‘पूर्वीचा काळ फार मनोहारी होता आणि आताचा नाही’ असं म्हणणं, म्हणजे ‘पूर्वी बर्फ फार गार होता’ असं म्हणण्यासारखं आहे!
पडघम - सांस्कृतिक
दिलीप माजगावकर
  • ‘राजहंस प्रकाशन’चे मा. दिलीप माजगावकर
  • Thu , 04 July 2019
  • पडघम सांस्कृतिक राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan दिलीप माजगावकर Dileep Majgaonkar मसाप Maharashtra Sahitya Parishad

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ ‘राजहंस प्रकाशन’चे मा. दिलीप माजगावकर यांना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते नुकताच समारंभपूर्वक देण्यात आला. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत.

.............................................................................................................................................

‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या वतीने हा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मला देण्यात आला, त्याबद्दल मी ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो. वास्तविक कोणाला, केव्हाही आणि कोणताही पुरस्कार मिळाला, तरी त्याचा तात्कालिक आनंद होत असतोच, तसा तो मलाही झालाय; पण या पुरस्काराच्या बाबतीत एक विलक्षण योग आलाय आणि म्हणून मला विशेष आनंद झालाय.

तो योग असा की, जी ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आज आपला ११३ वा वर्धापन दिवस साजरा करते आहे, त्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना १९०६ साली साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली इथे जवळच सदाशिव पेठेत मळेकर वाड्यात झाली. त्यावेळी तिथं मराठी ग्रंथकार परिषद भरवण्यात आली, ज्याचंच पुढं ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ असं नामांतर करण्यात आलं. आणि योगायोग असा की, ज्या मळेकर वाड्यात ती स्थापन झाली, त्याच मळेकर वाड्यात बरोब्बर ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६९मध्ये ‘राजहंस’चं स्थलांतर झालं. आज परिषदेच्या टिळक रोडवरच्या सभागृहात जो मळेकर वाड्याचा फोटो आपण पाहता, त्यात एका बाजूला ‘राजहंस’ची पाटी आपल्याला दिसेल आणि समोरच्या दरवाज्यात दोन वर्षांचा माझा मुलगा आपल्याला दिसेल. अशा प्रकारे या संस्थेची जन्मभूमी आणि माझी ५० वर्षांची कर्मभूमी एकच असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

या जोडीला अजून दोन आनंदाच्या गोष्टी या समारंभात घडल्या आहेत. पहिली म्हणजे हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला याची मी मिलिंद जोशी यांच्याकडे चौकशी केली; तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा पुरस्कार, हा मराठीतल्या बहुतेक सर्व मान्यवर साहित्यिकांनाच दिला गेलाय.’’ आणि अर्थात ते योग्य आणि उचितही आहे; पण प्रकाशक म्हणून यापूर्वी तो श्री.पु. भागवत यांना देण्यात आला होता. माझ्या प्रकाशनक्षेत्राच्या वाटचालीत ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी चालण्याचा प्रयत्न केला, त्यांना मिळालेला सन्मान मला मिळतोय याचाही मला आनंद वाटतोय.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीतल्या ज्या समीक्षकांविषयी माझ्या मनात अतिशय आदराची भावना आहे, ज्यांची समतोल, ठाशीव आणि अभ्यासपूर्ण समीक्षा मला आवडते; अशांपैकी एक डॉ. सुधीर रसाळ आहेत. दुर्दैवानं त्यांचा आणि माझा संबंध फार उशिरा आला. त्यामुळे त्यांचं फारसं लेखन मी प्रकाशित करू शकलो नाही; पण त्यांच्या हातून हा पुरस्कार मला मिळाला, याचा मला आनंद आहे.

