हे वर्ष विध्वंसासाठी नव्हे, तर साध्या माणुसकीसाठी संस्मरणीय ठरावं!
पडघम - साहित्यिक
गिरीश कार्नाड
  • डावीकडे अहमदनगर साहित्य संमेलनात भाषण करताना गिरीश कार्नाड (१९ मे १९३८, माथेरान - १० जून २०१९, बेंगळुरू)
  • Wed , 19 June 2019
  • पडघम साहित्यिक गिरीश कार्नाड Girish Karnad साहित्य संमेलन बुद्धिवादी Intellectual

नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक आणि विचारवंत गिरीश कार्नाड यांचं १० जून २०१९ रोजी निधन झालं. जानेवारी १९९७ च्या पहिल्या आठवड्यात अहमदनगर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक होते गिरीश कार्नाड. त्यावेळी त्यांनी केलेले उदघाटनपर भाषण बरेच गाजले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यांचा तात्कालिक संदर्भ त्यांनी निवडलेल्या व्याख्यानविषयाला होता. पण त्यांच्या भाषणात त्यांनी राजकारणी व्यक्तीला लक्ष्य बनवून विवेचन केलेले नाही. कलावंत, साहित्यिक, विचारवंत आणि एकंदरीतच स्वत:चा समावेश ‘बुद्धिवादी’ (Intellectual) वर्गात करणाऱ्या व्यक्ती,या त्यांच्या लक्ष्य आहेत. त्यांचे ते भाषण १९९७मध्ये जितकं प्रासंगिक होतं, त्यापेक्षा जास्त ते २०१९मध्ये प्रासंगिक आहे. त्यामुळे त्याचं हे पुनर्मुद्रण…

.............................................................................................................................................

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन करण्यासाठी मला आज या ठिकाणी बोलावलं हा माझा विशेष सन्मान आहे असं मी मानतो. आज कन्नड साहित्यात अगणित उत्कृष्ट साहित्यिक असताना, कन्नड साहित्याचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली, हा मी माझा मोठा गौरव समजतो.

एक गोष्ट मात्र मी प्रांजळपणे सांगू इच्छितो. मराठी साहित्यिकांच्या या महनीय मेळाव्यापुढे उभा असताना, माझ्या मनात परकेपणाची जराही भावना नाही. मी महाराष्ट्रात जन्मलो. माझं प्राथमिक शालेय शिक्षण मराठीतून झालं. आणि माझ्या कुटुंबीयांचं मराठी वाङ्मयावर प्रेम असल्यामुळे ‘आनंद’, ‘शालापत्रक’, ह.ना. आपटे, वि. स. खांडेकर, ‘स्वराज्य’ आणि अर्थातच ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ आणि ‘सकाळ’ यांवर मी वाढलो, पोसलो.

माझ्या सुदैवाने नाटककार या नात्यानं आजच्या मराठी रंगभूमीवरच्या काही अत्यंत प्रतिभासंपन्न लोकांशी माझा जवळून संपर्क आला. मी तर असंही म्हणेन की, माझ्या आई-वडिलांमुळे मराठी नाट्यपरंपरा हा मला माझा व्यक्तिगत वारसा वाटत आला आहे. माझ्या वडिलांना मूळचं ‘शारदा’ आणि ‘संशयकल्लोळ’ पाहिलं होतं. या नाटकांविषयी ते फार जिव्हाळ्यानं बोलत. आपल्या पोरसवदा वयात आपण बालगंधर्वांचं अनुकरण म्हणून बोटांच्या टोकांभोवती पदर कसा गुंडाळत गाणी गात असू ते माझी आई कित्येकदा करून दाखवत असे. अर्थात मोठ्या माणसांची नजर चुकवून, हे सांगायला नकोच! कन्नड नाटक मंडळीचे प्रयोग मी पाहिले ते युद्धानंतरच्या काळात, जेव्हा ती मंडळं घसरणीला लागली त्यावेळचे… परंतु त्या वेळीदेखील त्यांच्यावर महान मराठी आदर्शांची छाप स्पष्ट दिसत होती. तिच्यामुळे मी प्रभावित झालो. मला प्रेरणा मिळाली.

कन्नड आणि मराठी अशा दोन अत्यंत समृद्ध संस्कृतींची मेहेरनजर असणं ही कोणाही लेखकाच्या दृष्टीनं मोठी भाग्याची गोष्ट असते याची साक्ष महान कन्नड कवी द.रा. बेंद्रे व विद्वान शं.बा. जोशी यांचं लिखाण देतं. दोघांची मातृभाषा मराठी; धारवाडला शेजारीशेजारी राहिले आणि खऱ्या शेजाऱ्यांप्रमाणे भांडलेदेखील. ते भांडत मात्र कन्नड भाषेत! इतिहास आपल्याला सांगतो की, भक्तिसंप्रदायाचा उगम तामिळनाडूमध्ये झाला, कर्नाटकात येऊन तो विकास पावला. लिंगायत शरणांचं महान वचन-वाङ्मय निर्माण झालं. तेथून तो महाराष्ट्राकडे वळला. ज्ञानेश्वर, नामदेवादी संतांच्या वाङ्मयाचा फुलोरा निर्माण करून, पुन्हा माघारी कर्नाटकाकडे वळला आणि पुरंदरदास, कनकदास या वैष्णव संतांना प्रेरणा देऊन उत्तरेकडे जाऊन फोफावला. धर्म, वाङ्मय, नाटक, कला यांमध्ये, किंबहुना एकूण विचारधारणेतच, या दोन भाषांमधलं आदानप्रदान इतकं व्यामिश्र स्वरूपाचं आहे की, त्याचं विश्लेषण करणं कठीण आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxsk9jgd

.............................................................................................................................................

भिन्नतेच्या दृष्टीनं विचार करायला लागलो तर एक गोष्ट लक्षात येते ती अशी की, महाकाव्याची परंपरा ही कन्नड साहित्याची शक्ती आहे, बलस्थान आहे. नवव्या शतकापासून कन्नडमध्ये महाकाव्यं रचली गेली आहेत व आजही लिहिली जात आहेत. या साहित्य प्रकारानं कन्नड भाषेस बळकटी आणि स्थैर्य मिळवून दिलं आहे. दुसऱ्या बाजूनं विचार केला तर, आधुनिक कन्नड माणसाला मराठीकडे आदारानं पाहावं लागतं अशी दोन क्षेत्रं आहेत. एक म्हणजे विनोद. आम्ही कन्नड माणसं हसतो, पण लिखाणात नव्हे. त्यामुळे रा.ग. गडकरी, आचार्य अत्रे, श्री. कृ. कोल्हटकर, चिं.वि. जोश्यांपासून थेट पु.ल. देशपांड्यांपर्यंत विनोदी लेखक तुम्हाला देणाऱ्या परंपरेचा आम्हाला हेवा वाटतो. पु.लं.नी तर रंगभूमी आणि विनोद या दोहोंवर अधिराज्य केलं, आणि या यशाला मोठ्या मनाची आणि उदार हृदयाची अजोड जोड दिली. माझा त्यांच्याशी व्यक्तिश: परिचय आहे, याचा मला किती अभिमान वाटतो, ते मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं.

दुसरं क्षेत्र म्हणजे निष्ठावंत सामाजिक व राजकीय विचारवंतांची परंपरा. आगरकर, फुले, टिळक, आंबेडकर, कर्वे या विचारवंतांनी प्रश्न उपस्थित करण्याची, चर्चेची, वादविवादाची, चिंतनाची आणि परीक्षणाची एक निर्भय परंपरा निर्माण केली. मार्क्स-फुले-आंबेडकरवादाची मांडणी करणारे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते माझे स्नेही धुळ्याचे श्री. शरद् पाटील यांची मला जी निर्भीड, परखड परंतु विचारांना चालना देणारी पत्रं येतात, ती वाचून माझी खात्री पटली आहे की, मराठीत आजही ही परंपरा जिवंत व जोमदार आहे. फक्त मराठी भाषकांविषयी न बोलता महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं तर कित्येक पारशी, गुजराती, मुसलमान आणि इतरही बुद्धिनिष्ठांचा या यादीत अंतर्भाव करावा लागेल याची मला कल्पना आहे. कारण महाराष्ट्रानं त्यांना जन्म तरी दिला किंवा आसरा तरी.

आधुनिक कर्नाटकात अशा बौद्धिक (Intellectual) परंपरेचा पूर्ण अभाव आहे. गेली काही शतकं कर्नाटकात राष्ट्रीय पातळीचे विचारवंत निर्माण झाले नाहीत. इतकं जवळचं नातं असणाऱ्या या दोन भाषा या बाबतीत इतक्या वेगळ्या असाव्यात, ही गोष्ट थक्क करणारी आहे. तिचा अधिक खोलात विचार केला पाहिजे.

या फरकाचं एक कारण असं की, विजयनगरच्या पाडावानंतर कर्नाटकाची शकलं झाली. कर्नाटकाचा ३०० वर्षांचा इतिहास डोळ्यांपुढे आणला, निरीक्षण केलं तर ‘समर्थ’ असा एकच एक राजकीय विचारवंत त्या इतिहासात मला आढळतो. त्याचं नाव ऐकून तुम्हाला जसं आश्चर्य वाटेल, तसंच आश्चर्य माझ्या कन्नड मित्रांना वाटणार आहे. ती व्यक्ती म्हणजे टिपू सुलतान! ब्रिटिशांच्या व्यापारी धडाडीचे धोके त्या काळात त्या एकट्यालाच जाणवले होते. ब्रिटिशांच्या खुशामतीच्या हसण्यामागचा सार्वभौमत्वाचा कावा त्यानं ओळखला. फक्त त्यानं ब्रिटिशांची ती धूर्तता मराठ्यांनाही उमगली नाही, निजामालाही उमगली नाही. पण त्या टिपू सुलतानलादेखील शिवाजी महाराजाप्रमाणे कर्नाटकाची एकजूट घडवून त्याला स्वत:ची अशी ओळख देता आली नाही. ब्रिटिशांच्या राजवटीत कर्नाटकाचे चार भाग झाले. प्रत्येक भागाची दिशा वेगळी ठरली. मैसूर संस्थानानं संगीत-नृत्य-चित्रकला यांना आश्रय दिला. पण संस्थान ब्रिटिशांच्या तालावर नाचत असल्यामुळे क्रांतिकारक विचारांना वाव दिला नाही. १९५६ साली आजच्या कर्नाटक राज्यात ज्या वेळी हे चार भाग पुन्हा एक झाले, त्या वेळी एक नवी वैचारिक ऊर्जा स्पष्ट दिसू लागली. परंतु नव्यानं तयार झालेल्या सीमेमुळे या दोन भाषांमधली निकोप देवाणघेवाण खचितच मंदावली.

मी या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो आहे. मला आग्रहानं म्हणावंसं वाटतं की, एखादी भाषा अलग असली तरीही ती कवी, लेखक, कलावंत निर्माण करू शकते. परंतु बुद्धिनिष्ठ परंपरा निर्माण व्हायची तर तिच्या विकासाला पोषक असं वातावरण असणं आवश्यक असतं. अलग स्थितीत, एकट्यानं विचार केला जात नाही. विचाराला चर्चा, वादंग, अगदी प्रेमसंबंधदेखील, यांचं खतपाणी लागतं. जिवंत संस्कृतीचा पोत वादसंवादाच्या, संभाषणाच्या धाग्यांनी विणला जातो, असे रशियातल्या एम.एम. बाख्तित या विचारवंतानं म्हटलं आहे ते खरं आहे. पारंपरिक भारतीय तत्त्वचर्चेत ‘पूर्वपक्ष’ आधी मांडला जात असे. चर्चकाला आपला स्वत:चा युक्तिवाद मांडण्यापूर्वी आपल्याला विरोधकाची भूमिका समजली आहे आणि त्याच्या युक्तिवादाचा आपण प्रतिवाद करू शकतो, हे सिद्ध करावं लागे.

१२व्या शतकात कर्नाटकात लिंगायत संतांनी, वचनकारांनी जी सामाजिक, साहित्यिक क्रांती केली, तिची पाळंमुळंसुद्धा त्यांच्या ‘अनुभावमंटपा’च्या सभेतच होती. ज्ञानी, संत अनंतप्रभू हे या अनुभावमंटपाचे अध्यक्ष होते. बसवण्णा, महादेविअक्का वगैरे… बहिरंग चर्चेत भाग घेत आणि फार कठोर अशी विमर्शा होई. या चर्चेतूनच त्यांनी आधुनिक कन्नड तत्त्वज्ञानाला (म्हणजे संस्कृत दर्शनपरंपरेपासून संपूर्ण वेगळ्या अशा चिंतनाला) मूर्त स्वरूप दिलं. नवं साहित्य निर्माण केलं.

अशी वैचारिक परंपरा निकोप साहित्यिक आणि कलात्मक कार्याशी सांधलेली असते. एखादी कृती किंवा साहित्य, आपल्या युगाच्या विचारधारांमध्ये रुचलेलं असलं तरच, ते भावी पिढ्यांना प्रस्तुत ठरतं. नाहीतर सर्वथा अप्रस्तुत ठरते.

विवेचनातील कित्येक शब्दांप्रमाणेच ‘बुद्धिवादी’ (Intellectual) हा शब्दही आपण पश्चिमेकडून घेतला आहे.

तेव्हा या शब्दाचा इतिहास समजून घेणं बोधप्रद ठरेल. १९व्या शतकाच्या अखेरीला द्रेफसच्या (Dreyfus) खटल्याच्या काळात फ्रान्समध्ये हा शब्द प्रथम योजला गेला. माफ करा, आपणा सर्वांना परिचित असलेल्या या गोष्टीची मी पुनरुक्ती करतो आहे. द्रेफस हा फ्रेंच लष्करातला एक ज्यू अधिकारी होता. अनेक शतकं युरोपात ज्यू ही एक ठळकपणे उमटून पडणारी अल्पसंख्याक जमात होती. बहुसंख्यांच्या संस्कृतीत सामावण्याला किंवा धर्मांतराला ते तयार नव्हते. आपली स्वतंत्र (अस्मिता) त्यांना जतन करायची होती. परिणाम असा झाला की, त्यांचा सारखा पिच्छा पुरवला जाई, त्यांना बंदिस्त वस्त्यांमध्ये – ‘घेट्टो’मध्ये – इतरांपासून वेगळं डांबलं जाई. शिक्षणातूनच नाही तर सामाजिक जीवनातून त्यांना वगळलं जाई. त्यांची कुचेष्टा आणि उपहास तर होतच असे, परंतु सुनियोजित जातीय दंगलीत त्यांना मारूनही टाकलं जाई. ज्यूविरोधाची एक सामाजिक प्रथाच होती.

त्यामुळे फ्रेंच लष्करात एक कुलंगडं (Scandal) दडपून टाकण्याची वेळ आली, तेव्हा त्याचा सगळा दोष द्रेफसच्या माथी मारून मोकळं होणं सर्वांनाच सोयीचं होतं. अल्पसंख्याकांमधला असल्यानं त्याला ‘राष्ट्रविरोधी’, ‘देशद्रोही’, ‘दगाबाज’ वगैरे ठरवणं सोपं होतं. लोकांचा या आरोपांवर सहज विश्वास बसला. गुप्तपणे चालवलेल्या एका खटल्यात द्रेफसला गुन्हेगार ठरवलं गेलं.

परंतु द्रेफसचा बचाव करण्यासाठी तरुण फ्रेंच लेखक, शिक्षक, पत्रकार यांचा एक संघ उभा ठाकला. त्यात नोबेल पारितोषिक विजेते अनातोल फ्रान्सही होते. त्या सर्वांचं प्रतिपादन असं होतं की, फ्रान्सचा हरएक नागरिक, मग तो जन्मानं किंवा धर्मानं कोणीही असो, कायद्यापुढे समान असला पाहिजे. ‘राष्ट्रीय सुरक्षा’, ‘देशप्रेम’, ‘धर्माभिमान’, ‘राष्ट्रीयता’ यांसारख्या वेधक, मोहक शब्दांपेक्षा कायदा व न्याय यांची विवेकाधिष्ठित अंमलबजावणी ही राष्ट्राच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाची आहे. धार्मिक व जातीय पूर्वग्रहांचा त्यांनी धिक्कार केला. कादंबरीकार एमिल झोलानं ‘मी आरोप ठेवतो’ (J’ Accuse) या आपल्या प्रसिद्ध पुस्तिकेत सरकार व सेनाधिकारी यांच्यावर जनतेची हेतुपरस्सर दिशाभूल केल्याचा आरोप ठेवला. हा संघ बुद्धिवादी लोक म्हणून ओळखला जाई. लक्षात घ्या, त्यात त्यांचं कौतुक किंवा प्रशंसा नव्हती, तर तुच्छता होती. या तरुणांच्या राष्ट्राभिमानाच्या अभावावर मारलेला तो एक निंदाव्यंजक शिक्का होता. सरकारनं झोलावर पकड वॉरंटही काढलं. परंतु इंग्लंडमध्ये पळून जाऊन त्यानं आपला बचाव केला.

मात्र या चळवळीचा परिणाम म्हणून द्रेफसचा खटला पुन्हा चालवला गेला. त्यात त्याची निर्दोष म्हणून मुक्तता झाली. आणि त्याला सन्मानानं पुन्हा लष्करात घेतलं गेलं. त्या काळापर्यंत ख्रिस्ती असलेलं फ्रान्स त्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनलं. सरकार आणि चर्च स्वतंत्र झाले. प्रशासन आणि धर्म वेगळे झाले.

या संक्षिप्त इतिहासावरून स्पष्ट दिसून येतं की, ‘बुद्धिवादी’ या शब्दाचं समता, धर्मनिरपेक्षता व वाकस्वातंत्र्य या संकल्पनांशी अतूट नातं आहे. कोणताही मनुष्य प्रथम एक मानव, एक व्यक्ती असतो; त्याची जात, जमात, धर्म किंवा वर्ग हे अगदी गौण असतात.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

आपल्या समाजात या निष्ठेला कोणतं स्थान आहे, हे कसून तपासून पाहिलं पाहिजे.

भारत ही एक लोकशाही आहे. आपली घटना जगातील उत्कृष्ट घटनांमध्ये गणली जाते. स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतर आपण खचितच अभिमानानं म्हणू शकतो की, आणीबाणीची दोन लाजीरवाणी वर्षं सोडता आपले शास्ते नेहमी लोकांचे प्रतिनिधी होते व आहेत. निदान तत्त्वत: तरी आपण प्रत्येक नागरिकाचं विचारस्वातंत्र्य, इतरांचं मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नांचा अधिकार आणि आपल्या पसंतीचं चांगलं जीवन जगण्याचा अधिकार मान्य करतो, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.

या परिस्थितीचं श्रेय काही अंशी, आपल्या सेनादलाकडेही जातं. लष्करी राजवट लोकशाहीतील सावळ्यागोंधळापेक्षा कितीतरी जास्त अनर्थकारी असते, हे पाकिस्तान व बांगला देश या आपल्या दोन शेजाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे.

राजकीय परिस्थितीविषयी तटस्थ दृष्टिकोन बाळगून आपल्या सेनादलानं भारतीय लोकशाही टिकवण्याच्या कार्यात हातभार लावला हे लक्षात घेता, नवलाची गोष्ट अशी की, आज भारतात कितीतरी संघटना, पक्ष आणि तत्त्वप्रणाली सामान्य नागरिकापुढे सैनिकाचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपलाही पेशा लष्करी असल्याप्रमाणे गणवेष घालून रस्त्यावरून कवायत करणारे नागरिक आम्हाला रोज दिसून येतात. ‘नागरिकात सैनिक बनलं पाहिजे. भाषा, धर्म, राज्य अशा कुठल्या ना कुठल्या ध्येयासाठी योद्धा बनलं पाहिजे’ या लढाऊ भूमिकेचं आपल्याला का बरं एवढं आकर्षण वाटतं?

सामान्यपणे याचं उत्तर असं दिलं जातं की, आपल्यामध्ये शिस्त बाणायला हवी आहे. आपल्या समाजालाच शिस्त लागली पाहिजे. आपण फार सुस्त आणि दिशाहीन झालो आहोत.

परंतु फक्त सैनिकालाच शिस्त असावी लागते असं नाही. शास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, कलावंत, दुकानदार, माळी या साऱ्यांनादेखील शिस्त हवीच की! मग सैनिकच एवढा कोण विशेष लागून गेला?

याचं उत्तर असं की, सैनिक विचार करत नाही. त्याने विचार करावा अशी अपेक्षाही नसते. शास्त्रज्ञ, गायक-वादक, शेतकरी यांना शिस्त असावी लागते. शिस्तीमुळे त्यांचा विचार अधिक सर्जनशील बनतो. सैनिक शिस्त पाळतो, तयार असतो, सज्ज असतो, तो फक्त दुसऱ्यांनी केलेले हुकूम पाळण्यासाठी; सैनिकासाठी दुसरं कोणीतरी विचार करतं.

ज्या युद्धपरिस्थितीसाठी व्यावसायिक सैनिक घडवला जातो, त्या परिस्थितीत कदाचित विचार न करणं हे आदर्श ठरते. रणभूमीवर प्रत्येक सैनिक जर स्वत: विचार करेल आणि स्वतंत्रपणे आपल्या निर्णयाप्रमाणे वागेल, तर तो स्वत:चं आणि आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांचंही जीवन धोक्यात घालेल. फार काय, संपूर्ण मोहीमच गोत्यात येऊ शकेल.

परंतु आपण खुल्या, लोकशाही समाजाविषयी बोलतो आहोत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकानं, मग तो पुरुष असो वा स्त्री, स्वत: विचार करायचा असतो. सर्वांना शिक्षण देणं हे लोकशाही प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे असं आपण म्हणतो ते यासाठीच. शिक्षणामुळे नागरिक तर्कशुद्धपणे, स्पष्टपणे आणि स्वतंत्रपणे विचार करायला शिकतो. प्रत्येकाला मताधिकार आहे. मात्र मत देण्यापूर्वी सर्व परिस्थितीबद्दल सारासार विचार केला पाहिजे. आपण सत्तेवरच्या पक्षाला खाली ओढून पंतप्रधानदेखील बदलू शकतो. समाजाचा विचारशील घटक म्हणूनच नागरिकाला अधिकार दिलेले असतात.

सैनिकाचा आदर्श ठेवण्यामुळे नागरिकाच्या या पायाभूत लोकशाही जबाबदारीवर घाला पडतो. माणूस गणवेष का घालतो? गणवेषधारी इतर सर्वांसारखं दिसावं म्हणून. कवायतीतील हालचालीसुद्धा अगदी इतरांसारख्याच करायच्या असतात. वेगळेपणा उठून दिसणारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व याला तुकडीत जागाच नसते. सैनिक एक स्वतंत्र व्यक्ती राहत नाही. तो एका यंत्रणेचा भाग बनतो. तो बोलत नाही. फक्त आज्ञा पाळतो.

भाषासुद्धा यांत्रिक होऊन जाते! एक बटन दाबा, पलटण थांबते; दुसरे दाबा, ती सलाम ठोकते, तिसरे दाबा, ती एका मेळीने कूच करू लागते.

आपली स्वत:ची भाषा अर्थपूर्णतेनं वापरण्याची जबाबदारी जणू कोणावर नाहीच. लोकशाही समाजात प्रत्येक माणसाला आपलं व्यक्तित्व जोपासण्याची, निर्णयक्षमता वाढवण्याची संधी मिळत असते. अशा वेळी काही माणसांना जर माणसं असण्यापेक्षा यंत्र असणं अधिक आवडत असेल तर नक्कीच कुठेतरी फार मोठा गोंधळ आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

सैनिकाप्रमाणे वागणाऱ्या नागरिकाचा मानसिकदृष्ट्या मोठा फायदा असा की, त्याला सर्व प्रकारच्या – विशेषत: सामाजिक – जबाबदाऱ्यांपासून सोडवणूक मिळते. अस्तित्ववादी तत्त्ववेत्ते आपल्याला वारंवार सांगत असतात की, मानव म्हणून आपला सर्वांत मोठा ठेवा म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य. माझी नीतीमूल्यं मीच ठरवतो. महान संतकवी बसवण्णा यांनी म्हटल्याप्रमाणे, “अंतरंगात निष्ठा नसेल तर बाह्य कृतीचं मोल ते काय?” मला कोणी माझ्या तोंडात मारायला सांगितलं तर मी, ‘हे का करावं?’ असा प्रश्न विचारेन. माझी खात्री पटवायला सांगेन. परंतु मी एक सैनिक असेन तर मला आज्ञा झाली की, मारझोड, जाळपोळ, गोळीबार, नासधूस करेन – माझा शेजारी निरपराध असल्याचं मला माहीत असलं तरीही! दुसरं महायुद्ध संपल्यावर अनेक नाझी असं म्हणाले की, ‘आम्ही ज्यूंचं शिरकाण केलं, कारण तसा आम्हाला हुकूम होता.’

फक्त आज्ञाच यांत्रिक कळीचं काम करतात असं नाही. सगळे मनोव्यापारसुद्धा यांत्रिकपणे घडवले जातात. ‘ते’ विरुद्ध ‘आम्ही’ असा तो प्रकार असतो. आपलं बरोबर आहे का हे विचारण्याचा प्रश्नच नाही. ‘आपण’ नेहमीच बरोबर असतो. ‘ते’ नेहमीच चुकत असतात. अर्थात ‘त्यांना’ शिक्षा देऊन आपले विचार मान्य करायला भाग पाडायचं असतं. हे ‘ते’ कोण? गंमत अशी की, ही ‘ते’ची जागा नेहमी रिकामी असते, तिथं कुणालाही बसवता येतं. ही सर्वनामं नेहमी बहुवचनी असतात. कारण बहुवचनानं सार्वजनिक हिंसा सोपी होऊन जाते.

एका देशाचं अर्थकारण जर युद्धसामग्रीच्या उत्पादनावर अवलंबून असेल तर ती सामग्री वापरली जावी यासाठी त्या देशाला युद्धं निर्माण करावी लागतात. त्याप्रमाणे मानवी सामग्रीदेखील वापरली जावी लागते. त्यासाठी आपल्या समाजातच संकटपरंपरा निर्माण कराव्या लागतात. हे सैनिक कधीच कोणा बाहेरच्या शत्रूशी लढणार नसतात. त्यामुळे आतला शत्रू शोधावा लागतो व समाजातले लहानसहान समुदाय आत्मसंरक्षण करून शकत नसल्यानं ते लक्ष्य बनतात.

हिंसा सहसा नष्ट होत नाही, हे आपल्याला माहीत आहे. ती वाढते, नवे मार्ग, नवे शत्रू शोधते. विचारशक्ती पूर्णपणे गुंडाळून ठेवणं हा कोणत्याही लष्करी तत्त्वज्ञानाचा पायाभूत सिद्धान्त असतो. त्यामुळे जे विचार करण्याचं धाडस दाखवतात ते अखेर शत्रू ठरतात. ‘ते’ वेगळे असतात आणि त्यांना शिस्त लावावी लागते.

एक जुलूमशाही दुसऱ्या जुलूमशाहीला तोंड देऊ शकते. पाशवी शक्तीशी मुकाबला करणंदेखील तिला साधतं. परंतु विचारशीलता किंवा सर्जकता यांच्याशी जुलूमशाही सामना देऊ शकत नाही. कारण विचार व सर्जकता यांच्यावर कोणाचीही हुकमत चालू शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या शत्रूंच्या संदर्भात ज्या हिंसेचं समर्थन होऊ शकत होतं, ती हिंसा अपरिहार्यपणे आपल्याच लोकांकडे वळते. जे कोणी वेगळं असण्याचा प्रयत्न करतात त्यांचा, म्हणजे सरतेशेवटी पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांचा नाश करू पाहते.

हिटलरच्या गुप्त पोलिसदलाचा प्रमुख, फील्ड मार्शल हरमान गोअरिंग यानं एकदा असं म्हटलं की, ‘ ‘संस्कृती’ हा शब्द कानांवर पडताक्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो.’ ‘ब्राऊनिंग’ या शब्दानं त्याला इंग्रज कवी रॉबर्ट ब्राऊनिंग सुचवायचा नव्हता, तर त्या नावाचं एक रिव्हॉल्वर त्याला अभिप्रेत होतं. गोअरिंगनं नेमकं ओळखलं होतं की, समृद्ध व ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलूमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करेल. हिटलर, स्टालिन, माओ - सगळी एकच कहाणी. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबाम्बपेक्षा आपल्याच समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रपासनं आपल्याला जास्त धोका संभवतो. तो आपला, जवळचा, म्हणूनच खरा, शत्रू असतो.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आहे –

जिथं मनाला भीती शिवत नाही आणि

मस्तक उन्नत आहे;

जिथं ज्ञान मुक्त आहे,

जिथं समाज दुभंगला नाही,

संकुचितपणाच्या घरगुती भिंतींनी;

जिथं शब्द बाहेर पडतात,

सत्याच्या खोल दरीतून उत्स्फूर्तपणे;

जिथं पूर्णत्व मिळवण्यासाठी अखंड

उद्यमशीलता आपले बाहू पसरत आहे;

जिथं रूढीचं वाळवंट, विचारांचा निर्मल ओघ

ग्रासून टाकत नाही;

जिथं होतात समृद्ध विचार

आणि आचार तुझ्या प्रेरणेनं….

अशा या स्वातंत्र्याच्या स्वर्लोकात-

हे तात, माझा देश जागृत होऊ दे.

ही कविता ब्रिटिश राजवटीत लिहिलेली आहे. इंग्रजांनी तिच्यावर आक्षेप घेतला नाही. तिच्याबद्दल पेच कधी निर्माण झाला ठाऊक आहे? आणीबाणीत. त्या वेळी वर्तमानपत्रांवर ती छापण्याची बंदी घातली गेली. आणीबाणीच्या या काळातच दिल्लीत सूचना व प्रसारण मंत्रालयामध्ये फिल्म दिग्दर्शकांची एक मीटिंग बोलावली गेली होती. त्यात सत्यजित रे, हृषिकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मी उपस्थित होतो. तेव्हा खात्यानं इशारा दिला होता की, भारतात दलित किंवा स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांची नोंदच नाही. कारण आपण एक सहिष्णू समाज आहोत. चित्रपट बनवणाऱ्यांनी अशा विषयांपासून दूर राहिलेलंच बरं.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

सैनिकाचं तत्त्वज्ञान आज्ञापालनाचं असतं, तर नेत्याचं सत्तेचं असतं. त्यामुळे लष्करी मानसिकता ज्या वेळी राजकारणात गुंतते, त्या वेळी आपल्याला समर्थनासाठी जनतेला जे पवित्र किंवा भावनिकदृष्ट्या मोलाचं वाटतं, त्याचा वापर करते. इतिहास, धर्म, भाषा, जे सापडेल ते!

अशा परिस्थितीत आपल्या संस्कृतीला कसला भविष्यकाळ आहे? प्राचीन ग्रीसने आपल्याला राजकीय व्यवस्थेचे दोन नमुने दिले आहेत; स्पार्टा आणि अथेन्स. स्पार्टामध्ये प्रत्येक नागरिक सैनिक बनण्यासाठी वाढवला जात असे. बालपणीच आपल्या कुटुंबापासून दूर नेलेल्या या मुलाचा योद्धा बनण्यासाठी राज्यशासन त्याला निर्दय तालीम देत असे. अथेन्समधील नागरिकही, देशाला धोका निर्माण झाल्यावर मोठ्या शौर्यानं लढत असत. परंतु शांततेच्या काळात ते एका खुल्या लोकशाहीत वावरत असत. प्रत्येकाला जबाबदारीचं सार्वजनिक पद सांभाळावं लागे. महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सार्वजनिक चर्चा होत असत.

आज आपण अथेन्सला तिथल्या गौरवशाली वास्तुकलेबद्दल, तत्त्ववेत्ते, इतिहासकार, नाटककार यांबद्दल थोर मानतो. स्पार्टा मात्र नाहीसंच झालं. त्यानं कोणतीही निशाणी मागे ठेवली नाही. सर्व लक्ष्य नष्ट केल्यावर सामाजिक जुलमाचा फेरा स्वत:कडेच वळतो. ड्रॅगनला स्वत:खेरीज कोणतंच भक्ष्य उरत नाही, त्यातली गत होते. मग ड्रॅगन स्वत:लाच खाऊन टाकतो!

चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी सांगितलेल्या एका बोधकथेनं मी माझं भाषण संपवतो. त्यांना ही कथा चार्ली चॅप्लीनच्या एका पुस्तकात मिळाली.

एका राजकीय कैद्याला मृत्युची सजा झाली होती. त्याच्या वधासाठी गोळीबारपथक तयारीत उभं होतं. (तुम्हाला माहीत असेल की, अशा पथकात निदान दहाजण असतात. त्यामुळे या कृत्याचं उत्तरदायित्व व्यक्तिश: आपल्यावर आहे, अशी अपराधी भावना कोणालाही वाटत नाही.) शिक्षेच्या तहकुबीची आशा होती. त्यामुळे पथकाचा मुख्य अधिकारी तहकुबीचा हुकूम घेऊन येणाऱ्या जासुदाची अधिरतेनं प्रतीक्षा करत होता, परंतु जासूद आला नाही.

नेमलेल्या वेळी अधिकाऱ्यानं आज्ञा केली – ‘तैय्यार’. आणि वंगण दिलेल्या यंत्राप्रमाणे पथकानं एकसाथ रायफली सज्ज केल्या.

अधिकाऱ्यानं पुढे फर्मावलं, ‘नेम धरा’, पुन्हा एकदा तितक्याच यांत्रिक सफाईनं सर्वांनी नेम धरला. अकस्मात क्षितिजावर एक स्वार दिसला. जिवाच्या करारानं तो आपल्या हातातला माफीचा हुकूम फडकावून दाखवत होता.

त्याला पाहताच आनंदानं हुरळलेला अधिकारी ओरडला – ‘थांबा’. आणि यांत्रिक सफाईनं पथकानं एकसाथ गोळ्या झाडल्या.

ही नुसती कथा नव्हे. आपण सजग राहिलो नाही, तर आपल्या समाजाचं भविष्यात काय होईल, याचं हे नेमकं चित्र आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन करण्याचा मान मला लाभला याचा मला फार आनंद वाटतो, हे मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो. आज ३ जानेवारी. आपण नवीन वर्षांत पर्दापण करत आहोत. मी आपणा सर्वांसाठी ही शुभेच्छा व्यक्त करतो की, हे वर्ष विध्वंसासाठी नव्हे, तर साध्या माणुसकीसाठी संस्मरणीय ठरावं!

अनुवाद – सरोज देशपांडे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 27 June 2019

मराठीचा गौरव केला आहे त्यामुळे लेख चांगला वाटतो आहे. पण कर्नाटकात बौद्धिक परंपरेचा अभाव आहे, हे धाडसी विधान आहे. माझ्या मते कर्नाडांना विद्रोही बौद्धिक परंपरेचा अभाव अभिप्रेत असावा. बाकी टिपूला बृहद कर्नाटक उभारण्यात अपयश आलं होतं हे कर्नाड यांनी खुलेपणे सांगितलं आहे. हा प्रांजळपणा कौतुकास्पद आहे. या अपयशाची खोलवर चिकित्सा करायला हवी. टिपूने हिंदूंवर केलेल्या अत्याचार व बाटवाबाटवीमुळे तो लोकमान्य नेता होऊ शकला नाही. याच्या अगदी उलट शिवाजी महाराज होते. महाराजांनी परधर्मीयांवर केवळ वेगळ्या धर्माचे असल्याच्या कारणाने कधीच अत्याचार केले नाहीत. असो. कर्नाड इंग्रजीसारखेच मराठीतही ठळकपणे व्यक्त व्हायला हवे होते. याचं कारण असं की त्यांचं विचारविश्व पाश्चात्य संदर्भांभोवती (ग्रीस, रोम, ज्यू, नाझी, वगैरे) घोटाळताना दिसतं. एतद्देशीय संदर्भातले ( म्हणजे शिवाजी, रण प्रताप, गुरु गोविंदसिंह, इत्यादिंचे संबंधी ) त्यांचे विचार परत तपासायला मजा आली असती. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा