पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही प्रज्वलाताई तट्टे ‘बायस’च! कारण काय? स्मृतिभ्रंश की राजकीय मोतीबिंदू?
संकीर्ण - वाद-संवाद
राजेंद्र पातोडे
  • अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे बोधचिन्ह
  • Tue , 02 July 2019
  • संकीर्ण वाद-संवाद प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar काँग्रेस Congress भाजप BJP वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi राष्ट्रवादी काँग्रेस NCP

सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रज्वलाताई तट्टे यांचा ‘पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही वंचित बहुजन आघाडी सत्तेपासून वंचितच!’ हा ‘अक्षरनामा’तील लेख म्हणजे वंबआ व अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. ‘सामाजिक कार्यकर्ता’ अशी बिरुदावली स्वत:च्या नावापुढे जोडली म्हणून पुरावे नसताना काहीही लिहिण्याचा परवाना प्राप्त होतो, अशा थाटातले प्रज्वलाताई यांचे लिखाण आहे. त्यातील आशय आणि गृहीतके अत्यंत तकलादू आणि फोल आहेत. कुठल्याही ठोस आणि विश्वसनीय माहितीच्या आधाराशिवाय सुतावरून स्वर्ग गाठण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे करताना स्वतःचा दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आहे; हा अट्टाहास कायम दिसावा म्हणून ‘पुरोगामी महाराष्ट्र’ पुरोगामी सामाजिक चळवळींमध्ये अ‍ॅड. आंबेडकरांना भरपूर साथ देतो, ‘बाबासाहेबांचा वारसदार’ म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतो, ही ठेवणीतली लोणकढी थाप मारायलाही त्या विसरत नाहीत. 

त्यांचा पहिला आरोप आहे- महाराष्ट्रात वंबआने सर्व जागांवर उमेदवार उभे करून आठ ते दहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान केले. फक्त दोन जागा सोडल्या तर वंबआचे अन्य सर्व ठिकाणचे डिपॉझिट जप्त झाले! कर्नाटक, राजस्थाननंतर आता महाराष्ट्रातही अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘डिपॉझिट’ गमावण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला! 

या आरोपामागे ताईंची प्रस्थापित मानसिकता आहे. देशात फक्त काँग्रेस आणि भाजप व त्यांचे सहकारी पक्ष यांचीच सत्ता असेल, त्यांनीच आलटूनपालटून राजकारभार करावा, कुटुंबाकरता पक्ष चालवावेत आणि त्या सर्वांना येथल्या तमाम वंचित समूहाने मुकाटपणे मतदान करावे, एवढेच त्यांना अभिप्रेत असल्याचे दिसते. अन्यथा सर्व जागांवर वंबआने उमेदवार का उभे केले, हा प्रश्न त्यांना पडलाच नसता.

वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष म्हणून स्वतःचे निर्णय घेतो, त्याला जनपाठिंबा आहे. त्याला कोणत्याही ‘सो कॉल्ड’ लेखक\लेखिकेच्या सल्ल्याची गरज नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष चालवण्याची जबाबदारी त्या त्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची आहे.

वंबआचे डिपॉझिट गेले ते ईव्हीएममुळे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत झालेले मतदान आणि मतमोजणी यांची आकडेवारी जुळत नाही. निवडणूक आयोगही यावर काही बोलत नाही. संघ-भाजपच्या दबावाखाली या निवडणुका मॅनेज झाल्या आहेत. मी स्वतः निवडणूक आयोगाकडे दोन तक्रारी केल्या आहेत, अ‍ॅड. आंबेडकरांनी या तफावतीबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा मागितला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु त्यावर एका अक्षराचा खुलासा केला गेलेला नाही. निवडणुकीच्या काळात मतदार यादीमधून हजारो नावे गहाळ केली गेली. मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या, हे उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे. (दस्तुरखुद्द शरद पवारांनीदेखील राष्ट्रवादीला केलेले मतदान भाजपला गेल्याचे स्वतः पाहिले आहेच!) याबाबत ताई काही मांडत नाहीत, त्यांना फक्त आठ ते दहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याचीच काळजी आहे.     

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar

.............................................................................................................................................

मुसलमानांनी वंबआला मते का द्यायला हवी होती, त्यांचे कोणते प्रश्न हाती घेऊन तडीस नेण्यास ‘वंबआ’ कटिबद्ध आहे, हे अ‍ॅड. आंबेडकरांनी त्याच दमात सांगायला हवे होते, असा दुसरा बालिश प्रश्न ताईंनी उपस्थित केला आहे. गेली ३५ वर्षे अ‍ॅड. आंबेडकरांची राजकीय-सामाजिक भूमिका आणि भारिप व वंचितच्या सभा, मोर्चे, आंदोलने यांची ताईंना नीट माहिती नाही.  त्यांनी अ‍ॅड. आंबेडकरांना जो निकष लावला आहे, तोच काँग्रेस-राष्ट्रवादीला लावून बघावा, म्हणजे त्यांना उत्तर मिळेल. 

उत्तर प्रदेशात जाटवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मायावती चार वेळा मुख्यमंत्री होऊ शकतात, त्यांना तिथला ओबीसी, ब्राह्मण, मुसलमान समाज पाठिंबा देतो; तर पुरोगामी महाराष्ट्रात अ‍ॅड. आंबेडकरांना इथले दलितेतर पाठिंबा देत नाहीत, असा एक बाळबोध प्रश्न ताईंनी विचारला आहे. मायावती मुख्यमंत्री होण्यासाठी थेट भाजपचा पाठिंबा घेतात, गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींचा विधानसभेमध्ये प्रचार करतात, हे ओपन सिक्रेट मात्र त्या लिहीत नाहीत. उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघ हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक चर्मकार समाजाचे प्राबल्य असलेले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची तुलना कशी होऊ शकते? 

त्याच मायावतींनी २०१९ लोकसभेत उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती केली नाही, त्यावर ताई काही आक्षेप घेत नाहीत. उत्तर प्रदेशात सपा-बसपामुळे काँग्रेस भुईसपाट झाली हे लिहिण्याचे धाडस त्या करत नाहीत. कारण तसे केले तर वंबआला आरोपी करता येत नाही. म्हणून मायावतीच्या चार वेळा मुख्यमंत्री होण्याचे श्रेय तेथील ओबीसी, ब्राह्मण, मुसलमान यांना देताना भाजपने तीन वेळा दिलेला पाठिंबा मात्र जाणीवपूर्वक दडवतात!  

वेगवेगळ्या टप्प्यांवर अ‍ॅड. आंबेडकरांच्या भारिपला अनेकांनी भरघोस पाठिंबा दिलेला आहे, असे लक्षात येते. अनेक बिनीचे समाजसेवक-विचारवंत-कलावंत अशी सर्व जातींमधली मंडळी अ‍ॅड. आंबेडकरांसोबत गेली. पण सोबत राहू शकली नाहीत, हे वास्तव आहे, अशी खोडकर टिप्पणी ताई करतात. पुरोगामी, सत्यशोधक, फुले-शाहू आंबेडकरी विचारांनी भारलेली विविध माणसे अ‍ॅड. आंबेडकरांकडे ‘बाबासाहेबांचे वारसदार’ म्हणून मोठ्या आशेने आकृष्ट झाली होती असे लक्षात येते. पण पुढे काहीतरी बिनसले आणि ही मंडळी सोडून गेली. यातले अनेक जण दुसऱ्या पक्षांनी टाकलेल्या चिरीमिरीवर भाळणारे नव्हते, हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे, असा अभिनव शोध त्यांनी लावून टाकला आहे.

भारिप किंवा अ‍ॅड. आंबेडकरांना सोडून जाणारी माणसे ही १०० नंबरी सोन्याची असतात, हा त्यांचा अट्टाहास दिसतो. परंतु इतर पक्षातील सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत ताई काय लिहितात ते पहा-  “दुसरे असे की, भाजप-सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते या पक्षातून त्या पक्षात ये-जा करत असतील, पण प्रत्येक पक्षाची म्हणून काही विचारधारा असते. त्या त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याने मतदारांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासार्हतेवर लोक पक्षाला निवडून देतात. नेता महत्त्वाचा आहे, त्याचे नेतृत्वगुण आणि त्याची दिशा महत्त्वाची आहे. कार्यकर्ते येत-जात राहिल्याने फरक पडत नाही.” म्हणजे काय? 

म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, मनसे वगैरे पक्षातील नेते वा कार्यकर्ते यांना वेगळी कसोटी आणि भारिप सोडणाऱ्यांना वेगळा न्याय! भारिपमधून गेलेले नेते चिरीमिरीवर भाळले नव्हते, हा तर जागतिक कीर्तीचा शोध ठरावा!

२००४-२००९ लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ ही घोषणा होती. २०१४ मध्ये ‘माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष’ ही घोषणा होती. अ‍ॅड. आंबेडकर आधी ‘जातीअंताची लढाई’ हाती घेतात आणि नंतर त्याच जुन्या जातीतील नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांच्या जाती उघड करणारी वंचित बहुजनांची आघाडी लढवतात. जणू जातीअंताच्या लढाईला अपयश आल्याचे मान्यच करतात, हा ताईंचा आरोप हास्यास्पद आहे.

वंचित समूहातील उमेदवारांची यादी जातींसह प्रकाशित झाली. त्यातील अनेक जातीसमूहाला देश स्वतंत्र झाल्यापासून उमेदवारी दिली गेली नाही. एवढेच काय तर महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप यांनी एकाही मतदारसंघात उमेदवारी दिली नाही, याचे भानदेखील ताई राखत नाहीत. कुणाला प्रतिनिधित्व नाकारले, कोणते समूह वंचित राहतात, हा त्यांचा अजेंडा नाही किंवा सामाजिक प्रतिनिधित्व, लोकशाहीतील समानता याच्याशी त्यांना काहीही सोयरसुतक नाही. त्यांना काळजी आहे ती महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील घराणेशाहीची. विशिष्ट जातीतील आणि घराण्यातील बायको, मुलगी, सून, नातू , पणतू निवडून आले की, जातीअंताचा लढा बळकट होतो, हा असा काहीसा त्यांचा समज असावा किंवा घराणेशाहीची सत्ता कायम राहावी हा त्यांच्या स्वारस्याचा विषय दिसतो! 

कार्यकर्ते सोडतात तितक्याच सहजपणे आंदोलनाचे मुद्देही अ‍ॅड. आंबेडकर सोडून देतात, असे या लोकसभा निवडणुकीच्या काळात उठून समोर आलेले आणखी एक वास्तव असल्याची गरळ ताईंनी ओकली आहे. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेवरून उभा महाराष्ट्र् ढवळून निघाला होता. मराठा जातींपासून तर मुसलमान समाजापर्यंत सर्वांनी भीमा-कोरेगावच्या सरकार-संघप्रणीत दंगलीचा निषेध केला होता. देशभरातल्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात अ‍ॅड. आंबेडकरांना आपला नेता मानले होते. पण लोकसभा निवडणुकांमध्ये भिडे-एकबोटे-पेशवाई हे मुद्दे कुठे दिसलेच नाहीत. जणू या सर्वांच्या विरुद्धची तलवार अ‍ॅड. आंबेडकरांनी म्यानच करून टाकली असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. हे करताना ज्या काँग्रेसचा त्या कैवार घेतात, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकांमध्ये भिडे-एकबोटे-पेशवाई हे मुद्दे घेऊन लोकसभा लढवली आहे का? की भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर अशोक चव्हाण आणि शरद पवार बाजू मांडत आहेत? हे मात्र त्या सांगत नाहीत. वंचित समूह स्वतः चा राजकीय पक्ष उभा करून लाखो मते कशी घेऊ शकतात, हे खरे दुखणे आहे. यामुळे कासावीस होऊन ताईंनी पातळी सोडली आहे. 

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

मुस्लीम मुल्ला-मौलवींनी काँग्रेसलाच मते द्या, असे फतवे काढले म्हणून वंबआ काही ठिकाणी निवडून येऊ शकली नाही, असे आता अ‍ॅड. आंबेडकर म्हणत आहेत. पण मुसलमानांना वेगळे पाडण्याच्या संघ-भाजपच्या राजकारणाला भारिपने जोरकस विरोध केला का? कधी काळी त्यांनी टाडा विरोधात, इशरत जहाँ बनावट चकमकी विरोधात, अफझल गुरूला फाशीची शिक्षा देण्याविरोधात भूमिका घेतली होती. ती तलवार २०१४ नंतर अगदीच म्यान झालेली दिसते, असाही एक जावईशोध लावून ताई मोकळ्या झाल्यात. त्यांना अ‍ॅड. आंबेडकरांनी बीफ बंदी विरोधात काढलेले भाकड जनावराचे मोर्चे आठवले नाहीत किंवा नजीब प्रकरणी किंवा मॉब लिंचिंग प्रकरणी पक्षाची आंदोलनेही आठवली नाहीत. कारण काय? स्मृतिभ्रंश की राजकीय मोतीबिंदू?

त्यांनी हा आरोप करण्याआधी वंबआचा जाहीरनामा वाचण्याची तसदीदेखील घेतली नाही. तिहेरी तलाक हा गुन्हा म्हणून रद्द करणे, मुस्लिमांवरील हिंसाचार विरोधात व सामाजिक आर्थिक सुरक्षितता व भेदाभेद विरोधी कायदा करणे, अल्पसंख्याकांना लोकसंख्येच्या प्रमाणात विकासासाठी प्राधान्य, हे विषय जाहीरनाम्यात आहेत. भारतीय संविधानाचा सरनामा हा वंचितचा लोकसभेचा जाहीरनामा होता, पण त्याला ताईंनी बगल दिली आहे. एवढेच नव्हे तर मुसलमानांना वेगळे पाडण्याच्या संघ-भाजपच्या राजकारणाला काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरकस विरोध केला का, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही.

नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली, त्यात एकही मुस्लीम नाही, हा ताईंचा आणखी एक नवा शोध! डॉ. अब्दुल रहमान अंजारिया हे त्याच यादीत महासचिव आहेत आणि नांदेडचे फारूक अहेमद हे प्रदेश प्रवक्ता आहेत, एवढी साधी माहिती न घेता ताईंनी लेखन केले आहे.

काँग्रेसचे नेते प्रदेश बैठकीत ‘राष्ट्रवादीही भाजपला मदत करते’, असा आरोप करतात. काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये कसे गेले यावर ताई काही चिंतन-मनन करत नाहीत. स्वतः अशोक चव्हाण यांनीच खुलासा केलाय की, ‘वंचित ही भाजपची ‘बी टीम’ आहे, हा आरोप राजकीय होता. त्याला गांभीर्याने घेतले जाऊ नये!” आता बोला ताई!

अशा ‘बायस’ लेखक\लेखिकांना महाराष्ट्राची विचारी आणि विवेकशील जनता भीक घालत नाही किंवा अशा लिखाणाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, एवढे मात्र खरे!

.............................................................................................................................................

लेखक राजेंद्र पातोडे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आहेत.

rajendrapatode@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......