‘राजहंस प्रकाशन’ ही मी स्थापन केलेली संस्था नसून माझ्या थोरल्या बहिणीचे यजमान बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेली आहे. पुढे श्री.ग.- माझे मोठे बंधू यांनी काही निवडक पुस्तकांच्या आधारे ‘राजहंस’ला ओळख प्राप्त करून दिली, ही आता नव्यानं सांगण्याची गोष्ट नाही. याचबरोबर कोणतीही प्रकाशन संस्था अखेर नावारूपाला येते, नावलौकिक मिळवते ती त्या प्रकाशन संस्थेने कोणती पुस्तके प्रकाशित केली यातून. अर्थात आपल्या लेखकांच्या नावानेच ओळखली जाते. या वाटचालीत अनेक मान्यवर साहित्यिकांचे आणि उदयोन्मुख लेखकांचे, फार मोठे योगदान आहे. त्याच्या जोडीला ‘राजहंस’कडे असणार्‍या अनुभवी संपादकीय वर्गाचाही यात मोठा वाटा आहे. आपलं लेखनाचं काम पूर्ण झालं की, लेखक त्या पुस्तकापुरता त्यातून मोकळा झालेला असतो; पण पुढे त्या लेखनाला - त्या पुस्तकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देण्याचं काम प्रामुख्यानं प्रकाशक करत असतो आणि हे काम एकटा प्रकाशक करू शकत नाही, तर अगदी मुखपृष्ठ आणि आतील मांडणी करणाऱ्या कलावंतापासून ते संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक आणि बांधणीपर्यंत अनेक जण या व्यापात गुंतलेले असतात. थोडक्यात पुस्तकनिर्मिती हे एक टीम वर्क असतं. पुढे ही निर्मिती वितरक आणि पुस्तक विक्रेत्यांपर्यंत तुमच्या हाती पडत असते. या सगळ्या साखळ्या किंवा कड्या यांना एकत्र जोडण्याचं काम प्रकाशक करत असतो. आज ‘राजहंस’ला जी ओळख आणि मान्यता मिळाली आहे, त्यात माझा वाटा फार कमी आहे आणि हे मी खोट्या नम्रपणातून किंवा व्यासपीठावरच्या टाळीसाठी सांगत नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. ‘राजहंस’चं भाग्य असं की, अशी एक सशक्त टीम ‘राजहंस’ला बांधता आली, उभी करता आली. या सगळ्यांचा या आजच्या सन्मानात फार मोठा वाटा, फार मोठं योगदान आहे.

वास्तविक अशा सन्मानप्रसंगी सन्मानार्थीनं फार बोलू नये, आणि स्वत:बद्दल तर बोलूच नये; पण या निमित्तानं माझी आणि माझ्याप्रमाणेच पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांची आज नेमकी अडचण काय झालीय, याची फक्त कल्पना देतो. मी सर्व प्रकाशन व्यवसायाबद्दल फार अधिकारवाणीनं मात्र बोलत नाही. त्यातही महागाई, नोटाबंदी, जीएसटी या व्यावहारिक गोष्टींबद्दलही मी बोलणार नाही. याची दोन कारणं- एक म्हणजे हे त्यासाठीचं व्यासपीठ नाही आणि दुसरं म्हणजे अशा स्वरूपाच्या अडचणी सर्वच व्यवसायात कमी-जास्त प्रमाणात असतात. ती मंडळी त्यातून मार्ग काढत असतात. तसाच मार्ग आम्हालाही काढावा लागेल.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत असं म्हणता येईल की, पुस्तक प्रकाशन आणि लेखन-वाचन संस्कृती यांचं नातं एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतकं घट्ट होतं; पण आता मात्र वेगवेगळ्या दृकश्राव्य माध्यमांमुळे, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे पुस्तकांची आणि वाचकांची दुनिया एका विचित्र कोंडीत सापडली आहे. काही काळ का होईना पुस्तकांची विक्री कमी होताना दिसतेय, तर दृकश्राव्य या माध्यमांचं आकर्षण वेगानं वाढताना दिसतंय. ई-बुक आणि ऑडिओ बुक ही अशा बदलाची दोन ठळक उदाहरणं आहेत.

या आणि अशा स्वरूपाच्या बदलांकडे आम्ही कसं पाहतो, ते कसे आत्मसात करतो, नव्या तंत्रज्ञानाशी कसं जमवून घेतो, यावर आमचा पुढचा प्रवास आता ठरणार आहे

आज मराठीपुरतं बोलायचं, तर ई-बुक्स, ऑडिओ बुक्स यांचा प्रसार मर्यादित असला, तरी नजीकच्या काळात तो निश्चित वाढणार आहे. छापील पुस्तकांना हे पर्याय असणार आहेत. त्याच्याशी स्पर्धा न करता त्याच्याशी जमवून घेणं, तिथल्या केवळ तंत्रज्ञानापुरत्याच नाहीत; तर विषय, आशय आणि तो सादर करण्याच्या पद्धती यांविषयीच्या गरजा पूर्ण करणारी यंत्रणा उभी करणं हे आवश्यक होणार आहे. मग त्यासाठीचे विषय असतील, लेखक असतील, लेखन शैली असेल, त्याचं लेखनशास्त्र असेल - हे शिकून घ्यावं लागेल. तसे लेखक शोधावे लागतील, संपादक शोधावे लागतील. हे एका अर्थी छापील पुस्तकांना समांतर जाणारं माध्यम असणार आहे. तरीही या पुढच्या काळात छापील पुस्तकांचं महत्त्वही कमी होणार नाही. आज जगभरचे पाहणी अहवाल हेच सांगतात; पण या पुढे केवळ छापील पुस्तकांवर अवलंबून राहता येणार नाही, त्याला या नव्या माध्यमांची जोड द्यावी लागणार आहे.

प्रश्न असा आहे की, हे भोवताली जे बदल होतायंत त्याचा वेग इतका प्रचंड आहे की, त्याच्याशी जमवून घेताना आमची दमछाक होतेय; पण यावर आम्हालाच तोडगा काढावा लागणार आहे. या गोष्टीची प्रकाशकांना कल्पना नाही; पण यापुढे हे काम अधिक वेगानं हाती घ्यावं लागेल. तसा उशीर झालाच आहे, तो अधिक होऊन चालणार नाही.

या जोडीला अजून एक गोष्ट आम्हाला करता येणं आहे - ती म्हणजे ही आधुनिक माध्यमं आत्मसात करून आजवरच्या वाङ्मयीन वाटचालीचा सांधा नव्या युगाशी कसा जोडून घ्यायचा, हा विचार करावा लागेल. यात आम्ही नव्या माध्यमातून नवी पुस्तकं, नवे विषय, नवे लेखक हे तर पोचवणं अपेक्षित आहेच; पण आजवर जी अभिजात पुस्तकं मराठीत प्रकाशित झाली, तीही जगभर पसरलेल्या मराठी वाचकवर्गापर्यंत न्यायला हवीत. उदाहरणच द्यायचं, तर लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रं’ हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात आकर्षक वाचनातून वाचकापर्यंत गेलं; तर कोणीही ते ऐकू, वाचू शकेल. पुढच्या वर्षी लोकमान्यांची स्मृतिशताब्दी आहे. न. चिं. केळकरांनी तीन खंडांत टिळक चरित्र लिहिलं आहे. योग्य संपादन आणि आकर्षक वाचनातून ते सादर करणं सहज शक्य आहे. अशी अगदी पन्नास पुस्तकं आपण सादर केली, तरी वाचनसंस्कृतीसाठी ते मोठं काम होऊ शकेल.

आज जगभरातून छापील पुस्तकं प्रकाशित होत असताना, त्याचवेळी त्यांच्या ई-आवृत्त्याही प्रकाशित होत असतात. त्या स्वस्त असतात, त्यात ओझं बाळगायचं नसतं. हे म्हणजे पूर्वी हार्डबाऊंड आवृत्तीचं प्रकाशन होत असताना पेपरबॅक आवृत्त्याही प्रकाशित होत असत, तसंच आहे. अशा प्रयोगाचं अर्थकारणही व्यवहारात आणायचं आहे.

या नव्या माध्यमांच्या आगमनानं केवळ मराठीच नव्हे, तर जगभराच्या वाचनसंस्कृतीत उलथापालथ होते आहे. एका अर्थी हा संक्रमणाचा काळ आहे. या संक्रमणाला बिचकून चालणार नाही, तर हे बदल आपल्याला स्वीकारून आणि ते आत्मसात करूनच यातून मार्ग काढावा लागणार आहे. शेवटी प्रत्येक काळाची म्हणून अशी काही आव्हानं असतात आणि त्या काळात वावरणार्‍या सर्वांनाच त्याचा सामना करावा लागतो. हा सामना समर्थपणे करायचा असेल, तर आम्ही प्रकाशक मंडळींनी प्रथम एक गोष्ट करायला हवी. ती म्हणजे - पूर्वी असं होतं, पूर्वी तसं होतं, पूर्वी फार कसदार लेखन करणारे लेखक होते, आता फार उथळ लेखन करणारे लेखक आहेत, पूर्वी फार मोठा वाचक वर्ग होता, आता तो नाही,- हे असे उसासे टाकणं बंद करायला हवं. आताही कसदार लेखन करणारा तरुण लेखकवर्ग ग्रामीण भागातून येतो आहे. तो शोधायला हवा, त्याच्यापर्यंत पोचायला हवं. आताही वाचक वर्ग आहे. अनेक प्रकाशकांच्या निवडक पुस्तकांच्या आवृत्त्या अल्पावधीत संपतात. हे कशाचं लक्षण आहे? पूर्वीचा काळ फार मनोहारी होता आणि आताचा नाही असं म्हणणं, म्हणजे ‘पूर्वी बर्फ फार गार होता’ असं म्हणण्यासारखं आहे. या छायेतून जितके लवकरात लवकर आपण बाहेर पडू; तितक्या लवकर आपण नव्या काळाच्या आव्हानांना सामोरे जाऊ, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.  

.............................................................................................................................................

दिलीप माजगावकर यांच्याविषयीचा माहितीपट

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा