेखकांना बऱ्याचदा अनुभव येतो. विशेषत: महानगरातल्या वाचकांची ही तक्रार असते. मला मात्र असा अनुभव नाही. चंद्रपुरातला वाचक असो किंवा गोव्यातला, ‘मला तुमची भाषा समजत नाही’ असं आजवर कुठलाही वाचक मला कधीच म्हणालेला नाही. याचं कारण मी त्या भाषेतली वाचनीयता टिकवण्याचा प्रयत्न करतो. तसंच त्या सगळ्या परिसराचं वळण त्या भाषेला देण्याचा, पण नागर आणि ग्रामीण या दोन्ही भाषांची मोडतोड करून ती भाषा माझ्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझी भाषा दुर्बोध असल्याचं, अनाकलनीय असल्याचं किंवा समजत नसल्याचं सांगणारं मला कुणी भेटत नाही. दै. ‘लोकसत्ता’मध्ये मी दोनेक वर्षांपूर्वी शेतीविषयक सदर लिहिलं. ते ग्रामीण भागातल्या लोकांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल होतं, पण त्यावर शहरांमधल्या वाचकांच्याही खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया असायच्या. हा शहरी वाचकही या लेखनाने खूप अस्वस्थ व्हायचा.

प्रश्न : तुमचं लेखन शहरी माणसांच्या मनाचाही तळ ढवळणारं आहे, यात काही वादच नाही.

लोमटे : मला वाटतं की, संवेदनेच्या पातळीवर माणूस ग्रामीण किंवा शहरी, कुणीही असला, तरी त्याच्या संवेदनेला आवाहन करता आलं पाहिजे. त्याच्या संवेदनेला तुम्हाला कुठेतरी जागं करता आलं पाहिजे. ‘आलोक’च्या दुसऱ्या आवृत्तीवर समीक्षक (कै.) म. द. हातकणंगलेकर यांचा ब्लर्ब आहे. तो असा – “ ‘आलोक’ या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण, निसर्ग-पाऊसपाण्याचे वर्णन, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे, भ्रष्ट, बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली-शैलीचा नवा, अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते… लोमटे यांची शैली, अभिनव…ग्रामीण कथाकार ठोकळ, यादव आणि व्यंकटेश माडगूळकर, चारुता सागर यांना पार मागे टाकणारी…अस्सल प्रादेशिक आणि बोलीभाषेचे रंगरूप घेऊन मातीतील मुळे शोधणारी, उघड करणारी…नव्या वास्तवाचे, नव्या शैलीतील नवी बोलीभाषा वापरून मनाचा ठाव घेणारे चित्रण आसारामसारखे तरुण लेखक करीत आहेत. त्यांचा हेवा वाटतो आणि त्यांना सलामही करावासा वाटतो.”

प्रश्न : हातकणंगलेकरांशी मी सहमत आहे. तुमची कथा वाचणारा कुणीही याच्याशी सहमत होईल. गेल्या पंचवीस वर्षांमधले ग्रामीण भागात झालेले बदल टिपणारी तुमची कथा आहे, आणि या काळात ग्रामीण भाग झपाट्याने बदलला आहे.

लोमटे: पूर्वी ज्या लेखकांनी ग्रामीण जीवनाविषयी लिहिलं, ते ग्रामीण जीवन खूप स्थितिशील होतं. त्या जगण्यात फारसे बदल घडत नव्हते. लोक आपल्या आपल्या ठिकाणी राहायचे. त्यांच्या जगण्यात फार उलथापालथ नव्हती; पण १९९०नंतर एकूण जगण्यालाच खूप गती आलेली आहे. ती महानगरांमध्येच आलेली आहे, अशातला भाग नाही; ती ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. सूर्य उगवण्याच्या आधी गावातल्या मोबाईल रिचार्ज करणाऱ्या टपरीसमोर चार-दोन लोक जमा होतात. हा बदल बरा-वाईट याची चर्चा आपण नंतर करू; पण हे असं घडतं आहे. आता काहीही स्थितिशील राहिलेलं नाही. सगळ्यालाच विलक्षण गती आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, गाव कुठे संपतं आणि शहर कुठून सुरू होतं, हे तुम्ही सांगू शकत नाही. याला आपण अर्धनागर असं म्हणू शकतो. माझी कथा या जगाची कथा आहे असं मला वाटतं. ती काही स्थितिशील अशा ग्रामीण जीवनाची कथा नाही आणि ती करकरीत अशा शहरी माणसांचीही कथा नाही.

प्रश्न : जागतिकीकरणामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागही बदलांच्या सोसाट्यात किंवा वावटळीत सापडला आहे, असं म्हणतात. या सोसाट्यात सापडलेल्या माणसाच्या शोषणाच्या अनेक तऱ्हा निर्माण झाल्या आहेत. त्यांचा शोध तुमची कथा घेण्याचा प्रयत्न करते.

लोमटे : मी तुम्हाला जुनी उदाहरणं सांगतो. ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही वर्गवारी आपल्याला काय सांगते? तर पूर्वीचा भारत खूप समृद्ध होता. ‘इंडिया’ने काय केलं, तर ‘भारता’ची सगळी समृद्धी ओरबाडली. खरं तर यावरची माझी मांडणी शेतकरी संघटनेच्या मांडणीला छेद देणारी आहे, पण मी ती अनेक ठिकाणी केलेली आहे. लेखक म्हणून आपण स्वतंत्र असलं पाहिजे, असं मला वाटतं. आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही विचारधारेबद्दल किंवा तत्त्वज्ञानाबद्दल आपण कृतज्ञच असलं पाहिजे, पण त्याचबरोबर या धारेतल्या हरकतीच्या जागाही आपण नोंदवल्या पाहिजेत. असो.

‘इंडिया विरुद्ध भारत’, ही अतिशय सोपी वर्गवारी होती. म्हणजे पूर्वीच्या ‘भारता’त माणसं अतिशय गुण्या-गोविंदाने नांदत होती. ‘इंडिया’ने भारताची ती समृद्धी ओरबाडली. ‘इंडिया’चा जो सगळा झगमगाट आहे किंवा शायनिंग आहे, ती ‘भारता’च्या शोषणातून उभी राहिलेली आहे. मला असं वाटतं की, इतकी सोपी वर्गवारी करता येत नाही. कारण ग्रामीण भागात दुबळ्या माणसाचं शोषण होतच होतं. ‘इंडिया’तून माणसं आली आणि मग ‘भारता’तल्या माणसांचं शोषण व्हायला लागलं, असं काही नाही. ‘भारता’तल्या ‘भारता’तसुद्धा शोषणाची काही बेटं आकाराला आलेली होती. ज्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, त्यांनी गरीब-दुबळ्या माणसांना टाचेखाली घेण्याचे प्रकार होतच होते. ही गोष्ट आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. अमुक लोक असे असतात आणि अमुक तसे नसतात, असं काही मला वाटत नाही. मला वाटतं, जिथं वर्षानुवर्षं एकवटलेली सत्ता असते, तिथं शोषण होतं; दुबळ्यांना न्याय नाकारला जातो. अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे भारतातल्या भारतातसुद्धा शोषणव्यवस्थेचे अनेक स्तर पाहायला मिळतात. ते स्तर मांडण्याचं काम मी माझ्या कथांमधून करतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याकडे राजकारणाकडे खूपच सोयीचं, ठोकळेबाज आणि वरवर पाहिलं जातं. चांगले राजकीय संदर्भ असलेली, चांगले राजकीय तपशील असलेली कलाकृती किंवा कथा-कादंबरी आपल्याकडे फारशी सापडतच नाही. ‘इडा पिडा टळो’मध्ये उसाच्या प्रश्नावर आधारित ‘चरक’ नावाची कथा आहे; दलित-सवर्ण संघर्षावर आधारित ‘होरपळ’ नावाची कथा आहे. या दोन्ही कथांमध्ये शिवसेनेचे थेट राजकीय संदर्भ आहेत. शिवसेनेचा ग्रामीण भागातला शिरकाव साधारणपणे १९९०-१९९५ या काळातला आहे. १९९५पासून हा शिरकाव जास्त झाला, कारण त्या वर्षी हा पक्ष सत्तेत आला. हा जो सगळा काळ होता, त्याचं प्रतिबिंब आपल्याला फारसं कुठं सापडत नाही. ‘इडा पिडा टळो’मधल्या दोन-तीन कथांमध्ये शिवसेनेचा ग्रामीण भागातला जो शिरकाव आहे, किंवा त्या पुढचा टप्पा म्हणजे शिवसेनेने ग्रामीण भागात प्रस्थापित होणं, ‘रायगड’, ‘सिंहगड’ असं लिहिलेल्या मोटारसायकली भरधाव फिरणं, गावोगाव शिवसेनेच्या शाखा निघणं… म्हणजे राजकारणाचं चित्रण त्यात मी केलेलं आहे.

प्रश्न : ‘आलोक’मध्येही ‘खुंदळण’, ‘चिरेबंद’ या कथांमध्ये राजकीय संदर्भ आहेत. मला वाटतं की, तुम्ही मानवी जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून राजकारणाचा विचार करता; त्याच्याकडे निर्मळ दृष्टिकोनातून पाहता, ते समजून घेता. साहित्यिक राजकारणाकडे अतिशय ठोकळबाज पद्धतीने पाहिलं जातं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. गेल्या पंचवीस वर्षांतलं ग्रामीण लेखन हे ‘जागतिकीकरण कसं वाईट आहे आणि पूर्वीचा काळ कसा चांगला होता’, हे रंगवून रंगवून सांगण्यातच खर्ची पडलेलं दिसतं.

लोमटे : त्या सापळ्यातून मी पुढे निसटलोय. माझ्या डोक्यात काही पूर्वग्रह नाहीत. आधुनिकीकरण हिरव्या संस्कृतीला नष्ट करणारं आहे, अशा भाबड्या गोष्टी मी मानत नाही. मला वाटतं की, जगण्यातल्या वेगवान बदलांना जगणं कसं सामोरं जातंय किंवा प्रत्येक माणूस जगण्याच्या कसोटीवर कसा उतरतोय, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. त्यामुळे आधुनिकीकरणाच्या लाटा यायला लागल्याने हिरवी संस्कृती नष्ट व्हायला लागली, असा काही विचार मी करत नाही.

‘पूर्वीचं गाव किती छान होतं आणि आता हे काय सगळं सुरू झालंय’, किंवा ‘पूर्वीची माणसं एकत्र नांदायची आणि आता हे काय बदल आलेत, आमचं अमुक तमूक हरवलंय’ असं ग्रामीण भागाचं खोटं गौरवीकरण किंवा खोटं उदात्तीकरण करणं मला आवडत नाही.

प्रश्न : उदय प्रकाशांनी मागे एकदा सांगितलं होतं की, शेवटचा, तळातला माणूस हा लेखकाच्या आस्थेचा विषय असला पाहिजे आणि त्यांच्या आगामी कथांची कथानकं सांगून त्यांनी मला या मुद्द्यासाठी अनेक उदाहरणं दिली होती. तुमच्याही प्रत्येक कथेच्या आस्थेचा विषय शेवटचा माणूस हाच असतो.

लोमटे : म्हणजे तळपातळीवरचा जो माणूस आहे, त्या माणसाची घुसमट, जगतानाची त्याची झाडाझडती या गोष्टी मला नेहमी अस्वस्थ करतात आणि त्या गोष्टींना मला भिडावंसंच वाटतं.

प्रश्न : आणि त्याला तुम्ही निर्मळपणे भिडता. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की, इथलं समाजवास्तव समजावून घ्यायचं असेल, तर तुम्हाला जातवास्तव आणि जातीय संदर्भ विसरून चालतच नाही. मात्र या सगळ्या फ्रेममध्ये न अडकता तुम्ही त्या तळपातळीवरच्या माणसाला निर्मळपणे समजून घेता.

लोमटे : आपल्याकडे सर्जनशील लेखकाचे सर्जनाच्या पातळीवर असलेले हितसंबंध त्याच्या लेखनातून कधीकधी उघडे पडतात. मला वाटतं की, कुठल्याही जातीचा प्रतिनिधी म्हणून मी एखाद्या माणसाकडे पाहत नाही. मी एक युनिट म्हणून तो माणूस समजून घेतो आणि त्यातही जो दबलेला माणूस आहे, तळातला माणूस आहे, त्याला जास्त आत्मीयतेने समजून घेणं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते.

प्रश्न : हो. राजकीय-सामाजिक प्रश्न असलेली किंवा शेतीप्रश्नाशी निगडित असलेली अशी तुमची कोणतीही कथा पाहिली, तरी ‘माणूस’ हाच शेवटपर्यंत तुमच्या आस्थेचा विषय राहतो. त्याचं जगणं, त्याच्या रीतीभाती, त्याच्या परंपरा, त्याचं दुःख, त्याच्या दुःखाचे वेगवेगळे स्तर किंवा त्याच्या दुःखाच्या वेगवेगळ्या पातळ्या हे तुम्ही इतक्या बारकाईने मांडत राहता की, ती कथा खिळवून ठेवते; वाचकाच्या संवेदनशील मनाचा तळ ढवळून टाकते. त्यामुळेच ती ग्रामीण पर्यावरणातली असली, तरी फक्त ग्रामीण न राहता ती माणसांची कथा होते.

लोमटे : दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्याकडे चळवळी किंवा आंदोलनं इथपर्यंत मराठी लेखक पोहोचतच नाही. तो ते लिहूच शकत नाही. तो ग्रामीण असला काय किंवा शहरी असला काय, तो फारच काठावरचं जगतो. आता ‘इडा पिडा टळो’मध्ये कामगार चळवळीशी संबंधित असलेली गोष्ट आहे किंवा ‘आलोक’मधली एक कथा डाव्या चळवळीशी संबंधित कार्यकर्त्याची, त्याच्या पक्षावर असलेल्या निष्ठेशी आणि त्यासंदर्भातल्या र्‍हासाशी संबंधित आहे किंवा ‘इडा पिडा टळो’मध्येच शेतकरी आंदोलनाशी संबंधित ग्रामीण स्त्रीच्या जगण्याची एक कथा आहे. आपल्याकडच्या तथाकथित ग्रामीण लेखकांनी चळवळी, आंदोलनं या गोष्टींकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली होती. त्यामुळे चळवळी, त्यांच्यातले ताणेबाणे, या चळवळींच्या माध्यमातून होणारी उलथापालथ हे माझ्या या कथांमधून नव्यानेच आलं.

प्रश्न : पण त्यातही चळवळीशी निगडित असलेल्या किंवा चळवळीत काम करणार्‍या माणसावर त्या चळवळीची विचारधारा परिणाम करते. मात्र तुमची शेतकरी संघटनेशी अतिशय जवळीक असूनसुद्धा सर्जनशील लेखक म्हणून तुम्ही त्यांची विचारधारा स्वतःवर लादून घेतलेली नाही.

लोमटे : मी शेतकरी संघटनेत काम केलेलं नाही. मी कुणाचंच काहीच लादून घेत नाही. कुठल्याही सापळ्यात अडकत नाही. बाकीच्या भाषांमधले लेखक किती वेगवेगळ्या पातळ्यांवरचं जीवनदर्शन घडवतात! ते एकच गोष्ट आयुष्यभर सांगत नाहीत किंवा लिहीत नाहीत.

प्रश्न : एक कथालेखक म्हणून तुम्हाला आजच्या काळात कुठली आव्हानं वाटतात? कारण आजचा काळ हा बदलांच्या सोसाट्याचा आणि वावटळीचा काळ आहे.

लोमटे : तो बदलांच्या सोसाट्याचा तर आहेच, पण तो दुभंगलेलाही आहे. तो अशा पद्धतीने दुभंगलेला आहे की, माणसाच्या आयुष्यात स्वस्थता नावाची गोष्ट राहिलेलीच नाही. त्याबद्दल हळहळ करण्याचंही काही कारण नाही. आपण फारच काही गमावलं आहे, असं म्हणण्याचंही काही कारण नाही; पण या सर्व गतीमध्ये सर्वसामान्य वंचित माणसाबद्दल बोलणं किंवा त्याच्या जगण्याबद्दल विचार करणं किंवा आस्था दाखवणं ही गोष्ट आता हद्दपार झालेली आहे. तसंच कितीतरी गोष्टी आहेत, ज्या या नव्या युगाने जन्माला घातलेल्या आहेत. २०-२५ वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्ग’ हा एका विशिष्ट समूहातला होता. आता सगळ्याच जातींमधली शिकून स्थापित झालेली जी पिढी आहे, ती एकाच मध्यमवर्गात मोडण्याइतपत तिच्यात एकसाचीपण आलेलं आहे. हे सगळे मध्यमवर्गीय जिथून येतात, तिथल्या लोकांबद्दलसुद्धा ते नीट विचार करायला तयार नाहीत. त्यामुळे भविष्यात वंचितांचं जगणं आणखी दुष्कर होत जाईल. कारण त्यांच्या बाजूने कुणी फारसं उभं राहताना दिसणार नाही.

उदा. शेतकरी. ज्याच्याकडे सातबारा आहे, त्याला शेतकरी म्हणायचं का? सातबारा आहे म्हणून हायवेलगत फार्महाऊस असलेल्यांना, श्रीमंती बंगले असलेल्यांनाही उद्या शेतकरी म्हणणार का? मराठवाड्यातला किंवा विदर्भातला किंवा कोरडवाहू पट्ट्यातला; दुष्काळ, नापिकी यांच्याशी झगडत झगडत तगू पाहणारा कुठलाही शेतकरी आणि हायवेलगतचे शेतकरी यांच्यात काही फरक आहे की नाही? हे सगळं दिवसेंदिवस खूप जटिल होत जाईल.

प्रश्न : आजची कथा असं ज्याला म्हणता येईल, त्या कथेनं ही आव्हानं पेलली आहेत असं वाटतं का? तुमची, जयंत पवार, किरण गुरव, यांची कथा मराठीतल्या पूर्वीच्या कथांपेक्षा वेगळी आहे. ती खऱ्या अर्थाने आजची कथा आहे असं वाटतं.

लोमटे : मला वाटतं की, कधी काळी मराठी कथा संकुचित परिघात होती. ती मध्यमवर्गीय जीवनजाणिवेचं चित्रण करत होती. तिच्या त्या खुरट्या अवकाशातून ती केव्हाच बाहेर आलेली आहे. ‘कथा’ हा दुय्यम प्रकारचा वाङ्मयप्रकार आहे, असा जो न्यूनगंड होता, त्यातून आजची कथा पुरती बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. आजची मराठी कथा वेगवेगळ्या समूहांमधून यायला लागलेली आहे; वेगवेगळ्या प्रदेशांमधून यायला लागली आहे; वेगवेगळ्या स्तरांमधून यायला लागलेली आहे. त्यामुळे आजची मराठी कथा बहुस्तरीय आहे. आता ही कथा जुनी, ठरावीक साच्यातली मध्यमवर्गीय गोष्ट राहिलेली नाही. आज अ-नागर समूहातून लिहायला लागलेले जे लेखक आहेत, ते स्वत:ला ग्रामीण म्हणवत नाहीत. जो लेखक आजच्या या सगळ्या जगण्याकडे नितळपणे पाहतो, त्याला ‘ग्रामीण’ हे लेबल आवडतही नाही. आजची ही कथा महानगरातली असेल, खेड्यापाड्यातली असेल, आदिवासी तांड्यांवरची असेल किंवा दलित जगण्यासंबंधी असेल… ती बहुमुखी आहे. ही कथा २५-३० वर्षांपूर्वी सपाट जीवनदर्शन घडवणारी होती; खुरट्या मध्यमवर्गीय परिघातच अडकलेली कथा होती. कथेतून काहीतरी जीवनदर्शन घडवण्यापेक्षा किमान भाषिक कौशल्य असल्याने ‘काहीतरी लिहा आणि कुठल्यातरी मासिकात छापून आणा’ असं जे पूर्वी होतं, ते आता राहिलेलं नाही. एखादा कवी स्वतःच्या कवितेकडे किंवा एखादा कादंबरीकार स्वतःच्या कादंबरीकडे जितक्या गांभीर्याने पाहतो, तितकाच आजचा कथाकारही स्वतःच्या कथेकडे पाहतो.

ग्रामीण कथाच श्रेष्ठ आहे आणि शहरातली कथा मात्र श्रेष्ठ नाही, असं मी म्हणत नाही. कारण असं काही नसतं. गिरणगावातून सगळा कामगार उखडला जाणं, हे जयंत पवारच्या कथेतून येत असेल, तर जगण्यासाठी विस्थापित होणाऱ्या मराठवाडा-विदर्भातल्या माणसाचीसुद्धा तीच गोष्ट असू शकते. जगण्यातून उखडलं जाणं - मग ते गिरणगावातनं असो की मराठवाडा-विदर्भातनं असो – हा धागा जर जयंत पवारची कथा ताकदीने मांडत असेल, तर विस्थापित होण्याचा अनुभव आलेल्या कुठल्याही माणसाला ती आपली वाटते. एवढंच नाही, तर ज्याच्या जगण्याचा संकोच होच चाललेला आहे, ज्याचं जगणं आक्रसत चाललेलं आहे, त्या माणसालासुद्दा ती कथा आपली वाटते. साहित्य मुळात जोरकस असेल, तर ते शहरी, महानगरी, ग्रामीण, अमुकतमुक ही सगळी वर्गवारी मोडून पुढे येतं.

कधी काळी दिवाळी अंकांची गरज म्हणून, मासिकांची गरज म्हणून, रविवार पुरवण्यांची गरज म्हणून किमान भाषिक वकुब असलेली माणसं ज्या कथा लिहायची तशा कथा आता लिहिल्या जात नाहीत. कुणी करमणूक म्हणून कथा लिहीत नाही. अनेकांना माझं हे मत धक्कादायक वाटेल की, रविवार पुरवण्या कथा छापत नाहीत किंवा मासिकं कथा छापत नाहीत, ही गोष्ट मला खूप चांगली वाटते. त्यामुळे हौसेखातर होणारं कथालेखन आपोआपच थांबतं. ‘चार महिन्यांवर दिवाळी आलेली आहे म्हणून मग आता कथा पाडायला बसा’, हे मला आवडत नाही. अनेक कथा मी दिवाळी झाल्यानंतर लिहिलेल्या आहेत. आपल्याकडे दुसरी कुठली सोय नसते. तीस-चाळीस पानांची कथा असेल, तर ती दिवाळी अंकातच द्यावी लागते. मात्र कथा सुचून कागदावर उतरल्यानंतर तिनं दिवाळी अंकात जागा घेणं ही गोष्ट वेगळी आणि दिवाळी अंकासाठीच तिची निर्मिती होणं ही गोष्ट वेगळी आणि फार वाईट! एके काळी मराठीत हे सगळं होतं. हौसेखातरच करण्याचा सगळा मामला होता. आज जयंत पवार, किरण गुरव, माझी कथा या कथा तशा नाहीत. दिवाळी अंकांची गरज म्हणून किंवा रविवार पुरवण्यांची गरज म्हणून या कथा लिहिल्या जात नाहीत.

प्रश्न : मराठीतले तुमच्या आवडीचे कथाकार कोणते?

लोमटे : मला स्वत:ला मराठीतले बाबुराव बागूल, भाऊ पाध्ये आणि भास्कर चंदनशिव हे तीन कथाकार खूपच मोठे कथाकार वाटतात..

प्रश्न : यांच्यातलं समान सूत्र काय सांगता येईल?

लोमटे : ते माणसाकडे ‘माणूस’ म्हणून पाहतात. ते जगण्याला थेट भिडतात. ज्यांनी कधी अस्पृश्यतेचे चटके सहन केलेले नाहीत, ते भास्कर चंदनशिव यांच्यासारखे मराठवाड्यातले लेखकसुद्धा दलित जीवनासंबंधीची उत्कट कथा लिहितात. चंदनशिव हे असे लेखक आहेत, ज्यांनी ग्रामीण, दलित अशा सगळ्या सीमारेषा पुसून मराठवाड्यातल्या खूप वेगळ्या वंचितांचं जग मांडलं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा लेखकाचं नीट मूल्यमापनच होत नाही.

प्रश्न : भास्कर चंदनशिव यांचं तर अजिबातच झालेलं नाही…

लोमटे : खरं तर माझ्याआधी भास्कर चंदनशिव यांनाच साहित्य अकादमी मिळायला हवं होतं. ते निखळ माणूसपणाचा शोध घेतात. दलित, ग्रामीण अशा सगळ्या वर्गवाऱ्या पुसून माणूस समजून घेणं, त्याचं जगणं समजून घेणं, त्याच्या जगण्याला बळ पुरवणं हे साहित्याचं मुख्य काम असतं, त्याचा प्रधान हेतू असतो; आणि या सगळ्या गोष्टी चंदनशिव यांच्या कथेत प्रकर्षाने येतात.

प्रश्न : हे झाले पूर्वसुरी. समकालीनांपैकी…?

लोमटे : अलीकडच्यांपैकी जयंत पवारची कथा मला आवडते; किरण गुरवची कथा आवडते. गौतमीपुत्र कांबळे यांची कथा वेगळ्या प्रकारचा प्रयोग करणारी कथा आहे. त्यांचा ‘परिव्राजक’ नावाचा कथासंग्रह आहे. ती कथा आपल्याला कुठल्या स्थळकाळात बांधता येत नाही. त्यात वर्तमानकालीन संदर्भ सापडत नाहीत, पण ती कथा खूप वेगळी आहे. ती मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते.

प्रश्न : तुमची प्रत्येक कथा ही एखाद्या लघुकादंबरीसारखी असते. पण कादंबरीकडे न वळता तुम्ही कथालेखनच निष्ठेनं करत आला आहात. कथा हा वाङ्मयप्रकार तुम्हाला जास्त लुभावतो?

लोमटे : हो. आणि दुसरं म्हणजे ‘कथा’ हा वाङ्मयप्रकार मला अभावग्रस्त माणसांनी तगवलेला वाङ्यमप्रकार वाटतो. आपण जिला पुस्तकी भाषेत ‘कथा’ म्हणतो, ती खरं तर ‘गोष्ट’ आहे. जगण्याच्या असंख्य प्रश्नांनी जी माणसं गांजून गेलेली आहेत, तीसुद्धा स्वतःची दिवसभरची ठणकत्या अंगाची वेदना विसरून रात्री एकमेकांना ‘गोष्ट’ सांगतात. त्यातून जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न असतो. आपण ज्या अभावात जगत असतो, त्यातल्या जगण्यासाठी जे मानसिक बळ गोळा करावं लागतं, ते बळ गोळा करण्यासाठी ‘गोष्ट’ तयार झाली. कधी काळी भुताखेतांच्या, देवादिकांच्या ‘गोष्टी’ असतील, पण हीसुद्धा एक मोठी परंपरा आहे. तुम्ही पाहा, शेतकरी, शेतमजूर यांचे जगण्याचे खूप वांधे आहेत, पण ती माणसं एकेक-दोन दोन तास ‘गोष्टी’ सांगतात. इतकं सगळं अभावातलं जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, त्याला काहीतरी उतारा पाहिजे. ‘गोष्ट’ ही गोष्ट माणसाने कल्पनेच्या आधारे उभी केलेली आहे. ‘जादुई वास्तववाद’ असा कथाप्रकार अलीकडे आलेला आहे, पण आपल्याकडच्या ‘गोष्टी’ सांगण्याच्या परंपरेत ‘अद्भुत गोष्टी’ फार पूर्वीपासूनच आहेत. अभावात जगणाऱ्या माणसांना या ‘गोष्टीं’मधून निवारा मिळतो. बळ गोळा करण्याची ताकद ‘गोष्टी’तूनच आलेली आहे. एकमेकांना ‘गोष्टी’ सांगून जगण्याचं बळ मिळवण्याचा प्रयत्न माणसांनी केलेला आहे. वास्तविक, त्यांनी तर कथेकडे पाठ फिरवायला पाहिजे होती. ‘रिकाम्या ‘गोष्टी’त काय पडलंय आपल्यासाठी!’, असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, पण तसं घडत नाही. ‘नाही रे’ वर्गातून खूप मोठ्या प्रमाणावर ‘गोष्टी’ तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. लोककथेची परंपरा आदिवासींपासून सगळ्याच समाजघटकांमध्ये आहे. तांडे, वस्ती, वाड्या या सगळ्या ठिकाणची माणसं भलेही अभावात जगत असतील, पण त्यांनी ‘गोष्ट’ टिकवली; तगवली.

Post Comment

Shrikant Umrikar

Mon , 26 December 2016

आसाराम लोमटे यांंनी "इंंडिया भारत" या शरद जोशी यांंनी केलेल्या मांंडणीबाबत टिपणी केली आहे ती चुक गृृहीतकावर आहे.. मुळात शरद जोशी आर्थिक अंंगाने ही मांंडणी करतात.. शिवाय शोषणाची जी परिभाषा डाव्या चळवळीत वापरली जाते तीचा तसा वापर शरद जोशी करत नाहीत.. सामाजिक शोषणाबाबत कदाचित लोमटे बोलत आहेत.. जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली ठेवल्या गेले.. आणि याचे पुरावे गॅॅट कराराच्या कागद पत्रात आहेत.. असो पण लोमटेंंना आक्षेप आहे तशी ही मांंडणी मुळातच नाही..


Bhagyashree Bhagwat

Mon , 26 December 2016

आवर्जून वाचावीच अशी उत्कृष्ट मुलाखत! मराठी साहित्यिक अगदी क्वचित इतका वस्तुनिष्ठ, परखड, तरीही सखोल आणि प्रांजळ विचार करताना दिसतात.